सतराव्या शतकाच्या मध्यावर पश्चिम महाराष्ट्रात शिवछत्रपतींचं 'स्वराज्य' आकार घेत होतं आणि त्या दरम्यानच कर्नाटकातील एक बलाढ्य हिंदू साम्राज्य अस्ताला जात होतं. फक्त अस्ताला गेलं नाही, तर लुटलं आणि उध्वस्त केलं. कारण होतं दक्षिणेत एकवटलेल्या सुलतानी पातशाह्या.
आधी चौदाव्या शतकाच्या सुरुवातीला यादवांचे राज्य दिल्ली सुलतानांच्या ताब्यात गेले आणि दक्षिणेत मुस्लिम सत्तेचा अंमल सुरू झाला. अल्लाउद्दीन खिलजी, मोहम्मद बिन तुघलकच्या दक्षिणेकडील आक्रमणांनी 'होयसळ' राज्य लुटून नेले. सुलतानांनी पाठ फिरवल्यावर कर्नाटकातील 'कांपिली'त नवीन राज्य मूळ धरू लागले. 'कांपिली' ही होयसळांची राजधानी. प्राचीन 'आनेगुंदी' पासून २० किमी तर 'हम्पी' पासून पूर्वेला १५ किमीवर आहे. चौदाव्या शतकाच्या पूर्वार्धात इ. स. १३०३ च्या दरम्यान 'कांपिला' आणि त्याचे वडील 'मुम्माडी सिंग' हे देवगिरीचे यादव रामदेवाचे सरंजामदार होते आणि अनेकदा त्यांना होयसळ तिसरा बल्लाळ'च्या विरोधात मदत केली. दिल्लीच्या सुलतानाने देवगिरी काबीज केल्यावर कंपिला हा एक स्वतंत्र शासक बनला. सध्याचे अनंतपूर, चित्रदुर्ग, शिमोगा, रायचूर, धारवार आणि बेल्लारी जिल्ह्यांचा काही भाग समाविष्ट करून त्यांनी एक मोठे राज्य उभारले. त्याचा मुलगा 'रामनाथ' त्याच्या वीरशक्ती आणि पराक्रमासाठी प्रसिद्ध होता. महत्वाकांक्षी कांपिला हा होयसळ बल्लाळ तिसरा, प्रतापरुद्र, वरंगळचा काकतिया शासक आणि दिल्लीचा सुलतान यांच्याशी वारंवार युद्ध करत असे. मुहम्मद बिन तुघलकने बंडखोर 'बहाउद्दीन गरशास्प'ला आश्रय दिल्यामुळे कांपिला विरुद्ध अनेक मोहिमा चालवल्या. इ. स. १३२६ ला कांपिला आणि त्याचा मुलगा युद्धात पडले आणि हे राज्य दिल्ली साम्राज्याचा एक प्रांत बनले.
कांपिलाचे कोषागार 'हरिहर' आणि 'बुक्का' या दोन भावांना मुहम्मद बिन तुघलकने दिल्लीला कैद करून नेले. तिथे त्यांना इस्लाम स्वीकार करण्यास भाग पाडले. हे भाऊ मूळतः 'वरंगळ'च्या काकतीय 'प्रतापरुद्र'च्या सेवेत होते आणि इ.स. १३२३ मध्ये मुस्लिमांनी 'वरंगळ' जिंकल्यानंतर ते दक्षिणेकडे कंपिलीत पळून गेले. इ.स. १३२९ मध्ये मुहम्मद बिन तुघलक उत्तर भारतात परत गेल्यानंतर दक्षिणेत या राजवटीविरुद्ध अनेक बंड आणि मुक्ती चळवळी झाल्या. कांपिलीचा मुस्लिम राज्यपाल सुव्यवस्था राखू शकला नाही. त्याने दिल्लीला मदतीसाठी आवाहन केले. त्यानंतर सुलतानाने हरिहर आणि बुक्का यांना तुघलकांच्या वतीने दक्षिण प्रांत सांभाळण्यासाठी पाठवले. दोन्ही भावांनी दक्षिणेत केवळ सुव्यवस्थाच पुनर्स्थापित केली नाही तर अल्पावधीत इस्लामचाही त्याग केला. दिल्लीवरील निष्ठा सोडून त्यांनी स्वतंत्र राज्य स्थापन केले. ही एका पराक्रमी, बलाढ्य आणि भव्य मध्ययुगीन हिंदू साम्राज्याची सुरुवात होती. आणि ते होते विजयनगर साम्राज्य..!
शृंगेरी पिठाचे १२ वे जगतगुरु श्री स्वामी 'विद्यारण्य सरस्वती' यांचे हरिहर आणि बुक्का या दोघांना विजयनगरच्या स्थापनेसाठी राजकीय आणि नैतिक मार्गदर्शन मिळाले. इ. स. १३४६ ला पहिला स्वतंत्र राजा 'हरिहर'ने नगरात राजमहालाचे तसेच नगराभोवती तट उभारण्याचे काम हाती घेतले. नगरात शेतीसह पायाभूत सुविधा निर्माण केल्या. त्याला 'विजयनगर' नांव दिले आणि तुंगभद्रेच्या उत्तर तटावरील 'आनेगुंदी' किल्ला आणि शहर सोडून तो दक्षिण तटावरील विजयनगरातील 'हम्पी' या मध्यवर्ती शहरात राहावयास आला. बुक्काच्या मदतीने हरिहरने काही वर्षांतच पूर्व किनाऱ्यापासून पश्चिम किनाऱ्यापर्यंत आपले राज्य उभारले.
१३५६ ला 'बुक्काराय' सत्तेवर आला. पुढे बुक्कारायचा मुलगा 'कंप' हाही वडिलांप्रमाणेच शूर, कर्तबगार निघाला. त्याने १३७१ ला मदुराईच्या सुलतानाचा पराभव करून विजयनगरचे साम्राज्य थेट रामेश्वरम् पर्यंत तर उत्तरेला गोवा, पूर्वेला ओरिसापर्यंत पोहोचवले.
'संगमाची' पुढची वंशावळ 'देवराय पहिला' (१४०६ ते २२) सत्तेवर आला. विजयनगरची वाढती कीर्ती ऐकून 'निकोलो कोन्ती' हा 'रोम'चा व्यापारी आणि लेखक १४२० ला विजयनगरला भेट देऊन गेला. तो लिहितो, विजयनगरचा घेरा साठ मैल आहे. याची तटबंदी डोंगरांना भिडते. या नगरात ९० हजार लोक असावेत जे शस्त्र धारण करतात. भारतातील सर्वात शक्तिशाली असे विजयनगर आहे.
पुढे 'देवराय दुसरा' (१४२२ ते ४६) च्या कालखंडात विजयनगर अधिक प्रगत, समृद्ध आणि शक्तिशाली होत अगदी श्रीलंका(सिलोन), म्यानमार पर्यंत त्यांनी धडक मारली.
पार्शियन इस्लामिक विद्वान 'अब्दुल रजाक' हा दक्षिण भारतातील केरळच्या 'कुजीकोडी' भेटीदरम्यान 'दुसरा देवराय'च्या कार्यकाळात त्याने १४४० ला विजयनगरला भेट दिली. त्याच्यामते विजयनगर हे त्याकाळी जगातील सर्वात भव्य, शक्तिशाली आणि वैभवशाली शहर असून इथली उपजीविकेची शेती सुद्धा शत्रूपासून तटबंदीने संरक्षित केली आहे. नगराला सात तटबंद्या असून ११ लाख सैनिक याचे रक्षण करतात. नगराच्या केंद्रस्थानी १० पट मोठा बाजार असून महालाच्या जवळच चार मोठे प्रशस्त बाजार आहेत असं तो नमूद करतो.
पंढरपूरची श्री विठ्ठल मूर्तीचे इस्लामिक आक्रमकांपासून रक्षण करून, विजयनगरची कीर्ती वृद्धिंगत करण्यासाठी काही कालावधीसाठी विजयनगर मध्ये आणण्यात आली. त्यासाठी हम्पीत दुसऱ्या देवरायाने अतुलनीय 'विजय विठ्ठल' मंदिराची निर्मिती केली.
 |
विजय विठ्ठल मंदिर मुख्य गोपुर. विजयनगर साम्राज्य, हम्पी. (Hampi, Medieval history of Vijaynagar dynasty.) |
 |
'कल्याण मंडप' - Marriage Hall. विजय विठ्ठल मंदिर. विजयनगर साम्राज्य, हम्पी. (Hampi, Medieval history of Vijaynagar dynasty.) |
पुढे 'संगमा' घराण्याचा विरूपाक्ष (१४६५ ते ८५) याच्या डळमळत्या राजकीय परिस्थितीत परकीय घुसखोरी, राजकीय खून, हडपशाही वाढू लागली. त्यामुळे त्याची हत्या घडवून दुसरा 'सालुव' घराण्याचा 'नरसिंहराय' (१४८५ ते ९०) सत्तेवर आला. त्यानंतर 'तिम्माराय' (१४९० ते ९१) हा अल्प काळासाठी आणि पुढे 'इम्माडि नरसिंह' (१४९१ ते १५०५) असे 'सालुवां'नी थोडक्याच कालावधीसाठी विजयनगरचे साम्राज्य चालवले.
नंतर इम्माडि नरसिंहाची बंदी आणि पाडाव करून तिसऱ्या 'तुलूव' घराण्याचा 'वीर नरसिंह' (नरसनायक) सत्तेवर आला. थोड्याच दिवसात वीर नरसिंहाचे उत्तराधिकारी, त्याचे सावत्र भाऊ 'कृष्णदेवराय' यांच्या हाती शासन आले. 'तुलूवा'च्या तिसऱ्या पिढीचा 'कृष्णदेवराय' (१५०९ ते २९) हा विशेष पराक्रमी, कर्तबगार, हुशार, युद्धकुशल आणि शिक्षण कला गुणांना प्रोत्साहन देणारा विजयनगरचा महान राजा ठरला.
८ ऑगस्ट १५०९ या कृष्ण अष्टमीच्या दिवशी 'कृष्णदेवराय' यांचा राज्याभिषेक झाला. त्यांच्याबद्दल वर्णन करताना लिहिले आहे की, ते वीस वर्षाचे तरुण, उंच, सुंदर, युवक आहेत. तोंडावर कांजण्याचे व्रण असून त्यांचे रूप मनोहर आणि नितांत मदन सुंदर असे आहे. विदेशी पाहुण्यांचा ते आदरपूर्वक सत्कार करत असल्यामुळे ते सौजन्य मूर्ती म्हणून प्रसिद्ध आहेत. ते न्याय धुरंदर असून राज्यकारभारात चतुर आहेत. अंग मेहनती असल्यामुळे त्यांचे शरीर मजबूत आहे.
कृष्णदेवराय जेव्हा राजे होऊन गादीवर आले तेव्हा साम्राज्याची स्थिती फारशी चांगली नव्हती. त्यांनी पुढील एक वर्षात राज्याची स्थिती, पूर्वीच्या राजांच्या अशा आकांक्षा समजून घेतल्या. याच वेळी मोहम्मद शहा आणि युसुफ आदिलशा हे दोघे प्रचंड फौज घेऊन कृष्णदेवरायांना सहज हरवू या भ्रमात विजयनगरवर चालून आले. परंतु विजयनगरच्या सैन्याने त्यांना सीमेवरच रोखले. लढाईत शत्रू सैन्याची त्रेधा उडून ते पळून गेले. सुलतान घायाळ झाला. त्याची अपेक्षाभंग होऊन तो बिदरला परतला. युसुफ आदिलशह युद्धात मारला गेला. त्यामुळे विजापूरलाही वचक बसला.
इ. स. १५१३ मध्ये कृष्णदेवराय यांनी रामचूर व गुलबर्गा जिंकून घेतले. 'सुलतान मोहम्मद' बिदर येथे कैद होता. कृष्णदेवरायांनी त्याला कैदेतून सोडवून बहामणी सिंहासनावर बसविले. यामुळे शत्रू असलेल्या सुलतानाचा मित्र झाला व राज्याअंतर्गत कलह बंद झाला. पुंड, पाळेगार, सामंत आदी राजाविरुद्ध जी कारस्थाने करत, ती सर्व बंद झाली.
इ. स. १५१६ ला ओरिसा 'गजपती' राज्याचा राजा 'प्रतापरुद्रा'ला 'बेजवाडा' जवळील 'मेडुरू' येथे कृष्णदेवरायांनी युद्धात हरवले. उदयगिरी, कोदविडू, राजमहेंद्र हे अत्यंत बळकट किल्ले विजयनगर सेनेपुढे टिकू शकले नाहीत. या युद्धानंतर कृष्णा नदीच्या उत्तरेकडील जिंकलेली सर्व राज्ये राजा कृष्णदेवरायांनी पुन्हा प्रतापरुद्र यांना दिली. राजा प्रतापरुद्राने आपली कन्या 'जगन्नमोहिनी'चे (अन्नपूर्णादेवी) राजा कृष्णदेवरायशी लग्न करून देऊन त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवले.
या आधी 'तिरुमलादेवी' ही प्रथम तर 'चिन्नमादेवी' ही राजा कृष्णदेवरायची द्वितीय पत्नी होत.
चिन्नमादेवी ही शास्त्रीय नृत्यात विशेष पारंगत होती. विजय विठ्ठल मंदिरासमोर तिच्या नृत्य आराधनेसाठी दृष्ट लागावा असा भव्य, सुबक दगडी रंगमंडप निर्माण केला गेला.
 |
'रंग मंडप'. विजय विठ्ठल मंदिर. विजयनगर साम्राज्य, हम्पी. (Hampi, Medieval history of Vijaynagar dynasty.) |
ओरिसाच्या गजपतीचा 'उदयगिरी' किल्ला ताब्यात घेतल्यावर राजा कृष्णदेवरायाने तेथील बाळकृष्ण मूर्ती आपल्या विजयनगरात आणली. हम्पीच्या प्रवेशद्वारासमोर त्यांनी भव्य सुबक नक्षीचे 'कृष्ण मंदिर' उभारून त्या मूर्तीची मंदिरात स्थापना केली.
या 'कृष्ण मंदिर' देवालयाचा रंगमंडप सुंदर व भव्य आहे. मंडपाच्या स्तंभांवर कृष्णचरित्रातील सुबक शिल्पे कोरली आहेत. मंडपात प्रवेश करण्यासाठी अग्नेय आणि उत्तरेकडून पायऱ्या आहेत. मंदिराच्या पूर्वेकडे अन्नछत्र मंडपाचे अवशेष दिसतात.
 |
'कृष्ण मंदिर'. विजयनगर साम्राज्य, हम्पी. (Hampi, Medieval history of Vijaynagar dynasty) |
 |
'रंग मंडप'. कृष्ण मंदिर. विजयनगर साम्राज्य, हम्पी. (Hampi, Medieval history of Vijaynagar dynasty) |
 |
'कृष्ण मंदिर' मागील बाजूस दिसणारी जल व्यवस्था. विजयनगर साम्राज्य, हम्पी. (Hampi, Medieval history of Vijaynagar dynasty) |
दुसरा देवरायाच्या कार्यकाळात 'हजार राम मंदिर' बांधले. प्रथम हे मंदिर लहान स्वरूपात होते. पण नंतर राजा कृष्णदेवरायांनी दिग्विजयाच्या स्मरणार्थ इ.स. १५१३ मध्ये या मंदिराचा विस्तार करून त्यात कलात्मक भर घातली.
'बेलूर'च्या 'हळेबीडू' मंदिरात वापरलेला पांढरा दगड या मंदिराच्या शिल्प पटासाठी वापरला आहे. शिल्पांचे विषय प्रामुख्याने हिंदू देवता, योगी मुद्रा, दशावतार, वैष्णव देवता असे आहेत. एकूण ४७ शिल्पपट दिसतात. श्री रामांच्या जीवन चरित्रावर सर्व मिळून हजार सुबक प्रसंग या शिल्प पटांत कोरले आहेत. त्यामुळे या मंदिरास 'हजार राम मंदिर' हे नांव रूढ झाले. राजा कृष्णदेवराय वैष्णव धर्माभिमानी होते. त्यामुळे हनुमान, जांबुवंत, वेणू गोपाळ, यांच्या शिल्पमुर्त्या विशेष भावपूर्ण कोरल्या आहेत. राजघराण्यातील व्यक्तींच्या खास पूजेसाठी हे मंदिर बांधले असावे.
 |
'हजार राम मंदिर'. विजयनगर साम्राज्य, हम्पी. (Hampi, Medieval history of Vijaynagar dynasty) |
 |
'सभामंडपाचे पूर्व प्रवेशद्वार'. हजार राम मंदिर. विजयनगर साम्राज्य, हम्पी. (Hampi, Medieval history of Vijaynagar dynasty) |
 |
'सभामंडपाचे दक्षिण प्रवेशद्वार'. हजार राम मंदिर. विजयनगर साम्राज्य, हम्पी. (Hampi, Medieval history of Vijaynagar dynasty) |
हजार राम मंदिरासमोर एक खोल विहीर आहे याला 'यल्लमा आड' म्हणतात महानवमीच्या दिवशी येथे म्हशींचा आणि बकरींचा बळी दिला जात असे. मंदिराच्या सभामंडपातील स्तंभांवर विविध शिल्पे कोरलेली आढळतात. विशेष म्हणजे हा काळा दगड पॉलिश केलेला ग्रॅनाईट असावा.
 |
सभामंडपातील काळे ग्रॅनाईट स्तंभ. हजार राम मंदिर. विजयनगर साम्राज्य, हम्पी. (Hampi, Medieval history of Vijaynagar dynasty) |
राजा कृष्णदेवरायने पोर्तुगीजांबरोबरच पश्चिमात्य देशांशीही व्यापार आणि राजनैतिक संबंध बळकट केले. त्यांनी राजधानी हम्पीच्या (प्राचीन 'पंपापुर') पूर्व, उत्तर सीमा सुलतानी आक्रमकांपासून आणखी सुरक्षित केल्या. प्रत्येक लढाईत त्यांनी बहमनी सुलतानांचा निर्णायक पराभव करून त्यांना पळ काढायला लावला. प्रतिष्ठित रायचूर, दोआब प्रदेश जिंकला. तेलंगणा जिंकला. आणि उत्तरेकडे ओरिसा पर्यंत आपल्या मोहिमा चालवून त्यांनी विजयनगरची कीर्ती अत्युच्च शिखरावर नेऊन ठेवली.
एक कुशल विद्वान, कवी म्हणूनही त्यांनी अनेक संस्कृत आणि तेलगू साहित्यात लेखन केले. आपल्या तेलुगू कवितेच्या 'अमुक्तो-माल्यदा' संग्रहात त्यांनी आदर्श राजकीय प्रशासनाच्या तत्त्वांचे उत्तम चरित्र रेखाटन केले आहे.
प्रसिद्ध तेलुगू कवी 'अल्लासनी पेद्दन्ना' हे त्यांचे कवी होते, तर त्यांच्या दरबारात 'अष्ट-दिग्गज' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आठ कवींचा समावेश असल्याचे म्हटले जाते. तिरुपती मंदिरात राजा कृष्णदेवराय आणि त्याच्या दोन पत्नींचा एक उत्तम जीवन पोर्ट्रेट (तांब्यामध्ये) राजाने उभारला. राजेशाही व्यक्तिरेखांच्या समकालीन पोर्ट्रेट म्हणून तो आज मौल्यवान मानला जातो. या पोर्ट्रेटची प्रतिकृती 'कमलापूरम' येथील भारतीय पुरातत्व भागाच्या वस्तू संग्रहालयात ठेवली आहे.
 |
राजा कृष्णदेवरायांचे पोर्ट्रेट. कमलापूर ASI. हम्पी. |
 |
तिरुपती मंदिरातील राजा कृष्णदेवरायांचे मूळ पोर्ट्रेट. Photo courtesy by Google.
|
इ.स. १५२८ ला राजा कृष्णदेवरायाने हम्पीत उंच, भव्य आणि सुबक अशी श्रीलक्ष्मी नरसिंहाची मूर्ती बनविली. श्री नरसिंहाच्या बाजूलाच अखंड काळया पाषाणात कोरलेले जवळजवळ १२ फूट उंच 'बडवी' शिवलिंग आहे. या शिवलिंगाला असे नांव का रूढ झाले असावे हि माहिती मात्र मिळत नाही.
 |
'श्रीलक्ष्मी नरसिंह', हम्पी. (Hampi) |
 |
'बडवी' शिवलिंग. विजयनगर साम्राज्य, हम्पी.
|
सध्याचे 'होस्पेट' आणि त्याच्या परिसरात त्यांनी अनेक नवीन वसाहती वसविल्या. आणि त्यांची नावे त्यांची आई नागालादेवी (नागलापुरा), राणी (तिरुमालादेवियारा-पट्टणा) आणि मुलगा तिरुमला (तिरुमला महाराजापुरा) यांच्या सन्मानार्थ ठेवली. त्यांनी अनेक सिंचन प्रकल्प हाती घेतले. त्यांनी 'होस्पेट' जवळच एक मोठा जलाशय बांधला. आज तो 'तुंगभद्रा जलाशय' म्हणून ओळखला जातो.
दक्षिण भारतीय वास्तुकलेचा प्रसार करण्यासाठी त्यांनी असंख्य मंदिरांना उदारहस्ते भेटवस्तू दिल्या. राजधानी 'हम्पी' शहर त्यांनी भव्य सजवले. 'विरूपाक्ष' (पंपापती) मंदिराचा पूर्वेकडील दुसरा लहान गोपुर आणि रंगमंडपाचे बांधकाम करून घेतले. विजयनगर साम्राज्यात 'दसरा' हा सण मोठ्याने साजरा होत असे. महानवमीच्या दिवशी चौकटीला तराजू बांधून राजाची सुवर्ण, हिरे, मोती, धान्य तुला केली जाई. हे सर्व गोरगरीब जनतेत दान केले जाई. यासाठी 'राजांची तुला' या नावाने विठ्ठल मंदिराच्या दक्षिण बाजूस एक भव्य दगडी कमान प्रसिद्ध आहे. या कमानीच्या डाव्या खांबावर तळाला राजा कृष्णदेवराय आणि त्याच्या दोन पत्नींची लहान शिल्पे कोरली आहेत.
 |
'राजांची तुला'. विजयनगर साम्राज्य, हम्पी. ('King's Balance'. Hampi, Medieval history of Vijaynagar dynasty) |
 |
विजय विठ्ठल मंदिरासमोरील १ किमी अंतरावरील 'गज्जल मंडप' (उत्सव मंडप). विजयनगर साम्राज्य, हम्पी. (Hampi, Medieval history of Vijaynagar dynasty) |
 |
'कुडुरेगोंबे' मंदिर, 'व्याली' मंदिर. विजयनगर साम्राज्य, हम्पी. (Hampi, Medieval history of Vijaynagar dynasty) |
 |
विजय विठ्ठल मंदिरासमोरील १ किमी अंतरावरील 'पुष्करणी'. विजयनगर साम्राज्य, हम्पी. (Hampi, Medieval history of Vijaynagar dynasty) |
प्रसिद्ध जगप्रवासी 'मॅगेलन' आणि पोर्तुगीज इतिहासकार 'डोमिंगो पेस' आणि नुनिज यांचे चुलत भाऊ 'डुआर्टे बारबोसा' यांनी कृष्णदेवरायाच्या कारकिर्दीत १५२० ते २२ दरम्यान विजयनगरला भेट दिली. त्यांनी राजधानी हम्पी, त्यावेळचा दरबार, इमारती, इथले उत्सव इत्यादी गोष्टींवर भव्य, तेजस्वी आणि सचित्र वर्णन लिहिले आहे.
ओरिसाच्या पाडावानंतर येथील कोणार्कचा शिलारथ बघून राजा कृष्णदेवराय इतके प्रभावित झाले की, त्यांनी त्या रथाची प्रतिकृती आपल्या राज्याची राजधानी 'हम्पीत' निर्माण केली. भगवान विष्णूंचे वाहन 'गरुडा'स हा रथ अर्पण केला आहे. हा अद्वितीय 'शिल्परथ' श्री विठ्ठल मंदिरासमोरील प्रशस्त आवारात उभा दिसतो.
कित्येक वेळा कृष्णदेवराय स्वतः सैन्याचे नेतृत्व करत पुढे असत. सैन्य सदैव सुसज्ज ठेवणे, चांगली युद्धनीती यामुळे त्यांनी एका मागोमाग एक असे अनेक विजय प्राप्त केले. जखमी, घायाळ व मरण पावलेल्या सैनिकांच्या नातेवाईकांची ते जातीने जाऊन विचारपूस करत. युद्धात पराक्रम गाजवणाऱ्या सैनिकांना ते इनाम देत. या कारणामुळे सैन्य नेहमी कृष्णादेवरायांबरोबर एकनिष्ठ राही.
उचबेकिस्तानचा आक्रमक 'बाबर' हा राजा कृष्णदेवरायाच्या समकालीन एक चतुर सेनानी होऊन गेला. दिल्ली काबीज केल्यानंतर उत्तरेला तो आपले साम्राज्य मजबूतीच्या तयारीला लागला. विदेशी असल्यामुळे भारतीय महाद्वीपांचे राजकीय डावपेच समजण्यासाठी त्याला वेळ हवा होता. शक्तिशाली विजयनगरवर आक्रमण करण्याचे परिणाम तो जाणून होता. त्यामुळं कृष्णदेवरायाच्या काळात त्याने ते धाडस केले नाही.
केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, ओरिसा राज्यात पसरलेल्या विजयनगर साम्राज्याने राजा कृष्णदेवरायाच्या काळात एक सुवर्णपर्व अनुभवले.
इ.स. १५२९ मध्ये कृष्णदेवरायच्या मृत्यूनंतर त्यांचा सावत्र भाऊ 'अच्युतराय' (इ.स. १५२९ ते ४२) याला बाह्य शत्रूंसोबतच अंतर्गत कलह आणि सिंहासनासाठीच्या प्रतिस्पर्ध्यांशी संघर्ष करावा लागला. अच्युतराय देखील कला आणि साहित्याचा पुरस्कर्ता होता. त्यांचा दरबारी कवी 'राजनाथ दिंडीमा' यांनी त्यांच्या 'अच्युतारायभ्युदया' या काव्यात त्याचे चरित्र लिहिले आहे.
अच्युता'ने हम्पीत असामान्य असे 'अच्युतराय मंदिर' (तिरुवेंगलनाथ मंदिर) बांधले. या मंदिराच्या दरवाजांच्या चौकटीवरील स्तंभांवर दशावतारांची सुंदर शिल्पे कोरली आहेत. मंडपामध्ये हत्ती, घोडे, अरब व्यापारी तसेच विदेशी लोकांची शिल्पेही सुंदर व सहजरित्या कोरलेली दिसतात. रंगमंडपाचे छत सध्या भग्न आहे. द्वारपालांच्या मूर्तींनाही हानी पोहोचली आहे.
 |
'अच्युतराय मंदिर'. (तिरुवेंगलनाथ मंदिर). विजयनगर साम्राज्य, हम्पी. (Hampi, Medieval history of Vijaynagar dynasty) |
 |
'कल्याण मंडप'- Marriage Hall. अच्युतराय मंदिर. (तिरुवेंगलनाथ मंदिर). विजयनगर साम्राज्य, हम्पी. (Hampi, Medieval history of Vijaynagar dynasty) |
 |
अच्युतराय मंदिरातील रंग मंडपाचे उध्वस्त छत, मागे गाभार्याच्या दोन्ही बाजूला भग्न द्वारपाल. . विजयनगर साम्राज्य, हम्पी. (Hampi, Medieval history of Vijaynagar dynasty) |
 |
सभा मंडप. अच्युतराय मंदिर, हम्पी. |
 |
रंग मंडप. अच्युतराय मंदिर, हम्पी. |
 |
अच्युतराय मंदिरासमोरील 'पुष्करणी'. विजयनगर साम्राज्य, हम्पी. (Hampi, Medieval history of Vijaynagar dynasty) |
अच्युतरायाचा अधिकारी 'रामयामत्या'ने तिम्मलापुरम आणि आजूबाजूला बऱ्याच प्रमाणात मंदिरे तसेच तलाव बांधले. पुढे इ.स. १५४२ ला अच्युतरायच्या जागी त्यांचा नवजात मुलगा 'वेंकट पहिला' आला. पण त्याची लवकरच हत्या झाली. दरम्यान अच्युतरायाचा पुतण्या 'सदाशिवराय' (१५४२ ते ७६) सत्तेवर आला. आणि इथून पुढे मात्र विजयनगरसाठी अधोगतीचा काळ सुरू झाला. सत्ता जरी सदाशिवरायच्या हाती असली, तरी महत्त्वाचे सर्व निर्णय मात्र कृष्णदेवरायचा जावई 'आरविदु' घराण्याचा 'रामराया'च घेत असे.
रामरायाने दख्खनच्या सुलतानांच्या राजकीय कारभारात हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली. त्याने एका राज्याला दुसऱ्या राज्याविरुद्ध खेळवण्याचा प्रयत्न केला. परिणामी दक्षिणेत निजामशाही (अहमदनगर), बरिदशाही (बिदर), अली आदिलशाही (विजापूर), कुतुबशाही (गोवळकोंडा) आणि इमादशाही एकवटू लागल्या. रामरायानेही प्रचंड सैन्य जमवले. २२ जानेवारी १५६५ ला 'बंन्नीहट्टी' येथे झालेल्या 'तालिकोटा'च्या शेवटच्या निर्णायक संग्रामात एकवटलेल्या या पाच शाह्यांनी मात्र विजयनगरला निकराची शिकस्त दिली.
कृष्णा नदीच्या तीरावरील 'राक्षस' आणि 'तांगडी' गावाजवळ हा रणसंग्राम झाला. त्यामुळं 'राक्षस तांगडीचं युद्ध' म्हणूनही ते इतिहासात ओळखलं जातं. विजयनगरचे सैन्य सुरुवातीला यशस्वी होऊन युद्ध जवळजवळ जिंकलं होतं. पण विजयनगरच्या सैन्यातील दोन मुस्लिम सेनापतींनी दगाबाजी केली आणि परिस्थिती उलटली. अहमदनगरच्या सुलतानाने रामरायाला पकडले आणि ताबडतोब त्याचा शिरच्छेद केला. त्यावेळी योग्य नेतृत्वाच्या अभावी विजयनगर सैन्यात मोठा गोंधळ निर्माण झाला. जळजळ एक लाख हिंदूंची कत्तल झाली. विजेत्यांनी विनाशाची प्रक्रिया अगदी निर्दयी पद्धतीने पार पाडली. विजयनगर पूर्ण लुटण्यात आलं आणि लुटण्यासारखे काहीच शिल्लक न राहिल्यानं ते उध्वस्त केलं गेलं.
 |
विजयनगर साम्राज्य, हम्पी. (Hampi, Medieval history of Vijaynagar dynasty)
|
 |
'हम्पी' आणि 'प्राचीन आनेगुंदी' शहराला जोडणारा 'तुंगभद्रेवरील' विजयनगर साम्राज्यातील उध्वस्त 'पूल'. (Hampi, Medieval history of Vijaynagar dynasty) |
तालिकोटाच्या युद्धात अहमदनगरच्या सुलतानाकडून 'रामराया' मारला गेल्यानंतर विजयनगरची राजधानी हम्पीला स्वतःच्या नशिबावर सोडून रामरायाचा भाऊ 'तिरूमला' आणि 'सदाशिवराय' यांनी राज्याच्या खजिन्यासह आंध्र प्रदेशातील 'पेनुकोंडा' किल्ल्याचा आसरा घेतला. त्यांनी उरलं सुरलं विजयनगर सुलतानांच्या भरवशावर सोडून पुढे १५८५ ला आपली राजधानी 'चंद्रगिरीला' (आंध्र प्रदेश) हलवली. १६०४ ला तामिळनाडूतील 'वेल्लोर' ही त्यांची राजधानी होती. प्रत्येक स्थानांतरानुसार राजधानी बदलत गेली. पुढे विजयनगर अधूनमधून लुटारू आणि विजयी शत्रू सैनिकांच्या दयेवर अवलंबून राहिले. विजयनगर साम्राज्याची राजधानी 'हम्पी' नष्ट झाल्यानंतर पुढे शासक राजवंश चालू राहिला.
तिरुमला काही कालावधीनंतर परत आला आणि विजयनगरच्या पुनरुज्जीवनाचा प्रयत्न केला. पण 'हम्पी'ला पूर्वीचे वैभव परत मिळाले नाही. रामरायाच्या पिढीतील 'आरविदू' वंशाचा 'श्रीरंग तिसरा' (१७१७ ते ५९) हा विजयनगरचा शेवटचा शासक ठरला.
 |
'श्री पुरंदर स्वामी विष्णू मंदिर', हम्पी (Hampi, Medieval history of Vijaynagar dynasty) |
१६८९ पर्यंत विजयनगर कुतुबशाही आणि आदीलशाहीच्या अंकित होते. त्यापुढे विजयनगर मुघलांच्या ताब्यात गेले. १७०७ ला ते निजामाने मुघलांकडून जिंकून घेतले. तर पुढे हैदरअलीने निजामांकडून जिंकून घेतले. १७८० पर्यंत विजयनगर हैदर अलीकडेच राहिले. शेवटी १७९९ ला हैदर अलीचा मुलगा टिपू सुलतान कडून विजयनगर इंग्रजांनी जिंकून घेतले.
मध्ययुगीन काळातील विजयनगर शहर सध्या उद्ध्वस्त अवस्थेत आहे. समकालीन लेखकांनी गौरव केलेल्या विजयनगरच्या नागरी इमारती, भव्य बहुमजली सोनेरी रंगाच्या राजवाड्यांपैकी काही दगड आणि तळघरांशिवाय काहीच शिल्लक राहिले नाही. विटा आणि लाकडाच्या वरच्या रचना गायब झाल्या आहेत. उध्वस्त मंदिरांच्या रचना आणि प्रत्येक मंदिरासमोरील मध्ययुगीन काळातील प्रशस्त बहुमजली बाजारपेठांच्या इमारती कोसळल्या आहेत.
बहुतेक मंदिरांतील मुर्त्यां परकीय आक्रमणांत भग्न किंवा नष्ट केल्या आहेत. त्यामुळे असंख्य मंदिरांपैकी 'विरुपाक्ष' मंदिर, माल्यवंत रघुनाथ पर्वतावरील 'श्रीराम' आणि चक्रतीर्थावरील 'कोदंडराम' देवालय वगळता, इतर मंदिरांत देवतांची पूजा केली जात नाही. ज्या काही अर्धवट तुटलेल्या मुर्त्या, त्यावेळचे सुवर्ण चलन, शस्त्रे आणि इतर मौल्यवान वस्तू सापडल्या त्या पुरातत्व विभाग, 'कमलापूरम' येथील संग्रहालयात ठेवल्या आहेत. त्यांची किंमत आजच्या घडीला करता येणार नाही. या संग्रहालयास भेट दिल्याखेरीज विजयनगर आणि पर्यायाने हम्पी'ची भेट पूर्ण होऊ शकणार नाही.
 |
'भारतीय पुरातत्व विभाग', संग्रहालय.(ASI) कमलापूरम, हम्पी. |
 |
'उमा-महेश' सुवर्ण नाणे.(ASI) कमलापूरम, हम्पी. |
 |
'भारतीय पुरातत्व विभाग', संग्रहालय.(ASI) कमलापूरम, हम्पी. |
 |
'वराह राजमुद्रा' आणि 'ताम्रपट'(ASI) कमलापूरम, हम्पी. |
 |
'भारतीय पुरातत्व विभाग', संग्रहालय.(ASI) कमलापूरम, हम्पी. |
 |
विजयनगर शहराची प्रतिकृती. 'भारतीय पुरातत्व विभाग', संग्रहालय.(ASI) कमलापूरम. |
प्राचीन विरुपाक्ष मंदिर, मातंग आणि माल्यवंत टेकड्यांच्या पवित्र स्थळांचे 'हम्पी' गांव मात्र आजही तीर्थक्षेत्राचे केंद्र आहे. प्राचीन 'पम्पावती' नदी सध्या 'तुंगभद्रा' नावाने ओळखली जाते. रामायणात उल्लेख असलेले वानरराज वालीचे 'किष्किंधा' राज्य हे 'पम्पा' म्हणजेच 'तुंगभद्रा' नदीच्या उत्तर तटावर, हम्पीच्या पलीकडील तटावर होते. सातव्या शतकातील चालुक्य राजा विजयादित्य'च्या एका ताम्र पटामध्ये या जागेला 'पम्पा क्षेत्र' म्हटले आहे. विजयनगर जिल्ह्याच्या (होस्पेट) शासकीय कागदपत्रांतही या स्थळाचा आनेगुंदी, वीरुपाक्षपूर, होसपट्टण, होस, हम्पी, पट्टण हस्तिनावती, कंजर, विद्यानगर असे उल्लेख आले आहेत.
निसर्गाने विजयनगरच्या भूभागाला नैसर्गिक ताकद आणि सामरिक महत्त्व दिले. विजयनगरच्या शासकांनी याचा पुरेपूर वापर केला. बारामाही वाहणारी, न ओलांडता येणारी खोल तुंगभद्रा, महाकाय पांढरे ग्रॅनाईट दगड आणि उंच टेकड्यांना भव्य तटबंदीने जोडून त्यांनी अभेद्य, विशाल बंदिस्त प्रदेश तयार केला. बाह्य तटबंदीच्या रेषेसह त्यावेळी विजयनगर २६ चौरस किमी पेक्षा जास्त क्षेत्रफळाचे होते. त्याचे उत्तरेकडील आउट पोस्ट तुंगभद्रेच्या उत्तर तटावरील 'आनेगुंदी' तर पूर्वेकडील आउट पोस्ट १५ किमी वरील 'कांपिली' होते. सर्वात दक्षिणेकडील तटबंदीची रेषा 'होस्पेट' शहराच्या नैऋत्येस सुमारे तीन किमी अंतरावर आहे. अस्तित्वात असलेल्या उंच तटबंदीतील कोरीव प्रवेशद्वारे इतकी भव्य दिसतात की त्यातून हत्तीही सहजपणे जाऊ शकेल अशी आहेत.
 |
'अन्नछत्र मंडप', हजार राम मंदिर. हम्पी. (Hampi) |
जगभरातील पर्यटक, इतिहास संशोधक आणि वास्तुकलेच्या अभ्यासकांना या बलाढ्य, समृद्ध आणि प्रगत विजयनगरचे उद्ध्वस्त अवशेष आजही खुणावतात. त्याबरोबरच भारतवर्षातून अनेक हिंदू भाविक 'हम्पी'तील 'विरूपाक्ष' मंदिराला भावभक्तीने भेट देताना दिसतात.
 |
प्राचीन 'विरुपाक्ष (पंपापती) मंदिर प्राकार'. विजयनगर साम्राज्य, हम्पी. ( Ancient 'Virupaksh Temple'. Hampi, Medieval history of Vijaynagar dynasty) |
 |
प्राचीन 'विरुपाक्ष (पंपापती) मंदिर'. त्यासमोरील उध्वस्त बाजार इमारत. विजयनगर साम्राज्य, हम्पी. ( Ancient 'Virupaksh Temple'. Hampi, Medieval history of Vijaynagar dynasty) |
 |
विजयनगर साम्राज्याची 'वराह राजमुद्रा'. विजयनगर. हम्पी. |
जेव्हा 'हिराणाक्ष' नावाच्या राक्षसाने पृथ्वीला समुद्रात पळवून नेले, तेव्हा महाविष्णूंनी 'वराह' अवतार धारण करून धरतीला पुन्हा वर आणून तिची रक्षा केली होती. ही मनोकामना विजयनगर संस्थापकांनी मनात ठेवली. त्यांनी 'वराह' मूर्तीला आपली 'राजमुद्रा' बनवून तिची कीर्ती जगभर पसरविली.
 |
'श्री महाविष्णू'. विजयनगर साम्राज्य, हम्पी. (Hampi, Medieval history of Vijaynagar dynasty) |
विजयनगर आणि हम्पीच्या भटकंतीदरम्यान बरेच वाचन, जुने संदर्भ शोधणे आणि उपलब्ध माहितीची शहानिशा असे करावे लागले. मध्ययुगीन काळातील या साम्राज्याबद्दलचा इतिहास मर्यादित लेखात नक्कीच मावणारा नाही. सत्तेतील उत्पत्तीची गूढता, त्यात वेढलेली अस्पष्टता, बऱ्याच दंतकथा, वृत्तांत यामुळे विजयनगर साम्राज्याबद्दल आजही अनेक सिद्धांत मांडले जातात. पण विजयनगरच्या सर्व राज्यकर्त्यांनी ज्ञान, भाषा, साहित्य, कला, प्रगती यांना प्रोत्साहन दिले. राष्ट्रहित, निस्वार्थ व विशाल दृष्टिकोन मनात ठेवून संस्कृती आणि नीतिमत्तेचे रक्षण केले हे नाकारता येणार नाही.
कर्नाटकाच्या वीर पुत्रांनीं निर्माण केलेले असे हे विजयनगर साम्राज्य जवळजवळ साडेतीनशे वर्ष हिंदू संस्कृती आणि राष्ट्रवादाचा एक आधारस्तंभ म्हणून जगभर काम करत होते यात मात्र तिळभरही शंका उरत नाही..
|| श्री कृष्णार्पणमस्तु ||
संदर्भ :- 1) Annual report of the Archaeological Survey of India, 1907-08, 1908-09 and 1911-12
2) Sources of Vijaynagara History (Madras 1919) - Krishnaswamy Ayyangar
3) The Delhi Sultanate Bombay (1960) - R. C. Mujumdar, A. D. Pusalkar, A. K. Mujumdar
विजयनगरचे राज्यकर्ते :--
संगमा वंश - १३३६ ते १४८५
सालुव वंश - १४८५ ते १५०५
तुलुव वंश - १५०५ ते १५७०
आरविदू वंश - १५७० ते १६६५
येथे - जयवंत जाधव