आदल्या रात्री आम्ही'इर्शाळगड'ची तयारी केली आणि ऑक्टोम्बर परतीच्या पावसानं रात्रभर जोर धरला. त्यामुळं थांबायचं ठरलं. ट्रेक स्थगित झाला. सकाळी सगळे आरामात उठलो. पाऊस थांबला होता. इतकी तयारी केलीय, बेत ठरलाच होता तर पावसामुळं इर्शाळगड नाही पण बाहेर पडून दुसरा करू असा मुलीनं हट्ट धरला.
आमचं आटपेपर्यंत पत्नीनं खायचं बनवलं. सकाळचे नऊ वाजले होते. उशीर तर झालाच होता. निघालो आणि आमच्या राहत्या पनवेल जवळचाच 'भिवगड' ठरवून 'गौरकामत' गावात पोहचलो. इथे साडेदहा झाले. इथपर्यंत आलोच तर पुढचा थोडा परीक्षा घेणारा का नको, म्हणून सौभाग्यवती पत्नीनं ऐनवेळी 'कोथळीगड' आम्हा तिघांच्या गळी उतरवला.
पुन्हा पुढे २५ किमीचा प्रवास करत भरदुपारी बारा वाजता आंबेवाडी गाठली. त्यापुढे कोथळीगड पायथ्याचं आदिवासी 'पेठ' गांव चार किमीवर आहे. आधी पुढे पायथ्याच्या पेठ पर्यंत गाडी जाईल असं वाटलं, पण डोंगरातील चढणीचा निमुळता रस्ता बऱ्याच ठिकाणी पावसानं वाहून गेला तर कुठे घळीत खचला होता. गाडीसाठी तसा धोकादायक होता.
 |
| प्रवेशदारावरील 'शरभ' आणि बाजूला 'गणेश' शिल्प |
निर्णय बदलला, पुन्हा परतलो आणि गाडी आंबेवाडी सोडून झुडुपात कोणाच्या नजरेस सहसा येणार नाही अशी पार्क केली. पुढे सहयादीच्या कर्जत डोंगररांगेतील ३१०० फूट उंचीवर असलेल्या 'कोथळा'गड आणि त्याआधी चार किमी वरील गडपायथ्याचं 'पेठ' असा आम्ही मोहरा वळवला.

 |
| समोर दिसणारा 'कोथळीगड' |
 |
आंबेवाडी ते पेठ
|
नुकताच पावसाळा सरून परतीच्या बेभरवशाच्या सरींचे दिवस होते. त्यात ऑक्टोबरची गर्मी आणि डोक्यावर कडक उन्हातून मिळेल तिथे सावली घेत, दमछाक करत डोंगर चढुन 'पेठ' गाठलं. पेठ हे कर्जत तालुक्यातील किल्ले 'कोथळी' गडपायथ्याचं छोटं आदिवासी गांववस्ती म्हणता येईल. आंबेवाडी ते पेठ पर्यंत चालत तास दीडतास लागतोच. आम्ही पोहोचलो त्यावेळी गावात भात कापणी चालू होती. गावाबाहेर एका बंद घराच्या पडवीत कापून ठेवलेलं भात बाजूला करून आम्ही आमचं खाणं आटोपलं आणि अर्ध्या तासातच दुसऱ्या अवघड टप्प्याला सुरवात केली.
 |
| 'पेठ' गावातून दिसणारा कोथळीगड किल्ला |
गावाबाहेरच किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर 'किल्ले पेठ कोथळीगड'चा बोर्ड दिसतो. गांव सोडतात पुढे एका दगडावरून दुसऱ्यावर उंच पाय टाकत जाणारी वाट दमछाक करते. एक दाम्पत्य आम्हाला पेठ गावात पोचण्याआधीच अर्धवट वाटेतून परत येताना वाटेवर भेटलं.
पुढचे टप्पे चढताना मात्र शारीरिक कस लागतो. वाटेवर चाफ्याची झाडं थोडा गारवा देतात पण होणाऱ्या दमछाकीनं पाणी खूप लागत होतं. वर तिरकस तर कधी सरळ चढणारी वाट सावध, सांभाळून चढावी लागली. गडमाथ्याजवळ कारवीची उंच झुडपं आहेत ती गडपठाराचा अंदाज लागू देत नाहीत. पायथ्याच्या पेठ गावातून गडावर पोचण्यास तासभर लागतो.
 |
किल्ले 'कोथळीगड'
|
संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत मोगलांनी या छोटेखानी किल्ल्यास जिंकण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण किल्ल्याच्या नैसर्गिक कतळकड्याच्या तटबंदीनं दाद दिली नाही. पुढे मोगलांना फितूर झालेल्या मानकोजी पांढरे सरदाराच्या मदतीनं,फितुरीनं गडाची दारं उघडली आणि झालेल्या हातघाईत मराठ्यांना गड गमवावा लागला. त्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी मराठ्यांनी त्याच भीषण कातळकड्यांना दोरांच्या शिड्या लावून आत घुसण्याचा प्रयत्न केला.बंदूक आणि बाणांचा वापर झाला. खूप रक्तपात झाला,पण यश आले नाही.
 |
| प्रवेशदारातून गडमाथ्यावर येणारी वाट |
पुढे दुसऱ्या बाजीरावांच्या कारकिर्दीत हा गड मराठ्यांकडे आला. सुमारे एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत या गडावर वहिवाट होती. त्यानंतर ती गडपायथ्याला 'पेठ'गावात वसली.
गडपठारावर पोहचताच किल्ल्याचा एकमेव बुरुज भगवा फडकावीत स्वागत करतो. पुढे पायऱ्यांचे आणि प्रवेशदाराचे अवशेष दिसतात. त्यापुढे गडाच्या कातळात कोरलेल्या गुहा आहेत. वर बुरुजावर कातळात एक प्रशस्त मोठी गुहा आहे. परंतू ती वस्ती करण्यायोग्य नाही.
कातळ बुरुजाच्या सुरवातीला पहिली देवीची गुहा आहे. त्यापुढे दगडात कोरलेल्या पाण्याच्या टाक्या आहेत. बाजूला भैरोबाची गुहा दिसते.
भैरोबाची गुहा मोठी प्रशस्त असून आत छताला आधार देणारे सुबक कोरीव दगडी खांब आहेत.
 |
भैरोबाची गुहा
|
 |
भैरोबाची गुहा, खांबावरील कोरीव नक्षीकाम
|
दसऱ्यात घटस्थापनेच्या दिवसात 'पेठ' चे रहिवाशी गडावरील इथल्या देवीचं नऊ दिवस जागरण करतात आणि रात्री गडावरील गुहेतच वस्ती करतात. नवरात्रीत आमचं तिथं जाणं निव्वळ योगायोग होता.
 |
लक्ष्मी देवीची गुहा
|
बाजूलाच दुसऱ्या गुहेतून गडमाथ्यावर जाण्यासाठी कातळाच्या आतून पायऱ्या कोरल्या आहेत.काही जुने तोफेचे गोळे आहेत.सुरवातीच्या पायऱ्या तुटल्यामुळं काळजी घ्यावी लागते. उभ्या चढाच्या उंच पायऱ्या कातळच्या पोटातून वळसे घेत गडमाथ्याच्या प्रवेश दाराजवळ पोहचतात. या उभ्या चढच्या पायऱ्या मात्र दम काढतात.
 |
किल्ल्याच्या कातळात कोरलेल्या पायऱ्या.
|

बालेकिल्ल्याच्या दाराजवळ पोहोचण्याआधी एक छोटा आणि धोकादायक टप्पा पार करावा लागतो. गडमाथ्याच्या प्रवेशदाराची कमान दगडात कोरलेली आहे. चौकटीच्या बाजूला कातळावर 'शरभ' कोरलेलं असून बाजूला 'गणेश' मूर्ती कोरली आहे. सध्या गणेशमूर्ती भग्नावस्थेत दिसते.
 |
बालेकिल्लाचे प्रवेशद्वार
|
प्रवेशदार लाकडी असून त्यावर टोकदार लांब खिळे आहेत. ते नजीकच्या काळात केल्याचा अंदाज येतो. पुढे पायऱ्या चढून गडमाथ्यावर जाता येतं. गडमाथा लहान असून सध्या त्यावर पावसाळ्या नंतर उगवलेलं रान आणि झुडपं माजली आहेत.
गडमाथ्यापर्यंतची वाट काही टप्प्यात काळजीपूर्वक चढावी लागून दमछाक करणारी तर काही ठिकाणी धोकादायकही आहे.
 |
मराठ्यांच शस्त्रागार इथं होतं
|
गडमाथ्यावरून माणिकगड, इर्शाळगड, प्रबळगड आणि माथेरानचे डोंगर असे विहिंगम दृश्य दिसतं. धुक्यामुळं चंदेरी आणि त्या पलीकडील मलंगगड मात्र धूसर दिसतात.
या उंचीवरून समोरचा अफाट परिसर आणि निसर्ग बघून मन तृप्त होतं. आणि इथं पोचण्यासाठी केलेली पायपीट, दगदग विसरून जातो.
परतीच्या वेळी गडावर असतानाच अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. भिजत भिजतच आम्ही खाली पेठ गावात पोहोचलो. मुळात सुरुवातीलाच आम्हाला गड चढायला उशीर झाला. त्यात संध्याकाळी मावळतीला जोरदार पाऊस आणि अंधारून आलं. मोठी अडचण निर्माण झाली. आम्ही आज पेठ गावातच राहण्याची चौकशी केली. तसा एक टपरीवाला टेंट टाकून देण्यास तयार झाला, पण आमचे बदलीचे कपडे मात्र आंबेवाडीत गाडीत राहील्यानं ओल्या कपड्यात रात्र काढणं जीवावर आलं. काहीही करून आंबेवाडी गाठणं गरजेचं होतं. अंधारामुळे हाताशी वेळही कमी होता. त्यामुळं मनाचा हिय्या करुन मुसळधार पावसात भिजत,दगड धोंडयातुन ठेचकाळत निघालो. मुसळधार पावसामुळे टॉर्चचाही वापर करता येत नव्हता. हा आमच्यासाठी अनपेक्षित आणि भन्नाट अनुभव होता. दिवसभर दमून पुढे अंधारातून दगड चिखलातली आंबेवाडीपर्यंत निर्जन दाट जंगलातली केलेली चार किमीची पायपीट मात्र आमच्या कायमची लक्षात राहिली..
|| श्री कृष्णार्पणमस्तू ||
येथे - जयवंत जाधव