Thursday 28 October 2021

ऑफबीट - किल्ले सांकशी ( Offbeat - Sankshi Fort )

                  'सांकशी'च्या भेटीनंतर लिहायचे तर, "किल्ले सांकशी" पेण तालुक्यापासून दहा किमीवर अलीकडे आणि आमच्या राहत्या 'पनवेल' पासून ४० किमीवर आहे. उंची साधारण ८५० फूट, सह्याद्रीच्या मूळ रांगेत आणि चढाईच्या बाबतीत कठीण श्रेणीत मोडणारा हा किल्ला.

Wकिल्ले सांकशी (Sankshi Fort)
            'पनवेल'हून निघताना 'गोवा' हायवे धरून 'किल्ले कर्नाळा' ओलांडल्यावर साधारण १५ किमी वरील 'तरनखोप'ला डावं वळण घ्यावं लागतं. तिथून ८-९ किमी असलेलं 'मुंगोशी' मार्गे 'बळीवली' गांव गाठायचं. रस्ता बेताचाच असल्यानं वाहन काळजीपूर्वक चालवावं लागतं. चढाची वळणं घेताना 'मुंगोशी' गावातूनच समोर किल्ल्याचा अजश्र आडवा डोंगर दिसतो. या डोंगराला वळसा मारून 'प्रधानवाडी'तून रस्ता 'बळीवली'त येतो.
मुंगोशीतून दिसणारा किल्ले सांकशी 

           'बळीवली' गांव सोडून डोंगर पायथ्याला 'बद्रूद्दीन दर्गा' आहे. दर्ग्यासमोर पार्किंगसाठी प्रशस्त जागा आहे. "दर्ग्याचा किल्ला" म्हणूनही 'सांकशी'ला ओळखले जाते. किल्ल्याला सध्या प्रवेशदार किंवा बुरूज, तटबंदी अस्तित्वात नाही. कधीकाळी ती असल्यास काळाच्या ओघात नष्टही झाली असावी. पण किल्ल्यावर बऱ्याच प्रमाणात कातळात खोदलेल्या पाण्याच्या टाक्या दिसतात. बहुतेक टाक्या पावसानंतरच्या गाळानं आणि गवतानं भरलेल्या दिसतात. त्यामुळं प्रत्येक टाकिपर्यंत जाणं शक्य होत नाही.

गाडीवाट 

                आम्ही साधारण साडे आठ वाजता तिथं पोहोचून,दर्ग्यात किल्ल्यावर जाण्याच्या वाटेची चौकशी केली. पण हे सांगण्यास कोणी उत्सुक दिसलं नाही. तिथं सकाळी झाडलोट करणाऱ्या एकानं मात्र 'ती समोर दिसणारी गाडीवाट धरून जा' असं सांगितलं. पण ही वाट किल्ल्याकडे न जाता, डोंगराला पुढे समांतर जाणारी दिसली. साधारण पंधरा मिनिटांनी शंका आल्यावर पुन्हा दर्ग्यात येवून विनंती केली. तेव्हा त्यापैकी एकानं 'उधर शिवाजीका लिखा बोर्ड मिलेगा, वहासे जाव' इतकंच सांगितलं. वाढलेल्या झुडूपांच्या आड आम्ही 'सह्याद्री प्रतिष्ठान'चा बोर्ड शोधून काढला आणि मार्गी लागलो.

   
किल्ले सांकशी पायवाट 

            या दर्ग्यासमोर एक मस्जिदीची वास्तु दिसते. पुरातन आणि वास्तूवर वाढलेल्या पावसाळी गवतामुळं त्या वास्तूचा शांत रानात वेगळाच परिणाम जाणवतो. याला 'दिन मस्जिद' म्हणतात. सकाळच्या उन्हात, दवबिंदुनं चमकणाऱ्या  गवतात तिचं वेगळेपण उठून दिसतं. सुघड चौथऱ्यावर, पांढरा रंग उडालेली आणि कुलुपबंद असलेली ही किल्ल्याच्या डोंगर पायथ्याची वास्तु, सुंदर इस्लामिक स्थापत्यशास्त्राचा नमूना म्हणून पाहायला मिळते. नंतर चौकशी करता त्याचे दरवाजे वर्षातून एकदाच ठराविक दिवशी उघडण्यात येतात अशी प्रधानवाडीत माहिती मिळाली. या वास्तूच्या बरोबर समोर गवतातून उजव्या बाजूनं डोंगराकडं गेल्यास, आडाला हा 'सह्याद्री प्रतिष्ठान'चा बोर्ड दिसतो. 

पुरातन मस्जिद वास्तु (Sankshi Fort)  

            या बोर्डाजवळून एक पायवाट दाट झाडीतून किल्ल्यावर जाते. किल्ल्यावर फारसे कोणी फिरकत नसावेत असं वाटेवर वाढलेल्या गवतावरून दिसत होतं. तीव्र चढाची नागमोडी वळणं घेत दगडधोंडयातून पायवाट साधारण अर्ध्या तासात डोंगराच्या काळ्या कातळाजवळ येवून पोहोचते. इथं वाटेवरूनच समोर कातळ कड्याच्या उंच उतारावर अवघड जागी मोठी आयताकृती कोरलेली पाण्याची टाकी दिसते. आणि ही पायवाट तिथं संपते.

कातळवरील टाकी 

चढाईस मदत करणारा मावळा 

sankshi Fort

                 समोर अजश्र कातळ आणि उजवीकडं दरी दिसते. पुढील चढाई मात्र हा खडा कातळ (Rock Pach ) चढून करावी लागते. पावसामुळं खडकावर शेवाळ वाढलेलं दिसतं. खडकावरून ओघळणाऱ्या पाण्यामुळं ही पुढची पंधरा वीस फुटांची चढाई थरारक आणि धोकादायक आहे. आम्ही पोहोचलो त्यावेळी वरुन खाली दोर सोडलेला दिसला. उभ्या कातळावर अगदी मोजक्या ठिकाणी लक्षात न येतील अशा  खोबण्या ठेवल्या आहेत की नीट पायही ठेवता येत नाही. या खोबण्या आणि कातळतील फटींचा आधार घेत, शांत आणि संयमानं इथली चढाई करावी लागते. हा रॉक् पॅच चढताना दरीच्या बाजूनं वर जातो आणि वर शेवटी कोरलेल्या चार पाच पायरीपर्यंत येवून संपतो. 

                 साधारण पंधरा वीस फुटांचा हा टप्पा चढताना शेवाळांमुळं अवघड आहेच पण उतरतानाही खाली दरीत नजर जाताच पाय लटपटायला लावणारा आहे. या थरारक आणि धोकादायक चढाईमुळं या किल्ल्याच्या नादी कोणी फारसं लागत नसावेत. 


                 आम्ही तिथं पोहोचलो त्यावेळी 'सह्याद्री प्रतिष्ठान' च्या सात-आठ मावळ्यांचं किल्ल्यावर गवत सफाईचं काम चालू होतं. आमची चाहूल लागताच त्यांनी वरुन दोर हलवून प्रतिसाद दिला आणि मदतीसाठी चार पायऱ्या उतरून सामोरे आले. पण वर बांधलेल्या दोराची ओढ दरीकडे असल्यानं तो टाळून आम्ही एक एक करून तो कातळटप्पा सर केला. वर आल्यावर त्यांचे आभार मानले. 

सह्याद्री प्रतिष्ठान चे श्री प्रविण पाटील आणि इतर श्रमदान करताना 

                 चढून तर वर आलोय पण उतरतानाचा धोका आणि धास्ती आम्हाला होतीच. इतर ग्रुप बरोबर एक एकटयानं ट्रेकला जावून पत्करलेला धोका आणि आम्ही एकाच कुटुंबानं एकत्र, अपरिचित आणि डोंगरतल्या एकाकी ठिकाणी जावून पत्करलेला धोका अशा वेळी लक्षात येतोच. याआधी कोथळीगड,  इर्शाळ, धोदानीच्या बाजूनं केलेला विकटगड आणि आता सांकशीलाही  तो लक्षात आला. असो.. 

डावीकडील गाळानं भरलेली टाकी (Sankshi Fort)

                 हा अवघड टप्पा पार करून वर आल्यास लहान सपाटी दिसते. इथं डाव्या बाजूला जमिनीवर कातळात  एक पाण्याची टाकी कोरलेली आहे. टाकी गाळानं भरलेली दिसते. तर उजवीकडं समोरच्या कातळ पायथ्याला खोदलेली दुसरी प्रशस्त आणि खोल कोरलेली टाकी दिसते. त्यात स्वच्छ पाणी आहे. ही टाकी इतकी प्रशस्त आहे की, वरील कातळाला आधार देण्यासाठी टाकीत दगडी खांब ठेवलेले दिसतात. टाकीच्या वर चौकटीच्या ठिकाणी कोरीव काम लक्ष वेधून घेतं. या टाकीच्या बाजुनं पुढे कातळच्या पायथ्यानं अशाच कोरलेल्या पाण्याच्या टाक्या दिसतात. पण पावसानंतरच्या वाढलेल्या गवत झुडुपांमुळं आम्हाला तिथं पोहोचता आलं नाही. 

                 या टाकीच्या बाजूलाच कातळात केशरी रंगानं सुशोभित केलेलं चौरसाकृती  मंदिर दिसतं. याला 'वज्राई' किंवा 'जगमातेचं' मंदिर म्हणतात. ज्या 'शांक' राजानं हा किल्ला बांधला, त्याची ही 'जगमाता' मुलगी. कर्नाळयाच्या लढाईत तो मारला गेल्यावर या मुलीनं किल्ल्याच्या कड्यावरून उडी मारून जीव दिला, अशी दंतकथा सांगितली जाते.

दुसऱ्या टप्प्याची शिडी आणि बाजूला जगमाता मंदिर 

 
जगमाता मंदिर (Sankshi Fort)


              नवरात्रीत या मंदिराच्या उंबऱ्यावर रोज नवीन फुलांचा हार घालून दिवाबत्ती आजही केली जाते. दसऱ्यानंतर लगेच तिथं आमचं जाणं झाल्यामुळं आजही तो हार ताजा वाटत होता. 
             हे मावळे पावसाळा संपल्यानंतर प्रत्येक रविवारी पहाटे इथं येवून जमेल तितकं गवत आणि झुडुपं तोडतात. किल्ल्याच्या पायवाटेवर पुन्हा गवत उगवू नये म्हणून रसायन फवारणी करतात. श्री प्रवीण पाटील या ग्रुपचं सारथ्य करत होते. त्यांनी किल्ल्याबद्दल आम्हाला बरीच माहिती दिली. त्यानीच तो दोर खाली  सोडून ठेवला होता.

            'सह्याद्री प्रतिष्ठान'नं स्थानिक मावळे सभासदांना पावसानंतर एक एक गड किल्ला साफ करण्याची जबाबदारी दिली होती. आणि हे मावळे ती प्रामाणिकपणे पार पाडताना दिसत होते. उन्हं आणि उष्णता वाढल्यानं त्यांचं काम थांबवून परत उतरायची तयारी चालली होती. त्यांना पुन्हा पुढील रविवारी पहाटे इथं येवून पुढे काम चालू ठेवायचं होतं. आम्ही एकमेकांचे मोबाईल नंबर घेवून, आभार मानले आणि त्यांनी आमचा निरोप घेतला.  
दुसऱ्या टप्प्याची शिडी आणि प्रतिष्ठान चे मावळे 

               जगमातेचं मंदिर बघून, आणखी एक अवघड कातळ टप्पा चढून वर यावं लागतं. या टप्प्याला लावलेली शिडी चढून वर आल्यास वाट छोट्या खिंडीतून पुढे येते आणि डावी उजवीकडे अशी किल्ल्याच्या डोंगरमाथ्यावर जाते. आधी या कातळ टप्प्याला शिडी लावली नव्हती, त्यामुळं हा टप्पाही थरारक होता. पण या टप्प्याखाली दरी नसल्यानं जीवावरचा धोका नव्हता.  तशी या टप्प्याला मुळी शिडीची आवश्यकता नव्हती, मागील वर्षीच ती तिथं लावली गेली. या दोन कातळटप्प्यामुळंच किल्ल्याची चढाई कठीण श्रेणीत येत होती. अजूनही पहिल्या टप्प्यामुळं पावसाळ्यात ती धोकादायक आहे. त्यामुळं पावसात आणि त्यानंतर लगेच हा ट्रेक टाळावा. 

           

कातळतील कोरलेली चौकट 

               या खिंडीपुढे समोर कातळात कोरलेली चौकट दिसते. हे अर्धवट राहिलेलं काम असावं किंवा पहारेकऱ्यांना विसावा घेण्याची जागा असावी. या जागेत एका वेळेस तीन चार जण बसु शकतील किंवा एकजण आरामात झोपू शकेल इतकी जागा आहे. ऊन पावसापासून या जागेत बचाव होवू शकतो अशी ही जागा आहे. त्यापुढेच  जमिनीवरील कातळात दोन पाण्याच्या टाक्या दिसतात.
पाण्याच्या दोन टाक्या (Sankshi Fort)

     उजवीकडील पायवाटेनं एक लहानसा चढ चढून वाट किल्ल्याच्या सर्वोच्च माथा असलेल्या बालेकिल्ल्यावर येते. बालेकिल्ल्यावर भगवा फडकत असून उजवीकडं उद्ध्वस्त वाड्याचे अवशेष दिसतात. स्थानिक लोक याला 'राजदरबार' म्हणतात. राजदरबाराचे अवशेष कमरेइतक्या वाढलेल्या गवतात शोधावे लागतात. 
(Sankshi Fort)

बालेकिल्ल्यावरील भगवा 

सांकशीवरून दिसणारा माणिकगड 

         


                या बालेकिल्ल्यावरून उत्तरेला 'कर्नाळा' तर ईशान्येला 'माणिकगड' दिसतो. मागे 'माणिकगड' ट्रेक केला त्यावेळी हा 'सांकशी' आम्ही तिथून पाहिल्याच आज आठवलं. तसा 'माणिकगड'च्या ब्लॉगमध्ये उल्लेखही केला आहे. बालेकिल्ल्यावरून पश्चिमेला डोंगर उतारावर कोरलेली मोठी पाण्याची टाकी दिसते. वाढलेल्या गवतामुळं उतार जमिनीचा अंदाज येत नाही, त्यामुळं या टाकीपर्यंत उतरताना प्रत्येक पाऊल सावध टाकावं लागतं. या टाकीतील पाणी पिण्यायोग्य स्वच्छ दिसतं. 
पश्चिमेकडील टाकी 

               बालेकिल्ल्यापासून मागे, वर आलेल्या खिंडीपासून डावीकडे वळल्यास कातळात खोदलेल्या एकत्र पाच टाक्या दिसतात. त्यापैकी एका टाकीत पाणी भरलेलं आहे तर बाकी चार कोरड्या दिसतात. कदाचित या चार टाकींना खाली कातळात नैसर्गिक गळती असावी. भटकंती दरम्यान बऱ्याच किल्ल्यांवर जशी टाक्यांची निर्मिती दिसली, तशी इथल्या पाचही टाक्यांमध्ये खोदतानाच मध्ये कातळभिंती ठेवून निर्माण केलेल्या दिसतात. पाणिगळती झाल्यास किमान बाजूंच्या टाकीतील पाणी टिकून राहावे हा उद्देश असावा. आणि तो इथं साध्य झाल्याचं दिसतं. या टाकीत पाणी जमा होण्यासाठी कातळातच एकमेकांना आणि टाकींना जोडणारे चर दिसतात. तर या चरांमध्येच खोल खळगे ठेवलेले दिसतात. पाण्यावाटे वाहून आलेला गाळ या खोल खळग्यात साठून फक्त स्वच्छ पाणी या चरातून टाकीत जमा होईल अशी व्यवस्था केलेली दिसते. 

गडमाथ्यावर कातळात खोदलेल्या पाण्याच्या पाच टाक्या 

किल्ले सांकशी 

          या पाच टाक्यांपासून बालेकिल्ल्याच्या दिशेने दिसणाऱ्या पश्चिमेकडील दरीत पाहिल्यास, उभ्या कड्यावर आणखी एक पाण्याची टाकी दिसते. त्या अवघड ठिकाणी ती कोणत्या उद्देशानं व कशी निर्माण केली, हे एक कोडं आहे. कदाचित परकीय हल्ल्यात किल्ल्यावरील पाणी विष टाकून दूषित केल्यास तो राखीव पाणीसाठा अशा अवघड जागी सुरक्षित रहवा, किंवा उन्हाळ्याच्या सरत्या दिवसात निर्माण होणारी पाण्याची गरज भागवण्यासाठी त्यामागील उद्देशही असावा. कदाचित त्यावेळी त्या टाकीपर्यंत जाण्याची वाट अस्तित्वात असेलही, आणि कालानुरूप ती ढासळलीही असावी. पण सध्या त्या टाकीपर्यंत कड्यावरून उतरण्यासाठी गिर्यारोहण तंत्राची कला अवगत असणे आवश्यक आहे. 

                   सध्या किल्ल्यावर पावसानंतरची सफाई पूर्ण झालेली नसल्यामुळं गडमाथ्यावर सर्वत्र कमरेइतकं गवत वाढलं आहे. त्यामुळं चालताना प्रत्येक पाऊल सावध टाकावं लागतं. 

पश्चिम कड्यावरची टाकी 

गडमाथा (Sankshi Fort)

                      बालेकिल्ल्यावरून किल्ल्याचा डोंगर एकूण इंग्रजी 'L' आकाराचा दिसतो. पण या पाच टाक्यांच्या पुढे डोंगराला प्रचंड मोठी नैसर्गिक दरी असल्यानं पुढं जाता येत नाही. त्यामुळं गडमाथा आटोपशीर राहीला आहे. किल्ल्याच्या या दक्षिण आणि पश्चिम बाजूला अशा उभ्या ताशीव कड्यांमुळं नैसर्गिक संरक्षण मिळालं आहे. 
दोन डोंगरांमधील नैसर्गिक दरी 

कातळ कडा (Sankshi Fort)

'L' आकारात दिसणारा किल्ल्याचा डोंगरमाथा (Sankshi Fort)

               हा किल्ला आधी गुजरातच्या सुलतानाच्या ताब्यात होता. अहमदनगरच्या निजामाने तो जिंकून घेतला. पुढे पोर्तुगीजांची मदत घेवून,सुलतानाने तो परत ताब्यात घेतला. सुलतान किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात देऊन परत गुजरातला निघून गेला. दरम्यान निजामाने पुन्हा हल्ले सुरू ठेवले. सततच्या हल्ल्यांना कंटाळून शेवटी पोर्तुगीजांनी हा 'सांकशी' आणि 'कर्नाळा' किल्ला निजामाकडून विकत घेतला. १६४४ ला छत्रपतींनी कल्याण, रायरी सोबत 'किल्ले सांकशी' स्वराज्यात आणला.  

                गडपायथ्याला असलेल्या 'बद्रूद्दीन दर्ग्या'बद्दल तर फार चमत्कारिक माहिती मिळते. ज्यांच्या नावानं हा दर्गा बांधला ते 'हजरत सय्यद बद्रूद्दिन हुसेनी' हे इस्लामिक राजवटीतील 'चीशती' घराण्यातील होते. 'सांकशी' दरम्यान झालेल्या लढाईत ते मारले गेले. घोड्यावर स्वार असलेल्या बद्रूद्दिन हुसेनींचं मुंडकं 'सांकशी' च्या पायथ्याला पडलं. उरलेलं धड शत्रूसैन्याशी लढत सध्याच्या 'किल्ले परांडा' इथं कोसळलं. जिथं किल्ले 'सांकशी'च्या पायथ्याला त्यांचं मुंडकं पडलं, तिथंच हा सध्याचा दर्गा बांधला गेला. तर जिथं त्यांचं धड घोड्यावरून खाली कोसळलं तिथं परांड्यालाही असाच एक दर्गा उभारला गेला. 

बद्रूद्दिन दर्गा (Sankshi Fort)
मागील वर्षीच आम्ही मराठवाड्याच्या भटकंतीत 'किल्ले परांड्या'ला भेट दिली होती. 'किल्ले सांकशी' ते 'किल्ले परांडा' हे साधारण ३३५ किलोमीटर इतकं दूर अंतर आहे. त्या काळची ही चमत्कारिक घटना जर खरोखर घडली असेल, तर ते त्या खुदालाच माहीत. पण 'किल्ले परांड्या'लाही आज याच नावानं आणि याच घटनेच्या आधारे तिथंही दर्गा आहे..   

                               || श्री कृष्णार्पणमस्तू ||
येथे - जयवंत जाधव  

ऑफबीट - खरोसा लेणी, निलंगा, जि. लातूर Offbeat - Ancient Kharosa caves, Dist. Latur, Maharashtra.

                        महाराष्ट्रात वैशिष्ट्यपूर्ण अशी बरीच लेणी आहेत. काहींची प्रसिद्धी तर जगभर पोहोचली आहे. त्यांची कोरीव कलाकुसर आजही थक...