Monday 19 February 2024

ऑफबीट - खरोसा लेणी, निलंगा, जि. लातूर Offbeat - Ancient Kharosa caves, Dist. Latur, Maharashtra.

                        महाराष्ट्रात वैशिष्ट्यपूर्ण अशी बरीच लेणी आहेत. काहींची प्रसिद्धी तर जगभर पोहोचली आहे. त्यांची कोरीव कलाकुसर आजही थक्क करते. इ.स. पूर्व दुसऱ्या शतकापासून त्यांच्या निर्मितीचा काळ समजतो. त्या काळात रोम, इजिप्त यासारख्या पाश्चिमात्य देशांशी कोकण किनारपट्टीवरील बंदरांतून व्यापार वाढीस लागला. सहयाद्री घाटाखालील किनारपट्टीची ही बंदरं आणि घाटावरून दक्षिणेकडील व्यापारी बाजारपेठा छोट्या छोट्या वाटेनं जोडली होती. मौर्य, सातवाहन काळात राजकीय, आर्थिक स्थैर्य आल्यानंतर तो भरभराटीचा काळ या प्राचीन व्यापारी मार्गांवर लेणी खोदण्यास पूरक मानला जातो. वेगवेगळ्या कालावधीत हिंदू, बौध्द आणि जैन लेण्यांची निर्मिती झाली. काही वेगवेगळी तर काही लेणी एकत्रित खोदलेल्या दिसतात. व्यापाऱ्यांना वाटेवर विसावा घेण्यासाठी या लेण्यांचा उपयोग होत असे. तर बौद्ध भिक्खू धर्म प्रचारासाठी भारतभर फिरत. त्यांच्या दिनचर्येतील नियम पाळण्यास, त्याचप्रमाणे त्यांची ध्यान साधना, उपासना सुसह्य व्हावी या उद्देशानेही तात्कालीन राजांनी लेणी कोरून घेतल्याचे दिसते. 

प्राचीन 'खरोसा लेणी', खरोसा, ता. निलंगा, जि. लातूर, महाराष्ट्र. (Ancient Kharosa Caves, Dist. Latur, Maharashtra)

                       त्यापैकी काहींची आज पडझड झालेली दिसते. त्यांची डागडुजी करणं आजच्या घडीला अशक्य दिसते. लातूरच्या 'निलंगा' तालुक्यातील 'खरोसा' लेणी ही त्यापैकी एक. ई.स. ५०० ते ७०० दरम्यान खोदलेल्या एकूण १२ लेण्यांचा हा 'एकाश्म' (Monolith) समूह 'खरोसा' गावाबाहेर टेकडीच्या दक्षिणेला दिसतो. त्यावेळी 'बदामी'चे चालुक्य घराणे या भागावर राज्य करीत होते. 'जांभ्या' (Laterite) खडकात ही लेणी कोरली आहेत. कोकणातील चिऱ्याचा दगड नजरेसमोर आणल्यास त्याची प्रचिती येईल. ठिसूळ, सच्छिद्र गुणधर्म असल्यानं काळानुरूप वातावरणीय परिणामांमुळे या लेण्यांची बरीच झीज झालेली दिसते. त्यापैकी या समूहातील काही लेणी टिकाव धरून आहेत, तर काही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. 

                   पहिल्यांदा 'बर्जेस' या स्कॉटिश अधिकाऱ्याच्या नजरेस ही लेणी आली. त्यानंतर १८८५  चे मुंबईचे ब्रिटिश गव्हर्नर 'जेम्स फर्ग्युसन' यानी या लेण्यांचा अभ्यास केला. जेम्स फर्ग्युसन हे 'डेक्कन एज्युकेशन सोसायटी'चे पाहिले देणगीदार होते. आजचे पुण्यातील 'फर्ग्युसन कॉलेज' ही त्यांची आठवण आहे. 

खरोसा लेणी समूहातील पहिली लेणी  (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)

                  या लेण्यांच्या समूहातील पहिलं लेणं अंदाजे १२×६ फुट कातळात खोदलेली एक लहान ओबडधोबड खोली दिसते. खोलीत मागे रिकामी गर्भगृह दिसते. 

दुसऱ्या लेण्यातील भगवान बुद्ध मूर्ती (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)

खरोसा लेणी समूहातील दुसरी बौद्ध लेणी (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)

                   या लेण्याच्या बाजूला एकमेव बौद्ध लेणं आहे. लेण्यांच्या प्रांगणात चार फूट उंच स्तूप दिसतो. लेण्यांच्या डावी उजवीकडे कोरलेली एक एक खोली दिसते. लेणी कुलूपबंद आहेत. बंद दरवाजाच्या जाळीतून आत भिंतीलगत भगवान बुद्धांची सहा फूट उंच बैठी मूर्ती दिसते. सध्या मूर्तीला रंग लावलेला दिसतो. 

दुमजली तिसरी लेणी, खरोसा लेणी (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)
 
दुमजली तिसरी लेणी, खरोसा लेणी (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)

तिसऱ्या लेण्यातील द्वारपाल मूर्ती, खरोसा. (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)

               या लेण्यांच्या बाजूला एकूण तीन भागात विभागणी केलेले तिसऱ्या विशाल सभामंडपाचे दुमजली लेणं आहे. लेण्याच्या डावी, उजवीकडे कातळात द्वारपालांच्या विशाल मुर्त्या कोरल्या आहेत. उजवीकडील मूर्ती थोडीफार दिसते. डावीकडील मूर्तीची पूर्ण झीज झाली आहे. लेण्याचे दर्शनी आधारस्तंभही कालपरत्वे झीज होऊन तुटलेले दिसतात. लेण्याच्या तळमजल्यात ८ चौकोनाकृती स्तंभांनी आधार दिलेले प्रचंड मोठे सभामंडप आहे. पहिल्या मजल्यावरही तितकेच आधारस्तंभ असून ते सध्या शाबूत दिसतात.  लेण्याच्या मागे गर्भगृहात शिव मूर्ती असावी. कातळाची झीज झाल्याने ती ओळखता येत नाही.

चौथी दुमजली लेणी, खरोसा लेणी (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)

लेण्यातील द्वारपाल मूर्ती, खरोसा. (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)
लेण्यातील द्वारपाल मूर्ती, खरोसा. (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)

  
चौथ्या लेण्याच्या तळमजल्याचे आधारस्तंभ  (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)

 

चौथ्या लेण्याच्या गर्भगृहातील ब्रम्हा, विष्णू, महेश शिल्पे  (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)

                       या लेण्यांच्या पुढे अंदाजे ७० फूट रुंद आणि ५० फूट लांब असे चौथं प्रशस्त दुमजली लेणं दिसतं. लेण्याची रचना दोन भागात केलेली दिसते. दर्शनी भागात झीज झालेली काही कोरीव शिल्पे दिसतात. लेण्याच्या समोर एक अष्टकोनी तुटलेला स्तंभही दिसतो. लेण्याच्या तळमजल्यात १६ चौकोनाकृती स्तंभांनी आधार दिलेला सभामंडप आहे.  पहिल्या भागातील लेण्यात मागे आयताकार गर्भगृहात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची शिल्पे कोरलेली दिसतात. गर्भगृहाभोवती प्रदक्षिणा मार्ग दिसतो.
लेण्याच्या पहिल्या मजल्यावर जाणाऱ्या पायऱ्या  (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)

पहिल्या मजल्याच्या गर्भगृहातील ब्रम्हा, विष्णू, महेश शिल्पे  (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)

                      या लेण्याच्या वरच्या मजल्यावरही याच ठिकाणी गर्भगृहात ब्रह्मा, विष्णू, महेश यांची शिल्पे कोरलेली दिसतात. या गर्भगृहांच्या भोवतीही प्रदक्षिणा करण्यास मार्गिका ठेवली आहे. या लेण्यातून आधीच्या दुमजली लेण्याच्या तळमजल्यावर जाण्यासाठी सहा सात पायऱ्यांची अंतर्गत व्यवस्था दिसते. सध्या त्या तुटल्या आहेत. दुसऱ्या भागातील लेण्यांच्या तळमजल्याच्या गर्भगृहात सुध्दा ब्रह्मा, विष्णू, महेश यांची शिल्पे कोरली आहेत.  

पहिल्या मजल्याच्या गर्भगृहातील विशाल शिवलिंग, खरोसा (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)

   

लेण्याच्या पहिल्या मजल्यावरील आधार देणारे कातळ स्तंभ, खरोसा (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)
                 लेण्याच्या पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी डावीकडे कातळ बोगदा आणि अंधारातून वर जाणाऱ्या पायऱ्या दिसतात. पायऱ्यांची झीज होऊन तुटलेल्या दिसतात. या पायऱ्या चढण्यासाठी टॉर्च ची गरज आहे. अंधारातून वर चढताना कपाळ सांभाळावं लागतं. वर गेल्यानंतर बहुस्तंभ असलेला मंडप दिसतो. मागे  द्वारपालांची रचना असलेले चार स्तंभ आहेत. मागच्या दोन स्तंभांच्या वैशिष्ठ्यपूर्ण गर्भगृहात चार फूट व्यासाचे आणि सहा फूट उंचीचे शिवलिंग आहे. तळ मजल्यावरील ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या बरोबर वर दुसऱ्या मजल्यावर हे विशाल शिवलिंग कातळात कोरलेले दिसतं. या भव्य शिवपिंडी समोर नकळत नतमस्तक होतो. हे आडव्या विस्ताराचं लेणं इथल्या असंख्य चौकोनी स्तंभांनी वरचा कातळ डोंगर तोललेला दिसतो. या पहिल्या मजल्यावर छताची उंची जेमतेम सहा फूट असावी. वेगळं, वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रचंड विस्ताराचा हा सभामंडप दिसतो. या भव्य लेण्याच्या तळमजल्याचे आधार स्तंभ झीज होऊन तुटले असून वरच्या मजल्याचे स्तंभ थोडेफार टिकाव धरून आहेत. लेण्याची सध्या दुरावस्था दिसत असली तरी त्याची भव्यता नजरेत भरते. 
महादेव लेणी, खरोसा (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)
 
महादेव लेणी, खरोसा (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)

 
महादेव लेण्यातील आधारस्तंभ, समोर नंदी आणि मागे शिवलिंग. खरोसा (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)

महादेव लेण्याच्या भिंतीवरील शिल्पपट. खरोसा (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)
                  
              दुमजली लेण्याच्या बाजूलाच सुमारे ६० फूट रुंद आणि ७० फूट लांब 'महादेव लेणी' दिसतात. सभामंडपात एकूण २६ कोरीव स्तंभ आहेत. प्रत्येक स्तंभाचे कोरीव काम वेगवेगळं दिसतं. लेण्यांच्या गर्भगृहाभोवती प्रदक्षिणेसाठी मार्ग दिसतो. गर्भगृह अंदाजे ११ बाय १६ फुटाचे असून उंचीला साधारण ८ फूट असावे. आत वेदीवर विशाल शिवलिंग आहे. 

 

महादेव लेण्यातील कोरीव स्तंभ. खरोसा (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)
                     
महादेव लेण्याच्या भिंतीवरील शिल्पपट. खरोसा (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)

गर्भगृहाच्या चौकटीवरील द्वारपाल, नागदेवता. खरोसा (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)

                गर्भगृहाच्या मुख्य चौकटीवर दोन्ही बाजूस द्वारपाल असून दोन नागदेवता कोरल्या आहेत. लेण्यांच्या भिंतीवर अनेक पौराणिक शिल्पपट कोरले आहेत. दक्षिणेकडील भिंतीवर वैष्णव शिल्पांमध्ये मल्ल, नागदेवता, तसेच विष्णू अवतारंपैकी वराह, वामन, नृसिंह, कृष्ण, राम अवतार कोरलेले दिसतात. उत्तरेकडील भिंतीवर रावणानुग्रह मूर्ती, शिवपार्वती, तांडव नृत्य, भैरव इत्यादी शिल्पे कोरली आहेत. पूर्वी या शिल्पांवर गिलावा केला असावा. सध्या त्याचीही पडझड झाल्याचे दिसते. हा जांभा खडक ठिसूळ असल्याने बरीच शिल्पे झीज झाल्याने पुसट दिसतात. ओळखण्यास अडचणी येतात.  

महादेव लेणी, खरोसा (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)

                     या लेण्यांच्या पुढेच सहावं लेणं  दिसतं. ११ पायऱ्या चढून वर गेल्यानंतर चार स्तंभ दिसतात. लेण्याच्या सभामंडपात एकूण २४ स्तंभ दाटीवाटीने कोरलेले दिसतात. या लेण्याची लांबी रुंदी अंदाजे ५० फूट असावी. लेण्याच्या गर्भगृहात अंदाजे ५ फूट उंच श्री विष्णूंची चतुर्भुज मूर्ती दिसते. या लेण्याची सामान्य वैशिष्ट्ये 'बदामी' येथील हिंदू लेण्यांशी जुळतात. त्यामुळे अभ्यासाअंती 'जेम्स फर्ग्युसन' व 'बर्जेस' यांनी या लेण्याचा कालखंड सहाव्या ते सातव्या शतकाचा उत्तरार्ध मानला आहे. त्यावेळी या भागावर 'चालुक्य' घराणे राज्य करत होते. तर 'विराज शहा' या अभ्यासकांच्या मते इथले बौद्ध लेणे सुमारे आठव्या ते नवव्या शतकात कोरण्यात आले असावे. 

सहावं लेणं, खरोसा (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)
सहाव्या लेण्यातील श्री विष्णू मूर्ती, खरोसा (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)

 

सहावं लेणं, खरोसा (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)
  
सहावं लेणं, खरोसा (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)

सहावं लेणं, खरोसा (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)

                   यापुढील सातवं लेणं हे प्रचंड आडव्या विस्ताराचं दिसतं. या लेण्यांची उंची जेमतेम सहा फूट असून या ओबडधोबड लेण्यास प्रशस्त चौरस स्तंभांनी वरचा कातळ तोलून धरला आहे. या लेण्यात गर्भगृह दिसत नाही.

लेण्यांच्या समोरील रस्ता, उजवीकडे लेणी खरोसा (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)

                   पुढील आठव्या लेण्यातील मंडपाचे बहुस्तंभ कातळास आधार देताना दिसतात. आठव्या लेण्यास सभामंडप असून गर्भगृहात श्री विष्णूंची कोरीव मूर्ती दिसते.

सातवं लेणं, खरोसा (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)
सातवं लेणं, खरोसा (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)
आठवं लेणं, खरोसा (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)
  

आठवं लेणं, खरोसा (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)

नववं लेणं, खरोसा (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)

                   यापुढील नवव्या लेण्याच्या गर्भगृहात शिवपिंडी स्थापित दिसते. पिंडी समोर चौथऱ्यावर नंदी दिसतो. 

नवव्या लेण्यातील शिवपिंडी खरोसा

                  पुढील दहावं, अकरा आणि बारावं ही सर्व लेणी आकारानं लहान तसेच एकाश्म पद्धतीचीच दिसतात. ही सर्व दुय्यम स्वरूपाची असून अर्धवट सोडली आहेत.    

दहावं लेणं, खरोसा (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)

                  या लेण्यांपासून उजवीकडे वळून टेकडीवर जाणारी वाट या डोंगरावरील दर्ग्याच्या मागील बाजूस येते. दर्गा ओलांडून पुढे आल्यास डोंगराच्या दक्षिणेकडून या डोंगरावर येणारा आडवा पक्का रस्ता दिसतो.  

आकारावं लेणं, खरोसा (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)
बाराव्या लेण्यांकडे जाणारा रस्ता, खरोसा (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)

  
बारावं लेणं, खरोसा (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)

बाराव्या लेण्याजवळून डोंगरावरील दर्गा,खरोसा (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)

                  महाराष्ट्र वनविभागाने या डोंगरावर वृक्ष संवर्धनाचे काम हाती घेतल्याचे दिसते. डोंगरावर दिसणारे विविध पक्षी, सरपटणारे प्राणी आणि कीटकांची रंगीत छायाचित्रे आणि माहिती लोखंडी फलकावर पर्यटकांच्या माहितीसाठी लावलेली दिसतात.

   

डोंगरावरील दर्गा,खरोसा (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)

डोंगरावर रेणुकामाता मंदिराकडे जाणारा रस्ता, खरोसा (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)
 
 
श्री रेणुकामाता मंदिर, खरोसा (Ancient Kharosa Caves, Dist. Latur)

श्री रेणुकामाता, खरोसा

                     
       




             

               दर्ग्याच्या डावीकडे पुढे डोंगरावर रेणुका मातेचे प्राचीन देवस्थान आहे. मंदिराची निर्मिती सध्याचीच दिसते. १९९३ च्या भूकंपात जुन्या मंदिराची पडझड झाली पण मूर्ती मात्र सुरक्षित राहिली. त्यानंतर लोकवर्गणी आणि देणगीतून सध्या दिसणाऱ्या मंदिराची निर्मिती झालेली दिसते. 

                  या लेण्यांना भेट देण्यासाठी 'दादर बिदर' एक्सप्रेसने 'लातूर' गाठावे. तिथून २२ किमी वरच्या भुईकोट 'किल्ले औसा'ला भेट देऊन त्यापुढील २४ किमीवर 'निलंग्या'च्या आधी असणाऱ्या या प्राचीन लेण्यांना भेट देता येते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातूनही लातूरला येणाऱ्या एसटी बसेस आहेत. थोडा अधिक वेळ असल्यास या लेण्यांच्या पूर्वेला १० किमी  'निलंगा' तालुक्यातील प्राचीन 'नीलकंठेश्वर' मंदिरालाही भेट देता येईल.   

प्राचीन 'खरोसा लेणी', खरोसा, ता. निलंगा, जि. लातूर, महाराष्ट्र. (Ancient Kharosa Caves, Dist. Latur, Maharashtra)

                या लेण्यांची देखभाल आणि संरक्षणासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांची गरज आहे. येणारे पर्यटक इथे कचरा आणि गैरवर्तन करताना दिसतात. भारतीय पुरातत्व विभागाचे या लेण्यांकडे लक्ष गेलेले दिसत नाही.

               'खरोसा लेणी' समूहातील काही लेण्यांची दुरावस्था दिसते. कधी काळची ही वैभवसंपन्न लेणी आज कळा भोगताना दिसतात. काही लेणी अभ्यासू नजरेनं पाहिलं तर अप्रतिम आहेत. ठिसूळ जांभ्या खडकामुळे वेगाने झीज होत असली तरी शिल्लक कलाकृतींमधील शैव, वैष्णव आणि बौध्द पंथीय लेण्यांचा एकत्रित प्राचीन वारसा तसेच इथल्या महादेव लेण्याची ठेवण बघण्यासारखी आहे..

                                                        || श्री कृष्णार्पणमस्तु ||

येथे - जयवंत जाधव 

13 comments:

  1. खूप छान वर्णन! धन्यवाद जयवंत , मित्रा!!

    ReplyDelete
  2. जबरदस्तच !! मस्तच👌👌
    तुम्ही एवढी छान माहिती दिल्या बद्दल खुप खुप आभारी आहे

    ReplyDelete
  3. Khup chan blog aahe Sir

    ReplyDelete
  4. Khup chan. Keep it up.

    ReplyDelete
  5. छान माहिती लिहिली आहेस. लेणी कधी ऐकली नव्हती पण घर बसल्या माहिती आणि इतिहास कळला. छान चालू ठेव JK 👏💐🚩

    ReplyDelete
  6. छान मांडणी फोटो आणि माहिती मस्तच. चांगल लिवतोस की सायबा 😊👏

    ReplyDelete
  7. KHUP CHAN INFORMATION DILI DADA.. KEEP IT UP - (VARSHA)

    ReplyDelete
  8. खूप छान दादा ... छान माहित आहे...

    ReplyDelete
  9. मस्तच

    ReplyDelete
  10. लेण्यांची अतिशय छान फोटोसहित वास्तव माहितीपूर्ण वर्णन. सुंदर फोटोग्राफी. जयवंतराव आणि टीम शुभेच्छा .

    ReplyDelete
  11. This is a good passion to know about the history and our nation that will induct in the minds of new generation , keep it up with care.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद श्री अशोक साळुंखे साहेब 🙏

      Delete

ऑफबीट - खरोसा लेणी, निलंगा, जि. लातूर Offbeat - Ancient Kharosa caves, Dist. Latur, Maharashtra.

                        महाराष्ट्रात वैशिष्ट्यपूर्ण अशी बरीच लेणी आहेत. काहींची प्रसिद्धी तर जगभर पोहोचली आहे. त्यांची कोरीव कलाकुसर आजही थक...