Saturday 2 December 2023

गडहिंग्लज'चा ऐतिहासिक : 'किल्ले सामानगड' (Samangad Fort - Gadhinglaj, Dist. Kolhapur)

               सह्याद्रीच्या आंबोली घाटातून छोट्या मोठ्या टेकड्यांची एक डोंगररांग कोल्हापूरच्या 'गडहिंग्लज' भागाकडे आली आहे. आणि त्यावर राखणदाराच्या भूमिकेत किल्ले 'सामानगड' वसला आहे. पन्हाळा, भुदरगड, हरगापुरचा (संकेश्वर) वल्लभगड आणि पाटगांवचा किल्ले रांगणा यांच्या अगदी मधोमध असल्यानं या किल्ल्यावर बाहेरून हल्ला करण्यास वाव नाही. वाहतुकीसही हा किल्ला सुलभ दिसतो. त्यामुळं शिवकाळात या किल्ल्यावर युद्ध साहित्य ठेवून आघाडीच्या लढावू किल्ल्यांना ते पुरवलं जात असे. कदाचित यामुळे किल्ल्यास 'सामानगड'  नांव दिलं असावं. किल्ल्याच्या भौगोलिक स्थानावरून ते पटतं सुद्धा.  
                      दसऱ्याच्या बरोबर दुसऱ्याच दिवशी 'सामानगड'ला भेट झाली. या आधी ऑक्टोंबरला नवरात्रीच्या आठवडाभर आधी आमची 'सरसगड'ला भेट झालीच होती. पण योगायोगानं या वर्षी दसऱ्याचं हे 'सीमोल्लंघन' आणि आत्तापर्यंतची इतक्या वर्षांत या किल्लास दिलेली ही तिसरी भेट म्हणता येईल. 
'दुर्गवीर प्रतिष्ठान'ने दसऱ्यात सजवलेला समानगडाचा दक्षिणेकडील महादरवाजा, किल्ले सामानगड - Samangad Fort, Dist. Kolhapur
                      तसं पाहिलं तर कोल्हापूर म्हणजे रांगड्या शूरवीरांची, गड किल्ल्यांची भूमी. इथल्या किल्ल्यांचं योगदान इतिहासाच्या पानोपानी सापडतं. घनदाट आरण्ये, संपन्न वन्यजीवन, परंपरेनं जपलेल्या देवराया, वळणावळणांची नदीपात्रं, प्राचीन लेणी गुंफा, दुर्गम घाटमार्ग, ऐतिहासिक गडकोट किल्ले, लाल मातीच्या इथल्या पाऊलवाटा, सातासमुद्रापार पोहोचलेल्या कीर्तीचे लेखक, कलाकार आणि इथला रांगडा बाज तसेच स्वराज्याच्या कामी आलेल्या ज्ञात अज्ञात वीरांच्या गावोगावी असलेल्या विरगळी आणि समाध्या अशा एक ना अनेक गोष्टींनी कोल्हापूर परिसर परिपूर्ण आहे. दुर्गभटके, इतिहासाचे अभ्यासक आणि निसर्गप्रेमींना ही माझी पवित्र जन्मभूमी नेहमीच साद घालत आली आहे.  

दक्षिण तट, किल्ले सामानगड (Samangad Fort)

                           कोल्हापूर शहराच्या दक्षिणेला ७५ किमी आणि समुद्र सपाटीपासून सरासरी ३००० फूट उंचीवर वसलेल्या या किल्ले सामानगडावर जाण्यासाठी आधी गडहिंग्लज गाठावं लागतं. गडहिंग्लज तालुक्याच्या आग्नेयेला १२ किमी असलेल्या या किल्ल्यास गडहिंग्लज बस स्थानकातून 'नौकुड' मार्गे एसटी बस आहेत. चिंचेवाडीचा घाट चढून रस्ता डोंगरावरील सपाटीवर येतो. या सपाटीवर पायउतार होऊन डावीकडे डोंगराच्या सोंडेवरून जाणारा एकमेव पक्का रस्ता तीव्र चढ चढून समानगडाच्या पश्चिम दरवाजाच्या कमानीतून किल्ल्यात घेऊन जातो. पूर्वीचा इथला मूळ दरवाजा, इथे येणारा रस्ता आणि गडाची डावीकडील झेंडा बुरुजाची (निशाणी बुरुज) पश्चिम तटबंदी इंग्रजांनी तोफा डागून उध्वस्त केली होती. सध्या दिसणारी दरवाजाची कमान नव्यानं उभारली असून, तटबंदीचीही दुरुस्ती करण्यात आली आहे. 

कमानी दरवाजा - किल्ले सामानगड (Samangad Fort)
                 कमानीच्या दरवाजातून एक वाट सरळ गडाच्या मध्यभागी असलेली अंधार कोठडी, तुळजाभवानी मंदिर, त्यापलीकडील साखर विहीर, सात कमान विहीर व तशीच पुढे पूर्वेच्या सोंडी बुरुजाकडे जाते. तर कमानी दरवाजातून डावीकडे वळणारी वाट झेंडा बुरुज, वेताळ बुरुज, चोर दरवाजा अशी गडाच्या तटबंदीलगत उजवं वळण घेत शेवटी सोंडी बुरुजाजवळ येऊन मिळते. सोंडी बुरुजाजळून तटबंदी डावीकडे ठेवत वाट नुकत्याच शोध लागलेल्या महादरवाजापर्यंत व पुढे पुन्हा कमानी दरवाजाकडे येऊनही गडफेरी पूर्ण करता येते.
झेंडा बुरुज - किल्ले सामानगड (Samangad Fort)
                   जुलै १८४४ ला किल्ल्याच्या सुरुवातीच्या या झेंडा बुरुजावरून पहिल्यांदाच इंग्रजांविरुद्ध लढ्याचे निशान उभारले. त्यावेळी 'मुंजाप्पा कदम' यांनी या लढ्याचे नेतृत्व केले. (अशा लढ्यांना काहीजण 'बंड' समजतात. त्यास बंड न म्हणता, स्वातंत्र्यासाठी दिलेला 'लढा' म्हणणेच योग्य आहे.) त्यांनी शस्त्रे आणि दारुगोळ्याची किल्ल्यावर जमवाजमव केली. स्थानिक गावकरीही त्यांना येऊन मिळाले. गडाचे दरवाजे बंद केले गेले. गडावर त्यावेळी १० तोफा, १०० बंदूक बारदार, २०० सैनिक आणि ३५० गडकरी होते. दोनदा गडकर्‍यांनी इंग्रजांना हिंमतीने परतवून लावले. पण शेवटी १३ ऑक्टोबर १८४४ रोजी सामानगड इंग्रजांच्या ताब्यात गेला व त्यांनी तोफा लावून गडाची प्रचंड नासधूस केली. एप्रिल २०१७ ला आम्ही सहकुटुंब दिलेल्या गडभेटीपर्यंत ती तशीच उध्वस्त होती. येत्या पाच सहा वर्षात झेंडा बुरुज आणि बाजूच्या तटबंदीची दुरुस्ती केलेली दिसते. दरवर्षी २६ जानेवारी, १५ ऑगस्ट आणि १ मे च्या महाराष्ट्र दिनारोजी या झेंडा बुरुजावर 'दुर्गवीर प्रतिष्ठान' व स्थानिकांमार्फत तिरंगा फडकविला जातो.
झेंडा बुरुजासमोरील खोल विहीर (Samangad Fort)


झेंडा बुरुजासमोरील खोल विहीर (Samangad Fort)

                   झेंडा बुरुजाच्या समोर जाणाऱ्या पायवाटेवर जांभ्या दगडाच्या खडकात विहिरीत खोदलेली प्रचंड खोलीची दुसरी विहीर दिसते. लोखंडी पाईपने (Hand railing) ती सुरक्षित केली आहे. 

वेताळ बुरुज (Samangad Fort)
 
वेताळ बुरुजासमोरील पोस्ट (शेड) - Samangad Fort



तटबंदीतील मारा करण्यासाठी जंग्या आणि दिवळ्या (Samangad Fort)
                झेंडा बुरुजाच्या पुढे प्रचंड विस्ताराचा वेताळ बुरुज आहे. या बुरुजाच्या उंच खांबावर आसमंतात भव्य भगवा वाऱ्यावर डौलानं फडकत गडाची शान वाढवताना दिसतो. वेताळ बुरुजाच्या पुढील तटबंदी सुस्थितीत असून, तटबंदीत बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या आणि तोफमारा करण्यासाठी दिवळ्यांची व्यवस्था दिसते. या बुरुजावर पर्यटकांना विसावा आणि निसर्ग अनुभवण्यासाठी उंचावर शेड (पोस्ट) बांधले आहे.
तटबंदीबाहेरील उभे ताशीव कातळखांब (Samangad Fort)

तटबंदीबाहेरील उभे ताशीव कातळखांब (Samangad Fort)
                     झेंडा बुरुज, वेताळ बुरुज आणि पुढे चोर दरवाजाकडे जाणाऱ्या तटबंदीलगत, बाहेरील बाजूस, खाली जांभ्या कातळात दहा ते पंधरा फूट उंचीचे उभे ताशीव खांब दिसतात. या खांबांच्या आडून किल्ल्यावर आणि तटबंदीवर मारा करण्यास वाव दिसतो. किल्ल्याची निर्मिती करताना सभोवताचा जांभा कातळ उभा तासून त्यावर तटबंदी आणि योग्य त्या ठिकाणी बुरुजांची बांधणी केलेली दिसते. हे करताना तटबंदीच्या बाहेर दिसणारे हे कातळ खांब नष्ट करता आले असते. पण ते मुद्दाम ठेवलेले दिसतात. हे खांब कोणत्या उद्देशाने ठेवले असावेत ते मात्र सध्या आपल्याला उमगत नाही. 
चोरखिंड (चोर दरवाजा) Samangad Fort
तटबंदीबाहेरून दिसणारा चोर दरवाजा (Samangad Fort)

चिंचेवाडीच्या जंगलात उतरणारी चोरवाट (Samangad Fort)
कलात्मक बांधणीचा चोर दरवाजा (Samangad Fort)

             वेताळ बुरुजाच्या पुढे तटबंदी धरून चालत राहिल्यास किल्ल्यावरून पुढे आपतकाली बाहेर पडण्यासाठी 'चोर' दरवाजा आहे. मोठमोठे घडीव दगड वापरून सुंदर बांधणी केलेला हा दरवाजा दिसतो. यास 'चोर' किंवा 'चोरखिंड' दरवाजाही म्हणतात. या दरवाजातून खिंडीत उतरणारी वाट चिंचेवाडीकडील निबीड जंगलात घेऊन जाते.

झाडांच्या मध्ये दिसणाऱ्या बुरुजावर जाणाऱ्या पायऱ्या (Samangad Fort)

                चोर दरवाज्याच्या पुढे तटबंदीतील एका लहान बुरुजावर जाणाऱ्या तीन चार पायऱ्या दिसतात. पावसानंतर वाढलेलं गवत आणि झुडपामुळं काही ठिकाणच्या तटबंदीतील जंग्या आणि तोफमाऱ्याच्या दिवळ्या शोधाव्या लागतात. 

प्राचीन धान्य कोठारे (Samangad Fort)

प्राचीन धान्य कोठारे (Samangad Fort)

प्राचीन धान्य कोठारे (Samangad Fort)

                 या चोर दरवाज्यापासून उजवीकडे जाणारी एक वाट गडाच्या मध्यावर असलेल्या तुळजाभवानी मंदिर, साखर विहीर आणि सात कमान विहिरीजवळ येते. या वाटेवरच डाव्या बाजूला गडावरील धान्यसाठा करण्यासाठी, जमिनीखाली कातळात कोरलेले हंडाकार (किंवा रांजनाच्या आकाराचे) आणि अरुंद गोल तोंडाची दोन प्राचीन धान्य कोठारे दिसतात. त्यांच्या छोट्या गोल तोंडामुळे आणि वाढलेल्या गवतामुळे मात्र ती शोधून अभ्यासावी लागतात. 

सोंडी बुरुज आणि पलीकडे मुघल टेकडी - Photo on October 2023 (Samangad Fort)

सोंडी बुरुजावरील पोस्ट (Samangad Fort)

सोंडी बुरुज आणि पलीकडे मुघल टेकडी (Samangad Fort)
  
                      चोर दरवाज्यापासून तटबंदीलगत पुढे जाणारा रस्ता 'सोंडी बुरुजा'कडे जातो. मूळ बुरुजाच्या पुढे लांब आणि निमुळता होत जाणारा हा चिलखती तटबंदीचा बुरुज किल्ल्याच्या वैभवात भर घालतो. या बुरुजावरून मारा करण्यासाठी तटबंदीत जंग्या आणि तोफमाऱ्यासाठी दिवळ्या ठेवल्या आहेत. या बुरुजावरही विसावा घेण्यासाठी पोस्ट बांधले आहे. सोंडी बुरुजावरून डावीकडे उत्तरेला खमालेहट्टीचा जलाशय, गडहिंग्लज, संकेश्र्वर पर्यंतचा विस्तृत भूभाग नजरेच्या टप्प्यात येतो. 
सोंडी बुरुजावरून दिसणारा खमालेहट्टीचा जलाशय, गडहिंग्लज, संकेश्र्वर पर्यंतचा विस्तृत भूभाग  (Samangad Fort)


सोंडी बुरुज आणि पलीकडे मुघल टेकडी,Photo taken on - April 2017 (Samangad Fort)

                  सोंडी बुरुजाच्या समोर पूर्वेला एक उंच टेकडी दिसते. या टेकडीस 'मुघल टेकडी' म्हणतात. या टेकडी बद्दल सांगताना स्थानिक एक अशी आख्यायिका सांगतात की, शिवछत्रपतींच्या निधनानंतर संभाजीराजांच्या कारकिर्दीत प्रचंड मुघल सैन्य सामानगडावर चालून आलं. बरेच प्रयत्न करूनही त्यांना सामानगड पडत नाही हे कळल्यावर त्या सैन्यानं सोंडी बुरुजाच्या पुढे मातीची ही टेकडीच उभी केली. त्या टेकडीवर तोफा चढवून त्यांनी गडावर मारा केला आणि गड जिंकला. सोंडी बुरुजावरून दिसणारी एकमेव हीच ती 'मुघल टेकडी'.

                    सोंडी बुरुजापासून सरळ पश्चिमेकडे जाणारा रस्ता पुन्हा भवानी मंदिर, साखर विहीर आणि सात कमान विहिरीकडे येतो. तर तिथून डावीकडे म्हणजेच गडाच्या दक्षिणेकडील तटबंदी लगत जाणारा रस्ता नुकत्याच शोधून काढलेल्या महादरवाज्याकडे येतो. 

तटबंदीतील सौचकुप (Samangad Fort)

तटबंदीतील सौचकुप (Samangad Fort)

तटबंदीतील सौचकुप (Samangad Fort)
                   महादरवाजाकडे जाताना दक्षिणेची तटबंदीही बऱ्यापैकी सुस्थितीत आहे. या तटबंदीत कल्पकतेनं निर्माण केलेले सौचकुप (Toilet pots) आजही पाहायला मिळतात. सौचकुपाची सुविधा आपल्याला इंग्रजांनी दिली असे बरेचजण आजही मानतात. जे मानतात, त्यांनी हा सामानगड, लोहगडाच्या विंचू कड्याची तटबंदी, रायगड, लातूरचा भुईकोट औसा तसेच महाराष्ट्रातील इतर बऱ्याच किल्ल्यांना शोधक नजरेनं भेट द्यावी. कदाचित ते उध्वस्त असतील पण शेकडो वर्षांपूर्वीही आपल्या पूर्वजांना सौचकुपाबद्दल ज्ञान आणि त्याची आवश्यकता कळत होती त्याबद्दल खात्री पटते. 
दक्षिणेकडील महादरवाजा - किल्ले सामानगड  (Samangad Fort)


महादरवाजाची जुनी दगडी फरसबंद वाट (Samangad Fort)
दक्षिण महादरवाजा - किल्ले सामानगड (Samangad Fort, Dist. Kolhapur)
                 
महादरवाजाची जुनी दगडी फरसबंद वाट (Samangad Fort)
                    पुढे किल्ल्याचा उध्वस्त दक्षिण महादरवाजा दिसतो. 'दुर्गवीर प्रतिष्ठान' आणि आजूबाजूच्या ग्रामस्थांच्या मदतीने वर्षानुवर्षे मातीखाली गाढले गेलेल्या किल्ल्याच्या या दरवाजाचे अवशेष सध्या मोकळे केलेले दिसतात. दहा ते बारा फूट रुंदीचा हा प्रशस्त दरवाजा दिसतो. तो अंदाजे पंधरा फुट रुंदीच्या दक्षिण तटाला लागून आहे. याच्या चौकटीच्या उंबऱ्याचीच रुंदी चांगली बारा फूट दिसते. दरवाज्याच्या उजवीकडील चौकटीचा कातळ उंबऱ्यावर स्थिर असून, उंबऱ्याच्या आत उजवीकडे पहारेकऱ्यांची दगडात बांधून काढलेली भव्य पण उध्वस्त देवडी दिसते. बाकी डावीकडील उभ्या चौकटीची बाजू आणि देवडी पूर्णतः उध्वस्त दिसते. या दरवाज्यातून गडाखाली उतरणारी फरसबंद दगडांची वळणदार मुळ वाटही दिसते. ही वाट आणि उध्वस्त चौकटीची भव्यता बघूनच त्याकाळच्या या किल्ल्याची वैभवता कळते. नव्यानं सापडलेल्या या महादरवाजाने किल्ल्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. 

किल्ल्याच्या आतून दिसणारा कमानी दरवाजा (Samangad Fort)

                 महादरवाज्यापासून येणारी वाट पश्चिमेकडील सुरुवातीच्या कमानी दरवाज्याकडे येऊन तटालगतची गडफेरी पूर्ण होते. 

अंधार कोठडी (Samangad Fort)
अंधार कोठडीत उतरणाऱ्या पायऱ्या (Samangad Fort)

अंधार कोठडी (Samangad Fort)

अंधार कोठडी (Samangad Fort)

अंधार कोठडीत एका मागोमाग कोरलेल्या कमानी (Samangad Fort)
   
                                                                              सामानगडाचे मुख्य आकर्षण म्हणजे गडाच्या मध्यावर असलेली प्रचंड मोठी अंधार कोठडी. जमिनीखाली जांभ्या खडकात खोदलेल्या या कोठडीत उतरण्यासाठी कोरीव पायऱ्या आहेत. रुंद मार्ग असणाऱ्या या कोठडीच्या पायऱ्या डावीकडे काटकोनात वळत पुन्हा खाली उतरतात. आत प्रचंड अंधार दिसतो. अंधाराच्या पलीकडे कोठडीत साठलेले पाणी दिसते. या पाण्यावर पलीकडील बाजूस, वरून खाली उजेड येण्यासाठी चौकोनी झरोका खोदला आहे. असे एकूण तीन झरोके ऊजेडासाठी वेगवेगळ्या ठिकाणी खोदलेले दिसतात. प्रचंड खोली असलेल्या या झरोक्यातून कोणी अपघाती पडू नये म्हणून सध्या ते लोखंडी पाईपने सुरक्षित केले आहेत. पूर्वी इथे कैद्यांना ठेवलं जात असे.

सातकमान विहीर (Samangad Fort)

सातकमान विहिरीत उतरणाऱ्या पायऱ्या (Samangad Fort)
                   पुढे उजवीकडे सातकमान विहीर दिसते. कला आणि कल्पकतेने जांभ्या खडकात जमिनीखाली इंग्रजी C आकाराची खोदलेली ही विहीर आहे. अतिशय खोल अशा या विहिरीत उतरण्यासाठी डाव्या बाजूस कातळकोरीव पायऱ्या आहेत. पंधरा फूट रुंद मार्गाच्या या पायऱ्या उतरत गेल्यास डोक्यावर कोरीव कमान दिसते. पुढे पायऱ्या उजवीकडे काटकोनात वळून खाली पाण्याकडे जातात. पाण्यामुळे आपणांस त्यापुढे जाता येत नाही. पण वरून मात्र ही विहीर उघडी असून बघता येते. विहीर जसजशी खोल जाईल तसतशा पुढे कमानी वाढत जाताना दिसतात. 

सातकमान विहीर (Samangad Fort)
सातकमान विहिरीतुन दिसणाऱ्या पायऱ्या (Samangad Fort)

 

सातकमान विहीर (Samangad Fort)

                 अंधार कोठडी आणि सात कमान विहिरीच्या पायऱ्या चढून वर येताना दमछाक करतात.

साखर विहीर (Samangad Fort)

                    सात कमान विहिरीच्या समोर प्रचंड रुंदीची चौकोनी 'साखर विहीर' दिसते. या विहिरीमधे दुसरी चिंचोळी विहीर दिसते. 

श्री तुळजाभवानी मंदिर, किल्ले सामानगड  (Samangad Fort)
दुर्गवीर प्रतिष्ठानने काढलेली मंदिरातील रांगोळी (Samangad Fort)

श्री तुळजाभवानी, किल्ले सामानगड  (Samangad Fort)

                   बाजूलाच गडाची अधिष्ठाती 'तुळजाभवानी'चं मंदिर दिसतं. पूर्वी हे मंदिर कौलारू असून मंदिराच्या समोर प्रांगण दिसत होतं. आता ते नव्याने सिमेंट काँक्रीट मध्ये बांधून घेतलं आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रमाणबद्ध काळ्या पाषाणातील 'आई तुळजाभवानी'ची अती सुंदर, अष्टभुजा मूर्ती आहे. देवीच्या हातात परशु, बाण, तलवार, त्रिशूळ,ढाल व भाला ही सर्व आयुधं दिसतात. 

श्री तुळजाभवानी मंदिर, किल्ले सामानगड  (Samangad Fort)
दारू कोठार (Samangad Fort)

                  दसऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी तिथं जाणं झाल्यामुळे, दुर्गवीर प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी मंदिराच्या सभामंडपात मोठ्या आकाराची सुबक रांगोळी काढली  होती. मंडप झेंडूच्या फुलमाळांनी सजवलेले दिसत होते. मंदिराच्या दारावर दसऱ्याच्या मुहूर्ताचे 'ऊस' उभे केले होते. गाभाऱ्यातील देवीपुढे हळद-कुंकू आणि जागराचे साहित्य दिसत होतं. मंदिराबाहेर विझलेल्या दिवट्यांचा (मशाली) ढीग पडला होता. यावरून या मावळ्यांनी आदल्या दसऱ्याच्या रात्री देवीचा 'जागर' घातल्याचं दिसत होतं. 

पळसाच्या झाडाच्या बाजूचे उपहारगृह (Samangad Fort)
ड्रोमेन्टरी हॉल आणि गेस्ट हौस (Samangad Fort)
                    मंदिरांच्या मागील बाजूस निसर्गरम्य ठिकाणी पर्यटकांसाठी २७ फेब्रुवारी २००९ रोजी त्यावेळचे ग्रामविकास व पर्यटन मंत्री मा. विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते व विधान सभा अध्यक्ष मा. बाबासाहेब कुपेकर यांच्या अध्यक्षतेखाली गेस्ट हाऊस, ड्रॉमेंट्री हॉल आणि उपहारगृह बांधलं. पण अपुऱ्या सुविधांमुळे आणि वापरात नसल्यामुळं वर्षानुवर्षे ते बंद अवस्थेत दिसतं. बाजूलाच एक प्रचंड मोठं म्हणता येईल असं पळसाचं झाड आहे. झाडाभोवती पार बांधला आहे. आजपर्यंतच्या भटकंतीत इतकं मोठं पळसाचं झाडं पाहण्यात आलेलं नाही. या झाडाखाली निवांत शिदोरी सोडू शकतो.


                 मंदिराला लागूनच बाजूला सखलात जुने चौथरे दिसतात. चौथऱ्यांच्या बाजूस 'दारू कोठार' असा बोर्ड दिसतो. 

 किल्ले सामानगड  (Samangad Fort)

                  किल्ल्यास लहान मोठे असे मिळून एकूण दहा बुरुज आहेत. बाराव्या शतकात शिलाहार राजवटीतील दुसऱ्या भोज राजानं हा किल्ला बांधला. सध्याच्या मराठवाड्यातील संत गोरोबा कुंभारांचं 'तेर' म्हणजेच प्राचीन 'तगर' नगर हे शिलाहार राजवटीत राजधानी म्हणून उदयास आलं होतं. सह्याद्रीच्या दख्खन भूमीत भुदरगड, रांगणा, पन्हाळा, सामानगड अशा किल्ल्यांची शृंखलाच या राजवटीनं उभारली. 

                 १६६७ च्या आसपास शेजारच्या भुदरगड सोबत हा किल्ला शिवरायांनी जिंकून स्वराज्यात आणला. पुढे शंभूराजांच्या काळात २९ सप्टेंबर १६८८ रोजी सामानगड मुघलांनी जिंकून घेतला. ऑगस्ट १७०१  पूर्वी तो परत मराठ्यांनी ताब्यात आणला. पुढे शहजादा बेदारबख्त याने गडाला वेढा घालून सामानगड जिंकून घेतला. त्यावेळी साबाजी क्षीरसागर गडाचे किल्लेदार होते. औरंगजेबाने गड जिंकल्यावर ८ मार्च १७०२ ला शहामिर यास किल्लेदार म्हणून नेमले. पण पुढे ऑगस्ट १७०४ अखेर मराठ्यांनी परत हा किल्ला मोघलांकडून जिंकून घेतला. 

                        पुढे काळाच्या ओघात सामानगड करवीरकर छत्रपतींच्या ताब्यात गेला. नंतर इंग्रजांनी कोल्हापूरच्या राज्यावर आपले वर्चस्व स्थापित केले. जुलै १८४४ मध्ये सामानगडाने इंग्रजांविरुद्ध प्रथम स्वातंत्र्याचे (बंडाचे) निशाण उभारले. आणि सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे मुंजाप्पा कदम यांच्या नेतृत्वाखाली इंग्रजांना दोनदा परतवून लावले. पण शेवटी १३ ऑक्टोबर १८४४ रोजी सामानगड इंग्रजांच्या ताब्यात गेला.

 किल्ले सामानगड  (Samangad Fort)

                        पूर्वी किल्ला आणि किल्ल्याच्या डोंगरावर फक्त झुडूपं दिसायची. आता शासनाच्या सामाजिक वनीकरणामुळं गडावर आणि आजूबाजूला प्रचंड जंगल दिसतं. स्थानिक आणि कर्नाटकाकडील मेंढपाळ किल्ल्यावर बकऱ्या चारताना दिसतात.

                        सामानगडची भटकंती करण्यास सरासरी दोन तास पुरतात. दुर्गवीर प्रतिष्ठानचे मावळे गडाची स्वच्छता, संवर्धन आणि पावित्र्य राखण्याचं मोलाचं काम अगदी चोख करताना दिसतात. गडावर बऱ्याच विहिरी असूनही, उपसा नसल्यानं त्यातील पाणी पिण्यालायक नाही. या वेगवेगळ्या विहिरींचे कलात्मक खोदकाम, अंधार कोठडी, किल्ल्याचे बुरुज, तटबंदी दुर्गरसिकांनी अभ्यासपूर्वक न्याहाळावीत इतकी अपेक्षा ठेवून सामानगडचा ऐन दसऱ्यात  मांडलेला हा जागर इथे संपवितो..

                                                    || श्री कृष्णार्पणमस्तू ||

येथे - जयवंत जाधव

13 comments:

  1. खूप खूप सुंदर माहिती दिली आहे दादा.. मी तिथे जाऊन प्रत्क्षय बघून आली, पण तुमच्या लिखाणामुळे त्या किल्ल्याची माहिती सविस्तरपणे समजली. Thank you so much.. - (Varsha)

    ReplyDelete
  2. Very very useful information

    ReplyDelete
  3. खूप छान वर्णन केलेत आपण, जयवंत सर! खूप खूप आभारी आहोत!!

    ReplyDelete
  4. Very useful information for newcomers and nicely described along with photos.Made us feel proud of our culture!

    ReplyDelete
  5. 5/6वर्षा पूर्वी आम्ही मोटर सायकल घेऊन गडावर जाऊन आलो होतो त्याच्या बद्दल काहीच माहिती माहित नव्हती.. आज तुमचा लेख वाचून इतिहास समजला.. खुप छान 👍🏻👍🏻👍🏻👍🏻

    ReplyDelete
  6. खूपच सुंदरमाहिती , किल्यांचे वास्तविक वर्णन , किल्यांचे छान फोटो आणि किल्याचा पूर्ण इतिहास आपण आपल्या लेखणीतून उभा केलात.

    ReplyDelete
  7. खूप खूप छान माहिती दिली.

    ReplyDelete
  8. खुप छान.... सामान गडाच्या बाजूला माझी सासुरवाडी आहे. त्यामुळे माझं गडावर सारखं जात असतो... शब्दात माहिती छान लिहिलास. अप्रतिम छायाचित्र माहिती सहित.... खुप सुंदर.... 👌👍🙏🚩🙏

    ReplyDelete
  9. खूप छान लिहलय👏👏👌👌

    ReplyDelete
  10. माहिती छान मांडली आहे , खूप सुंदर!

    ReplyDelete
  11. किल्ल्याचे सुंदर शब्दात वर्णन केले आहे. फोटो माहितीत भर घालतात. किल्ले भटकंतीची आवड आणि त्यावर लिखाणाला तोड नाही. तुमच्या फॅमिलीच्या भटकंती बद्दल नेहमी कौतुक आहे. जयवंत, सुरुवातीला लेखात कोल्हापूर जिल्ह्यातील वर्णन करताना परंपरागत देवराया हा शब्द नवीन वाटतो. देवराया हे नक्की कशाबद्दल म्हणता येईल. सॉरी
    बाकी सर्व लेख परिपूर्ण वाटतो. माहितीत भर घालतो. Thank you Jaiwant and family 💐👏👏

    ReplyDelete
    Replies
    1. हा गायरान सारखाच प्रकार आहे पण देवराइंना गायरान म्हणता येणार नाही. थोडक्यात हा निसर्गातील समतोल (जैवविविधता) सांभाळण्यासाठी देवांच्या ( किंवा देवस्थानांच्या) नावाने गावांनं सांभाळून ठेवलेले राखीव जंगल म्हणता येईल. ते आजही आहेत.

      Delete
  12. आपण लिहिलेली सामानगडाची माहिती वाचुन गडाची बरीच माहीती मिळाल्याचे समाधान वाटले. आपल्या लिखाणास सुभेच्छा. शामराव खवरे

    ReplyDelete

ऑफबीट - खरोसा लेणी, निलंगा, जि. लातूर Offbeat - Ancient Kharosa caves, Dist. Latur, Maharashtra.

                        महाराष्ट्रात वैशिष्ट्यपूर्ण अशी बरीच लेणी आहेत. काहींची प्रसिद्धी तर जगभर पोहोचली आहे. त्यांची कोरीव कलाकुसर आजही थक...