Friday 5 February 2021

किल्ले माणिकगड (Gherakilla Manikgad)

                'माणिकगड'ला भेट द्यायची तर दिवसभर पायपीट करायची तयारी ठेवावी..  डोंगरतल्या टेकड्या, ओढे-नाले, आडवी झालेली झाडं ओलांडुन, अंधार पडण्याआधी परतून येण्यासाठी वेळेवर लक्ष ठेवावं लागतं. मोजकंच थांबत, दिवसभर न थकता चालायला लावणारा हा ट्रेक म्हणता येईल.
बालेकिल्ल्यावरील दुहेरी उद्ध्वस्त तटबंदितील हनुमान दरवाजा (Manikgad Fort)

           अडीज-तीन तास झाडीतून वाट काढत, दमछाक करून गडपायथ्याला पोहोचल्यावर, शेवटी तासाभराचा  टप्पा शारीरिक, मानसिक परीक्षा घेतोच.. 

             'माणिकगड'ला येण्यासाठी पनवेल पासून अंदाजे २५ किमीवर असलेल्या रसायनी मार्गे 'वाशिवली' गाठावी. एस टी, वढाप किंवा स्वतःच्या वाहनानंही येऊ शकतो. 'वाशिवली' गावामागील टेकडी ओलांडली की रस्ता पाऊलवाटेत रूपांतरित होतो. या टेकडीनंतर साधारण पंधरा मिनिटांवर एक जनावरांचा 'गोठा' दिसतो. 'गोठ्या'च्या अलीकडे डावी-उजवीकडुन जाणाऱ्या दोन पाऊलवाटा दिसतात. पूर्वानुभव किंवा निघतानाच गावात चौकशी न केल्यास इथं फसगत होतेच. 

               गोठ्याच्या उजवीकडून जाणारी वाट दाट जंगलात घुसते. अधूनमधून 'माणिकगड'चा माथा दिसत राहतो आणि  पुढे वाट दिसेनाशी होते. तोपर्यंत बरीच पायपीट आणि वेळ खर्ची होते.  

जळालेलं पठार आणि समोर माणिकगड (Manikgad) 
                                           

                      नेमकं हेच यावेळी घडलं. पण आमच्या सुदैवानं वरच्या बाजूलाच एक ट्रेकर्सचा ग्रुप 'माणिकगड'ला जात होता. त्यांचीही वाट चुकली होती. पठारावरुन जाणारी वाट पुन्हा गाठण्यासाठी बहुधा ते मधला अवघड टप्पा चढून जात होते. 

 

    

                आम्ही त्यांच्या मागून असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. ते जाणारी अवघड घळ न चढता पुन्हा मागे फिरुन, पठारावर येणाऱ्या वाटेनं येण्यास आम्हाला सांगितलं. पुन्हा पाऊण तासाची मागं पायपीट करून नेमकी वाट गाठली.

             गावामागील या टेकडीनंतर गोठा ओलांडल्यावर हे एक लांबलचक पठार दिसतं. पठारावरुन दूरवर धुक्यात किल्ले माणिक खुणावतो. पावसात या पठारावर कमरेइतकं गवत असावं. पण यावेळी जंगलात लागणाऱ्या वणव्यात ते बरंच जळालेलं दिसलं.  

               पठार संपून जंगलात शिरण्यापूर्वी गडमाथा दिसत राहतो. गडाचा डोंगर डावीकडं ठेवत पायथ्याच्या दुरून ही वाट बऱ्याच टेकड्या, ओढे आणि दगड धोंडे ओलांडत जाते.  तीनएक तासाच्या अथक वाट चालीनंतर गडाला उजवीकडून वळसा मारत, गडपायथ्याला पोहचते. 

            वाट मधे बऱ्याचदा  दिसेनाशीही  होते आणि गोंधळून जातो. काही ठिकाणी एकावर एक असे तीन लहान दगड किंवा खडे ठेवलेले दिसतात. जंगलात हे एकमेकांवर ठेवलेले दगड-खडे ही याआधी वापरलेल्या मानवी वाटेची खात्रीशीर खूण समजावी. अशा खुणा शोधत पुढे रेटून चालत राहणं हाच एक पर्याय उरतो.  

पायवाटेतील  ओढे 
                

              बऱ्याच वेळानं समोरुन दोघेजन येताना दिसले. त्यांच्याकडे किल्ल्यावर जाणाऱ्या वाटेची चौकशी केली.  त्यांच्या माहितीनुसार सरासरी पन्नास जणांचा त्यांचा  फॅमीली ग्रुप 'अष्ट्या'हून 'माणिकगड'ची मागील बाजुनं चढाई करत होता, आणि अर्ध्या तासात पुढं जंगलात आम्हाला मारुतीचं देऊळ लागणार होतं. 'पेण'च्या अष्ट्या'हूनही तासाभरात येणारी एक पाऊलवाट या देवळाजवळून गडावर जाणारी आहे.  

मारुती मंदिर (Manikgad)
               मारुतीच्या देवळाजवळ आम्हाला त्यांचा ग्रुप दिसला आणि विचारपूस झाली. त्या ग्रुपमध्ये वयस्क आणि मुलं असल्यानं त्यांना मागे सोडून आम्ही चढाई सुरू ठेवली. 
        देऊळ म्हणजे लोखंडी पाइप वापरुन उभारलेल्या सांगाड्यावर टाकलेला पत्रा इतकंच म्हणता येईल. पत्र्याखाली शेंदूर लावलेली मारुतीची मूर्ती दिसते. 
मागे 'अष्टया'चा ग्रुप, माणिकगड.

              

              

                             इथून पुढची चढाई दाट जंगलातल्या मोठमोठ्या दगडांतून सुरू होते. कधी दरीच्या काठानं घसरणाऱ्या वाटेनं घेवून जाते. आम्ही आतापर्यंत ओलांडलेले ओढे-नाले पावसात दुथडी भरून वाहत असावेत. दरी उतारावरची ही वाटही धोकादायक असावी. त्यामुळं जोरदार पावसात हा ट्रेक टाळावा.   

 

            इथून वर अर्धीअधिक चढाई केल्यानंतर गडाची तटबंदी आणि त्यापुढे बुरूज दिसू लागतात. तटबंदी बऱ्याच ठिकाणी ढासळलेली दिसते. 

           या शेवटच्या टप्प्यात दुपारी आम्हाला गडाच्या तटबंदीखाली धोकादायक दरीउतारावर काही मुलांचा ग्रुप दिसला.चौकशी करता मारुतीच्या देवळापर्यंत येण्याआधीच, गडाच्या लिंगीला बुरूज समजून, तिथंच कुठेतरी वाट शोधण्यासाठी ते अवघड जागी चढले. पुढची वाट न सापडल्यानं तिथून बाजूबाजुनं पुढं सरकत राहिले. सकाळी आम्हाला पठारावरची वाट ओरडून सांगणारे ते हेच होते. 

             ठाण्याच्या 'रामचंद्र' नगर मधून आलेला तो आठ-दहा जणांचा ग्रुप होता. त्यांची आत्ता प्रत्यक्ष भेट होत होती. ते दुसऱ्यांदा वाट भरकटले होते. त्यातील 'नचिकेत' ज्यानं आम्हाला  मार्गदर्शन केलं, तो आमच्या पनवेलला डेन्टल च्या तिसऱ्या वर्षाला आहे. यांना आणि 'अष्ट्या'हून आलेल्यांना पुढे जाण्यास वाट देवून आम्ही वाटेतच शिदोरी सोडली. 



माणिकगडाला असलेल्या दोन्ही बाजूच्या लिंगी, माणिकगड.

           जंगलातून एक पूर्ण वळसा मारून अंदाजे तीन-साडेतीन  तासात वाट गडाच्या मागे पोहचते. गडामागुन आणि मंदिरासमोरून किल्ल्यास असणाऱ्या दोन नैसर्गिक लिंगी दिसतात. आणि गडामागील मंदिरानंतर पुन्हा तासाभराचा डोंगराला मागून वळसा मारत, वाट शेवटच्या टप्प्यात पुन्हा वर समोर येते. थोडक्यात माणिकगड म्हणजे एक द्राविडी प्राणायाम दिसतो. गडमाथ्यावर पोहोचण्यापूर्वी समोर 'रसायनी' दिसते.  

           पूर्वाभिमुख असलेला किल्ल्याचा महादरवाजा पूर्ण उद्ध्वस्त दिसतो. दाराजवळ लावलेल्या फलकामुळंच  तो ओळखता येतो.

किल्ल्याचं मुख्य प्रवेश दार Manikgad
         महादरवाजा पार करून पुढे गेल्यास डोंगर उतारावर कातळात खोदलेली एक मोठी पाण्याची टाकी  दिसते. टाकीच्या पुढेच डोंगरउतारावरुन वाट अर्धवर्तुळाकार वळण घेते. पुढे उजवीकडुन तीव्र चढानं तुटलेल्या तटबंदीतून गडाच्या सर्वोच्च उंचीवर असलेल्या  बालेकिल्ल्यात येते. 

बालेकिल्ल्यात येताना 
किल्ल्यावरील अर्धवर्तुळाकार वळण (Manikgad Fort) 

बालेकिल्ल्याची वाट (Manikgad Fort) 
पाण्याची टाकी (Manikgad)


     बालेकिल्ल्याची तटबंदीही उद्ध्वस्त दिसते.  डावीकडेच पुढे चुन्याच्या घाण्याची जागा दिसते. सध्या तिथं कातळात कोरलेला वर्तुळाकार चर दिसतो. किल्ल्याच्या बांधकामासाठी दगड सांधताना या घाण्यात त्यावेळी चुना मळला असावा. 

चुन्याचा घाणा (Manikgad Fort)

बालेकिल्ला (Manikgad Fort)

        घाण्याच्या डावीकडे पुढे किल्ल्याची अर्धवट उद्ध्वस्त तटबंदी दिसते. शाबूत राहिलेल्या तटबंदीत काही ठिकाणी मारा करण्यासाठी ठेवलेल्या जंग्याही दिसतात.  पुढे गडमाथ्यावर उद्ध्वस्त मंदिराची जागा दिसते. सध्या त्याच्या गाभाऱ्यातील घूमटी तेवढी जागेवर दिसते. घूमटित एक देवतेची मूर्ती दिसते. त्यापुढेच डावीकडं पश्चिमेकडील तटबंदीत उद्ध्वस्त प्रवेशदार आणि खाली दरीत उतरणाऱ्या अर्धवट पायऱ्या दिसतात. खाली ठाव न लागणारी दरी असल्यानं ही वाट खूपच  धोकादायक वाटते.   

मंदिराची घुमटी (Manikgad Fort) 

          







            



पश्चिमेकडील उद्ध्वस्त दरवाजा 

                                                   डावीकडं समोर पश्चिमेकडं तोंड असलेला तिसरा दरवाजा दिसतो. दरवाजाच्या सभोवतीची तटबंदी उद्ध्वस्त दिसते. सध्या त्याच्या दगडी चौकटीची कमान जागेवर शिल्लक दिसते. चौकटीच्या माथ्यावर  एक सुंदर गणेशमूर्ती कोरलेली दिसते. याला 'हनुमान दरवाजा' म्हणतात. या गडाच्या बालेकिल्ल्यावरही तटबंदी असल्याचं दिसतं. बालेकिल्ल्यास दुहेरी तटबंदी असलेलं हे दुर्मिळ उदाहरण असावं.    

             'हनुमान' दरवाजा ओलांडल्यास उजवीकडं वाड्याचे अवशेष दिसतात. वाडा पूर्ण उद्ध्वस्त असून त्याच्या पायऱ्या आणि चौथऱ्याच्या मूळ आराखड्याचे दगड मात्र जागेवरच दिसतात. वाड्यासमोरून प्रचंड दरीपलिकडचे ईरशाळगड, प्रबळगड आणि माथेरान डोंगर दिसतात. 

              वाड्याच्या पुढे गडाच्या सर्वोच्च माथ्यावर असलेला सर्वात मोठा तलाव खोदलेला दिसतो. त्यातील पाण्याची पातळी तळाला गेली असून, पाणी पिण्यालायक नाही. या तलावाच्या बाजूला आणखी एक छोटी पाण्याची टाकी कोरलेली दिसते. 

वाड्याचे अवशेष 

 
उद्ध्वस्त वाडा 

             




              

गडमाथ्यावरचा तलाव (Manikgad Fort) 

           तलावापासून उजवीकडं वळल्यास गडाच्या पूर्वेकडील तटबंदिवर येतो. बुरुजापासून खाली ढासळलेल्या तटबंदिच्या बाजुनं काही पायऱ्या उतरल्यास, वाट किल्ल्यात प्रवेश करताना पहिल्या मुख्य प्रवेश दारासमोरुन जो बुरूज दिसतो त्या बुरुजावर येते.

बुरूज आणि पलीकडील खोल दरी (Manikgad Fort)  

वाड्यासमोरून दिसणारे प्रबळगड,ईरशाळगड,माथेरान डोंगर  
बुरुजाकडून तटबंदीवर येणाऱ्या तुटलेल्या पायऱ्या 
              पुढे चालत राहिल्यास डावीकडं कातळात बाजूबाजूलाच कोरलेल्या पाण्याच्या  टाक्या दिसतात. या टक्यांच्या बाजूला उघड्यावर छोटं महादेव मंदिर आहे. मंदिरात गाभाऱ्याच्या ठिकाणी शिवपिंड असून मागे दगडात कोरलेली गणेश मूर्ती ठेवलेली दिसते. पिंडीसामोरच नंदी आहे. 
           मंदिराकडं पाठ करून उभं राहिल्यास समोर प्रचंड दरीपलीकडचे डोंगरमाथे आणि दूरवर 'सांकशीचा' किल्ला असं सुंदर दृश्य दिसतं.   
पाण्याच्या टाक्या Manikgad Fort) 

 

महादेव मंदिर 

समोर किल्ले सांकशी 

          
          इथं आम्हाला पुढे आलेला 'अष्टया'चा ग्रुप भेटला. पुढे येऊन, जेवण बनवून, सर्व जेवायच्या तयारीत होते. आम्हालाही आग्रह झाला, पण आमचं जेवण आधीच उरकल्यानं नम्र नकार दिला. फारच आग्रह झाल्यानं आम्ही उभयतांनी दोन दोन घास घेतले. थोड्या गप्पाही झाल्या. ते सर्वजण अष्टयाच्या 'भेसरे' कुटुंबातील होते. खोपोली, ठाणे तर काहीजण उल्हासनगरहुन एकत्र आले होते.                        
            आज त्यांचं या दुर्गम किल्ल्यावर गेट टूगेदर होतं. मागील ३१ डिसेंबरला ते सगळे मिळून रायगडला गेले होते तर मागील वर्षी शेगावला. 
         त्यांचा आग्रही पाहुणचार आणि कुटुंबाची एकी बघून कौतुक वाटलं. नऊ गावचे सरपंच असलेले श्री भेसरे आम्हाला पिण्यालायक पाण्याची टाकी दाखवण्यासाठी स्वतः गडाच्या पश्चिमेला धोकादायक दरीकाठाच्या  कातळ उतारावर आले. ती पाण्याची टाकी त्यावेळी आम्हाला दाखवली नसती तर, खाली परतेपर्यंत आम्हाला नक्कीच पाण्याची अडचण आली असती. त्यांची जेवणं आटोपायची असल्यानं आम्ही त्यांचा निरोप घेतला. 
कातळातील दरिकाठावरची टाकी 

          या किल्ल्याचं बांधकाम नौदलप्रमुख, सरखेल 'कान्होजी आंग्रें'नी केलं. इंग्रज, पोर्तुगीज आरमारानं अथक प्रयत्न करूनही मराठा आरमार या दर्यासारंगानं अजिंक्य ठेवलं. त्यांनी संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर अनिर्बंध सत्ता गाजविली होती. त्याच दरम्यान कान्होजींनी हा किल्ला बांधला असावा. नंतर १७१८ ला पेशव्यांनी या किल्ल्याचा ताबा कान्होजींनाच दिला..

            दुपारचे तीन वाजले होते. गडमाथा आटोपशीर असल्यानं तासाभरात गडफेरी पूर्ण झाली. अंधाराच्या आधी 'वाशिवली' गाठायची होती. २५०० फुट उंचीवरील,सह्याद्रीच्या मुळ पर्वतरांगेत येणारा हा किल्ला आणि त्याचा  शेवटचा अवघड टप्पा उतरून, पुन्हा तेवढीच पायपीट करून परत जायचं होतं. 

       खाली उतरून मारुतीचं देऊळ गाठल्यावर बरं वाटलं. पुढं दोन तीन तासाची पायपीट अजून शिल्लक होतीच पण धोका नव्हता. 

          मजल दरमजल करत पठार गाठलं. उरलेलं पठार आज पुन्हा जळताना दिसलं. उन्हाळ्यातील उष्णतेनं कोरडी पानं आणि गवतानं पेट घेतला असावा किंवा हा मानवी निष्काळजीपणाही असावा. हे एक न सुटलेलं कोडं आहे. दिवसभर उन्हात तापलेलं गवत, झुडूपं  कापसासारखं पेटताना दिसत होतं. फुलपाखरं आणि कीटकांची होणारी धावाधाव, त्यांची तडफड आम्ही प्रत्यक्ष जवळून अनुभवली.. 

Manikgad 
Manikgad 

 


                                 || श्री कृष्णार्पणमस्तु || 
येथे - जयवंत जाधव   

ऑफबीट - खरोसा लेणी, निलंगा, जि. लातूर Offbeat - Ancient Kharosa caves, Dist. Latur, Maharashtra.

                        महाराष्ट्रात वैशिष्ट्यपूर्ण अशी बरीच लेणी आहेत. काहींची प्रसिद्धी तर जगभर पोहोचली आहे. त्यांची कोरीव कलाकुसर आजही थक...