Sunday 27 March 2022

ऑफबीट - चिरनेर (Offbeat Chirner)

              चिरनेर., रायगड जिल्ह्यात उरण तालुक्यातील एक अपरंपरागत, निसर्गरम्य, समुद्रालगत आणि पुरातन इतिहास सांगणारं छोटं खेडं. चिरनेरचा ऐतिहासिक सत्याग्रह, प्रशस्त तळ्याकाठी पुरातन जागृत महागणपती आणि  शंभू महादेव मंदिर प्रसिद्ध आहे. नोव्हेंबर - डिसेंबर मध्ये पोपटीचा हंगाम आणि बऱ्याच प्रमाणात इथं असलेली शेततळी, इथली मातीची भांडी हे सर्व नजीकच्या काळात मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे शहरातील निसर्गप्रेमी आणि भाविकांना आकर्षित करताना दिसतं. 
श्री महागणपती (Chirner)

गाभाऱ्याच्या चौकटीवरील शिल्प गणेशपट्टी 

         द्रोणागिरी किल्ला, सागरी वाहतुकीचं जवाहरलाल नेहरू पोर्ट, शहरीकरणात अग्रेसर असलेलं उल्वे शहर, भविष्यातील न्हावा शेवा सागरी सेतु आणि पनवेल नजीक होणारं आंतरराष्ट्रीय विमानतळ यामुळं उरण परिसर सध्या लक्षणीय प्रगती करताना दिसतं. 
               उरणच्या पूर्वेला १४ किमी आणि पनवेलच्या पश्चिमेला २४ किमी असलेलं हे चिरनेर मध्यवर्ती आणि सोईस्कर ठिकाण म्हणता येईल. १२०० वर्षापूर्वी शिलाहार घराण्यातील बिंबी राजाची या कोकण प्रांतावर सत्ता होती. चिरनेर हे त्यावेळी मुंबई बंदराशी व्यापार संबंध ठेवून होतं. त्यामुळं या खेड्यात आठरापगड जातीच्या लोकांची वस्ती एकवटली. मंदिरं उभारली. कदाचित त्यावेळचं इथलं गणपती आणि शंभू महादेव मंदिर  असावं. 

श्री महागणपती मंदिर (Chirner)

 

            

           सरासरी शंभर वर्षांपर्यंत इथं घनदाट जंगल होतं. स्थानिक आगरी समाज जंगलातून मध, जळाऊ लाकूड, पशुपालन, फळे, रानभाज्या आणि शिकार यावर गुजराण करत. १८७८ च्या जंगल कायद्यात सुधारणा करून १९२७ ला इंग्रजांनी स्थानिकांना जंगलात बंदी घातली. त्यांच्या पोटापाण्याचे हाल होऊ लागले, साऱ्या भारतवर्षात थोड्याअधिक फरकानं स्थानिकांवर हीच वेळ आली. देशभर जंगल सत्याग्रह पुकारला गेला. त्या सत्याग्रहास उरण चिरनेरच्या आगरी जनतेने भरघोस पाठिंबा दिला. 

 

हुतात्मा स्मारक (Chirner)

            अहिंसेच्या मार्गानं चाललेल्या या आंदोलनाला हिंसेचं वळण मिळालं. २५ सप्टेंबर १९३० ला चिरनेरच्या अक्कादेवीच्या माळरानावर ब्रिटिशांनी गोळीबार केला. त्यात काही स्थानिक मारले गेले. घटनेच्या चौकशी दरम्यान चिरनेरचे काही आरोपी ठरवून पकडले. गावात पोलिस चौकी नसल्यानं या गणपतीच्या देवळात त्यांना कोंडून मारहाण करण्यात आली होती. 

               या घटनेचा निषेध करण्यासाठी गावातील बाळाराम रामजी ठाकूर हा तरुण देवळाजवळ आला. त्यावेळी पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला. बाळारामचा हात जखमी झाला. त्या दरम्यान एक गोळी देवळाच्या लोखंडी गजाला लागली होती. ग्रामस्थांनी या लोखंडी गजाची आठवण आजही जपून ठेवली आहे. देवळात प्रवेश करताना डाव्या बाजूला   हा गोळी लागलेला गज सर्वांना स्पष्ट दिसेल असा खिडकीत बंदिस्त करून ठेवलेला दिसतो. 

१९३० चा गोळी लागलेला लोखंडी गज 

 

  
 

              त्यावेळी एकूण आठ क्रांतिकारक शहीद झाले. त्यांच्या स्मरणार्थ जानेवारी १९३२ ला स्मृतिस्तंभ बांधला गेला. पण जून १९३२ ला लगेच तो इंग्रज सरकारनं पाडला. पुन्हा जानेवारी १९३९ ला मुंबई जिल्ह्याचे प्रमुख प्रधान श्री खेर यांच्या हस्ते उभारण्यात आला. हा सुंदर शिल्प स्तंभ स्मारक मंदिराला लागूनच दक्षिणेला दिसतो. 
हुतात्मा स्तंभ (Chirner)

             सप्टेंबर २००५ साली तळ्याकाठावर राखीव जागेत हुतात्मा क्रांतीकारकांचे भव्य बोलके पुतळे उभारलेले आहेत. प्रत्येक पुतळ्याखाली त्यांचे नांव, गांव आणि कोणत्या क्षणी त्यांना वीरमरण आलं, त्या क्षणाचा उल्लेख लिहिलेला दिसतो. श्री महागणपतीचा आशीर्वाद घेणारा प्रत्यक भाविक इथं ओढला जातो आणि या हुतात्म्यापुढे नतमस्तक होताना दिसतो.

          बाराव्या शतकापासून इस्लामिक आणि त्यानंतर पोर्तुगीजांनी केलेली आक्रमणं आणि जबरदस्तीचं धर्मपरिवर्तन यातून मंदिरं आणि मुर्त्याही सुटल्या नाहीत. मंदिरं तुटली पण त्यावेळच्या पूजाऱ्यांनी मुर्त्या वाचविण्याचा प्रयत्न केला. कुठे तळघरात, विहिरीत, तळ्यात तर कुठे जमिनीखाली मुर्त्या लपविल्या गेल्या. शिवछत्रपतींनी लावलेला स्वराज्याचा वटवृक्ष पेशवेकाळात अगदी अटकेपार फोफावला. पुन्हा देव, देश आणि स्वधर्म वाढीस लागला. 

           जसे नानासाहेब पेशवे गणेशभक्त होते, तसे उरण प्रांताचे त्यांचे सुभेदार रामजी महादेव फडकेही गणेशभक्त होते. धर्मांतरासाठी छळणाऱ्या पोर्तुगीजांचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला. त्यांनी उरण, पाली पोर्तुगीज मुक्त केली. त्यांना तळ्यातल्या गणेशाचा दृष्टान्त झाला आणि या महागणपतीची पुन्हा स्थापना झाली. 

            तळ्याकाठावर श्री महागणपती मंदिर बांधलं. मंदिराच्या पूर्वेस असलेल्या तळ्यास 'देवाचं तळं' नांव पडलं. पाच फुट उंचीची श्री महागणपतीची सिंदूरचर्चित मूर्ती पूर्वाभिमुख आहे. महडचा स्वयंभू श्री वरदविनायक आणि या मूर्तीत बरंच साम्य दिसतं. मूर्ती इतकी प्रसन्न, सुंदर आणि सुरेख आहे की, बघताक्षणी भाविक सुखावून जातो. गाभाऱ्यासमोर उंच पितळी रेखीव स्तंभावर मोठा नक्षीदार मूषक श्री महागणपतीकडे तोंड करून दोन पायावर उभा आहे.

गाभाऱ्यासमोरील पितळी मूषक 

                  

मंदिराचं नवीन बांधलेलं सभामंडप (Chirner) 

             मंदिराचा गाभारा दगडी असून, अंतराळ गोल घुमटाकार आहे. गाभाऱ्याच्या चौकटीवर दगडात कोरलेली गणेशपट्टि दिसते. गाभाऱ्यावर पितळी कळस दिसतो. गाभाऱ्याच्या चार कोपऱ्यात चार चबुतरे ठेवलेले  दिसतात. सध्या मूळ गाभाऱ्याला बाहेरून प्लास्टर केले असून, पूर्ण मंदिराला आतून बाहेरून उठावदार रंग लावलेला दिसतो. पुढे कालांतरानं गाभाऱ्यापुढील सभामंडप बांधलेला दिसतो. 

           या सभामंडपास लागूनच नजीकच्या काळात आणखी एक भव्य, प्रशस्त मंडप बांधलेला दिसतो. हा नवीन सभामंडप इतका प्रशस्त आहे की, गावातील लग्न आणि इतर शुभकार्य इथं केली जातात. तळ्याकाठच्या या मंदिरासमोर प्रशस्त समतल मोकळी जागा दिसते. मंदिराच्या उजवीकडे दक्षिणेला जुनं कौलारू मारुती मंदिर दिसतं. 

            तळ्याकाठावरच गणपती मंदिरासमोर पुरातन श्री शंभू महादेवाचं मंदिर आहे. मंदिराचा सभामंडप नजीकच्या काळात बांधलेला दिसतो. गाभारा लहान असला तरी, गाभाऱ्याच्या उजवीकडे दिवडीत गणेश तर डावीकडील दिवडीत कार्तिक स्वामींची सुबक मूर्ती दिसते. गाभाऱ्यात शिवपिंडी असून, पिंडीवर कलशातून पडणारी अखंड जलधार दिसते. पिंडीसमोर पाषाणी भिंतीतील दिवडीत माता पार्वती स्थापित दिसते. भिंतीच्या गाभाऱ्यासमोर सभामंडपात पाषाणात घडविलेला नंदी दिसतो. 

    

श्री शंभू महादेव मंदिर (Chirner)
गद्धेगळ (Chirner)

            मंदिराच्या बाजूलाच जमिनीत उभी शेंदूर लावलेली गद्धेगळ दिसते. अगदी तळ्याकाठावर हे मंदिर आहे. 

नंदी 

         इ. स. १७३९ ला वसईच्या स्वारीवर निघताना चिमाजि आप्पांनी या महागणपती आणि शंभू महादेवाचे आशीर्वाद घेतल्याची माहिती गावात मिळते. 

शिवलिंग आणि मागे माता पार्वती (Chirner)

              




           

           या भव्य तळ्याला एकूण चार दगडी घाट आहेत. काही स्थानिक घाटावर झाडांच्या सावलीत मासेमारीसाठी पाण्यात गळ टाकून बसलेले दिसतात. 

मासेमारी करणारे स्थानिक (Chirner)

देवाचं तळं (Chirner)

देवाचं तळं - डावीकडे महादेव आणि समोर महागणपती मंदिर (Chirner)

             चिरनेर गावात मातीची भांडी तयार करून येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांना विकण्याचा व्यवसायही दिसतो. त्यासाठी लागणारी माती इथल्या शेतातून काढली जाते. माती काढल्यानंतर तयार झालेल्या खड्ड्यात पाणी साठवून शेततळी तयार करतात. या शेततळ्यात मस्त्योद्योग करताना स्थानिक दिसतात. 

  

पोपटी पार्टीचा आस्वाद घेताना महिला मंडळ (Chirner)

भांडी विकणारी चिरनेर ची भगिनी 

 

मातीची भांडी बनवताना (Chirner)

  

             निसर्गाच्या सानिध्यात इथली शेततळी, तळ्याकाठी प्रशस्त जागेतील महागणपती, शंभू महादेव, कौलारू मारुती मंदिर, हुतात्म्याचे बोलके भावूक पुतळे आणि भव्य शिल्प स्मारक तसेच इथली शांतता, हे रोजच्या धावपळीतुन वेळ काढून एकदा तरी अनुभवावं असं आहे..

                                      || श्री कृष्णार्पणमस्तु ||

येथे - जयवंत जाधव 

Saturday 12 March 2022

श्री लक्ष्मी नृसिंह - श्रीक्षेत्र निरा नृसिंहपूर (Shri Neera Nrusinhpur)

          'नरसिंह होऊनिया, घुमवित गर्जनांसी; शतसूर्य तेज दावा, अज्ञात या जणांशी'..या श्रीधर फडकेंच्या भक्ति गीतातील नरसिंह अवतारातील भगवान विष्णूंची मंदिरं महाराष्ट्रात खूप कमी दिसतात. प्राचीन आणि ठराविक मुख्य मंदिरांपैकी 'निरा नृसिंहपुर' हे एक आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्य प्रदेशातील अनेक भक्तांचा 'श्री नृसिंह' कुलस्वामी आहेच पण ज्यांचा कुलस्वामी नाही, त्यांनाही भयमुक्त करणारा हा श्री विष्णू अवतार आकर्षित करताना दिसतो.   

 श्री विष्णू (Neera Nrusinhpur)

           श्रीक्षेत्र निरा नृसिंहपुर हे आमच्या राहत्या पनवेलहून २८५ किमी तर पुणे जिल्ह्यात, पुणे शहरापासून अंदाजे १८५ किमी, अग्नेयेस, इंदापूर तालुक्यात, सोलापूर जिल्ह्याच्या काठावर भिमा आणि निरा नदीच्या पवित्र संगमावर स्थापित आहे. रेल्वेनं यायचं झाल्यास कुर्डुवाडी स्टेशनवर उतरून, सोलापूर महामार्गावरील टेंभूर्णी आणि पुढे अकलुजला जाणाऱ्या एस्. टी. बसनं 'संगम चौक'ला उतरावं. पुढे रिक्षानं दीड किमी वरील भीमा नदीचा पूल ओलांडल्यास डावीकडं हे पुरातन श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर लक्ष वेधून घेतं. स्वतःचं वाहन असल्यास हेच अंतर पाच सहा तासात गाठता येतं. 

भीमा नदीवरील पूल 
श्रीक्षेत्र निरा नृसिंहपूर (Neera Nrusinhpur)


श्री लक्ष्मी नृसिंह (Neera Nrusinhpur)

            भिमा नदीनं पश्चिम - उत्तर - पूर्व असा वळणदार घेतलेला वळसा आणि दक्षिणेकडून भिमेला पूर्वेस मिळालेली निरा नदी, यामुळं निरा नृसिंहपुर हा अगदी सिंहाच्या नखाच्या आकारातील भूप्रदेश दिसतो. आणि या अवतारी ठिकाणाबद्दल हेही एक वैशिष्ठ्य म्हणावं लागेल.

           दैत्यासुर हिरण्यकश्यपू वधासाठी घेतलेला श्री विष्णूंचा नृसिंह हा चौथा अवतार मानलं गेलं आहे. तर याआधी हिरण्यकश्यपूचा भाऊ हिरणाक्ष, ज्यानं अत्याचारानं पृथ्वी रसातळाला नेली होती, त्याच्या निर्दालनसाठी तिसऱ्या अवतारात श्री विष्णूंनी वराह अवतार घेतला. आपला बंधू  हिरणाक्षाच्या वधामुळं हिरण्यकश्यपू सुडानं पेटून उठला. श्री विष्णूला संपविण्यासाठी त्यानं ब्रह्मदेवाची घोर आराधना सुरू केली.

       दरम्यान इंद्रानं त्याच्या राज्यावर हल्ला चढवून हिरण्यकश्यपूची पत्नी 'कयाधू'चं हरण केलं. गर्भावस्थेत असलेल्या कयाधूची नारदांनी सुटका केली आणि आपल्या आश्रमात नेलं. त्रिकालज्ञानी नारदांनी कयाधूच्या गर्भातील प्रल्हादाला दिव्यज्ञानाचा उपदेश केला.

        ब्रम्हदेवाकडून अमरत्वाचा वर घेवून हिरण्यकश्यपू परतल्यानंतर प्रल्हादाचा जन्म झाला. नारद कृपेनं असुरपुत्र प्रल्हाद विष्णुभक्त झाला. पुढे नारदांकडे तो भीमा निरेच्या संगमावर येऊन भक्ति करू लागला. तिथं त्यानं वाळूची नृसिंहाची मूर्ती बनवून मनोभावे पूजु लागला. कालांतरानं श्री विष्णु प्रसन्न होऊन त्यास वर मागण्यास सांगितले. प्रह्लादानं श्री विष्णूना त्या मूर्तीत कायम वास्तव्य करण्यास सांगितलं. श्री विष्णूनी विनंती मान्य करून, मूर्तीचं दर्शन घेणाऱ्या भक्तांचे नित्य रक्षण करण्याचं वचन प्रल्हादास दिलं. 

दक्षिण प्रवेशद्वार (Shri Neera Nrusinhpur)

   

मंदिर मंडपातून गाभारा (Neera Nrusinhpur)

         







         आपला बंधु हिरणाक्षचा वध करणाऱ्या विष्णूप्रती प्रल्हादाची भक्ति बघून हिरण्यकश्यपू संतापून उठत असे. अनेक प्रयासांनी प्रल्हाद विष्णूभक्तिपासून ढळत नसल्याचं पाहून त्यानं प्रल्हादास जीवे मारण्याचे प्रयत्न केले. अंती भरसभेत हिरण्यकश्यपूनं प्रल्हादास विष्णूचं अस्तित्व विचारलं. सर्वव्यापी असल्यानं प्रल्हादानं समोर दिसणाऱ्या खांबाकडं बोट दाखवलं. 

            संतापून हिरण्यकश्यपूनं हातातील गदेनं त्या खांबावर प्रहार केले. त्यावेळी ब्रह्मांड फुटावेत असे खांबातून अति भयंकर आवाज झाले. मानवी धड आणि सिंहाचं तोंड असं श्रीहरी विष्णू भयंकर रुपात प्रकटले. कराल दाढा, चंचल तीक्ष्ण जीभ, कान शंकुसारखे ताठ होते. नाकपुड्या पर्वतातील गुहेसारख्या, तर मस्तक आणि वक्षस्थळ विशाल दिसत होतं.  चढवलेल्या भुवयांमुळं चेहरा उग्र झाला होता.  नखं हीच त्यांची शस्त्र होती. त्यांच्या जवळ जाणंही अशक्य होतं. तरीसुद्धा हिरण्यकश्यपूनं धाव घेवून त्यांना ललकारलं. 

           नृसिंह रूपातील श्री विष्णुंनी त्याला गदेसह अलगद उचलून, श्री ब्रम्हाच्या वरदानाचा मान राखत, ना घरात ना दरात तर  दोन्ही दारांच्या उंबऱ्यावर बसून; ना जमीन ना आकाश तर आपल्या मांडीवर उताणा पाडून; ना दिवसा ना रात्री तर संध्याकाळी; ना मानव ना प्राणी तर नर आणि सिंहाचा जोड अवतार घेऊन हिरण्यकश्यपूची छाती विदीर्ण केली. त्याला दूर फेकून दिलं. आजूबाजूच्या शस्त्रधारी राक्षासांनाही त्यांनी क्षणात संपविलं. 

         क्रोधानं तप्त, लाल झालेल्या नृसिंह मुखातून बाहेर आग पडू लागली. त्यांना शांत करण्यासाठी प्रत्यक्ष देवांचीही तारांबळ उडाली. शेवटी देवांनी प्रल्हादाला विनवणी केली. 

          प्रल्हाद उग्ररूपी नृसिंहाकडे गेला आणि नमस्कार घातला. लोक भयमुक्तीसाठी या आवताराचं स्मरण करतील अशी नरहरीस ग्वाही दिली. तेव्हा त्यांनी शांत होऊन देवी लक्ष्मी आणि शेषनागासह सर्वांना दर्शन दिलं. प्रल्हादास अनेक आशीर्वाद देऊन निघून गेले. 

              श्री विष्णुंनी घेतलेल्या या चौथ्या चमत्कारिक अवतार कथेवर भगवान व्यासांनी स्वतंत्र नृसिंहपुराण लिहिलं आहे. पद्मपुराणात निरा नृसिंहपुर हे सुदर्शनीय क्षेत्र असून, पृथ्वीच्या नाभिचं केंद्र असल्याचं भू वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालं आहे. हे भक्तांना आकर्षून घेणारं आणखी एक कारण असावं.

परिवार देवता मंदिरं (Neera Nrusinhpur)
 

          विष्णूभक्त ब्रम्हदेवाकृत आणि विष्णूभक्त प्रल्हादाकृत अशा दोन नृसिंह मूर्ती आज नीरा नृसिंहपूरच्या मंदिरातील एकाच गाभाऱ्यात स्थापित दिसतात. गाभाऱ्यातील प्रल्हादाकृत वाळूची मूर्ती ही आद्य मूर्ती मानली जाते. ती पश्चिमाभिमुख आहे. त्यामुळं मंदिराच्या पश्चिमेकडील दरवाज्याला 'महादरवाजा' म्हटलं जातं. या वाळूच्या मूर्तीची झीज होऊ नये म्हणून, मूर्तीवर वज्रलेप केल्याची माहिती आम्हाला मंदिरातील पुजाऱ्यांनी दिली. ब्रम्हदेवाकृत काळ्या पाषाणातील दुसरी श्रीमुर्ती या मूळ मूर्तीच्या डाव्या बाजूस त्याच गाभाऱ्यात उत्तराभिमुख दिसते. श्री विष्णुंचं नृसिंह अवतारातील भीषण रूप शांत झालेलं या मूर्तीत दिसतं. त्यामुळं या मूर्तीस 'शामराज' म्हणतात.

 

समोर प्रल्हादाकृत नृसिंह आणि उजवीकडे ब्रम्हदेवकृत नृसिंह 

 

               'श्री'च्या मूर्तीसमोर चांदीनं मढवलेली आडवी दांडी दिसते. समई, पूजा साहित्य ठेवण्यासाठी तिचा वापर होतो. चांदीत मढवलेल्या दांडीवर शंख, चक्र कमळ, गदा अशी श्री विष्णूची शुभ चिन्हे कोरलेली दिसतात. 

                श्री नृसिंह मंदिराच्या डाव्या बाजूलाच श्री लक्ष्मी मंदिर दिसतं. मंदिरावर दगडी शिखर आहे. शिखराच्या दोन दगडी फटीतून दिवस रात्र पाणी झिरपताना दिसतं. हा लहानसा पाझर 'गुप्त गंगा' म्हणून ओळखला जातो. या मंदिराचं शिखर नदीपात्रापासून सरासरी १५० फुट उंचीवर आहे. हा एक चमत्कार असून, तर्कशास्त्रानेही याचा आजपर्यंत उलगडा झालेला नाही.

 

मागे, समोर दिसणारे श्री लक्ष्मी मंदिर 

             निरा, भीमा आणि ही गुप्त गंगा असा त्रिवेणी संगम असल्यानं निरा नृसिंहपूर हे 'दक्षिण प्रयाग' म्हणून ओळखले जाते. ही प्रल्हादाची जन्मभूमी आणि तपोभूमी मानली जाते. या पवित्र क्षेत्राला महर्षि व्यास, आद्य शंकराचार्य, आद्य माधवाचार्य असे महात्मे येवून गेले. संत तुकाराम, त्यांची शिष्या बहिणाबाई कुलकर्णी,अहिल्याबाई होळकर, तात्या टोपे, दुसरे बाजीराव पेशवे इत्यादि इथे नृसिंह दर्शनास येऊन गेले. 

काशी विश्वेश्वर मंदिर (shri Neera Nrusinhpur)
श्री काशी विश्वेश्वर शिवलिंग 
    

            श्री नृसिंह मंदिरासमोर लाकडी मंडपात, 'श्री'च्या मूर्तीकडे तोंड करून प्रल्हाद मूर्ती दिसते.  प्रल्हाद मंडपात वर व आजूबाजूला लाकडी कपाटात दशावतार ठेवलेले दिसतात. मंदिराची मुख्य चौकट आणि दरवाजे पितळी असून, त्यावर अतिशय सुबक नक्षी कोरलेली दिसते. सभामंडप अनेक दगडी कोरीव खांबांवर तोललेला दिसतो.
श्री प्रल्हाद मूर्ती (Neera Nrusinhpur)

 

प्रल्हाद मंदिर (shri Neera Nrusinh)

          गाभाऱ्याच्या दोन्ही बाजूस दोन खोल्या असून त्यापैकी एक 'श्री'च शेजघर आहे. पहाटे साडे पाच वाजता मंदिर उघडले जाते. रात्री नऊ वाजता 'श्री' ची शेजारती होऊन ते बंद होतं. मंदिर व्यवस्थापनाची स्वतंत्र पाठशाळा असून, तिथं लहान मुलांना वेदाअभ्यास शिकविला जातो. धोतर आणि  पांढऱ्या बंडीत ही मुलं तिथं बागडताना दिसतात. 
  
'श्री' चे शेजघर 
                सरासरी इ. स. ८७० वर्षापूर्वी इथं मूळ मंदिर असावं. त्यानंतर १७८७ च्या पेशवेकाळात नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील, सरदार विठ्ठल शिवदेव विंचुरकरांच्या घराण्यानं पुढं टप्प्याटप्प्यानं या मंदिराचा जीर्णोद्धार करून सध्या दिसणारं मंदिर बांधल्याचं निरा नृसिंहपुरचा इतिहास सांगतो. यंत्राकर बांधलेल्या चबुतऱ्यावर श्रीमुर्ती विराजित असून त्यावर 'श्री'चे अंतराळ व गर्भगृह बांधलेलं दिसतं. पुढे विठ्ठल शिवदेवांचे पुत्र शिवाजी विठ्ठल यांनी मंदिराच्या अंतराळापुढील दगडी मंडप, पश्चिम दरवाजा व नगारखाना बांधवून घेतला. त्यांचे पणतू विठ्ठल नरसिंह यांनी मंदिराचा लाकडी सभामंडप, धर्मशाळा आणि पूर्वेकडील अभेद्य तटात दोन्ही बाजूचे भक्कम दिसणारे बुरूज बांधले. 

              हेमाडपंथी बांधणीच्या या मंदिरास भक्कम असा तट दिसतो. मंदिराच्या दक्षिण, पूर्व आणि उत्तरेस ओवऱ्या दिसतात. विठ्ठल शिवदेवांचे खापर पणतू रघुनाथरावांनी मंदिराच्या शिखराचा जीर्णोद्धार केला. त्यांनीच 'श्री'चे सिंहासन चांदीनं मढविल्याची इतिहासात नोंद मिळते. 

सोळखांबी मंदिर - भीमा निरा संगम 

भीमा निरा संगम 
           












              दादोजी मुधोजींनी १५२७ ला संगमावरील पुरातन दिसणारा घाट बांधला. त्यानीच संगमावरील सोळाखांबी दिसणारं ओवऱ्यांचं अश्वस्थ नृसिंह मंदिर बांधलं. 
१५२७ चा संगमावरील घाट 

संगमाकडे येणारा पदपथ बांधकाम 

               




           सध्या निरेच्या काठी मंदिराच्या दक्षिणेकडील उर्वरित घाट आणि पदरस्ता बांधण्याचं काम चालू दिसतं.

सध्या निरेकाठावरील घाट बांधणी काम 
    

         मंदिराच्या प्राकारात मंदिर उभारणी वेळी बसविलेला मुहूर्त गणपती, काशी विश्वेश्वर शिवलिंग, विठ्ठल रुक्मिणी, श्री दत्त अशा परिवार देवता दिसतात. मंदिराच्या डाव्या बाजूस जतन केलेला दुर्मिळ असा 'तरटी' वृक्ष दिसतो. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाचा मुक्काम नृसिंहपुर जवळील अकलूज येथे पडला होता. परधर्माचा तिरस्कार आणि धर्मस्थळे उद्ध्वस्त करण्यात त्याचा हातखंडा होताच. त्यावेळी पूजाऱ्यांनी दोन्ही नृसिंहाच्या मूर्ती या तरटी वृक्षाखाली तळघरात लपविल्या होत्या. 
डावीकडे विश्वेश्वर मंदिर, समोर मूळ नृसिंह मंदिर आणि उजवीकडे दुर्मिळ 'तरटी' वृक्ष 
  

पश्चिम दारावरील घाट 

        मंदिर उंच जोत्यावर बांधलं असून, मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन टप्प्यात पायऱ्या दिसतात. पैकी पावसाळ्यात भीमा निरेच्या महापुरात पाणी पहिल्या टप्प्यापर्यंत वर चढतं. पश्चिम दरवाज्यातून आत मंदिर प्राकारात आत आल्यास दोन्ही बाजूस तटबंदीत पहारेकऱ्यांच्या देवड्या दिसतात. त्यापुढेच एक प्रचंड घंटा दिसते. इ.स. १७३९ ला चिमाजी अप्पांनी पोर्तुगीजांकडून वसईचा किल्ला जिंकल्यावर, त्या किल्ल्यावरील चार प्रचंड मोठ्या घंटा ताब्यात घेतल्या. त्यापैकी ही एक आहे. याच पेशवेकाळात तिथं बाबा सोनार नावाचा प्रख्यात पैलवान होऊन गेला. मोठमोठी झाडं तो मूळापासून सहज उपटत असे. या पैलवानानं ही प्रचंड घाट डाव्या हातानं उचलून, उजव्या हातानं तिथल्या लाकडी तुळीला बांधली. त्यांच्या गौरवानिमित्त मंदिराच्या लाकडी माडीजवळ वर दर्शनी भागात त्याचा पुतळा दिसतो. 

प्राकारातील दीपमाळ, डावीकडे माडीवर पै. बाबा सोनार पुतळा 

                    वैशाख शुक्ल षष्ठी ते चतुर्दशी असे नऊ दिवस नृसिंह उत्सव साजरा होतो. १७९५ ला निजामाशी झालेल्या घनघोर युद्धात खंडेराव विंचुरकरांनी अतुलनीय पराक्रम गाजवला. नंतर ते निरा नृसिंहपूरी आले. पण त्यानंतर अचानक त्यांचं निधन झालं. विंचुरकर घराण्याचं या देवस्थानास अमोल योगदान मिळालं. त्यांच्या अचानक निधनामुळं आजही श्री नृसिंहाचा नवरात्र उत्सव वैशाख षष्ठी ऐवजी सप्तमीस सुरू होतो..                                              

                                   || श्री कृष्णार्पणमस्तू ||

येथे - जयवंत जाधव     

ऑफबीट - खरोसा लेणी, निलंगा, जि. लातूर Offbeat - Ancient Kharosa caves, Dist. Latur, Maharashtra.

                        महाराष्ट्रात वैशिष्ट्यपूर्ण अशी बरीच लेणी आहेत. काहींची प्रसिद्धी तर जगभर पोहोचली आहे. त्यांची कोरीव कलाकुसर आजही थक...