Friday 25 November 2022

किल्ले रोहिडा (विचित्र गड) Fort Rohida (Vichitragad)

                       दसरा गेला आणि परतीच्या पावसानं पुन्हा जोर धरला. तीन दिवस झोडपून काढलं. पुढली चार दिवस उसंत घेऊन परत कोसळू लगला. पनवेल परिसरातील भातं पोसवुन गळ्याशी आली. दिवाळी सरली तसा पाऊस सरला. ऑक्टोबर उष्णतेच्या आधीच हवेत गारठा जाणवू लागला. दिवसभर उष्णता आणि पहाटे गारठा अशा नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात हवामान खात्यानं 'मुंबई आणि परिसरातील हवामान वाईट, अति वाईट..' जाहीर केलं.

                        आणि या दरम्यान 'बाजी बांदल' अर्थात इतिहासात 'बाजीप्रभू देशपांडे' नावाचं रत्न शिवरायांना जिथं गवसलं, त्या सह्याद्रीच्या 'महाबळेश्वर डोंगर' रांगेत ३६६५ फूट उंचीवरील 'किल्ले रोहिड्या'चं नियोजन केलं. रोहिड्याला 'विचित्रगड' किंवा 'बिनीचा किल्ला' म्हणूनही ओळखलं जातं.
                      

किल्ले रोहिडा (विचित्र गड) (Rohida Fort)

                 साताऱ्याचे दोन, पुण्याचा एक आणि पनवेलहून मी असे चार बालमित्र नोव्हेंबरच्या तिसऱ्या शुक्रवारी, संध्याकाळी पुण्याच्या रोहिड खोऱ्यातल्या 'बाजारवाडी' गावात जमलो. आधी कलावंतीण आणि प्रबळच्या भटकंतीसाठी आम्ही एकत्र आलो होतो.

                    किल्ले रोहिड्याला भेट द्यायची झाल्यास, पुणे - भोर - बाजारवाडी अशा एस टी बसेस आहेत. पण पुढील भटकंती सोईची व्हावी म्हणून आम्ही प्रत्येकजण स्वतः च्या वाहनांन तिथं जमलो.

गडपायथ्याचं घर आणि मागे किल्ले रोहिडा (Rohida Fort)
                    'बाजारवाडी' हे पुणे जिल्ह्यातील भोरपासून दक्षिणेला ८ किमीवर आणि किल्ल्याच्या पूर्व पायथ्याला असलेल्या 'दशरथ शिंदे' या बालमित्राचं गांव. गावात वडिलोपार्जित शेती आणि त्या ठिकाणीच सध्या दोन्ही भावांनी मिळून कौतुक करण्यासारखं टुमदार घर बांधलं. शे शंभर माणसं राहतील असं आधुनिक सुविधा असलेल्या या घराच्या अंगणातूनच 'किल्ले रोहिड्याचं' मनोहारी दृश्य दिसतं. आमची तिथं राहण्याची सोय झालीच. 'निरा' नदीच्या खोऱ्यात वसलेली आणि 'भाटगर' धरणामुळं ही गावं विज, पाणी आणि दळणवळणांच्या साधनांमुळं आज संपन्न दिसतात.
भाटगर धरण, तालुका भोर (Rohida)
                आम्ही सकाळी सात वाजता डोंगर चढाईला सुरुवात केली. घराच्या बाजूलाच 'किल्ले रोहीड्या'ची  पायवाट दाखवणारा ठळक बोर्ड दिसतो. बोर्डाच्या बाजूला किल्ल्याबद्दल माहिती लिहिलेले मोठे फलक फॉरेस्ट खात्याच्या हद्दीत उभे आहेत. गावाबाहेर किल्ल्याच्या पायवाटेवर, गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीजवळ पर्यटकांना एक रुपयात पाण्याची बाटली देणारी स्वयंचलित मशीन 'गोदरेज कंपनी'नं उभारली आहे. गांव पंचायतीनं येणाऱ्या पर्यटकांसाठी पार्किंगचीही सोय केली आहे. 
दुसऱ्या  टप्प्यावरील आसन व्यवस्था (Rohida)
दुसऱ्या टप्प्याची चढाई (Rohida)
रोप'च्या इंजिनाचे अवशेष (Rohida Fort)
                      गड चढाई एकूण तीन टप्प्यांची असून, गांव सोडल्यानंतर चढाईचा पहिला पंधरा मिनिटांचा टप्पा सोपा आहे. या टप्प्यानंतर गवताळ पठार दिसतं. पठारावर गावातील जनावरं चरताना दिसतात. पुढील चढाई तीव्र असून दमछाक करते. डोंगराच्या तीव्र उतारावर कमरे इतक्या गवतातून नागमोडी वळणं घेत दुसऱ्या टप्प्याची चढाई संपते. या टप्प्यावर उतारावरच्या तीव्र वळणांवर संरक्षक रेलिंग बसविले आहेत. याच टप्प्यावरील सपाटीवर गड चढाई करणाऱ्याना 'गोदरेज' कंपनीनं बाकड्यांची व्यवस्था केलेली आहे. बाकड्यांच्या बाजूलाच जुनी लोखंडी बैठक आणि काही इंजिनाचे अवशेष दिसतात. पाच सहा वर्षांपूर्वी किल्ल्याच्या डागडुगीसाठी लागणारं बांधकाम साहित्य, इथून 'रोप'च्या सहाय्यानं किल्ल्यावर पोहोचवल्याची माहिती मित्राकडून समजली. 
कारवीची झुडुपं (Rohida Fort)

                    तिसऱ्या टप्प्याची चढाई आणखी तीव्र असून दमछाक करते. या टप्प्यात मुरुमावर उगवणारी आणि भूजलस्तर धरून ठेवणारी 'कारवी'ची झुडपं (Strobilanthes sessilis) दिसतात. सह्याद्रीच्या शुष्क उतारावर दिसणाऱ्या या कारवीच्या काठ्यांपासून बनवलेल्या 'कुडाच्या' भिंती आजही आदिवासी पाड्यांवर दिसतात. कारवीच्या  झुडपांमुळे पुढची चढाई थोडी सुसह्य वाटते. 
गणेश दरवाजा
गणेश दरवाजा (Rohida Fort)
                             या शेवटच्या खड्या चढाईनंतर किल्ल्यावर जाण्यासाठी एकूण तीन दरवाजांपैकी पहिला 'गणेश' दरवाजा लागतो.  कातळ कडा संपतो त्या अवघड टोकावर या दरवाज्याची उभारणी दिसते. या दरवाजासमोर अगदीच अरुंद तोकडी जागा दिसते आणि त्यासमोर खोल दरी. बाहेरून हल्ला करणाऱ्या शत्रूला फार हालचाल करता येऊ नये या कल्पकतेने या दरवाज्याची उभारणी केल्याचं दिसतं. 
                          दरवाजा  गोमुखी असून चौकटीवर गणेशपट्टी असावी. सध्या तिची झीज झाल्यानं अस्पष्ट दिसते.  दरवाज्यावर तटबंदीत शत्रुवर मारगिरी करण्यासाठी जंग्या ठेवल्या आहेत. चौकटीवर तटबंदीत वाऱ्यावर भगवा फडकताना दिसतो. लाकडी दरवाजे जुने दिसत असले तरी नजीकच्या काळात बसवलेले असावेत. 
 
गणेश दरवाजा - आतून घेतलेला फोटो
देवळीतील देवता (Rohida)
                                   दरवाजा ओलांडून आत डाव्या बाजूला कड्याच्या काठावर संरक्षणासाठी तटबंदी दिसते. उजवीकडे चौकटीलगत दिवळीत तांदळा स्वरूपातील देवतेची मूर्ती दिसते.  पुढे उजवीकडे वीसएक पायऱ्या चढून गेल्यास समोर 'फत्ते' बुरुज दिसतो. या बुरुजातून, पहिला दरवाजा ओलांडून आलेल्या शत्रूवर मारा करण्यासाठी दोन जंग्या आणि त्या वरील बाजूस हत्तीच्या तोंडाचं कोरलेले उठावदार शिल्प दिसतं. त्यानंतर लगेच डावीकडे दुसरा प्रशस्त, मजबूत आणि सुस्थितीतला गोमुखी दरवाजा दिसतो. चौकटीच्या दोन्ही बाजूस किल्ल्यांच्या सामर्थ्याचं प्रतीक असलेली 'शरभ' शिल्पे कोरलेली दिसतात.
फत्ते बुरुजातील जंग्या , हस्तिमुख आणि डावीकडे दुसरा दरवाजा
चौकटीवर कोरलेली शरभ शिल्पं (Rohida)
 
                       हा दुसरा दरवाजा ओलांडून आत आल्यास समोर कातळ आणि उजवीकडे भूमिगत पाण्याची टाकी दिसते. टाकीत उतरण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था असून अंधाऱ्या टाकीत उजेड येण्यासाठी पलीकडे वर तिसऱ्या दरवाजाकडे जाणाऱ्या पायऱ्यांच्या ठिकाणी कातळात झरोका दिसतो. सध्या या  टाकीतील पाणी पिण्यालायक नाही. अगदी अरुंद, अवघड जागेत पाषाणात कोरलेली ही प्रशस्त भूमिगत टाकी उत्कृष्ट कातळशिल्पाचा नमुना वाटते. या दरवाज्याच्या डावीकडे पहारेकऱ्यांसाठी देवडी असावी पण ती उध्वस्त दिसते. 
भूमिगत पाण्याची टाकी (Rohida)

                     







                       इथून पुन्हा काटकोनात उजवीकडे ३०-४० पायऱ्या चढून वर गेल्यास समोर  किल्ल्याच्या वैभवात भर घालणारा तिसरा दरवाजा दिसतो. पाषाणात घडवलेली चौकट आणि दोन्ही बाजूच्या पाषाणी भिंती वगळता बाकीचं बांधकाम उध्वस्त दिसतं. ही उध्वस्त करण्याची किमया नक्कीच इंग्रज डोक्यांची असावी. शिल्लक राहिलेलं बांधकाम अजूनही मजबूत दिसतं. 
                    मुख्य चौकटीवर दोन्ही बाजूस कमळ पुष्प, तर दरवाज्याच्या चौकटी बाहेर दोन्ही बाजूस  पाषाणी हत्तीमुखांची सुंदर उठावदार शिल्प कोरलेली आहेत. या शिल्पांच्या बाजूला डावीकडे देवनागरी आणि उजवीकडे फारसी भाषेतील शिलालेख कोरलेले दिसतात. फारशी शिलालेखावरून या तिसऱ्या दरवाज्याचं बांधकाम मोहम्मद आदिलशहाने सोळाव्या शतकात केलं असा इतिहास संशोधकांचा अनुमान निघतो. या दरवाज्याची कोरीव पाषाणी कमान, उठावदार हस्त शिल्प आणि चौकटीवरील कोरलेले दोन्हीं शिलालेख हे खूप सुंदर आणि बघण्यासारखं आहे. 
 
अप्रतिम तिसरा दरवाजा (Rohida Fort)

               या दरवाजातून आत आल्यास उजवीकडे पहारेकऱ्यांची देवडी दिसते. आणि अगदी समोर गडावर महत्वाची समजली जाणारी आणि जिथे न्यायनिवाडा व इतर महत्वाचे निर्णय घेतले जात त्या 'सदरे'च्या वास्तूचा चौथरा दिसतो.
                    सदरेच्या मागे गडसपाटीवर 'रोहिडमल्ला'चं जिर्णोद्धार केलेलं सुस्थितीतील मंदिर दिसतं. मंदिराच्या व्हरांड्यात दहा पंधराजण वस्ती राहू शकतात. मंदिरासमोर स्वच्छ पाण्याचं तळं आहे. तळं सध्या जाळीच्या कुंपणांन बंदिस्त दिसतं. मंदिर आणि या तळ्याच्या उजवीकडील बाजूस गडावरील आणखी एक प्रशस्त तळं आहे. या तळ्याकाठावर बसण्यास बाकड्याची व्यवस्था आहे.
 
सदरेचे अवशेष (Rohida Fort)


रोहिडमल्ल (भैरव) मंदिर 
राजवाड्याचे अवशेष (Rohida)
रोहिडमल्ल (भैरव) मंदिर (Rohida Fort)
रोहिडमल्ल मंदिराच्या उजवीकडील तळं (Rohida Fort)

जुन्या भांड्यांचे अवशेष (Rohida Fort)


                  सदरेच्या डावीकडे किल्लेदाराच्या वाड्याचे अवशेष दिसतात. बाजूलाच गडावर सापडलेली जुन्या पाषाणी, खापरांच्या भांड्यांचे तुकडे, पाटा वरवंटा आणि शिवलिंग बैठकीवर मांडून ठेवलेले आहेत.
                          इथे डावीकडून गडफेरी सुरूवात केल्यास गडाच्या दक्षिणेस सुंदर सोपान मार्गाचा आणि वैशिष्ठ्यपूर्ण बांधकाम केलेला 'शिरवले' बुरुज दिसतो. बुरुज थोडा सखलात असून बुरुजावर उतरणाऱ्या पायऱ्या उध्वस्त आहेत. सध्या तिथं जाण्यासाठी अलीकडे डावीकडून पायवाट आहे. या बुरुजापासून अंदाजे तीन फुटावर पुन्हा बाहेरून बांधकाम केल्याचं दिसतं. कदाचित नंतर या बुरुजाचं मजबुतीकरण केलं असावं. त्यामुळं पहिल्या बुरुजाच्या मुळ जंग्या बंद दिसतात. नंतर केलेल्या बांधकामात फक्त वरच्या बाजूला जंग्या आहेत. 
शिरवले बुरुज (Rohida Fort)
 
जामगुडे बुरुज (Rohida Fort)

                    शिरवले बुरुजापासून जवळच डावीकडे 'दामगुडे' बुरुज दिसतो. साध्या आणि तटबंदी सदृश्य दिसणाऱ्या या बुरुजात जंग्या ठेवलेल्या दिसतात. 
                    दामगुडे बुरुजाच्या पुढेच किल्ल्याच्या बांधकामाच्या वेळी दगडांचे सांधे भरण्यासाठी वापरण्यात आलेला चुना मळण्याचा घाणा दिसतो. कातळात कोरलेल्या या चरात सध्या अवजड पाषाणी चाक विसावलेलं दिसतं. 
चुन्याचा घाणा (Rohida Fort)

      
पश्चिम उतारावरील एकत्रित पाण्याच्या टाक्या
                     या घाण्याजवळच गडाच्या पश्चिमेला कातळात कोरलेली पाण्याची टाकी दिसते. टाकीत उतरण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था दिसते. सध्या या टाकीभोवतीही जाळीदार कुंपण असून आजूबाजूला डोक्याइतकं उंच गवत माजलं आहे. या पाण्याच्या टाकीजवळच गडाच्या पश्चिम उतारावर आणखी पाच ते सहा टाक्या एकत्र दिसतात. या टाक्यांतील पाणीसाठा गडावरील इतर टाकींच्या मानाने जास्तच दिसतो. यातील काही टाक्या पाषाणात कोरलेल्या तर काही बांधवलेल्या दिसतात. या सर्व टाक्यातील पाणी सध्या पिण्यालायक स्वच्छ दिसत नाही. 
पश्चिम उतारावरील एकत्रित पाण्याच्या टाक्या
पाटणे बुरुज (Rohida Fort)
               त्या पुढेच हाकेच्या अंतरावर 'पाटणे' बुरुज दिसतो. बुरुजाची रचना जमिनी पासून थोड्या उंचीवर उठाव दिल्याप्रमाणे भासते.
                   किल्ल्याच्या वायव्य दिशेला 'वाघजाई' बुरुज दिसतो. याचं बांधकाम शिरवले बुरुजाप्रमाणेच वैशिष्ट्यपूर्ण, सुंदर आहे. शत्रूवर मारगिरी करण्यासाठी ठेवलेल्या आधीच्या जंग्या नंतर केलेल्या मजबुतीकरणामुळं बंद दिसतात. या बुरुजावरून, बुरुजाकडे येणाऱ्या डोंगराच्या सोंडेवर सरासरी दीड किमीवर वाघजाई देवीचे देऊळ दिसतं. देवीच्या नावावरून या बुरुजाला हे नांव दिलं असावं. 
वाघजाई बुरुज (Rohida Fort)

वाघजाई बुरुज (Rohida Fort)
                वाघजाई बुरुजाच्या पुढेच गडाच्या उत्तरेला एकमेव आणि सुस्थितीत दिसणारी लांबलचक तटबंदी दिसते. या तटबंदीच्या टोकाला गडावरून खाली वाघजाई देवळाकडे उतरण्यासाठी 'चोर' दरवाज्याची व्यवस्था केलेली दिसते. या दरवाज्यातून आत गेल्यास गडाखाली प्रचंड खोल दरी आणि दरीत घनदाट जंगल दिसतं. वैशिष्ट्यपूर्ण अशी या चोर दरवाज्याची रचना दिसते. 
चोर (गुप्त) दरवाजा (Rohida Fort)
                  भोरहून बाजारवाडीला येताना बाजारवाडी आधी ५ किमीवर 'हातनोशी' गाव लागतं. या गावातून 'रामोशीवाडी'मार्गे वाघजाई मंदिर आणि पुढे या गुप्त चोर दरवाजातून एक पायवाट किल्ल्यावर येते. हातनोशीतून दीड दोन तास पायी अंतर असलेली ही पायवाट या खोल दरीमुळं खूपच धोकादायक आहे. त्यामुळं सध्या ट्रेकर्स बाजारवाडी मार्गे रोहिडा सर करताना दिसतात.
              पुढे चालत राहिल्यास पूर्वेला 'सर्जा' बुरुज नजरेस पडतो. हा बुरुजही रेखीव, सुंदर आहे. बुरुजात जागोजागी आवश्यकतेनुसार जंग्या ठेवलेल्या दिसतात. बुरुजावर ध्वजकाठीच्या चौथऱ्याची पडझड झालेली दिसते. बाजूलाच बसण्यासाठी बाकड्यांची व्यवस्था दिसते. 
सर्जा बुरुज (Rohida Fort)

सदरेच्या बुरुज (Rohida Fort)
             पुढे सदरेसमोर बुरुज आहे. याला 'सदरेचा' बुरुज म्हणतात. इथे गडफेरी पूर्ण होते. गडावर स्वच्छ्ता राखलेली दिसते. प्रत्येक बुरुजाजवळ नांव लिहिलेला फलक आणि बसण्यासाठी लोखंडी आरामदायी बाकडयांची सोय दिसते. मित्रानं दिलेल्या माहितीनुसार पावसात या गडाच्या दरडीवरून कोसळणारे धबधबे, इथली हिरवळ आणि झोंबणारा वारा अनुभवण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते. गडमाथा आटोपशीर असून, तासाभरात गडफेरी पूर्ण होते. आम्ही डावीकडून गडफेरी केली. ती उजवीकडूनही करता येते. गडावर सध्या पावसानंतर डोक्याइतकं उंच वाढलेलं गवत दिसतं. 
                      किल्ल्याचा आकार अंदाजे चौकोनाकृती किंवा पंचकोनी असून किल्ल्याच्या पूर्व दिशेनं गडप्रवेश होतो. किल्ल्यास असलेले मुख्य तीन दरवाजे, शिरवले बुरुज, वाघजाई बुरुज, सर्जा बुरुज, रोहिडमल्ल मंदिर, त्या समोरील पाण्याचं तळं आणि वैशिष्ठ्यपूर्ण तटबंदीतील गुप्त (चोर) दरवाजा किल्ल्याच्या वैभवात विशेष भर घालताना दिसतात. गडाला एकूण सहा बुरुज असून त्यांचं बांधकाम अजूनही मजबूत दिसतं. गडावरील पाण्याची तळी आणि कोरलेल्या टाक्या, त्यावेळी गडावर असणारी शिबंदी आणि राबता सिद्ध करतात.
 
सर्जा बुरुजावरून दिसणारे किल्ल्याचे दरवाजे (Rohida Fort)
                 किल्ले रोहिड्याची बांधणी यादव कालीन आहे. फारशी शिलालेखावरून सोळाव्या शतकात रोहिडा मोहम्मद आदिलशहाच्या ताब्यात असावा. स्वराज्य स्थापनेनंतर १६५६ ला रोहिड्याच्या कृष्णाजी बांदल देशमुखांनी स्वराज्यात सामील होण्यास विरोध केला. त्यामुळं स्वकियांच्या अंतर्गत कारवाया रोखून त्यांच्या बंदोबस्तासाठी शिवरायांनी रोहिड्यावर हल्ला केला. झालेल्या हातघाईत कृष्णाजी बांदल कामी आले. बाजीप्रभू देशपांडे या कृष्णाजींच्या कारभाऱ्याचा पराक्रम त्यावेळी शिवरायांनी पहिला. बाजीप्रभू आणि त्यांच्या सहकाऱ्यांना राजांनी त्यावेळी स्वराज्यात सामील करून घेतलं. शेवटपर्यंत बाजीप्रभूंनी आपलं ईमान राजांच्या पायी वाहिलं. 
                    तर कृष्णाजी बांदलांचा मृत्यू १६४८ लाच झाला होता. १६५६ ला राजांनी गड आदिलशाहीचे किल्लेदार विठ्ठल मुदगल यांच्या कडून जिंकून घेतला होता. या दोन्ही गोष्टींबद्दल इतिहासात तफावत आढळते.
                        बांदल या शब्दाची उत्पत्ती 'बाण दल' पासून झाली असावी. 
हस्तशिल्प आणि शिलालेख -तिसरा दरवाजा 

                   १६६६ ला पुरंदर तहात रोहिडा मुघलांकडे गेला. २४ जुन १६७० ला तो राजांनी परत जिंकून घेतला. संभाजीराजांनंतर गड पुन्हा मुघलांकडे गेला. १६८९ ला स्वराज्याचे पंत सचिव शंकराजी नारायण यांनी रोहिडा पुन्हा स्वराज्यात आणला. अगदी भारताला स्वातंत्र्य मिळून संस्थाने खालसा होईपर्यंतपर्यंत हा किल्ला 'भोर'च्या संस्थानिकांकडे होता. सध्या भोर तालुक्यात संस्थानिकांचा राजवाडा सुस्थितीत पाहायला मिळतो. 
भोर संस्थानिकांचा वाडा (Bhor Rohida)
                 त्याचप्रमाणे कान्होजी नाईक - जेध्यांकडे या भोर मावळ प्रांतातील देशमुखी होती. शहाजी राजांच्या मर्जीतील आणि त्यांचे समवयस्कर कान्होजींनी आदिलशाही सरदार अफजल खान आक्रमणाच्या वेळी शिवाजी राजांना सर्वतो मदत केली. आदिलशहानं मावळ प्रांतातील सर्व देशमुखांना अफझलखानास सहाय्य करण्याची धमकीची पत्रे दिली होती. आदिलशहाच्या धमकीमुळे बिथरलेल्या मावळ प्रांतातील सर्व देशमुखांना कान्होजींनी संघटित करून राजांच्या पाठीशी उभे केले. प्रतापगडाच्या युद्धात त्यांनी विशेष पराक्रम गाजवला. 
                  कान्होजी 'तलवारीच्या पहिल्या पानाचे मानकरी' होते. त्यांचं प्रचंड संघटन कौशल्य राजांच्या नेहमीच उपयोगी पडलं. आग्र्याहून औरंगजेबच्या नजर कैदेतून शिवाजीराजांना परत आणण्यासही कान्होजींचं योगदान होतं. शहाजीराजे, शिवाजी राजे आणि संभाजी राजे अशा तीन पिढ्यांना जेध्यांची प्रामाणिक साथ लाभली. 
भोर शहरातील शिवरायांचा अश्वारूढ श्वेत पुतळा
                       कान्होजींचे वंशज केशवराव जेधे 'संयुक्त महाराष्ट्र चळवळ समिती'चे अध्यक्ष होते. मुंबईतील 'हुतात्मा चौक' हे नाव आणि महाराष्ट्राला अभिमान वाटावा असा १ मे रोजीचा दरवर्षी साजरा होणारा 'महाराष्ट्र दिन' यासाठी केशवराव जेधेंचं नेतृत्व लाभलं.
                       येसाजी कंक, सुभेदार तानाजी मालुसरे अशी कितीतरी लढावू वीररत्नं या मावळ खोऱ्यात जन्मली. इथल्या डोंगर मातीत भटकताना त्यांनी स्वराज्यासाठी केलेल्या पराक्रमांचे, बलिदानाचे पोवाडे डोक्यात घुमू लागतात आणि भटकंतीला वेगळाच रंग चढतो..
                                      || श्री कृष्णार्पणमस्तू ||
येथे - जयवंत जाधव 

ऑफबीट - खरोसा लेणी, निलंगा, जि. लातूर Offbeat - Ancient Kharosa caves, Dist. Latur, Maharashtra.

                        महाराष्ट्रात वैशिष्ट्यपूर्ण अशी बरीच लेणी आहेत. काहींची प्रसिद्धी तर जगभर पोहोचली आहे. त्यांची कोरीव कलाकुसर आजही थक...