Saturday 3 April 2021

लोहगड ( Lohagad )

                   'उंबर खिंडी'चा रणसंग्राम इ. स. १६६१ ला झाला. मूठभर मराठा सैन्यानं हजारो मुघल सैन्याची दाणादाण उडवली. त्यावेळी मुघल सरदार करतलब खान, स्त्री सरदार रायबाघन यांना शिवछत्रपतींनी जीवदान देऊन सोडून दिलं. स्वराज्याच्या मुळावर उठलेलं हे संकट आणि ती भरभक्कम तयारीची मोघल फौज राजांनी पुढं गनिमी काव्यानं उंबरखिंडीत गाठण्यासाठी  लोहगड - विसापूर खिंडीतून जाऊ दिली. या खिंडीत आल्यास उजवीकडं लोहगड आणि डावीकडं विसापूर किल्ला दिसतो.

लोहगडावरून - किल्ले विसापूर (Lohagad)

       जुना मुंबई - पुणे हायवे'न लोणावळा सोडून ८ किमीवर एक चौक दिसतो. पुण्याकडं जाताना या चौकात डावं वळल्यास सरळ एकविरा देवीला पोहचतो, तर तिथूनच उजवं वळल्यास रस्ता लोहगडला घेऊन जातो. या हायवेवरून एकमेकांसमोर असलेल्या लोहगड - विसापूर किल्ल्यांची जोडी दिसते. उजवं वळून दोन किमीवर मुंबई - पुणे लोहमार्गावरील 'मळवली' स्टेशन दिसतं. मळवलीच्या पुढं एक्सप्रेस हायवे ओलांडून दोन किमीवर डावीकडं प्रसिध्द 'भाजे लेणी' आहेत. संध्याकाळी ५ वा. या लेण्यात प्रवेश बंद होतो. त्यामुळं लोहगडला जातानाच ती बघून जाणं सोईस्कर होतं.  

भाजे लेणी (Bhaja Caves)
 
Bhaja Caves

       महाराष्ट्रातले बहुतेक किल्ले इंग्रजांनी तोफा, सुरुंग लावून उध्वस्त केलेत. पण कालानुरूप दुरुस्ती आणि बांधकामं होत राहिल्यानं लोहगड बऱ्यापैकी शिल्लक राहिलाय आणि आजही तो सुस्थितीत दिसतो. सह्याद्रीच्या लोणावळा डोंगररांगेत येणारा, ३४०० फूट उंचीवरील, सुंदर आणि लष्करीदृष्ट्या मजबूत असलेला हा किल्ला भटकंतीत समाधान देऊन जातो. 


लोहगड तटबंदी, चर्या, झरोके आणि समोर दिसणारा किल्ले विसापूर (Lohagad) 

    
किल्ल्यावर जाणाऱ्या पायऱ्या 

                                        

           

        


        

     

   तर, ही लोहगड - विसापूरची खिंड ओलांडली की, डावीकडं वळून रस्ता विसापूरला जातो. तर सरळ जाणारा रस्ता लोहगडला. खिंडी आधी एक घाटरस्ता लागतो. उभ्या चढाचा आणि धोकादायक वळणांचा अरुंद कच्चा रस्ता वाहन चालवताना कसोटी घेतो. लोहगडला एस. टी. बसची आजून सोय नाही पण, घाटातला फुट - फूटभर खड्ड्यांचा रस्ता नवख्या वाहनचालकांना गाड्या बाजूला पार्क करून पायी जाण्यास भाग पाडताना दिसतो.   वर लोहगडवाडीत पार्किंगची सोय आहे. तिथं जेवणाचीही सोय होते.  

        लोहगडवाडीतून अवघ्या अर्ध्या तासात गडमाथा गाठता येतो. 

        सुरवातीपासूनच किल्ल्यावर जाण्यासाठी सुघड पायऱ्या आहेत. वळणावळणाच्या पायऱ्या चढत गेल्यास भव्य तटबंदी आणि बुरुज दिसतात. 

       पहिलाच भव्य दगडी चौकट आणि भक्कम लाकडी दारावर टोकदार खिळे असलेला 'गणेश दरवाजा' स्वागत करतो. चौकटीच्या दोन्ही बाजूस गणेशमूर्ती कोरल्या आहेत. त्यांच्याच वर दोन्हीकडं कोरलेली 'कमळं' दिसतात. दरवाजाच्या आतील बाजूस बांधकाम थोडंफार उध्वस्त असून बऱ्यापैकी शाबूत आहे. समोर उजवीकडं खाली एक शिलालेख असून त्यावर सावळे कुटुंबातील नरबळी देण्यात आला असून, त्याबदली त्यांच्या वंशजांना लोहगडवाडीची पाटीलकी देण्यात आली होती असा उल्लेख आहे. 

गणेश दरवाजा 

        त्यावेळी महत्वाचा बुरुज, प्रवेशदार बांधकामानंतर वारंवार ढासळत असता, ते कायम टिकून राहण्यासाठी असा नरबळी देण्याची प्रथा असावी. पूर्वी लहानपणी कोल्हापूरच्या माझ्या गावी आम्ही दिवसभर नदीपात्रातून उन्हात हुंदडत असता, वडीलधारी मंडळी बाजूला धरणाच्या बांधकामात मुलांना धरून जिवंत घालतात अशी धडकी भरवणारी भीती आम्हाला घालत. ते इथं आठवलं. असो.. 

        गणेश दरवाजाच्या आतील बाजूलाच एक लहान खोली आहे. खोलीत दोन प्रशस्त झरोके दिसतात. त्यांचा रोख लोहगडवाडीच्या दिशेनं किल्ल्याचा रस्ता जिथून सुरू होतो, तिथं तोफमारा करण्यासाठी रोखलेला दिसतो.

            या  गणेश दरवाजाला मजबूत, रुंद तटबंदी असून, तोफमारा करण्यासाठी झरोके दिसतात. तसेच बंदूक आणि बाणांचा मारा करण्यासाठी जंग्या आहेत. या सर्व जंग्यांचा रोख गडावर येणाऱ्या पायऱ्यांवर वेगवेगळ्या कोनातून ठेवलेला दिसतो.   

नारायण दरवाजा 

      या दरवाजाच्या पुढेच पायऱ्या चढून गेल्यास दुसरा भव्य, दगडी 'नारायण दरवाजा' दिसतो. यालाही मजबूत तटबंदी आणि बाजूला बुरुज आहेत. हा दरवाजा नानासाहेब पेशव्यांनी बांधवून घेतल्याचा इतिहासात उल्लेख मिळतो. दरवाजा ओलांडून पायऱ्या चढून वर आल्यास उजवीकडं दोन कातळात कोरलेल्या मोठ्या गुहा दिसतात. या गुहेत त्याकाळी धान्य साठवलं जाई. सध्या तिथं आत कातळातून झिरपणारं पाणी साठून राहिलेलं दिसतं. 

       यापुढील तिसरा 'हनुमान दरवाजा' भव्य आणि सर्वात प्राचीन आहे. दरवाजाच्या दगडी चौकटीवर दोन्ही बाजूस हनुमान मुर्त्या कोरलेल्या दिसतात. आणि त्यांच्याच वर दोन्हीकडे 'शरभ' कोरलेले दिसतात. याही दरवाजांच्या लाकडी दारांवर लोखंडी खिळे आणि साखळदंड आहेत. दरवाजाच्या आतील बाजूस पहारेकर्यांसाठी असणाऱ्या देवड्या दिसतात, तर समोर त्यांना राहण्यासाठी देवड्या दिसतात. सध्या त्या थोड्याफार उध्वस्त दिसतात.    

पहारेकऱ्यांच्या देवड्या 

      लोहगडच्या सुरवातीच्या परिसरात माकडांचा खूप वावर आहे. बरोबर काही खायचं असल्यास इथली माकडं धिटाईनं पिच्छा पुरवतात. सीलबंद बिसलेरी बाटल्यांची झकाणं उघडणं आणि बॅगेंची सहजपणे तपासणी करतानाही दिसतात.   

तटबंदीतील झरोके आणि चर्या (Lohagad Fort)

       इथून वळणावळणांचा गडावर येणारा पायऱ्यांचा मार्ग दिसतो. इथल्या तटबंदीवरून आणि जंग्यातून किल्ल्यात येणाऱ्यांवर सहज मारा करू शकतो. गडावर येण्याच्या सुरवातीपासून ते मुख्य दरवाजात येईपर्यंत शत्रूवर नजर ठेवण्यासाठी आणि मारा करण्याची अप्रतिम लष्करी व्यवस्था या किल्ल्यास आहे. त्यामुळंच कदाचित छत्रपतींच्या पहिल्या सुरत लुटीचा सर्व खजिना सरसेनापती नेतोजी पालकरांनी या किल्ल्यावर ठेवला असावा. 

खाली लोहगडवाडी 
Lohagad Fort 

           
       पुढील पायऱ्या चढून गेल्यास समोर 'सदर' दिसते. सदरेवर न्यायनिवाडा आणि इतर महत्वाचे निर्णय घेतले जात. सदरेवरच गाड्यांवर ठेवलेल्या इंग्रज बनावटीच्या दोन छोट्या सुंदर तोफा आहेत. तिसरी तुटलेली तोफ या दोन तोफांच्या मध्यभागी जमिनीवर बसवलेली दिसते.   
दर्ग्याच्या अलीकडील 'सदर'
सदरेवरील तोफ 
      सदरेच्या डावीकडं दर्गा दिसतो. दर्ग्यात दोन समाध्याही दिसतात. त्या कोणाच्या असाव्यात याचा ठोस पुरावा मिळत नाही. या सदरेपासून डावी उजवीकडून गडफेरी करू शकतो. उजवीकडं फलकावर गडावरील महत्वाची ठिकाणं आणि त्यांची दिशा दाखवलेली दिसते. 

 

पाण्याची टाकी (बुजलेली)

         उजव्या बाजूनं तटबंदीवरुन पुढे गेल्यास डावीकडं जमिनीतील बुजलेल्या पाण्याच्या टाक्या दिसतात. त्याच्याच पुढं 'लक्ष्मीकोठी' दिसते. लक्ष्मीकोठी ही एक कातळात कोरलेली प्रशस्त मोठी गुहा असून, आत दगडी खांबांनी आधार दिलेल्या बऱ्याच खोल्या आहेत. आत अंधार असल्यानं तिथं टॉर्चची गरज आहे. सुरवातीची खोली मोठी हॉलसारखी दिसते. सरासरी शंभर माणसं एकावेळी राहतील इतकी ही गुहा मोठी दिसते. देवळाच्या गाभाऱ्यात समई विझल्यानंतर जसा गंध येतो, तसा एक विशिष्ट तेलकट गंध इथं नेहमी अनुभवास येतो. पहिल्या सुरत लुटीचा खजिना या लक्ष्मीकोठीत ठेवला होता. या गोष्टीवरून लोहगडची सुरक्षितता आणि अभेद्यतता लक्षात यावी. 

लक्ष्मीकोठी (Lohagad) 
   
         या कोठीच्या अलीकडेच आणखी एक प्रशस्त गुहा असून , गुहेतील जमिनीवरील कातळात ओळीनं कोरलेले चौरस हौद दिसतात. या सर्व गुहेंना दगडी चौकट व समोर बांधीव दगडी भिंती दिसतात. बाजूलाच घोड्यांच्या पागा असलेला फलक दिसतो. या सर्वांसमोर तटबंदिखाली लोहगडवाडी दिसते तर समोर बुलंद 'किल्ले विसापूर' लक्ष वेधून घेत राहतो. 

लोहगडावरून - किल्ले विसापूर 

 

पवना जलाशय आणि पलीकडे किल्ले तुंग 

    गडावरून समोर आग्नेयेला पुणे शहरास पाणीपुरवठा करणारा अवाढव्य 'पवना जलाशय' दिसतो. या जलाशयाच्या डावीकडं धुक्यात 'किल्ले तिकोना' तर उजवीकडं 'किल्ले तुंग' दिसतात.                लक्ष्मीकोठीकडून तटबंदी धरून डावीकडं वळल्यास किल्ल्याच्या पश्चिमेकडे जाण्यासाठी पठार लागतं. पुढे चालत राहिल्यास किल्ल्याच्या मागे पश्चिमेला एक लांबलचक, अरुंद माची दिसते. याला 'विंचूकडा' म्हणतात. सरासरी दीड किलोमीटर लांबीची आणि तीस मीटर रुंदीची डोंगराची नैसर्गिक सोंड जणू आजूबाजू आणि समोरच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यास असावी तशी आहे. 'विंचूकडा' हे लोहगडचं प्रमुख वैशिष्ठय आणि आकर्षण आहे. या विंचूकड्याच्या माचीला दोन्ही बाजूनं मजबूत तटबंदी आहे. तटबंदीवर चढण्या उतरण्यासाठी ठीकठिकाणी पायऱ्यांची व्यवस्था दिसते.  

विंचुकडा (Lohagad)
विंचुकड्यावरील टाकी 
Lohagad Fort 

            या माचीवर घरांचे भग्न अवशेष दिसतात. तटबंदीत ठिकठिकाणी छोट्या छोट्या खोल्या असून सौचकूपांची व्यवस्थाही दिसते. या माचीच्या सुरवातीलाच खडकात कोरलेली एक मोठी पाण्याची टाकी दिसते. त्यात पाणी आहे पण सध्या पिण्यायोग्य नाही. वरील या सर्व व्यवस्थेवरून बहुतेक पहारेकऱ्यांच्या राहण्याची ही जागा असावी. किल्ल्याच्या पश्चिमेला या माचीचा आकार निमुळता होत पुढे टोकाला गोलाकार विंचवाच्या नांगीसारखा दिसतो. त्यामुळं या माचीला 'विंचूकडा' नांव पडलं असावं. मूळ किल्ल्याच्या उंचीपेक्षा या माचीची उंची थोडी कमी असल्यानं, माचीवर येण्यासाठी एक कातळटप्पा सांभाळून उतरावा लागतो. 

       विंचूकड्याच्या शेवटी गोलाकार टोकाला बाहेरील तटबंदीच्या आत अंदाजे तीन चार फूट अंतर सोडून दुसरी मजबूत तटबंदी आणि दगडी बांधकाम दिसतं. दोन्ही तटबंदीच्या जागेमधून अर्धगोलाकार वळसा मारू शकतो. तटबंदीत उतरण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था असून दोन्ही बाजूला अतिशय ठेंगणे म्हणजेच तीन - साडेतीन फुटांच्या चौकटीतून वाकून जावं लागतं. या टोकाला दुहेरी तटबंदीनं संरक्षित केलं असून शिल्पकलेचा हा एक उत्तम नमुना आहे.      

           
दुहेरी तटबंदी - विंचुकडा 
दगडी चौकट - विंचुकडा 

      बरेच भटके हा 'विंचूकडा' किल्ल्यावरून दुरूनच बघतात आणि परततात. पण लोहगड ज्यांना पूर्णत्वानं बघायचा आहे त्यांनी विंचूकड्याच्या शेवटच्या टोकाला आवश्य भेट द्यावी. या कड्यावर वाऱ्याचा जोरदार मारा आहे. तटबंदीखाली प्रचंड दरी आणि दरीत जंगल दिसतं. पावसात लोहगडची भटकंती मस्त आहे, पण इथला जोरदार पाऊस आणि वाऱ्याच्या माऱ्यामुळं माचीवर विशेष काळजी घ्यावी. 
      या विंचूकड्यानंतर उजवीकडून गेल्यास गडफेरी पूर्ण करू शकतो. इथं गडमाथ्यावरचं पठार लागतं, ते ओलांडलं की उतारावर एक 'सोळा कोन' असलेलं तळं दिसतं. तळ्यात उतरण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. तळं नानासाहेब पेशव्यांनी बांधवून घेतल्याचा इतिहासात उल्लेख आढळतो. 


सोळा कोनी तळं (Lohagad) 

     तर पठारावरून पुढे दुसरं अष्टकोनी 'त्रंबक तळं' दिसतं. याच्या बाजूलाच कातळात कोरलेली आणखी एक पाण्याची टाकी दिसते. या दोन्हीतील पाणी स्वच्छ आणि पिण्यायोग्य दिसतं. किल्ल्यावर कातळात कोरलेल्या अशा बऱ्याच पाण्याच्या टाक्या दिसतात.


  

त्र्यंबक तळं 



 
       या तालावापासून अलीकडे येताना एक पुरातन महादेव मंदिर लागतं. मंदिर उंचीला लहान आणि साधं, अलीकडेच बांधलेलं दिसतं. आतील शिवपिंड मात्र प्राचिन आहे. मंदिरासमोर काळ्या पाषाणातील भग्न नंदी दिसतो. या मंदिराकडून पुढं चालत आल्यास गडफेरी पूर्ण होऊन पुन्हा दर्गा आणि सदरेजवळ येतो.     
दूरवर महादेव मंदिर 

       एकूण या किल्ल्याची रचना त्रिकोणी आहे. पूर्वेकडून किल्ल्यावर प्रवेश होतो, पश्चिमेकडं विंचूकडा आहे. साधारण दोन तीन तासात गडफेरी पूर्ण होते. गडमाथ्याच्या पठारावर मध्यभागी एक उंच टेकडी असून, या टेकडीवर दर्गा दिसतो. 

     

गडमाथ्यावरील पठार (Lohagad)

टेकडीवरील दर्गा 

     हा किल्ला सरासरी सत्तावीसशे वर्षांपूर्वी म्हणजे ईसवीसन पूर्व ७ व्या शतकात बांधला असावा. सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव या सर्व राजवटी या किल्ल्यानं पहिल्या. १४८९ ला मलिक अहमदनं निजामशाहीची स्थापना करून बरेच किल्ले जिंकले होते. त्यातील हा लोहगड महत्वाचा किल्ला होता. १५६४ ला अहमदनगरचा सातवा राजा, दुसरा बुऱ्हाण निजाम या किल्ल्यात कैदेत होता. १६३० ला किल्ला आदिलशाहीत आला. १६५७ मध्ये शिवछत्रपतींनी कल्याण, भिवंडी, रायरी सोबत जिंकून 'लोहगड' स्वराज्यात आणला. १६६५ ला पुरंदरच्या तहात मुघलांना दिला तर १६७० मध्ये जिंकून पुन्हा ताब्यात घेतला. 

Lohagad Fort 

       पुढे १७१३ मध्ये शाहूमहाराजांनी किल्ल्याचा ताबा दर्यासारंग 'कान्होजी आंग्रे'स दिला. १७२० मध्ये तो पेशव्याकडं आला. दरम्यान नानासाहेबांनी किल्ल्यावरील सोळा कोनी विहीर, नारायण दरवाजा आणि किल्ला आणखी मजबूत करण्यासाठी इतर बांधकामं करून घेतली. त्यानंतर त्यांनी सर्व संपत्ती लोहगडावर हलवली. १८०३ ला लोहगड इंग्रजांनी घेतला, पण दुसऱ्या बाजीरावांनी तो पुन्हा जिंकून घेतला. १८१८ मध्ये 'जनरल प्रॉथर' लोहगड घेण्यासाठी आला. त्याने प्रथम विसापूर जिंकला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी मराठे स्वतःहून लोहगड सोडून निघून गेले.

       नांव सार्थ करणाऱ्या या किल्ल्यास दैदिप्यमान इतिहास असून जास्तीत जास्त काळ 'लोहगड' मराठेशाहीत राहिला..

                             || श्री कृष्णार्पणमस्तु ||

येथे - जयवंत जाधव  

ऑफबीट - खरोसा लेणी, निलंगा, जि. लातूर Offbeat - Ancient Kharosa caves, Dist. Latur, Maharashtra.

                        महाराष्ट्रात वैशिष्ट्यपूर्ण अशी बरीच लेणी आहेत. काहींची प्रसिद्धी तर जगभर पोहोचली आहे. त्यांची कोरीव कलाकुसर आजही थक...