डिसेंबरच्या तिसऱ्या रविवारी 'भेलीव'च्या 'मृगगडा'स आम्ही सहकुटुंब भेट दिली. पुण्याचा पन्नाशी ओलांडलेल्या अकरा जणांचा ग्रुप, मुंबईच्या विक्रोळीतून आलेला एक सोलो ट्रेकर आणि आम्ही तिघे, याव्यतिरिक्त रविवार असूनही किल्ल्याची चढाई करणारे विशेष असं कोणी दिसलं नाही.
 |
किल्ले मृगगड (Mrugagad Fort)
|
मराठ्यांचा जाज्वल्य इतिहास सांगणारे बेलाग गडकिल्ले सह्याद्रीत आहेतच. ते आपलं दुर्ग वैभव टिकवूनही आहेत. पर्यटकांची तिथं नेहमी वर्दळ दिसते. पण याच सह्याद्रीत असेही छोटे दुर्गम आणि कडवं आव्हान देणारे किल्ले आहेत की ज्यांनी परकीय आक्रमणं थोपवून स्वराज्याची पताका अबाधित राखली. या गडकिल्ल्यांच्या बाबतीत डोंगरभटके वगळता, गडपायथ्याचे स्थानिक रहिवाशीही उदासीन दिसतात. या किल्ल्यांची पर्यटकांना एकतर नावं, ठिकाणं माहीत नसावीत किंवा एकाकी दुर्गम धोकादायक ठिकाणांमुळं आणि सुविधा नसल्यामुळं ते इकडे फिरकत नसावेत.
'मृगगड'. रायगडच्या सुधागड तालुक्यात सह्याद्रीखाली खोपोली पासून पालीकडे २३ किमीवर (NH 92) जांभूळपाड्याला डावं वळण घ्यायचं. पुढे नऊ किमीच्या 'भेलीव' गावात डावीकडे जंगलाच्या पलीकडं 'मृगगड' दिसतो. मुंबई, ठाणे आणि पुण्याकडील डोंगर भटक्यांना खोपोली मध्यवर्ती ठिकाण आहे. खोपोलीहून गडपायथ्याचं 'भेलीव' हे गांव सरासरी 32 किमी आहे. तर आमच्या राहत्या पनवेल पासून खोपोली मार्गे ६०-६५ किमी. खोपोलीहून 'पाली'ला जाणाऱ्या एसटी बसेस जांभूळपाड्याला थांबतात. तिथून मोजक्याच एसटी बसेस असल्यानं, भेलीवसाठी रिक्षा किंवा वडाप शोधावं लागतं. स्वतःचं वाहन असेल तर मृगगड वेळेत, एका दिवसात करण्यासारखा आहे.
 |
| गावाबाहेरील टेकडीवरून दिसणारं मंदिर आणि शाळा (Mrugagad) |
'भेलीव' हे मृगगडाच्या पायथ्याचं 'अंबा' नदीजवळ लोणावळ्याच्या दरीकोंदनातलं गांव. गावात प्रवेश करताच डावीकडं शाळा दिसते. शाळेजवळ पार्किंगची सोय आहे. सरासरी चार पाचशे लोकवस्तीचं गांव असावं. सह्याद्रीच्या डोंगररांगेखालीच असल्यानं गांव परिसरात धुव्वाधार पाऊस पडतो. प्रामुख्यानं इथं भात शेतीच दिसते. गांव दिसायला बेताचं असलं तरी गावातील लोक उद्यमशील मदत करणारे दिसतात. गावकऱ्यांनी एकजुटीनं जुन्या मंदिराचा जीर्णोद्धार करून सध्या गावाच्या उत्तरेला भव्य, सुबक 'भवानी' मातेचं मंदिर उभारलं आहे. आमच्या भेटी दरम्यान मंदिराची रंगरंगोटी चालू होती. येत्या माघ महिन्यातील पौर्णिमेला मंदिराचं कळसारोहन आणि वास्तूपुजा नियोजित आहे. शाळा आणि मंदिर एकमेकांना पाठमोरे आहेत. आणि या दोन्हींच्या उजव्या बाजूस गाव वसलं आहे. 'मृगगड' नावाचा गिरिदुर्ग सहयाद्रीच्या याच लोणावळा दरीकोंदणात बाजुला १७५० फूट उंचीवर वसला आहे. 'भेलीवचा किल्ला' म्हणूनही मृगगडास ओळखलं जातं.
 |
| रस्त्यावरून दिसणारा किल्ले मृगगड आणि मोराडी सुळका (Mrugagad Fort) |
गडावर जाणारा रस्ता मंदिर आणि शाळेच्या मधून उत्तरेकडील गावाबाहेरच्या कातळ टेकडीवरुन जातो. टेकडीवर सपाटी दिसते. त्या समोर जंगल आणि जंगलाच्या पलीकडे ईशान्येला एकसारखे दिसणारे ओळीत चार लहानमोठे डोंगरसुळके लोणावळा डोंगररांगेला काटकोनात भेलीवपर्यंत निमुळते होताना दिसतात. त्यातील तिसऱ्या सुळक्यावर दुरून भगवा दिसतो. चौकशी केल्यावर एकानं सरळ सगळ्याच सुळ्यांकडे बोट दाखवलं आणि आम्ही जे समजून घ्यायचं ते घेतलं. टेकडी पठारानंतर दिसणाऱ्या जंगलात उजवीकडून की समोरून सुळक्यांना वळसा मारून पुढं जायचं हे कळलं नाही. उजवीकडे एकावर एक असे तीन मोठे दगड रचलेले दिसले. मागील अनुभवावरून हीच पायवाट असावी असं समजून आम्ही उजवीकडून जंगलात घुसलो. पाच दहा मिनिटांनी एक मळलेली पायवाट आणि किल्ले मृगगड असा बोर्ड झाडाला ठोकलेला दिसला.
 |
| किल्ल्याकडे जाणारी पायवाट (Mrugagad Fort) |
 |
| Mrugagad Fort |
घनदाट झाडीतून जाणारी ही पायवाट रम्य वाटते. प्रबळ गडावरील जंगलाची आठवण करून देते. आंबा, पळस, जनावरांवर माशा बसू नये म्हणून शेतकरी वापरतात त्या 'निंगडी'ची, करवंदीची झुडपं यांनी हा परिसर व्यापलेला दिसतो. त्यामुळे अर्ध्या तासाच्या चालीतही उन्हाचा त्रास जाणवला नाही. एक एक करत पायवाटेनं तिसरा सुळका ओलांडला की वाट डाव्या बाजूच्या डोंगर भिंतीकडे सरकते आणि दगडधोंड्यातून कातळाकडे जाते.
 |
| Mrugagad Fort |
 |
| कातळाकडे जाणारी पायवाट (Mrugagad Fort) |
कातळाच्या पायथ्याला उजवीकडं चौरसाकृती दिसणारी गुहा खोदलेली दिसते. वाट मात्र समोर डावी उजवीकडं दिसणाऱ्या महाकाय डोंगर जिथं येऊन मिळतात त्या तीव्र उताराच्या घळीतून वर चढताना दिसते. पुढे घळ अगदीच चिंचोळी होत जाते. त्यात भरीस भर म्हणून घळीत उताराच्या अंतरा अंतरावर मोठे दगड अडकले आहेत. घळीत जेमतेम जागा असल्यानं फार हालचाल करता येत नाहीच पण एकमेकांना मदतही करता येत नाही. नवख्यांना हा टप्पा दमवत असावा. नंतर चौकशी केली असता या टप्प्यावर दोर लावून देण्यास गावातील तरुण तयार असल्याचं समजलं.