उन्हाळ्यात शुष्क झालेल्या धरतीला पावसाने तजेला दिल्यानंतर सह्याद्रीतल्या दऱ्या डोंगरांचे रूप विलोभनीय असेच दिसते. बोरघाटाचे राखणदार किल्ले 'राजमाची', पूर्वेची 'लोहगड विसापूर' जोडी तसेच त्याच्या दक्षिणेचा सह्याद्री धारेवर सवाष्णी घाटवाटेवर लक्ष ठेवून असलेला 'कोरीगड' हे पावसाळ्यात मनमुराद आनंद लुटण्याची मुंबई पुण्याकडील भटक्यांची आवडती ठिकाणं. धुव्वाधार पावसात चिंब दाट धुक्यातून इथल्या हिरव्या पायवाटा चालण्याची सुप्त इच्छा या प्रत्येकाची असते. पावसाळी भटकंतीची ही ठिकाणं भटके मुद्दाम राखून ठेवताना दिसतात. असं असलं तरी आपल्या पूर्वजांच्या या धारातीर्थांना दुर्गभटके इतर वेळीही इथे आवर्जून भेट देतात. त्यातील 'लोहगड विसापूर' हे जोड किल्ले प्रामुख्याने अग्रक्रमाने येतात.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर पुण्याकडं जाताना बोरघाट चढून लोणावळ्यानंतर ८ किमी छेद रस्त्यावर (Junction) डावं वळल्यास कार्ला आणि एकविरा देवीला पोहचतो. तर तिथून उजवं वळल्यास रस्ता किल्ले लोहगड विसापूरला घेऊन जातो. या रस्त्यावर महामार्गापासून दोन किमीवर मुंबई-पुणे लोहमार्गावरील 'मळवली' स्टेशन दिसतं. त्यापुढे दोन किमीवर प्रसिध्द 'भाजे' लेणी आहेत. त्यापुढे खिंडीचा घाट आणि पुढे 'गायमुख' खिंड. खिंडीतून डावीकडे काटकोनात वळणारा रस्ता किल्ले विसापूरला घेऊन जातो. आणि पुढे सरळ गेल्यास लोहगड किल्ल्याच्या पायथ्याला लोहगडवाडीत येतो. लोहगड आणि विसापूर हे समोरासमोरील किल्ले या खिंडीने विभागले आहेत.
याआधी जानेवारी २०२१ ला किल्ले लोहगडच्या भेटीदरम्यान हा घाट आम्ही वाहनाने सहकुटुंब चढलो होतो. या घाटातून एका वेळी फक्त एकच वाहन जाऊ शकेल असा अतिशय अरुंद, अतितीव्र वळणांचा आणि धोकादायक चढाचा घाट म्हणून ओळखला जातो. त्यावेळी घाटातल्या फुट फुटभर खड्ड्यांनीही परीक्षा घेतली होती. आता मित्रांसोबत फेब्रुवारी २०२६ ला 'किल्ले विसापूर'च्या भेटीदरम्यान हा घाटरस्ता बऱ्यापैकी सुस्थितीत आहे.
पुढे खिंडीत डावा वळसा घेतल्यानंतर किल्ले विसापूरच्या पश्चिम कड्याच्या पायथ्यापर्यंत पक्का रस्ता आहे. पायथ्याखालून पाहिल्यास पुढे तोंड काढलेल्या कासवासारखा किल्ल्याचा हा अजश्र कडा अंगावर येतो.
 |
| किल्ले विसापूरचा 'पश्चिम कडा'. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra. |
'उंबर खिंडी'चा रणसंग्राम इ. स. १६६१ ला झाला. मूठभर मराठा सैन्यानं हजारो मुघल सैन्याची दाणादाण उडवली. मुघल सरदार करतलब खान, स्त्री सरदार रायबाघन यांना त्यावेळी शिवछत्रपतींनी जीवदान देऊन सोडून दिलं. स्वराज्याच्या मुळावरचं हे संकट आणि भरभक्कम तयारीची ती मुघल फौज सह्याद्रीखाली 'उंबरखिंडी'त गाठण्यासाठी राजांनी गनिमी काव्यानं या 'गायमुख' खिंडीतून वळवली होती. या खिंडीत आल्यास उजवीकडं लोहगड आणि डावीकडं विसापूर किल्ला दिसतो.
विसापूर किल्ल्याचा विस्तार पूर्व पश्चिम आहे. किल्ल्यावर जाणाऱ्या दोन वाटा आहेत. पहिली 'मळवली' रेल्वे स्टेशनपासून भाजे लेण्याजवळून जंगलातील पायवाट किल्ल्याच्या उत्तरेकडून किल्ल्यावर येते. या वाटेला 'पाटण' गावातून येणारी वाट किल्ल्याच्या पायथ्याजवळ मिळते. या वाटेने किल्ल्यावर पोहोचण्यास सरासरी दोन तास पुरतात. पुण्याकडील भटक्यांना पाटण कडून येणारी वाट सोईस्कर आहे. तर दुसरी पायवाट 'भाजे' लेणी ओलांडून गायमुख खिंडीतून पुढे लोहगडवाडीकडे न जाता, विसापूर किल्ल्याला डावा वळसा घेत किल्ल्याच्या दक्षिणेकडून किल्ल्यावर येते. या वाटेने गडमाथा तासाभरात गाठता येतो.
पश्चिम कड्याजवळ मोकळ्या जागेत पार्किंगची सोय आहे. आजूबाजूला 'वीकएंड'ला येणाऱ्या आणि पावसाळी पर्यटकांसाठी सुसज्ज कॅम्पिंग आणि निवासी हॉटेल्स'चीही सोय आहे. पश्चिम कडा डावीकडे ठेवून पुढे जाणारा कच्चा रस्ता कातळ भिंतीखालून दक्षिणेकडे वीस मिनिटात पायथ्याचे 'हॉटेल विसावा' जवळ येतो. पावसात चिखल दगडांमुळे इथपर्यंत वाहने येऊ शकत नाहीत.
 |
| किल्ले विसापूरची 'दक्षिण तटबंदी'. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra. |
 |
| किल्ले विसापूरच्या 'पायथ्याची कमान'. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra. |
या उपाहारगृहाच्या समोर डावीकडे जंगलातून जाणारी पायवाट किल्ल्यावर जाते. सुरुवातीला वाटेवर स्वागत करणारी कमान आहे. पुढे पायथ्याच्या गर्द जंगलातील दगड धोंडे आणि झाडांच्या मुळ्यातून वाट चढत जाते. या पायवाटेवर निसर्गाची सुंदरता आणि शांतता अनुभवास येते.
किल्ल्याच्या पायथ्याला उभ्या कातळात एक पाण्याचा हौद खोदलेला दिसतो. हौदाचे तोंड लहान दिसत असले तरी तो कातळात खोल आणि मोठा पसरला आहे. हौदाच्या समोर कातळावर शिलालेख कोरलेला दिसतो.
 |
| किल्ले विसापूरच्या पायथ्याचे जंगल. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra. |
 |
| किल्ले विसापूरच्या पायथ्याचा कातळ हौद. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra. |
 |
| किल्ले विसापूरच्या पायथ्याचा कातळ हौद. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra. |
हौद पाहून पुढे आल्यास विखुरलेल्या मोठमोठ्या दगडातून वर जाणारा रस्ता दिसतो. गडमाथ्यापर्यंत घेऊन जाणारे हे दगड म्हणजे किल्ल्याचा दक्षिणेकडील पूर्वीचा पायरी मार्ग. इंग्रजांनी तो उध्वस्त केला. पावसाळ्यात किल्ल्यावरील पाणी या दगडांतून खाली येताना त्याला खळाळणाऱ्या ओढ्याचे स्वरूप प्राप्त होते. पावसाळी पर्यटक इथे आनंद लुटताना दिसतात. पण गडचढाई करताना दगडांचा हा टप्पा पुरता दम काढतो.
 |
| किल्ल्याचा 'दक्षिणेकडील मार्ग'. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra. |
दगडांचा टप्पा चढून वर आल्यास समोर उध्वस्त दरवाजाचे आणि देवडीचे अवशेष दिसतात. त्या पलीकडे कातळ उतारावर खोदलेल्या गुहा दिसतात. त्यापैकी एका गुहेत स्वच्छ पाणी दिसते. यांचे शिल्लक राहिलेले अवशेष कोरीव कलात्मक आहेत. उध्वस्त अवशेषांवरून किल्ल्याच्या दक्षिणेकडील हा दरवाजा भव्य असावा.
 |
| विसापूर किल्ल्याचा उध्वस्त 'दक्षिण दरवाजा'. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra. |
 |
| दक्षिण दरवाजामागील 'गुहा'. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra. |
 |
विसापूर किल्ल्याचा उध्वस्त 'दक्षिण दरवाजा'. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra.
|
इथून डावीकडे थोडीफार किल्ल्याची तटबंदी आणि तटबंदीवरून फेरफटका मारण्यासाठी 'फांजी'ची व्यवस्था दिसते. उतारावरून येणारे पावसाचे पाणी या तटबंदीजवळ साचून ती ढासळू नये म्हणून पाण्याचा निचरा होण्यासाठी तटबंदीत छिद्रांची व्यवस्था दिसते. पुढे तटबंदी नष्ट झालेली दिसते. त्यापुढे गडमाथ्यावरचे पश्चिमेकडील लांबलचक त्रिकोणी पठार दिसते.
 |
| किल्ल्याची उध्वस्त 'दक्षिण तटबंदी'. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra. |
पुढे किल्ल्याच्या पश्चिम कड्यावरून अगदी समोर लोहगड नजरेच्या टप्प्यात येतो. बाजूला पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 'पवना' जलाशयाचा विस्तार, जलाशयाच्या पलीकडे 'किल्ले तुंग' आणि त्याच्या डाव्या बाजूस 'किल्ले तिकोना' असा विस्तीर्ण मावळ परिसर दिसतो. पूर्वी किल्ल्याच्या या पश्चिमेला तटबंदी असावी. समोर खिंडीपलीकडे 'किल्ले लोहगड' दिसतो. दोन्ही किल्ले समोरासमोर आणि समान उंचीचे म्हणजे समुद्रसपाटीपासून ३३५० फूट उंच आहेत. विसापूरच्या पश्चिम धारेवरून किल्ले लोहगडावर तोफमारा करणे सहज शक्य दिसते. तर लोहगडावरूनही विसापूरची पश्चिम बाजू माऱ्याच्या टप्प्यात येते. या तोफमाऱ्यामुळे कदाचित विसापूर किल्ल्याची ही पश्चिम तटबंदी उध्वस्त झाली असावी.
 |
किल्ल्याची उध्वस्त 'दक्षिण तटबंदी आणि मागे किल्ले लोहगड'. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra.
|
 |
| पश्चिम तटबंदीवरुन 'किल्ले तुंग', 'किल्ले तिकोना' आणि 'पवना जलाशय'. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra. |
लोहगड समोर असला तरी गोमुखी रचनेचे लष्करी दृष्ट्या त्याचे मजबूत दरवाजे पायदळाने हल्ला करून जिंकणे सहज दिसत नाही. तसेच किल्ले विसापूरला 'पाटण' आणि 'लोहगडवाडी' या दोन्हीकडून पायरीच्या मार्गामुळे किल्ले विसापूर जिंकण्यास भौगोलिक दृष्ट्या लोहगडा इतका अवघड दिसत नाही. त्यामुळेच कदाचित १८१८ मध्ये 'जनरल प्रॉथर' लोहगड घेण्यासाठी आला. पण त्याने प्रथम विसापूर जिंकला आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी मराठे स्वतःहून लोहगड सोडून निघून गेले.
 |
| विसापूर किल्ल्याच्या पश्चिम कड्यावरून 'गायमुख खिंडीपलीकडे किल्ले लोहगड आणि त्याचा विंचूकडा'. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra. |
पश्चिम टोकापासून उजवे वळल्यास पुढे किल्ल्याची लांबलचक उत्तर तटबंदी दिसते. तटबंदीत मजबूत अर्धगोल बुरुज आहेत. बुरुज जमिनीला समांतर आहेत. या बुरुजांच्या कमानीतून तोफमारा करण्यासाठी प्रशस्त रेखीव दिवळ्या तसेच बंदूक, बाणमारा करण्यासाठी वेगवेगळे कोन साधून तटबंदीत 'जंग्या' ठेवल्या आहेत. तटबंदीच्या मागून सैनिकांना सुरक्षित गस्त घालण्यासाठी 'फांजी' आणि फांजीवर चढण्यासाठी ठिकठिकाणी पायऱ्यांची व्यवस्था दिसते.
 |
विसापूर किल्ल्याची 'उत्तर तटबंदी' आणि पायथ्याचे जंगल. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra.
|
 |
उत्तर तटबंदीतील 'बुरुज' आणि पायथ्याचे जंगल. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra.
|
 |
| उत्तर तटबंदीतील 'फांजी आणि तटबंदीतील पहारेकऱ्यांची खोली'. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra. |
किल्ल्याच्या या उत्तर तटबंदीत सुंदर कलात्मक खोली तयार केलेली दिसते. गस्त घालणाऱ्या पहारेकऱ्यांना ऊन पावसापासून बचाव करण्यासाठी तिचा वापर केला जात असावा. दिसायला तिची चौकट ठेंगणी असली तरी आत मात्र पुरुषभर उंची आहे. सध्या कडक उन्हातही खोलीत बऱ्यापैकी गारवा जाणवतो. बाजूला तटबंदीत सौच्चकुपाचीही व्यवस्था दिसते. अशीच पहारेकर्यांची दुसरी खोली किल्ल्याच्या दक्षिणेकडे आग्नेय तटबंदीत दिसते.
 |
तटबंदीतील पहारेकऱ्यांची खोली'. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra.
|
उजवीकडे पठारावर किल्ला बांधण्याच्या सुमारास वापरलेला चुन्याचा घाणा दिसतो. घाण्याच्या चरात भले मोठे उभे दगडी चाक लक्ष वेधून घेते. घाण्याच्या मागे टेकडीच्या दिशेने जमिनीवर खोदलेले दहा-बारा पाण्याचे कातळ हौद दिसतात. काही हौदात स्वच्छ पाणी दिसते. रखरखीत उन्हात इथल्या गार पाण्यात पाय बुडवून बसण्याचे स्वर्गसुख भटके आवर्जून घेतात. त्यापुढे किल्ल्याच्या पठारावरील दोन उंच टेकड्यांपैकी पहिली टेकडी दिसते.
 |
किल्ल्याच्या ईशान्य पठारावरील 'चुन्याचा घाणा'. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra.
|
 |
किल्ल्याच्या ईशान्येकडील 'कातळ टाक्या'. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra.
|
 |
किल्ल्याच्या ईशान्येकडील 'कातळ टाक्या'. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra.
|
या हौदांच्या पुढे पाच मिनिटांच्या अंतरावर उत्तरेकडे आणखी आठ नऊ कातळ हौदांचा समूह ओळीत दिसतो. काही हौदातील पाणी सुकले आहे. त्यापैकी एका हौदाच्या भिंतीवरील कमानीत हनुमानाचे शिल्प कोरलेले दिसते. मारुतीच्या डाव्या हातात फुल आणि उजवा हात चापट मारण्यासाठी उचलला आहे. मूर्तीच्या गळ्यात उपरणे, कमरेला कटीवस्त्र, गळ्यात कंठा, डोक्यावर शेंडी असे सुंदर शिल्प आहे. पावसात हौदातील पाण्यात त्याचे सुंदर प्रतिबिंब पाहण्यासारखे असते.
 |
| किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra. |
टेकडीच्या डावीकडे तटबंदी उध्वस्त झाल्यामुळे खाली उत्तरेकडे उभा कडा दिसतो. पुढे तटबंदी धरून १५ मिनिटे चालल्यानंतर उजवीकडील टेकडीच्या पायथ्याला चौथर्यावर वाड्याचे अवशेष दिसतात. त्याच्या सभोवती दगडी कुंपण आहे. त्याचे छप्पर उध्वस्त दिसते. या वाड्याच्या बाजूला टेकडीच्या उतारावर आणखी एका वाड्याचे अवशेष दिसतात. वाड्याच्या शिल्लक अवशेषांवरून हे बांधकाम पूर्वी कलात्मक असावे. हे अवशेष किल्ल्यावरील धान्य कोठार असावे असेही सांगितले जाते.
 |
उत्तरेकडील 'धान्य कोठार' अवशेष. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra.
|
 |
उत्तरेकडील 'दुसरे धान्य कोठार' अवशेष. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra.
|
 |
उत्तरेकडील 'दुसरे धान्य कोठार' अवशेष. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra.
|
कोठारांच्या समोर उत्तरेकडे गेल्यास कातळात खोदलेले पाच-सहा प्रशस्त मोठे पाण्याचे हौद दिसतात. त्याही पुढे टोकाला किल्ल्याचा 'चिलखती बुरुज' दिसतो. किल्ल्याचा हा उत्तर बुरुज आणि त्याची बाह्य तटबंदी यामध्ये फेरफटका मारण्यासाठी चिंचोळा मार्ग आहे. तटबंदीत उतरण्यासाठी डावीकडील धोकादायक दरीजवळून सांभाळून उतरल्यास पुढे घडीव पायऱ्या आणि सुंदर ठेंगणी कातळ चौकट दिसते. तटबंदीतून पलीकडे बाहेर येतानाही पायऱ्या आणि कातळ चौकट आहे. वर बुरुजावर उत्तरेकडे तोंड करून एक तोफ तसेच दुसरी तुटलेली तोफ ठेवलेली दिसते. बाजूला भगवा डौलाने फडकताना दिसतो. हा चिलखती बुरुज किल्ल्याच्या वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना म्हणून अभ्यासता येईल. लोहगडाच्या विंचूकड्याचा चिलखती बुरुज आणि हा दोघात बरेच रचनात्मक साम्य दिसते.
 |
| उत्तरेच्या चिलखती बुरुजाकडे जाताना दिसणाऱ्या कातळटाक्या. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra. |
 |
| उत्तरेचा 'चिलखती बुरुज'. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra. |
 |
चिलखती बुरुजाच्या 'दुहेरी तटबंदीतील मार्ग'. किल्ले विसापूर.
|
या बुरुजाची तटबंदी आणि कातळ हौद धरून मागे आल्यास, डावीकडे पायऱ्यांची चिंचोळी पायवाट गड उतार होताना दिसते. बाजूला पुरातत्व खात्याचा फलक दिसतो. हा 'भाजे' लेणी आणि 'पाटण' गावातून किल्ल्याच्या उत्तरेकडून येणारा मार्ग आहे. पायवाट उतरण्यापूर्वी उजवीकडे उतारावर एक ओतीव तोफ दिसते. या तोफेच्या बाजूलाच दुसरी लाकडी गाड्यावर ठेवलेली सुंदर लहान तोफ दिसते. दोन्ही तोफांची तोंडे उत्तर दिशा म्हणजे पाटण गावातून येणाऱ्या मार्गावर वळवली आहेत.
 |
चिलखती बुरुज'. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra.
|
हि उत्तरेची वाट उतरून आल्यास डावीकडील चिलखती बुरुजाच्या कातळ भिंतीला धरून उतरणाऱ्या प्रशस्त खोदीव पायऱ्या अचंबित करतात. त्यातील काही पायऱ्या उध्वस्त असून त्यांचे अस्ताव्यस्त दगड बाजूला पडले आहेत. अंदाजे पन्नास पायऱ्या उतरून खाली आल्यास समोर कातळ भिंतीवर भव्य हनुमान शिल्प लक्ष वेधून घेते. मारुतीच्या गळ्यात कंठा, कलाकुसर केलेले उपरणे, कटीवस्त्र, डोक्यावर शेंडी आणि पाठीवर भाला असे वेगळेपण दाखवणारे सुंदर शिल्प दिसते.
शिल्पाच्या बाजूला त्याच कातळात खोदलेल्या दोन मोठ्या गुहा आहेत. दोन्ही गुहेंच्या मध्ये कातळ भिंत दिसते. त्यापैकी एका गुहेच्या चौकट पट्टीवर सुंदर गणेश मूर्ती, तर दुसऱ्यावर उठावदार पुष्प कोरले आहे. पावसाळा वगळता या गुहा वस्ती करण्यायोग्य वाटतात. त्यापुढे कातळात खोदलेले दोन पाण्याचे हौदही आहेत. त्यातील पाणी मात्र पिण्यायोग्य दिसत नाही. ही वाट पुढे डावीकडे वळून 'भाजे' लेणी तर उजवीकडे वळणारी 'पाटण' गावाकडे जाते.
 |
| किल्ल्याची 'उत्तरेकडील भाजे आणि पाटण गावाकडे जाणारी वाट'. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra. |
 |
किल्ल्याची 'उत्तरेकडील भाजे आणि पाटण गावाकडे जाणारी वाट'. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra.
|
 |
उत्तरेकडील वाटेवरील 'श्री हनुमान शिल्प'. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra.
|
 |
हनुमान शिल्पाशेजारील 'खोदीव गुहा'. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra.
|
पूर्वी इथल्या तोफां'जवळ किल्ल्याचा उत्तर दरवाजा असावा. इंग्रज राजवटीत दक्षिणेकडील पायऱ्या आणि दरवाजा सोबतच उत्तरेकडीलही या पायऱ्या आणि दरवाजा उध्वस्त केला असावा. या मार्गाला किल्ल्याचा 'उत्तर दरवाजा' म्हणून ओळखले जाते.
 |
उत्तर दरवाजाजवळील 'तोफा'. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra.
|
उत्तर दरवाजाकडून मागे किल्ल्याच्या दुसऱ्या टेकडीकडे आल्यास सभोवती घनदाट जंगल आणि वाढलेल्या वेली दिसतात. इथून एक पायवाट किल्ल्यावरील 'राजवाड्या'कडे येते. वाड्याची पडझड झाली असून शिल्लक राहिलेले चौथरे, उंचच्या उंच अर्धवट भिंती त्याचप्रमाणे वाड्यातील पायऱ्या दिसतात. त्यांच्याभोवती झाडावेलींचा विळखा पडलेला दिसतो. भिंतीलगत वर जाणाऱ्या उध्वस्त पायऱ्यांवरून वाडा दुमजली पैसपैस असावा. वाड्याच्या भिंतीत ठेवलेल्या लहान मोठ्या दिवळ्याही दिसतात. वाड्याला तळघरही असावे. तळघरात उतरणारा पायरी मार्ग बुजलेला दिसतो. इथल्या एकाकी शांत वातावरणात एक गुढता भरून राहिली आहे.
 |
'राजवाड्याचे अवशेष'. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra.
|
 |
'राजवाड्याचे अवशेष'. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra.
|
 |
'राजवाड्याचे अवशेष'. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra.
|
या वाड्यापासून ईशान्येला गेल्यास किल्ल्यावरील पुरातन महादेव मंदिर दिसते. मंदिर दगडी असून वर छत आहे. मंदिरासमोर दोन कातळ नंदी आहेत. नंदीच्या मागे भगवा ध्वज आणि त्यामागे मंदिराच्या प्रांगणात सुंदर कोरीव दीपस्तंभ आहे. गुडघाभर उंचीच्या दगडी चौथऱ्यावरील मंदिरात प्राचीन शिवपिंडी दिसते. पिंडीवर वाहिलेली फुले, गंध आणि तेवणारी निरंजन, यावरून इथल्या दूर निर्जन मंदिरात नित्य पूजा होत असावी. त्या अपरिचित, अव्यक्त भक्ताला नमस्कार.
मंदिरामागे पाण्याचे खोल तळे आहे. मंदिराइतकेच ते प्राचीन असावे. त्यात उतरण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था आहे.
 |
| शिव शंभू 'श्री महादेव'. किल्ले विसापूर, मावळ, पुणे, महाराष्ट्र. |
मंदिरामागे चौथर्यावर दुपारच्या जेवणानंतर सावलीत विसावा घेणारे साध्या कपड्यातील काही शासकीय कर्मचारी दिसले. किल्ले विसापूर हा पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असून त्या तिघांची इथे सुरक्षा कर्मचारी म्हणून नेमणूक केली आहे. किल्ल्यावरील प्राचीन बांधकामाची कोणी हानी करू नये तसेच किल्ल्यावर अनुचित वर्तन करू नये म्हणून ते लक्ष ठेवून असतात. ऊन पाऊस आणि थंडीवाऱ्याची तमा न बाळगता ३५० एकरच्या अवाढव्य किल्ल्यावर फेरफटका मारतात. रोज दमछाक करणाऱ्या धारदार दगड धोंड्यातून गड चढउतार करतात. वय वर्षे पन्नाशी ओलांडलेले हे कर्मचारी आणि नोकरी निमित्त त्यांची इथली नेमणूक म्हणजे रोजची परीक्षाच वाटली. असो..
 |
| 'श्री महादेव मंदिर'. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra. |
 |
| मंदिरामागील 'तळे'. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra. |
महादेव मंदिरापासून डावीकडे वळल्यास समोर किल्ल्याच्या उत्तर काठाजवळ सुकलेला तलाव दिसतो. त्याच्या बाजूलाच दोन मोठे खोदीव कातळ हौद दिसतात. हौदांच्या पलीकडे किल्ल्याच्या उत्तर काठावर ईशान्येकडे दुसरा चुन्याचा घाणा दिसतो. किल्ल्याच्या पूर्व भागाकडे जाताना डाव्या बाजूला अस्तित्व टिकवून असलेली तटबंदी आणि उद्ध्वस्त अवशेष दिसतात. ही तटबंदी किल्ल्याच्या अगदी पूर्व टोकापर्यंत जाते. रखरखत्या पठारावरून किल्ल्याच्या पूर्व टोकाला जाताना हनुमानाची भग्न मूर्ती दिसते. ती अगदी हेतुपूर्वक तोडलेली स्पष्ट दिसते. मूर्तीच्या पुढेच उजव्या बाजूला टेकडीच्या पूर्व पायथ्याला आणखी आठ दहा खोदीव हौदांचा समूह दिसतो.
 |
| किल्ल्याच्या उत्तरेकडील सुकलेला 'तलाव'. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra. |
 |
| किल्ल्याच्या ईशान्येकडील 'चुन्याचा घाणा', बाजूला वस्तू अवशेष आणि मागे किल्ल्याचे पश्चिम पठार. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra. |
पुढे किल्ल्याच्या पूर्वेला समोर दोन कोठारांचे अवशेषही दिसतात. त्यापुढे दूरवर किल्ल्याच्या अगदी टोकाचा 'गोल' बुरुज दिसतो. हा बुरुज पठाराच्या सपाटीपासून उंचावर असून बुरुजाभोवती फेरफटका मारण्यासाठी बाह्य तटबंदीतून वाट ठेवली आहे. बुरुजावर भगवा फडकताना दिसतो. तुटलेल्या आठ-दहा पायऱ्या चढून बुरुजावर आल्यास वर तोफ मांडणी आणि ती वेगवेगळ्या कोणातून फिरवण्यासाठी वर्तुळाकार चराची व्यवस्था दिसते. बुरुजावरून समोर 'भातराशी'चा प्रचंड डोंगर आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर नजरेच्या टप्प्यात येतो. टेकडीला पुन्हा डावा वळसा मारल्यास दक्षिणेकडील किल्ल्याची तटबंदी दिसते. ही तटबंदी धरून पुन्हा किल्ल्याच्या दक्षिण दरवाजाकडे येता येते. इथे गडफेरी पूर्ण होते.
किल्ले विसापूरचा पूर्व पश्चिम पसरलेला अवाढव्य गडमाथा पूर्ण करण्यास जवळ जवळ चार तास लागतात. त्यात उन्हाळ्याचे दिवस असल्यास आजून शारीरिक, मानसिक कस लागतोच. गडमाथ्यावरील दोन्ही टेकडींच्या मधून जाणाऱ्या अनेक पायवाटांपैकी एक पायवाट वीस मिनिटात दक्षिणेकडील दरवाजाकडे जाते. उन्हात फिरून कंटाळलेले दुर्गप्रेमी बऱ्याच वेळा हा मार्ग अवलंबताना दिसतात. तर काही दुर्गप्रेमी पुन्हा भेट देऊन गडमाथा टप्प्याटप्प्याने फिरतात.
 |
उजवीकडे 'कोठार', डावीकडे 'गोल बुरुज'. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra.
|
 |
'गोल बुरुज'. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra.
|
 |
'गोल बुरुज' आणि मागे 'भातराशीचा डोंगर'. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra.
|
किल्ल्यावरील टेकडीच्या सभोवती जंगलातून अनेक पाऊलवाटा दिसतात. किल्ल्याच्या बांधणीसाठी लागणारे दगड किल्ल्यावरील कातळातूनच काढल्याने किल्ल्यावर पाण्यासाठी लहान मोठे मिळून जवळजवळ ८०-८२ कातळ हौद आहेत. त्यातील बऱ्याच हौदात उन्हाळभर पाणी टिकून राहते. गडमाथ्यावरच्या दोन्ही टेकडीवर गवत आणि झाडाझुडपाव्यतिरिक्त विशेष असे कोणतेही अवशेष दिसत नाहीत. चारा पाण्याची नैसर्गिक व्यवस्था असल्याने विसापूरच्या माथ्यावर बऱ्याच गाई बैल चरताना दिसतात. त्यांच्यामुळेच या फसव्या ढोरवाटा तयार झालेल्या दिसतात.
किल्ल्याचा एकूण आकार मराठी 'ळ' अक्षर किंवा संबळीच्या आकारासारखा दिसतो. त्यामुळे किल्ले विसापूर ताब्यात येताच शिवछत्रपतींनी त्याचे 'संबळगड' असे नामकरण केले. त्याचप्रमाणे तो 'फुलपाखरा'च्या आकाराचाही म्हणता येईल. किल्ल्याच्या दक्षिणोत्तर प्रवेश वाटा तर डावी उजवीकडे म्हणजे पूर्व-पश्चिमेकडे पंख पसरलेल्या फुलपाखराप्रमाणे किल्ल्याचा विस्तार दिसतो.
 |
| जानेवारी २०२१ साली लोहगडावरून - 'किल्ले विसापूर'. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra. |
बाजूच्या भाजे आणि बेडसे लेण्यांवरून प्राचीन 'बोरघाट' (लोणावळा) व्यापारी मार्ग आणि पवन मावळावर लक्ष ठेवण्यासाठी किल्ले विसापूर सातवाहन काळात बांधला. त्यापुढील चालुक्य, राष्ट्रकूट, यादव या सर्व राजवटी या किल्ल्यानं पहिल्या. १४८९ ला मलिक अहमदनं निजामशाहीची स्थापना करून बरेच किल्ले जिंकले. त्यावेळी लोहगडासोबत विसापूरही त्याने जिंकला. १६५७ मध्ये शिवछत्रपतींनी कल्याण, भिवंडी, रायरी जिंकून लोहगडासोबत किल्ले विसापूरही स्वराज्यात आणला. १६६५ ला पुरंदर तहात तो मुघलांना दिला तर १६७० ला जिंकून पुन्हा ताब्यात घेतला. पुढे पेशवाईत बाळाजी विश्वनाथ यांनी १७१३ ते १७१७ च्या कालावधीत किल्ल्याच्या तटबंदीची दुरुस्ती केली.  |
| किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Pune, Maharashtra. |
१८१८ पर्यंत जवळजवळ शंभर वर्षापेक्षा जास्त काळ मात्र किल्ले विसापूर मराठ्यांच्याच ताब्यात राहिला. पुढे १८१८ मध्ये 'जनरल प्रॉथर' लोहगड घेण्यासाठी आला. त्याने प्रथम विसापूर जिंकला. किल्ले विसापूर पडल्यानंतर त्याच्या दुसऱ्याच दिवशी मराठे स्वतःहून लोहगड सोडून निघून गेले.
किल्ले विसापूरची मजबूत तटबंदी, तटबंदीतील बुरुज, पाण्याचे कातळ हौद, हनुमानाची सुंदर कातळ शिल्पे बघण्यासाठी दुर्गप्रेमींनी इथे एकदा तरी नक्की भेट द्यावी. पावसाळ्यात इथला भन्नाट वारा कानात शिरून येणाऱ्या धुंदीचा अनुभव घेण्यासाठी इथे पुन्हा येण्याचे नक्की करूनच आम्ही परतलो..
|| श्री कृष्णार्पणमस्तू ||
येथे - जयवंत जाधव
No comments:
Post a Comment