Tuesday, 24 November 2026

'किल्ले महिपालगड'. ता. चंदगड, जि. कोल्हापूर, महाराष्ट्र. - 'Mahipalgad Fort', Chandgad, Dist. Kolhapur, Maharashtra.

                   'किल्ले महिपालगडा'ला भेट द्यायची झाल्यास कोल्हापूरहून संकेश्वर बेळगांव शिनोळी मार्गे पायथ्याच्या तीन किमी 'देवरवाडी' गावातून रस्ता आहे. हा रस्ता किल्ल्याच्या पश्चिमेकडून किल्ल्यावर येतो. रस्ता बऱ्यापैकी रुंद आणि सुस्थितीत आहे. पायथ्याच्या देवरवाडी पासून किल्ला तीन किमी अंतरावर आहे.

                    दुसरा रस्ता कोल्हापूर गडहिंग्लज नेसरी किणी कोवाड मार्गे उत्तरेकडील पायथ्याच्या चार किमी 'सुंडी' गावातून किल्ल्यावर येतो. रस्ता त्या मानाने वळणावळणांचा उभ्या चढचा, अरुंद आणि सध्या ठीकठिकाणी उखडला आहे. हा रस्ता किल्ल्याच्या बुरुजाजवळ गडाची उत्तर तटबंदी आणि त्या खालचा कातळ फोडून वर येण्यासाठी नंतरचा पर्यायी मार्ग बनवला आहे. नजीकच्या काळात बनवलेल्या या वाटेवरील ठिकाणाला 'बहिर्जी नाईक' प्रवेशद्वार असे नाव दिले आहे. म्हणजे किल्ले महिपालगडाला दक्षिणेकडून 'देवरवाडी' आणि उत्तरेकडून 'सुंडी' या दोन्ही गावांतून रस्ते (connectivity) आहेत. या रस्त्यांनी थेट गडमाथा गाठता येतो. संपूर्ण गडावर दाट वस्ती आहे. महिपालगड ग्रामपंचायतीने  गडावरही रस्ते बनवले आहेत. त्यामुळे गडमाथा वाहनानेही फिरता येतो.

                         किल्ले महिपालगड हा गिरीदुर्ग महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिणेला अंदाजे १३० किमी आणि कर्नाटकातील बेळगाव शहरापासून पश्चिमेला २० किमी अंतरावर आहे. त्याची समुद्रसपाटीपासून उंची सरासरी ३२०० फूट आहे. तर कर्नाटक राज्याची सीमा (Border) हिपालगडाच्या अगदी पूर्व तटबंदीतूनच जाते.

                     यावेळी आम्ही माझे कोल्हापूर जिल्ह्यातील साळगांव मधून आजरा मार्गे यायचं असल्यामुळे आम्ही नेसरी कोवाड मार्गे पायथ्याच्या 'सुंडी' गावातून स्वतःच्या वाहनाने किल्ल्याचा घाटरस्ता चढलो आणि पश्चिमेकडील देवरवाडीतून उतरलो. त्यामुळे परतीच्या प्रवासात किल्ल्याच्या पायथ्याला २ किमी अंतरावर असलेले प्राचीन श्री वैजनाथ मंदिरासही भेट देता आली. मंदिरापासून जवळच असलेल्या पण फार परिचित नसलेल्या प्राचीन गुहेला मात्र भेट देऊ शकलो नाही. वेळेअभावी तिथंपर्यंत पोहोचता आले नाही याचे वैषम्य राहिले. असो.

                     बहिर्जी नाईक प्रवेशद्वाराने वर येताच उजव्या बाजूला किल्ल्याच्या उत्तरेचा भव्य 'झेंडा' बुरुज स्वागत करतो. या बुरुजालगत किल्ल्याची थोडीफार उध्वस्त तटबंदी शिल्लक दिसते. बुरुजावर झेंडा काठीचे अवशेष दिसतात. बुरुजावर गवत आणि झुडपं माजलेली दिसतात. बाजूला गवताच्या 'गंज्या' रचलेल्या दिसतात. त्यापुढे घरांची वस्ती आहे. या बुरुजासमोरच एक उंच निमुळता कातळस्तंभ दिसतो. तो मुद्दाम ठेवला असावा. त्याचा उद्देश मात्र लक्षात येत नाही. अशा प्रकारचे बरेच कातळस्तंभ किल्ले सामानगडच्या उत्तर तटबंदीलगतही ठेवलेले दिसतात.

'बहिर्जी नाईक' प्रवेशद्वाराजवळील किल्ल्याच्या उत्तरेचा 'झेंडा बुरुज'. - किल्ले महिपालगड, चंदगड, कोल्हापूर, महाराष्ट्र. (Mahipalgad Fort, Kolhapur, Maharashtra.)

'सुंडी' गावाकडून दिसणारा किल्ल्याच्या उत्तरेचा 'झेंडा बुरुज आणि तटबंदी'. - किल्ले महिपालगड, चंदगड, कोल्हापूर, महाराष्ट्र. (Mahipalgad Fort, Kolhapur, Maharashtra.)
                            तर प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला तटबंदीलगत गावातील जनावरांच्या शेणाचे उकिरडे दिसतात. ते आणि पुढे गावातील घरांमागे किल्ल्याच्या उध्वस्त तटबंदीवर ठिकठिकाणी बांधलेली शौचालये आहेत. प्रवेशद्वाराने आत आल्यास डावीकडे झाडाझुडपात गडप झालेली किल्ल्याची अस्पष्ट तटबंदी दिसते. गावात प्रवेश करताना सुरुवातीलाच गावातील प्लास्टिकचा कचरा पडलेला दिसतो. रस्ता गावात जाणाऱ्या रस्त्याला डावी उजवीकडे छेदत दाट वस्तीत शिरतो. गावात आल्यावर किल्ल्यावर कोणकोणती ठिकाणे पाहता येतील त्याची चौकशी केली आणि आम्ही सरळ न जाता डावीकडील गल्लीतून किल्ल्याच्या तटबंदीलगत असलेल्या घरांच्या गल्लीतून पूर्वेकडे पुरातन श्री अंबाबाई मंदिराच्या प्रांगणात आलो. 
महिपालगड गावकऱ्यांनी तटबंदीवर बांधलेली 'सौचालये'. - किल्ले महिपालगड, चंदगड, कोल्हापूर, महाराष्ट्र. (Mahipalgad Fort, Kolhapur, Maharashtra.)

'महिपालगड गांव' आणि गल्लीतून रचलेल्या 'गवताच्या गंज्या'. - किल्ले महिपालगड, चंदगड, कोल्हापूर, महाराष्ट्र. (Mahipalgad Fort, Kolhapur, Maharashtra.)

                    सध्या या मंदिराचा जीर्णोद्वार चालू आहे. मंदिराच्या आवारात रेती खडी आणि विटांचे ढीग दिसले. मंदिरासमोरील प्रांगण प्रशस्त मोकळे आहे. तिथे शेजारच्या शेतकरी कुटुंबाने उन्हात सुगीत मळलेले भात वाळत घातलेले दिसत होते. जीर्णोद्धार चालू असलेल्या या नव्या मंदिराला उंच भव्य सभामंडप आणि मागे गाभाऱ्यात श्री अंबाबाईची पूर्वाभिमुख सुंदर मूर्ती आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर स्तंभावर शिवछत्रपतींचा अर्धपुतळा दिसतो. मंदिराचे प्रांगण वगळता आजूबाजूला दाट लोकवस्ती आहे. 
'श्री अंबाबाई मंदिर'. - किल्ले महिपालगड, चंदगड, कोल्हापूर, महाराष्ट्र. (Mahipalgad Fort, Kolhapur, Maharashtra)
 
'सभामंडप'. श्री अंबाबाई मंदिर. - किल्ले महिपालगड, चंदगड, कोल्हापूर, महाराष्ट्र. (Mahipalgad Fort, Kolhapur, Maharashtra)

श्री माता अंबाबाई. (Mahipalgad Fort)


                     अंबाबाई मंदिरापासून उजव्या गल्लीतून पुढे गेल्यास शिवकाळात किल्ल्याची जलव्यवस्था असलेले प्रचंड मोठे 'जांभ्या' कातळात (Laterite) खोदलेले तळे आणि तळ्याला लागूनच अरुंद विहीर आहे. तळे अंदाजे 25 फूट खोल असावे पण त्या बाजूची निमुळती विहीर किती खोल आहे हे आजपर्यंत गावकऱ्यांनाही सांगता येत नाही. या विहिरीतून तळ्यात पाणी येण्यासाठी दोन्हींच्या मध्ये कातळात आडवा बोगदा खोदला आहे. खोदलेल्या बोगद्याची रेखीव कमान बाहेरून दिसते. सध्या पाण्याची पातळी या बोगद्याच्या कमानीपर्यंत आहे. पावसाळ्यात मात्र तळे पूर्ण क्षमतेने भरते. विहिरीवर सध्या पाणी उपसण्यासाठी मोटर आणि सुरक्षिततेसाठी विहिरीवर लोखंडी जाळी ठेवली आहे. विहिरीच्या सभोवती आणि तळ्याचा काही भाग पाईपच्या रेलिंगने संरक्षित केलेला दिसतो. या तळ्याचा आकार सरासरी ४०× ७० फूट इतका मोठा असावा. तळ्यात उतरण्यासाठी काटकोनात फिरून येणाऱ्या अरुंद चरातून पायऱ्या खोदल्या आहेत. जांभा खडक (Laterite) मुळात सच्छिद्र, ठिसूळ असल्याने त्या पायऱ्यांची आता सिमेंटने डागडुगी केलेली दिसते. दसऱ्यात या तळ्यावर आधी अंबाबाईची पूजा त्यानंतर बाजूच्या मंदिरातील मूर्तीची पूजा करण्याची पूर्वापार परंपरा आहे, अशी माहिती बाजूच्या घरातील देसाई आजीबाईंनी आम्हाला दिली. तळ्यावर बसविलेल्या या रेलिंगचा उपयोग आजूबाजूच्या रहिवाशांना रोजची कपडे वाळत घालण्यासाठी होतो.    

'पाण्याचे तळे'. - किल्ले महिपालगड, चंदगड, कोल्हापूर, महाराष्ट्र. (Mahipalgad Fort, Kolhapur, Maharashtra)

तळ्यातून विहिरीकडे खोदलेल्या 'बोगद्याची पाण्याजवळ दिसणारी कमान'. - किल्ले महिपालगड, चंदगड, कोल्हापूर, महाराष्ट्र. Mahipalgad Fort, Kolhapur, Maharashtra.
  
'अरुंद खोल विहीर'. - किल्ले महिपालगड, चंदगड, कोल्हापूर, महाराष्ट्र. (Mahipalgad Fort, Chandgad, Kolhapur, Maharashtra)

अरुंद चरातून तळ्यात उतरणाऱ्या 'पायऱ्या'. - किल्ले महिपालगड, चंदगड, कोल्हापूर, महाराष्ट्र. (Mahipalgad Fort, Chandgad, Kolhapur, Maharashtra.)
                     या देसाई आजींनी आम्हाला 'तळ्यापलीकडील कोठार बघायला जा' असे सांगितले. आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा कोठाराची अर्धवट बाह्य भिंत आणि त्यामागे सिमेंट काँक्रीटचे पक्के घर उभारलेले दिसले. 
कोठाराच्या ठिकाणी बांधलेले घर. - किल्ले महिपालगड, चंदगड, कोल्हापूर, महाराष्ट्र. (Mahipalgad Fort, Chandgad, Kolhapur, Maharashtra.)

                      या प्रचंड तळ्याच्या आणि अंबाबाई मंदिराच्या मागे महिपालगड बालेकिल्ल्याचे सुंदर प्रवेशद्वार दिसते. उजवीकडील बुरुज आणि डावीकडील तटबंदीतून उजवे वळण घेत रस्ता या बालेकिल्ल्याच्या गोमुखी दरवाजात येतो. हा बालेकिल्ल्याच्या भाग बुरुज आणि तटबंदीने वेगळा केलेला दिसतो. बालेकिल्ल्याची मजबूत कातळ चौकट आणि आजूबाजूला थोडीफार तटबंदी शाबूत दिसते. तटबंदीवर झुडपं वाढली आहेत. या दरवाजाच्या चौकटीवर सुंदर गणेशमूर्ती दिसते. हा बालेकिल्ल्याचा बुरुज, दरवाजा, त्या मागचे पाण्याचे खोदीव तळे, विहीर आणि अंबाबाई मंदिर हे त्यावेळी बालेकिल्ल्याचे भाग असावेत. सध्या या दरवाजाभोवती गावातील घरांनी अतिक्रमण केलेले दिसते. बुरुजाच्या अगदी बाजूलाच घर असून बुरुजाला खेटून पाण्याचे ड्रम भरून ठेवलेले दिसतात. हे सगळे बहुदा जागेअभावी विभक्त होऊन गावात विस्तारलेल्या कुटुंबांचे परिणाम असावेत.
'बालेकिल्ल्याचा गोमुखी दरवाजा'. - किल्ले महिपालगड, चंदगड, कोल्हापूर, महाराष्ट्र. (Mahipalgad Fort, Chandgad, Kolhapur, Maharashtra.

'बालेकिल्ल्याचा गोमुखी दरवाजा'. उजवीकडे बुरुज आणि डावीकडे तटबंदी. - किल्ले महिपालगड, चंदगड, कोल्हापूर, महाराष्ट्र. (Mahipalgad Fort, Chandgad, Kolhapur, Maharashtra.)

'बालेकिल्ल्याचा दरवाजा' (मागील बाजू) - किल्ले महिपालगड, चंदगड, कोल्हापूर, महाराष्ट्र. (Mahipalgad Fort, Chandgad, Kolhapur, Maharashtra.)


'बालेकिल्ल्याचा दरवाजा' (मागील बाजू ) - किल्ले महिपालगड, चंदगड, कोल्हापूर, महाराष्ट्र. (Mahipalgad Fort, Chandgad, Kolhapur, Maharashtra.)

                        पुढे किल्ल्याच्या पूर्व दिशेला आग्नेय कोपऱ्यात तटबंदीलगत 'निशान' बुरुज आहे. बुरुजाची डागडुगी केली असल्याने तो सुस्थितीत दिसतो. बुरुजावर जाणाऱ्या वळणदार पायऱ्या असून वर झेंडा फडकवण्यासाठी स्तंभ आहे. या बुरुजावरून पूर्वेकडे गडपायथ्याचे घनदाट जंगल त्यापुढे कर्नाटक राज्यातील शेती व पुढे बेळगाव शहरापर्यंतचा विस्तृत प्रदेश नजरेस येतो. तसेच या बुरुजावरून पश्चिमेकडील 'कलानंदीगड'ही दृष्टीस पडतो. बुरुजाच्या पायथ्याला श्री महादेव मंदिर आणि त्यासमोर नंदी आहे. या बुरुजाजवळ येईल वातावरण शांत निसर्गरम्य आणि निवांत आहे. सभासद बखरीत उल्लेख केल्याप्रमाणे शिवछत्रपतींनी वसवलेल्या १११ किल्ल्यांपैकी महिपालगड हा एक आहे.

'निशान बुरुज' - किल्ले महिपालगड, चंदगड, कोल्हापूर, महाराष्ट्र. (Mahipalgad Fort, Chandgad, Kolhapur, Maharashtra.)
  
'निशान' बुरूजाजवळून बेळगांवकडील दिसणारा परिसर. - किल्ले महिपालगड, चंदगड, कोल्हापूर, महाराष्ट्र. (Mahipalgad Fort, Chandgad, Kolhapur, Maharashtra.)
  
'निशान' बुरूजावरून पूर्व पायथ्याचे दिसणारे घनदाट जंगल. - किल्ले महिपालगड, चंदगड, कोल्हापूर, महाराष्ट्र. (Mahipalgad Fort, Chandgad, Kolhapur, Maharashtra.)
 
'निशान' बुरूजावरून पश्चिमेकडे अंधुक दिसणारा 'कलानंदीगड'. - किल्ले महिपालगड, चंदगड, कोल्हापूर, महाराष्ट्र. (Mahipalgad Fort, Chandgad, Kolhapur, Maharashtra.)
  
श्री महादेव मंदिर- 'निशान'  बुरुज. किल्ले महिपालगड. (Mahipalgad Fort, Maharashtra.)

श्री महादेव मंदिर- 'निशान'  बुरुज. किल्ले महिपालगड. (Mahipalgad Fort.)


'निशान' बुरूजाजवळील रम्य परिसर. - किल्ले महिपालगड, चंदगड, कोल्हापूर, महाराष्ट्र. (Mahipalgad Fort, Chandgad, Kolhapur, Maharashtra.)
                      किल्ल्याला उत्तर, पूर्व तसेच पश्चिमेकडे तटबंदी आहे ती बऱ्यापैकी उध्वस्त किंवा ढासळलेली दिसते. तटबंदी लगतच रहिवाशांची घरे आहेत. या तटबंदीवरच त्यांनी ठीकठिकाणी शौचालये बांधली आहेत. तसेच लाकूडफाटा व गवताच्या गंज्या रचल्या आहेत. त्यामुळे किल्ल्याची अवस्था बिकट दिसते.
पूर्व तटबंदीवर बांधलेली 'सौचालये'. किल्ले महिपालगड, चंदगड, कोल्हापूर, महाराष्ट्र. (Mahipalgad Fort, Kolhapur, Maharashtra.)
  

पूर्व तटबंदीवर बांधलेली 'सौचालये'. किल्ले महिपालगड, चंदगड, कोल्हापूर, महाराष्ट्र. (Mahipalgad Fort, Kolhapur, Maharashtra.)
                       महिपालगडाचे मुख्यत्वे दोन भाग पडले आहेत. गडावरील पूर्व भागात दाट लोकवस्ती आहे. तर पश्चिमेकडील भाग मोकळा रिकामी असून तिथे भारतीय सैन्यदलाचा तटबंदीला दोराच्या शिड्या लावून नित्य सराव सुरू असतो. त्यामुळे त्या भागात फारशी वस्ती दिसत नाही. या दोन्ही भागांच्या मध्यभागी चौकात एसटी स्टँड आहे. बाजूला प्राथमिक शाळा आहे. चौकात शिवछत्रपतींचा अश्वारूढ सुंदर पुतळा आहे. यातील छत्रपतींच्या अश्वाची सावधपणे उभी असलेली प्रतिमा मनाला भावते. 
महिपालगड चौकातील 'एस.टी. स्टॅन्ड'जवळील शिवछत्रपतींचा पुतळा.  - किल्ले महिपालगड, चंदगड, कोल्हापूर, महाराष्ट्र. (Mahipalgad Fort, Chandgad, Kolhapur, Maharashtra.)
  
दाट लोकवस्तीचे महिपालगड. - किल्ले महिपालगड, चंदगड, कोल्हापूर, महाराष्ट्र. (Mahipalgad Fort, Chandgad, Kolhapur, Maharashtra.)
   
महिपालगड 'प्राथमिक शाळा'. - किल्ले महिपालगड, चंदगड, कोल्हापूर, महाराष्ट्र. (Mahipalgad Fort, Chandgad, Kolhapur, Maharashtra.)
                      प्राचीन काळी 'महिपाल' राजाने हा किल्ला बांधला. महिपाल राजास कुष्ठरोग झाल्यानंतर त्याने गडाखालील 'वैजनाथ' मंदिराच्या मागील पवित्र जलकुंडात अंघोळ केली आणि तो बरा झाला. ही माहिती महिपालगडाचे रहिवाशी सांगतात. 

                    तर मंदिराचे वयस्क पुजारी श्री शंकर काका मंदिराबद्दल सांगतात की राम - रावण युद्धात जेव्हा लक्ष्मणाला बाण लागून मूर्छित झाला त्यावेळी हनुमान संजीवनी घेऊन दक्षिणेकडे लंकेत जाताना त्या पर्वताचा काही भाग इथले मंदिर आणि आजूबाजूच्या परिसरात पडला. या घटनेमुळे महिपालगडाच्या पायथ्याशी असलेल्या जंगलात आज बऱ्याच वनौषधी सापडतात. या अख्यायिकेला अनुसरून, महिपाल राजाने श्री 'वैद्यनाथा'ची स्थापना केली व कुष्ठरोगातून बरा झाल्यामुळे आरोग्य भवानी (माता पार्वती) मंदिराची स्थापना केली. वैद्यनाथाचा अपभ्रंश होऊन 'वैजनाथ' आणि पार्वती मंदिराला 'आरोग्य भवानी' असे नाव रूढ झाले.

प्राचीन हेमाडपंथी 'श्री वैजनाथ मंदिर संकुल'. - किल्ले महिपालगड, चंदगड, कोल्हापूर, महाराष्ट्र. (Mahipalgad Fort, Chandgad, Kolhapur, Maharashtra.)
                     सध्या दिसणाऱ्या या हेमाडपंथी मंदिराची उभारणी अकराव्या शतकात झाली. मंदिराला सभामंडप आहे. सभामंडपात मोठा रेखीव कातळनंदी आणि नंदीसमोर कासव दिसते. मंडपाचे कातळखांब भव्य, सुबक आणि घाटदार कोरलेले दिसतात. तर गाभाऱ्यात मोठे, सुबक शिवलिंग दिसते.  
प्राचीन हेमाडपंथी 'श्री वैजनाथ मंदिर'. - किल्ले महिपालगड, चंदगड, कोल्हापूर, महाराष्ट्र. (Mahipalgad Fort, Chandgad, Kolhapur, Maharashtra.)
  
'नंदी'. श्री वैजनाथ मंदिर. - किल्ले महिपालगड, चंदगड, कोल्हापूर, महाराष्ट्र. (Mahipalgad Fort, Chandgad, Kolhapur, Maharashtra.)
  
श्री वैजनाथ मंदिराचे 'कातळस्तंभ'- किल्ले महिपालगड, चंदगड, कोल्हापूर, महाराष्ट्र. (Mahipalgad Fort, Chandgad, Kolhapur, Maharashtra.)


'श्री वैजनाथ'- किल्ले महिपालगड, चंदगड, कोल्हापूर, महाराष्ट्र. (Mahipalgad Fort, Chandgad, Kolhapur, Maharashtra.)
                       मंदिराच्या उजव्या बाजूला मंदिराचा भाग असलेले आरोग्य भवानी माता पार्वतीचेही तसेच सुंदर मंदिर आहे. गाभाऱ्यात माता पार्वतीची भव्य सुंदर मूर्ती विराजमान आहे. मूर्तीच्या मस्तकावर अंगचेच शिवलिंग, शिवलिंगावर नागदेवता आणि वर कीर्तीमुख आहे. अगदी वेगळेपण सिद्ध करणारी अशी ही सुंदर प्राचीन मूर्ती आहे. एकत्वाच्या दोन्ही देवता बाजूबाजूला असल्या तरी त्या एकाच मंदिरसंकुलाचा भाग आहेत. हे भव्य प्राचीन मंदिर उत्तराभिमुख दिसते. श्री गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायात या श्री वैजनाथाच्या ठिकाणाचे 'दक्षिणेतील महाक्षेत्र' असा उल्लेख आहे.
'आरोग्य भवानी - माता पार्वती मंदिर'. - किल्ले महिपालगड, चंदगड, कोल्हापूर, महाराष्ट्र. (Mahipalgad Fort, Chandgad, Kolhapur, Maharashtra.)
  
'सभामंडप', आरोग्य भवानी - माता पार्वती मंदिर. - किल्ले महिपालगड, चंदगड, कोल्हापूर, महाराष्ट्र. (Mahipalgad Fort, Chandgad, Kolhapur, Maharashtra.)
  

'आरोग्य भवानी - माता पार्वती'. - किल्ले महिपालगड, महाराष्ट्र.
'आरोग्य भवानी - माता पार्वती'. - किल्ले महिपालगड, महाराष्ट्र.
                               श्री वैजनाथ मंदिराच्या मागील बाजूस दगडात बांधून घेतलेले पवित्र जलकुंड आहे. ते मंदिरा इतकेच प्राचीन आहे. त्याच्या भिंतींवर नंदी, मत्स्य, नाग, हस्त, शिवलिंग अशा कलात्मक आकृत्या कोरल्या आहेत. याच जलकुंडात महिपाल राजाने आंघोळ करून कुष्ठरोग बरा झाल्याचे सांगितले जाते.
श्री वैजनाथ मंदिरामागील 'जलकुंड'. - किल्ले महिपालगड, चंदगड, कोल्हापूर, महाराष्ट्र. (Mahipalgad Fort, Chandgad, Kolhapur, Maharashtra.)
  
श्री वैजनाथ मंदिरामागील 'जलकुंड' आणि त्यामागे 'यात्रीनिवास' - किल्ले महिपालगड, चंदगड, कोल्हापूर, महाराष्ट्र. (Mahipalgad Fort, Chandgad, Kolhapur, Maharashtra.)

                    सध्या या मंदिराचा विस्तार करण्यासाठी मंदिरासमोर आणखी भव्य सभामंडप उभारण्याचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. नवीन बांधकाम मंदिराचे प्राचीनत्व जपत तोडीस तोड करणे चालू असले तरी मुळात हेमाडपंथी असलेल्या शैलीस मात्र जुळताना दिसत नाही. या मंदिराची शैली हेमाडपंथी असल्यामुळे मंदिरासोबतच महिपालगडाचेही प्राचीनत्व सिद्ध होते.
श्री वैजनाथ मंदिरासमोरील 'नवीन सभामंडप'. - किल्ले महिपालगड, चंदगड, कोल्हापूर, महाराष्ट्र. (Mahipalgad Fort, Chandgad, Kolhapur, Maharashtra.)

                    बेळगाव शिनोळी आणि पुढे देवरवाडी मार्गे महिपालगडावर जाताना पायथ्याला मुख्य रस्त्याच्या उजवीकडे सखलात हे मंदिर आहे. त्यासाठी सुघड पायऱ्या आहेत. या पायऱ्यांच्या उजवीकडे मंदिराच्या बाजूलाच यात्रेकरूंच्या निवासासाठी सोय आहे. 
श्री वैजनाथ मंदिराजवळील 'यात्रीनिवास' - किल्ले महिपालगड, चंदगड, कोल्हापूर, महाराष्ट्र. (Mahipalgad Fort, Chandgad, Kolhapur, Maharashtra.)
                     मंदिराच्या पलीकडे रस्त्याच्या डावीकडे दगडात बांधवलेले आणखीन दुसरे पुरातन पाण्याचे तळे आहे. उथळ असल्याने सध्या त्यातील पाणी आटले आहे. या प्राचीन मंदिराचा परिसर अगदी निसर्गरम्य आणि शांत असून दुर्गभटक्यांनी थांबून तिथे आवर्जून विसावा घ्यावा असे आहे.
श्री वैजनाथ मंदिराजवळील 'दगडी बांधीव तळे'. - किल्ले महिपालगड, चंदगड, कोल्हापूर, महाराष्ट्र. (Mahipalgad Fort, Chandgad, Kolhapur, Maharashtra.)
  
'श्री वैजनाथ मंदिर परिसर'. - किल्ले महिपालगड, चंदगड, कोल्हापूर, महाराष्ट्र. (Mahipalgad Fort, Chandgad, Kolhapur, Maharashtra.)

                      'महिपालगड' गाव बरेच विस्तारले आहे. गाव शेतीप्रधान आहे. महिपालगड महाराष्ट्रात असला तरी किल्ल्याच्या पूर्व तटबंदीतूनच कर्नाटक राज्याची सीमा जाते. त्यामुळे गडावर राहणाऱ्या रहिवाशांची शेती तसेच रोटी बेटीचे व्यवहार कर्नाटक राज्यातही आहेत. अगदी कर्नाटक राज्याच्या सीमेवरच असल्यामुळे इथले रहिवाशी मराठी बरोबरच कन्नड अगदी लीलया बोलतात. गडवाशीयांना गडाविषयी सार्थ अभिमान असून महिपाल गडाबद्दल ते अगदी भरभरून बोलताना दिसतात..

                                                     || श्री कृष्णार्पणमस्तु ||

येथे - जयवंत जाधव

'किल्ले महिपालगड'. ता. चंदगड, जि. कोल्हापूर, महाराष्ट्र. - 'Mahipalgad Fort', Chandgad, Dist. Kolhapur, Maharashtra.

                   'किल्ले महिपालगडा'ला भेट द्यायची झाल्यास कोल्हापूरहून संकेश्वर बेळगांव शिनोळी मार्गे पायथ्याच्या तीन किमी 'दे...