Saturday 19 December 2020

गोरोबा कुंभारांच 'तेर' - प्राचीन 'तगर' नगर (Ter - Goroba Kumbhar)

             मराठवाड्याच्या भटकंतीत 'परांडाकिल्ल्यानंतर संत गोरोबा कुंभारांच्या 'तेर' (ढोकी) गावी गेलो. जाण्याचा उद्देश फक्त वारकरी संप्रदायाचे संत गोरोबा काकांच घर आणि त्यांनी वय वर्षे ४९ व्या वर्षी घेतलेल्या समाधी मंदिराचं दर्शन घेणं इतकाच होता.

       आजोबा आणि चुलते वारकरी संप्रदायाचे असल्यानं तसेच  वडीलही अधून मधून वारी करत असल्यानं भागवत धर्म आणि 'तेरला जाण्याबद्दल मनात एक अनामिक ओढ होतीच. कोल्हापूर जिल्ह्यातील आमच्या मूळ गावातून त्यावेळच्या दळणवळनांच्या साधनांमुळं पंढरपूरदेहू-आळंदी त्यांना दूर असायची. त्यानंतर पुढे गोरोबा काकांचं 'तेरतर दूर कर्मकठीणच होतं. इथपर्यंत आलोच आहे  तर आपण तरी जाऊ. बघू. इतकाच उद्देश होता.

         मागे औरंगाबादच्या भटकंतीत संत एकनाथांच्या पैठणला भेट झालीच होती. या वेळचा योग हे कदाचित पूर्वसंचित असावं..

           उस्मानाबाद पासून 'तेरउत्तर पूर्वेला २८ किलोमीटर आहे. स्वतःचं वाहन असल्यानं बार्शीहून पुढे ५७ किमीचं 'तेरतासाभरातच गाठलं. आणि या प्राचीन गावचे धागेदोरे समजत गेले तसं अचंबित झालो. विचारपूस करत एस टी स्टँडच्या पुढे गावाबाहेर तेरणा नदीचा पूल ओलांडला की नदीकाठावरच्या घाटावर डाव्या हाताला लाल रंगातील 'श्री कालेश्वरमहादेवाचं पुरातन मंदिर लक्ष वेधून घेतं. त्याच्याच बाजूला गोरोबा काकांचं समाधी मंदिर आहे. 

श्री कालेश्वर महादेव मंदिर ( Kaleshwar Temple) 
गोरोबा काकांचं समाधी मंदिर (Goroba Temple) 

तेरणा नदी (Terna River)



       ७ व्या शतकातील चालुक्य घराण्यातील हे श्री कालेश्वर मंदिर मोठं सुबक असून, अंतराळविरहित आहे. गर्भगृहाचं छप्पर चौरस असून वर निमुळतं होत गेलं आहे. पुढे सभामंडप आहे. मंदिराच्या बाहेरील आधारभिंती मध्ययुगीन काळात बांधल्या असाव्यात. सध्या भिंतींना गिलावा केल्यानं मुळ भिंतीच्या आराखड्याचा अंदाज येत नाही.   शिखर द्राविडी पद्धतीचं असून , शिखरामध्येही छोटं मंदिर आहे. त्यात एक यज्ञकुंड असून, हे यज्ञकुंड म्हणजेच सितामाईची जागा होती असं समजलं जातं.


गोरोबा काकांचं मंदिर(मागील बाजू)
श्री कालेश्वर महादेव मंदिर 

    काही इतिहास संशोधकांच्या मते महेश्वराचे परमभक्त कालचुरी राजवटीतील हे मंदिर असावं. पुराणकथेनुसार मात्र दुर्वास ऋषी नेहमी पूजा करत असलेलं हे कालेश्वराचं मंदिर विश्वकर्म्यानं बांधलं आहे.

गोरोबा काका मुखवटा (समाधी मंदिर)

           बाराव्या शतकातील गोरोबा काका या मंदिरात जप आणि विठ्ठलाचं भजन कीर्तन करत. त्यांनी या मंदिराच्या बाजूलाच विठ्ठलध्यासानं समाधी घेतली. सध्या तिथं त्यांचं समाधी मंदिर आहे. मंदिरात काकांचा मुखवटा असून त्यामागेच विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे. 

गोरोबा काकांचं समाधी मंदिर (आतील बाजू)

  गोरोबा काकांच्या समाधी मंदिरामागेच पुरातन आणि सुबक नक्षीचं निलकंटेश्वर महादेव मंदिर आहे.पश्चिमेकडं शिवलिंगाचं तोंड असलेलं हे वैशिठ्यपुर्ण मंदिर आहे.

निलकंठेश्वर मंदिर (Nilkantheshwar Temple) 


         त्यानंतर आम्हाला उत्कंठा असलेलं काकांचं घर शोधत गावात गेलो. तिथं मात्र भ्रमनिरास झाला. नवीन सिमेंटचं बांधकाम करून, घराला पुराण आभास देण्याचं काम सध्या पुरातत्व विभागानं चालू केलं आहे. घरात छप्पर तोलून धरण्यासाठी लाकडी खांब बसवले असून, त्यांना ऐतिहासिक स्वरूप आणण्याचा प्रयत्न केला आहे. आत, पुढे डाव्या कोपऱ्यात चौथऱ्यावर विठ्ठल मूर्ती उभी आहे. जिथं हा चौथरा आहे, तिथंच काकांचा मडकी बनवण्यासाठी चिखलाचा गारा असायचा असं तिथल्या एका आजीबाईनं माहिती दिली.

घरातील चौथरा 

गोरोबा काकांचं घर 

     कालपरत्वे ७०० वर्षांपूर्वीचं मातीचं घर टिकाव धरून राहणं अशक्यच आहेपण गोरोबा काकांच्या नांदत्या घराची जागा बघून मात्र समाधान झालं. 

           चैत्र वद्य एकादशी ते आमावस्या कालावधीत तिथं मोठा उत्सव भरतो. आजूबाजूच्या पंचक्रोशीतून वारकरी सांप्रदायाच्या दिंड्यापालख्या काकांच्या भेटीस येतात. भजन कीर्तन आणि पारायणं होतात. बाराव्या शतकातील गोरोबा काकांचे समकालीन व त्यानंतरही संतश्रेष्ठांचा येथे मेळा भरायचा. त्याकाळीही भागवत धर्माचं "तगर" म्हणजेच सध्याचं 'तेरएक प्रमुख केंद्र होतं.

       'तेरगावच्या मध्यवर्ती वस्तीत एक विष्णुचं मंदिर असूनत्याचा आकार गजपृष्ठासारखा (हत्तीची पाठ) आहे. पहिल्या शतकातील 'तक्षीलाआणि 'सिरकपशहराच्या स्थापत्य शास्त्राची प्रेरणा घेऊन तिसऱ्या शतकात ही वास्तू बांधली असावी. 

त्रिविक्रम मंदिर (समोरून) Trivikram Temple

त्रिविक्रम मंदिर (मागील बाजू)  Trivikram Vishnu Temple

            सातवाहन काळातील हे मंदिर असून, आधी त्या जागेवर बौद्ध चैत्य असावे. पुढे सुमारे तीनशे वर्षानंतर म्हणजे सहाव्या शतकातील चालुक्य काळात बौद्ध धर्माचा पगडा ओसरल्यानंतर, त्यावर हलक्या व मजबूत विटांचं छप्पर घालून आत त्रिविक्रम अवतारातील (बळीला पाताळात दाबताना) विष्णूची मूर्ती स्थापली असावी. या केलेल्या बदलामूळंच मंदिराचा आकार बौद्ध चैत्यसारखा दिसतो. थोडक्यातबौद्ध चैत्याचा मंदिरात बदल झाला असं म्हणायला हरकत नाही. असो..

   आत मंदिरात काळ्या पाषणातील श्री विष्णूंची भव्य रेखीव, सुबक मूर्ती असून, श्री विष्णूंच्या पायाखाली बळी आहे. बाजूलाच बळीची पत्नी असून शुक्राचार्य ही आहे. महाराष्ट्रातील हे एकमेव आणि वैशिष्ठ्यपूर्ण, अतिशय पुरातन मंदिर आज तिथं अस्तित्वात आहे. प्राचीन "त्रिविक्रम विष्णू मंदिर" म्हणून त्याची ख्याती आहे.

त्रिविक्रम विष्णु मूर्ती 


     मंदिराच्या गर्भगृहासमोर पुर्णतः हलक्या विटांनी बांधलेला आणि मजबूत लाकडी खांबांनी आधार दिलेलाअंदाजे साडेतीन मीटर उंचीचा सभामंडप आहे. इथल्या  लाकडी तुळया आणि खांबांचं काम बघण्यासारखं आहे. मंडपात गर्भगृहासमोरच यज्ञ वेदी (धुमी) असून जमीन सारवलेली पण ओबडधोबड आहे.

मंडप 


               
या मंडपात संत नामदेवांनी कीर्तन केल्याचा उल्लेख 'तेरच्या इतिहासात आढळतो. 

               या मंदिराच्या प्राकारात प्रवेश करताच समोर पुरातत्व खात्याचा या मंदिराबद्दल माहितीचा फलक दिसतो. त्यावरील लेख ऊन पावसामुळं पूर्ण मिटला असून फक्त पत्रा शिल्लक राहिला आहे. या प्राचीन अमूल्य आणि दुर्मिळ ठेव्याचं रक्षण सध्या दैवावर हवाला ठेवून होत आहे. इथं येण्यापूर्वी परांडा किल्ल्यातील 'ढाल-काठी' बुरुजावरच्या भल्या मोठ्यादुर्लभपंचधातूंच्या तोफेवर दोन सुंदर सिंह आहेत. त्यापैकी एका सिंहाचे मात्र तोंड मानेपासून कटर लावून कापून नेलं आहे. आशी घटना घडू नयेत हीच अपेक्षा. 

       मंदिरासमोर मंडपात गरुड मूर्ती हात जोडलेल्या मुद्रेत असून बाजूलाच उजवीकडं महदेवाचं छोटं पुरातन देवूळ आहे. त्यात शिवलिंगामागेच पार्वती, गणेश आणि नागमूर्ती आहेत. 

गरुड मंडप 
महादेव देवुळ

             हलक्या आणि टिकाऊ विटांचं तंत्र त्याकाळी विकसित असावं. अशाच विटांचा एक बौद्धकालीन स्तूप 'तेरएस टी स्टँडच्या समोरच केलेल्या उत्खननात नजीकच्या काळात सापडला आहे. 


             मातीत मोठ्या प्रमाणात तूस मिसळून त्याची वीट उच्च तापमानाला भाजल्यास आतील तूस जळून जातं आणि सच्छिद्र पोकळ्या तयार झालेली वीट वजनानं खूप हलकी व मजबूत होते. या विटांची घनता पाण्यापेक्षा कमी असल्यानं त्या पाण्यावर सहज तरंगतात.


        अशी पाण्यावर तरंगणारी वीट तिथल्या कै. रामलिंगप्पा लामतुरे वस्तुसंग्रहालयात असूनअशाच विटेचा एक तुकडा गोरोबा काकांच्या मंदिरासमोर पाण्यावर तरंगताना दिसतो.

         महाराष्ट्रात मराठवाडा हे १५२४ पासून भूकंप प्रवण केंद्र असल्याच्या नोंदी आहेतच. प्राचीनकाळी जीवितहानी टाळण्यासाठी अशा हलक्या विटांची घरं आणि मंदिरं बांधण्याचं तंत्र तिथं विकसित झालं असावं.

          उस्मानाबाद पासून २८ किलोमीटरवर असलेल्या 'तेर'चा पुराणात "सत्यपूरी" असा उल्लेख आढळतो. काही ठिकाणी "तगर" नगर असा उल्लेख आहे.

            इथं असलेल्या पुरातन मंदिरांची निर्मिती दुसऱ्या ते सातव्या शतकातील आढळते. उत्खननात सापडलेले बौद्धकालीन स्तूपशिलाहार काळातली नाणीत्याचप्रमाणे सातवाहन कालीन देवतेच्या मुर्त्या तसेच ग्रीक व रोमची नाणीही सापडली आहेत.यावरून 'तेरहे प्राचीन काळी व्यापारसंस्कृती आणि धर्म प्रचाराच्या प्रमुख केंद्रापैकी एक असल्याचे पुरावे समोर आले आहेत.

     तसेच अनेक प्राचीन हस्तिदंती वस्तू, कंगवे, मातीच्या भांड्यांचे तुकडे, मणी, गळ्यातील हार, बाहुल्या, शंख शिंपले, जुन्या मोठाल्या विटा उत्खननात सापडल्या आहेत. 

कै. रामलिंगप्पा लामतूरे  

 


      या सर्व वस्तू तिथल्या कै. रामलिंगप्पा लामतुरे वस्तू संग्रहालयात ठेवल्या आहेत. कै. रामलिंगाप्पांनी त्यांच्या हयातीत प्रतिकूल परिस्थितीतही अथक प्रयत्नांनी जमवलेल्या या जवळ जवळ २५
 हजार वस्तु १९७२ मध्ये शासनाच्या हवाली केल्या.

           रोम आणि ग्रीकचे व्यापारी किंमती माल दक्षिणेकडून प्राचीन 'तगरआणि 'पैठणला आणून नंतर तो बैलगाडीत भरून गुजरात मध्ये सध्याच्या भरुच (भडोच)ला पाठवत असल्याचा उल्लेख एक ग्रीक प्रवाशानं 'पेरिप्लेस ऑफ द एरिथ्रीएन सीया ग्रंथात इ. स. ५०  ते १३० च्या काळात केला आहे. दुसऱ्या शतकात 'टोलेमी'ने केलेल्या प्रवास वर्णनात 'तेरचा उल्लेख आढळतो.

      सातवाहन काळात या नगरानं सुवर्णकाळ अनुभवला असून, 'तेर' त्या काळी दक्षिणेची राजधानी होती.

      'तेर' गावातच श्री उत्तरेश्वराचं इ. स. ५५० च्या सुमारास फक्त हलक्या आणि कलात्मक विटांनी बांधलेलं महादेव मंदिर आहे. पण वेळेअभावी ते पाहता आलं नाही. 

            आधी उल्लेख केल्याप्रमाणे तिथं आमचं जाणं केवळ गोरोबा काका इतकंच होतंपण तिथून निघताना मात्र बरंच काही घेऊन निघालो होतो..


|| श्री कृष्णार्पणमस्तू  ||

     
    येथे - जयवंत जाधव 

ऑफबीट - खरोसा लेणी, निलंगा, जि. लातूर Offbeat - Ancient Kharosa caves, Dist. Latur, Maharashtra.

                        महाराष्ट्रात वैशिष्ट्यपूर्ण अशी बरीच लेणी आहेत. काहींची प्रसिद्धी तर जगभर पोहोचली आहे. त्यांची कोरीव कलाकुसर आजही थक...