Friday, 10 April 2026

'किल्ले विसापूर', ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Pune, Maharashtra.

                           उन्हाळ्यात शुष्क झालेल्या धरतीला पावसाने तजेला दिल्यानंतर सह्याद्रीतल्या दऱ्या डोंगरांचे रूप विलोभनीय असेच दिसते. बोरघाटाचे राखणदार किल्ले 'राजमाची', पूर्वेची 'लोहगड विसापूर' जोडी तसेच त्याच्या दक्षिणेचा सह्याद्री धारेवर सवाष्णी घाटवाटेवर लक्ष ठेवून असलेला 'कोरीगड' हे पावसाळ्यात मनमुराद आनंद लुटण्याची मुंबई पुण्याकडील भटक्यांची आवडती ठिकाणं. धुव्वाधार पावसात चिंब दाट धुक्यातून इथल्या हिरव्या पायवाटा चालण्याची सुप्त इच्छा या प्रत्येकाची असते. पावसाळी भटकंतीची ही ठिकाणं भटके मुद्दाम राखून ठेवताना दिसतात. असं असलं तरी आपल्या पूर्वजांच्या या धारातीर्थांना दुर्गभटके इतर वेळीही इथे भेट देताना दिसतात. त्यातील 'लोहगड विसापूर' हे जोड किल्ले प्रामुख्याने अग्रक्रमाने येतात.

                           जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर पुण्याकडं जाताना बोरघाट चढून लोणावळ्यानंतर ८ किमी छेद रस्त्यावर (Junction) डावं वळल्यास कार्ला आणि एकविरा देवीला पोहचतो. तर तिथून उजवं वळल्यास रस्ता किल्ले लोहगड विसापूरला घेऊन जातो. या रस्त्यावर महामार्गापासून दोन किमीवर मुंबई-पुणे लोहमार्गावरील 'मळवली' स्टेशन दिसतं. त्यापुढे दोन किमीवर प्रसिध्द 'भाजे' लेणी आहेत. त्यापुढे खिंडीचा घाट आणि पुढे 'गायमुख' खिंड. खिंडीतून डावीकडे काटकोनात वळणारा रस्ता किल्ले विसापूरला घेऊन जातो. आणि पुढे सरळ गेल्यास लोहगड किल्ल्याच्या पायथ्याला लोहगडवाडीत येतो. लोहगड आणि विसापूर हे समोरासमोरील किल्ले या खिंडीने विभागले आहेत.   

 लोहगडावरून - गायमुख खिंडीपलीकडे 'किल्ले विसापूर' (जानेवारी २०२१), किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra. 
                         याआधी जानेवारी २०२१ ला किल्ले लोहगडच्या भेटीदरम्यान हा घाट आम्ही वाहनाने सहकुटुंब चढलो होतो. या घाटातून एका वेळी फक्त एकच वाहन जाऊ शकेल असा अतिशय अरुंद, अतितीव्र वळणांचा आणि धोकादायक चढाचा घाट म्हणून ओळखला जातो. त्यावेळी घाटातल्या फुट फुटभर खड्ड्यांनी परीक्षा घेतली होती. आता मित्रांसोबत फेब्रुवारी २०२६ ला 'किल्ले विसापूर'च्या भेटीदरम्यान हा घाटरस्ता बऱ्यापैकी सुस्थितीत आहे.
                 पुढे खिंडीत डावा वळसा घेतल्यानंतर किल्ले विसापूरच्या पश्चिम कड्याच्या पायथ्यापर्यंत पक्का रस्ता आहे. पायथ्याखालून पाहिल्यास पुढे तोंड काढलेल्या कासवासारखा किल्ल्याचा हा अजश्र कडा अंगावर येतो.
किल्ले विसापूरचा 'पश्चिम कडा'. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra.  
                         'उंबर खिंडी'चा रणसंग्राम इ. स. १६६१ ला झाला. मूठभर मराठा सैन्यानं हजारो मुघल सैन्याची दाणादाण उडवली. मुघल सरदार करतलब खान, स्त्री सरदार रायबाघन यांना त्यावेळी शिवछत्रपतींनी जीवदान देऊन सोडून दिलं. स्वराज्याच्या मुळावरचं हे संकट आणि भरभक्कम तयारीची ती मुघल फौज सह्याद्रीखाली 'उंबरखिंडी'त गाठण्यासाठी राजांनी गनिमी काव्यानं या 'गायमुख' खिंडीतून वळवली होती. या खिंडीत आल्यास उजवीकडं लोहगड आणि डावीकडं विसापूर किल्ला दिसतो.

                          विसापूर किल्ल्याचा विस्तार पूर्व पश्चिम आहे. किल्ल्यावर जाणाऱ्या दोन वाटा आहेत. पहिली 'मळवली' रेल्वे स्टेशनपासून भाजे लेण्याजवळून जंगलातील पायवाट किल्ल्याच्या उत्तरेकडून किल्ल्यावर येते. या वाटेला 'पाटण' गावातून येणारी वाट किल्ल्याच्या पायथ्याजवळ मिळते. या वाटेने किल्ल्यावर पोहोचण्यास सरासरी दोन तास पुरतात. पुण्याकडील भटक्यांना पाटण कडून येणारी वाट सोईस्कर आहे. तर दुसरी पायवाट 'भाजे' लेणी ओलांडून गायमुख खिंडीतून पुढे लोहगडवाडीकडे न जाता, विसापूर किल्ल्याला डावा वळसा घेत किल्ल्याच्या दक्षिणेकडून किल्ल्यावर येते. या वाटेने गडमाथा तासाभरात गाठता येतो. 

                          पश्चिम कड्याजवळ मोकळ्या जागेत पार्किंगची सोय आहे. आजूबाजूला 'वीकएंड'ला येणाऱ्या आणि पावसाळी पर्यटकांसाठी सुसज्ज कॅम्पिंग आणि निवासी हॉटेल्स'चीही सोय आहे. पश्चिम कडा डावीकडे ठेवून पुढे जाणारा कच्चा रस्ता कातळ भिंतीखालून दक्षिणेकडे वीस मिनिटात पायथ्याचे 'हॉटेल विसावा' जवळ येतो. पावसात चिखल दगडांमुळे इथपर्यंत वाहने येऊ शकत नाहीत.

किल्ले विसापूरची 'दक्षिण तटबंदी'. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra.  


किल्ले विसापूरच्या 'पायथ्याची कमान'. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra.  

                          या उपाहारगृहाच्या समोर डावीकडे जंगलातून जाणारी पायवाट किल्ल्यावर जाते. सुरुवातीला वाटेवर स्वागत करणारी कमान आहे. पुढे पायथ्याच्या गर्द जंगलातील दगड धोंडे आणि झाडांच्या मुळ्यातून वाट चढत जाते. या पायवाटेवर निसर्गाची सुंदरता आणि शांतता अनुभवास येते.

                          किल्ल्याच्या पायथ्याला उभ्या कातळात एक पाण्याचा हौद खोदलेला दिसतो. हौदाचे तोंड लहान दिसत असले तरी तो कातळात खोल आणि मोठा पसरला आहे. हौदाच्या समोर कातळावर शिलालेख  कोरलेला दिसतो.

किल्ले विसापूरच्या पायथ्याचे जंगल. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra.    
किल्ले विसापूरच्या पायथ्याचा कातळ हौद. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra.      
 
किल्ले विसापूरच्या पायथ्याचा कातळ हौद. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra.      

                          हौद पाहून पुढे आल्यास विखुरलेल्या मोठमोठ्या दगडातून वर जाणारा रस्ता दिसतो. गडमाथ्यापर्यंत घेऊन जाणारे हे दगड म्हणजे किल्ल्याचा दक्षिणेकडील पूर्वीचा पायरी मार्ग. इंग्रजांनी तो उध्वस्त केला. पावसाळ्यात किल्ल्यावरील पाणी या दगडांतून खाली येताना त्याला खळाळणाऱ्या ओढ्याचे स्वरूप प्राप्त होते. पावसाळी पर्यटक इथे आनंद लुटताना दिसतात. पण गडचढाई करताना दगडांचा हा टप्पा पुरता दम काढतो.  

किल्ल्याचा 'दक्षिणेकडील मार्ग'. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra.

                         दगडांचा टप्पा चढून वर आल्यास समोर उध्वस्त दरवाजाचे आणि देवडीचे अवशेष दिसतात. त्या पलीकडे कातळ उतारावर खोदलेल्या गुहा दिसतात. त्यापैकी एका गुहेत स्वच्छ पाणी दिसते. यांचे शिल्लक राहिलेले अवशेष कोरीव कलात्मक आहेत. उध्वस्त अवशेषांवरून किल्ल्याच्या दक्षिणेकडील हा दरवाजा भव्य असावा. 

विसापूर किल्ल्याचा उध्वस्त 'दक्षिण दरवाजा'. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra.
  
दक्षिण दरवाजामागील 'गुहा'. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra.
विसापूर किल्ल्याचा उध्वस्त 'दक्षिण दरवाजा'. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra.
                           इथून डावीकडे थोडीफार किल्ल्याची तटबंदी आणि तटबंदीवरून फेरफटका मारण्यासाठी 'फांजी'ची व्यवस्था दिसते. उतारावरून येणारे पावसाचे पाणी या तटबंदीजवळ साचून ती ढासळू नये म्हणून पाण्याचा निचरा होण्यासाठी तटबंदीत छिद्रांची व्यवस्था दिसते. पुढे तटबंदी नष्ट झालेली दिसते. त्यापुढे गडमाथ्यावरचे पश्चिमेकडील लांबलचक त्रिकोणी पठार दिसते.   
किल्ल्याची उध्वस्त 'दक्षिण तटबंदी'. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra.

                           पुढे किल्ल्याच्या पश्चिम कड्यावरून अगदी समोर लोहगड नजरेच्या टप्प्यात येतो. बाजूला पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 'पवना' जलाशयाचा विस्तार, जलाशयाच्या पलीकडे 'किल्ले तुंग' आणि त्याच्या डाव्या बाजूस 'किल्ले तिकोना' असा विस्तीर्ण मावळ परिसर दिसतो. पूर्वी किल्ल्याच्या या पश्चिमेला तटबंदी असावी. समोर खिंडीपलीकडे 'किल्ले लोहगड' दिसतो. दोन्ही किल्ले समोरासमोर आणि समान उंचीचे म्हणजे समुद्रसपाटीपासून ३३५० फूट उंच आहेत. विसापूरच्या पश्चिम धारेवरून किल्ले लोहगडावर तोफमारा करणे सहज शक्य दिसते. तर लोहगडावरूनही विसापूरची पश्चिम बाजू माऱ्याच्या टप्प्यात येते. या तोफमाऱ्यामुळे कदाचित विसापूर किल्ल्याची ही पश्चिम तटबंदी उध्वस्त झाली असावी. 

किल्ल्याची उध्वस्त 'दक्षिण तटबंदी आणि मागे किल्ले लोहगड'. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra.
  

पश्चिम तटबंदीवरुन 'किल्ले तुंग', 'किल्ले तिकोना' आणि 'पवना जलाशय'. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra.

                            लोहगड समोर असला तरी गोमुखी रचनेचे लष्करी दृष्ट्या त्याचे मजबूत दरवाजे पायदळाने  हल्ला करून जिंकणे सहज दिसत नाही. तसेच किल्ले विसापूरला 'पाटण' आणि 'लोहगडवाडी' या दोन्हीकडून पायरीच्या मार्गामुळे किल्ले विसापूर जिंकण्यास भौगोलिक दृष्ट्या लोहगडा इतका अवघड दिसत नाही. त्यामुळेच कदाचित १८१८ मध्ये 'जनरल प्रॉथर' लोहगड घेण्यासाठी आला. पण त्याने प्रथम विसापूर जिंकला आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी मराठे स्वतःहून लोहगड सोडून निघून गेले.

विसापूर किल्ल्याच्या पश्चिम कड्यावरून 'गायमुख खिंडीपलीकडे किल्ले लोहगड आणि त्याचा विंचूकडा'. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra.
                            पश्चिम टोकापासून उजवे वळल्यास पुढे किल्ल्याची लांबलचक उत्तर तटबंदी दिसते. तटबंदीत मजबूत अर्धगोल बुरुज आहेत. बुरुज जमिनीला समांतर आहेत. या बुरुजांच्या कमानीतून तोफमारा करण्यासाठी प्रशस्त रेखीव दिवळ्या तसेच बंदूक, बाणमारा करण्यासाठी वेगवेगळे कोन साधून तटबंदीत 'जंग्या' ठेवल्या आहेत. तटबंदीच्या मागून सैनिकांना सुरक्षित गस्त घालण्यासाठी 'फांजी' आणि फांजीवर चढण्यासाठी ठिकठिकाणी पायऱ्यांची व्यवस्था दिसते.  
विसापूर किल्ल्याची 'उत्तर तटबंदी' आणि पायथ्याचे जंगल. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra.
  
उत्तर तटबंदीतील 'बुरुज' आणि पायथ्याचे जंगल. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra.
 
उत्तर तटबंदीतील 'फांजी आणि तटबंदीतील पहारेकऱ्यांची खोली'. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra.
                              किल्ल्याच्या या उत्तर तटबंदीत सुंदर कलात्मक खोली तयार केलेली दिसते. गस्त घालणाऱ्या पहारेकऱ्यांना ऊन पावसापासून बचाव करण्यासाठी तिचा वापर केला जात असावा. दिसायला तिची चौकट ठेंगणी असली तरी आत मात्र पुरुषभर उंची आहे. सध्या कडक उन्हातही खोलीत बऱ्यापैकी गारवा जाणवतो. बाजूला तटबंदीत सौच्चकुपाचीही व्यवस्था दिसते. अशीच पहारेकर्यांची दुसरी खोली किल्ल्याच्या दक्षिणेकडे आग्नेय तटबंदीत दिसते.   
तटबंदीतील पहारेकऱ्यांची खोली'. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra.
                              उजवीकडे पठारावर किल्ला बांधण्याच्या सुमारास वापरलेला चुन्याचा घाणा दिसतो. घाण्याच्या चरात भले मोठे उभे दगडी चाक लक्ष वेधून घेते. घाण्याच्या मागे टेकडीच्या दिशेने जमिनीवर खोदलेले दहा-बारा पाण्याचे कातळ हौद दिसतात. काही हौदात स्वच्छ पाणी दिसते. रखरखीत उन्हात इथल्या गार पाण्यात पाय बुडवून बसण्याचे स्वर्गसुख भटके आवर्जून घेतात. त्यापुढे किल्ल्याच्या पठारावरील दोन उंच टेकड्यांपैकी पहिली टेकडी दिसते.   
किल्ल्याच्या ईशान्य पठारावरील 'चुन्याचा घाणा'. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra.
किल्ल्याच्या ईशान्येकडील 'कातळ टाक्या'. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra.
 
किल्ल्याच्या ईशान्येकडील 'कातळ टाक्या'. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra.
                             या हौदांच्या पुढे पाच मिनिटांच्या अंतरावर उत्तरेकडे आणखी आठ नऊ कातळ हौदांचा समूह ओळीत दिसतो. काही हौदातील पाणी सुकले आहे. त्यापैकी एका हौदाच्या भिंतीवरील कमानीत हनुमानाचे शिल्प कोरलेले दिसते. मारुतीच्या डाव्या हातात फुल आणि उजवा हात चापट मारण्यासाठी उचलला आहे. मूर्तीच्या गळ्यात उपरणे, कमरेला कटीवस्त्र, गळ्यात कंठा, डोक्यावर शेंडी असे सुंदर शिल्प आहे. पावसात हौदातील पाण्यात त्याचे सुंदर प्रतिबिंब पाहण्यासारखे असते.  
किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra.
                             टेकडीच्या डावीकडे तटबंदी उध्वस्त झाल्यामुळे खाली उत्तरेकडे उभा कडा दिसतो. पुढे तटबंदी धरून १५ मिनिटे चालल्यानंतर उजवीकडील टेकडीच्या पायथ्याला चौथर्‍यावर वाड्याचे अवशेष दिसतात. त्याच्या सभोवती दगडी कुंपण आहे. त्याचे छप्पर उध्वस्त दिसते. या वाड्याच्या बाजूला टेकडीच्या उतारावर आणखी एका वाड्याचे अवशेष दिसतात. वाड्याच्या शिल्लक अवशेषांवरून हे बांधकाम पूर्वी कलात्मक असावे. हे अवशेष किल्ल्यावरील धान्य कोठार असावे असेही सांगितले जाते.  
उत्तरेकडील 'धान्य कोठार' अवशेष. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra.
 
उत्तरेकडील 'दुसरे धान्य कोठार' अवशेष. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra.
 
उत्तरेकडील 'दुसरे धान्य कोठार' अवशेष. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra.
                            कोठारांच्या समोर उत्तरेकडे गेल्यास कातळात खोदलेले पाच-सहा प्रशस्त मोठे पाण्याचे हौद दिसतात. त्याही पुढे टोकाला किल्ल्याचा 'चिलखती बुरुज' दिसतो. किल्ल्याचा हा उत्तर बुरुज आणि त्याची बाह्य तटबंदी यामध्ये फेरफटका मारण्यासाठी चिंचोळा मार्ग आहे. तटबंदीत उतरण्यासाठी डावीकडील धोकादायक दरीजवळून सांभाळून उतरल्यास पुढे घडीव पायऱ्या आणि सुंदर ठेंगणी कातळ चौकट दिसते. तटबंदीतून पलीकडे बाहेर येतानाही पायऱ्या आणि कातळ चौकट आहे. वर बुरुजावर उत्तरेकडे तोंड करून एक तोफ तसेच दुसरी तुटलेली तोफ ठेवलेली दिसते. बाजूला भगवा डौलाने फडकताना दिसतो. हा चिलखती बुरुज किल्ल्याच्या वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना म्हणून अभ्यासता येईल. लोहगडाच्या विंचूकड्याचा चिलखती बुरुज आणि हा दोघात बरेच रचनात्मक साम्य दिसते.  
उत्तरेच्या चिलखती बुरुजाकडे जाताना दिसणाऱ्या कातळटाक्या. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra.
  
उत्तरेचा 'चिलखती बुरुज'. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra.

चिलखती बुरुजाच्या 'दुहेरी तटबंदीतील मार्ग'. किल्ले विसापूर.



                            या बुरुजाची तटबंदी आणि कातळ हौद धरून मागे आल्यास, डावीकडे पायऱ्यांची चिंचोळी पायवाट गड उतार होताना दिसते. बाजूला पुरातत्व खात्याचा फलक दिसतो. हा 'भाजे' लेणी आणि 'पाटण' गावातून किल्ल्याच्या उत्तरेकडून येणारा मार्ग आहे. पायवाट उतरण्यापूर्वी उजवीकडे उतारावर एक ओतीव तोफ दिसते. या तोफेच्या बाजूलाच दुसरी लाकडी गाड्यावर ठेवलेली सुंदर लहान तोफ दिसते. दोन्ही तोफांची तोंडे उत्तर दिशा म्हणजे पाटण गावातून येणाऱ्या मार्गावर वळवली आहेत. 



   

चिलखती बुरुज'. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra.
                            हि उत्तरेची वाट उतरून आल्यास डावीकडील चिलखती बुरुजाच्या कातळ भिंतीला धरून उतरणाऱ्या प्रशस्त खोदीव पायऱ्या अचंबित करतात. त्यातील काही पायऱ्या उध्वस्त असून त्यांचे अस्ताव्यस्त दगड बाजूला पडले आहेत. अंदाजे पन्नास पायऱ्या उतरून खाली आल्यास समोर कातळ भिंतीवर भव्य हनुमान शिल्प लक्ष वेधून घेते. मारुतीच्या गळ्यात कंठा, कलाकुसर केलेले उपरणे, कटीवस्त्र, डोक्यावर शेंडी आणि पाठीवर भाला असे वेगळेपण दाखवणारे सुंदर शिल्प दिसते. 

                            शिल्पाच्या बाजूला त्याच कातळात खोदलेल्या दोन मोठ्या गुहा आहेत. दोन्ही गुहेंच्या मध्ये कातळ भिंत दिसते. त्यापैकी एका गुहेच्या चौकट पट्टीवर सुंदर गणेश मूर्ती, तर दुसऱ्यावर उठावदार पुष्प कोरले आहे. पावसाळा वगळता या गुहा वस्ती करण्यायोग्य वाटतात. त्यापुढे कातळात खोदलेले दोन पाण्याचे हौदही आहेत. त्यातील पाणी मात्र पिण्यायोग्य दिसत नाही. ही वाट पुढे डावीकडे वळून 'भाजे' लेणी तर उजवीकडे वळणारी 'पाटण' गावाकडे जाते.

किल्ल्याची 'उत्तरेकडील भाजे आणि पाटण गावाकडे जाणारी वाट'. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra.
  
किल्ल्याची 'उत्तरेकडील भाजे आणि पाटण गावाकडे जाणारी वाट'. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra.
 
उत्तरेकडील वाटेवरील 'श्री हनुमान शिल्प'. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra.

हनुमान शिल्पाशेजारील 'खोदीव गुहा'. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra.
                            पूर्वी इथल्या तोफां'जवळ किल्ल्याचा उत्तर दरवाजा असावा. इंग्रज राजवटीत दक्षिणेकडील पायऱ्या आणि दरवाजा सोबतच उत्तरेकडीलही या पायऱ्या आणि दरवाजा उध्वस्त केला असावा. या मार्गाला किल्ल्याचा 'उत्तर दरवाजा' म्हणून ओळखले जाते.  
उत्तर दरवाजाजवळील 'तोफा'. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra.
                             उत्तर दरवाजाकडून मागे किल्ल्याच्या दुसऱ्या टेकडीकडे आल्यास सभोवती घनदाट जंगल आणि वाढलेल्या वेली दिसतात. इथून एक पायवाट किल्ल्यावरील 'राजवाड्या'कडे येते. वाड्याची पडझड झाली असून शिल्लक राहिलेले चौथरे, उंचच्या उंच अर्धवट भिंती त्याचप्रमाणे वाड्यातील पायऱ्या दिसतात. त्यांच्याभोवती झाडावेलींचा विळखा पडलेला दिसतो. भिंतीलगत वर जाणाऱ्या उध्वस्त पायऱ्यांवरून वाडा दुमजली पैसपैस असावा. वाड्याच्या भिंतीत ठेवलेल्या लहान मोठ्या दिवळ्याही दिसतात. वाड्याला तळघरही असावे. तळघरात उतरणारा पायरी मार्ग बुजलेला दिसतो. इथल्या एकाकी शांत वातावरणात एक गुढता भरून राहिली आहे.  
'राजवाड्याचे अवशेष'. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra.
  
'राजवाड्याचे अवशेष'. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra.
 
'राजवाड्याचे अवशेष'. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra.
                            या वाड्यापासून ईशान्येला गेल्यास किल्ल्यावरील पुरातन महादेव मंदिर दिसते. मंदिर दगडी असून वर छत आहे. मंदिरासमोर दोन कातळ नंदी आहेत. नंदीच्या मागे भगवा ध्वज आणि त्यामागे मंदिराच्या प्रांगणात सुंदर कोरीव दीपस्तंभ आहे. गुडघाभर उंचीच्या दगडी चौथऱ्यावरील मंदिरात  प्राचीन शिवपिंडी दिसते. पिंडीवर वाहिलेली फुले, गंध आणि तेवणारी निरंजन, यावरून इथल्या दूर निर्जन मंदिरात नित्य पूजा होत असावी. त्या अपरिचित, अव्यक्त भक्ताला नमस्कार. 

                           मंदिरामागे पाण्याचे खोल तळे आहे. मंदिराइतकेच ते प्राचीन असावे. त्यात उतरण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था आहे. 

शिव शंभू 'श्री महादेव'. किल्ले विसापूर, मावळ, पुणे, महाराष्ट्र. 

                           मंदिरामागे चौथर्‍यावर दुपारच्या जेवणानंतर सावलीत विसावा घेणारे साध्या कपड्यातील काही शासकीय कर्मचारी दिसले. किल्ले विसापूर हा पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असून त्या तिघांची इथे सुरक्षा कर्मचारी म्हणून नेमणूक केली आहे. किल्ल्यावरील प्राचीन बांधकामाची कोणी हानी करू नये तसेच किल्ल्यावर अनुचित वर्तन करू नये म्हणून ते लक्ष ठेवून असतात. ऊन पाऊस आणि थंडीवाऱ्याची तमा न बाळगता ३५० एकरच्या अवाढव्य किल्ल्यावर फेरफटका मारतात. रोज दमछाक करणाऱ्या धारदार दगड धोंड्यातून गड चढउतार करतात. वय वर्षे पन्नाशी ओलांडलेले हे कर्मचारी आणि नोकरी निमित्त त्यांची इथली नेमणूक म्हणजे रोजची परीक्षाच वाटली. असो..

  

   

'श्री महादेव मंदिर'. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra.
  
मंदिरामागील 'तळे'. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra.
                            महादेव मंदिरापासून डावीकडे वळल्यास समोर किल्ल्याच्या उत्तर काठाजवळ सुकलेला तलाव दिसतो. त्याच्या बाजूलाच दोन मोठे खोदीव कातळ हौद दिसतात. हौदांच्या पलीकडे किल्ल्याच्या उत्तर काठावर ईशान्येकडे दुसरा चुन्याचा घाणा दिसतो. किल्ल्याच्या पूर्व भागाकडे जाताना डाव्या बाजूला अस्तित्व टिकवून असलेली तटबंदी आणि उद्ध्वस्त अवशेष दिसतात. ही तटबंदी किल्ल्याच्या अगदी पूर्व टोकापर्यंत जाते. रखरखत्या पठारावरून किल्ल्याच्या पूर्व टोकाला जाताना हनुमानाची भग्न मूर्ती दिसते. ती अगदी हेतुपूर्वक तोडलेली स्पष्ट  दिसते. मूर्तीच्या पुढेच उजव्या बाजूला टेकडीच्या पूर्व पायथ्याला आणखी आठ दहा खोदीव हौदांचा समूह दिसतो.  
किल्ल्याच्या उत्तरेकडील सुकलेला 'तलाव'. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra.
   
किल्ल्याच्या ईशान्येकडील 'चुन्याचा घाणा', बाजूला वस्तू अवशेष आणि मागे किल्ल्याचे पश्चिम पठार. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra.
                            पुढे किल्ल्याच्या पूर्वेला समोर दोन कोठारांचे अवशेषही दिसतात. त्यापुढे दूरवर किल्ल्याच्या अगदी टोकाचा 'गोल' बुरुज दिसतो. हा बुरुज पठाराच्या सपाटीपासून उंचावर असून बुरुजाभोवती फेरफटका मारण्यासाठी बाह्य तटबंदीतून वाट ठेवली आहे. बुरुजावर भगवा फडकताना दिसतो. तुटलेल्या आठ-दहा पायऱ्या चढून बुरुजावर आल्यास वर तोफ मांडणी आणि ती वेगवेगळ्या कोणातून फिरवण्यासाठी वर्तुळाकार चराची व्यवस्था दिसते. बुरुजावरून समोर 'भातराशी'चा प्रचंड डोंगर आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर नजरेच्या टप्प्यात येतो. टेकडीला पुन्हा डावा वळसा मारल्यास दक्षिणेकडील किल्ल्याची तटबंदी दिसते. ही तटबंदी धरून पुन्हा किल्ल्याच्या दक्षिण दरवाजाकडे येता येते. इथे गडफेरी पूर्ण होते.

                           किल्ले विसापूरचा पूर्व पश्चिम पसरलेला अवाढव्य गडमाथा पूर्ण करण्यास जवळ जवळ चार तास लागतात. त्यात उन्हाळ्याचे दिवस असल्यास आजून शारीरिक, मानसिक कस लागतोच. गडमाथ्यावरील दोन्ही टेकडींच्या मधून जाणाऱ्या अनेक पायवाटांपैकी एक पायवाट वीस मिनिटात दक्षिणेकडील दरवाजाकडे जाते. उन्हात फिरून कंटाळलेले दुर्गप्रेमी बऱ्याच वेळा हा मार्ग अवलंबताना दिसतात. तर काही दुर्गप्रेमी पुन्हा भेट देऊन गडमाथा टप्प्याटप्प्याने फिरतात.  

उजवीकडे 'कोठार', डावीकडे 'गोल बुरुज'. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra.
  
'गोल बुरुज'. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra.
 
'गोल बुरुज' आणि मागे 'भातराशीचा डोंगर'. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra.
                          

                         किल्ल्यावरील टेकडीच्या सभोवती जंगलातून अनेक पाऊलवाटा दिसतात. किल्ल्याच्या बांधणीसाठी लागणारे दगड किल्ल्यावरील कातळातूनच काढल्याने किल्ल्यावर पाण्यासाठी लहान मोठे मिळून जवळजवळ ८०-८२ कातळ हौद आहेत. त्यातील बऱ्याच हौदात उन्हाळभर पाणी टिकून राहते. गडमाथ्यावरच्या दोन्ही टेकडीवर गवत आणि झाडाझुडपाव्यतिरिक्त विशेष असे कोणतेही अवशेष दिसत नाहीत. चारा पाण्याची नैसर्गिक व्यवस्था असल्याने विसापूरच्या माथ्यावर बऱ्याच गाई बैल चरताना दिसतात. त्यांच्यामुळेच या फसव्या ढोरवाटा तयार झालेल्या दिसतात.

                        किल्ल्याचा एकूण आकार मराठी 'ळ' अक्षर किंवा संबळीच्या आकारासारखा दिसतो. त्यामुळे किल्ले विसापूर ताब्यात येताच शिवछत्रपतींनी त्याचे 'संबळगड' असे नामकरण केले. त्याचप्रमाणे तो 'फुलपाखरा'च्या आकाराचाही म्हणता येईल. किल्ल्याच्या दक्षिणोत्तर प्रवेश वाटा तर डावी उजवीकडे म्हणजे पूर्व-पश्चिमेकडे पंख पसरलेल्या फुलपाखराप्रमाणे किल्ल्याचा विस्तार दिसतो. 

जानेवारी २०२१ साली लोहगडावरून - 'किल्ले विसापूर'. किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Lonavala, Pune, Maharashtra.
                         बाजूच्या भाजे आणि बेडसे लेण्यांवरून प्राचीन 'बोरघाट' (लोणावळा) व्यापारी मार्ग आणि पवन मावळावर लक्ष ठेवण्यासाठी किल्ले विसापूर सातवाहन काळात बांधला. त्यापुढील चालुक्य, राष्ट्रकूट, यादव या सर्व राजवटी या किल्ल्यानं पहिल्या. १४८९ ला मलिक अहमदनं निजामशाहीची स्थापना करून बरेच किल्ले जिंकले. त्यावेळी लोहगडासोबत विसापूरही त्याने जिंकला. १६५७ मध्ये शिवछत्रपतींनी कल्याण, भिवंडी, रायरी जिंकून लोहगडासोबत किल्ले विसापूरही स्वराज्यात आणला. १६६५ ला पुरंदर तहात तो मुघलांना दिला तर १६७० ला जिंकून पुन्हा ताब्यात घेतला. पुढे पेशवाईत बाळाजी विश्वनाथ यांनी १७१३ ते १७१७ च्या कालावधीत किल्ल्याच्या तटबंदीची दुरुस्ती केली.  
किल्ले विसापूर, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Pune, Maharashtra.

                  १८१८ पर्यंत जवळजवळ शंभर वर्षापेक्षा जास्त काळ मात्र किल्ले विसापूर मराठ्यांच्याच ताब्यात राहिला. पुढे १८१८ मध्ये 'जनरल प्रॉथर' लोहगड घेण्यासाठी आला. त्याने प्रथम विसापूर जिंकला. किल्ले विसापूर पडल्यानंतर त्याच्या दुसऱ्याच दिवशी मराठे स्वतःहून लोहगड सोडून निघून गेले.

                      किल्ले विसापूरची मजबूत तटबंदी, तटबंदीतील बुरुज, पाण्याचे कातळ हौद, हनुमानाची सुंदर कातळ शिल्पे बघण्यासाठी दुर्गप्रेमींनी इथे एकदा तरी नक्की भेट द्यावी. पावसाळ्यात इथला भन्नाट वारा कानात शिरून येणाऱ्या धुंदीचा अनुभव घेण्यासाठी इथे पुन्हा येण्याचे नक्की करूनच आम्ही परतलो..

                                                               || श्री कृष्णार्पणमस्तू ||

येथे - जयवंत जाधव           

Thursday, 19 February 2026

ऑफबीट - 'किल्ले हडसर', ता. जुन्नर, जि. पुणे, महाराष्ट्र. Offbeat - 'Hadasar Fort', Junnar, Pune, Maharashtra.

                      सरासरी दोन हजार वर्षांपूर्वी सातवाहन काळात (इ.स. पूर्व २३० ते इ.स. २५०) कोकणपट्टीवर वसई पासून दक्षिणेकडे गोव्यापर्यंत अनेक बंदरे भरभराटीला आली. त्यापैकी उत्तर कोकणातील कल्याण, शुर्पारक (सोपारा, नालासोपारा) यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. त्याचप्रमाणे सह्याद्रीच्या डोंगराळ भागातून बाहेर पडल्यावर दूरवर पसरलेल्या सपाट भूप्रदेशावरील उदयास आलेली तेर (तगर नगर), पैठण, जुन्नर (जीर्णनगर) या मोठमोठ्या प्राचीन शहरांना पहिल्यांदा जोडणारे ते म्हणजे सह्याद्रीतील खिंडीचे मार्ग. त्या घाटखिंडींच्या संरक्षणासाठी दुर्ग बांधणी, शिल्प लेणी आणि घाट मार्गांची बांधणी या तिन्ही प्रक्रिया एकाच वेळी चालवल्या. घाट मार्गावर लक्ष ठेवून त्यांचे रक्षण करण्यासाठी त्यांनी सह्याद्रीच्या कडेकपारीत अनेक किल्ल्यांची निर्मिती केली. 

                 सातवाहनांची उपराजधानी जुन्नरकडून कल्याण बंदराकडे जाणाऱ्या 'नाणेघाट' व्यापारी मार्गासाठी त्यांनी नाणेघाट ते जुन्नर पर्यंत जीवधन, निमगिरी, चावंड, हडसर, शिवनेरी अशा गिरीदुर्गांची शृंखला बांधून सह्याद्रीत लढाऊ योध्येच निर्माण केले.

             त्यापैकी 'किल्ले हडसर'चा विचार करता निर्माण केलेल्या इतर किल्ल्यांच्या तुलनेत त्याचे स्थापत्यशास्त्र, सौंदर्य आणि कल्पकता उजवी ठरते. 

ऑफबीट - 'किल्ले हडसर' ता. जुन्नर, जि. पुणे, महाराष्ट्र. Offbeat - 'Hadasar Fort', Junnar, Pune, Maharashtra.

                       'किल्ले हडसर'ला भेट देण्यासाठी मुंबई, ठाण्याहून कल्याण माळशेज घाटातून गणेश खिंड ओलांडून, तर पुण्याहून यायचे झाल्यास चाकण मंचर जुन्नरहून पायथ्याच्या 'हडसर' गावापर्यंत पोहोचता येते. 

                     पायथ्याच्या हडसर गावातून किल्ल्यावर जाणाऱ्या दोन वाटा आहेत. त्यापैकी 'हडसर' गावातून 'खुंटीची' वाट आणि दुसरी पुढे सरासरी पाच किमी किल्ल्याच्या डोंगराला उजवा वळसा मारून, पश्चिमेकडील 'पेठे'च्या वाडीतून. त्यापैकी पूर्वेची खुंटीची वाट ८० अंशाच्या उभ्या कातळावर लोखंडी गज (खुंट्या) आणि खोबण्यांचा आधार घेत चढाई करण्यास कठीण तसेच धोकादायकही आहे. आजच्या भटकंतीत सोबत पत्नी असल्याने हडसर गावात 'खुंटी'च्या वाटेची चौकशी केली. आणि आगाऊ धाडस न करता किल्ल्याच्या पश्चिमेकडील 'पेठे'च्या वाडीतून चढाईची वाट निवडली.  

                  'पेठे'च्या वाडीतून समोर हडसर किल्ल्याची प्रचंड आडवी, रौद्र कातळाची भिंत दिसते. पर्वतासमान दिसणाऱ्या या गिरीदुर्गाची उंची समुद्रसपाटीपासून सरासरी ३२०० फूट आहे. यामुळेही कदाचित या किल्ल्यास 'पर्वतगड' हे दुसरे नाव पडले असावे. वाडीत विचारल्यास किल्ल्यावर जाणारी पाऊलवाट आहे असं सांगितलं जातं. वाडी सोडल्यास थोडं मोकळं खडकाळ पठार लागतं. पठाराच्या पलीकडे दोन-चार घरांची 'डुंबरे वस्ती' आहे. तिथून बाजूला डोंगरातून येणारा ओढा दिसतो. त्याच्या काठावर मोठ-मोठी उंबराची झाडे आहेत. ओढ्याच्या दुतर्फा भातशेती आहे. या ओढ्याच्या बाजूने पुढे शेतातून जाणाऱ्या पाऊलवाटेवर उजव्या बाजूस घडीव दगडांची एक पुरातन आयताकृती विहीर दिसते. या विहिरी जवळून जाणारी पाऊलवाट किल्ल्याच्या पायथ्याकडील जंगलात जाते. 

'पेठे'च्या वाडीतून दिसणारी 'हडसर किल्ल्या'ची आडवी कातळ भिंत. 'किल्ले हडसर' ता. जुन्नर, जि. पुणे, महाराष्ट्र. Offbeat - 'Hadasar Fort', Junnar, Pune, Maharashtra.

पाऊलवाटेवरील पुरातन 'विहीर'. 'किल्ले हडसर' ता. जुन्नर, जि. पुणे, महाराष्ट्र. Offbeat - 'Hadasar Fort', Junnar, Pune, Maharashtra.
                       जंगलाच्या सुरुवातीला वाटेवर एका आंब्याच्या झाडाखाली समाधी आहे. समाधीवर 'जबाजी भले, दि. ३०. १९९८' अशी नोंद दिसते. समाधीच्या घुमटीत शिवपिंडी असून त्यापुढे नंदीचे कातळ शिल्प ठेवले आहे. आपल्या प्रिय पूर्वजांची आठवण निरंतर जपण्यासाठी समाधी बांधतो. समाधीचे स्वरूप एक ओटा, चबुतरा किंवा मंदिर (घुमटी) स्वरूपात असते. समाधीवर घुमटी बांधल्यास आणि ती पूर्वज स्त्री असेल तर घुमटीत देवीस्वरूप मूर्ती ठेवतो. त्याचप्रमाणे पुरुष पूर्वजासाठी शिवपिंडी ठेवतो. बऱ्याच समाधीवर (ओट्यावर) घुमटी बांधली जात नाही. पण इथल्या समाधीवर घुमटीत शिवपिंडी आणि समोर नंदी असल्यामुळे दुर्गभटके हे मंदिर असल्याची माहिती देताना दिसतात. असो..
अंब्याच्या झाडाखालची 'समाधी'. 'किल्ले हडसर' ता. जुन्नर, जि. पुणे, महाराष्ट्र. Offbeat - 'Hadasar Fort', Junnar, Pune, Maharashtra.

                       पुढे किल्ल्याकडे जाणारी पाऊलवाट झुडपातून आणि जंगलातून जाते. भातशेतीत आणि डोंगर उतारावर वाडीतील गुरं चरतात. त्याने पायथ्याला बऱ्याच 'ढोरवाटा' (पाऊलवाटा) तयार झाल्या आहेत. या वाटांवर दिशादर्शक बाण किंवा खुणा करण्याची गरज आहे. पण तसे दिसत नाही. पुढे दोन चार ठिकाणी मिळणाऱ्या इतर पाऊलवाटा दिशाभूल करतात. चढाच्या दगडांतून लक्ष ठेवल्यास अवघड जागी पायरीसाठी रचलेल्या दगडांवर लोखंडी जाळ्या बसविल्या आहेत. ठिकठिकाणी जाळ्या दिसणारी ही पाऊलवाट सोडायची नाही.  

किल्ल्याकडे जाणारी पाऊलवाट. 'किल्ले हडसर' ता. जुन्नर, जि. पुणे, महाराष्ट्र. Offbeat - 'Hadasar Fort', Junnar, Pune, Maharashtra.


डेरेदार झाडाजवळून डोंगरावर जाणाऱ्या पायऱ्या. किल्ले हडसर.

                    पुढे एका डेरेदार झाडाजवळ किल्ल्याची माहिती देणारे दोन फलक दिसतात. आणि इथून डोंगरावर जाणाऱ्या पायऱ्या दिसतात. बाजूला भटक्यांना विश्रांती घेण्यासाठी शेड तर त्याच्या बाजूला एक उंच वॉच टॉवर दिसतो. पेठेच्या वाडीतून जाणारी पूर्वीची ही पाऊलवाट पुढे किल्ल्याच्या मुख्य दरवाजातून जाते म्हणून या वाटेला 'राजमार्ग' म्हटले जाते. पूर्वी या पायऱ्या सुस्थितीत असाव्यात. आता त्या ठीकठिकाणी उध्वस्त विखुरल्या आहेत. 

 



किल्ल्याची माहिती देणारे 'फलक'. 'किल्ले हडसर', महाराष्ट्र.

                    या पायरींच्या पुढे नागमोडी वळणे घेत तीव्र चढाने वाट दगड धोंड्यातून पुढे जाते. जसजसे किल्ल्याच्या कातळाकडे जाऊ तसतशी झुडूपं विरळ होत दमछाक करणारा चढ सुरू होतो. या दगडातून पाय मुरगाळून दुखापत होऊ नये म्हणून काळजी घ्यावी.  

                    आज आम्हाला पनवेलहून माळशेज घाट ओलांडून गणेश खिंडीतून सरासरी १६० किमीचे अंतर पार करून किल्ले हडसरच्या पायथ्याला पोहोचण्यास दुपारी बारा वाजून गेले. आमच्या भेटीचा आठवड्यातील मधलाच दिवस असल्याने सोबत किंवा पुढे कोणी भेटले तर ते नंतरच कळणार होते.

                    पेठेच्या वाडीतून किल्ल्याकडे जाताना किल्ल्याचा कातळ डावीकडे दिसत असला तरी, पुढे या कातळाच्या बाजूला उजवीकडे दुसरा डोंगर दिसतो. पायवाट किल्ल्याच्या कातळ पायाथ्याकडून फिरून उजव्या कातळ पायथ्याकडे येते. पुढे दोन्ही डोंगर एकत्र येतात. झाडांतून उजव्या खड्या चढावर दूरवर कोरीव पायऱ्या आणि त्याचे रेलिंग दिसतात. पुढे त्या खिंडीतून किल्ल्याकडे जाता येते.

दोन्ही डोंगरांमधील 'खिंड'. किल्ले हडसर, ता. जुन्नर, जि. पुणे, महाराष्ट्र. Offbeat - 'Hadasar Fort', Junnar, Pune, Maharashtra.
 

जवीकडील डोंगरावर 'पायऱ्या आणि रेलिंगकडे जाणारी पायवाट'. किल्ले हडसर, ता. जुन्नर, जि. पुणे, महाराष्ट्र. Hadasar Fort, Junnar, Pune, Maharashtra. 
                    पायरीचा हा पहिला टप्पा चढून आल्यास वाट दोन्ही खिंडीतील पुन्हा गर्द झुडपातून जाते. त्यापुढे या कातळाच्या पुढच्या कोरीव पायऱ्या सुरू होतात. या पायरीवर बाजूला कातळात लहानशी उघडी गुहा आहे. उन्हात आणि पावसापासून इथे अडोसा घेऊ शकतो. या ठिकाणी आम्ही घरी बांधून आणलेली शिदोरी सोडली. इथे आम्हाला गडउतार होताना पुण्याचे सहा सात दुर्गमावळे भेटले. 
रेलिंगकडे जाणारी पायवाट. मागे 'किल्ले हडसर', जि. पुणे, महाराष्ट्र. Hadasar Fort, Junnar, Pune, Maharashtra. 

पायथ्याच्या खिंडीतील झुडपातील वाट. किल्ले हडसर, ता. जुन्नर, जि. पुणे, महाराष्ट्र. Hadasar Fort, Junnar, Pune, Maharashtra.

पायऱ्यांचा दुसरा टप्पा'. किल्ले हडसर, ता. जुन्नर, जि. पुणे, महाराष्ट्र. Hadasar Fort, Junnar, Pune, Maharashtra. 
                  पायरीचा हा टप्पा संपताच खिंडीतून किल्ल्यावर जाणाऱ्या पायऱ्या आहेत. सुरुवातीला खिंडीत येईपर्यंत या पायऱ्यांचा अंदाज येत नाही. उंच चढाच्या सरासरी १५० ओबडधोबड पायऱ्या एका दमात चढताना अक्षरशः घाम काढतात. वर आल्यास समोर आडव्या तटबंदीने रस्ता अडवून तो डावीकडे किल्ल्याच्या कातळावर वळवला आहे. अडवलेल्या तटबंदीवरून पायरीवर मारा करण्यासाठी 'जंग्या' आणि 'दिवळ्या' ठेवल्या आहेत. तटबंदी जवळ 'मरहट्टे सह्याद्रीचे' आणि 'शिवाजी ट्रेल' या दुर्गसंवर्धन संस्थेच्या सौजन्याने किल्ल्याचा नकाशा फलक इथे लावला आहे. 
किल्ल्याच्या पायऱ्या. समोर आडवी तटबंदी. किल्ले हडसर, ता. जुन्नर, जि. पुणे, महाराष्ट्र. Hadasar Fort, Junnar, Pune, Maharashtra. 


किल्ल्याच्या पायऱ्यावरून - समोर 'किल्ले निमगिरी'. किल्ले हडसर, ता. जुन्नर, जि. पुणे, महाराष्ट्र. Hadasar Fort, Junnar, Pune, Maharashtra. 


पहिल्या दरवाजाकडे वळवलेली वाट'. किल्ले हडसर, ता. जुन्नर, जि. पुणे, महाराष्ट्र. Hadasar Fort, Junnar, Pune, Maharashtra. 

                      डावीकडे अखंड कातळात किल्ल्याचा पहिला कोरीव दरवाजा आहे. खाली पायरीवरून इथे एखादी गुहा असावी असे वाटते. पण दरवाजात आल्यास डाव्या बाजूला कातळात कोरीव अर्धस्तंभ आणि उजव्या बाजूला किल्ल्याचा पहिला मुख्य प्रवेश दरवाजा कोरून काढलेला दिसतो. दरवाजा तिहेरी कमानीत अगदी अप्रतिम कोरला असून समोर मोकळी जागा आहे. चौकटीच्या आतील बाजूस पहारेकऱ्यांसाठी 'देवड्या' दिसतात. त्यापैकी डाव्या बाजूची देवडी मोठी ऐसपैस कलात्मक कोरली आहे. 

कातळातील किल्ल्याचा 'पहिला प्रवेश दरवाजा'. किल्ले हडसर, ता. जुन्नर, जि. पुणे, महाराष्ट्र. Hadasar Fort, Junnar, Pune, Maharashtra. 


पहिल्या दरवाजातील 'देवडी' आणि वर जाणाऱ्या 'पायऱ्या'. किल्ले हडसर, ता. जुन्नर, जि. पुणे, महाराष्ट्र. Hadasar Fort, Junnar, Pune, Maharashtra.
                    या दरवाजातून सरासरी वीस पायऱ्या चढून वर आल्यास वाट दोन्ही कातळ डोंगरांच्या मधील आडव्या तटबंदीवर येते. तटबंदीच्या मध्यभागी ध्वजस्तंभ दिसतो. तटबंदीच्या पलीकडे हडसर गावातून दोन्ही डोंगरांच्या खिंडीतून एक तिसरी वाट किल्ल्यावर येते. तिला 'नळीची वाट' म्हणतात. पाऊलवाट मध्यम असली तरी किल्ल्याजवळ आडव्या तटबंदी जवळचा कातळ चढण्यासाठी जिकरीचे आहे. 

                      या तटबंदीवरून पलीकडे दक्षिणेला किल्ल्याचा जोडभाग असलेल्या डोंगराच्या टेकडीवर जाणारी पायवाट आहे. पायवाटेने या टेकडीवर गेल्यास सुरुवातीला दगडांच्या चौथर्‍यवर गणेश मूर्ती दिसते. ही नजीकच्या काळात मांडली असावी. पुढे टेकडीवर दोन कातळ टाक्या दिसतात. टेकडीवर सगळीकडे गवत असून पुढे पाऊलवाट दिसत नाही. त्यामुळे भटके क्वचितच या बाजूला येत असावेत. या टेकडीवरून किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाजावरील दोन बुरुज आणि आजूबाजूची थोडीफार शिल्लक राहिलेली तटबंदी दिसते. 

पहिल्या दरवाजातुन वर जाणाऱ्या 'वळणदार पायऱ्या'. किल्ले हडसर, ता. जुन्नर, जि. पुणे, महाराष्ट्र. Hadasar Fort, Junnar, Pune, Maharashtra. 


दोन डोंगरांच्या मधील आडव्या तटबंदीवरील 'ध्वजस्तंभ' आणि समोर 'टेकडीवर जाणारी वाट'. किल्ले हडसर. Hadasar Fort, Maharashtra.

आडव्या तटबंदीवरून किल्ल्यावरील दिसणारे दोन बुरुज आणि तटबंदी. किल्ले हडसर, ता. जुन्नर, जि. पुणे, महाराष्ट्र. Hadasar Fort, Junnar, Pune, Maharashtra.
                      पुन्हा मधल्या तटबंदी वरून मागे येऊन या दरवाजाच्या डावीकडून नागमोडी वळणे घेत वर जाणाऱ्या वीसएक पायऱ्या पहिल्या दरवाजावर कोरलेल्या दुसऱ्या दरवाजात येतात. दरवाजात येण्यापूर्वी पायऱ्यांसोबत उजवीकडे सुबक कोरलेली कड्याची धारदार भिंत आणि मागे विस्तीर्ण माणिकडोहाच्या पार्श्वभूमीवर त्यावरचा लक्षवेधक उंच कोनाडा दुर्गभटक्यांना आकर्षून घेतो. भटक्यांची ही आवडती जागा, तिथे रेंगाळून छायाचित्रात कैद करण्यास भाग पाडतो.  
दुर्ग भटक्यांची आवडती जागा - 'Jewel Of Hadsar Fort'. किल्ले हडसर, ता. जुन्नर, जि. पुणे, महाराष्ट्र. Hadasar Fort, Junnar, Pune, Maharashtra.
                      किल्ल्याचा दुसरा दरवाजाही तिहेरी कमानीत कोरला असून सुंदर भक्कम असा आहे. त्याच्याही आतील बाजूस पहारेकऱ्यांसाठी 'देवड्या' आहेत. इथल्या दोन्ही 'देवड्या' मात्र मोठ्या आणि कलात्मक कोरल्या आहेत. पुढे डावे वळण घेत पायऱ्या चिंचोळ्या कोरीव मार्गातून किल्ल्यावर जातात. २१ डिसेंबर २०२० साली 'सह्याद्री प्रतिष्ठान'च्या वतीने लोकवर्गणीतून इथल्या दोन्ही दरवाजांच्या चौकटींना सुंदर लाकडी दरवाजे बनवण्यात आले. 
किल्ल्याचा 'दुसरा दरवाजा'. किल्ले हडसर, ता. जुन्नर, जि. पुणे, महाराष्ट्र. Hadasar Fort, Junnar, Pune, Maharashtra.

 'दुसरा दरवाजा'. किल्ले हडसर, Hadasar Fort, Maharashtra.

                   इथल्या कोरीव पायऱ्यांची लांबी अंदाजे सहा फूट असावी. वळणदार कोरीव मार्गीकेतील या पायऱ्या चढता उतरताना जोरात पाय आपटल्यास पायरीतून तबल्यातील 'ता' (किंवा 'ना') चे ध्वनी उमटतात. त्यामुळे पायऱ्यांखाली पोकळी असल्याचा भास होतो. वास्तुशास्त्राचा हा दुर्मिळ नमुना 'किल्ले हडसर'वर अनुभवायला मिळतो.





 

दुसऱ्या दरवाजातील 'देवड्या'. किल्ले हडसर, ता. जुन्नर, जि. पुणे, महाराष्ट्र. Hadasar Fort, Junnar, Pune, Maharashtra. 

                     इथली सुंदर कातळ वळणे, कोरीव भिंती, ध्वनी निर्माण करणाऱ्या इथल्या गुढ पायऱ्या, किल्ल्याचे एकावर एक असे कल्पकतेने कोरून काढलेले बोगद्यातील भक्कम गोमुखी दरवाजे, हे सर्व सलग एकाच कातळात घडवले आहेत. त्यासाठी त्यावेळच्या कारागिरांनी कोणतीही उणीव मागे ठेवलेली दिसत नाही. सह्याद्रीच्या दऱ्या डोंगरात शोधल्यास अशा सुंदर किल्ल्याच्या स्थापत्यशास्त्रांची मोजकीच रत्ने असावीत.

                    पायऱ्यांवरून वर आल्यास पूर्वेला किल्ल्याचे विस्तीर्ण पठार दिसते. पठाराच्या मध्यभागी उंच टेकडी दिसते. तो किल्ल्याचा 'बालेकिल्ला' आहे. पठारावरील कातळ सोडल्यास बालेकिल्ला आणि आजूबाजूला 'निलगिरींचे' वृक्ष रोपण केले आहे. चढून आलेल्या पायऱ्यांकडे पठाराचा उतार आहे. उतारावरून वाहून आलेले पावसाचे पाणी पायरीवर येऊ नये म्हणून त्यांच्या वर कातळात कल्पकतेने 'चर' खोदून पाणी कड्यावरून खाली सोडण्याची व्यवस्था दिसते. 

गडमाथ्यावर येणाऱ्या पायऱ्या आणि पाण्यासाठी खोदलेला 'चर'. किल्ले हडसर, ता. जुन्नर, जि. पुणे, महाराष्ट्र. Hadasar Fort, Junnar, Pune, Maharashtra. 


कातळटाकी आणि राजमुद्रा. किल्ले हडसर, महाराष्ट्र. Hadasar Fort, Maharashtra.

                     पायऱ्या चढताच उजव्या बाजूला कातळात आयताकृती छोटं पाण्याचं टाकं खोदलं आहे. त्यातील पाणी पिण्यायोग्य दिसत नाही. त्यासमोर फायबरची 'राजमुद्रा' स्थानापन्न केली आहे. 'राजमुद्रे'मागेच भन्नाट वाऱ्यावर किल्ले हडसरचा 'भगवा' डौलाने फडकताना दिसतो. या टप्प्यावरून दक्षिणेला विस्तीर्ण 'माणिकडोह' जलाशय आणि वायव्येला 'किल्ले निमगिरी' आणि माळशेज घाटाची डोंगररांग तर नैऋत्येला जलाशयाच्या पलीकडे 'किल्ले चावंड' डोळ्यांचे पारणे फेडतात.

गडमाथ्यावर येणाऱ्या पायऱ्या, राजमुद्रा आणि पाण्यासाठी खोदलेला 'चर'. किल्ले हडसर, ता. जुन्नर, जि. पुणे, महाराष्ट्र. Hadasar Fort, Junnar, Pune, Maharashtra.

                     पुढे डाव्या बाजूला कातळ उतारावर किल्ल्यावरील तीन सुंदर तोफा मांडल्या आहेत. त्यांचे तोंड माणिकडोह तलाव आणि माळशेज घाटाच्या दिशेने पश्चिमेच्या दरीत वळवलेले दिसते. त्यातील दोन ओतीव तोफा असून मधली 'मगरमुखी' तोफ आहे. सुबक गाड्यावर मांडलेल्या या तोफांचा दरारा किल्ल्याच्या रुबाबात आणखीन भर घालताना दिसतात.  

किल्ल्यावरील 'तोफा'. किल्ले हडसर, ता. जुन्नर, जि. पुणे, महाराष्ट्र. Hadasar Fort, Junnar, Pune, Maharashtra.

                      या तोफांच्या मागे पठारावर एक मोठा पाण्याचा कातळ हौद खोदलेला दिसतो. त्याला 'कमानी टाकं' म्हणतात. चार वर्षांपूर्वी 'मरहट्टे सह्याद्रीचे' आणि 'शिवाजी ट्रेल' या दुर्गसंवर्धन संस्थेनी या टाकीतील गाळ काढून त्याची सफाई केली. दरम्यान टाकीतील गाळात 'मगरमुखी' तोफ सापडली, ती किल्ल्यावर मांडून ठेवलेल्या तीन तोफांपैकी एक आहे. तसेच वाहून आलेला गाळ टाकीत पुन्हा जाऊ नये म्हणून टाकीच्या सभोवती बांधकामही करून घेतले. सध्या टाकीत बऱ्यापैकी पाणी असून ते स्वच्छ दिसतं.   

'कमानी टाकं'. किल्ले हडसर, ता. जुन्नर, जि. पुणे, महाराष्ट्र. Hadasar Fort, Junnar, Pune, Maharashtra.

                      या टाकीच्या मागे किल्ल्यावरचा सर्वात मोठा गोल आकाराचा 'तलाव' दिसतो. तलावाच्या पश्चिम काठावर एका अज्ञात समाधीचे अवशेष दिसतात. तलावात थोडेफार पाणी शिल्लक आहे. बाकी तो गाळ आणि गवताने भरला आहे. तलावाच्या पूर्व बाजूला पाणी दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी तलावातच कातळ हौद खोदले आहेत. तलावाच्या पलीकडे पुरातन महादेव मंदिर दिसतं. या मंदिराच्या मागून किल्ल्याच्या उत्तरेला पायवाटेने जाताना हे कातळ हौद स्पष्ट दिसतात.   

गडमाथ्यावरील तळं, समोर बालेकिल्ल्याची टेकडी आणि उजवीकडे महादेव मंदिर. किल्ले हडसर, पुणे, महाराष्ट्र. Hadasar Fort, Pune, Maharashtra.
 
गडमाथ्यावरील तळ्यात खोदलेले 'कातळ हौद'. किल्ले हडसर, ता. जुन्नर, जि. पुणे, महाराष्ट्र. Hadasar Fort, Junnar, Pune, Maharashtra.

                        किल्ल्याच्या मध्यावर असलेल्या बालेकिल्ल्याच्या उंच टेकडीवर तटबंदी दिसत नाही. 

                    पुढे कमरे इतक्या पाषाणी चौथर्‍यावर पुरातन महादेव मंदिर असून मंदिरासमोर सुबक नंदी आहे. मंदिराला गर्भगृह आणि मंडप आहेत. दोन्हीवर सुबक दगडी कळस असून गर्भगृहाचा कळस तुलनेने मोठा उंच आहे. मंदिराच्या चौकटीवर मध्यभागी 'गणेश' तर उंबऱ्यावर 'कीर्तीमुख' कोरले आहे. आत मंडपात समोर दोन्ही बाजूला अष्ट पाकळ्यांच्या नक्षीदार दिवळ्या आहेत. त्यापैकी उजव्या दिवळीत पाषणात कोरलेली श्री गणेशाची मूर्ती आहे. हा सिंदूर चर्चित गणेश इतका सुंदर आणि सुबक आहे की, नजर जाताच त्याच्या चरणी मन लिन होऊन जाते. तर उजवीकडील दिवळीत मारुतीची मूर्ती दिसते. तोही सिंदूर चर्चित सुंदर असून विशेष म्हणजे त्याला 'मिश्या' आणि डोक्यावर 'टोप' कोरला आहे. मारुतीच्या मूर्ती समोर भिंतीतील दिवळीत श्री विष्णूवाहन गरुडाचीही सुंदर मूर्ती हात जोडून आणि उड्डाण घेण्याच्या तयारीत दिसते.  

महादेव मंदिर. किल्ले हडसर, ता. जुन्नर, जि. पुणे, महाराष्ट्र. Hadasar Fort, Junnar, Pune, Maharashtra.
 
महादेव मंदिरातील सुबक गणेश मूर्ती आणि गाभाऱ्यात शिवपिंडी. किल्ले हडसर, ता. जुन्नर, जि. पुणे, महाराष्ट्र. Hadasar Fort, Junnar, Pune, Maharashtra.
 
श्री हनुमान मूर्ती. महादेव मंदिर. किल्ले हडसर Hadasar Fort.

श्री गरुड मूर्ती. महादेव मंदिर. किल्ले हडसर Hadasar Fort.


श्री  महादेव. किल्ले हडसर,  Hadasar Fort.



                     मंदिराच्या गर्भगृहाची चौकट ठेंगणी असून त्याच्या चौकटीवरही गणेश आणि खाली उंबऱ्यावर कीर्तीमुख कोरले आहे. गाभाऱ्यात श्री महादेवाची सुंदर रेखीव शिवपिंडी दिसते. वाहिलेल्या ताज्या फुलांवरून या अपरिचित ठिकाणी इथल्या देवतांची नित्य पूजा होताना दिसते. महाशिवरात्रीत इथे उत्सव भरतो. या ठिकाणी शिर्डीहून गडभेटीस आलेले तिघे दुर्ग भटके आम्हाला भेटले. 

                        मंदिराच्या पुढे दक्षिणेकडे वाढलेल्या गवतात किल्ल्यावरील उध्वस्त वाड्यांचे अवशेष दिसतात. त्यापुढे पूर्वेला हडसर गावातून कडा चढून येणारी 'खुंटीची वाट' आहे. इथेच किल्ल्याच्या पूर्वेचा बुरुज आणि त्याच्या आजूबाजूची तटबंदी दिसते. जवळच गडमाथ्यावरील दुसरे लहान तळे आणि जमिनीच्या कातळावर खोदलेले पाण्याचे हौद दिसतात. त्यापुढे पठारावर शेंदूर लावलेली मारुतीची मूर्ती उघड्यावर दिसते. 

वाड्याचे अवशेष. किल्ले हडसर, महाराष्ट्र. Hadasar Fort, Maharashtra.

 

श्री हनुमान मूर्ती. महादेव मंदिर. किल्ले हडसर Hadasar Fort.

पाषाणाचे भांडे. किल्ले हडसर. Hadasar Fort, Maharashtra.

                       किल्ल्याच्या उत्तर पूर्वेला एक सुबक गुहा कोरली आहे. आत चौथर्‍यावर एका अनामिक देवीचे भग्न अवशेष दिसतात. बालेकिल्ल्याच्या टेकडीला वळसा मारून पुढे उत्तरेकडे गेल्यास पाऊलवाटेवर एक सुंदर सप्तकोनी पाषाणाचे भांडे दिसते.

  




देवीचे मंदिर. किल्ले हडसर, ता. जुन्नर, जि. पुणे, महाराष्ट्र. Hadasar Fort, Junnar, Pune, Maharashtra.

                      पुन्हा उत्तरेकडून पश्चिमेकडे वळसा मारून चढून आलेल्या  पायऱ्यांकडे येताना पाऊलवाटेवर जमिनीच्या सपाटीवरून सहजासहजी दिसणार नाही असा भूअंतर्गत खोल 'चर' आहे. जवळ गेल्यास त्यात कोणी अपघाती पडू नये म्हणून सभोवती दगड मांडलेले दिसतात. किल्ल्याच्या पश्चिमेकडील तीव्र उताराकडून तिथे आत जाता येते. वळणदार खोदलेल्या या चरातून आत आल्यास सुरुवातीची चौकट दिसते. चौकट ओलांडून समोर आणि डावी उजवीकडे अशा तीन आयताकृती गुहा खोदलेल्या दिसतात. 

'धान्य कोठार' आणि छताजवळ 'दगडी खुंट्या'. किल्ले हडसर, पुणे, महाराष्ट्र. Hadasar Fort.

                   तीनही गुहा प्रमाणबद्ध असून त्यांच्या आत आणखीन खोल्या खोदून त्यांचा जमिनीखाली विस्तार केलेला दिसतो. आत अंधार असल्यामुळे प्रत्येक खोलीच्या शेवटपर्यंत जाता आले नाही. हे किल्ल्याचे 'धान्य कोठार' आहे. यांना किल्ल्याची 'लेणी'ही म्हणतात. वरून उघड्या कोठारात पडणारे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी आत येण्याच्या वाटेवरच लहान चर खोदून, पाणी किल्ल्याच्या पश्चिम उतारावरून बाहेर सोडलेले दिसते. तसेच कोठारात वरून पावसाचे पाणी पडू नये यासाठी खबरदारी म्हणून कोठारावर पूर्वी छप्पर असावे. कोठाराच्या छताजवळ आधार देणाऱ्या दगडी 'खुंट्या' दिसतात. त्यातील काही खुंट्या अजूनही अस्तित्व टिकवून आहेत. किल्ल्याच्या पश्चिम उतारावर एका बाजूला जमिनीखाली खोदलेली ही विस्तीर्ण धान्य कोठारे जमिनीवरून सहसा दिसत नाहीत. ही अप्रतिम शिल्पकाला नक्कीच पाहण्यासारखी आहे.   

'धान्य कोठाराचा मार्ग'. किल्ले हडसर, ता. जुन्नर, जि. पुणे, महाराष्ट्र. Hadasar Fort, Junnar, Pune, Maharashtra.
'धान्य कोठाराचा मार्ग' आणि पाण्यासाठी 'चर'. किल्ले हडसर, पुणे, महाराष्ट्र. Hadasar Fort, Maharashtra.
  
'धान्य कोठार' आणि छताजवळ 'दगडी खुंट्या' . किल्ले हडसर, ता. जुन्नर, जि. पुणे, महाराष्ट्र. Hadasar Fort, Pune, Maharashtra.

'धान्य कोठार'. किल्ले हडसर, ता. जुन्नर, जि. पुणे, महाराष्ट्र. Hadasar Fort.


'धान्य कोठारातील खोल्या'. किल्ले हडसर, महाराष्ट्र. Hadasar Fort.


                     १४८३ साली निजामशाहीचा सरदार 'मलिक अहमद' यानं प्राचीन जुन्नर बाजारपेठ काबीज करून 'किल्ले हडसर' सोबत आजूबाजूचे किल्ले ताब्यात घेतले. 

                     १६३७ ला निजामशाहीत असताना मुघलांशी झालेल्या तहात शहाजीराजांनी पाच किल्ल्यांपैकी 'किल्ले हडसर' मोघलांना दिला होता.

                    स्वराज्य निर्मितीनंतर १६६५ च्या पुरंदर तहात मुघलांकडे गेलेले किल्ले परत मिळवण्यासाठी शिवछत्रपतींनी मोहीम हाती घेतली. १६७१-७२ मध्ये साल्हेरचा किल्ला जिंकल्यानंतर, तो परत मिळवण्यासाठी इख्लासखानच्या नेतृत्वाखाली मुघल सैन्याने साल्हेरला वेढा घातला. त्याला प्रत्युत्तर म्हणून साल्हेर जवळ मराठा सैन्याने मुघलांना खुल्या मैदानात समोरासमोर टक्कर दिली. युद्धातील निर्णयक विजयानंतर अजिंक्य ठरलेल्या मराठा सैन्याने त्यानंतर जुन्नर जवळील किल्ले निमगिरी, चावंड, जीवधन, हरिश्चंद्रगड, सोबतच 'किल्ले हडसर' जिंकून घेतला.

                     छत्रपतींच्या निधनानंतर पुन्हा तो मुघलांकडे गेला आणि १७४८ ला पेशवाईत पुन्हा मराठ्यांकडे आला. २५ एप्रिल १८१८ रोजी तो इंग्रजांच्या ताब्यात गेला. त्यानंतर इंग्रजांनी किल्ल्याच्या वाटा सुरुंग लावून उध्वस्त केल्या. 

'माणिकडोह धरण', पलीकडे 'किल्ले शिवनेरी'. किल्ले हडसर, ता. जुन्नर, जि. पुणे, महाराष्ट्र. Hadasar Fort, Maharashtra.
                   'किल्ले हडसर'च्या पायथ्याला पेठेच्या वाडीत 'पवार खानावळ' आहे. घरगुती आहे. पण  येणाऱ्या भटक्यांच्या जेवणाची तसेच गरज पडल्यास राहण्याचीही सोय होते.
                किल्ल्याचा एकूण आकार त्रिकोणी आहे. किल्ल्याच्या माथ्यावर भटकंतीसाठी दोन तास पुरतात. किल्ल्यावर असलेले प्रचंड मोठे भूअंतर्गत धान्य कोठार, पाण्याची तळी आणि खोदलेले हौद यावरून किल्ल्यावर त्यावेळी मोठा राबता असावा. महाराष्ट्राच्या विशाल पावन भूमीवर सातवाहनानंतर ज्या ज्या राजवटी इथे राज्य करून गेल्या त्यांच्या या साक्षीदाराला एकदा नक्कीच भेटले पाहिजे..

                                          || श्री कृष्णार्पणमस्तु ||


येथे - जयवंत जाधव

'किल्ले विसापूर', ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Pune, Maharashtra.

                           उन्हाळ्यात शुष्क झालेल्या धरतीला पावसाने तजेला दिल्यानंतर सह्याद्रीतल्या दऱ्या डोंगरांचे रूप विलोभनीय असेच दिसते....