Thursday 11 March 2021

किल्ले 'सोंडाईगड' (Offbeat - 'Sondai Fort')

                
             सुरक्षित, कमी वेळेतला, कोणत्याही हंगामात सहकुटुंब ट्रेक करायचा तर किल्ले 'सोंडाईगड' करावा. धोका कमी त्यामुळं थरार नाही. सकाळी लवकर सुरुवात केल्यास दुपारी जेवण जेवण्यास परत सोंडाईवाडीत येऊ शकतो. 
कातळात कोरलेल्या टाक्या,  पलीकडे आडवा माथेरान (Sondai Fort) 

         कर्जत कडून सुरुवात केल्यास माथेरान डोंगर, चंदेरी, विकटगड, प्रबळ, ईरशाळ यांच्याच पंगतीत बसणारा हा धाकटा बंधु 'सोंडाईगड'. सह्याद्रीच्या माथेरान डोंगररांगेतील हा १२०० फुट उंचीचा 'सोंडाई' तासाभरच्या चढाईत दमवतो. गडमाथ्यावरून दिसणारा परिसर सुखाऊन जातो. सह्याद्रीतले गडकिल्ले ही महाराष्ट्राला देणगी आहे आणि त्यात शिवछत्रपतींनी त्याला वेगळीच धार चढवली.. 

             'सोंडाई'साठी मुंबईहून जुन्या हायवेनं पुण्यास जाताना मध्ये 'चौक' ला डावं वळण घ्यावं. डावीकडं दिसणारं मोर्बे जलाशय ओलांडल्यावर चार किलोमीटरवर 'बोरगाव' तिठयावर पुन्हा डावं वळायचं. पुढे वेडीवाकडी वळणं घेत जलाशयाच्या काठानं घाट रस्ता सोंडाईवाडीत घेऊन जातो.

                'बोरगाव' तिठयापुढेच दीड किलोमीटरवर 'वावर्ले' तिठयावरूनही डावं वळून सोंडाईला जाऊ शकतो. पण वावर्ले गावातून गडावर जाण्यास जंगलातून अडीज तीन तासाची चाल आहे. सोंडाईवाडीतून गडमाथा तासाभरात गाठू शकतो. त्यामुळं बरेच ट्रेकर्स सोंडाईवाडीला प्राधान्य देताना दिसतात.

             मध्य रेल्वेचं कर्जत स्टेशनहूनही ९ किमीवरील 'बोरगांव' तिठयावर बसनं येऊ शकतो. स्वतःच वाहन असेल तर 'पनवेल-चौक' मार्गे सोंडाईवाडी सोईस्कर आहे. 

             सोंडाईवाडी हे गड पायथ्याचं छोटं गांव आहे. गावात टुमदार कौलारू घरं असून, प्रत्येक घरासमोर प्रशस्त अंगणं दिसतात. गावात काही आदिवाशी घरं सोडल्यास, अंगणात दिसणारी वाहनं आणि सुखसुविधांमुळ गांव सधन वाटतं. आजूबाजू आणि परिसरात पाऊस मुबलक पडत असल्यानं भातशेतीची वावरं दिसतात. याच भातशेतीच्या वावरात काही आदिवाशी गडभेटीस येणाऱ्यांना पार्किंग ची सोय करतात. तर काही गडावर जावून परत येण्यापूर्वी जेवणाची सोयही करून देतात.

दुसऱ्या पठारावरून 

             सोंडाईवाडीतून गडावर जाणारी पायवाट मळलेली आहे. सुरवातीची गावाबाहेरून जाणारी वाट ही ओढ्यातील दगडधोंडयाची असून पंधरा मिनिटात एका पठारावर पोहचते. या पठारावरून दूर उंचावर गडसुळक्याचं दर्शन होतं. सुळक्यावरचे दोन भगवे दिसतात. इथपर्यंत येताना सुरवातीला  लिंबूपाणी, काकडी, कलिंगड विकण्याच्या दोन तीन टपऱ्या दिसतात. पुढील पायवाट तुरळक जंगलातून चढत जाते. गड डावीकडं ठेवत उजव्या बाजुनं वळसा मारत तीव्र चढत जाते. इथपर्यंत येताना कातळचे दोन तीन टप्पे सांभाळून चढावे लागतात. पावसाळ्यात शेवाळ आणि पाण्यामुळं या टप्प्यावर विशेष काळजी घ्यावी. पुढची पाऊलवाट मात्र दमछाक करते. 

मोर्बे जलाशय आणि उजवीकडं ईरशाळ 

Rock Pach 

             





             


                      या उतारावरून मागे विस्तृत मोर्बे जलाशय, वावर्ले धरण, ईरशाळ, प्रबळगड आणि समोर माथेरानचा अजश्र डोंगर दिसतो. 

           गडचढाई पश्चिमेकडून असल्यानं सकाळी लवकर सुरुवात केल्यास उन्हाचा त्रास कमी जाणवतो. उन्हाळ्यात सकाळी आकरा नंतर मात्र कस लागतो. तीव्र चढ घेत सरासरी एक तासात तिसऱ्या सपाटीवर येतो. इथून गडसुळका स्पष्ट दिसून दूरवर सुळक्यावर जाण्यासाठी लावलेल्या दोन शिड्याही दिसतात. 

समोर माथेरान डोंगर 


सोंडाई सुळका (Sondai Fort)



             सुळक्याच्या पायथ्यालाच डावीकडं कातळच्या उतारावर कोरलेल्या पाण्याच्या दोन मोठ्या टाक्या आहेत. त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. या टाक्या बघून लोखंडी शिडी चढून वर उजवीकडं वळसा मारून दुसरी शिडी लागते. दुसरी शिडी चढून गेल्यास समोर कातळात कोरलेल्या आणखी दोन पाण्याच्या टाक्या आहेत. त्यातील पहिली टाकी मोठी प्रशस्त असून आत टाकीत कातळाच्या छताला आधार देणारे दोन दगडी खांब आहेत. यातील पाणी पिण्यायोग्य आहे. आम्ही वर पोहचलो त्या वेळी आदल्या रात्री वर कॅम्प करून राहिलेला एक ग्रुप त्यातील पाणी वापरताना दिसत होते. या टाकीला लागूनच दुसरी पाण्याची टाकी दिसते. दुसरी टाकी लहान असून कातळच्या धोकादायक उतारावर असल्यानं तिथपर्यंत जाता आलं नाही. पुढे डावीकडं असलेली छोटी तिसरी शिडी ओलांडली की आपण गडाच्या सर्वोच्च माथ्यावर पोहचतो.

खांबटाकी (Sondai Fort)
समोर मोठी आणि पलीकडं दुसरी टाकी 

              गडमाथा अगदी लहान आहे. माथ्यावर झाडाखाली सोंडाई देवीची मूर्ती असून बाजूलाच शेंदूर लावून ओळीनं ठेवलेल्या इतर देवतांच्या पाच मुर्त्या दिसतात. सगळ्या मुर्त्या उघड्यावर असून झाड हेच त्यांचं आधार दिसतं. आश्विन कृष्ण चथुर्दशी म्हणजेच दिवाळी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी गडावर देवीचा उत्सव भरतो. 

श्री सोंडाई देवी (Sondai Devi) 
 
पहिल्या शिडीवरून लोणावळा डोंगररांग 



               





                          आधी या सुळक्यावर चढाई करण्यासाठी कातळात कोरलेल्या पायऱ्या आणि खोबणींचा वापर केला जायचा. त्यावेळचा थरार औरच असावा. सध्या तिथल्या शिडींमुळं थरार संपला आहे.                

                सोंडाई गडमाथ्यावरून बाजूचा मुरुंब डोंगर दिसतो. या डोंगरावर गौळदेवाची एक प्रचंड मोठी शिळा अधांतरी आणि अगदी चमत्कारीकरित्या स्थिरावलेली दिसते. आधी कधीतरी स्थानिकांनी ती शिळा खाली ढकलण्याचा प्रयत्न केला होता. ज्यावेळी ती शिळा हलवण्यासाठी जमिनीत पहार मारली, त्यावेळी जमिनीतून रक्ताचे ओघळ बाहेर आले. हा दैवी चमत्कार समजून त्यांनी तो नाद सोडून दिला. 

                  या गौळदेवाच्या शिळेकडं जाण्यासाठी, सोंडाईचा सुळका उतरून पुन्हा पहिल्या शिडीपर्यंत खाली यावं लागतं. या शिडीला उजवा वळसा मारून वाट सोंडाईच्या मुख्य कातळालगत दरीकाठानं जाते. वाट काट्याकुट्यांची, दगडांतून अडचणीची आहे. पंधरा मिनिटं चालल्यावर वाट सोंडाई आणि मुरुंब डोंगराच्या चिंचोळ्या घळीतून वर चढते. घळ पार करून वर आल्यास पलीकडील दरी दिसते. पुढे वाट बंद दिसते. पण उजव्या बाजूचा अंदाजे दहा फूट उभा कातळ चढल्यास वाट वर मुरुंब डोंगराच्या माथ्यावर जाताना दिसते. हा कातळ, त्यावर तीव्र उभ्या चढणीची डोंगराच्या माथ्यावर जाणारी वाट आणि खाली खोल दरी हे सगळं खूप धोकादायक वाटलं. त्यामुळं पुढचा प्रयत्न आम्ही सोडून दिला. हा कातळ चढायचा असल्यास जवळ वीस फूट लांबीचा दोर ठेवावा.

मुरुंब - सोंडाई मधील घळ 


 



मुरुंब डोंगरावरील गौळदेव शिळा 

मुरुंब डोंगर 

            



                                           

                 या अपरिचित 'सोंडाई'चा इतिहासात फारसा उल्लेख नाही, पण मे १६६६ मध्ये शिवछत्रपतींनी कल्याण,रायरी,भिवंडी परिसर ताब्यात घेतल्यावर तो स्वराज्यात सामील झाला. गडावर कातळात कोरलेल्या पाण्याच्या टाकींमुळे हा गड टेहळणीसाठी उपयोगात आणला असावा. 

डावीकडं वावर्ले धरण आणि उजवीकडं मोर्बे जलाशय 


समोर लोणावळा डोंगररांग (Sondai Fort) 
   


सोंडाई गडमाथा (Sondai Fort)

             गडमाथ्यावरून मागे पश्चिमेला विस्तृत मोर्बे जलाशय, बाजूलाच वावर्ले धरण, मोर्बे जलाशयाच्या बाजूला बेलाग ईरशाळ आणि प्रबळगड दिसतात. समोर माथेरानचा 'वन ट्री हिल पॉइंट' तर अगदी जवळून दिसतो. तर पूर्वेला सोनगड, दक्षिणेला किल्ले राजमाची आणि लोणावळ्याची डोंगररांग दिसते. पावसाळ्यात हे सगळं दृश्य मोठं दुर्मिळ, विहिंगम दिसतं. त्यामुळं पावसाळ्यात हा ट्रेक एकदा तरी नक्कीच करावा..                                                
                                    || श्री कृष्णार्पणमस्तु ||

येथे - जयवंत जाधव  

ऑफबीट - खरोसा लेणी, निलंगा, जि. लातूर Offbeat - Ancient Kharosa caves, Dist. Latur, Maharashtra.

                        महाराष्ट्रात वैशिष्ट्यपूर्ण अशी बरीच लेणी आहेत. काहींची प्रसिद्धी तर जगभर पोहोचली आहे. त्यांची कोरीव कलाकुसर आजही थक...