Thursday 22 December 2022

ऑफबीट - 'भेलीव'चा किल्ला - 'मृगगड' (Offbeat - Mrugagad)


                        डिसेंबरच्या तिसऱ्या रविवारी 'भेलीव'च्या 'मृगगडा'स आम्ही सहकुटुंब भेट दिली. एक पुण्याचा पन्नाशी ओलांडलेल्या अकरा जणांचा ग्रुप, मुंबईच्या विक्रोळीतून आलेला एक सोलो ट्रेकर आणि आम्ही तिघे, याव्यतिरिक्त रविवार असूनही किल्ल्याची चढाई करणारे विशेष असं कोणी दिसलं नाही.
  
किल्ले मृगगड (Mrugagad Fort)

                           मराठ्यांचा जाज्वल्य इतिहास सांगणारे, बेलाग गड किल्ले सह्याद्रीत आहेतच. ते आपलं दुर्ग वैभव टिकवूनही आहेत. पर्यटकांची तिथं नेहमी वर्दळ दिसते. पण याच सह्याद्रीत असेही छोटे, दुर्गम, कडवं आव्हान देणारे किल्ले आहेत की ज्यांनी परकीय आक्रमणं थोपवून स्वराज्याची पताका अबाधित राखली. अश्या गड किल्ल्यांच्या बाबतीत डोंगर भटके वगळता, गडपायथ्याचे स्थानिक रहिवाशीही उदासीन दिसतात. या किल्ल्यांची पर्यटकांना एकतर नावं, ठिकाणं माहीत नसावीत किंवा एकाकी, दुर्गम, धोकादायक ठिकाणांमुळं आणि सुविधा उपलब्ध नसल्यामुळं ते फिरकतही नसावेत.

                             "मृगगड". रायगडच्या सुधागड तालुक्यात, सह्याद्री घाटाखाली खोपोली पासून २३ किमीवरच्या पाली हायवेवर (NH 92) जांभूळपाड्याला डावं वळण घ्यायचं. पुढे नऊ किमीच्या 'भेलीव' गावात डावीकडे जंगलाच्या पलीकडं 'मृगगड' दिसतो. मुंबई, ठाणे आणि पुण्याकडील डोंगर भटक्यांना खोपोली मध्यवर्ती ठिकाण आहे. खोपोलीहून गडपायथ्याचं 'भेलीव' हे गांव सरासरी 32 किमी आहे. तर आमच्या राहत्या पनवेल पासून खोपोली मार्गे ६०-६५ किमी. खोपोलीहून 'पाली'ला जाणाऱ्या एसटी बसेस जांभूळपाड्याला थांबतात. तिथून मोजक्याच एसटी बसेस असल्यानं, भेलीवसाठी रिक्षा किंवा वडाप शोधावं लागतं. स्वतःचं वाहन असेल तर मृगगड वेळेत, एका दिवसात करण्यासारखा आहे.

गावाबाहेरील टेकडीवरून दिसणारं मंदिर आणि शाळा (Mrugagad)

                   'भेलीव' हे मृगगडाच्या पायथ्याचं, 'अंबा' नदीजवळ, लोणावळ्याच्या दरीकोंदनातलं गांव. गावात प्रवेश करताच डावीकडं शाळा दिसते. शाळेजवळ पार्किंगची सोय आहे. सरासरी चार पाचशे लोकवस्तीचं गांव असावं. सह्याद्रीच्या डोंगररांगेखालीच असल्यानं गांव, परिसरात धुव्वाधार पाऊस पडतो. प्रामुख्यानं इथं भात शेतीच दिसते. गांव दिसायला बेताचं असलं तरी गावातील लोक उद्यमशील, मदत करणारे दिसतात. गावकऱ्यांनी एकजुटीनं जुन्या मंदिराचा जीर्णोद्धार करून सध्या गावाच्या उत्तरेला भव्य, सुबक 'भवानी' मातेचं मंदिर उभारलं आहे.  आमच्या भेटी दरम्यान मंदिराची रंगरंगोटी चालू होती. येत्या माघ महिन्यातील पौर्णिमेला मंदिराचं कळसारोहन आणि वास्तूपुजा नियोजित आहे. शाळा आणि मंदिर एकमेकांना पाठमोरे आहेत. आणि या दोन्हींच्या उजव्या बाजूस गाव वसलं आहे. 'मृगगड' नावाचा गिरिदुर्ग सहयाद्रीच्या याच लोणावळा दरीकोंदणात गावाबाजुला १७५० फूट उंचीवर वसला आहे. "भेलीवचा किल्ला" म्हणूनही मृगगडास ओळखलं जातं. 

रस्त्यावरून दिसणारा किल्ले मृगगड आणि मोराडी सुळका (Mrugagad Fort)

                     गडावर जाणारा रस्ता मंदिर आणि शाळेच्या मधून उत्तरेकडील गावाबाहेरच्या कातळ टेकडीवरुन जातो. टेकडीवर सपाटी दिसते. त्या समोर जंगल आणि जंगलाच्या पलीकडे ईशान्येला एकसारखे दिसणारे ओळीत चार लहानमोठे डोंगरसुळके. लोणावळा डोंगर रांगेपासून काटकोनात, भेलीव पर्यंत सुळके निमुळते होताना दिसतात. नीट निरखून पहिल्यास त्यातील तिसऱ्या सुळक्यावर दुरून भगवा दिसतो. चौकशी केल्यावर एकानं सरळ सगळ्याच सुळ्यांकडे बोट दाखवलं आणि आम्ही जे समजून घ्यायचं ते घेतलं. टेकडी पठारानंतर दिसणाऱ्या जंगलात उजवीकडून, की समोरून सुळक्यांना वळसा मारून पुढं जायचं हे कळलं नाही. उजवीकडे एकावर एक असे तीन मोठे दगड रचलेले दिसले. मागील अनुभवावरून हीच पायवाट असावी असं समजून आम्ही उजवीकडून जंगलात घुसलो. पाच दहा मिनिटांनी एक मळलेली पायवाट आणि किल्ले मृगगड असा बोर्ड झाडाला ठोकलेला दिसला.

किल्ल्याकडे जाणारी पायवाट (Mrugagad Fort)
Mrugagad Fort

                     घनदाट झाडीतून जाणारी ही पायवाट शीतल, रम्य वाटते. प्रबळ गडावरील जंगलाची आठवण करून देते. आंबा, पळस, जनावरांवर माशा बसू नये म्हणून शेतकरी वापरतात त्या 'निंगडी'ची, करवंदीची झुडपं यांनी हा परिसर व्यापलेला दिसतो. त्यामुळे अर्ध्या तासाच्या चालीतही उन्हाचा त्रास जाणवला नाही. एक एक करत पायवाटेनं तिसरा सुळका ओलांडला की वाट पायथ्याकडं सरकते आणि दगडधोंड्यातून पुढे कातळाकडे जाते.

Mrugagad Fort
कातळाकडे जाणारी पायवाट (Mrugagad Fort)
  
 
                       कातळाच्या पायथ्याला उजवीकडं चौरसाकृती प्रवेशद्वार दिसणारी गुहा कोरलेली दिसते. वाट मात्र समोर डावी उजवीकडं दिसणाऱ्या महाकाय डोंगरांच्या कातळकडा जिथं येऊन मिळतात त्या तीव्र उताराच्या घळीतून वर चढताना दिसते. पुढे घळ अगदी चिंचोळी होत जाते. त्यात भरीस भर म्हणून घळीतल्या तीव्र उताराच्या अंतरा अंतरावर मोठे दगड अडकलेले दिसतात. घळीत जेमतेम जागा असल्यानं फार हालचाल करता येत नाहीच पण एकमेकांना मदतही करता येत नाही. नवख्यांना हा टप्पा दमवत असावा. नंतर चौकशी केली असता, या टप्प्यावर दोर लावून देण्यास गावातील तरुण तयार असल्याचं समजलं.
 
घळीकडे येणारी पायवाट (Mrugagad Fort)
 

दोन्ही डोंगरमधील घळ (Mrugagad Fort)

घळीवरून दिसणारी दरी (Mrugagad Fort)

दोन्ही डोंगरमधील घळ (Mrugagad Fort)
                       त्यानंतर वाट कातळ उतारावर डावीकडून वळसा मारत उजवीकडे वळते. समोर किल्ल्याचा भिमकाय कातळ नजरेस येतो. कातळावर सरकणारी माती आणि डावीकडं दरी असल्यानं सावध पावलं टाकावी. वळून उजवीकडे आल्यास, वाट तिसऱ्या आणि चौथ्या डोंगरांमधील छोट्या सपाटीवर येते. उजवीकडे समोर एका दगडावर कोरलेल्या अस्पष्ट पादुका दिसतात. बाजूला किल्ल्याची माहिती देणारा बोर्ड दिसतो. सध्या त्यावरील सर्व अक्षरं उडालेली आहेत. पादुकांच्या दगडामागे चौथी टेकडी गवतानं व्यापलेली दिसते. तुलनेत इथून डावीकडील किल्ल्याच्या तिसऱ्या डोंगराची उंची आणि व्याप्ती जास्त दिसते.
 
तिसऱ्या आणि चौथ्या डोंगरमाथ्यावरील सपाटी (Mrugagad)
किल्ल्याचा कातळ (Mrugagad Fort)
         
पादुका (Mrugagad Fort)
                      डावीकडे मुख्य किल्ल्याचा खडा कातळ दिसतो. कातळावर सुरुवातीला रुंद तर वर छोट्या अस्पष्ट होत, नागमोडी वळणं घेत कोरलेल्या पायऱ्या गडमाथ्यावर जातात. मध्यानंतर पायऱ्यांमधील अंतर आणि उंची कमी जास्त दिसते. काही पायऱ्या मध्ये तुटलेल्याही आहेत. दरीकाठावरून जाणाऱ्या या पायऱ्या आणि ठराविक ठिकाणी खोबण्यांचा आधार घेत सावकाश, संयमानं हा टप्पा पार करावा लागतो. एखादं चुकीचं पडलेलं पाऊल इथं जीवावर बेतू शकतं. मध्येच जवळ जवळ ८० अंशाच्या कोनातून वर जाणाऱ्या या पायऱ्यांचा छोटा टप्पा आणि त्याखाली खोल दरी मानसिक कसोटी घेतात, पण क्षणभर 'कलावंतीण'ची आठवण करून देतात.
किल्ल्याचा कातळ आणि पायऱ्या (Mrugagad Fort)


Steep Steps
     
                    कातळावरून गडचढाई करण्यापूर्वी या कातळाच्या उजवीकडे समोर कातळ काठावरून जाणाऱ्या अरुंद पायऱ्या दिसतात. या गडाच्या कातळात असलेल्या समोरील गुहेकडे त्या जातात. जेमतेम एक पाऊल ठेवता येईल इतक्या रुंद आणि खाली खोल दरी दिसते. सध्या गुहेत फारसं काही बघण्यासारखं दिसत नाही, पण थरार मात्र अनुभवता येतो.
उजवीकडील गुहेत जाणाऱ्या पायऱ्या (Mrugagad Fort)
गुहा (Mrugagad Fort)


कातळ पायऱ्या (Mrugagad Fort)
कातळ पायऱ्या (Mrugagad Fort)

                       किल्ल्याचा उभा कातळ चढून वर आल्यास उजवीकडं अर्धवट तटबंदी दिसते. तटबंदीला उजवा वळसा मारून वाट गडमाथ्यावर येते. उजवीकडे कड्याच्या काठावर 'महिषासुर मर्दिनी'चं छोटं उध्वस्त मंदिर दिसतं. मंदिराच्या घुमटीवर सध्या पत्र्याचा आडोसा दिसतो. देवीच्या बाजुला दुसऱ्या एका स्त्री देवतेची मूर्ती आणि शिवपिंडी दिसते. वेगवेगळ्या दगडावर कोरलेल्या या दोन्ही मुर्त्या सुबक आहेत.
महिषासुर मर्दिनी मंदिर (Mrugagad Fort)
पूर्वेची तटबंदी (Mrugagad Fort)
मोराडी सुळका 'स्वयंभू शिवलिंग' लोणावळा घाट (Mrugagad Fort)
                    किल्ल्याच्या या पूर्व कड्यावरून लोणावळ्याचा आकाशात घुसलेला 'मोराडी सुळका' आणि 'लायन्स पॉइंट' तसेच लोणावळा डोंगररांग छान,  विलोभनीय दिसतात. इथून लोणावळा घाटमाथ्यावर नजर ठेवता येते. मोराडी सुळका हा शिवलिंगाच्या आकाराचा दिसतो. सह्याद्रीतून वर उठलेला हा सुळका 'स्वयंभू शिवलिंग' मानलं जातं.
                    तर मंदिराच्या डावीकडं समोर उध्वस्त दगडी चौथरा दिसतो. कदाचित ते सदरेचे अवशेष असावेत. डावीकडे समोर मध्यम आकाराच्या पाण्याच्या तीन टाक्या दिसतात. त्यापैकी एका टाकीत सध्या पाणी शिल्लक असून बाकीच्या दोन कोरड्या दिसतात. टाकीतील पाणी पिण्यायोग्य दिसत नाही. कदाचित या दोन टक्यांना खाली काताळात नैसर्गिक गळती असावी.
किल्ल्यावरील सुरुवातीच्या पाण्याच्या टाक्या (Mrugagad Fort)


किल्ल्यावरील सुरुवातीच्या पाण्याच्या टाक्या (Mrugagad Fort)
                     या टाक्यांच्या आजूबाजूला टाकींची सफाई करताना निघालेल्या दगडांचे ढीग दिसतात. तर काही दगड अस्ताव्यस्त विखुरलेले दिसतात. किल्ल्याबद्दल अधिक चौकशी करता लॉकडाऊन दरम्यान गडावर जमिनीखाली पूर्वी लपवलेली तांब्याची भांडी शोधण्याचा प्रयत्न झाला होता अशी खाली गावात खबर मिळते. असो..
            या टाकींच्या समोर उत्तरेला आणखी एका वाड्याचे अवशेष दिसतात.
बालेकिल्ल्याची टेकडी (Mrugagad Fort)


बालेकिल्ल्यावरील वाड्याचे अवशेष (Mrugagad)

बालेकिल्ल्यावरील दगडी भांडे (Mrugagad Fort)

                        पुढे गडमाथ्याच्या टेकडीवर जाणारी पायवाट दिसते. टेकडीवरही असेच एका वाड्याच्या चौथऱ्याचे अवशेष आहेत. वाड्यात एक मोठं दगडी, घडीव आणि वाटोळ्या आकाराचं भांडं दिसतं. कदाचित हा किल्ल्याचा बालेकिल्ला असावा. या टेकडी पलीकडे डाव्या बाजूला म्हणजेच भेलीवच्या दिशेनं उतार जमिनीवर कातळात खोदलेल्या आणखी दोन पाण्याच्या टाक्यांची रचना दिसते. त्यातील एका टाकीत पाण्याचा काही अंश शिल्लक असून दुसरी टाकी गाळाने भरलेली दिसते. आजूबाजूला गुडघ्या इतकं सुकलेलं गवत दिसतं.

किल्ल्याच्या दक्षिणेकडील उतारावरील पाण्याच्या टाक्या (Mrugagad Fort)

                       त्यापुढे शेवटी किल्ल्यावर थोडाफार सपाट म्हणता येईल असा काळा कातळ दिसतो. हे मृगगडाचं शेवटचं टोक असून या कातळावरही आणखी तीन पाण्याच्या टाक्या कोरलेल्या दिसतात. पैकी तिसऱ्या टाकीचं काम अर्धवट राहिलेलं दिसतं. या तिन्ही टाक्या कातळावर, आडव्या उभ्या काटकोनात कोरलेल्या चरांनी एकमेकांना जोडलेल्या दिसतात. कातळावर ठिकठिकाणी गोल हळगेही दिसतात. खळग्यांचा उपयोग त्यावेळी लाकडी खांब उभा करून किल्ल्यावर आडोसा उभारण्यासाठी तसेच पावसाच्या पाण्यातून वाहून आलेला गाळ या खळग्यात साठून, फक्त पाणी टाकीत जमा होईल या उद्देशानं केला असावा. इथंही दोन टाक्या पूर्ण गाळाणं भरलेल्या दिसत असून, पैकी एका टाकीत पाण्याचा शेवटचा अंश शिल्लक दिसतो. इथल्या टाकींची व्यवस्था बघून 'किल्ले सांकशी'वर असलेलं जलव्यवस्थापन आठवतं. या टाकींच्या बाजूला झाडावर फडकणारा भगवा दुरुन 'भेलीव' गावातून दिसतो.

टाकिंना असलेली चर व्यवस्था (Mrugagad Fort)
किल्ल्याच्या शेवटच्या टोकावरील पाण्याच्या टाक्या (Mrugagad Fort)
किल्ल्यावरून दिसणारा वाघदरी परिसर (Mrugagad Fort)

किल्ल्यावरून दिसणारा वाघदरी परिसर आणि समोर किल्ले अनघई (Mrugagad Fort)
  
उंबरखिंड (Mrugagad Fort)


                               गडमाथ्याच्या या टोकावरून पश्चिमेला कोकण, दक्षिणेला 'अंबा' नदीचा 'वाघदरी' परिसर, अग्नेयेला अनघई किल्ल्याचा डोंगर, तर उत्तरेला 'उंबरखिंड' परिसरावर नजर ठेवता येते. याच उंबरखिंडीत १६६१ ला शिवरायांनी हजारोंची फौज घेवून स्वराज्याच्या मुळावर उठलेल्या मुघल सरदार 'कर्तलब खान' आणि त्याच्या फौजेची, मूठभर मावळ्यांनिशी दाणादाण उडवली होती. त्यामुळं शिवरायांनी त्यावेळी मृगगडावरून त्या फौजेवर नक्कीच नजर ठेवली असावी. 

                      गडाला पूर्वेकडं सुरुवातीची थोडीफार तटबंदी दिसते. जर किल्ल्याच्या इतर कड्याकाठावर पूर्वी ती असल्यास ढासळलीही असावी. किंवा पोर्तुगीज, इंग्रज राजवटीत ती उध्वस्तही केली असावी. बाकी उभ्या कड्यांमुळं किल्ल्याला नैसर्गिक संरक्षण मिळालेलं आहे. त्यामुळं इतर कुठेच बुरुजांची आवश्यकता दिसत नाही. पावसाळ्यात मात्र निसरडा कातळ आणि पायऱ्यांमुळं शक्यतो हा ट्रेक टाळावा.

किल्ले मृगगड (Mrugagad Fort)


किल्ले मृगगड (Mrugagad Fort)

                        किल्ल्याचा एकूण आकार लांबट गोलाकार असून किल्ला काळ्या कातळाच्या डोंगरमाथ्यावर पूर्व पश्चिम असा वसलेला दिसतो. किल्ल्याच्या निर्मितीचा इतिहास मात्र आजही अज्ञात आहे. पण कदाचित मध्ययुगीन काळात हा किल्ला निर्माण केला असावा. गडमाथा पाऊण तासात फिरून आटोपणारा आहे. किल्ल्यास चारही बाजूंनी उभे कडे असून त्यापैकी पूर्वेकडचा धोकादायक कडा आणि दरिजवळून गडप्रवेश आहे. त्यामुळं बाहेरून किल्ल्यावर चालून जाणं तितकं सोपं दिसत नाही. 'मृगगड'च्या चढाईची श्रेणी मध्यम असली तरी, नवख्या डोंगर भटक्यांसाठी नक्कीच धाडसाची ठरावी..

                                     || श्री कृष्णार्पणमस्तू ||                          

येथे - जयवंत जाधव

20 comments:

  1. खुप छान 💐🙏👍

    ReplyDelete
  2. अतिशय सुंदर वर्णन. नवख्या मंडळी साठी तर आवश्यक आहे

    ReplyDelete
  3. सुंदर आणी मुद्देसूद लिखाण, खुप छान वाटलं वाचायला. तुमची फोटोग्राफी उत्तम आहे

    ReplyDelete
  4. साहेब तुम्ही जे वर्णन करता त्याला तोड नाही.खूपच सुंदर व छान माहिती .तुमच्यामुळे आम्हांला काही माहीत नसलेल्या गडकिल्ल्यांची माहिती मिळते .असेच लिहीत राहा.धन्यवाद 👌👌👌👍🙏

    ReplyDelete
  5. खूप छान माहिती दिल्याबद्दल आभार! आपण असे वर्णन केले आहे जसे त्या गडावर जाऊन आल्यासारखं वाटतंय. धन्यवाद

    ReplyDelete
  6. नमस्कार जयवंत आज पुन्हा एकदा ट्रेकिंगचा अनुभव तुझ्या ब्लॉग मधुन मिळला.तुझं लिखाण इतक वैविध्यपुर्ण आहे की वाचल्यावर मला असा अनुभव येतो मी प्रत्यक्षात ट्रेकिंग करत आहे. मृगगडाची महिती तर मिळलीच पण छोट्याछोट्या जागेच, देवळांचं तेथील देवतांची ची माहिती देऊन वाचकांच्या ज्ञनात भर होते. पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏

    ReplyDelete
  7. खुप छान 👌

    ReplyDelete
  8. तुम्ही तिघांनी एक अपरिचित किल्ल्याची सफर घडवली. Thanks Hemlata and family.

    ReplyDelete
  9. खुपच छान👌👌👌
    नवनवीन किल्ल्यांची माहिती दिल्याबद्दल आभार👍👍👍

    ReplyDelete
  10. Nice information helpful to new trekkers. Take care while at unknown risky places. Doing well thanks.

    ReplyDelete
  11. खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद , जयवंत मित्रा

    ReplyDelete
  12. Khup chan lihlay

    ReplyDelete
  13. Khupch chan lihlay dada, as vatat ki praktshy amhi te anubhavat ahot.. keep it up, asech lihat raha..

    ReplyDelete
  14. सुंदर आणी मुद्देसूद लिखाण 👍👌

    ReplyDelete
  15. सुंदर व अप्रतिम वर्णन👌

    ReplyDelete
  16. Sheetal Kulkarni25 January 2023 at 13:20

    सुंदर व अप्रतिम लेख...

    ReplyDelete
  17. खूप सुंदर माहिती, धन्यवाद मित्रा, असाच लिहीत रहा!

    ReplyDelete
  18. Very Nice
    Great Information 👍

    ReplyDelete
  19. अतुल लहाने29 March 2023 at 15:17

    अप्रतिम वर्णन, सारे काही अगदी नजरे समोर अवतरले.

    ReplyDelete

ऑफबीट - खरोसा लेणी, निलंगा, जि. लातूर Offbeat - Ancient Kharosa caves, Dist. Latur, Maharashtra.

                        महाराष्ट्रात वैशिष्ट्यपूर्ण अशी बरीच लेणी आहेत. काहींची प्रसिद्धी तर जगभर पोहोचली आहे. त्यांची कोरीव कलाकुसर आजही थक...