![]() |
श्री महागणपती (Chirner) |
![]() |
गाभाऱ्याच्या चौकटीवरील शिल्प गणेशपट्टी |
![]() |
श्री महागणपती मंदिर (Chirner) |
सरासरी शंभर वर्षांपर्यंत इथं घनदाट जंगल होतं. स्थानिक आगरी समाज जंगलातून मध, जळाऊ लाकूड, पशुपालन, फळे, रानभाज्या आणि शिकार यावर गुजराण करत. १८७८ च्या जंगल कायद्यात सुधारणा करून १९२७ ला इंग्रजांनी स्थानिकांना जंगलात बंदी घातली. त्यांच्या पोटापाण्याचे हाल होऊ लागले, साऱ्या भारतवर्षात थोड्याअधिक फरकानं स्थानिकांवर हीच वेळ आली. देशभर जंगल सत्याग्रह पुकारला गेला. त्या सत्याग्रहास उरण चिरनेरच्या आगरी जनतेने भरघोस पाठिंबा दिला.
![]() |
हुतात्मा स्मारक (Chirner) |
अहिंसेच्या मार्गानं चाललेल्या या आंदोलनाला हिंसेचं वळण मिळालं. २५ सप्टेंबर १९३० ला चिरनेरच्या अक्कादेवीच्या माळरानावर ब्रिटिशांनी गोळीबार केला. त्यात काही स्थानिक मारले गेले. घटनेच्या चौकशी दरम्यान चिरनेरचे काही आरोपी ठरवून पकडले. गावात पोलिस चौकी नसल्यानं या गणपतीच्या देवळात त्यांना कोंडून मारहाण करण्यात आली होती.
या घटनेचा निषेध करण्यासाठी गावातील बाळाराम रामजी ठाकूर हा तरुण देवळाजवळ आला. त्यावेळी पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला. बाळारामचा हात जखमी झाला. त्या दरम्यान एक गोळी देवळाच्या लोखंडी गजाला लागली होती. ग्रामस्थांनी या लोखंडी गजाची आठवण आजही जपून ठेवली आहे. देवळात प्रवेश करताना डाव्या बाजूला हा गोळी लागलेला गज सर्वांना स्पष्ट दिसेल असा खिडकीत बंदिस्त करून ठेवलेला दिसतो.
![]() |
१९३० चा गोळी लागलेला लोखंडी गज |
![]() |
![]() |
हुतात्मा स्तंभ (Chirner) |
सप्टेंबर २००५ साली तळ्याकाठावर राखीव जागेत हुतात्मा क्रांतीकारकांचे भव्य बोलके पुतळे उभारलेले आहेत. प्रत्येक पुतळ्याखाली त्यांचे नांव, गांव आणि कोणत्या क्षणी त्यांना वीरमरण आलं, त्या क्षणाचा उल्लेख लिहिलेला दिसतो. श्री महागणपतीचा आशीर्वाद घेणारा प्रत्यक भाविक इथं ओढला जातो आणि या हुतात्म्यापुढे नतमस्तक होताना दिसतो.
बाराव्या शतकापासून इस्लामिक आणि त्यानंतर पोर्तुगीजांनी केलेली आक्रमणं आणि जबरदस्तीचं धर्मपरिवर्तन यातून मंदिरं आणि मुर्त्याही सुटल्या नाहीत. मंदिरं तुटली पण त्यावेळच्या पूजाऱ्यांनी मुर्त्या वाचविण्याचा प्रयत्न केला. कुठे तळघरात, विहिरीत, तळ्यात तर कुठे जमिनीखाली मुर्त्या लपविल्या गेल्या. शिवछत्रपतींनी लावलेला स्वराज्याचा वटवृक्ष पेशवेकाळात अगदी अटकेपार फोफावला. पुन्हा देव, देश आणि स्वधर्म वाढीस लागला.
जसे नानासाहेब पेशवे गणेशभक्त होते, तसे उरण प्रांताचे त्यांचे सुभेदार रामजी महादेव फडकेही गणेशभक्त होते. धर्मांतरासाठी छळणाऱ्या पोर्तुगीजांचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला. त्यांनी उरण, पाली पोर्तुगीज मुक्त केली. त्यांना तळ्यातल्या गणेशाचा दृष्टान्त झाला आणि या महागणपतीची पुन्हा स्थापना झाली.
तळ्याकाठावर श्री महागणपती मंदिर बांधलं. मंदिराच्या पूर्वेस असलेल्या तळ्यास 'देवाचं तळं' नांव पडलं. पाच फुट उंचीची श्री महागणपतीची सिंदूरचर्चित मूर्ती पूर्वाभिमुख आहे. महडचा स्वयंभू श्री वरदविनायक आणि या मूर्तीत बरंच साम्य दिसतं. मूर्ती इतकी प्रसन्न, सुंदर आणि सुरेख आहे की, बघताक्षणी भाविक सुखावून जातो. गाभाऱ्यासमोर उंच पितळी रेखीव स्तंभावर मोठा नक्षीदार मूषक श्री महागणपतीकडे तोंड करून दोन पायावर उभा आहे.
![]() |
![]() |
गाभाऱ्यासमोरील पितळी मूषक |
![]() |
मंदिराचं नवीन बांधलेलं सभामंडप (Chirner) |
मंदिराचा गाभारा दगडी असून, अंतराळ गोल घुमटाकार आहे. गाभाऱ्याच्या चौकटीवर दगडात कोरलेली गणेशपट्टि दिसते. गाभाऱ्यावर पितळी कळस दिसतो. गाभाऱ्याच्या चार कोपऱ्यात चार चबुतरे ठेवलेले दिसतात. सध्या मूळ गाभाऱ्याला बाहेरून प्लास्टर केले असून, पूर्ण मंदिराला आतून बाहेरून उठावदार रंग लावलेला दिसतो. पुढे कालांतरानं गाभाऱ्यापुढील सभामंडप बांधलेला दिसतो.
या सभामंडपास लागूनच नजीकच्या काळात आणखी एक भव्य, प्रशस्त मंडप बांधलेला दिसतो. हा नवीन सभामंडप इतका प्रशस्त आहे की, गावातील लग्न आणि इतर शुभकार्य इथं केली जातात. तळ्याकाठच्या या मंदिरासमोर प्रशस्त समतल मोकळी जागा दिसते. मंदिराच्या उजवीकडे दक्षिणेला जुनं कौलारू मारुती मंदिर दिसतं.
तळ्याकाठावरच गणपती मंदिरासमोर पुरातन श्री शंभू महादेवाचं मंदिर आहे. मंदिराचा सभामंडप नजीकच्या काळात बांधलेला दिसतो. गाभारा लहान असला तरी, गाभाऱ्याच्या उजवीकडे दिवडीत गणेश तर डावीकडील दिवडीत कार्तिक स्वामींची सुबक मूर्ती दिसते. गाभाऱ्यात शिवपिंडी असून, पिंडीवर कलशातून पडणारी अखंड जलधार दिसते. पिंडीसमोर पाषाणी भिंतीतील दिवडीत माता पार्वती स्थापित दिसते. भिंतीच्या गाभाऱ्यासमोर सभामंडपात पाषाणात घडविलेला नंदी दिसतो.
![]() |
![]() |
श्री शंभू महादेव मंदिर (Chirner) |
![]() |
गद्धेगळ (Chirner) |
![]() |
नंदी |
इ. स. १७३९ ला वसईच्या स्वारीवर निघताना चिमाजि आप्पांनी या महागणपती आणि शंभू महादेवाचे आशीर्वाद घेतल्याची माहिती गावात मिळते.
![]() |
शिवलिंग आणि मागे माता पार्वती (Chirner) |
या भव्य तळ्याला एकूण चार दगडी घाट आहेत. काही स्थानिक घाटावर झाडांच्या सावलीत मासेमारीसाठी पाण्यात गळ टाकून बसलेले दिसतात.
![]() |
मासेमारी करणारे स्थानिक (Chirner) |
![]() |
देवाचं तळं (Chirner) |
![]() |
देवाचं तळं - डावीकडे महादेव आणि समोर महागणपती मंदिर (Chirner) |
चिरनेर गावात मातीची भांडी तयार करून येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांना विकण्याचा व्यवसायही दिसतो. त्यासाठी लागणारी माती इथल्या शेतातून काढली जाते. माती काढल्यानंतर तयार झालेल्या खड्ड्यात पाणी साठवून शेततळी तयार करतात. या शेततळ्यात मस्त्योद्योग करताना स्थानिक दिसतात.
![]() |
पोपटी पार्टीचा आस्वाद घेताना महिला मंडळ (Chirner) |
![]() |
भांडी विकणारी चिरनेर ची भगिनी |
![]() |
मातीची भांडी बनवताना (Chirner) |
|| श्री कृष्णार्पणमस्तु ||
येथे - जयवंत जाधव
Nice blog khup chan mahiti dhili
ReplyDeleteVery nice jaywant
ReplyDeleteBest blog
ReplyDeleteचिरनेर ची छान माहिती दिली आहे. लेख वाचून उस्तूकता वाढली. योग आल्यास चिरनेरला नक्की जाऊन येऊ.
ReplyDeleteखूप मस्त चिरनेर.
ReplyDelete