Wednesday 10 January 2024

वास्तू वैभव : भुईकोट 'किल्ले औसा', जि. लातूर - Ausa Fort, Dist. Latur, Maharashtra.

                   मराठवाड्यातील लातूर जिल्ह्याच्या मुख्य शहरापासून नैऋत्येला २० किमीवर 'औसा' हे तालुका ठिकाण आहे. औसाला लागूनच दक्षिणेला छोटा पण भव्य असलेला भुईकोट 'किल्ले औसा' म्हणजे 'औसा'ची शान मानली जाते. 
                     औसा आणि पर्यायाने लातूर शहराचा प्राचीन इतिहास पाहिला तर राष्ट्रकूट घराण्याने इ.स. ७५३ ते ९७३ या कालावधीत दक्षिणेवर राज्य केलं. या घराण्यातील 'अमोघवर्ष' राजानं लातूर शहर वसविले. त्यानंतर चालुक्य सम्राज्यानं इथं राज्य केलं. दिगंबर जैन पंथाचं औसा हे एक प्रमुख केंद्र होतं. त्यानंतर हा भूभाग देवगिरीच्या यादवांच्या ताब्यात आला. यादव काळात 'औसा' हे प्रशासकीय केंद्र म्हणून नावारूपाला आले. 

नौबत दरवाजा, किल्ले औसा, ता. औसा, जिल्हा लातूर, महाराष्ट्र (Ausa Fort, Dist. Latur, Maharashtra )
                            १३३७ ला यादवांचे राज्य दिल्ली सुलतानाच्या ताब्यात गेले आणि दक्षिणेत मुस्लिम सत्तेचा अम्मल सुरू झाला. १३५१ मध्ये दिल्ली सुलतानाच्या ताब्यातील हा भाग बहामनी साम्राज्यात आला. पहिला बुऱ्हाण निजामाने इथे सत्ता स्थापन केली. बहामणी काळात बिदरच्या या सुलतानाचा वजीर 'महमुद गवान'नं पंधराव्या शतकात 'किल्ले औसा'ची पुनर्रचना (दुरुस्ती) केली. 

                     निझामाविरुद्ध आदिलशाही आणि मुघल यांच्या १६३५ मध्ये युद्धानंतर झालेल्या तहात किल्ले औसाचा उल्लेख मिळतो. त्याआधी १५९९ ला मुघलांनी अहमदनगरच्या निजामाचा पराभव करून किल्ला ताब्यात घेतला होता. निजामशाही, आदिलशाही आणि मुघल यांच्या संघर्षात पुढे किल्ल्याने बरीच इस्लामिक स्थित्यंतरे पाहिली. 

सहावा दरवाजा, बुरुजावर कर्नल 'मेडिज टेलर'ची राहती वास्तू, खाली पांढऱ्या रंगाचे पीर थडगे (Ausa Fort, Latur)
                       पुढे बहामनी साम्राज्याची शकले होऊन औसासह लातूर हैद्राबाद निजामाच्या संस्थानात गेले. १८५३ ला हा भाग हैद्राबादच्या निजामाने इंग्रजांकडे गहाण ठेवला होता. १८६१ पर्यंत तो इंग्रजांकडे राहिला. त्यावेळी कर्नल 'मेडिज टेलर' हा ब्रिटिश कमिशनर म्हणून 'नळदुर्ग' परगण्याचा कारभार बघत असताना वरील गहाण कालावधीत औसा'चीही जबाबदारी इथे येऊन जाऊन सांभाळत होता. निजामाचे हे हैद्राबाद संस्थान १७ सप्टेंबर १९४८ मध्ये स्वतंत्र भारतात विलीन झाल्यानंतर लातूर आणि पर्यायाने औसा महाराष्ट्र राज्यात आले. आजही 'मेडिज टेलर'चं राहतं घर या भुईकोटाच्या ईशान्येला असलेल्या बुरुजावर सुस्थितीत दिसतं.

              छत्रपतींचं स्वराज्य त्याकाळी सह्याद्री आणि कोकणापुरतं मर्यादित राहिल्यानं हा किल्ला मराठी साम्राज्यात आला नाही. पण छत्रपतींनंतर १६९९ ते १७०७ या कालावधीत स्वराज्याचे सेनापती धनाजी जाधव आणि मुघल सरदार झुल्पिकार खान यांच्यात औसा'च्या आजूबाजूला चकमकी होऊन मराठेशाहीनं जरब ठेवल्याची नोंद मिळते.

डावीकडे खंदकाची बाह्य भिंत 'रेवणी', त्यानंतर खंदक, किल्ल्याची बाह्य तटबंदी, मध्ये परकोट आणि उजवीकडील उंच मुख्य तटबंदीतील दिसणाऱ्या चर्या (Ausa Fort)

                       मराठवाड्यात लातूर जवळ समतल (सपाट) जमिनीच्या किंचित खोलगट भागात या भुईकोट किल्ले औसाची निर्मिती केलेली दिसते. त्यामुळे दुरून किल्ल्याचं अस्तित्व चटकन लक्षात येतं नाही. पण किल्ल्याच्या तटावरून चौफेर दूरवरचा भूभाग मात्र नजरेच्या टप्प्यात येतो. औसाच्या आग्नेयेला २२ किमीवर लातूरच्या 'निलंग्या'च्या आधी प्राचीन 'खरोसा लेणी' आहेत. उत्तर आणि दक्षिणेच्या प्राचीन व्यापारी मार्गावर (Ancient Silk Route) असणारी ही लेणी त्याकाळी व्यापाऱ्यांसाठी विसावा घेण्याचं ठिकाण होतं. या व्यापारी मार्गावर नजर ठेऊन, त्यांचं रक्षण करण्याचं मध्यवर्त ठिकाण म्हणजे भुईकोट 'किल्ले औसा'. प्राचीन बाजारपेठ, त्यानंतर यादव काळात हे प्रशासकीय केंद्र असणं यामुळे 'औसा' किल्ल्याची निर्मिती मुस्लिम सत्तेच्या आधी निश्चितच चालुक्य साम्राज्यातील  हिंदू राजवटीत झाली याला पुष्टी मिळते.  

मगरमुखी तोफ (Ausa Fort, Latur)
                   अंदाजे साडेपाच हेक्टर (१३ एकर) जागेवर हा किल्ला वसला आहे. किल्ल्याचं क्षेत्रफळ कमी असलं तरी मध्ययुगात या किल्ल्याला खूपच लष्करी महत्त्व होतं. त्यामुळं प्रत्येक राजवटीला 'औसा'चं हे जमिनीवरील 'ठाणं' स्वतःच्या ताब्यात हवंच होतं.

                      दोन वर्षापूर्वीच आम्ही सहकुटुंब मराठवाड्याच्या भटकंतीत 'धाराशिव लेणी', गोरोबा काकांचं प्राचीन 'तगर' नगर (तेर) आणि त्यांना संरक्षण पुरविणारा भुईकोट 'किल्ले परांड्या'ला भेट दिली होती.  यावेळच्या भटकंतीत उत्तर आणि दक्षिणेच्या प्राचीन व्यापारी मार्गावरील 'खरोसा लेणी' आणि त्यावर नजर ठेऊन असणारा भुईकोट 'किल्ले औसा' हे यावेळचं नियोजन होतं.

सोलापूर - लातूर (Ausa Fort, Latur)

                        किल्ले औसासाठी लातूरला येण्याऱ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एसटी बस आहेत. मुंबईकरांना दादरहून 'बिदर' एक्सप्रेस पकडूनही लातूरला उतरता येते. औसा हे लातूर-सोलापूर हायवेलगत लातूरच्या जवळ असल्यानं औसा पर्यंत इतरही वाहतुकीची चांगली सोय आहे. रस्तेही चांगले आहेत. अर्थातच या आणि अशा महामार्गांचे श्रेय महाराष्ट्राचे सद्गृहस्थ, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी साहेब यांना निश्चित जातं.

                     किल्ले औसाची सर्वसाधारण रचना पाहिल्यास, खंदकाची ३० फूट उंच बाहेरील दगडी भिंत ज्याला 'रेवणी' म्हटले जाते. त्यानंतर ३८ मीटर रुंदीचा खोल खंदक आहे. खंदकाला लागून किल्ल्याची ३० फूट उंचीची पहिली (बाह्य) तटबंदी, त्यानंतर 'परकोट' किंवा 'शेरहाजी' (दोन्ही तटबंदीतील लष्करी हालचालींची जागा) आणि  दुसरी ४५ फूट उंचीची आतील (आंतर) मुख्य किल्ल्याची तटबंदी अशी आहे. सहसा भुईकोट किल्ल्याच्या बाह्य तटबंदीत किल्ल्याचे दरवाजे सुरू होतात. पण पहिल्या मुख्य दरवाजाच्या बाबतीत 'किल्ले औसा' अपवाद असून, किल्ल्याचा पहिला 'लोहबंदी' दरवाजा किल्ल्याच्या पूर्वेला खंदकाच्या बाहेर निर्माण केला आहे.

लोहबंदी दरवाजा, किल्ले औसा, लातूर (Ausa Fort, Latur)

खंदकातुन लोहबंदी दरवाजा, किल्ले औसा (Ausa Fort, Latur)

लोहबंदी दरवाजा, किल्ले औसा (Ausa Fort, Latur)

खंदकातून झाडामागे दिसणारा नौबत दरवाजा (Ausa Fort, Latur)

खंदकातील घरे (Ausa Fort, Latur)
                    किल्ल्यात प्रवेश करायचा झाल्यास आधी पूर्वेकडून खंदकात उतरणारा 'लोहबंदी' दरवाजा ओलांडावा लागतो. मजबूत आणि वेगळ्या धाटणीचा दगडांत घडवलेला हा भव्य दरवाजा आणि त्याची भव्य प्राचीन दगडी 'फरसबंदीची' वाट दुर्ग रसिकांचं स्वागत करते. ही उतार दगडांची प्राचीन वाट दरवाजाच्या मजबूत कमानीतून सरळ किल्ल्याच्या खंदकात घेऊन जाते. या दरवाजाच्या दोन्ही बाह्य बाजूस सैनिकांसाठी 'देवड्या' ठेवल्या आहेत. समोर किल्ल्याची आडवी तटबंदी, तटबंदीत बुरुज आणि लोहबंदी दरवाजा ओलांडून खंदकाकडे पुढे येणाऱ्या शत्रूवर मारा करण्यासाठी तटबंदीत 'चर्या' आणि 'दिवळ्या' दिसतात. हा लोहबंदी दरवाजा आणि पुढे किल्ल्याचे सहा असे एकूण सात मुख्य दरवाजे किल्ल्यास आहेत.                                                       किल्ल्यात प्रवेश करताना सध्या खंदकाचा पूर्वेकडील काही भाग अतिक्रमण करून बुजवला असून त्यावर खंदकातच घरे बांधलेली दिसतात. या खंदकातून उजवीकडे वळून घरे ओलांडत वाट खंदकाच्या छोट्या पुलावरून किल्ल्याच्या दुसऱ्या 'नौबत' दरवाजात घेऊन जाते. पूर्वी लोहबंदी आणि नौबत दरवाजांच्या मध्ये खंदकावर लाकडी पूल असावा. युद्ध काळात तो उचलून घेतला जाई. 

                      'नौबत' दरवाजा किल्ल्याच्या बुरुजात बनवलेला आहे. दरवाजावर सुंदर 'सज्जा' आहे. या सज्जासोबत डावीकडे बुरुजांवर सलग पाच आणि उजवीकडील बुरुजावर एक असे एकूण सात सुसज्ज सज्जे या नौबत दरवाजाचं रक्षण करताना दिसतात. प्रत्येक बुरुजातून तोफमारा करण्यासाठी 'दिवळ्या' तर सज्जावरून बाण आणि बंदुकीचा मारा करण्यासाठी 'जंग्या' ठेवलेल्या दिसतात. इतकं करूनही खंदक ओलांडून या दरवाजात पोहोचलेल्या शत्रूवर वरून उकळतं तेल आणि निखारे ओतण्यासाठी सज्जाच्या दगडात आटोपशीर फटी ठेवल्या आहेत. दरवाजाच्या सज्जावर दोन्ही बाजूस दोन मिनार ठेवलेला नौबतखाना दिसतो. दरवाजावरील कमान आणि सज्जाखाली दगडांत कोरलेली सुंदर 'गजथर' (हस्तिशिल्प) पट्टी दिसते. हा नौबत दरवाजा किल्ल्याची सुंदरता आणि भव्यतेची जाणीव करून देतो. त्याचबरोबर किल्ल्याचं रक्षण करताना शत्रूला तगडं आव्हान देताना दिसतो.  

खंदकातून नौबत दरवाजा (Ausa Fort, Latur)

सज्जा आणि गजथर (हस्तिशिल्प) पट्टी 
                   नौबत दरवाजाच्या बाहेर डाव्या बाजूला खंदकात किल्ल्याची प्राचीन विहीर दिसते. विहिरीला पंप लावून त्या पाण्याचा उपयोग किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी तसेच स्थानिकांनी कपडे धुण्यासाठी केलेला दिसतो. किल्ल्याच्या तोंडावर त्यांनी निर्माण केलेला धोबीघाट नजरेत भरतो.

खंदकाचा केलेला सदुपयोग (Ausa Fort)
नौबत दरवाजाच्या उजवीकडे खंदकातील विहीर (Ausa Fort)
                   नौबत दरवाजा ओलांडल्यास उजवीकडे किल्ल्याच्या तटबंदीची उंच भिंत आणि समोर डावीकडील दोन बुरुजांमध्ये किल्ल्याचा तिसरा गोमुखी 'अरीत खान' दरवाजा दिसतो. या बुरुज आणि दरवाजाच्या वर सज्जे आणि तीनही सज्जांच्या खाली दगडात एकसंघ कोरलेली सुंदर 'गजथर' (हस्तशिल्प) पट्टी दिसते. सज्जातून शत्रूवर उकळतं तेल ओतण्यासाठी फटींची व्यवस्था दिसते. या दरवाजा समोर कमरे इतक्या उंच व्हरांड्यावर दोन सुसज्ज 'ओवऱ्या' आणि ओवऱ्यांच्या मागे शिपायांच्या 'देवड्या' दिसतात. बुरुज आणि तीनही सज्जांतून शत्रूवर मारा करण्यासाठी दिवळ्या, जंग्या दिसतात. हे एक छोटं 'रणमंडळ' (Battle field) म्हणता येईल. 

अरितखान दरवाजा, त्यावरील सज्जे आणि दिसणारी गजथर पट्टी (Ausa Fort, Latur)

तोफगोळे (Ausa Fort, Latur)

अरितखान दरवाजासमोरील देवड्या (Ausa Fort, Latur)

नौबत दरवाजाचे जीर्ण अवशेष उजवीकडे चिनी दरवाजा (Ausa Fort)
                 'अरीत खान' दरवाजा ओलांडून किल्ल्याच्या चौथ्या 'चीनी' दरवाजापर्यंत जाण्यासाठी डावी, उजवीकडील शिपायांच्या 'देवड्या' ओलांडाव्या लागतात. समोर उजवीकडे दोन्ही बुरुजांमध्ये हा चौथा 'चीनी' दरवाजा दिसतो. याही दरवाजांच्या वर आणि बुरुजांच्या वर सज्जे आणि सज्जातून शत्रूवर मारा करण्याची व्यवस्था दिसते. दरवाज्याच्या उजव्या बुरुजाला लागूनच सज्जावर जाण्याऱ्या पायऱ्यांची व्यवस्था दिसते. उजवीकडे एका जाळीबंद देवडीत किल्ल्यात सापडलेले वेगवेगळ्या आकाराचे तोफगोळे ठेवलेले दिसतात. तर डावीकडील एका देवडीत किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी तिकीट देण्याची व्यवस्था दिसते. माणसी १० रुपये तिकीट आकारले जाते. मोकळ्या वेळेत विचारल्यास, तिकीट कर्मचारी किल्ल्याबद्दल जुजबी माहिती सांगताना दिसतो. तिकीट खोली समोर रणमंडळात 'नौबत' दरवाज्याचे मूळ जीर्ण अवशेष रचून ठेवलेले दिसतात. त्या दरवाजाच्या लोखंडी पट्टीवरचे फुटभर लांबीचे टोकदार सुळे थक्क करतात. 

पाचवा दरवाजा समोरील देवड्या (Ausa Fort, Latur)
                      हा दरवाजा ओलांडून काटकोनात डावीकडे समोर आडव्या तटबंदीत भव्य पाचवा दरवाजा दिसतो. तटबंदीतून मारा करण्यासाठी तटबंदीत भरपूर दिवळ्या आणि जंग्यांची व्यवस्था दिसते. दरवाज्याकडे जाताना डावीकडे, दरवाजा समोर शिपायांच्या देवड्या दिसतात. हे सुद्धा इथपर्यंत पोहोचलेल्या शत्रूला घेरून मारा करण्याचं रणमंडळ (Battle field) दिसतं. 
भव्य बुरुजावर 'मेडिज टेलर'ची राहती वस्तू, खाली पीर थडगे आणि डावीकडे किल्ल्याचा सहावा दरवाजा (Ausa Fort, Latur)


चौथऱ्यावरील तोफा, बुरुज आणि सज्जे (Ausa Fort, Latur)
इशरत महाल (Ausa Fort, Latur)
                     पाचवा दरवाजा ओलांडून आल्यास समोर मोकळी जागा दिसते. त्यापलीकडे उजव्या बाजूला समोर दोन प्रचंड घेरांच्या बुरुजांमध्ये किल्ल्याच्या दुसऱ्या भव्य तटबंदीत सहावा दरवाजा दिसतो. दरवाज्याच्या उजव्या बुरुजालगत छोट्या खोलीत पीराचं थडगं आहे. याच बुरुजावर ब्रिटिश कमिशनर कर्नल 'मेडिज टेलर'ची राहती वास्तू दिसते. दरवाजाच्या डाव्या बाजूला कमरे इतक्या उंच चौथर्‍यावर किल्ल्यात सापडलेल्या वेगवेगळ्या बनावटीच्या नक्षीदार दहा तोफा मांडून ठेवलेल्या दिसतात. त्यात गाड्यावर मांडलेली एक पंचधातूची दुर्मिळ तोफही दिसते. डावीकडे किल्ल्याच्या दोन्ही तटबंदीतून जाणारा रस्ता दिसतो. तो पूर्ण १३ एकर किल्ल्याला वळसा मारून उजवीकडे दिसणाऱ्या दरवाजातून पुन्हा याच दरवाजा जवळ येऊन मिळतो. 
डावीकडे राणी महाल (Ausa Fort, Latur)
                       डाव्या बाजूच्या दोन्ही तटबंदी मधून गडफेरी केल्यास डाव्या बाजूस एक कमानीवजा दरवाज्याची इमारत दिसते. त्यास 'राणी महल' म्हटलं जातं. कदाचित दोन्ही तटबंदीत असल्यानं ते किल्लेदाराचं राहण्याचं ठिकाण असावं. त्यापुढेच बाह्य तटबंदी लगत 'इशरत महल' नावाची वास्तू दिसते. इशरत महलच्या चौकटीवर फारशी शिलालेख दिसतो. या महालाच्या डाव्या कोपऱ्यात सौच्च कुपाची (Toilet Pot) व्यवस्था दिसते. याचे उत्सर्जन (Outlet) खंदकात सोडलेले दिसते. किल्ल्याच्या नांदत्या काळात ही एखाद्या अधिकाऱ्याची निवासी वास्तू असावी. या दोन्ही इमारतीवर छप्पर दिसत नाही. इथे किल्ल्याच्या या बाह्य तटबंदीवर असलेल्या चर्या आणि जंग्यांमधून खंदकापलीकडे समोर दिसणारा लोहबंदी दरवाजा आणि डावीकडे दिसणाऱ्या नौबत दरवाजातून किल्ल्यात घुसणाऱ्या शत्रूवर मारा करता येतो.
बाह्य तटबंदीवरुन उजवीकडे खंदक आणि डावीकडे मुख्य तटबंदी, बुरुज (Ausa Fort, Latur)

                 पुढे किल्ल्याच्या बाहेरील तटबंदीवरील 'फांजी'वरून फेरफटका मारताना किल्ल्याची उजवीकडील भव्य उंचीची मुख्य तटबंदी, तटबंदीत ठेवलेल्या चर्या आणि जंग्या दिसतात. तटबंदीत ठिकठिकाणी डेरेदार घेराचे प्रचंड बुरुज दिसतात. बुरुजांवर बाहेर काढलेले सुंदर सज्जे आहेत. पुढे किल्ल्याच्या बाह्य खंदकाच्या परिघात घेतलेली अर्धचंद्राकृती 'चांद' विहीर दिसते. पुढे किल्ल्याच्या मागील बाजूस याच बाह्य तटबंदीच्या परिघात 'तवा' विहीर दिसते. 

मुख्य तटबंदीतील एका बुरुजावरील सज्जा (Ausa Fort, Latur)

चांद विहीर (Ausa Fort, Latur)
                    अतिशय खोल आणि विस्तीर्ण 'चांद' विहीर आणि 'तवा' विहीर उत्तम वास्तुशास्त्राचा नमुना आहेत. तवा विहिरीत उतरण्यासाठी बाह्य तटबंदीत ठेवलेल्या सुंदर कमानी दरवाजातून उतरणाऱ्या पायऱ्या दिसतात. सुरुवातीच्या 'नौबत' दरवाजा जवळील विहीर, 'चांद' विहीर आणि 'तवा' विहीर या सर्व अतिशय कल्पकतेने किल्ल्याच्या बाह्य खंदकाच्या परिघात सामावून घेतलेल्या आहेत. या भव्य, खोल विहीरी किल्ल्याला तसेच किल्ल्याच्या खंदकाला पाणीपुरवठा करत. 
तवा विहीर (Ausa Fort, Latur)

चांद विहीर (Ausa Fort, Latur)
 
तवा विहीरीत उतरणाऱ्या पायऱ्या (Ausa Fort, Latur)

तवा विहीरीचा कमानी दरवाजा (Ausa Fort, Latur)
                   










 







                  दोन्ही तटबंदीतून पुढे गेल्यास किल्ल्याच्या मागे पश्चिम आणि उत्तरेच्या बाह्य तटबंदीचा काही भाग उध्वस्त दिसतो.  दोन्ही तटबंदीत वर्षानुवर्षाचं जंगल माजलेलं दिसतं. सध्या जंगल तोडून तिथे पायवाटेची व्यवस्था केलेली दिसते. 
दोन्ही तटबंदीमधे वाढलेले जंगल, बाजूला खंदकात उतरणारा मार्ग
खंदकात उतरणारा मार्ग (Ausa Fort)
                            महाराष्ट्र शासन आणि पुरातत्व विभागाच्या सहकार्याने या तटबंदीची पुनर्बांधणी सुरू आहे. इथेच वाढलेल्या झुडपातून किल्ल्याच्या बाह्य तटबंदीतून खंदकात उतरणारा घडीव दगडी पायऱ्यांचा मार्ग दिसतो. सध्या या पायऱ्यांवर कचरा, माती आणि गाळ असल्याने पायऱ्या उतरून खाली खंदकाकडे जाणे अडचणीचे दिसते. किल्ल्याच्या या उत्तर तटबंदीवरुन औसा तालुक्याचा पसारा दृष्टीक्षेपात येतो. पुढे दोन्ही तटबंदीतून उजवीकडे वळून वाट पुन्हा सहाव्या दरवाजाच्या समोर चौथर्‍यावर मांडून ठेवलेल्या तोफांच्या ठिकाणी येते आणि दोन्ही तटबंदीतील फेरी इथे पूर्ण होते.
उत्तरेकडील बाह्य तटबंदीची दुरुस्ती (Ausa Fort, Latur)

घड्याळ दरवाजा (Ausa Fort, Latur)
घड्याळ दरवाजा (Ausa Fort, Latur)

 

किल्ले औसा (Ausa Fort, Latur)


घड्याळ दरवाजामागील उध्वस्त कमान (Ausa Fort, Latur)

                   पुढे किल्ल्यात जाण्यासाठी किल्ल्याच्या मुख्य दुसऱ्या तटबंदीत असणारा सहावा भव्य दरवाजा ओलांडावा लागतो. आत गेल्यास समोर आयताकृती उघड्या जागेच्या चौफेर बाजूने, गुडघाभर उंच व्हरांडा दिसतो. व्हरांड्यावर चारही बाजूंनी अनेक ओवऱ्यांची रचना असलेले प्रशस्त प्रांगण आहे. ओवऱ्यांच्या मागे खोल्या आहेत. इंग्रज राजवटीत हैदराबादचा निजाम या प्रांगणातून औसा तालुक्याचा कारभार चालवत असे. या प्रांगणाच्या दक्षिण कोपऱ्यात किल्ल्यात जाणारा 'घड्याळ' दरवाजा दिसतो. या दरवाजाच्या कमनिमागील काही भाग उध्वस्त असून सध्या त्याची पुनर्बांधणी चालू आहे. प्रांगणाच्या चारही बाजूस असलेल्या खोल्यांवर समतल छत (Slab) आणि मध्ये मोकळी जागा दिसते. किल्ल्याच्या नांदत्या काळात या मोकळ्या जागेत बाजार भरत असे आणि किल्ल्यातील महिला हव्या असलेल्या वस्तू छतावरून बघून खरेदी करत. 

                    सातव्या घड्याळ दरवाजातून किल्ल्यात जाणारी सिमेंटची बनवलेली वाट दिसते. ती किल्ल्याचे 'दारूकोठार', 'पाणी महाल' आणि किल्ल्याच्या पश्चिमेला असलेल्या 'कटोरा विहिरी'पर्यंत जाते. बाकी किल्ल्यात जंगल, प्रचंड फोफावलेले वृक्ष आणि उध्वस्त वास्तू दिसतात. तिकीट देणाऱ्या कर्मचाऱ्यास विचारल्यानंतर वरील वास्तूंचा ठिकाणा सांगतो. पण वाढलेल्या झुडूपांतून जमिनीखालील या वास्तूंचा संयमाने माग घ्यावा लागतो.

औसा किल्ल्यातील मस्जिद (Ausa Fort, Latur)

मुख्य तटबंदीवरुन दिसणारे किल्ल्यातील अवशेष 
           छत्रपतींच्या निधनानंतर संभाजी राजे मुघलांविरुद्ध आघाडी उघडतात त्यावेळी स्वतः औरंगजेब मराठ्यांचं राज्य चिरडण्यासाठी दक्षिणेत उतरतो. त्यावेळी औरंगजेब काही कालावधीसाठी औसाच्या किल्ल्यात आल्याच्या नोंदी सापडतात. त्याच्याच आज्ञेनुसार किल्ल्याचा 'सोहरब खान' हा किल्लेदार असताना किल्ल्यात मस्जिद बांधण्यात आली. 'घड्याळ' दरवाजा ओलांडल्यास उजवीकडे उध्वस्त वास्तूंच्या पलीकडे किल्ल्यातील ही छोटीशी मस्जिद दिसते.

                  किल्ल्याच्या डावीकडे मुख्य तटबंदीवर जाणाऱ्या पायऱ्या दिसतात. मुख्य तटबंदीच्या उंच 'फांजी'वरून किल्ल्याभोवती दुसरा फेरफटका मारता येतो. या तटबंदीवरून किल्ल्यातील विस्तीर्ण अंतर्गत परिसर, उध्वस्त वास्तू, मुख्य तटबंदीतील प्रचंड बुरुज, त्या बुरुजांवरील तोफा, किल्ल्यातील जलमहाल इत्यादी वास्तू झुडपांच्या आडून दिसतात.

मुख्य तटबंदीवरुन दिसणारे किल्ल्यातील अवशेष 
मुख्य तटबंदीवरुन दिसणारे किल्ल्यातील अवशेष 

                    मुख्य तटबंदीचे दगडी बांधकाम, त्यावर विटांच्या चर्या आणि या अवाढव्य मजबूत  चर्यांत जंग्यांची आणि दिवळ्यांची व्यवस्था दिसते. तटबंदीच्या 'फांजी'वरून चालताना बाह्य तटबंदी, तटबंदीच्या पलीकडे स्थानिकांनी खंदकात केलेली शेती, चांद विहीर, तवा विहीर तसेच खंदकाची बाह्य भिंत 'रेवणी' दिसते. खंदकाच्या 'रेवणी'ला खंदकाच्या बाहेरील बाजूस उतार दिल्यामुळे खंडकापलीकडून शत्रूने किल्ल्यावर केलेल्या  तोफमारेचा अंदाज पुरता चुकत असे.  
बुरुजावरील तोफेच्या बाजूला दिसणारा पाण्याचा हौद (Ausa Fort, Latur)

बांगडी तोफ  (Ausa Fort, Latur)
                 किल्ल्याच्या या तटबंदी वरून चालताना भव्य बुरुजांवर ठेवलेल्या वेगवेगळ्या आकाराच्या आणि घडणीच्या मोठमोठ्या तोफा दिसतात. त्यात 'मगर मुखी' तोफ' 'बांगडी' तोफ, तर काही 'ओतीव' तोफा दिसतात. 
बुरुजावरील ओतीव तोफ  (Ausa Fort, Latur)

पंचधातूची स्पॅनिश तोफ (Ausa Fort, Latur)
               किल्ल्याच्या आग्नेय बुरुजावर 'स्पेन' देशात बनवलेली पंचधातूची प्राचीन दुर्मिळ तोफ आहे. या तोफेच्या तोंडावर 'स्पेन' देशाच्या राष्ट्रध्वजात असलेले चिन्ह (Logo) दिसतं. पोर्तुगीजांकडून ही तोफ बहामनी किंवा आदिलशाही सुलतानांच्या काळात विकत घेऊन या किल्ल्यावर स्थापित केलेली दिसते. या तोफांचा आवाज आणि विध्वंस करण्याच्या ताकदीची सहज कल्पना करता येते. काही समाजकंटकांकडून या दुर्मिळ तोफेचे तुकडे तोडल्यामुळे सध्या ती लोखंडी पिंजऱ्यात बंदिस्त करून ठेवली आहे.

तोफेवरील स्पॅनिश लोगो (Ausa Fort, Latur)

मगरमुखी तोफ  (Ausa Fort, Latur)
Ausa Fort, Latur
 
    
बुरुजावरील तोफेला थंड करण्यासाठी पाण्याचा हौद (Ausa Fort, Latur)

दोन्ही तटबंदीतील परकोट आणि किल्ल्याची मुख्य तटबंदी  (Ausa Fort, Latur)

                युद्धकाळात तोफ डागल्यानंतर त्या प्रचंड गरम होत. गरम तोफेत पुन्हा लगेच दारुगोळा भरणे धोक्याचे असे. त्या थंड करण्यासाठी बुरुजांवरील हौदात पाणी साठवून ओल्या कपड्याने त्या थंड केल्या जात. किल्ल्याच्या या मुख्य तटबंदीतील प्रत्येक बुरुजांवर तोफांच्या बाजूला गोलाकार, चौकोनी, षटकोनी, अष्टकोनी आकाराचे हौद जमिनीत ठेवलेले दिसतात. किल्ल्याच्या बाहेरील तटबंदीत २३ आणि आतील तटबंदीत १९ असे एकूण ४२ लढाऊ बुरुज किल्ल्यास आहेत. 

मुख्य तटबंदीतील बुरुज, चर्या आणि जंग्या (Ausa Fort, Latur)

 
भूमिगत कोठार, किल्ले औसा (Ausa Fort, Latur)
कोठारातुन दिसणारा मार्ग , किल्ले औसा (Ausa Fort, Latur)

कोठारात उतरण्याचा मार्ग, किल्ले औसा (Ausa Fort, Latur)

                     किल्ल्याच्या दक्षिण घड्याळ दरवाज्यापासून किल्ल्यात येणारी वाट पुढे उजव्या बाजूस दिसणाऱ्या कोठाराकडे जाते. भूमिगत तळघरासारखी बांधणी असलेल्या या प्रचंड कोठाराच्या मागील बाजूस कोठारात उतरणाऱ्या पायऱ्या दिसतात. कोठराच्या बाहेर डावीकडून कोठराच्या गच्चीवर जाणाऱ्या पायऱ्या दिसतात. या कोठाराचा किल्ल्यातील धान्य किंवा दारुगोळा साठवण्यासाठी उपयोग केला जात असावा. 
  
जल महाल, किल्ले औसा (Ausa Fort, Latur)
                    कोठाराच्या समोरच किल्ल्यातील वैशिष्ठ्यपूर्ण 'जल महाल' दिसतो. आयताकृती आकाराचा गुडघाभर खोल पाणी साठवण्याचा हा तलाव दिसतो. सध्या तलाव कोरडा दिसतो. ठीक ठिकाणी झरोक्यांची सोय असलेल्या या भूमिगत वास्तूच्या उजव्या कोपऱ्यात लोखंडी जाळीचे झाकण दिसते. झकाणाखाली वास्तूत उतरण्यासाठी चिंचोळ्या पायऱ्यांचा मार्ग आहे. आत उतरून गेल्यास जवळ जवळ ७० फूट लांब आणि ४५ फूट रुंदीचा भव्य भूमिगत मंडप दिसतो. या वास्तूला अनेक खांबांचा आधार दिला आहे. लातूर सारख्या कमी पावसाच्या, कोरड्या वातावरणातील प्रदेशात वर असलेल्या उथळ तलावात पाणी साठवून जमिनीखालील महालात थंडावा निर्माण केला जात असे.
कटोरा विहीर, उजवीकडे रहाट व्यवस्था आणि डावीकडे पाणी साठवण्याची जागा (Ausa Fort, Latur)

बहुमजली कटोरा विहीर (Ausa Fort, Latur)

उजवीकडे दिसणारा कटोरा विहिरीत उतरण्याचा मार्ग (Ausa Fort, Latur)
                  या जलमहालाच्या पुढेच नैऋत्य कोपऱ्यात किल्ल्याच्या वैभवाचं प्रतीक असलेली 'कटोरा विहीर' दिसते. षटकोनी आकाराची बहुमजली ही विहीर दिसते. विहिरीच्या मागील बाजूने कमानीवजा दरवाजातून विहीरीच्या प्रत्येक मजल्यावर उतरणाऱ्या पायऱ्या आहेत. खोलवर असलेल्या या विहिरीला पाणी उपसण्यासाठी पूर्वीची 'रहाट' व्यवस्था दिसते. तसेच उपसलेलं पाणी बाजूच्या वास्तूत साठवून ठेवण्याचीही व्यवस्था दिसते. हे साठवलेलं पाणी किल्ल्यात ठिकठिकाणी 'खपारी' (खापरी, मातीपासून बनवलेले) नळातून पुरवठा केलं जात असे. सध्या विहिरीत उतरणाऱ्या पायऱ्यांवर कचरा तसेच वाढलेली झुडूपं असल्यानं आत प्रयत्न करूनही उतरता येत नाही. 

              १६३६ ते १७२४ या दीर्घ कालखंडात किल्ल्यावर मुघलांची सत्ता राहिली. १७२४ नंतर मुघलशाही खिळखिळी होत असता मुघलांचा हैदराबादचा सुभेदार निजाम स्वतःची निजामशाही स्थापन करून सत्ता हातात घेतो. त्यावेळी औसा किल्ला हैद्राबाद निजामाच्या ताब्यात जातो. 

किल्ले औसाच्या प्रवेश दारांची दिसणारी गुंतागुंतीची रचना (Ausa Fort, Latur)


खंदकात उतरणारा पण सध्या बुजलेला मार्ग (Ausa Fort, Latur)

                 १७६० साली मराठ्यांचे सदाशिव (भाऊ) पेशवे आणि हैदराबादचा निजाम यांच्यामध्ये झालेल्या 'उदगीर'च्या तुंबळ लढाईत निजाम सपाटून मार खातो. त्यावेळी निजामाशी झालेल्या उदगीर'च्या तहात उदगीर, औसा आणि विजापूर मराठी साम्राज्यात आले. पण त्यानंतर लगेचच भाऊंच्या नेतृत्वाखाली झालेल्या पानिपतच्या लढाईत मराठ्यांच्या पराभवानंतर मराठ्यांची लष्करी ताकद कमकुवत झाली. आणि विजापूर वगळता निजामाने पुन्हा उदगीर आणि औसा किल्ले ताब्यात घेतले. १९४८ पर्यंत औसा आणि आजूबाजूचा परिसर हैदराबाद निजामाच्या ताब्यात राहिला. वर सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे हैद्राबाद संस्थान १७ सप्टेंबर १९४८ मध्ये स्वतंत्र भारतात विलीन झाल्यानंतर औसा आणि पर्यायाने लातूर महाराष्ट्र राज्यात आले.

                 इतिहासाच्या उलथापालथीत किल्ल्याने दीर्घकाळ इस्लामिक सत्ता अनुभवली. किल्ल्याच्या त्या त्या काळात केलेल्या दुरुस्त्यांमुळे किल्ल्याच्या वास्तू, दरवाजांना इस्लामिक नावे रूढ झालेली दिसतात. 

                  जमिनीवरील हा भुईकोट 'किल्ले औसा' जिंकण्यास सोपा वाटत असला तरी, खंदकाच्या बाह्य उताराची 'रेवणी', किल्ल्या सभोवतीचा दलदलीचा खोल रुंद खंदक, किल्ल्याच्या दोन्ही उंच अभेद्य तटबंद्या, त्या तटबंदीतील सैनिकी हालचालींना वाव देणारे प्रचंड विस्ताराचे बुरुज तसेच 'औसा'च्या सर्व सातही दरवाजांची लष्करी दृष्ट्या गुंतागुंतीची ठेवलेली रचना आणि प्रत्येक दरवाजा अंतर्गत असणारे 'रणमंडळ' (Battle field's) हे सर्व नक्कीच विचार करायला भाग पाडणारे आहेत..

                                                 || श्री कृष्णार्पणमस्तु ||

येथे - जयवंत जाधव 

9 comments:

  1. अप्रतिम छायाचित्र आणि छान लिखाण माहिती सहित .... खुप सुंदर दादा . - varsha

    ReplyDelete
  2. खूप छान वर्णन जणू काही आपण स्वतः जाऊन आल्यासारखे वाटले. धन्यवाद मित्रा!

    ReplyDelete
  3. अप्रतिम लेखन व फोटोज्. जिवंत वर्णन वाटत. खरंच खूप छान माहिती मिळाली.

    ReplyDelete
  4. भुईकोट औसाची फोटो आणि माहिती मस्त मिळाली. या वेळी एकदम लातूर गाठलं. मस्त आवडले. शुभेच्छा 💐👌

    ReplyDelete
  5. Khup Chhan mahiti.अप्रतिम छायाचित्र आणि छान लिखाण माहिती सहित .... खुप सुंदर

    ReplyDelete
  6. खूप छान

    ReplyDelete
  7. Yekadam Chan mudesud likhan kela aahe Chan

    ReplyDelete
  8. सदर किल्ला व आजुबाजुचा परीसर यांची पुरेपूर माहिती छायाचित्रांसह दिल्यामुळे वाचन करताना प्रत्यक्ष किल्ल्याचे चित्र व प्रसंग डोळ्यांसमोर उभा राहतो...
    आपण गड किल्ले सर करून लोकांपर्यंत हि अनमोल माहिती व अमुल्य ठेवा पोहोचवत आहात हे खुप महान कार्य आहे...
    आपणांस पुढिल वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा. आपला उत्साह असाच वृद्धिंगत होत राहो.
    नवीन उपक्रम व स्वप्ने साकार होवोत हिच जगदंबेचरणी प्रार्थना...

    ReplyDelete

ऑफबीट - खरोसा लेणी, निलंगा, जि. लातूर Offbeat - Ancient Kharosa caves, Dist. Latur, Maharashtra.

                        महाराष्ट्रात वैशिष्ट्यपूर्ण अशी बरीच लेणी आहेत. काहींची प्रसिद्धी तर जगभर पोहोचली आहे. त्यांची कोरीव कलाकुसर आजही थक...