Monday 22 January 2024

कृष्णेच्या 'बहे' बेटावरील प्राचीन 'रामलिंग' आणि समर्थ स्थापित मारुती, वाळवा, जि. सांगली. - Bahe's Ancient Ramling and Hanuman Temple, Dist. Sangali, Maharashtra.

                    सतराव्या शतकात श्री समर्थ रामदासांनी अनेक ठिकाणी मारुती मंदिरांची स्थापना केली. विशेषतः सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात स्थापन केलेल्या मंदिरांपैकी चाफळ मधील दोन, उंब्रज, पारगाव, शहापूर, मसूर, बत्तीस शिराळा, शिंगणवाडी, माजगांव, 'बेट बोरगांव' आणि मनपाडळे अशी आकरा प्रमुख मंदिरं मानली जातात. 'बेट-बोरगांव'(बेट-बहे) चा मारुती त्यापैकी एक. इतर मारुती मंदिरांच्या तुलनेत बोरगांवचा मारुती आणि श्री रामांनी स्थापन केलेले इथल्या बेटावरील प्राचीन 'शिवलिंग' यांचे धागे एकमेकांशी जुळतात.  

 'रामलिंग' मंदिर. बेट-बहे. ता. वाळवा. जि. सांगली (Bahe Ramling and Hanuman Temple)
                   रावण वधानंतर श्रीरामचंद्र, माता सीता आणि लक्ष्मण लंकेहून अयोध्येला परतले. जाताना कृष्णेकाठी स्वहस्ते शिवलिंग तयार करून श्री रामचंद्रांनी त्याचे पूजन केले. रावणाचे पिता 'विश्रवा' हे 'पौलस्त्य' ऋषींचे पुत्र. ते ब्रह्मदेव कुलीन ब्राह्मण कुळातील होत. त्या अनुषंगाने श्री रामांनी रावण (ब्राह्मण) वधाच्या पातकाचं परिमार्जन कृष्णेकाठी घेतले अशीही अख्याईका सांगितली जाते.
                   कृष्णेकाठी श्रीरामचंद्र ध्यानसाधनेत असताना त्यांच्या भेटीसाठी कृष्णा आली आणि तिच्या पाण्याची पातळी अचानक वाढली. त्यांच्या साधनेत खंड पडू नये म्हणून भक्त हनुमानाने विराट रूप धारण करून कृष्णेचा प्रवाह दोन्ही बाहुंनी थोपवून धरला. थोपवून धरल्यामुळे या ठिकाणी कृष्णेचे नदीपात्र विभागून पुढे पुन्हा एकत्र मिळतं. इस्लामपूर पासून उत्तरेला १५ किमी आणि सातारा जिल्ह्यातील कराड पासून अग्नेयेला २३ किमी अंतरावर बोरगावला कृष्णेच्या दक्षिण प्रवाही पात्रात या घटनेमुळे 'बेट' निर्माण झाले आहे.
                   मुंबई, पुण्याहून येताना कराड शहरात मुख्य बेंगलोर हायवेला डावं आणि त्यापुढे लगेच वाठार - रेठरे फॅक्टरीला उजवं वळण घेऊन पुणे बेंगलोर हायवेला समांतर जाणारा रस्ता कोळे नृसिंहपूरहून 'बेट बोरगांव'ला येतो. इस्लामपूरहून इथे बसेसची सोय आहे. खाजगी किंवा स्वतःचं वाहन असणाऱ्या कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि पुढे कर्नाटकाकडील पुणे, मुंबईकरांना जाता-येता तासाभरात इथे सहज भेट देता येते.   
पुलाच्या डाव्या बाजूचा 'बहे' बेटाकडे जाणारा बंधारा (Bahe Ramling and Hanuman Temple)
                      कोळे नृसिंहपुर पासून कोल्हापूरकडे येताना दोन किमीवर कृष्णेच्या रुंद पात्रावर पुल दिसतो. या पुलाच्या बाजूलाच उजवीकडे कमी उंचीचा बंधारा आहे. तर डावीकडे कृष्णेच्या पात्रात हे बेट दिसते. कृष्णेचा मुख्य पुल न ओलांडता पुलाच्या उजव्या बाजूने या बंधाऱ्यापर्यंत जाता येते. बंधाऱ्याच्या तोंडावरच निःशुल्क पार्किंगची जागा आहे. बंधाऱ्याच्या मध्यावर नदीपात्रातून काटकोनात डावीकडे वळून पुलाखालून तयार केलेला रस्ता 'बहे' बेटाकडे घेऊन जातो. 
 'बहे' बेटाकडे जाणारा रस्ता (Bahe Ramling and Hanuman Temple)

नदीपात्रातून 'बहे' बेटाकडे जाणारा रस्ता (Bahe Ramling and Hanuman Temple)

 'बहे' बेटाकडे जाणारा रस्ता (Bahe Ramling and Hanuman Temple)

बेटावरील उंच जोत्यावर दिसणारी मंदिरे  (Bahe Ramling and Hanuman Temple)
 'रामलिंग' आणि मारुती मंदिराकडे जाणारी प्रवेशदार कमान. बेट-बहे (Bahe Ramling and Hanuman Temple)

                     सरासरी एक दिड किलोमीटरच्या या बांधीव दगडी रस्त्याच्या दुतर्फा नदीपात्र सोडल्यास सुशोभीकरण केले आहे. त्यात गुलमोहोराची झाडे प्रकर्षाने दिसतात. इतर झाडे प्रतिवर्षी पुरामुळे टिकत नसावीत. मंदिराच्या आजुबाजूस उंच बेटावर मात्र बऱ्याच प्रकारची मोठमोठी झाडे दिसतात. या रस्त्यावरून जाताना उजवीकडे उंच दगडी जोता दिसतो. दुरून या बेटाच्या जोत्यावरील पाठमोरी मंदिरं दिसतात. जोत्याला उजवा वळसा मारल्यास समोर पायऱ्या आणि पायऱ्यांच्या वर मंदिराची दगडी कमान दिसते. कमान ओलांडल्यास उजवीकडे रामलिंग मंदिर आणि त्यामागे समर्थ स्थापित हनुमान मंदिर दिसतं. मंदिरात श्रीराम स्थापित शिवलिंग आहे. शिवलिंगावर सात फण्यांच्या नागदेवतेनं सावली धरली आहे. मागे माता सितेसह प्रभू रामचंद्र, लक्ष्मण आणि वीर मारुती स्वस्वरुप स्थापित आहेत.

 'रामलिंग' बेट-बहे. ता. वाळवा. जि. सांगली (Bahe Ramling and Hanuman Temple)

 'रामलिंग' मंदिरासमोरील नंदी दाराची मुख्य कमान. बेट-बहे (Bahe Ramling and Hanuman Temple)
श्रीराम स्थापित प्राचीन 'रामलिंग' बहे. ता. वाळवा. जि. सांगली (Bahe Ramling and Hanuman Temple)
                     श्री रामचंद्रांनी स्थापन केलेले शिवलिंग म्हणुन त्यास प्राचीन 'रामलिंग' म्हणून ओळखले जाते. पूर्वी इथे लहान मंदिर असावे. पण सध्या दिसणारं मंदिर हे चौदाव्या शतकातील आहे. विटा आणि चुन्याचा वापर केलेलं प्रशस्त ओवऱ्यांचं हे मंदिर आहे. सध्या मंदिराच्या बाह्य भिंतींना प्लास्टर करून मंदिर रंगवलेलं दिसतं.
                    सतराव्या शतकात रामभक्त आणि मारुतीचे उपासक श्री 'समर्थ रामदास' या बेटावर आले. ज्या अर्थी या बेटाला श्री रामाचे पाय लागले आहेत तर त्याचा निस्सीम भक्त हनुमानाचे अस्तित्व या ठिकाणी नक्कीच असले पाहिजे असे त्यांना वाटले. ध्यान साधनेतून समर्थांना तशी स्पंदने जाणवली. 'कुंभका'चा त्यांना चांगला अभ्यास असल्यानं ते पाण्याखाली दीर्घकाळ राहू शकत. त्यांनीच ही मूर्ती पाण्यातून शोधून बाहेर काढली आणि या प्राचीन रामलिंग मंदिराच्या बरोबर मागे स्थापन केली. जवळ जवळ सहा फुट उंच असलेल्या आणि समर्थांनी स्थापन केलेल्या प्रसिद्ध आकरा मारुतीपैकी हा विशेष एक आहे. मारुतीचे दोन्ही हात मोकळे निशस्त्र असून कृष्णेचा प्रवाह रोखण्यासाठी अधोगामी बाहू पसरलेले दिसतात.
श्री समर्थ स्थापित आकरा मारुतींपैकी एक मारुती, बहे (Bahe Ramling and Hanuman Temple)
श्री समर्थ स्थापित मारुती मंदिर आणि उजवीकडे श्री गणेश मंदिर, बहे (Bahe Ramling and Hanuman Temple)

मारुती मंदिर, बहे (Bahe Ramling and Hanuman Temple)
                    भक्त मारुतीने आपल्या बाहूंनी प्रवाह अडवल्यामुळं बेट तयार झाले. प्राचीन काळी या क्षेत्राला 'बाहोक्षेत्र', 'बाहे' इत्यादी नावाने ओळखले जात असे. सध्या बोरगांवला 'बेट-बहे',  'बहे-बोरगांव' ही नांव रूढ आहेत. 'बहे' चा अर्थ भुजा, बाहू असा आहे. या ठिकाणाचा उल्लेख कृष्ण महात्म्य तसेच श्रीधरस्वामीनी लिहिलेल्या वाल्मिकी रामायणातही सापडतो.             
                    मूळ मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या या मारुती मंदिराच्या उजवीकडे गणेश मंदिर दिसतं. गणेश मूर्ती सुंदर, आकर्षक आहे. मंदिर परिसरात आणखी एक जुनं महादेव मंदिर आहे. त्यातील शिवलिंग मात्र प्राचीन असावं. मंदिर आवारात तीन चार टपऱ्याही दिसतात.  १९७०-७२ च्या आसपास इथे जोगळेकर महाराज आले होते. त्यानंतर बापू बिरू वाटेगावकरही आले. 'बापू बिरुं'नी त्यांचा अनुग्रह (शिष्यत्व) घेतला होता असं सांगितलं जातं. मंदिराचे पुजारी श्री लक्ष्मण दत्तात्रय बडवे येणाऱ्या भक्तांना या दोन्ही मंदिरांची माहिती देत असतात.
 
रामलिंग, मारुती मंदिर परिसर, बहे (Bahe Ramling and Hanuman Temple)

                   मंदिर परिसर शांत, निवांत आहे. दोन्ही बाजूंनी कृष्णा खळाळते आहे. स्थानिक, कौटुंबिक तसेच शालेय सहली इथे येताना दिसतात. प्रतिवर्षी कृष्णेच्या पुरातून वाहून आलेला गाळ आणि बेटावरील प्लास्टिकचा कचरा ही इथली समस्या आहे. तो काढण्यासाठी 'शिवसंकल्प प्रतिष्ठान' बेटावर स्वच्छता, साफसफाईचे अभियान राबवत असतात. त्यांना 'कामगार संघटना' इस्लामपूर, 'जगदंब ट्रेकर्स' इस्लामपूर, आणि 'बहे'चे ग्रामस्थ वेळोवेळी साथ देताना दिसतात.
 
बेट बहे (Bahe Ramling and Hanuman Temple)

                   इथून दोन किमी उत्तरेला दोन हजार वर्षापूर्वी कौंडिण्यपुरचा राजा भिमदेव यांनी कृष्णेच्या डोहातून बाहेर काढलेली श्री नृसिंहाची दुर्मिळ, प्राचीन मूर्ती कोळे नृसिंहपुरला आहे. कोळे नृसिंहपुर आणि श्री हनुमानाची स्वामीभक्ती सांगणारे कृष्णेच्या पात्रातील हे बेट अगदी एकमेकांच्या जवळ आहेत. विष्णू आवतारांची महती असलेल्या या दोन्ही धार्मिक आणि प्राचीन ठिकाणांना एकदा सहज भेट देता येईल..
                   
        कोळे नृसिंहपुरची प्राचीन मूर्ती आणि मंदिराबद्दल माहिती देणारा लेख - https://sahyadri300.blogspot.com/2023/10/shri-kole-nrisinhpur-valva-dist-sangli.html

                                                             || श्री कृष्णार्पणमस्तु ||


येथे - जयवंत जाधव

5 comments:

  1. 🙏👍.........

    ReplyDelete
  2. Very nice informations

    ReplyDelete
  3. नाद निर्मितो मंगल धाम, श्री राम जय राम जय जय राम 🙏🏻
    खूप छान संक्षिप्त माहिती मित्रा..👏💐

    ReplyDelete
  4. जयवंत मित्रा, खूप छान माहिती, धन्यवाद!

    ReplyDelete
  5. माझे बाजूला कालवडे गांव. आम्ही दरवर्षी बहेला भेट देतो. तुम्ही लिहिलेला लेख वाचून खूप बरे वाटले. छान सविस्तर माहिती मिळाली. 👌
    --- श्री जयवंत गाडे

    ReplyDelete

ऑफबीट - खरोसा लेणी, निलंगा, जि. लातूर Offbeat - Ancient Kharosa caves, Dist. Latur, Maharashtra.

                        महाराष्ट्रात वैशिष्ट्यपूर्ण अशी बरीच लेणी आहेत. काहींची प्रसिद्धी तर जगभर पोहोचली आहे. त्यांची कोरीव कलाकुसर आजही थक...