Sunday 15 October 2023

श्रीक्षेत्र कोळे नृसिंहपुर, ता. वाळवा, सांगली - Shri Kole Nrisinhpur, Walva, Dist. Sangli

                       मागील वर्षी भीमा निरेच्या पवित्र संगमावरील श्री लक्ष्मीनृसिंह मंदिराची भेट झाली. त्यानंतर या वर्षी सांगलीच्या वाळवा तालुक्यातील इस्लामपूर जवळ 'श्री कोळे नृसिंह' या अद्भुत स्थापत्य शैलीच्या प्राचीन मंदिराला भेटण्याचा योग आला. नृसिंह मंदिरांपैकी पश्चिम महाराष्ट्रातील कोळे नृसिंह, निरा नृसिंह आणि धोम नृसिंह ही मंदिरं पुरातन आहेत. त्यापैकी कोळे नृसिंहपुरला कृष्णेकाठी १४ फूट खोल भुयारात स्थापलेली नृसिंहाची शोडस मूर्ती आहे. गंडकी (Brimstone) शिळेतील  मूर्तीचं सौंदर्य आणि हेमाडपंथी मंदिराची त्रिस्तरीय अद्भुत स्थापत्यशैली बघण्यासारखी आहे. महाराष्ट्र आणि बाहेरील बऱ्याच भाविकांची ही स्फूर्तिदेवता कुलदैवत आहे.

                      इस्लामपूर पासून उत्तरेला १३ किमी आणि सातारा जिल्ह्यातील कराड पासून अग्नेयेला २१ किमी अंतरावर हे पुरातन मंदिर आहे.

श्री नृसिंह, श्रीक्षेत्र कोळे नृसिंहपूर 
                     इस्लामपूरहून इथे नियमित एसटी बसेसची सोय आहे. खाजगी किंवा स्वतःचं वाहन असणाऱ्या कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि पुढे कर्नाटकाकडील पुणे, मुंबईकरांना जाता - येता इथे सहज भेट देता येईल. या मंदिरापुढेच अगदी दोन किमीवर कृष्णेच्या दक्षिण प्रवाही, विस्तृत पात्रातील 'बहे'च्या बेटावर श्रीराम स्थापित प्राचीन शिवलिंग आणि श्री समर्थ रामदासांनी स्थापन केलेल्या मारुतीलाही भेट देता येते.
                   आणि थोडी अधिक तयारी असल्यास या नृसिंह मंदिराआधी येताना अवघ्या ५ किमीवर रस्त्याच्या डाव्या बाजूलाच डोंगरावर दिसणारा मच्छिंद्रगडही करता येईल.

                   मुंबई, पुण्याहून येताना कराड शहरात मुख्य बेंगलोर हायवेला डावं आणि त्यापुढे लगेच वाठार - रेठरे फॅक्टरीला उजवं वळण घेऊन पुणे बेंगलोर हायवेला समांतर जाणारा रस्ता कोळे नृसिंहपूरला येतो. पुढे बोरगावच्या 'बेट बहे' मारुतीच दर्शन घेऊन पुन्हा बेंगलोर हायवेवरून कोल्हापूरला येता येतं. किंवा आल्या पावली पुन्हा पुणे मुंबईकडे वळता येतं.

कृष्णा नदी, कोळे नृसिंहपूर

श्री नृसिंह मंदिर नवीन सभामंडप 


पूर्व प्रवेश दारामागून दिसणाऱ्या देवड्या
                   दुसऱ्या शतकात 'कौडिण्यपुर'चा राजा (सध्या 'तासगाव' तालुक्यातील 'कुंडल' गांव) 'भीमदेव'नं ही प्राचिन श्रीनृसिंह मूर्ती कृष्णेच्या डोहातून बाहेर काढली.

                   या मुर्तीची कथा रोचक आहे. महाभारत लिहिणारे वेद 'व्यासां'चे पिता 'पराशर' ऋषी कृष्णेकाठी दंडकारण्यात होते. त्यांनी नृसिंह दर्शनाची मनीषा धरून श्री विष्णूंची आराधना केली. श्री विष्णूंनी शोडसभुजा(सोळा हात), उग्रतेजस्वी, कृद्ध, भूमंडळ हादरवणारं आणि तोंडातून अग्निज्वाला निघणारं नृसिंहरूप दाखवलं. त्यांनी श्री नृसिंहाची मनोभावे पूजा केली. भूतलाला न पेलवणारं देवाचं हे मानस रूप त्यांनी कृष्णेच्या डोहात विसर्जित केलं.
                  काळ लोटला. कर्नाटकातील 'अंजन' गावचं एक शापित ब्राम्हण कुटुंब कृष्णेकाठी आश्रम बांधून श्री विष्णूंची आराधना करू लागले. जवळ जवळ बारा वर्ष त्यांनी तिथे उपासना केली. श्री विष्णूंनी त्यांस दृष्टांत देऊन राजा भीमदेवच्या मदतीनं कृष्णेच्या डोहातील ही मूर्ती बाहेर काढण्यास सांगितले. मूर्ती कशी सापडेल तेही सांगितले. ब्राह्मण पती-पत्नीच्या सांगण्यावरून उत्सुकतेपोटी राजा भीमदेव नावाड्यांना घेऊन कृष्णेच्या पात्रात उतरला. नावेतून सुकलेल्या तुरकाट्यांची एक एक पेंडी पाण्यात सोडत शोध सुरू झाला. ज्या ठिकाणी पेंडी पाण्यात पेट घेईल त्या ठिकाणी मूर्तीचं अस्तित्व सापडणार होतं. पेंडीनं पेट घेतलेल्या ठिकाणी नृसिंह मूर्ती सोबत आणखी चार मुर्त्या सापडल्या.
                 त्या मुर्तीपैकी तंबव्याला केशवराजाची मूर्ती, कोळे गावात कोळजाई, रेठऱ्याला पिंपळाई देवीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. पाचवी मूर्ती तोंडातून ज्वाळा निघणाऱ्या मारुतीची निघाली. ज्वालाग्राही मारुतीची उपासना झेपणार नसल्यामुळे ती पुन्हा कृष्णेत विसर्जित करण्यात आली. पुढे या घटनेमुळे  'कोळे' गावास 'ज्वाला नृसिंहपुर' हे दुसरे नांवही रूढ झाले.
                  सापडलेल्या मूर्तींची स्थापना कृष्णे काठी जंगलात न करता आपल्या राज्यात करावी हा राजाचा हेतू होता. पण त्यानंतर देव दृष्टांतानुसार राजानं नृसिंह मूर्ती कृष्णेकाठीच स्थापण केली. तिथं लहान मंदिर बांधलं. राजाने त्या ब्राह्मण दांपत्यास तिथेच राहण्यास सांगितले. मूर्तीची पूजाअर्चा व मंदिराच्या देखभालीसाठी राजाने कोळे, मच्छिंद्रगड, येडे शिर्डी या गावातील काही जमिनी त्यांना दान दिल्या. ही घटना सरासरी इ.स. दुसऱ्या शतकातील १७८ ला घडली. कोळे नृसिंहपुर जवळ असलेल्या 'सागरेश्वर  महादेव' देवस्थानाची माहिती आणि महती सांगणारी 'समुद्रेश्वर महात्म्य' या पोथीतील या राजा भिमदेवचा सातवा पूर्वज 'भिष्मक' राजा होता.  
                  'कौंडिण्यपुर' आणि  'भीमदेव'चा पूर्वज राजा 'भिष्मक' यांचा उल्लेख आल्यामुळे इथे नमूद करावेसे वाटते की, श्रीकृष्ण पत्नी माता 'रुक्मिणी'देवी यांचं 'कौंडिण्यपूर' हे माहेर. राजा भीष्मक रुक्मिणीचे पिता. रुक्मिणी स्वयंवराच्या नाट्यमय प्रसंगावेळी श्रीकृष्ण हे दंडकारण्य ओलांडून दक्षिणेला आले होते. तर कंस वधानंतर चिढलेल्या कंसाचे सासरे जरासंध आणि शिशुपाल यांना पाठीवर घेत हेच दंडकारण्य पहिल्यांदा ओलांडले होते. श्रीकृष्णाच्या मथुरेवर जरासंधाने केलेल्या त्यावेळच्या सतराव्या आक्रमणाचं शेपूट पार दक्षिणेपर्यंत ताणलं गेलं होतं. आणि त्यामुळेच नंतर मथुरावासींची जरासंधाच्या जाचातून सुटका करण्यासाठी 'द्वारका' निर्माण झाली. त्यावेळी भगवान परशुरामांनी श्रीकृष्णांना 'सुदर्शन' बहाल केलं. पुढे 'पद्मावत' राज्यांतर्गत करवीर (कोल्हापूर) नगरीचा उन्मत आणि उद्धत झालेल्या 'शृगाल' राजावर श्रीकृष्णांनी प्रथमच सुदर्शन यंत्रचक्राचा प्रयोग केला होता.
                   चौथ्या विष्णू अवतारातील श्री नृसिंह आणि नवव्या अवतारातील श्रीकृष्ण तसेच श्रीकृष्णांचे सासर कौंडण्यपूरचे वंशज राजा भिमदेव या तिन्ही गोष्टींचा योग मिलाप या स्थळाशी असल्यामुळं हे सर्व इथे मुद्दाम अधोरेखित केले आहे. सह्याद्रीतील गड किल्ले, लेण्यांबरोबरच इथल्या देवभूमीतील प्राचीन मंदिरं आणि त्यांचा इतिहास या कारणांसाठीच मांडला जातो. गायला जातो.
                   सध्या दिसणाऱ्या इथल्या हेमाडपंथी शैलीच्या या मंदिराची उभारणी ज्ञानेश्वरांच्या समकालीन यादव काळात इ.स.१२६० ला झाली. यादवांचं श्री नृसिंह हे कुलदैवत. देवगिरीचा राजा 'रामदेवराय'चा प्रधान 'हेमाद्री' (हेमाड) यांनी त्यांच्या 'हेमाड' शैलीत उभारलेल्या बऱ्याच मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे. भूयाराच्या पहिल्याच पायरीवर दिसणारा 'भानू तुकदेव त्याचा पुत्र गोपाळ भास्कर त्याचा पुत्र भानु गोपाळ' या शिलालेखानुसार या मंदिराचे बांधकाम त्यांच्या तीन पिढ्यांनी पूर्ण केल्याचे कळते.

पूर्वेकडील प्रवेशद्वार 
 

                     कृष्णेच्या वळणदार पूर्व तीरावर वसलेल्या या मंदिराला पूर्व, पश्चिम आणि उत्तरेला असे एकूण तीन भव्य दगडी दरवाजे आहेत. एखाद्या किल्ल्याला शोभावेत अशी या दरवाजांची रचना दिसते. पूर्वेकडील दारातून मंदिरात प्रवेश आहे. या दाराच्या भव्य दगडी कमानीतील चौकटीवर दोन्ही बाजूस घोड्यांच्या तोंडांची उठावदार कोरीव शिल्पे आहेत. चौकटीच्या मध्यभागी सुबक गणेश कोरला असून गणेशाच्या वर किर्तीमुख आहे. या दरवाजाच्या आत दोन्ही बाजूला पहारेकऱ्यांच्या देवड्या दिसतात. किल्ल्याच्या दरवाजांच्या आतील बाजूस या स्वरूपाच्या देवड्या असतात.
पूर्व दरवाजातून दिसणारा दिंडी दरवाजा 



नवीन RCC सभामंडप

उत्तरेकडील दरवाजाजवळील दीपमाळा 

गरुड दीपमाळ
हनुमान दीपमाळ 
                     पूर्वेच्या या दारातून समोर डाव्या लांबलचक दगडी भिंतीला लागून लहान दिंडी दरवाजा दिसतो. या दरवाजाच्या चौकटीवर सुध्दा गणेश पट्टी कोरलेली दिसते. नजीकच्या काळात मंदिर दुरुस्ती अंतर्गत समोरील दिंडी दरवाजाच्या आधी दगडी भिंतीत उत्तरेला नवीन प्रवेशद्वार ठेवलं आहे. हा दरवाजा सध्या बांधलेल्या भव्य आरसीसी मंडपात घेऊन जातो. या मंडपातून पुढे डावीकडून दोन दीपमाळेच्या मधून उजवीकडील उत्तरेच्या भव्य पुरातन दाराकडे जातो. या दरवाजाच्या वर नगारखाना दिसतो. वर नगारखाण्यात जाण्यासाठी दाराच्या आत उजव्या भिंतीत घडीव पायऱ्यांची व्यवस्था केली आहे. या उत्तरेच्या दारासमोरच गुहेत उतरणाऱ्या आधुनिक ग्रॅनाईट लाद्या बसवून पायऱ्यांचा सध्या सुसज्ज मार्ग बनवलेला दिसतो. या पायऱ्यांचा दोन टप्प्यात बनवलेला मार्ग श्री दर्शनासाठी  आबालवृद्धांना खूपच सोईस्कर आहे.

नवीन RCC सभामंडप


भुयारात जाणारा नवीन मार्ग 
भुयारात जाणारा नवीन मार्ग 
             

                    पूर्वापार दिंडी दरवाजातून येणारा प्राचीन मार्ग मात्र पश्चिमेकडून तीन टप्प्यात गुहेत उतरतो. दिंडी दरवाजाच्या आत दगडी मंडप असून मंदिराच्या एकूण तीन टप्प्यांच्या रचनेतील जमीन पातळीवरील हा मंडप आहे. या मंडपाच्या दगडी कमानीतून उजवीकडे वळल्यास अंदाजे पुरुषभर उंचीची दोन तुळशी वृंदावन आहेत. वृंदावनांच्या वर लाकडी मंडप आहे. या मंडपावर देवाची पालखी ठेवलेली दिसते. मंडपाचे वासे, तुळ्यांना आकर्षक रंग लावलेला दिसतो. आता हा पुरातन लाकडी मंडप मोडकळीस आलेला आहे.

 

भुयारातील नृसिंह मूर्तीवरील वृंदावन आणि त्यावरील लाकडी मंडप

भुयारात पश्चिमेकडून जाणारा मार्ग 
पहिल्या पायरीवरील शिलालेख

चौदा फूट खोल भुयारातील नृसिंह मूर्तीवरील वृंदावन आणि त्यावरील प्राचीन लाकडी मंडप 




                               

                    

            दोन्ही वृंदावनांना उजवी प्रदक्षिणा घालून पश्चिमेकडून भूगर्भात उतरणाऱ्या नऊ पायऱ्यांनी अंबाबाई मंडपात येता येतं. या भव्य मंडपात श्री अंबाबाई, सरस्वतीची मूर्ती आहे. एक लक्ष्मीनारायण आणि विठ्ठल मूर्ती आहे. तसेच गरुडस्थित गोविंदाची यानाकमुर्ती आहे. या वैशिष्ट्यपूर्ण रचनेच्या भुयारी मंडपात कोल्हापूर दरबाराचे राजगुरू सिद्धेश्वर महाराजांनी अनेक वर्षे साधना केली. इथे डाव्या हाताला त्यांच्या सान्निध्याने पूनित झालेले त्यांचे दगडी आसन आणि त्यापुढे त्यांची समाधी आहे. इथल्या गरुड खांबाला प्रदक्षिणा घालून पुढे भुयारात उतरण्याची रीत आहे. गरुड खांबाच्या पूर्वेला उजवीकडील चिंचोळ्या दगडी चौकटीतून दुसऱ्या भुयारात उतरता येतं. डावीकडे वळसा मारल्यावर समोर भैरवाची मूर्ती दिसते. पुढे तीन पायऱ्या उतरून ठेंगण्या चौकटीतून श्री नृसिंहाच्या गर्भगृहात येता येतं.

                            हा पुरातन मार्ग आणि सध्या अबालवृद्धांच्या सोईसाठी बनवलेला मार्ग जमिनीखाली देवाच्या गर्भगृहाबाहेर एकत्र मिळतात.

  

श्री सिद्धेश्वर महाराज समाधी

जमिनीखाली दुसऱ्या भुयारात उतरणारा मार्ग 

 
यानाकमुर्ती 

श्री लक्ष्मी नारायण 

विठ्ठल मूर्ती 
अंबाबाई आणि सरस्वती मूर्ती

                  गर्भगृह अंदाजे ६ फूट लांब आणि ८ फूट रुंदीचे आहे. देवाच्या मूर्तीसमोर स्टीलच्या जाळीचे दरवाजे आहेत. दरवाजाच्या आत मूर्तीसमोर अनुष्ठानाला बसण्या इतपत जागा दिसते. आत पूजा पाठ करणारे कुलकर्णी देवाचं पावित्र्य कसोशीनं पाळताना दिसतात. तीर्थ प्रसाद घेण्यासाठी भाविकांचा पुढे येणारा हात सुध्दा स्टीलच्या दाराबाहेरच राहील अशी खबरदारी इथं घेतली जाते.
गर्भगृहाची ठेंगणी चौकट 
गर्भगृह 

गर्भगृहातील वायुविजनासाठी झरोका

                   जमिनीखालच्या तिसऱ्या भुयारातील या गर्भगृहात प्राणवायूचा पुरवठा होण्यासाठी गर्भगृहाच्या पश्चिम भिंतीवर कोनाड्यात एक झरोका दिसतो. तो थेट पहिल्यांदा प्रवेश करताना जमीन पातळीवर दिसणाऱ्या तुळशी वृंदावनाच्या  गावाक्षांना जोडलेला आहे. या वृंदावनापासून गर्भगृहातील व्यक्तींची शब्द संवाद साधला जातो. तसेच भक्ताने वर वृंदावनातुन अर्पण केलेली दक्षिणा किंवा सुपारी थेट नृसिंह मूर्तीच्या चरणाशी येऊन पडते.

                   श्री नृसिंह महाराजांची चलाचल, उग्र, तामस रूपातील ही मूर्ती एका अखंड शाळीग्राम शिळेवर कोरलेली आहे. देवाच्या मागे प्रभावळ दिसते. डोक्याच्या मागे महिरप आहे. प्रभावळीवर दशावतार कोरलेले दिसतात. मूर्तीच्या उजव्या बाजूस मत्स्य, कुर्म (कासव), वराह, नृसिंह आणि वामन अवतार कोरले आहेत. श्रींच्या डाव्या बाजूस परशुराम, श्रीराम, श्रीकृष्ण, बुद्ध व कल्की असे एकूण दहा अवतार कोरलेले दिसतात. देवाच्या डोक्यावर आणि या दशावतारांच्या मध्यभागी भव्य किर्तीमुख आहे. किर्तीमुखाच्या खाली सात फण्यांची नागदेवता दिसते. देवाच्या पायाशी उजव्या बाजूला अंदाजे सव्वा फूट उंच भूदेवी आणि बाजूला विरासनातील गरुड मूर्ती दिसते. देवाच्या डाव्या बाजूला पायाशी एक फूट उंचीची किरीटधारी भक्त प्रल्हाद मूर्ती तर सव्वा फूट उंचीची माता लक्ष्मी मूर्ती आहे.
                  श्री नृसिंहाचे मुख उग्र असून नजर विस्फारलेली दिसते. सिंहमुखी मानेभोवती आयाळ आहे. कान शंकू सारखे उभे दिसतात. बाहू बलदंड आणि शरीर अतिशय प्रमाणबद्ध दिसतं. मुखातून गर्जना करण्यास उत्कट अशी लवलवणारी जीभ दिसते. छाती विशाल असून मूर्ती सालंकृत दिसते. डोक्यावर किरीट आहे. दंडात बाजूबंद आहेत. हातात कडी, पायात तोडे दिसतात. गळ्यात रत्नहार असून तो हिरण्यकश्यपुशी झालेल्या झटापटीत पायापर्यंत पोहोचला आहे. देवाच्या कमरेला मेखला दिसतो.

श्री मूर्तीभोवती कोरलेले दशावतार आणि मध्यभागी कीर्तिमुख
                  या मूर्तीतील हिरण्यकश्यपूही सालंंकृत असून किरीटधारी आहे. देवाच्या डाव्या मांडीवरील त्याचे मुख रेखीव असून गळ्यातील माळ घरंगळलेली दिसते. कानात कुंडले व कमरेचे भरजरी काठाचे वस्त्र कोरले आहे.
                   देवाच्या शोडस (सोळा) भुजांत विष्णूची शंख, चक्र, गदा, पद्म तसेच विष्णूच्या पुढील वामन अवतारातील कलश, परशुराम अवतारातील परशु, श्रीरामांचे धनुष्य, श्रीकृष्णाची मुरली तसेच एका हातात ढाल आहे. एक हात वरद मुद्रेत आहे. मूर्तीच्या डोक्याच्या डाव्या बाजूचे तीन हात मूर्ती पाण्यातून काढताना निसटले आहेत. देवाने डाव्या हाताने दैत्याचा उजवा खडगधारी हात धरलेला आहे. दैत्याचा उजवा पाय उजव्या हाताने धरलेला असून डावा पाय आपल्या उजव्या मांडीखाली मुडपून ठेवला आहे. अशा प्रकारे श्री नृसिंह हिरण्यकश्यपूस जखडून दोन्ही हातांनी त्याची छाती विदीर्ण करत आहे.
                  या मंदिरात सिद्धेश्वर महाराजांच्या भेटीसाठी महान कवी 'केकावलीकार मोरोपंत' हेही नृसिंहपुरास आले होते. सेनाधुरंदर महादजी शिंदे यांनीही नृसिंह पुरी येऊन श्रींचे दर्शन घेतले होते. संत शिरोमणी नामदेव महाराजांचे सहावे पूर्वज यदुशेठ हे आपल्या कुलदेवतेचे नेहमी दर्शन व्हावे यासाठी येथे राहावयास आले होते. संत नामदेवांनीही या तीर्थक्षेत्रास भेट दिली होती. या आधी संभाजी महाराजांनी या देवस्थानास सढळ हस्ते मदत केली होती. महम्मद आदिलशहाने देखील या देवस्थानास देणगी दिल्याची नोंद मंदिराच्या इतिहासात मिळते.
उत्तरेकडील दरवाजावरील नगारखाना
उत्तर दरवाजाबाहेरील पुजाऱ्यांची घरे 

मंदिर परिसरातील कुलकर्ण्यांची घरे
मंदिर परिसरातील पुजाऱ्यांची घरे


               वैशाख शुद्ध सप्तमीपासून नृसिंह जयंतीचा उत्सव सुरू होऊन पुढे वैशाख वद्य प्रतिपदेच्या दहाव्या दिवशी उत्सवाची सांगता होते. मूळ कोळे गावातून मंदिर देखभाल आणि पूजेसाठी पूर्वी इथे आलेल्या कुलकर्ण्यांची आताची पिढी पूजापाठ, अनुष्ठान करताना दिसतात. निवडक पुजाऱ्यांचा त्यावेळचा वंश वृद्धिंगत होऊन सर्वांची मंदिर परिसराभोवती घरे दिसतात. श्री नृसिंह मूर्ती, मंदिर आणि त्याच्या प्राचीन इतिहासाबद्दल जोशी, कुलकर्णी भरभरून बोलताना दिसतात.

                  कोयना परिसरात होणाऱ्या वारंवार भूकंपामुळे मंदिराची अंतर्गत रचना सध्या कमकुवत झाली आहे. येत्या ८-१० वर्षापासून भुयारात पाण्याचे उमाळे फुटून भूयाराच्या तळ वाटेवर पाणी दिसतं. त्यावर आजुन उपाय सापडलेला नाही. सध्या लोकवर्गणीतून व देणगीतून मंदिर दुरुस्ती आणि जीर्णोद्धार चालू आहे. सध्या मूळ प्राचीन मंदिराभोवती प्रशस्त ओवरींचे भव्य आरसीसी मंडप बांधले आहेत. जुन्या आणि नवीन वास्तूतंत्राचा मेळ घालण्याचा प्रयत्न केलेला दिसतो.

                    महाभारत पर्वाच्याही आधीची अख्याइका सांगणारी, दुर्मिळ अशा गंडकी शिळेतील पाच सव्वा पाच फूट उंचीची रेखीव सुंदर आणि पुरातन मूर्ती, तसेच या मंदिराची त्रिस्तरीय स्थापत्य शैली एकदा नक्कीच बघावी अशी आहे..                                                                                                                                                       || श्री कृष्णार्पणमस्तु ||

येथे - जयवंत जाधव

17 comments:

  1. अप्रतिम व विस्तृत मांडणी खूपच छान 🙏🏻👍

    ReplyDelete
  2. Useful information

    ReplyDelete
  3. खूप छान 👌

    ReplyDelete
  4. खुपच छान व उपयुक्त माहिती आमच्या कुलदेवतेची दिल्या बद्द्ल धन्यवाद

    ReplyDelete
  5. Nice information 🙏

    ReplyDelete
  6. उत्कृष्ट शब्द रचना आणि मांडणी.‌विस्तृत माहिती

    ReplyDelete
  7. उत्कृष्ट माहिती पुरवल्या बद्दल धन्यवाद.

    ReplyDelete
  8. Dear जयवंत उत्कृष्ठ आणि खुप छान माहिती.... ब्लॉग वाचल्यानंतर तिथे गेल्या सारखे वाटते.... खुप मस्तच... 👌👍🙏🌹

    ReplyDelete
  9. खुप छान माहिती..... 👍

    ReplyDelete
  10. खूप छान माहिती 👌👌माझ माहेर कराड....जवळ आहे....नक्की प्रयत्न करेन जान्याचा 🙏🙏😊

    ReplyDelete
  11. लेख छान आहे. प्राचीन मूर्ती गंडकी आणि शाळीग्राम शिळेची आहे. दोन्हीत फरक आहे की एकाच आहे ते कळले नाही. इतिहास आणि फोटो छान माहितीत भर घालतात. एकंदर लेख नेहमीप्रमाणे मस्त लिहिलं आहे. धन्यवाद आणि शुभेच्छा मित्रा 💐👏

    ReplyDelete
    Replies
    1. मूळ नांव शाळीग्राम आहे. तो गंडकी नदीच्या पत्रात मिळतो. म्हणणारे त्याला दोन्ही नावानं संबोधतात पण ती एकच शिळा (दगड) आहे.

      Delete
  12. खूप छान माहिती दिली

    ReplyDelete
  13. Khup sundar likhan

    ReplyDelete
  14. अतिशय सुंदर ब्लॉग लिहिला आहे. चित्राच्या माध्यमातून भीमा निरेच्या संगमावरील प्राचीन श्री लक्ष्मीनृसिंह मंदिराचे जे वर्णन आपण केले आहे ते वाचताना प्रत्यक्ष दर्शन झाल्याचा भास झाला. आपल्या या प्राचीन संस्कृतीचा आपल्याला अभिमान वाटतो. आपल्या संस्कृतीचे ऐतिहासिक दाखले बर्‍याच लोकाना माहीत नसतात. अशा माध्यमातून आपण ते माहित करून देण्याचे मोलाचे काम करीत आहात. तुमच्या या कार्याला माझ्या शुभेच्छा.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद मित्रवर्य श्री चंद्रकांत कालकुंद्रे 🙏

      Delete

ऑफबीट - खरोसा लेणी, निलंगा, जि. लातूर Offbeat - Ancient Kharosa caves, Dist. Latur, Maharashtra.

                        महाराष्ट्रात वैशिष्ट्यपूर्ण अशी बरीच लेणी आहेत. काहींची प्रसिद्धी तर जगभर पोहोचली आहे. त्यांची कोरीव कलाकुसर आजही थक...