Saturday 4 November 2023

ऑफबीट - 'श्रीक्षेत्र पाली'चा 'सरसगड' (पगडीचा किल्ला), Offbeat - Sarasgad Fort, Pali, Maharashtra.

                  महाराष्ट्रातील अष्टविनायक गणपती मधील सुधागड तालुक्यातील श्रीक्षेत्र पालीचा 'बल्लाळेश्वर' प्रसिद्ध आहे. या पाली गावच्या पूर्वेस दक्षिणोत्तर पसरून, आकाशात घुसलेला विशिष्ट आकाराचा डोंगर नजरेस पडतो. पाली गावात प्रवेश करण्यापूर्वी डाव्या हाताला रस्त्यावरून निरखून पाहिल्यास हा डोंगर पुणेरी पगडीच्या आकाराचा दिसतो. तसेच तो श्री बल्लाळेश्वराच्या आकाराचाही दिसतो. श्री बल्लाळेश्वराच्या रूपात पाली गावाची पाठीराखण करणारा हाच तो 'सरसगड'. तर पगडीच्या आकारामुळे सरसगडास 'पगडीचा किल्ला'ही म्हटले जाते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक सर्रास बल्लाळेश्वरला भेट देतात. पण बाजूलाच खड्या कातळावर उभा असलेल्या या किल्ल्याकडे दुर्ग भटक्यांशिवाय सहसा कोणी फिरकत नाहीत. या काळ्या कातळावर प्राचीन इतिहास सांगणारा दुर्ग असल्याचे अनेकांना ज्ञात नाही. किंवा माहीत असल्यास चढाईच्या दमछाकीनंतर किल्ल्याच्या शेवटच्या थरार ९६ पायाऱ्यांमुळं त्याच्या नादी लागत नाहीत. श्रीक्षेत्र पाली आणि बल्लाळेश्वर प्रसिध्द असले तरी सरसगड डोंगर भटक्यांच्या भेटीसाठी नेहमीच आसुसला आहे.

किल्ले सरसगड, पाली, महाराष्ट्र (Sarasgad Fort)
                   समुद्र सपाटीपासून सरासरी १६०० फूट उंचीवर असलेला हा सरसगड रायगडच्या सुधागड तालुक्यात, खोपोलीपासून ४० किमीवर आहे. दूसरा पर्यायी मार्ग म्हणजे नागोठणे रेल्वे स्थानकापासून १४ किमी अंतरावर हा आहे. तर आमच्या राहत्या पनवेलपासून रसायनी मार्गे हा गिरिदुर्ग ७० किमी अंतरावर आहे. मुंबई पुण्याकडून येणाऱ्या भटक्यांना सरसगडासाठी खोपोली मध्यवर्ती, सोयीस्कर ठिकाण आहे. खोपोलीपासुन पालीपर्यंत नियमित एसटी बसेस आहेत. प्रसिद्ध तीर्थक्षेत्रामुळं इथे कोणत्याही पर्यायी वाहनाने सहज पोहचू शकतो. 
                        सह्याद्रीच्या मूळ धारेपासून वेगळा असल्याने हा कोणत्याही डोंगर रांगेत न येणारा स्वतंत्र असा डोंगर आहे.  
श्री बल्लाळेश्वर पाली (Sarasgad Fort)
 
पाली गावातून दिसणारा श्री बल्लाळेश्वराच्या आकाराचा सरसगड (Sarasgad Fort)
पुणेरी पगडीच्या आकाराचा दिसणारा सरसगड Photo Courtesy by Google (Sarasgad Fort)

                 पनवेलहून सकाळी आठच्या आधीच आम्ही पाली गाठली. श्री बल्लाळेश्वर मंदिरा मागे दोन मिनिटांवर उजवीकडे मोठं तळं आहे. या तळ्याच्या समोर मंदिरामागून डावीकडे जाणारी वाट सरसगडला घेऊन जाते. तसा मार्गदर्शक फलक डाव्या बाजूला दिसतोच. गांव ओलांडताच गर्द झाडाझुडुपांतून वाट सुरु होते. नागमोडी वळणांची दगड धोंड्यातून चढत जाणारी वाट पहिल्याच टप्प्यात दमवते. वीस मिनिटांत सपाट पठारावर पोहोचवते.   

सरसगडच्या पहिल्या पठारावर घेऊन जाणारी पाऊलवाट (Sarasgad Fort)

सरसगडच्या पहिल्या पठारावर घेऊन जाणारी पाऊलवाट

घारापुरीच्या लेण्यातील त्रिमूर्ती शिल्प 
              या सपाटीवर गुढग्या इतकं गवत दिसतं. आणि समोर आकाशात घुसणारा किल्ल्याचा सुळका दिसतो. डावीकडे पूर्वेला वसलेलं संपूर्ण पाली गांव नजरेच्या टप्प्यात येतं. दक्षिणेकडील या चढाईच्या वाटेवरून किल्ल्याकडे पाहिल्यास घरापुरीच्या 'त्रिमूर्ति'ची हमखास आठवण होते.

दक्षिणेकडून घारापुरीच्या लेण्यातील 'त्रिमूर्ती'ची आठवण करून देणारा सरसगड (Sarasgad Fort)


दुसऱ्या पठारावरील पाण्याचा हौद (Sarasgad Fort)

                     पठारावरून पुढे चालत राहिल्यास पुढे दुसऱ्या वीस मिनिटात पायवाट चढत दुसऱ्या सपाटीवर पोहोचते. या सपाटीवर तुरळक झाडं, झुडूपं दिसतात. आमचं तिथं जाणं नवरात्रीच्या आठवडाभर आधी आणि पावसानंतर लगेच झालं. एकप्रकारे दसऱ्याच्या आधीच सीमोल्लंघन झालं. त्यावेळी सभोवताली गर्द हिरवं, पोपटी गवत मनाला मोहून टाकणारं होतं. उतार हिरव्या दुलईवर समोर दूरवर किल्ल्याचा काळाभिन्न कातळ आणि त्यावरील तटबंदी लक्ष वेधून घेते. दोन्ही जुळ्या कातळांपैकी उजवा कातळ उंच असून त्यावर किल्ल्याच्या बालेकिल्ल्याचीही तटबंदी स्पष्ट दिसते. या पायवाटेवर डाव्या बाजूला झाडीत कातळात खोदलेला पाण्याचा एकमेव हौद आहे. डोंगरातून पावसानंतर वाहून येणारं पाणी त्यात  जमा होऊन, संथ पन्हाळीनं ते पुन्हा खाली हिरव्या गवतात लुप्त होत होतं. नितळ पाण्यात तळाची खेकडी, बेडक्या सहज नजरेस येत होते. या हौदाचा उपयोग किल्ल्याच्या नांदत्या काळात घोड्यांना पाणी पाजण्यासाठी केला जात असावा. 

किल्ले सरसगडाचे गवतातून दिसणारे विहिंगम दृश्य, उजवीकडे उंच बालेकिल्ल्यावर दिसणारी तटबंदी (Sarasgad Fort)

                    पुढे दहा मिनिटांच्या वाटचालीनंतर खडकावरून किल्ल्यावर जाणारी वाट आहे. उजवीकडे वळून कातळावर जाणाऱ्या खोदीव पायऱ्या चढल्या नंतर वाट डावीकडे कड्याच्या बाजूनं कातळ पार करून वर येते. या कड्याच्या डाव्या बाजूला दरी आहे. या टप्प्यावर उजव्या बाजूच्या कातळाचा आधार घेत सावकाश हा टप्पा पार करावा.  

सरसगडचा पहिला कातळ टप्पा (Sarasgad Fort)

सरसगडचा पहिला कातळ टप्पा (वरून)

सरसगडचा पहिला कातळ टप्पा (Sarasgad Fort)

किल्ल्याच्या पायथ्याची प्राचीन गुहा (Sarasgad Fort)
                   या टप्प्यानंतर समोर किल्ल्याचे दोन महाकाय ताशीव कातळ एकमेकांना खेटून उभे दिसतात. आणि याच सुळक्यांच्या माथ्यावर 'सरसगड' वसला आहे. दोन्ही सुळक्यांच्या खिंडीत प्रवेश करण्यापूर्वी डाव्या सुळक्याच्या पायथ्याला एक खोलवर आडव्या कोरलेल्या गुहेची चौकट दिसते. आत लांबवर खोदलेली ही प्राचीन गुहा उत्कृष्ट स्थापत्य शैलीचा नमुना आहे. ती बघून पुढे त्याच कातळात कोरलेल्या ७० ते ८० अंशाच्या कोनातून किल्ल्यावर जाणाऱ्या उभ्या पायऱ्या आहेत.  
सरसगडच्या उंच, उभ्या ९६ पायऱ्या आणि उजवीकडे घळ (Sarasgad Fort)

सरसगडच्या उंच, उभ्या ९६ पायऱ्या (Sarasgad Fort)

                   या दोन महाकाय कातळ सुळक्यांच्या खिंडीत  डाव्या सुळक्या लगत ७०-८० अंशाच्या कोनातून वर जाणाऱ्या ९६ पायऱ्या दिसतात. उजव्या बाजूची खोल दरी (घळ) आणि गुडघ्या इतक्या उंचीच्या अक्षरशः उभ्या चढत जाणाऱ्या पायऱ्या घाम काढतात. मध्ये दोन ठिकाणी पायऱ्या तुटलेल्या आहेत. या पायऱ्या चांगल्याच दमवतात आणि खाली नजर जाताच मानसिक परीक्षा घेतात. फार सावकाश, संयमानं, सावध पायऱ्या चढून वर आल्यास उजवीकडे बुरुज आणि पुढे समोर कातळ भिंत दिसते. डाव्या बाजूस कातळात किल्ल्याचा सुंदर गोमुखी दिंडी दरवाजा दिसतो. 

सरसगडचा दक्षिणेकडील गोमुखी 'दिंडी' दरवाजा (Sarasgad Fort)
                         हा दिंडी दरवाजा अखंड कातळात कोरला गेला आहे. चौकटीचा वरील भाग पिंपळाकृती आहे. चौकटीवर सुंदर तीन पाकळ्या कोरलेल्या दिसतात. याचे लाकडी दरवाजेही कलात्मक असून सध्याच बनवलेले दिसतात. दरवाज्याच्या बाहेर दोन्ही बाजूस बसण्यासाठी ओट्यांची व्यवस्था दिसते. साध्याच पण सुंदर रीतीने एकसंघ कातळात कोरलेल्या या दिंडी दरवाजाची प्राचीन कला बघून अचंबित होतोच पण अभिमानही वाटतो.
डावीकडील पहारेकऱ्यांची देवडी (Sarasgad Fort)

दिंडी दरवाजातून किल्ल्यावर जाणाऱ्या पायऱ्या (Sarasgad Fort)

                    या दिंडी दरवाजाच्या आत डाव्या बाजूस कातळात पहारेकऱ्यांसाठी खोदलेली भव्य,कलात्मक देवडी दिसते. देवडीला खांबांचा आधार दिला आहे. इथून उजवीकडे जाणाऱ्या दहा-बारा पायऱ्या चढून आल्यास वाट मुख्य किल्ल्यावर येते. बाजूला फलकावर किल्ल्याचा नकाशा आहे. इथून दोन वाटा बालेकिल्ल्याला वळसा मारायला फुटतात. त्यातील डावीकडील वाट पावसानंतर वाढलेल्या डोक्याइतक्या उंच गवतात लुप्त झाली आहे. समोर किल्ल्याची तटबंदी आणि तोफमारा करण्यासाठी दिवळ्यांची रचना दिसते. या किल्ल्याच्या उजव्या बाजूच्या सुळक्यावर बाले किल्ल्याची तटबंदी दिसते. उजवीकडून दहा पंधरा उध्वस्त पायऱ्या किल्ल्यावर घेऊन जातात.  सध्या उजवीकडून जाणारी वाट थोडीफार सुसह्य वाटते.

किल्ल्यावरील नकाशा फलक (Sarasgad Fort)

किल्ल्याची तटबंदी (Sarasgad Fort)
(Sarasgad Fort)

                 वर प्रवेश केल्यावर बालेकिल्ल्याच्या पायथ्याला किंचित डाव्या बाजूस कातळात प्रचंड मोठी गुहा कोरलेली आहे. गुहेत शेंदूर लावलेली अज्ञात देवतेची शिळा दिसते. गुहेच्या समोर प्रशस्त मोठी पाण्याची टाकी कोरलेली दिसते. या टाकीत बालेकिल्ल्याच्या सुळक्यावरून पावसाचे ओघळून पडणारं पाणी दिसतं.

किल्ल्यावरून दिसणारा बालेकिल्ला (Sarasgad Fort)

बालेकिल्ल्याच्या पायथ्याची गुहा आणि त्यासमोरील पाण्याची खोदीव टाकी (Sarasgad Fort)

    सुळक्याच्या दोन्ही बाजूने गडफेरी करू शकतो. उजव्या बाजूने सुरुवात केल्यास बालेकिल्ल्याच्या सुळक्याच्या पायथ्याला 'ऐनाचा हौद', 'उंबराचा हौद' असे बरेच पाण्यासाठी खडकात खोदलेले हौद दिसतात. पुढे काही छोट्या मोठ्या गुहा दिसतात. त्यातील एका गुहेस 'शस्त्रागार' असे नाव दिले आहे. एक गुहा इतकी मोठी रुंद आहे की, तिला कातळखांबांचा आधार देऊन गुहेत उतरण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था केली आहे. गुहेत अर्धवट उंचीच्या कातळ भिंतींच्या आधारे खण (compartments) केलेले दिसतात. 

उंबराचा हौद (Sarasgad Fort)
हौद (Sarasgad Fort)

ऐनाचा हौद (Sarasgad Fort)
हौद (Sarasgad Fort)

               त्यापुढे बालेकिल्ल्याच्या सुळक्याच्या मागील बाजूस पिण्यालयक स्वच्छ पाण्याची टाकी दिसते. इथे उजव्या बाजूस तटबंदी उतरून जाणारा चोर दरवाजा आहे. त्यापुढे मोठा बुरुज दिसतो. पण पावसानंतर डोक्याच्याही वर उंच वाढलेल्या गवत आणि झुडुपांमुळे तो आम्हाला उतरता आला नाही. चोर दरवाजाच्या खाली किल्ल्याची दुहेरी तटबंदी दिसते.

बालेकिल्ल्याच्या पायथ्याच्या कातळ गुहा, शास्त्रागारे, धान्य कोठारे (Sarasgad Fort)

बहुखणी खांब गुहा (Sarasgad Fort)
    
किल्ल्याच्या उत्तरेकडील पिण्यालायक पाण्याची टाकी (Sarasgad Fort)

खांब गुहेत उतरणाऱ्या पायऱ्या (Sarasgad Fort)

                  बालेकिल्ल्याच्या कातळाला वळसा मारत पुढे आल्यास, उजव्या बाजूस किल्ल्याच्या उत्तरेला 'महादरवाजा' दिसतो. पायऱ्या उतरून वाट या महादरवाजात येते. चार पदरी दगडात बनवलेल्या मजबूत चौकटीचा हा दरवाजा दिसतो. या दरवाज्यालाही सध्या सुबक लाकडी दरवाजे बनवलेले दिसतात. पूर्वी उत्तरेकडून किल्ल्यावर या महादरवाजातून वहिवाट असावी. सध्या खाली उतरणाऱ्या पायऱ्या उध्वस्त दिसतात तसेच त्यापुढे खाली जंगल माजल्यामुळे ही वाट धोकादायक झाली आहे. उत्तर दिशेकडे तोंड केल्यास महादरवाजाच्या डावीकडे गडाच्या तिहेरी बुरुजांची एकत्र बांधणी दिसते. पण वाढलेली झाडं आणि गवतामुळे त्यांचा पूर्ण अंदाज येत नाही. 

उत्तरेकडील महादरवाजा (Sarasgad Fort)

                 


महादरवाजा समोरील उधवस्त चौकी (Sarasgad Fort)

महादरवाजासमोरील उधवस्त पायऱ्या
झाडाझुडुपांच्या आडाला तिहेरी बुरुज तटबंदी

बालेकिल्ल्यावरील तळं आणि केदारेश्वर मंदिर (Sarasgad Fort)

                      महादरवाजाच्या पुढे पहारेकऱ्यांची उध्वस्त चौकी दिसते. या चौकी पुढे डावीकडून किल्ल्याच्या बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी वाढलेल्या गवतातून कातळावर जाणारी अस्पष्ट वाट आहे. कातळात कोरलेल्या या अरुंद धोकादायक पायऱ्या मध्यावर कातळात कोरलेल्या पाण्याच्या टाकी जवळून बालेकिल्ल्याच्या माथ्यावर जातात. बालेकिल्ल्याच्या या प्रशस्त माथ्यावर अज्ञात उध्वस्त झालेली कबर दिसते. त्यापुढे बालेकिल्ल्याच्या माथ्यावर प्रशस्त मोठं तळं आहे. या तळ्याकाठावर 'केदारेश्वराचे' प्राचीन मंदिर दिसते. मंदिराच्या भिंती उध्वस्त असून सध्या त्यावर पत्र्याचे शेड आहे. बाजूला मंदिराच्या खांबांचे तुटलेले कोरीव प्राचीन अवशेष ठेवले आहेत. मंदिराजवळच शिवछत्रपतींचा सुंदर भगवा फेटेधारी आणि सिंहासनारूढ पुतळा काचेच्या पेटीत दिसतो.

बालेकिल्ल्यावरील उधवस्त कबर (Sarasgad Fort)

केदारेश्वर मंदिर (Sarasgad Fort)

बालेकिल्ल्यावरील शिवछत्रपतींचा पुतळा (Sarasgad Fort)

                     किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावरून पूर्वेला सुधागड, घनगड, कोराईगड तर वायव्येला माणिकगड आणि किल्ले कर्नाळा दिसतात. सर्व किल्ले धुक्यातून अंधुक दिसतात पण कॅमेऱ्यात स्पष्ट टिपता येत नाहीत. दिसत नाहीत. वाढलेल्या गवतातून बालेकिल्ल्याची तटबंदी बऱ्यापैकी शाबूत दिसते. पण प्रत्येक ठिकाणी गवतांमुळे तिथपर्यंत पोहचू शकत नाही.  

किल्ल्याची वरून दिसणारी तटबंदी (Sarasgad Fort)

                    बालेकिल्ला उतरून सुळक्याला डावं वळत पुढे गेल्यास समोर पायऱ्या उतरून पाहिल्या सुळक्याच्या माथ्यावर येता येतं. व इथून पुढे दिंडी दरवाजाकडे येता येतं. या पायऱ्या न उतरता डोक्याच्याही वर उंच गवतातून वाट काढत बालेकिल्ल्यास वळसा मारुन पुढे आल्यास पुन्हा सुरवातीच्या बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी किंचित डावीकडे कोरलेली गुहा आणि त्यासमोरील प्रशस्त पाण्याच्या हौदाजवळ येता येतं. इथे आपली गडफेरी पूर्ण होते. 

सर्वोच्च माथ्यावरून पूर्वेला धुक्यातील सुधागड, घनगड, कोराईगड (Sarasgad Fort)

                  या एकूण चार पाच तासांच्या चढाईत पुरती दमछाक होते. ऑक्टोबरची उष्णता, वातावरणातील दमटपणा, आद्रता यामुळे शारीरिक कस लागतो. जवळ मुबलक पाणी ठेवावं लागतं. उष्माघातापासून विशेष काळजी घ्यावी लागते. ऑक्टोंबरच्या दिवसात शक्यतो उन्हं वर चढण्यापूर्वीच दमछाक करणाऱ्या चढाईचे टप्पे सर करून जाणं सोयीस्कर आहे. आणि त्या तयारीनेच आम्ही सकाळी लवकर गडपायथ्याला पोहोचलो. परतीच्या वेळी भर दुपारी बारा वाजता पुण्याच्या काही कॉलेज तरुणांचा ग्रुप या थरारक पायऱ्यांच्या आधी खाली आम्हाला भेटला. जळगांवची ही मुलं पुण्याला शिकत आहेत. पुण्याहून इथं पोहोचायला त्यांना उशीर झाला होता. आजच्या दिवशी भेटलेला हा एकमेव ग्रुप भर उन्हात इथं पोहोचेपर्यंत अक्षरशः मेताकुटीस आला होता. तशी आमचीही वाट लागलीच होती. त्यांच्याकडील पाणीही संपत आलं होतं. फक्त किल्ल्यावर पिण्यायोग्य पाण्याची त्यांनी आमच्याकडे चौकशी केली. यावरून ऑक्टोबर महिन्यातील डोंगर चढाईची कल्पना यावी. सर्वत्र वाढलेल्या डोक्याइतक्या गवतातून अशा डोंगर भटकंतीत वाऱ्याचा अंगाला सहसा स्पर्श होत नाही. आणि या दिवशी उष्णतेनं चांगलच शिखर गाठलं होतं.

उंच गवतातून दिसणारी बालेकिल्ल्याची तटबंदी (Sarasgad Fort)
Sarasgad Fort

                    बऱ्याचवेळा पावसाळी गवतामुळे किल्ल्यांच्या तटबंदीपर्यंत जाता येत नाही. गवतातून पायाखाली काहीच दिसत नाही. अशा वेळी आगाऊ धाडस करणे हाही एक मोठा धोका आहे. पावसानंतर लगेच केलेली डोंगर भटकंती निसर्गरम्य नक्कीच आहे, पण वाढलेल्या गवतामुळे डोंगरातील किल्ले, त्यांच्या अवशेषांचा मागोवा, धांडोळा (explore) घेण्यास अडचण मात्र कायम राहते. 

माजलेल्या गवतातून बालेकिल्ल्याकडे जाणारी वाट (Sarasgad Fort)

महादरवाजा (Sarasgad Fort)

                   सरसगडावरील अनेक उध्वस्त अवशेष आणि कातळात खोदलेल्या पाण्याच्या हौदांवरून किल्ल्यावर त्यावेळी बरीच शिबंदी असावी. तसेच सरसगडाच्या पायथ्याच्या गावाला मध्ययुगीन काळात तटबंदी अस्तित्वात होती. त्यावेळी त्या गावाचे 'मामलेपाल' असं नांव होतं. पुढे त्याचं 'पाल' आणि सध्याचं 'पाली' झालं. श्री बल्लाळेश्वराचे आज दिसणारे मंदिर पूर्वी आंतरबाह्य लाकडी होते, नानासाहेब फडणवीसांनी ते दगडात बांधवून घेतलं.

पहारेकऱ्यांची देवडी (Sarasgad Fort)

                      सरसगडचा लिखित इतिहास फारसा उपलब्ध नाही पण किल्ल्यावर खोदलेल्या पाण्याच्या टाक्या, कोरलेल्या पायऱ्या, किल्ल्याची बांधकाम शैली, तिथल्या गुहा या सर्व ई.स. पूर्व तिसऱ्या शतकातील मौर्य शैलीशी जुळतात. अर्थातच या काळात इथला व्यापार भरभराटीस येऊन पाश्चिमात्य देशातील इजिप्त, बॉबीलॉन, फिनिशिया या देशांशी आपल्या ठाणे, कल्याण, सोपारा (नालासोपारा), मांदाड, चौल, महाड सारख्या बंदरातून व्यापारी उलाढाल होत असे. घाटावरच्या पैठण, तेर(तगर), नाशिक, जुन्नर या व्यापारी केंद्रांशी त्यावेळी किनारपट्टीवर जाणाऱ्या, उतरणाऱ्या मालाची नाणेघाट, बोरघाट (लोणावळा), सवाष्णीच्या घाटातुन वाहतूक होत असे. त्यापैकी नागोठणे बंदरातून सवाष्णी घाटमार्गे चालणाऱ्या माल वाहतुकीस सुधागड, सरसगडाने संरक्षण पुरविले होते. यावरून सरसगडाच्या प्राचीनतेची जाणीव होते.

                     मौर्य साम्राज्यानंतर सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार अशी साम्राज्ये सरसगडाने पहिली. पुढे पंधराव्या शतकात निजामशाहीचा संस्थापक मलिक महम्मदने किल्ला ताब्यात घेतला. त्यानंतर विजापूरच्या आदिलशहाने किल्ला निजामांकडून जिंकून घेतला. पुढे शिवछत्रपतींच्या कोकण स्वारीत १६५६ च्या आसपास सरसगड स्वराज्यात आला. या लढाईत 'नारो मुकुंद'  म्हणून इतिहासात प्रसिद्ध असलेल्या आणि कारकुनी करणाऱ्या 'नारायण मुकुंद गांडेकर' यांनी अतुलनीय पराक्रम केला. छत्रपतींनी या बहद्दरास सरसगडा सोबत आकरा गडांची सबनिशी बहाल केली. 

किल्ले सरसगड (Sarasgad Fort)

            'नारो मुकुंद' यांना मिळालेली सबनीशी पुढे त्यांचा मुलगा 'शंकराजी नारायण' यांना मिळाली. शंकराजी सुद्धा वडिलांसारखाच पराक्रमी निघाला. पुढे राजाराम महाराज जिंजीस गेले असता मुघलांनी रामचंद्रपंत अमात्यांकडून 'राजगड' जिंकून घेतला. त्यावेळी शंकराजींनी पराक्रमाची शिकस्त करत राजगड मुघलांकडून पुन्हा जिंकून घेतला. राजाराम महाराजांनी शंकराजीच्या पराक्रमाचा गौरव करत त्यांना 'पंतसचिव' हा किताब बहाल केला. १६९७ साली शंकराजींनी 'भोर संस्थाना'ची स्थापना करून त्यात सरसगडाचीही सोय लावली. पेशवाईच्या काळात दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी माधवराव आणि लक्ष्मणराव रास्ते यांच्या मुलांना सरसगडावर कैदेत ठेवले अशी इतिहासात नोंद मिळते. १६९७ ला 'शंकराजी नारायण' यांनी स्थापन केलेले 'भोर संस्था'न ८ मार्च १९४८ रोजी स्वतंत्र भारतात विलीन झाले आणि उत्तम डागडुगी, व्यवस्था असणारा 'सरसगड' पोरका झाला. 

किल्ले सरसगड, पाली (Sarasgad Fort)

                     वेगवेगळ्या साम्राज्यांचा इतिहास, सोबत प्राचीन खुणा आणि धडकी भरवणारा कातळ 'सरसगड' अभिमानानं मिरवतो आहे. ऊन, वारा, पावसाचा बेबंद मारा सोसत, भटक्यांना चढाईचे आव्हान देत तो आजही खंबीर उभा आहे..

                                              || श्री कृष्णार्पणमस्तु ||

येथे - जयवंत जाधव

16 comments:

  1. Khup Sundar nisargramy

    ReplyDelete
  2. हा ब्लॉग वाचून मी भुतकाळा मध्ये गेलो 20 वर्षा पुर्वी मी दर माघी गणेश जयंतीला जात असे आणि सरसगड मनसोक्त फिरत असे नक्कीच जुन्या आठवणी जाग्या झाल्या पुन्हा एकदा धन्यवाद 🙏🙏

    ReplyDelete
  3. खूप छान टप्प्या टप्प्याने चित्रांसहीत वर्णन केले आहे. अत्यंत माहितीपूर्ण लेख आहे.

    ReplyDelete
  4. प्रकाश ,आभिमान वाटणारे हया मोहिमा बघून आनंद,तर आहे च पण,हे सर्व करतांना वेळ कसा काढतोस तेच कळत नाही, तुझ्या मुळे खूप छान माहिती मिळाली ,हया तुझ्या मोहिमा बंघुन आभिमान छाती उंचावते, अभिनंदन खूप छान, छान आवड,,मेहनत , तुला, खूप खूप शुभेच्छा अभिनंदन

    ReplyDelete
  5. खूप छान मांडणी केली आहे.पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. 🎉

    ReplyDelete
  6. भांजे .याहि आगोदर आपण आम्हाला अनेक गडाकिल्यांची माहिती दिलाच आहेस , आणि आता या श्री क्षेत्र पालीचा सरसगड ( पगडीचा किल्ला) या किल्ल्याची तू छोट्या छोट्या गोष्टीची माहिती लिहीला आहेस. त्या मुळे मला प्रतेक्ष गडावर आहे आसे वाटते. उन्, पाऊस, थंडी, वारा, कठिन चढ, उतार, गवत्, झाडी या सार्ववर् मात करत हि माहिती आमच्या पर्यंत पोचवण्याचे काम काम करत् आसतोस, त्या बद्धल मनापासून आभार. 🙏तुज्या या लिखाणातून निघणारे प्रतेक ठिकाण माज्या मनाला टच्य करुन जाते.मला भरपूर काही लिहायचं होते पण वेळे अभावी आवरत घेतो. आपण सर्व कुटुंब वेळेत वेळ काढून घेतलेल्या मेहनती बद्दल सर्वोच्च मनापासून आभार🙏🙏धन्यवाद🌹🌹👍निवृत्ती गोविलकर

    ReplyDelete
  7. Very nice and breezy detail

    ReplyDelete
  8. खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल जयवंत सर आपले खूप खूप धन्यवाद! आम्ही आपल्या ब्लॉगची वाटच बघत असतो जेणेकरून गड किल्ल्यांवर प्रत्यक्ष जाऊन आल्यासारखे वाटते. पुन्हा एकदा आपणास धन्यवाद!!

    ReplyDelete
  9. छान माहिती

    ReplyDelete
  10. खूप छान माहिती, असे वाटते की आपण स्वःता तिथे आहोत.

    ReplyDelete
  11. Nice information with 📸......👍

    ReplyDelete
  12. Dear जयवंत खुप छान फोटो सहित माहिती उत्कृष्ठ मांडणी, माहिती वाचत वाचत असताना सरसगडावर असल्यासारखे वाटत. अतिशय सुंदर..... 👌👍🙏🌹🙏🚩🙏

    ReplyDelete
  13. खूप छान माहिती दिली आहे जयवंत दादा। तुम्ही ज्या प्रकारे वर्णन करता, असे वाटते कि आपण प्रत्येक्षात तिथे आहोत। पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्या

    ReplyDelete
  14. छान लेख आहे. प्रत्येक गोष्ट ज्या प्रकारे विस्तार करून मांडली आहे त्यामुळे ह्या गडावर असल्याचे जाणवते. हि संचित माहिती खुप उपयोगी आहे.

    ReplyDelete

ऑफबीट - खरोसा लेणी, निलंगा, जि. लातूर Offbeat - Ancient Kharosa caves, Dist. Latur, Maharashtra.

                        महाराष्ट्रात वैशिष्ट्यपूर्ण अशी बरीच लेणी आहेत. काहींची प्रसिद्धी तर जगभर पोहोचली आहे. त्यांची कोरीव कलाकुसर आजही थक...