Friday, 20 November 2020

ऑफबीट - इर्शाळगड (Irshalgad)



             पावसानंतर लगेच एखादा ऑफबीट ट्रेक करून निसर्ग अनुभवायचा असेल तर, 'इर्शाळ'ला विसरून चालणार नाही. अगदी मुंबई-ठाण्यापासून जवळच आणि एका दिवसात करण्यासारखा. झालंही तसंच, ठरवलेला इर्शाळ पावसामुळं स्थगित झाला आणि कोथळीगड केला. कोथळीगडानं आम्हाला भन्नाट अनुभव दिला. दिवाळी समोर असताना त्यानंतर लगेच 'इर्शाळ' करणं शक्यही नव्हतं. मनात हुरहूर होतीच. 
            तसं पाहिलं तर मागील वर्षी याच दिवसात केलेला पेबचा विकटगड, प्रबळगड, आम्ही  अनेकदा गेलेलो कर्नाळा आणि आत्ताचा 'इर्शाळ' हे सगळे सह्याद्रीच्या माथेरान डोंगररांगेत येणारे. अति कठीण नसले तरी धोकादायक. चढाईच्या बाबतीत दमवणारे आहेत. या सर्वांचा एक गुणधर्म म्हणजे अरुंद, तीव्र उतारावर पायाखालची घसरणारी इथली माती. एकदा घसरलो की खालच्या एक दोघांना घेऊनच खाली जाणाऱ्या इथल्या वाटा.. पेबच्या विकटगडला तर परतीच्या वेळी अंधारातून ढोरवाटाही तुडविल्यात. 
           सह्याद्रीत अनेक उंच डोंगर, गड किल्ले आहेत. ऑफबीटही आहेत. पण खुमखुमी जिरवायची असेल तर माथेरानच्या रांगेतले दोन-तीन करावेच. 





                                                                                                                                               

           योग जुळून आला आणि दिवाळीच्या आदल्या रविवारी निघालो. भल्या सकाळी खायचं बांधून घेऊन घर सोडलं.
           'इर्शाळ' तसा पनवेलच्या आमच्या राहत्या घरापासून जवळच २५ किलोमीटरवर म्हणता येईल. चौकच्या अलीकडे डाव्या बाजुला एखाद्या मैलावर., मुंबई पुणे हायवेवरून त्याच्या विशिष्ट आकारामुळं नजरेत येतो. तर पुण्याहून येताना खालापूर  टोलनाका सोडल्यावर 'चौक' नंतर उजवीकडे.. शरीरसौष्ठव स्पर्धेत मूठ वळावी, त्या मुठीच्या आकाराचा, सह्याद्रीतील ३७०० फूट उंचीचा  बेलाग उघडा कातळ. अगदी रस्त्याकडेला म्हणता येईल. 
          याचं सौंदर्य बघायचंय त्यांनी पावसानंतर लगेच जावं. एकदा का ऊन्ह तापली की डोंगर ऊतारावरची फुलं लुप्त होतात. 
          चौक रेल्वे स्थानक सोडून उजवीकडे मोर्बे जलाशयाकडे जाणारा रस्ता थेट इर्शाळगडाला घेऊन जातो. स्वतःचं वाहन असेल तर 'नानिवली' गावापर्यंत जाता येतं किंवा 'वडाप' आहेच. 
         आम्ही सकाळी नऊ वाजता नानिवलीपासून पायवाटेनं चढाई सुरु केली. सुरुवातच मुळी तीव्र चढानं सुरू झाली. हा चढ खुप दमछाक करतो. एक संपला की दुसरा, असा टप्प्या टप्प्यानं दमवतो. एक दोनदा बसायला लावून पाणी पाजतोच.. 

तीव्र चढाईचे टप्पे 
                                                                                     
            हा चढ संपला की मागे वळून पाहिल्यास मोर्बे धरणाच्या जलाशयाचा परिसर खूप सुंदर दिसतो. नजरेच्या पूर्ण  टप्प्यात येतो.
मोर्बे जलाशय (Morbe Reservoir)

Morbe Reservoir & catchment Area





























           इथपर्यंत डोंगर उघडा आणि रखरखीत निष्पर्ण आहे. पुढच्या पाऊलवाटेची चढाई थोडी कमी होत जाऊन, अधून मधून सावली देणारी झाडं आहेत. तर मधेच ही वाट डोंगराच्या अरुंद सोंडेवरून, कमरेइतक्या गवतातून सरळ पठारावर आणून सोडते. या पठारावरून इर्शाळगडाचं क्षणिक दर्शन होतं. पुढे चालत राहिल्यास तास दिड तासात  इर्शाळवाडी दिसू लागते.



           इर्शाळवाडी हे गडाच्या पायथ्याचं छोटं आदिवासी गांव. शहरापासून जवळ असूनही मागासलेले. गावात सुखसुविधा आजून पोहचायच्या आहेत. इथं भातशेती मात्र विपुल करतात. गावचे तरुण दिवसभर क्रिकेटच्या मॅच मध्ये रंगलेले दिसतात. असो.


           इर्शाळवाडीतुन दिसणारा गड उजवीकडे ठेवून, वाट गडाला वळसा मारण्यासाठी डावीकडून पुढे जाते. गाव सोडताच, गावाबाहेर पाऊल वाटेवरच्या उतारावर गडाची अधिष्ठाती 'श्री विशाळा' देवीचं छोटं देऊळ आहे. विशाळा देवीच्या नावावरून गडाला "इर्शाळगड" नांव पडलं असावं. 

श्री विशाळा  देवी 

            ही वाट पुढे गडाच्या डाव्या बाजूनं चढाची तीव्र वळणं घेत एका सपाटीवर पोहोचते आणि या इर्शाळ माचीवरून समोर इर्शाळचा महाकाय सुळका नजरेत येतो. 





                                    इर्शाळ माचीवरून 



         पठारावरून पुढे सुळक्याकडे जाऊन वाट पुन्हा डावीकडे जाते ते थेट गडाच्या मागच्या बाजूला पोहचतो. सुरवातीला इर्शाळवाडीतून गड समोरच दिसतो पण जाण्याची पाऊलवाट व गडचढाई मात्र मागून, फिरूनच करावी लागते.



           पुढे नजरेसमोर प्रचंड दरीपलीकडचा  प्रबळगड ठेवून वाट थोडी उतार होत इर्शाळच्या कातळाला समतल जाते. इथे एक भला मोठा तुकडा या कातळपासून सुटून डोंगरा लगतच उतारावर स्थिरावला आहे. या दोन्हींच्या मधून जेमतेम एखादी व्यक्ती अंग चोरून पलिकडं सरकेल इतकी चिंचोळी वाट उरली आहे.निखळलेला आणि जिथून निखळला त्या कातळाच्या पृष्ठभागावर निळसर हिरवा रंग दिसतो. अशाच नैसर्गिक टिकाऊ रंगांचं मिश्रण ई. स. पूर्व दुसऱ्या शतकातील औरंगाबाद येथील अजिंठ्यासारख्या लेण्यातील चित्रे रंगवण्यासाठी वापरलं असावं.

कातळामधील चिंचोळी वाट 


खंडकांवरील रंग 

         वाट पुढे उजवीकडे वळून, मोठमोठ्या दगडातून अवघड टप्पे चढत  कातळावर जाते. उजवीकडे वळण्याआधी आपण पुढे सरळ गुहेत जावू शकतो, पण  गुहेची वाट जीवावर बेतणारी  असल्यानं ती अलीकडेच बंद केली आहे. कातळावर चढाई करण्यापूर्वी उजवीकडं उतारावर एक पाण्याची टाकी कोरली  आहे. त्यात पावसाचं  पाणी जमा होतं. गडावरुन टेहाळणी करणाऱ्यास त्या पाण्याचा उपयोग होत असावा. 


पाण्याची  कोरलेली टाकी 

           पुढे कातळाच्या तीव्र उतारावर चार पायंड्यांची शिडी बसवली आहे. ती सांभाळून चढल्यावर आणखी एक कठीण आणि धोकादायक उभा चढ आहे. इथेही एक डळमळणारी,अरुंद आणि अर्धवट उंचीची शिडी बसवली आहे. शिडीच्या टोकावरून पुढचा कातळ अतिशय सावध, तोल सांभाळत एक एक करून चढावं लागतं. शिडीच्या पायंड्या दोरीनं बांधल्या असून त्या वरखाली, तिरकस झाल्या आहेत. शिडी अरुंद आणि कातळालगत खाचेत अडकवल्यानं, चढता उतरताना तोल पूर्ण बाहेरील बाजूस दरीकडे राहतो. अगदी थोडीशी घाई किंवा या उंचीमुळं क्षणभर संयम सुटल्यास जीवावर बेतू शकतं. बरेच नवखे या शिडीपासून माघारी फिरताना दिसतात. 

         सह्याद्रीत विशेषतः ऑफबीट ट्रेकला शेवटी शेवटी असे अवघड आणि धोकादायक टप्पे नक्कीच अनुभवायला येतील. 








            शनिवार-रविवारी मात्र या शिडीजवळ भगव्या कफनीत एक म्हातारा उभा असतो. शिडी तीच आहे, फक्त तो खाली उभा राहून चढणाऱ्या, उतरणाऱ्यांना तोंडी मानसिक धीर देत असतो. गड चढून उतरल्यावर आपण त्याला जे प्रेमानं देऊ, ते तो घेतो. कधीकाळी अचानक अडचण उद्भवल्यास खाली इर्शाळवाडीत मदतीसाठी त्याच्यामार्फत वर्दी देऊ शकतो. इतर दिवशी तो तिथं असेलच याची खात्री देता येत नाही.


            दोन्ही शिडींच्या मध्ये उतारावर असताना, आधीच वर गेलेला 'मुसाफिर' ग्रुप उतरू लागला आणि आम्हाला त्या अवघड जागी अर्धा तास अवघडून उभं राहावं लागलं. त्याच वेळी खालून अंधेरीचे 'टीम किल्लेदार' ट्रेकर्स आले आणि त्या धोकादायक, अपुऱ्या जागेत गर्दी झाली. एखाद्याची थोडीशी चूकही इतरांना भोवते तसं  आमच्यासाठी ते धोकादायकच होतं, पण इलाज नव्हता.

           'टीम किल्लेदार' खाली असल्यानं आम्हाला वर चढाई करण्यास त्यांची मदत झालीच.

शिडीचे टप्पे 


                                                             

         दोन्ही टप्पे  वर चढुन आलो की आपण सरळ नेढ्यात पोहोचतो. हे नेढं म्हणजे डोंगराच्या कातळाला नैसर्गिक रीतीनं पडलेलं छिद्र.. सह्याद्रीत अशी बरीच नेढी आहेत. 
            येणाऱ्या वाटेकडं पाठ करून या नेढ्यात उभं राहिलं की खाली इर्शाळवाडी दिसते. समोर मोर्बे धरणाचा  जलाशय अगदी लहान वाटू लगतो, आणि त्या समोरील विस्तृत परिसर नजरेसमोर येतो. उजव्या हाताला दूरवर धुक्यात कर्नाळा दिसतो. वातावरण नितळ असेल तर तो कॅमेऱ्यातही घेता येईल. 
          तर मागे प्रचंड दरीपलीकडचा प्रबळगड नजरेत आणखीनच 'प्रबळ' दिसतो. प्रबळ च्या मागेच माथेरान डोंगर, बेलाग चंदेरी आणि दूरवर मलंगगड असा सारा परिसर नजरेच्या टप्प्यात येतो. 


नेढयातून दिसणारा उजेड 



गड माथ्यावरील  नेढं
गड माथ्यावरील  नेढं

         इथं वाऱ्याचा मारा इतका आहे की नेढ्यात जपूनच उभं राहावं लागतं. इथला घोंगावणारा वारा आम्ही रायगड, लोहगडलाही अनुभवला नाही. मध्ये कुठलीच आडकाठी नसलेल्या मोर्बे जलशयावरून, पाण्याचा गारवा घेऊन थेट इर्शाळला भिडतो. कॅमेऱ्यात व्हिडीओ घेताना त्याचा रुद्र आवाज अनुभवता येतो. 



          या वाऱ्याच्या माऱ्यामुळंच झीज होऊन या अजश्र कातळाचे छोटे मोठे भाग निखळत असावेत. हे नेढं आणि आधी उल्लेख केलेला वाटेवरचा मोठा कातळ असाच निखळला असावा. आम्ही इथं हा अवघड टप्पा चढुन नेढ्यात येण्यापूर्वी असाच एक वर खडकाचा  छोटा तुकडा निखळून वेगानं खाली आला आणि 'टीम किल्लेदार' मधील एकाच्या उजव्या हाताला चाटून गेला. जखम झालीच पण थोडक्यात निभावलं. त्यावेळी आम्ही तिथंच होतो. 


खाली टीम किल्लेदारचा जखमी ट्रेकर 


            नेढं ओलांडुन वाट डाव्या बाजूला एक छोटा पण सोपा कातळ चढून नेढ्यावरील सपाटीवर येते आणि सरळ आकाशाला गवसणी घालणाऱ्या सुळक्याच्या पायाशी येऊन संपते. वर कातळालगतच कोरलेली पाण्याची टाकी आहे. सुळक्यावर  चढाई करण्यासाठी मात्र दोर आणि प्रस्तरारोहण (रॅपलिंग ची) कला आणि त्या साहित्याची गरज आहे.

       कोरलेल्या पाण्याच्या टाकीवरून इर्शाळगडचा टेहळणीसाठी उपयोग केला जात असावा. इतिहासात 'इर्शाळ'चा विशेष उल्लेख नाही. पण 1666 च्या मे मध्ये शिवरायांनी कल्याण, भिवंडी आणि रायरी पर्यंतचा मुलुख ताब्यात घेतला. त्यावेळी इर्शाळगड स्वराज्यात सामील झाला. 

        गडपायथ्याला असलेलं 'चौक' हे राजा शिवछत्रपतींचे निकटवर्ती आणि शत्रूच्या उरात धडकी भरवणारे, स्वराज्याचे पहिले सरसेनापती नेतोजी पालकर यांचं जन्मगांव आहे. आणि महाराजांची तीसरी पत्नी, पुतळा राणीसाहेब याच पालकर घराण्यातील होत..

                                 || श्री कृष्णार्पणमस्तू || 
येथे - जयवंत जाधव  

Wednesday, 11 November 2020

पेठ - कोथळीगड (Peth Kothaligad)

       आदल्या रात्री आम्ही'इर्शाळगड'ची तयारी केली आणि ऑक्टोम्बर परतीच्या पावसानं रात्रभर जोर धरला. त्यामुळं थांबायचं ठरलं. ट्रेक स्थगित झाला. सकाळी सगळे आरामात उठलो. पाऊस थांबला होताइतकी तयारी केलीय, बेत ठरलाच होता तर पावसामुळं इर्शाळगड नाही पण बाहेर पडून दुसरा करू असा मुलीनं हट्ट धरला

         आमचं आटपेपर्यंत पत्नीनं खायचं बनवलं. सकाळचे नऊ वाजले होते. उशीर तर झालाच होता. निघालो आणि आमच्या राहत्या पनवेल जवळचाच 'भिवगड' ठरवून 'गौरकामत' गावात पोहचलो. इथे साडेदहा झाले. इथपर्यंत आलोच तर पुढचा थोडा परीक्षा घेणारा का नको, म्हणून सौभाग्यवती पत्नीनं ऐनवेळी 'कोथळीगड' आम्हा तिघांच्या गळी उतरवला.

       पुन्हा पुढे २५ किमीचा प्रवास करत भरदुपारी बारा वाजता आंबेवाडी गाठली. त्यापुढे कोथळीगड पायथ्याचं आदिवासी 'पेठ' गांव चार किमीवर आहे. आधी पुढे पायथ्याच्या पेठ पर्यंत गाडी जाईल असं वाटलं, पण डोंगरातील चढणीचा निमुळता रस्ता बऱ्याच ठिकाणी पावसानं वाहून गेला तर कुठे घळीत खचला होता. गाडीसाठी तसा धोकादायक होता.

प्रवेशदारावरील  'शरभ' आणि बाजूला 'गणेश' शिल्प


        निर्णय बदलला, पुन्हा परतलो आणि गाडी आंबेवाडी सोडून झुडुपात कोणाच्या नजरेस सहसा येणार नाही अशी पार्क केली. पुढे सहयादीच्या कर्जत डोंगररांगेतील ३१०० फूट उंचीवर असलेल्या 'कोथळा'गड आणि त्याआधी चार किमी वरील गडपायथ्याचं 'पेठ' असा आम्ही मोहरा वळवला
                


समोर दिसणारा 'कोथळीगड' 

  

Kothaligad
आंबेवाडी ते पेठ   

 
        नुकताच पावसाळा सरून परतीच्या बेभरवशाच्या सरींचे दिवस होते. त्यात ऑक्टोबरची गर्मी आणि डोक्यावर कडक उन्हातून मिळेल तिथे सावली घेत, दमछाक करत डोंगर चढुन 'पेठ' गाठलं. पेठ हे कर्जत तालुक्यातील किल्ले 'कोथळी' गडपायथ्याचं छोटं आदिवासी गांववस्ती म्हणता येईल. आंबेवाडी ते पेठ पर्यंत चालत तास दीडतास लागतोच. आम्ही पोहोचलो त्यावेळी गावात भात कापणी चालू होती. गावाबाहेर एका बंद घराच्या पडवीत कापून ठेवलेलं भात बाजूला करून आम्ही आमचं खाणं आटोपलं आणि अर्ध्या तासातच दुसऱ्या अवघड टप्प्याला सुरवात केली.

'पेठ' गावातून दिसणारा कोथळीगड किल्ला 
                               
     गावाबाहेरच किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर 'किल्ले पेठ कोथळीगड'चा बोर्ड दिसतो. गांव सोडतात पुढे एका दगडावरून दुसऱ्यावर उंच पाय टाकत जाणारी वाट दमछाक करते. एक दाम्पत्य आम्हाला पेठ गावात पोचण्याआधीच अर्धवट वाटेतून परत येताना वाटेवर भेटलं.


      पुढचे टप्पे चढताना मात्र शारीरिक कस लागतो. वाटेवर चाफ्याची झाडं थोडा गारवा देतात पण होणाऱ्या दमछाकीनं पाणी खूप लागत होतं. वर तिरकस तर कधी सरळ चढणारी वाट सावध, सांभाळून चढावी लागली. गडमाथ्याजवळ कारवीची उंच झुडपं आहेत ती गडपठाराचा अंदाज लागू देत नाहीत. पायथ्याच्या पेठ गावातून गडावर पोचण्यास तासभर लागतो.

किल्ले 'कोथळीगड' 

       संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत मोगलांनी या छोटेखानी किल्ल्यास जिंकण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण किल्ल्याच्या नैसर्गिक कतळकड्याच्या तटबंदीनं दाद दिली नाही. पुढे मोगलांना फितूर झालेल्या मानकोजी पांढरे सरदाराच्या मदतीनं,फितुरीनं गडाची दारं उघडली आणि झालेल्या हातघाईत मराठ्यांना गड गमवावा लागला. त्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी मराठ्यांनी त्याच भीषण कातळकड्यांना दोरांच्या शिड्या लावून आत घुसण्याचा प्रयत्न केला.बंदूक आणि बाणांचा वापर झाला. खूप रक्तपात झाला,पण यश आले नाही. 

प्रवेशदारातून गडमाथ्यावर येणारी वाट 

        पुढे दुसऱ्या बाजीरावांच्या कारकिर्दीत हा गड मराठ्यांकडे आला. सुमारे एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत या गडावर वहिवाट होती. त्यानंतर ती गडपायथ्याला 'पेठ'गावात वसली.
     
      गडपठारावर पोहचताच किल्ल्याचा एकमेव बुरुज भगवा फडकावीत स्वागत करतो. पुढे पायऱ्यांचे आणि प्रवेशदाराचे अवशेष दिसतात. त्यापुढे गडाच्या कातळात कोरलेल्या गुहा आहेत. वर बुरुजावर कातळात एक प्रशस्त मोठी गुहा आहे. परंतू ती वस्ती करण्यायोग्य नाही.
 
      कातळ बुरुजाच्या सुरवातीला पहिली देवीची गुहा आहे. त्यापुढे दगडात कोरलेल्या पाण्याच्या टाक्या आहेतबाजूला भैरोबाची गुहा दिसते.
 
      भैरोबाची गुहा मोठी प्रशस्त असून आत छताला आधार देणारे सुबक कोरीव दगडी खांब आहेत.           

भैरोबाची गुहा 

 
भैरोबाची गुहा, खांबावरील कोरीव नक्षीकाम 
        
        दसऱ्यात घटस्थापनेच्या दिवसात 'पेठ' चे रहिवाशी गडावरील इथल्या देवीचं नऊ दिवस जागरण करतात आणि रात्री गडावरील गुहेतच वस्ती करतात. नवरात्रीत आमचं तिथं जाणं निव्वळ योगायोग होता.        

लक्ष्मी देवीची गुहा 
         

         बाजूलाच दुसऱ्या गुहेतून गडमाथ्यावर जाण्यासाठी कातळाच्या आतून पायऱ्या कोरल्या आहेत.काही जुने तोफेचे गोळे आहेत.सुरवातीच्या पायऱ्या तुटल्यामुळं काळजी घ्यावी लागते. उभ्या चढाच्या उंच पायऱ्या कातळच्या पोटातून वळसे घेत गडमाथ्याच्या प्रवेश दाराजवळ पोहचतात. या उभ्या चढच्या पायऱ्या मात्र दम काढतात.

 
किल्ल्याच्या कातळात  कोरलेल्या पायऱ्या. 

                 बालेकिल्ल्याच्या दाराजवळ पोहोचण्याआधी एक छोटा आणि धोकादायक टप्पा पार करावा लागतो. गडमाथ्याच्या प्रवेशदाराची कमान दगडात कोरलेली आहे. चौकटीच्या बाजूला कातळावर 'शरभ' कोरलेलं असून बाजूला 'गणेश' मूर्ती कोरली आहे. सध्या गणेशमूर्ती भग्नावस्थेत दिसते.                              

बालेकिल्लाचे प्रवेशद्वार 

       प्रवेशदार लाकडी असून त्यावर टोकदार लांब खिळे आहेत. ते नजीकच्या काळात केल्याचा अंदाज येतो. पुढे पायऱ्या चढून गडमाथ्यावर जाता येतं. गडमाथा लहान असून सध्या त्यावर पावसाळ्या नंतर उगवलेलं रान आणि झुडपं माजली आहेत. 

         गडमाथ्यापर्यंतची वाट काही टप्प्यात काळजीपूर्वक चढावी लागून दमछाक करणारी तर काही ठिकाणी धोकादायकही आहे.


मराठ्यांच शस्त्रागार इथं होतं 

      गडमाथ्यावरून माणिकगड, इर्शाळगड, प्रबळगड आणि माथेरानचे डोंगर असे विहिंगम दृश्य दिसतं. धुक्यामुळं चंदेरी आणि त्या पलीकडील मलंगगड मात्र धूसर दिसतात.




         या उंचीवरून समोरचा अफाट परिसर आणि निसर्ग बघून मन तृप्त होतं. आणि इथं पोचण्यासाठी केलेली पायपीट, दगदग विसरून जातो

         परतीच्या वेळी गडावर असतानाच अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. भिजत भिजतच आम्ही खाली पेठ गावात पोहोचलो. मुळात सुरुवातीलाच आम्हाला गड चढायला उशीर झाला. त्यात संध्याकाळी मावळतीला जोरदार पाऊस आणि अंधारून आलं. मोठी अडचण निर्माण झाली. आम्ही आज पेठ गावातच राहण्याची चौकशी केली. तसा एक टपरीवाला टेंट टाकून देण्यास तयार झाला, पण आमचे बदलीचे कपडे मात्र आंबेवाडीत गाडीत राहील्यानं ओल्या कपड्यात रात्र काढणं जीवावर आलं. काहीही करून आंबेवाडी गाठणं गरजेचं होतं. अंधारामुळे हाताशी वेळही कमी होता. त्यामुळं मनाचा हिय्या करुन मुसळधार पावसात भिजत,दगड धोंडयातुन ठेचकाळत निघालो. मुसळधार पावसामुळे टॉर्चचाही वापर करता येत नव्हता. हा आमच्यासाठी अनपेक्षित आणि भन्नाट अनुभव होता. दिवसभर दमून पुढे अंधारातून दगड चिखलातली आंबेवाडीपर्यंत निर्जन दाट जंगलातली केलेली चार किमीची पायपीट मात्र आमच्या कायमची लक्षात राहिली.. 
               || श्री कृष्णार्पणमस्तू ||

येथे - जयवंत जाधव  

दुर्गश्रीमंत - 'किल्ले अवचितगड', ता. रोहा, रायगड, महाराष्ट्र. 'Avchitgad Fort', Raigad, Maharashtra.

                  दक्षिणोत्तर पसरलेल्या सह्याद्रीची एक पश्चिम डोंगररांग 'रोह्या'कडे आली आहे. 'रोह्या'च्या उत्तरेकडून जाणाऱ्य...