Saturday, 29 January 2022

प्रबळगड (Prabalgad Fort)

                    बरेच भटके कलावंतीण सुळका आणि 'प्रबळ' ठरवून येतात, पुढे प्रबळचा पसारा बघून  त्यातूनही बरेच माघार  घेताना दिसतात. किल्ले प्रबळचा स्वतःचा आवाका मोठाच म्हणावा लागेल. पायथ्याच्या ठाकुरवाडीपासून प्रबळवाडी आणि पुढे 'बैलशिंग' खिंडीतून प्रबळमाथा ही चढाई मुळी  तीन - चार तासांची आहे. पुढे दाट जंगलातून प्रबळचं पठार फिरण्यास दोन तीन तास लागतातच. प्रबळमाथ्यावर जाऊन येवून पाच किलोमीटर असलेल्या काळ्या बुरुजाला भेट देवून, पुन्हा पायथ्याची ठाकूरवाडी गाठणं नक्कीच सोप्पं नाही. दिवसभर तंगडतोड करायला लावणारी ही भटकंती आहे. 

'प्रबळ' (कलावंतीण वरुन)

                    सह्याद्रीच्या माथेरान डोंगररांगेतील या २३०० फुट उंचीच्या प्रबळचं प्रथम दर्शनच मुळी अवाढव्य, राकट, त्याचे नियम मोडल्यास निर्दयी आणि आजपर्यंत आम्ही सहकुटुंब केलेल्या प्रयत्नात हुलकावणी देणारा म्हणावा लागेल. जुना मुंबई पुणे हायवेवर पनवेल सोडल्यास पहिलं डावीकडं लक्ष वेधून घेतो तो किल्ले प्रबळ आणि त्यापुढेच अगदी समोर किल्ले ईर्शाळगड.

कलावंतीण कडून बैलशिंग खिंडीकडे जाणारी कातळवाट 

प्रबळमाचीवरुण डावीकडे कलावंतीण, उजवीकडे प्रबळ (Prabalgad Fort)
           

               प्रबळ आणि कलावंतिणचा रस्ता मुंबई - पुणे हायवेवर पनवेल सोडल्यास, १० किमी वरील 'शेडुंग' फाट्यापासून डावीकडं गडपायथ्याची ठाकूरवाडी आणि त्यापुढं तासभर प्रबळवाडी पर्यंत एकच आहे. सध्या प्रबळवाडीत जेवणाची राहण्याची सोय आहे. प्रबळवाडी पासून तासाभराची एक पायवाट पश्चिमेकडे प्रबळला समांतर जाते ती 'बैलशिंग' खिंडीत येते. तर कलावंतिण कडून यायचं झाल्यास, कलावंतिण - प्रबळमधील इंग्रजी 'V' आकाराच्या खिंडीपासून कातळकाठानं, दगडधोंडयातून दुसरी तासाभराची वाट याच 'बैलशिंग' खिंडीत येऊन मिळते. कातळापासून सुटलेल्या या धारदार दगडांच्या वाटेवर सावध पावलं टाकावी लागतात.

             गडाच्या उत्तरेकडील 'बैलशिंग' खिंड हीच प्रबळच्या माथ्यावर जाणारी एकमेव वाट म्हणावी लागेल. या खिंडीचा दुरून अंदाज येत नाही. दोन कातळ डोंगरांच्या मध्ये मोठमोठ्या दगडांची झालेली घसरण आणि चहाची टपरी, हीच या खिंडीतून प्रबळ माथ्यावर जाणाऱ्या वाटेची ओळख समजावी. ही वाट म्हणजे एकावर एक उभे दगड, आणि ते सर करत गडमाथा गाठणं इतकंच म्हणावं लागेल. दमछाक झाल्यावर खिंडीतला हा तिसरा उभा टप्पा शरीर पिळवटून टाकणारा आहे. आणि कदाचित या कारणामुळंच बरेच ट्रेकर्स प्रबळ समोर गूढघे टेकत असावेत.

कलावंतीण ते बैलशिंग खिंडीकडे 

      

                 प्रबळवर पाण्याचं दुर्भिक्षच म्हणावं लागेल. माथेरान आधी इंग्रजांनी थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रबळचा विचार केला होता, पण तिथल्या पाण्याच्या कमतरतेमुळं ते झालं नाही. सध्या माथेरानच्या सनसेट पॉइंटवरून पश्चिमेचा सूर्य, दूरवर एका इंग्रजी 'V' आकाराच्या डोंगरखाचेत अस्ताला जाताना दिसतो. ही खाच म्हणजेच प्रबळगड आणि त्या लगत खेटलेला कलावंतिण शिखराचा सुळका होय.
 
माथेरानच्या सनसेट पॉइंटवरून दिसणारी प्रबळ आणि कलावंतीणची 'V' आकाराची खाच (Prabalgad Fort)

 

                 या खाचेलगत डावीकडं कातळात खोदलेली गुहा दिसते. एका वेळी एकजण गूढघ्यावर रांगत आत शिरेल इतकी ती अरुंद, तर आत दूरवर खोदलेल्या गुहेत खोलीसारखी कमी उंचीची जागा दिसते. तर अशीच दुसरी कातळात खोदलेली गुहा बैलशिंग खिंडीच्या तोंडावर, डाव्या बाजूला, खिंड चढायला सुरुवात करण्यापूर्वी दिसते. प्रबळच्या कातळ पायथ्याला असणाऱ्या या दोन गुहा बौद्धकालीन असाव्यात असा अनुमान निघतो.

बैलशिंग खिंडीजवळील गुहा (Prabal Fort)

 

   
कलावंतीण जवळील बौद्धकालीन गुहा  

    
           या बौद्ध कालखंडानंतर येणारे शिलाहार, यादव राजवटींनी या गडास लष्करी चौकी बनवून त्यास 'मुरंजन' नांव दिलं. त्यावेळी पनवेल, कल्याण या प्राचीन बंदरांवर लक्ष ठेवण्यासाठी या चौकीचा वापर केला असावा. पुढे बहामणी काळात तो अधिक उदयास आला. नंतर तो अहमदनगरच्या निजामानं ताब्यात घेतला. मुघल सम्राट शहाजहान आणि विजापूरच्या आदिलशाहनं तह करून निजामशाही बुडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी निजामशाहीत असताना, शहाजीराजांनी निजामशाही वाचविण्यासाठी त्याच्या वारसाला घेवून कोंढाणा, मुरुंबदेवाच्या डोंगरात निघून गेले. 

                पुढे जंजिऱ्याच्या सिद्धीनं आणि चौलच्या पोर्तुगीजांनी शहाजीराजांना मदत नाकारल्यावर, ते जिजाऊ आणि बाल शिवरायांना घेवून ससैन्य मुरंजनवर गेले. शिवाजीराजे अवघे सहा वर्षाचे असतानाच त्यांचे पाऊल मुरंजन म्हणजे प्रबळला लागले होते. पुढे माहुलीच्या तहानुसार गड मुघलांच्या ताब्यात राहिला, पण प्रत्यक्षात सत्ता विजापूरच्या आदिलशाहचीच राहिली. 
                 १६५६ ला शिवरायांनी जावळीच्या चंद्रराव मोरेंना हरवून जावळी ताब्यात घेतली, त्याचवेळी शिवरायांचे शूर सरदार आबाजी महादेव यांनी कल्याण, भिवंडी ते रायरी पर्यंतचा मुलुख स्वराज्यात आणला आणि मुरंजन स्वराज्यात सामील झाला. गड ताब्यात आल्यावर शिवरायांनी मुरंजनचे नांव बदलून 'प्रबळगड' असे ठेवले. १६६५ च्या पुरंदर तहानुसार प्रबळगड मुघलांना देण्यात आला. पण औरंगजेबच्या आग्र्यातील कपटी घटनेनंतर तो तह मोडीत काढून मराठ्यांनी प्रबळ पुन्हा जिंकून घेतला. त्यावेळच्या लढाईत राजा जयसिंगाने नेमलेला प्रबळचा किल्लेदार केशरसिंह हाडा हा राजपूत धारातीर्थी पडला. तत्पूर्वी किल्ल्यावर राजपूत स्त्रियांनी जोहर केला. किल्ल्याच्या झडतीत सापडलेल्या केशरसिंहची आई आणि दोन मुलांना राजांनी देऊळगावी असलेल्या मोघली छावणीत सन्मानानं पाठवून दिलं. पुढे किल्ल्याच्या खोदकामात बरीच संपत्ति राजांच्या हाती आली. 
बैलशिंग खिंड (Prabalgad Fort)
बैलखिंडीची टपरी, प्रबळगड 

                    











                   बैलशिंग खिंडीतून गडमाथा गाठताना वर सुरुवातीला उध्वस्त महादरवाजा दिसतो. आधी तो मातीखाली दबला गेला होता, स्थानिकांच्या मदतीनं तो आता थोडाफार मोकळा केल्याचं दिसतं. या दरवाजाच्या उजव्या बाजूला उतारावर कातळात कोरलेली पाण्याची टाकी दिसते. महादरवाजाच्या आतील बाजूस चहाची आणि विसावा घेण्यासाठी टपरी दिसते. प्रबळवाडीतील एक दाम्पत्य ही टपरी चालवताना दिसतं. शेगडीसाठी लागणारं गॅस सिलेंडर प्रबळवाडीतून ही बैलशिंग खिंड चढून डोक्यावरून आणलं जातं. त्यांची मेहनत बघून, तिथं पोहोचणारा प्रत्येक भटक्या त्यांना सलाम करत असावा.
महादरवाजा (Prabalgad Fort)

उद्ध्वस्त महादरवाजा (Prabalgad Fort)
   
 

महादरवाजातुन दिसणारा किल्ले कर्नाळा (Prabalgad Fort)

             महादरवाजाच्या वरच्या बाजुनं डावी उजवीकडं  पायवाटा जातात. डावीकडील पायवाट दाट झाडीतून गडावरुन नैऋत्येला कलावंतिण सुळक्याच्या दिशेनं जाते, आणि वीस मिनिटात एका कड्यावर येऊन संपते. कलावंतिण सुळका प्रबळपेक्षा उंचीनं काहीसा कमी असल्यानं, प्रबळच्या ईशान्य कड्यावरून कलावंतिणचं धडकी भरवणारं दृश्य दिसतं. या कड्याला संरक्षित कुंपण नसल्यानं काळजी आणि सावधानता बाळगावी लागते. 

प्रबळच्या कड्यावरून कलावंतीण 

 

                 महादरवाजाकडे मागे येऊन उजवीकडील पायवाटेवर अर्ध्या तासाच्या चालीनंतर गडावरील उध्वस्त अवस्थेतील चार वाड्यांचे अवशेष दिसतात. वाड्यांच्या अवतीभोवती मोठमोठी झाडं आणि घनदाट वाढलेलं जंगल दिसतं. वाड्यासमोरून जाणाऱ्या पायवाटेवर जंगलातून पुढे उजवीकडं वळल्यास, ढासळलेल्या आणि त्यावर वाढलेल्या झाडांनी एक समाधी दिसते.

वाड्याचे अवशेष (Prabalgad Fort)

  

उद्ध्वस्त समाधी (Prabalgad Fort)
   

उद्ध्वस्त वाड्याचे अवशेष (Prabal Fort) 
                त्यापुढेच जंगलात उघड्यावर पडकं गणेश मंदिर दिसतं. मंदिराचा चौथरा, भिंती उध्वस्त असून, लाकडी मंडपावर पत्रे बसवून आडोसा केलेला दिसतो. गाभाऱ्याच्या ठिकाणी शेंदूर लावलेली गणेश मूर्ती आणि दुसऱ्या एका देवतेची भग्न मूर्ती दिसते. गणेश मूर्तीच्या मागे भग्नावस्थेतील शिवलिंग दिसतं. मंदिरासमोर मंडपात भग्न नंदी आणि मंदिराबाहेरच वाटेवर आणि मंदिराकडे तोंड करून दूसरा भग्न नंदी दिसतो. मंदिर मंडपातील दिसणाऱ्या पताका आणि आकाश कंदिलावरून, दसरा दिवाळीत आणि सणावाराला इथं पूजा होत असावी.                   
गणेश मंदिर (Prabalgad Fort)

                              मंदिराच्या पुढे दोन मिनिटांवर डावीकडं गडावरील सर्वात मोठं तळं दिसतं. आता ते गाळ आणि गवतानं भरलेलं आहे.

Prabalgad Fort 

 
प्रबळवरील तळं (Prabalgad Fort)

               
प्रबळवरील जंगल (Prabalgad Fort)

                 










                   या तळ्यापुढेच वीस मिनिटांवर एक किल्ले ईर्शाळ कडे जाणारी डोंगराची सोंड असून बाजूलाच उद्ध्वस्त दरवाजा दिसतो. 'बोरीची सोंड' म्हणून तिला ओळखलं जातं. या डोंगराच्या सोंडेवरून किल्ले ईर्शाळ दोन तासात गाठता येतो. हा मार्ग खूपच धोकादायक असून, इथून ईर्शाळला जाताना बरेच ट्रेकर्स फसले आहेत तर काहींना रेस्क्यू ऑपरेशन करून वाचविलेल्या बातम्या मिळतात. रेंज ट्रेकर्स इथून प्रयत्न करताना दिसतात. या  सोंडेवरून किल्ले कर्नाळा, ईर्शाळगड, मोरबे जलाशय आणि माणिकगड असा भव्य परिसर दिसतो.

 

बोरीची सोंड, समोर ईर्शाळ आणि डावीकडे मोरबे जलाशय (Prabalgad Fort) 

 

काळ्या बुरुजाजवळून दिसणारा इर्शाळ   

                   त्यापुढेच अर्ध्या तासाच्या अथक वाटचालीनंतर प्रबळच्या पूर्वेचं शेवटचं टोक आणि नामचीन 'काळा बुरूज' दिसतो. काळ्या कातळचे दगड बुरुजाला वापरले असल्यानं एकूण बुरुज काळाभिन्न दिसतो. रंगावरून याला 'काळा बुरूज' नांव पडलं असावं. या बुरुजाजवळूनही गडउतार होण्यासाठी चोर वाट आहे. सध्या तिची पडझड झाल्यानं धोकादायक आहे. काळ्या बुरुजावरून ईर्शाळ, मोरबे जलाशय आणि माथेरानचे विविध पॉईंट्स दिसतात.    

              प्रबळची भव्यता किल्ले ईर्शाळवरून दिसते. मागील ईर्शाळच्या भेटीत ती आम्ही अनुभवलीच. किल्ले ईर्शाळच्या भटकंतीचा अनुभव https://sahyadri300.blogspot.com/2020/11/irshalgad.html या लिंकवर लिहिला आहे. 
 
 ईर्शाळच्या भेटीत ईर्शाळवरून दिसणारा किल्ले प्रबळ आणि ईर्शाळकडे येणारी बोरीची सोंड 

                किल्ले प्रबळच्या चढाईचे टप्पे आणि त्याच्या पसाऱ्यामुळं, 'रेंज ट्रेकर्स' वगळता भटक्यांची भटकंती प्रबळच्या गडमाथ्यापर्यंतच थांबताना दिसते. प्रबळला प्राचीन इतिहास असूनही त्याचा शोध, अभ्यास अपुराच राहिलाय. प्रबळच्या निबीड जंगलातल्या फसव्या वाटा, उद्ध्वस्त तटबंदी, वाडे तसेच पाण्याचं दुर्भिक्ष हे सगळं मुंबई - ठाण्यापासून जवळ आणि मोक्याच्या जागी असूनही' किल्ले प्रबळ' दुर्लक्षित राहिलाय असं म्हणावं लागेल.. 
                                     || श्री कृष्णार्पणमस्तु ||
येथे - जयवंत जाधव     
     

दुर्गश्रीमंत - 'किल्ले अवचितगड', ता. रोहा, रायगड, महाराष्ट्र. 'Avchitgad Fort', Raigad, Maharashtra.

                  दक्षिणोत्तर पसरलेल्या सह्याद्रीची एक पश्चिम डोंगररांग 'रोह्या'कडे आली आहे. 'रोह्या'च्या उत्तरेकडून जाणाऱ्य...