मुंबईचं दक्षिण टोक 'मलबार हिल'. समुद्रालगत असलं तरी मुंबई शहरातील हे उंच ठिकाण. छोट्या मोठ्या टेकड्यांच मिळून असलेलं हे जुनं बेट. मुंबईच्या मूळ सात बेटांपैकी एक. १६६१ ला पोर्तुगीजांची राजकन्या 'कॅथरीन'चं इंग्लंडचा राजा 'चार्ल्स दुसरा' याच्याशी लग्न झाल्यावर त्याला हुंड्यात मिळालेली ही सात बेटं. नंतर १६६८ ला या बेटांच व्यवस्थापन 'ईस्ट इंडिया' कंपनीकडे सोपवलं गेलं. कंपनीनं आठराव्या शतकाच्या उत्तरार्धात भराव टाकून ही सर्व बेटं रस्ते आणि रेल्वेनं जोडण्याचं काम हाती घेतलं. जवळ जवळ साठ वर्षे हे काम चालू राहिलं. त्यापैकीच हे टेकडींचं एक बेट.
आज मोजक्या मुंबईकरांना क्वचित माहीत असेल की या बेटावर एक गोड्या पाण्याचं तळं आहे. आणि बाजूलाच एक महादेव मंदिरही आहे. या तलावाचा आणि मंदिराचा वारसा थेट रामायण कालावधीला जोडला गेला आहे.
 |
गोमुखातून कोसळणारा पाण्याचा स्तोत्र (Banganga) |
सीतेच्या शोधार्थ श्रीराम या ठिकाणी आले होते. कदाचित दक्षिणेस असलेल्या लंकेत जाण्यासाठी या अरबी समुद्रालगत असलेल्या या बेटांच्या टोकाला ते आले असावेत. इथं आल्यावर त्यांनी बंधू लक्ष्मणाकडे पाण्याची मागणी केली. समुद्रानं वेढलेल्या या बेटावर त्यावेळी पिण्यालायक पाणी मिळणं नक्कीच दुरापास्त असावं. त्यावेळी लक्ष्मणानं या ठिकाणी जमिनीत बाण मारून जल उत्पती केली. आणि हजारो मैलांचा भूअंतर्ग प्रवास करून गंगा अवतरली.
विश्वास ठेवायला ही घटना अतर्क्य वाटते, पण अरबी समुद्रकिनाऱ्यापासून हाकेच्या अंतरावर खाऱ्या पाण्यानं वेढलेलं असूनही एक पिण्यालायक गोड्या पाण्याचा स्त्रोत्र अखंड वाहताना दिसतो. सरासरी पाच हॉर्सपॉवरचं इंजिन खेचू शकेल इतकं पाणी तेरा त्रिकाळ या तळ्यात अव्याहतपणे जमा होताना दिसतं.
 |
श्री वालुकेश्वर (वाळकेश्वर) Walkeshwar Temple |
 |
श्री वालुकेश्वर (वाळकेश्वर) |
बाण मारून प्रकट झालेल्या गंगेस 'बाणगंगा' हे नांव पडलं. दरम्यान श्री रामांनी तिथं वास्तव्य करून शिवलिंगाची पूजा केली. तिथल्या वाळू पासून शिवलिंग तयार केलं. त्यामुळं शिवलिंगास 'वालुकेश्वर' म्हणून ओळखलं जाऊ लागलं. वालुकेश्वरचा अपभ्रंश होऊन आजचं 'वाळकेश्र्वर' झालं. सात हजार वर्षांची परंपरा असलेलं हे बाणगंगा आणि वालुकेश्वर मंदिर बऱ्याच मुंबईकरांना अपरिचित आहे.
 |
आयताकृती बाणगंगा तलाव (Banganga) |
इ. स. ११२७ ला शिलाहार राजाचा मंत्री लक्ष्मण प्रभू यांनी या तळ्याचं आणि मंदिराचं बांधकाम केलं. ते गौड सारस्वत ब्राह्मण होते. शिलाहार काळात महाराष्ट्रातील बऱ्याच किल्ल्याचं बांधकाम झालं आहे. सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी मूळ मंदिर उद्ध्वस्त केलं. १७१५ ला मुंबईचे प्रसिध्द व्यापारी राम कामत यांच्या देणगीतून मंदिराचा पुन्हा जिर्णोद्धार झाला. तर सध्या सिमेंट काँक्रिटचं मंदिर दिसतं.
 |
Temple Banganga |
पश्चिम रेल्वेचं ग्रँट रोड किंवा चर्नी रोड रेल्वे स्टेशन हे यासाठी जवळचं स्टेशन आहे. तर बेस्ट उपक्रमाचा 'वाळकेश्वर बस डेपो' इथून १० मिनिट पायी अंतरावर आहे. अरबी समुद्र किनाऱ्यापासून फक्त ५० मीटर म्हणजेच पायी दोन मिनिटांच्या अंतरावर आहे. तलावाकडे येण्यासाठी पायऱ्या उतरून यावं लागतं. मुंबईची तगमग करणारी उष्णता आणि गोंगाटापासून दिलासा देणारं हे ठिकाण आहे.
 |
Banganga |
तलाव आणि मंदिर परिसराची देखभाल आणि दुरुस्ती मुंबई महानगर पालिकेकडे आहे. तर रस्त्यावर दिवाबत्तीची जबाबदारी 'बेस्ट' च्या विद्युत विभागाकडे आहे. या पुरातन जागेचे महत्व वाढवण्यासाठी 'आर्. पी. गोयंका फाऊंडेशन' या प्रसिद्ध व्यापारी आणि सेवाभावी संस्थेनं रस्त्यावरील विद्यमान विजेचे खांब बदलून ऐतिहासिक दिसणारे खांब बसविण्याचं काम मार्च २०२२ ला घेतलं होतं. या कामासंदर्भात पाहणी आणि कार्यवाही करण्यासाठी 'बेस्ट' वीजपुरवठा विभागातर्फे माझी अधिकारी या नात्यानं बऱ्याचदा तिथं भेट झाली. आणि ऑगस्ट २०२२ ला हे काम पूर्णत्वास गेलं.
 |
घाटावरची कार्ये करणारे ब्राह्मण (Banganga Tank) |
 |
नवीन उभारलेले रस्त्यावरील विजेचे खांब |
सध्या आयाताकृती दिसणारा तलाव हा पाषाणाने बांधवून घेतलेला असून, तलावाच्या चारही बाजूंनी उतरण्यासाठी पूर्ण लांबीचे घाट बांधलेले दिसतात. पौराणिक वारसा असलेला हा तलाव 'फिजा', 'चांदणी बार' सारख्या चित्रपटात प्रदर्शित केलेला दिसतो.
नोव्हेंबर २००७ ला ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या समितीनं या ठिकाणाला चित्रपटात प्रदर्शित करण्यास हरकत घेतली होती. तशी तक्रार त्यावेळचे महाराष्ट्राचे विद्यमान गृहमंत्री कै. आर. आर. पाटील यांच्याकडे आली होती..
|| श्री कृष्णार्पणमस्तु ||
येथे - जयवंत जाधव