'श्रीराम'. ज्यांच्या पावन पदस्पर्शानं पुनीत झालेत अशी महाराष्ट्र देशी काही ठिकाणं आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात 'हिरण्यकेशी' नदीकाठावर असंच एक पुरातन महादेव आणि राम मंदिर असलेलं सर्वदूर कीर्तीचं ठिकाण आहे. 'रामतीर्थ' नावानं ते पंचक्रोशीत ओळखलं जातं. कोल्हापूर शहरापासून दक्षिणेला ८५ किमीवर आणि आजरा तालुक्यापासून उत्तरेला दोन किमी वर असलेलं हे निसर्गरम्य ठिकाण प्रत्येक महाशिवरात्रीत गजबजुन जातं. नजीकच्या काळात शासनानं रामतीर्थास 'क' वर्ग (C Grade) पर्यटन स्थळाचा दर्जा दिला आहे.
 |
नंदी, अमृतेश्वर महादेव मंदिर, रामतीर्थ, आजरा (Ramtirth, Ajara, Dist. Kolhapur, Maharashtra) |
जैव विविधतेत संपन्न, संवेदनशील असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घाट माथ्यावरच्या 'आंबोली' गावात उगम पावलेली ही हिरण्यकेशी नदी पुढे कर्नाटकात 'घटप्रभा' नावानं ओळखली जाते. सध्या २०२० ला या हिरण्यकेशीच्या उगमाजवळ 'स्चीस्टुरा हिरण्यकेशी' (Schistura hiranyakeshi) या गोड्या पाण्यातील नवीन माशाच्या प्रजातीचा नव्यानं लागलेला शोध जगासमोर आला आहे. या संशोधनात डॉ. प्रवीणराज जयसिंहन, शंकर बालसुब्रमण्यम आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे यांचं मोलाचं योगदान आहे.
 |
'स्चीस्टुरा हिरण्यकेशी' (Schistura hiranyakeshi) नव्या प्रजातीचा मासा - Foto Courtesy by Google |
 |
हिरण्यकेशी उगमस्थान आंबोली (Ramtirth) |
 |
हिरण्यकेशी उगमस्थान आंबोली |
उगम पावलेल्या ठिकाणापासून सरासरी ३५ किमीवर 'आजऱ्या'जवळ हिरण्यकेशीच्या काठावर हे पुरातन धार्मिक रामतीर्थ आहे. वनवासात असता प्रभू श्रीरामचंद्र, माता सीता आणि लक्ष्मण इथं एक दिवस राहिले होते अशी अख्यायिका आहे.
घाटमाथ्यावरुन खाली सिंधुदुर्गाकडे, कोकणात आणि गोव्याला जाण्यासाठी आजरा हेच मुख्य प्रवेशद्वार आहे. या वाटेवर आजरा शहरापूर्वी एक किमीवर ब्रिटिश काळात बांधलेला 'व्हिक्टोरिया पूल' ओलांडल्यावर उजवीकडे वळून जाणारा पक्का रस्ता या निसर्गरम्य रामतीर्थास येतो. पावसाळ्यात इथला धबधबा आणि पाण्याचा प्रपात तसेच इथला निसर्ग अनुभवण्यासाठी पर्यटक वाट वाकडी करताना दिसतात.
सरासरी २००७ ला या तीर्थाजवळच पश्चिमेला हिरण्यकेशीवर 'सोहाळे' गावासाठी बांधलेल्या पुलामुळं पलीकडील या गावातून एक पायवाट इथं येते. तर आजरा गारगोटी रस्त्यावर असलेल्या 'साळगांव'च्या बंधाऱ्यावरून पण सध्या प्रचलित नसलेली आणि महाशिवरात्रीत वापरली जाणारी जंगलातून दुसरी पायवाट इथं येते.
 |
साळगांव बंधारा (Salgaon Bridge) Ramtirth |
सध्याच्या घनदाट जंगलामुळं रानगवे, भेकरं, रानडुक्कर, हत्ती, मोरांचा इथं वावर असतो. पहाटे या वाटेवर रानगवे, रानडुक्कर दर्शन देताना गावकऱ्यांनी बघितल्याचं सांगतात. तर कित्येक रात्री गारगोटीला जाणाऱ्या आजरा साळगांव रस्त्यावर गवू रेडे आडवे उभे असता लोकांनी पाहिलेत. या जंगलाच्या आसऱ्यानं राहणाऱ्या जनावरांमुळं दिवसा सुध्दा एकट्या दुकट्यानं या जंगलातील वाटेनं रामतीर्थाला जाताना सावधानता बाळगावी लागते.
 |
गवू रेडा (Ramtirth) |
 |
रामतीर्थ जंगल (Ramtirth Forest) Ramtirth
|
आजऱ्याकडून येणारा रस्ता सोडता सोहाळे, साळगांवा'तून इथं येण्यासाठी मोठ्या पल्ल्याचा फेरा मारावा लागतो. जंगलातील पायवाट प्रचलित नसल्यानं नवख्यांची दिशाभूल होऊ शकते. साळगांवातून वाटाड्या घेणं अधिक सोयीचं होईल. माझं जन्मगाव साळगांवातून आमच्या लहानपणी या पायवाटेनं महाशिवरात्रीत जत्रेला जाणं होत असे. आता बऱ्याच वर्षानंतर आजच्या भेटीदरम्यान मी आणि मुलगा दोघेच असल्यानं या वाटेची नव्यानं चाचपणी करायचं ठरवलं.
हिरण्यकेशीवरचा साळगांव बंधारा ओलांडल्यानंतर सरासरी एक किमीवर डावीकडं उत्तरेला घनदाट जंगलात जाणारी गाडीवाट दिसते. या वाटेवर सरासरी अर्धा किमीवर डाव्या बाजूला देसायांचं घर दिसतं. त्यापुढे अंदाजे ३०० मी. अंतरावर उजवीकडं वळायचं. या उजव्या वळणावर ठोस अशी कोणतीच खूण किंवा मळलेली वाट नाही. पण या जवळपास अश्या तात्पुरत्या लहान दगडांवर दिशादर्शक रंग लावलेला दिसतो. पुढच्या वेळेस ते दगड तिथं असतीलच याची खात्री देता येणार नाही.
 |
दगडावरील दिशादर्शक रंग, रामतीर्थ (Ramtirth) |
 |
रामतीर्थ जंगल (Ramtirth Forest) Ramtirth |
 |
रामतीर्थ जंगल (Ramtirth Forest) Ramtirth |
कोल्हापूर जिल्ह्याच्या आजरा वनपरिक्षेत्रात येणारा हा परिसर राखीव, संवर्धित आणि संरक्षित आहे. गोबरगॅस आणि नजीकच्या काळात घरोघरी पोहोचलेल्या गॅसमुळं वृक्षतोडीचं प्रमाण बऱ्यापैकी कमी झालं आहे. त्याचा परिणाम म्हणून हे बेसुमार वाढलेलं जंगल असावं.
सुरुवातीला वेळूची प्रचंड वाढलेली बेटं वगळता, पुढे चारोळी, खैर, बेहडा, पळस, साग, हिरडा, निलगिर तसेच करवंद आणि घाणेरीच्या झुडपांनी हा परिसर भरलेला दिसतो. काही दुर्मिळ वनस्पतीही दिसतात.
पूर्वेला पालापाचोळ्यातून सतत अर्ध्या तासाच्या सावध चालीनंतर वन विभागानं खोदलेला चर दिसतो. इथपर्यंत पायवाट म्हणावी अशी दिसत नाही. हा मध्ये दिसणारा चर रामतीर्थाच्या जवळपास पोहोचल्याची खूण समजावी. पुढे साधारण दहा मिनिटांच्या चालीनंतर जंगलात एका थोड्याफार मळलेल्या आडव्या गाडीवाटेवर उजवं वळल्यास समोर डावीकडं जुनं गणपती देउळ दिसतं.
 |
गणपती मंदिर, रामतीर्थ जंगल, (Ramtirth) |
 |
रामतीर्थ जंगल (Ramtirth Forest) Ramtirth |
 |
गणपती मंदिर |
त्यापुढे वाट उतार होत सरळ आजऱ्या कडून येणाऱ्या पक्क्या रस्त्याला मिळते. आणि समोर प्रचंड विस्तारलेला वटवृक्ष. वटवृक्षाच्या बाजूला मोकळ्या जागेत झाडांखाली बसण्यासाठी वन विभागानं गोलाकार आसनांची व्यवस्था केलेली आहे. तत्पूर्वी डाव्या बाजुला पाठमोरं आणि हिरण्यकेशी नदीकडे तोंड करून जुनं पुराणं अमृतेश्वर महादेव मंदिर दिसतं. मंदिरापुढे दिसणारा नवीन सभामंडप या दहा वर्षांच्या कालावधीत बांधला आहे. पूर्वी या सभामंडपाच्या मोकळ्या जागेत चौथऱ्यावर एक छोटी शिवपिंडी आणि बाजुला भग्न नंदी दिसायचा.
 |
नवीन बांधलेला सभामंडप, अमृतेश्वर महादेव मंदिर रामतीर्थ (Ramtirth) |
 |
अमृतेश्वर महादेव मंदिर आणि उजवीकडे शिव पार्वती मंदिर, सण २००८ रामतीर्थ |
 |
अमृतेश्वर महादेव नवीन बांधलेला सभामंडप रामतीर्थ (Ramtirth) |
 |
सण २००८ ला दिसणारं अमृतेश्वर महादेव मंदिर, रामतीर्थ |
हे मंदिर एकेरी ओवरीची रचना असलेला सुरवातीचा दगडी नंदीमंडप, त्यात काळ्या शिळेत कोरलेला मोठा नंदी, मध्ये दगडी सभामंडप आणि समोर मंदिराचा मुळ गाभारा असं दिसतं.
पूर्ण मंडप व्यापणाऱ्या या नंदीच्या गळ्यात दुहेरी घुंगरांची माळ, माळेत सुबक घंटा, पाठीवर एकेरी घुंगरांची झूलमाळ आणि चारही पायात घुंगुरमाळा परिधान केलेल्या दिसतात. शेपटी आणि मस्तकावर सुंदर नाजूक नक्षी दिसते. हा प्रचंड नंदी आपला पुढील उजवा पाय मुडपुन डाव्या पायाचा खुर धरणीला रेटा देऊन उठण्याच्या तयारीत दिसतो. मागील दोन्ही पायही वर उठण्यासाठी तयारीत असे काटकोनात दिसतात. नंदीचं वळणदार पुष्ट बलदंड वशिंड त्याच्या रुबाबात भर घालताना दिसतं.
 |
नंदी, अमृतेश्वर महादेव मंदिर रामतीर्थ (Ramtirth) |
 |
नंदी, अमृतेश्वर महादेव मंदिर रामतीर्थ (Ramtirth) |
नंदीच्या पुढ्यात शिवपिंडी असून, पांच फण्यांच्या नागदेवतेनं त्यावर सावली धरलेली दिसते. तर या दोन्हींवर नंदीनं सावली धरली आहे. किंचित डावीकडे झुकून कोणत्याही क्षणी उठण्याच्या तयारीत असलेला शक्तिशाली नंदी या रामतीर्थाव्यतिरिक्त इतर ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणींही क्वचित दिसत असावा.
मध्ये लहानसा सभामंडप असून त्याच्या दगडी छताला डावी उजवीकडं उतार दिसतो.
 |
अमृतेश्वर महादेव मंदिर गाभारा रामतीर्थ (Ramtirth) |
समोर मंदिराचा मुळ दगडी गाभारा दिसतो. गाभाऱ्याच्या भिंतीला उजवीकडं दिवळीत श्री गणेशाची तर डावीकडं श्री विष्णूंची सुबक कोरीव मूर्ती स्थानापन्न दिसते. गाभाऱ्याची चौकट दगडात कोरली असून वर चौकटीवर मध्यभागी गणेश कोरलेला आहे. खाली उंबऱ्यावर कीर्तीमुख कोरलेलं दिसतं. चौकटीच्या दोन्ही बाजूस उंबऱ्याजवळ कमल पुष्प कोरलेली दिसतात. बाहेरून गाभाऱ्यात जाताना पायांस स्पर्श होईल असं उंबऱ्याच्या कीर्तीमुखासमोर पायरीवर कासव कोरलेलं दिसतं. मजबूत आणि वेगळ्या घडणीची ही दगडी चौकट दिसते.
 |
अमृतेश्वर महादेव मंदिर गाभारा रामतीर्थ |
 |
अमृतेश्वर महादेव, रामतीर्थ (Ramtirth) |
 |
महादेव मंदिर गाभारा (Ramtirth) |
आत गाभाऱ्यात सरासरी चार फूट उंच आणि तेवढ्याच रुंदीची एकाच शीळेत घडवलेली प्रशस्त चौरसाकृती शिवपिंडी दिसते.
गाभाऱ्यावर बाहेरून एकावर एक ठेवलेल्या चौरस चकात्यांच्या पिरॅमिड सारखी केलेली कळस योजना आणि शेवटी कमळ पुष्पात असलेला गोल दगडी कळस दिसतो. आत गाभाऱ्याच्या घुमटाला आतून त्रिमितीची नक्षी असून गर्भगृहाच्या अंतराळातही सुंदर कमळ पुष्प कोरलेले दिसतं. नंदी, शिवपिंडी आणि एकंदर पश्चिम भारतात आढळणाऱ्या 'वाकटक' आणि 'हेमाडपंथी' पद्धतीनुसार दिसणाऱ्या या मंदिराची ठेवण दुर्मिळ वाखाणण्यासारखी आहे.
 |
समाधी रामतीर्थ (Ramtirth) |
मंदिरा समोर रस्त्यापलीकडे शिल्पकलेचा उत्तम नमुना असणारी एक जुनी समाधीही दिसते. या मंदिरा इतकीच ती जुनी असावी.
या मंदिराच्या बाजूलाच शिवपार्वती मंदिर दिसतं. हे दगडी मंदिर दिसायला छोटं चौरसाकृती दिसतं. फक्त गर्भगृह असणाऱ्या या मंदिरात केंद्रस्थानी शिवपिंडी दिसते. मागे पाषाणी भिंतीत मोठ्या प्रशस्त दिवळीत शिवपिंडी आणि शिवपिंडीवर मध्यभागी अलंकृत असलेली माता पार्वती स्थानापन्न असणारी एक दुर्मिळ रचना इथं पाहायला मिळते.
 |
शिवपिंडी - शिव पार्वती मंदिर रामतीर्थ (Ramtirth) |
 |
शिवपिंडी - शिव पार्वती मंदिर रामतीर्थ (Ramtirth) |
 |
शिव पार्वती मंदिर रामतीर्थ (Ramtirth) |
पुढे हाकेच्या अंतरावरच चौथर्यावर तिसरं महादेव मंदिर असून याचा मंडप व्हरांडेवजा आहे. एकूण चार दगडी खांबांवर हा मंडप तोललेला दिसतो. आधाराचे दगडी खांब आणि दगडी तुळ्यांची सांधे अडक (Joints) इथं बघण्यासारखी आहे. आत गाभाऱ्यात चार फूट रुंद आणि फुटभर उंचीची अष्टकोनी शिवपिंडी दिसते. या पिंडीवर वैशिष्ट्यपूर्ण कासव कोरलेलं दिसतं. तर मागे दगडी दिवळीत फुटभर उंचीची शिवपिंडी दिसते.  |
तिसरं महादेव मंदिर - सण २००८ रामतीर्थ (Ramtirth) |
 |
शिवपिंडी, तिसरं महादेव मंदिर रामतीर्थ (Ramtirth) |
 |
तिसरं महादेव मंदिर - Latest Temple रामतीर्थ (Ramtirth) |
 |
ध्यानमग्न भगवान शिव - रामतीर्थ |
 |
पिंपळ्या मारुती मंदिर रामतीर्थ (Ramtirth) |
 |
पिंपळ्या मारुती (Ramtirth) |
या मंदिराच्या मागील बाजूस जुना पांढरा चाफा दिसतो तर बाजूलाच विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती नजीकच्या काळात स्थापित केलेली दिसते. त्यापुढे भगवान शिवाची ध्यानमग्न मोठी रंगीत मूर्ती सध्याच्या काळात स्थापलेली दिसते. मूर्ती भोवती सुशोभीकरण केलं आहे. बाजूला पिंपळाच्या वृक्षाखाली राक्षसवध करताना 'पिंपळ्या मारुती'ची मूर्ती दिसते. या मूर्तीभोवती सध्या छोट्या मंदिराची उभारणी केली आहे.
 |
लिंगायत समाजाची धर्मशाळा रामतीर्थ (Ramtirth) |
शिवमुर्तीच्या अलीकडे खाली लिंगायत समाजाची धर्मशाळा दिसते. चिऱ्यांच्या भिंती आणि कुलूपबंद असणाऱ्या या धर्मशाळेची तशी आजरा ग्रामपंचायत दफ्तरी नोंद आहे. धर्मशाळा नव्यानं बांधण्यासाठी सध्या या समाजाकडून निधी गोळा करणं चालू आहे. रामनवमीनंतर एका विशिष्ट दिवशी या समाजाकडून इथं महाप्रसाद केला जातो.
 |
श्रीराम मंदिर रामतीर्थ (Ramtirth) |
या तीनही प्राचीन मंदिरांच्या मागील बाजूस शासनानं पर्यटकांसाठी गेस्ट हाऊस बनवलं आहे पण अपुऱ्या सुविधांमुळे आणि वापरात नसल्यामुळं सध्या ते बंद दिसतं.
 |
डावीकडे गेस्ट हाऊस आणि पार्किंग व्यवस्था रामतीर्थ (Ramtirth) |
 |
श्रीराम मंदिर रामतीर्थ (Ramtirth) |
 |
श्रीराम मंदिर रामतीर्थ (Ramtirth) |
ओळीत असणाऱ्या या सर्व मंदिरांच्या पुढे श्रीराम मंदिर दिसतं. मंदिर बाहेरुन दगडी भिंतीचं असून आत लाकडांचा वापर दिसतो. समोर मंदिरात उंच चौथऱ्यावर सर्वकृपाळू श्रीरामचंद्र, त्यांच्या डावीकडे माता सीता आणि उजवीकडं लक्ष्मणाची मूर्ती स्थापित दिसते. उजव्या हाताला सुशोभित असलेला श्रीरामांचा पाळणा दिसतो. चौथऱ्यावर आजूबाजूला इतर परिवार देवतांच्या छोट्या पितळी मुर्त्या आणि मुखवटे ठेवलेले दिसतात. या सर्व देवता जाळीच्या दरवाजांनं कुलूपबंद दिसतात. मंदिरात डाव्या बाजूला वीररुद्र हनुमान राक्षसवध करताना दगडी शिल्पात कोरला आहे. सरासरी चार फूट उंचीच्या या शिल्पाच्या तळाला मोडी लिपी सदृश्य लेख दिसतो. मूर्तीवर वारंवार केलेल्या पक्क्या रंगाच्या रंगरंगोटीमुळं तो सध्या अस्पष्ट दिसतो.
 |
श्रीराम मंदिर रामतीर्थ (Ramtirth) |
 |
रामतीर्थाचे बुवा - कै. गोविंददास गुरु गोपालदास (Ramtirth) |
 |
हनुमान - श्रीराम मंदिर (Ramtirth) |
या मंदिरात पूजाअर्चा आणि देखभाल करण्यासाठी बऱ्याच वर्षापासून 'गोविंददास गुरू गोकुळदास' बैरागी यांची नेमणूक झाली होती. सगळे त्यांना आदरानं 'रामतीर्थाचा बुवा' म्हणत. मंदिरांच्या आसऱ्यानं ते या निबिड जंगलात एकटेच राहत. चार वर्षापूर्वी त्यांचं वयोमानामुळं देहावसान झालं.
पश्चिम महाराष्ट्रातील हे देवस्थान अयोध्येतील 'बैरागी आखाड्या'च्या अखत्यारीत येतं. नाशिक जवळील 'इगतपुरी'च्या 'श्रीराम आश्रम विश्वस्थ संस्थे'शी हा बैरागी आखाडा संलग्न आहे. रामतीर्थाचे मठाधिपती म्हणून इगतपुरीहून या 'बुवांची' त्यांच्या उमेदीच्या काळात नेमणूक केली होती. त्यांच्या नंतर येत्या चार वर्षात या देवस्थानाची पूजा देखभाल करण्यासाठी कोणीच नसल्यानं, आजऱ्याचे श्री विलास नलावडे हे सदगृहस्थ सकाळ संध्याकाळ इथली पूजापाठ बघतात.
 |
हिरण्यकेशी नदीपात्र रामतीर्थ (Ramtirth) |
 |
सोहाळे धरण रामतीर्थ (Ramtirth) |
ही चारही दुर्मिळ ठेव्याची पुरातन मंदिरं हिरण्यकेशीच्या विस्तृत वळणावरच्या पश्चिम काठावर वसलेली दिसतात. वर सोहाळे गावासाठी बांधलेल्या पुलात पावसाळ्यानंतर पाणी अडवल्यामुळे नोव्हेंबरनंतर इथला पाण्याचा ओघ कमी दिसतो. पावसाळ्यात मात्र नदी दुथडी भरून वाहते. मंदिरासमोरच धबधबा असून धबधब्याच्या वरील नदीपात्र उथळ दिसतं. खाली धबधब्यानंतरचं नदीपात्र खोल, धोकादायक दिसतं. धबधबा दिसायला लहान दिसत असला तरी पावसाळ्यात तो विक्राळ रूप धारण करतो. नदीपात्रातील दगड अतिशय गुळगुळीत निसरडे असल्यानं तिथं अंघोळ करणंही धोकादायक आहे. आत्तापर्यंत इथं जीवितहानी झाल्याच्या नोंदी आहेत. पावसात या धबधब्याचा आनंद दूर नदीकाठावरुन घेतला जात असे. २००७ सालापासून पर्यटकांसाठी नदीवर सिमेंट काँक्रीटचा बांधलेला आडवा पूल (Bridge) दिसतो.
 |
रामतीर्थावरील पर्यटक पूल (Ramtirth) |
नेसरीचे बाबासाहेब कुपेकर विधानसभेचे अध्यक्ष असता आजऱ्याच्या नळपाणी योजनेच्या उदघाटनासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी रामतीर्थाच्या विकासासाठी निधी घोषित केला. त्यातून हा पर्यटक पूल साकारला. त्यामुळं पावसाळ्यात पर्यटकांना धडकी भरवणाऱ्या या धबधब्याचा सुरक्षित आनंद घेता येऊ लागला.
 |
हिरण्यकेशी नदीपात्र रामतीर्थ (Ramtirth) |
 |
Ramtirth |
इथला निसर्गरम्य परिसर आणि धबधब्याचं चित्रीकरण 'जोगवा', 'आली अंगावर', 'अनोळखी' यासारख्या बऱ्याच नव्या जुन्या प्रसिद्ध मराठी चित्रपटातून केलेलं दिसतं.
दुसरं असं की, आजऱ्याचे श्री आनंदा कुंभार या सदृहस्थांचा उल्लेख केल्याशिवाय हा लेख पूर्ण होऊ शकणार नाही. रामतीर्थाला भेट दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी आम्ही त्यांची भेट घेतली. रामतीर्थ देवस्थान, सध्याच्या तिथल्या घडामोडी, व्यवस्था याविषयी त्यांनी आम्हाला बरीच माहिती दिली. आजऱ्यात कुंभार गल्लीत त्यांचा मूर्ती बनवण्याचा कारखाना असून ते स्वतः एक कुशल कारागीर आहेत. वेगवेगळ्या देवतांच्या मुर्त्या, त्यांची वैशिष्ट्ये, देवतांच्या उंची आकारानुसार त्यांची प्रमाणं कशी, किती असावीत याची शास्त्रोक्त माहिती त्यांच्याशी मारलेल्या गप्पांतून दिसून आली. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कार्यकारिणीचे ते सदस्य आहेत. तर सध्या आजऱ्याच्या नगरसेवक पदाचा पदभारही ते सांभाळतात.
गोविंददास गुरु गोकुळदास बैरागी यांच्यानंतर रामतीर्थाच्या मठाधिपदी दुसऱ्या बैराग्याची नेमणूक व्हावी यासाठी यांचा चार वर्षापासून पाठपुरावा चालू आहे. एक दोनदा ते इगतपुरीलाही जाऊन आलेत. भेटीदरम्यान त्यांनी बहुमोल वेळ दिलाच पण त्यांचं साधं राहणीमान आणि मोकळं नम्र बोलणं मनात घर करून गेलं.
 |
रामतीर्थ धबधबा (Ramtirth Waterfall) |
रामतीर्थाबद्दल स्थानिक जनमाणसांत काही अख्यायिकाही प्रचलित आहेत. प्रतिवर्षी पावसाळ्यात हिरण्यकेशीला पूर येतो. पाणी नदीपात्र ओलांडून मंदिरातील श्रीरामांच्या पायाला स्पर्श करतं त्यानंतर नदीचं पात्र पाण्याची मर्यादा ओलांडत नाही.
तसेच पावसाळ्याच्या पुरानंतर धबधब्यातून कोसळणाऱ्या पाण्यावर मध्यभागी एक पिवळसर रंगाचा पट्टा दिसतो. माता सीतेनं हळदीचे हात धुतल्याची ती खूण समजली जाते.
त्याचप्रमाणं अमृतेश्वर महादेव मंदिरातील प्रशस्त मोठा नंदी हा प्रत्येक वर्षी तिळा तिळानं वर उठतो. ज्यावेळी उठून तो उभा राहील त्यावेळी जगबुडी येईल आणि नव्या युगाची सुरुवात होईल. जेव्हा लहानपणी आम्ही रामतीर्थाला येत असू त्यावेळी या जगबुडीच्या कल्पनेनं आम्ही मुलं या अवाढव्य नंदीला घाबरुन असे.
जगबुडीबद्दल माहित नाही, पण आजही प्रत्येक पावसात जेव्हा हिरण्यकेशी आपलं नदीपात्र ओलांडून श्रीरामांच्या चरणांशी स्पर्श करते त्यानंतर ती आपल्या मर्यादेत वाहताना दिसते..
|| श्री कृष्णार्पणमस्तू ||
येथे - जयवंत जाधव