Wednesday, 29 May 2024

नाना फडणवीस वाडा, मेणवली, ता. वाई, जि. सातारा. - Nana Fadanvis Wada, Menavali Village, Dist. Satara, Maharashtra.


                 आठराव्या शतकाच्या मध्यावर महाराष्ट्रात एक धुरंदर राजकारणी आणि मुत्सद्दी व्यक्तिमत्व उदयास आलं. 

                 'नाना फडणवीस'. 

                  योग आला सातारा जिल्ह्यात वाई तालुक्यातील 'मेणवली' गावातील 'नाना फडणवीसां'च्या वाड्याला भेटण्याचा. पुणे सातारा हायवेला 'सुरुर' जवळ उजवं वळण घेऊन 'वाई'ला जाणारा रस्ता वाईच्या पुढे तीन किमी अंतरावर 'मेणवली' गावात घेऊन जातो. गावच्या एसटी स्टँडपासून डावीकडे जाणारा एकमेव रस्ता नानांच्या वाड्याकडे जातो. तटबंदीतील दोनशे खणांचा (खोल्या) आणि चार बुरूजांचा हा वाडा अडीचशे वर्षापासून 'राजमान्य राजश्री नानांची' कीर्ती सांगतो. वाड्याच्या उदरात लपलेल्या आठवणी उलगडण्याचा प्रयत्न करतो आहे.

मेणवली वाडा, मेणवली, वाई, जि. सातारा. महाराष्ट्र Menavli Wada, Menavli, Dist. Satara, Maharashtra 

                  'नानांच्या' पूर्वजन्मीचा इतिहास सांगायचा तर 'बाळाजी जनार्दन भानू' आणि 'बाळाजी विश्वनाथ भट' हे 'श्रीवर्धन' (कोकण) गावचे स्नेही. बाळाजी विश्वनाथ भट हे जंजिरेच्या सिद्धीकडे चाकरीस होते. सिद्धीचा लोकांवरील छळ आणि अन्याय बघून ते देशावर येऊन मराठा चाकरीस रुजू झाले. स्वकर्तुत्वाने मोठे झाले. छत्रपती शाहूंनी १७१३ मध्ये त्यांना पेशवे पद बहाल केले. 

मेणवली वाडा, मेणवली, वाई, जि. सातारा. महाराष्ट्र Menavli Wada, Menavli, Dist. Satara, Maharashtra 

मेणवली एस. टी. स्टॅन्ड Menavli Wada, Maharashtra 

  

                पूर्वाश्रमीच्या मैत्रीला जागत बाळाजी विश्वनाथ भट यांनी बाळाजी जनार्दन भानू यांना बोलावून 'फडणवीस' पदाची जबाबदारी दिली. १२ फेब्रू. १७४२ ला नानांचा जन्म झाला. त्यांचे नांव आजोबांशी संबंधित 'बाळाजी जनार्दन भानू' असेच ठेवले. हेच बाळाजी जनार्दन भानू पुढे 'नाना फडणवीस' नावाने इतिहासात प्रसिद्ध झाले. 

                 जवळ जवळ चार दशकं नानांनी आपल्या मुसद्दी राजकारणाने शत्रुंवरही छाप उठवली. इंग्रजांपासून मराठेशाहीला असलेला धोका ते ओळखून होते. निजाम, हैदर अली, फ्रेंच या सत्तांना इंग्रजांविरुद्ध एकत्र करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. नानांच्या हयातीत इंग्रजांना मराठेशाहीपासून दूर ठेवण्यास ते यशस्वी ठरले. 

                पानिपतच्या युद्धात हादरलेल्या मराठी साम्राज्याला सावरण्यासाठी आणि मराठेशाहीचा गमावलेला लौकिक पुन्हा मिळविण्यासाठी नानांनी माधवराव पेशव्यांच्या काळात महादजी शिंदेंच्या मदतीने मोलाचा हातभार लावला. पेशव्यांच्या प्रत्येक मोहिमेची व्यवस्था नाना बघत. मोहिमांना लागणारा पैसा, दारूगोळा व अन्य सामग्रीची जबाबदारी नानांकडे असे. पेशवे युद्ध मोहिमांवर जाताना राज्याची जबाबदारी नानांवर टाकून जात. एकूण चार पेशव्यांच्या कारकिर्दीत नानांनी 'फडणवीस' हे पद भूषविले.

 

नानांचे 'दफ्तर' Menavli Wada, Wai, Dist. Satara

 

'राजमान्य राजश्री नाना फडणवीस' Menavli Wada, Wai, Satara 

                  पानिपतच्या युद्धात भाऊ सदाशिवराव पेशव्यांचं काय झालं हे कोणालाच कळलं नाही. माधवराव पेशवे असताना एके दिवशी पुण्यात एक माणूस मीच सदाशिव भाऊ असल्याचे सांगत आला. अनेकांना तो पटला सुद्धा पण चौकशीनंतर तो 'सुखलाल' नावाचा एक कनोजी ब्राह्मण असल्याचे सिद्ध झाले. आणि त्याला रत्नागिरीच्या किल्ल्यावर डांबण्यात आले. पुढे पेशव्यांच्या विरोधकांच्या मदतीने सवाई माधवरावांच्या कारकर्दीत त्याने पुन्हा डोकं वर काढलं. त्यावेळी मात्र त्याला देहांताची शिक्षा देण्यात आली आणि त्याला सामील असलेल्या पेशवे विरोधकांनाही नानांनी कडक शासन दिलं. इतिहासातील हे तोतया प्रकरण  नाना फडणवीसांनी बुद्धी कौशल्यानं हाताळलं होतं.

पहिल्या मजल्यावरील दिवाणखाना आणि पंगतीचा चौक यांना जोडणारी खोली  Menavli Wada, Maharashtra

                   माधवरावांच्या अकाली मृत्यूमुळे पेशवे पद पुन्हा रिते झाले. त्यात बाळाजी विश्वनाथ यांचा नातू रघुनाथराव अर्थात राघोबा दादा यांना पेशवे पदाची महत्वकांक्षा लागली. राघोबा दादांना इंग्रजांचं पाठबळ होतं. पण माधवरावांच्या इच्छेप्रमाणे माधवरावांचा धाकटा बंधू नारायणराव यास पेशवे पद देण्याचे ठरले. राघोबा दादांनी मग गारद्यांच्या मदतीने नारायण रावाचा खून केला. राघोबा दादा आणि त्यांची पत्नी आनंदीबाई यांचा या कटात हात असल्याचे न्यायमूर्ती रामशास्त्री यांनी पुराव्यानिशी सिद्ध केले आणि दोघांना कठोर शासन केले. पुढे नारायणरावांचा पुत्र माधवराव नारायण भट (सवाई माधव) यास पेशवे पदाची वस्त्रे बहाल केली. फक्त ४० दिवसाचे वय असणारे पाळण्यातील या अजाण पेशव्याच्या वतीने नाना फडणवीस मराठेशाहीचा कारभार पाहू लागले. 

मुख्य प्रवेशदार, मेणवली वाडा, वाई  Menavli Wada, Dist. Satara 


दिंडी दरवाजा Menavli Wada

                 या नानांच्या 'मेणवलीच्या' वाड्याला चहू बाजूंनी भक्कम तटबंदी आहे. तटबंदीत एकूण चार लढाऊ बुरुज आहेत. त्यातील पहिला बुरुज मुख्य प्रवेश दारालगत डाव्या बाजूस दिसतो. दुसरा 'गोरखचिंच बुरुज' वाड्याच्या उजव्या बाजूस असलेल्या दुसऱ्या प्रवेश दाराला खेटून आहे. तिसरा आणि चौथा बुरुज वाड्याच्या मागे कृष्णेच्या काठालगत असलेल्या उजव्या तटबंदीत आहेत. वाड्याला एकूण तीन भक्कम दरवाजे आहेत. पहिले दोन मेणवली गावाच्या बाजूला वाड्याच्या तटबंदीत बुरुजांना लागून आहेत. तर तिसरा दरवाजा वाड्याच्या मागील बाजूस कृष्णेकाठी बांधलेल्या घाट पायऱ्यांवर उतरतो. जवळजवळ दीड एकर वाड्याच्या चौथऱ्याचे मूळ बांधकाम दगडी आहे. वरील बांधकामात सागवान लाकूड, माती, विटा आणि चुन्याचा वापर केलेला दिसतो. वाड्याच्या काही भागांची दुरुस्ती आजही चालूच आहे.

प्रवेश चौक, मुख्य प्रवेशदार Menavli Wada


पहिल्या बुरुजावर जाणाऱ्या पायऱ्या Menavli Wada

                  मुख्य प्रवेश दाराला भव्य लाकडी दारं आणि त्या दारात एक छोटा दिंडी दरवाजा आहे. दाराच्या वर माडीसारखा दिसणारा 'नगारखाना' आहे. नगारखाण्याला समोर एक दरवाजा आणि दोन्ही बाजूस लाकडी खिडक्या ठेवल्या आहेत. दाराच्या डाव्या बाजूस पहिला बुरुज आहे. उजवीकडे वाड्याचाच भाग असलेली शिपायासाठी देवडी आहे. या दारातून आत आल्यास 'प्रवेश चौक' दिसतो. चौकाला कमरे इतक्या उंचीचा सभोवती दगडी व्हरांडा दिसतो. चौकाच्या वरांड्यातच वाड्याला भेट देणाऱ्यास माणसी ७० रुपये शुल्क आकारलं जातं. इयत्ता चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना किंवा चार फूट उंची खालील मुलांना प्रवेश मात्र निःशुल्क आहे. चौकाच्या डावीकडील कोपऱ्यात बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या दिसतात. बुरुजावरून बाहेर मारा करण्यासाठी छोट्या जंग्या ठेवल्या आहेत.

गणेश चौकातून दिसणारा वाडा, वाड्याची सदर Menavli Wada, Dist. Satara 
गणेश चौकातून दिसणारी 'पडवी' Menavli Wada, Wai, Dist. Satara
                    उजवीकडे वळून वाड्यात प्रवेश केल्यास वाड्याचं प्रांगण आणि 'गणेश चौक' दिसतो. त्याला 'सदरेचा चौक'ही म्हणतात. समोर कमरे इतक्या उंच दगडी चौथर्‍यावर दिमाखदार सुंदर वाडा दिसतो. डावीकडे व्हरांडेवजा वाड्याची 'पडवी' दिसते. पडवीत माणसे काही काळ एकत्र बसू शकतील किंवा अवजारे आणि इतर सामान तात्पुरती ठेवण्यासाठी या पडवीचा उपयोग होई. पूर्वीच्या पडवीचं लाकूड सामान व छतावरची कौलं बदलली आहेत. पडवीला आधार देणारे सागवानी खांब, खांबाखालचे 'तळखडे' आणि सांधेजोडही जुना संदर्भ घेऊनच केल्याचं दिसतं. सध्या पडवीत त्याकाळी वाड्यात करमणुकीसाठी खेळले जाणारे प्राचीन खेळ मांडून ठेवले आहेत. पडवीच्या पुढे शेवटी तटबंदीत दुसऱ्या बुरुजाला खेटून वाड्याचा दुसरा भव्य दरवाजा दिसतो.
दुसरा दरवाजा, डावीकडे पडवी उजवीकडे हळदी कुंकवाचा चौक Menavli Wada, Wai, Dist. Satara

बाहेरून दिसणारा दुसरा दरवाजा, Menavli Wada, Wai, Dist. Satara

दुसरा गोरखचिंच बुरुज, गोरखचिंच (बाओबाब) वृक्ष Menavli Wada, Wai, Dist. Satara
गोरखचिंच बुरुजावरून दिसणारा वाड्याचा भाग Menavli Wada, Wai, Dist. Satara



गोरखचिंच बुरुज Menavli Wada, Wai, Dist. Satara

                  या दुसऱ्या दरवाजाच्या बुरुजाला 'गोरखचिंच बुरुज' या विशेष नावानं ओळखलं जातं. वाड्याच्या बाहेर प्रांगणात या बुरुजासमोर एक अतिशय जुना 'गोरखचिंच' वृक्ष आहे. या झाडाचे मूळ आफ्रिकेतले असून त्याचे तिथले मूळ नांव 'बाओबाब' आहे. झाडाचे प्रचंड फोफावलेले खोड हत्तीच्या पायाच्या आकाराचे असून आयुष्यही दिर्घ आहे. झाडाजवळ उभे राहिल्यास त्याच्या खाली झुकलेल्या फांद्या आपल्याला पकडतील असं उगाचच वाटतं. झाडाच्या एकूण स्वरुपामुळं अंधारात ते भीतीदायक वाटत असल्यानं या झाडास 'भुताचे झाड' (Ghost Tree) असेही म्हटलं जातं. या दुर्मिळ प्रकारातील झाडाची मुळं कृष्णा नदीपर्यंत पोहोचली आहेत. नानांनी स्वतः हे झाड लावलं होतं अशी वाड्यात नोंद आहे. 
हळदी कुंकवाचा चौक Menavli Wada, Wai, Dist. Satara



हळदी कुंकवाचा चौक Menavli Wada, Wai, Dist. Satara

               या दुसऱ्या दाराजवळच्या पडवी समोर हळदीकुंकू सारखे कार्यक्रम तसेच गप्पागोष्टी करण्यासाठी महिलांसाठी प्रशस्त मोठा कलाकुसर केलेला सोपा दिसतो. देवघर जवळ असल्याने या भागात प्रामुख्याने स्त्रियांचा वावर असे. खाजगी समारंभ आणि सण इथे साजरे होत. वाड्यातील अतिशय सुबक आणि देखण्या भागांपैकी हा चौक आहे. सोप्यावर सुरूदार खांबांची रांग असून खांबांच्या वरील भागांना किलफुलांचा आकार देण्यात आला आहे. सोप्याचे छत अर्थात 'तक्तपोषी' हे लाकडी कोरीव कामाचा उत्कृष्ट नमुना आहे. चौकातील कारंजे या भागाची शोभा वाढवताना दिसते. तक्तपोषीची सुबक महिरपी व त्यावरील चित्रेही पाहण्यासारखीच आहेत.

हळदी कुंकवाचा सोपा, मागे देवघराच्या दरवाजा आणि 'जय विजय' चित्रे  Menavli Wada, Wai, Dist. Satara

                   हळदी कुंकवाच्या सोप्याच्या उजव्या बाजूस देवघराचा दरवाजा दिसतो. या दरवाज्याच्या दोन्ही बाजूंना श्री विष्णूचे द्वारपाल 'जय' आणि 'विजय' यांची चित्रे रंगवली आहेत. कालपरत्वे चित्रे जीर्ण झाली असली तरी त्यांचे पुनरुज्जीवन इतर कामांबरोबर बाकी आहे. कमळाच्या बैठकीवर उभ्या असलेल्या जय, विजय यांच्या हातात चक्र आणि गदा ही आयुधे आहेत. देवघरात विष्णूचे शालिग्राम पूजेसाठी ठेवले आहेत. दरवाज्याच्या चौकटीवर एका पाळण्याचे चित्र आहे. पाळण्याच्या बाजूला एक स्त्री प्रतिमा रेखाटली आहे. ते बहुतेक संतान देवता 'जिवतीचे' चित्र असावे. बाळाच्या दीर्घायुष्यासाठी खास करून श्रावणातल्या शुक्रवारी स्त्रिया हिची पूजा करतात.

सदरेचा सोपा Menavli Wada, Wai, Dist. Satara


सदरेच्या सोप्यातून पहिल्या मजल्यावर जाणारा दरवाजा Menavli Wada, Wai, Dist. Satara
पहिल्या मजल्यावर जाणारा जिना Menavli Wada

                  पुन्हा सदरेच्या मुख्य चौकात येऊन वाड्याच्या पायऱ्या चढून वर आल्यास आडवी चिंचोळी जागा दिसते. कामकाजासाठी आलेला बाहेरचा माणूस या सोप्यावरच घरमालक किंवा संबंधिताला भेटत असे. त्याला एकदम घराच्या मुख्य भागात प्रवेश नसावा. याला 'गणेश सोपा' म्हणतात. नानांच्या काळात या जागेचा कार्यालयीन कामासाठीही उपयोग होत असे. या सोप्याच्या उजव्या बाजूने वाड्याच्या पहिल्या मजल्यावरील नानांचा दिवाणखाना, कलादान खोली, दफ्तर-कचेरी, त्यांच्या आरामासाठी पलांगाची खोली, जेवणाच्या पंगतीचा चौक, खलबतखाना आणि इतर बऱ्याच पहिल्या मजल्यावरील खोल्यांकडे जाण्यासाठी पायऱ्या दिसतात. 

 

नानांचा दिवाणखाना Menavli Wada, Wai, Dist. Satara


  












                 पहिल्या मजल्यावर प्रथम नानांचा 'दिवाणखाना' (Drawing Room) दिसतो. नाना इथे बसून आल्या गेल्यांशी बोलत. छोट्या-मोठ्या बैठका होत. दिवाणखान्याची तक्तपोषी (लाकडाचे नक्षीदार छत), छोटे कोनाडे, सुरुच्या आकाराचे खांब, महिरपी कमानी आणि पुरुषभर उंचीच्या खिडक्या अशी बांधकामाची ठळक वैशिष्ट्ये आठराव्या शतकातील 'कलमदानी' पद्धतीची इथं दिसतात.
पलंगाची खोली Menavli Wada, Wai, Dist. Satara


  
पलंगाची खोली Menavli Wada, Wai, Dist. Satara
                                दिवाणखान्याच्या बाजूच्या खोलीत नानांना आराम करण्यासाठी त्यावेळी वापरलेला त्यांचा पलंग आहे. पलंगावर हवा घेण्यासाठी झुलत्या झडप पंख्याची (Fan) सोय आहे. या झडपेला बांधलेली दोरी सेवक दुसऱ्या खोलीतून ती मागेपुढे ओढून सेवा देत असे. 
पंगतीचा चौक Menavli Wada, Wai, Dist. Satara

                    दिवाणखान्याच्या मागील बाजूस 'पंगतीचा चौक' दिसतो. वाड्यातील स्वयंपाकघराच्या शेजारी असलेला हा चौक वाड्याचे ब्रह्मस्थान आहे. 'पंगत' हा महाराष्ट्रीयन जेवणाचा एक अविभाज्य भाग. पूर्वीच्या काळी सणावाराला आणि धार्मिक कार्याच्या प्रसंगी पाहुण्यांना बोलावून मेजवानी दिली जात. जशी मोठ्या वाड्यांमध्ये यासाठी अशी वेगळी रचना केलेली असे ती इथेही दिसते. रोजच्या भोजनासाठीही या चौकाचा वापर होत असे. पंक्तीच्या चौकाच्या गॅलरीची लाकडी रचना, तिची ठेवण वेगळी बघण्यासारखी आहे.

पंगतीच्या चौकातून दिसणारा दफ्तर दरवाजा Menavli Wada, Wai, Dist. Satara

खलबतखाना Menavli Wada, Wai, Dist. Satara
दिवाणखान्यातून खलबतखान्यात जाणारा दरवाजा Menavli Wada, Wai, Dist. Satara

                   दिवाणखान्याच्या डाव्या बाजूस 'खलबतखाना' दिसतो. खलबतखान्याच्या या छोट्या खोलीत तीन पायऱ्या उतरून जावं लागतं. नानांसारख्या राजकारणात मुरलेल्या आणि कर्तबगार माणसाला अनेक प्रकारची प्रतिष्ठित माणसं, राजदूत, गुप्तहेर मंडळी भेटायला येत. गुप्तता आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव त्यांच्याशी एकांतात बोलणे, चर्चा करण्यासाठी या खलबतखाण्याचा उपयोग होत असे. या खोलीत कोण व काय बोलणं चालू आहे ते इतरांना बाहेरून कळत नसे. आणि आजही कळत नाही.

नानांचे 'दफ्तर' Menavli Wada, Wai, Dist. Satara

                     'फड' म्हणजे 'कार्यालय' (Office), 'नवीस' म्हणजे 'अधिकारी' (Incharge). फडाच्या मुख्य अधिकाऱ्यास 'फडणवीस' म्हणत. पेशव्यांच्या शासन काळात प्रशासकीय कामकाजातील महत्त्वाचा भाग म्हणजे 'दफ्तर'. आजच्या काळातील राज्याच्या सचिवालयासारखे याचे स्वरूप असायचे. नानांच्या आजोबांच्या काळापासून हे महत्त्वाचे पद सांभाळले होते. त्या काळात महत्त्वाचे सरदार आणि अधिकारी यांचे स्वतःचे दफ्तर असे. नानांच्या दफ्तराचा मोठा भाग हा 'मेनवली' वाड्यातच होता. हा भाग 'मेनवली दफ्तर' म्हणून प्रसिद्ध आहे. प्रशासकीय पत्रे, खाजगी पत्रव्यवहार आणि भारताच्या विविध भागातून नानांना पाठवण्यात आलेल्या खबरा असे या कागदपत्रांचे स्वरूप आहे. पेशवा नारायण रावांच्या काळापासून ते नाना फडणवीसांच्या मृत्यूपर्यंत विविध घटना सांगणारी ही मोडी लिपीतील कागदपत्रे म्हणजे ऐतिहासिक खजिनाच आहे. यातील बरीच कागदपत्रे आज पुण्यातील डेक्कन कॉलेज, भारत इतिहास संशोधन मंडळ आणि औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आहेत. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धातील राजकीय परिस्थिती समजून घेण्यासाठी या दप्तरातील कागदपत्रे महत्त्वाची ठरतात.

मेणवली वाडा Menavli Wada, Wai, Dist. Satara

   

मेणवली वाडा Menavli Wada, Wai, Dist. Satara

नानांनी बांधलेला कृष्णेकाठी मेणवली घाट आणि महादेव मंदिर  Menavli Wada, Wai, Dist. Satara

                   प्रखर बुद्धिमत्ता, अखंड सावधानता आणि उत्तम गुप्तहेर व्यवस्थेच्या आधारे 'राजमान्य राजश्री नानांनी' मराठी साम्राज्याच्या कठीण काळातही कारभाराची धुरा एक हाती सांभाळली. प्रतिष्ठित आणि प्रभावी राजकारण, कठोर प्रशासन आणि कूटनीतीमुळं युरोपियन त्यांना मराठ्यांचा 'मॅकविलन' म्हणत. त्यांनी अनेक समाज उपयोगी कामासाठी योगदान दिले. खोपोली आणि पौंड येथील तलाव, तासगाव आणि मेणवली येथील नद्यांवरील घाट, मौजे नरे आंबेगाव (कात्रज) पासून पुण्यातील सदाशिव पेठेपर्यंत (नाना वाडा) पाण्याची नळ योजना, उत्तरेतील कर्मनाशी (गंगा) नदीवरील पूल, वाराणसीच्या दुर्गा घाटाची दुरुस्ती, भीमाशंकरच्या शिव मंदिराचा जीर्णोद्धार, पुण्यातील बेलबागेचे विष्णू मंदिर ही काही उदाहरणं म्हणता येतील.

नानांची रंगाची (चित्र) खोली Menavli Wada, Wai, Dist. Satara

                    नानांचा स्वतःचा चित्र संग्रह होता. त्यांनी बांधलेल्या काही वाड्यात व देवळात चित्रे रंगवण्यासाठी महाराष्ट्रातील आणि बाहेरील प्रख्यात कलाकारांना नियुक्त केलं होतं. त्यातील काही अप्रतिम चित्रं या मेणवलीच्या वाड्यातही पाहायला मिळतात. नानांनी आत्मचरित्राचे लिखाणही सुरू केले होते, परंतु ते पूर्ण झाले नाही. अशा या महाराष्ट्राच्या धुरंदर व्यक्तिमत्त्वाचा मृत्यू फाल्गुन कृष्ण तृतीया शके १७२१ म्हणजे १३ मार्च १८०० रोजी झाला. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी जिऊबाई यांनी या वाड्यात वास्तव्य केले. आज हा वाडा त्यांचे वंशज 'फडणवीस मेणवलीकर' कुटुंबाची खाजगी मालमत्ता आहे. आणि ते कसोशीने जतन करण्याचा प्रयत्न करताना दिसतात..

                                             || श्रीकृष्णार्पणमस्तू ||

येथे - जयवंत जाधव

'हम्पी' - विजयनगर साम्राज्याची राजधानी. - 'Hampi' - Medieval history of Vijaynagar dynasty.

                       सतराव्या शतकाच्या मध्यावर पश्चिम महाराष्ट्रात शिवछत्रपतींचं 'स्वराज्य' आकार घेत होतं आणि त्या दरम्यानच कर्नाट...