Monday, 10 June 2024

'धोम'चे प्राचीन श्री नृसिंह सिद्धेश्वर मंदिर, धोम, जि. सातारा - Ancient Shri Nrisinh Siddheshwar Temple, Dhom Village, Dist. Satara, Maharashtra.

              प्राचीनतेचा वारसा लाभलेल्या मंदिरांपैकी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात वाई तालुक्यातील 'धोम' गावचं नृसिंह मंदिर एक होय. महाराष्ट्रातील एकूण तीन प्राचीन नृसिंह मंदिरांपैकी सोलापूर आणि पुणे जिल्ह्याच्या हद्दीवर निरेकाठी असणारे निरा नृसिंह, सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कृष्णेकाठी कोळे नृसिंह आणि सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात कृष्णेकाठीच असलेले धोम'चे श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर. या मंदिराच्या प्रांगणात त्याच कालावधीत बांधलेले श्री सिद्धेश्वर मंदिरही आहे. यापैकी निरा आणि कोळ्याच्या नृसिंह मंदिरांना यापूर्वीच भेट झाली. त्या दोन्ही मंदिरांबद्दल त्या त्या वेळी लेख लिहिण्याचा योग आला. यावेळी वाईच्या 'मेणवली' गावातील 'नाना फडणवीस वाडा' आणि त्यानंतर पुढे या 'धोम'च्या 'नृसिंह सिद्धेश्वर मंदिरा'ला भेटण्याचा योग आला.  
श्री नृसिंह सिद्धेश्वर मंदिर, धोम, ता. वाई, जि. सातारा ( Shri Nrisinh Siddheshwar Temple, Dhom, Satara, Maharashtra.)

                    पुणे बंगलोर हायवेला 'सुरुर' जवळ उजवं वळण घेऊन वाईमार्गे रस्ता १९ किमीच्या 'मेणवलीत' येतो. तिथल्या 'फडणवीस वाड्या'ला भेट देऊन त्यापुढे ५ किमी 'धोम' धरणाच्या पायथ्याला असलेल्या प्राचीन ' लक्ष्मी नृसिंह' मंदिराकडे येता येतं. 

                      डावीकडे धोम गावात जाणाऱ्या प्रवेश कमानीतून न जाता पुढे अंदाजे दोनशे मीटर अभेपुरी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यानं सरळ धोम धरणाच्या पायथ्याकडे जायचं. तिथून डावीकडे वळणारा रस्ता थेट मंदिराजळ येतो. हा रस्ता अतिशय अरुंद आणि दुतर्फा गच्च झाडीचा आहे. समोरून वाहन आल्यास पुन्हा मागे फिरण्याशिवाय पर्याय नाही. डावं वळण घेऊन रस्ता मंदिरामागुन वाहनतळाजवळ (पार्किंग) येतो. पार्किंग निशुल्क आहे. उजवीकडे मंदिराची तटबंदी आणि पलीकडे सखलात श्री सिद्धेश्वर मंदिराचे कळस लक्ष वेधून घेतात. बाजूला शेडखाली नृसिंह महाराजांचा सुंदर रथ विसावलेला दिसतो. 

नृसिंह महाराजांचा रथ, धोम (Dhom)

 
पार्किंग जवळून दिसणारे श्री नृसिंह सिद्धेश्वर मंदिर (Shri Nrisinh Siddheshwar Temple)

प्रवेशद्वार, श्री नृसिंह सिद्धेश्वर मंदिर, धोम, ता. वाई, जि. सातारा (Shri Nrisinh Siddheshwar Temple, Dhom, Satara, Maharashtra.)
                     पार्किंगला उजवा वळसा मारल्यास मंदिराचे तटबंदीतील एकमेव प्रवेशद्वार दिसते. दरवाजाची दोन बुरुजांच्या मध्ये सप्त दलांच्या आकर्षक कमानीत दगडी चौकटीची बांधणी दिसते. प्रवेशद्वाराच्या चौकटीवर श्रीगणेश आणि उंबऱ्यावर  कीर्तीमुख कोरलं आहे. दाराच्या दोन्ही बाजूस बसण्यासाठी 'ओटे' दिसतात. बुरुजाच्या दोन्ही बाजूस कमल पुष्प कोरली आहेत. डावीकडील बुरुजावर दगडात कमल पुष्पाच्या बाजूला शिवपिंडी, सूर्य आणि गणेश कोरले आहेत. बुरुजात दिवे लावण्यासाठी ठिकठिकाणी दिवळ्यांची व्यवस्था दिसते. प्रवेश दारावर नगारखानाही दिसतो. बुरुज आणि तटबंदीत बुजवलेल्या 'चर्या' दिसतात. दरवाज्याच्या आतील दोन्ही बाजूस शिपायांसाठी ठेवल्या जाणाऱ्या 'देवड्यांची' व्यवस्था दिसते. 

                 मंदिराला सभोवती पुरुषभर उंचीचे दगडी बांधकाम आणि वर विटांची भक्कम अशी पंधरा फुटाची तटबंदी दिसते. एखाद्या किल्ल्याला असावी अशी मंदिर आवाराची रचना दिसते. 

अष्टकोनी जोत्यावरील दगडी खांबावर श्री नृसिंह मंदिर (Shri Nrisinh Siddheshwar Temple, Dhom)
  
दगडी खांबावर येणाऱ्या पायऱ्या (Shri Nrisinh Siddheshwar Temple, Dhom)

 
श्री नृसिंह स्वामींचे शांत रूप  (Shri Nrisinh Siddheshwar Temple, Dhom)
                      प्रवेशद्वारातून आत आल्यास उजवीकडे भव्य पाषाणी अष्टकोनी जोत्याच्या मध्यभागी दगडी खांबाची उंच रचना आहे. श्री नृसिंह खांबातून प्रकट झाल्यामुळे खांबावर नृसिंहाचे मंदिर बांधलेले दिसते. भगवान विष्णूंच्या चौथ्या अवतारातील श्री नृसिंहाच्या दोन मुर्त्या दिसतात. एक मूर्ती हिरण्यकश्यपूचा वध करताना रुद्र अवतारातील असून पाठमोऱ्या (मागील) बाजूस माता लक्ष्मी समवेत देवाचे शांत रूप दाखविले आहे. देवाच्या शांत रूपातील मूर्ती स्वतः धौम्य ऋषींनी स्थापन केली आहे. मागील उग्र रूपातील मूर्ती बहुदा बहामनी काळापासूनची असावी. दोन्ही मूर्तीसमोर विष्णूभक्त प्रल्हाद घुमटित स्थापित दिसतो. श्रींचे दर्शन घेण्यासाठी खांबाच्या दोन्ही बाजूनं वर चढून जाण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था आहे. आम्ही पोहोचलो त्यावेळी मंदिराचे पुजारी जाळीबंद असणारे दोन्ही दरवाजे उघडून देवाला मध्यान्हीचा नैवेद्य अर्पण करत होते. सर्वांनी श्रींची मनोभावे आरती केली.  
पेशवेकालीन सागवानी मंडपाची दुरुस्ती  (Shri Nrisinh Siddheshwar Temple, Dhom)

                   श्री नृसिंह मंदिरावर प्रशस्त सागवानी मंडप दिसतो. १७८० ला पेशव्यांनी पुण्याचे शिल्पकार शिवराम सावकार यांच्याकडून हा आतील मंडप आणि बाहेरील तटबंदीचं बांधकाम करून घेतलं. सध्या या लाकडी मंडपाची पुन्हा दुरुस्ती सुरू आहे.  

पुष्करणी, नंदी मंडप (Shri Nrisinh Siddheshwar Temple, Dhom)

                    श्री नृसिंह मंदिरासमोर अद्भुत रचनेची पुष्करणी दिसते. कमल पुष्पाच्या आकारातील या पुष्करणीत पाण्यावर प्रचंड आकाराचे पाषाणी कासव आणि त्याच्या पाठीवर भव्य मंडपी मंदिरात सुबक नंदी कोरला आहे. काळ्या पाषाणातील हे रेखीव शिल्प आणि त्याची कलाकुसर थक्क करून सोडते. जेव्हा या पुष्करणीत पाणी काठोकाठ भरते त्यावेळी कासव पाण्यावर तरंगतानाचा भास होतो. या पुष्करणीत जमिनीखालून 'सायपन' पध्दतीनं पाणी येतं. जडत्व आणि गुरुत्वाकर्षण तत्वानं चालणारं हे नैसर्गिक काम रहस्यमय वाटतं. तळाला कमळ त्यामध्ये कासव आणि वर नंदी हे जणू ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची प्रतीकं आहेत. या पुष्करणीची रचना आणि सुबक नक्षीचा नंदी मंत्रमुग्ध करणारे आहेत.

धौम्य ऋषींची समाधी  (Shri Nrisinh Siddheshwar Temple, Dhom)

पुष्कर्णीच्या मागील श्री सिद्धेश्वर मंदिर, डावीकडे  सुरूवातीला छोटे सूर्य मंदिर, त्यामागे गणेश मंदिर Dhom 
                   समोर काळ्या मजबूत पाषाणात बांधलेले अतिसुंदर श्री सिद्धेश्वर मंदिर आहे. मंदिराच्या पायऱ्या चढताना पायरी खाली चिंचोळ्या खोल जागेत 'धौम्य' ऋषींची समाधी आहे. सध्या ती जाळीच्या दरवाज्याने कुलुपबंद केली आहे. सरासरी आठ बाय बारा फूट आकाराची आत जागा दिसते. समोर मोठ्या दगडाने पुढील रस्ता बंद दिसतो. समाधीचे पावित्र्य राखण्यासाठी तिथे कोणी जात नाहीत. धौम्य ऋषी पांडवांचे पौराहित्य सांगत. मार्गदर्शन करत. त्यावेळी दंडकारण्यातील या ठिकाणी त्यांचा आश्रम होता. पांडवांचे भय नष्ट करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी शिव महादेवाची उपासना केली. श्री महादेवांनी चराचराला भयमुक्त करणारे श्री नृसिंहाला आवाहन केले आणि श्री विष्णूंचा चौथा अवतार श्रीनृसिंह महाराज प्रकट झाले. या घटनेमुळे या मंदिरास पांडवकालीन मंदिर मानलं जातं. 'धौम्य' ऋषींच्या नावावरून या गावास 'धोम' हे नाव रूढ झालं. मंदिराचे पुजारी श्री गणेश पांबरे गुरुजी यांनी मंदिराबद्दल सांगताना त्यावेळचा काळ, वेग, ग्रहांचे वेध यांची माहिती देत मंदिराच्या भौगोलिक स्थानाचं महत्त्व सांगितलं. काही समजलं तर काही आमच्या डोक्यावरून गेलं. असो. 
सभामंडप, श्री सिद्धेश्वर मंदिर  (Shri Nrisinh Siddheshwar Temple, Dhom)

सभामंडप, श्री सिद्धेश्वर मंदिर  (Shri Nrisinh Siddheshwar Temple, Dhom)

                    या सिद्धेश्वर मंदिराचा सभामंडप छातीइतक्या उंच जोत्यावर आहे आणि त्याखाली धौम्य ऋषींची समाधी दिसते. मंडपास दोन पूर्णाकृती आणि बाजूंचे दोन अर्ध खांब असे एकूण चार खांब दिसतात. मंडपाच्या मध्यावर जमिनीवर कासवाची दगडी प्रतिमा आहे. मंदिराच्या गर्भगृहाची मजबूत, ठेंगणी कोरीव चौकट असून तिच्या चौकटीवर गणेश तर उंबऱ्यावर सुंदर कीर्तीमुख कोरलं आहे. चौकटीच्या लाकडी दरवाजांवरही कलाकुसर केली आहे. ते मंदिरा इतकेच प्राचीन असून त्यांवर कोणताही वातावरणीय परिणाम होत नाही असे सांगितले जाते.  

श्री सिद्धेश्वर गर्भगृहाचे प्रवेशद्वार (Shri Nrisinh Siddheshwar Temple, Dhom)

श्री सिद्धेश्वर महादेव (Shri Nrisinh Siddheshwar Temple, Dhom)

गर्भगृहातुन दिसणारा सभामंडप (Shri Nrisinh Siddheshwar Temple, Dhom)
                    गर्भगृहाच्या पाच पायऱ्या उतरून समोर गुळगुळीत पाषाणी चौकटीत शिवलिंग स्थापन केलेलं दिसतं. सभोवती पाच अंकणे कोरलेल्या सुंदर  शिवपिंडीचं वेगळेपण उठून दिसतं. शिवलिंगाच्या मागे नागदेवतेनं सावली धरली असून शिवलिंगावर कलशातून नेहमी जलाभिषेक होताना दिसतो. मागे गर्भगृहाच्या पाषाणी भिंतीच्या दिवळीत माता पार्वतीची चतुर्भुज मूर्ती दिसते. गर्भगृहाच्या अंतराळातही सुंदर पुष्पदलं कोरली आहेत. आत गर्भगृहात नैसर्गिक उजेड येण्यासाठी डावीकडे भिंतीत उतरता झरोका ठेवला असून उजवीकडील झरोका बंद केल्याचं दिसतं. 

                  मंदिराचे आणि समोरील पुषकरणीचे (नंदी मंडपाचे) शिखर द्रविडी पद्धतीचे दिसते. शिखरावरही मंदिरांच्या गोलाकार प्रतिकृती सुबकरीत्या कोरलेल्या दिसतात. वर गोलाकार कळस दिसतो.  

नृसिंह मंडपातील महादेवाचा पंचमुखी खांब, समोर सिद्धेश्वर मंदिर 

माता पार्वतीच्या उजव्या पायाजवळ श्री गणेश आणि डावीकडे कार्तिकेय

श्री सूर्यनारायण मंदिर (Dhom)

श्री गणेश मंदिर (धोम)

               मंदिराच्या उजव्या बाजूस महादेवाची पाच मुखे असलेला पाच फूट उंचीचा विशिष्ठ गोलाकार दगडी खांब आहे. हा खांब या मंदिराचे शक्तिस्थान मानलं जातं.

             मंदिराच्या प्रांगणात मध्यभागी शिव महादेव श्री सिद्धेश्वर, समोर डाव्या बाजूला सूर्यनारायण, त्या मागे गणेश तर मंदिराच्या उजव्या बाजूस समोर माता पार्वती आणि मागील बाजूस कार्तिकेय स्वामींचं  मंदिर दिसतं. एकूण या मंदिराचं दुर्मिळ असं 'शिवपंचायतन' स्वरूप आहे.   

                 मंदिराच्या मागील बाजूस श्री गणेश आणि हनुमानाची मूर्ती स्थापिली आहे. बाजूला काही शिवलिंग, प्राचीन जीर्ण मुर्त्या आणि वीरगळी ठेवलेल्या दिसतात.  

अंधार विहीर, धोम 

अंधार विहीर, धोम

                  मंदिराच्या एकमेव मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यास तटबंदीच्या डाव्या कोपऱ्यात जमिनीखालील भुयारात उतरणाऱ्या पायऱ्या दिसतात. त्या एका गडद अंधाऱ्या विहिरीत उतरताना दिसतात. विहीर खोल असून विहिरीत सदोदित पाणी दिसतं. सध्या ती सुरक्षिततेसाठी लोखंडी जाळीच्या दरवाजांनी बंद केली आहे. या वेळी विहिरीचे दरवाजेही उघडे होते त्यामुळे आम्हाला आतल्या अंधुक उजेडात पाण्याची पातळी बघता आली. पण विहिरीत उतरणं नक्कीच धोकादायक आहे. श्री सिद्धेश्वर मंदिराच्या सभामंडपाखाली असणाऱ्या धौम्य ऋषींच्या समाधीपासून निघणारं पाणी पुष्करणीत जातं व तिथून पुढे या अंधाऱ्या विहिरीत येतं. या विहिरी मार्गे जमिनीखालून पाणी पुढे मंदिराच्या उजव्या बाजूस कृष्णेकाठी दिसणाऱ्या गोमुखातून बाहेर पडताना दिसतं. उन्हाळ्यात भूजल पातळी खोल जात असल्यानं या दिवसात पुष्करणीत पाणी कमी दिसतं. 

कृष्णेचे मूळ नदीपात्र आणि गोमुखाकडे (Dhom)
गोमुख, धूत पापेश्वर तीर्थ (Dhom)
                                     

                मंदिराच्या उजव्या बाजूचा उतार रस्ता कृष्णेच्या पूर्वीच्या मूळ नदी पात्राकडे जातो. इथे पूर्वी बांधलेला घाट दिसतो. घाटावर श्री गणेश, श्रीराम आणि पंचमुखी देवीचं मंदिर आहे. आमच्या भेटीदरम्यान ऐन उन्हाळ्यातही बारीक धारेनं गोमुखातून पाणी नदीपात्रात पडताना दिसत होतं. सध्या दिसणारं नदीपात्र म्हणजे कृष्णेच्या पात्रात नजर जाईल तिथपर्यंत प्रचंड माजलेली फक्त आणि फक्त जलपर्णीच दिसते. घाटावर चिखल, दलदलही आहेच.

धूत पापेश्वर तीर्थावरील जलपर्णीने व्यापलेले कृष्णेचे नदीपात्र (Dhom)

धोम धरण प्रकल्प, धोम, जि. सातारा, महाराष्ट्र.(Shri Nrisinh Siddheshwar Temple, Dhom)
श्री नृसिंह सिद्धेश्वर मंदिराचे पुजारी श्री गणेश पांबरे गुरुजी (Dhom)

                    पुजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कृष्ण महात्म्य गुरुचरित्रामध्ये ज्या 'धूतपापेश्वर तीर्था'चा उल्लेख आहे ते हेच 'गोमूख तीर्थ' आहे. कृष्णा नदीवर बांधलेल्या 'धोम धरण प्रकल्पा'मुळे इथून वाहणाऱ्या पूर्वीच्या कृष्णा नदीच्या पात्रात हस्तक्षेप झाला आणि नदीचे पात्र बदलले. त्यामुळे पात्रातील पाण्याचा नीट निचरा न होता दलदल आणि परिणामी जलपर्णी वाढली आहे. मंदिराचे पुजारी श्री पांबरे गुरुजी म्हणतात की, पश्चिम महाराष्ट्रात आढळणाऱ्या प्रत्येक डासाची प्रजात तुम्हाला इथे दिसेल. धोम गावच्या रहिवाशांनी ही जलपर्णी हटवण्यासाठी बरेच प्रयत्न केले पण ते यशस्वी झाले नाहीत. त्यांनी शासन दरबारी अर्ज देऊन या कृष्णेच्या मूळ पात्रात पाणी सोडण्याची विनंती केली आहे. परंतु ही बाबही वर्षानुवर्षे 'लाल फितीत' अडकलेली दिसते..

                                          || श्री कृष्णार्पणमस्तू ||

येथे - जयवंत जाधव  

'हम्पी' - विजयनगर साम्राज्याची राजधानी. - 'Hampi' - Medieval history of Vijaynagar dynasty.

                       सतराव्या शतकाच्या मध्यावर पश्चिम महाराष्ट्रात शिवछत्रपतींचं 'स्वराज्य' आकार घेत होतं आणि त्या दरम्यानच कर्नाट...