Tuesday, 29 October 2024

ऑफबीट - किल्ले 'भिवगड' (भिमगड), ता. कर्जत, रायगड. Offbeat - Bhivgad Fort, Karjat, Raigad, Maharashtra.

                     सह्याद्रीतील कर्जत डोंगररांगेची एक सोंड उत्तरेकडील 'गौरकामथ' गावात उतरलेली दिसते. डोंगरसोंडेच्या या माथ्यावर आणि कर्जतच्या अजश्र डोंगर कुशीत छोटासा 'किल्ले भिवगड' वसला आहे. 'भिवगड'ला 'भिमगड' या नावानंही ओळखलं जातं.
किल्ले भिवगड पायथ्याचा वीररुद्र मारुती आणि समोर दिसणारा 'किल्ले भिवगड', ता. कर्जत, रायगड (Bhivgad Fort, Karjat, Maharashtra)

                भिवगड फारसा परिचित नाही. पण भिवगडच्या आधी 'वदप' गावातून भिवगडला येणाऱ्या पायवाटेवरच्या धबधब्याला हौशी पर्यटकांची पावसात गर्दी दिसते. पुढे याच पायवाटेवरून डोंगराच्या खिंडीतून उजवीकडे जाणारी पायवाट 'ढाक बहिरी'ला जाते. आणि डावीकडील भिवगडला. गिर्यारोहण तंत्राची कला आणि ते साहित्य सोबत असणारे साहसवीर या बुलंद आणि बेलाग ढाकच्या किल्ल्याला भिडताना दिसतात. एरव्ही  तिकडे कोणी फारसे फिरकत नाहीत. भिवगडावरही उध्वस्त महादरवाजा, चौथऱ्यांचे अवशेष तसेच गाळाने भरलेल्या कातळ टाक्या दिसतात. त्यामुळे या धबधब्या व्यतिरिक्त भिवगडही अपरिचितच राहिलेला दिसतो.

                   समुद्र सपाटीपासून ८२५ फूट उंच, रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात असलेल्या या भिवगडला भेट देण्यासाठी 'गौरकामथ' हे गाव सोयीचे आहे. मध्य रेल्वेच्या कर्जत रेल्वे स्थानकातून अवघ्या आठ किमी अंतरावरील या गावात रिक्षा, वढाप करून येता येतं. किंवा स्वतःच वाहन असेल तर तिथून वीस मिनिटात 'गौरकामथ' गाठता येतं. 'वदप' गावातून भिवगडच्या मागील बाजूनेही तीव्र चढाच्या पायवाटेने या किल्ल्याची चढाई करता येते. दोन्ही गावांच्या मधोमध, उजव्या बाजूला डोंगर माथ्यावर किल्ला वसला आहे.

'वदप' गावातून दिसणारा किल्ले भिवगड, त्यामागे कर्जत डोंगररांग. (Bhivgad Fort, Karjat, Maharashtra)


गौरकामत गावामागील ओढा. (Bhivgad Fort, Karjat)


गौरकामत गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर  (Bhivgad Fort, Karjat, Maharashtra)

  

गौरकामत गावातून मारुतीची मूर्ती आणि किल्ल्याकडे जाणारा कच्चा रस्ता   (Bhivgad Fort, Karjat, Maharashtra)
                 गौरकामथ गावात रस्त्याच्या डाव्या बाजूला श्री विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. या मंदिराच्या समोर आणि गावच्या मागील बाजूने जाणारा कच्चा रस्ता कर्जत डोंगराकडे जातो. रस्त्याच्या डाव्या हातालाच डोंगरातून येणारा ओढा लागतो. पुढे सरासरी पाच मिनिटाच्या अंतरावर मोकळ्या जागेत वीररुद्र  मारुतीची शेडखाली भव्य मूर्ती दिसते. मूर्तीच्या मागे किल्ले भिवगडचा डोंगर तर त्या डोंगरापासून उजवीकडे  आलेल्या डोंगर सोंडेच्या पायथ्याला जवळच गौरकामथ गावास पाणीपुरवठा करणारी पाण्याची टाकी दिसते. या टाकी जवळून डोंगरसोंडेवरून जाणारी पायवाट किल्ले भिवगडास घेऊन जाते.
पाण्याची टाकी आणि किल्ल्यावर जाणारी डोंगरसोंड (Bhivgad Fort, Karjat, Maharashtra)
     
डोंगरसोंडेवरील पहिल्या सपाटीवरून दिसणारा किल्ले भिवगड  (Bhivgad Fort, Karjat, Maharashtra)
डोंगरसोंडेवरील पहिल्या सपाटीवरून दिसणारा किल्ले भिवगड  (Bhivgad Fort, Karjat, Maharashtra)
                                                                            

दुसऱ्या सपाटीवरून दिसणारा भिवगडचा पायथा (Bhivgad Fort, Karjat, Maharashtra)
 
भिवगड पायथ्याच्या कातळातील गुहा (Bhivgad Fort)

                अंदाजे पंधरा मिनिटाच्या चालीनंतर पायवाट पाहिल्या टेकडीची सपाटी ओलांडून दुसऱ्या टेकडीच्या डाव्या धारेवर जाते. ही लहान टेकडी ओलांडून अर्ध्या तासात पायवाट किल्ले भिवगडच्या पायथ्याशी येते. डाव्या बाजूने पुढे जाणारी कर्जत डोंगररांग आणि समोर किल्ले भिवगडवर चढणारी उभी घळ दिसते. डावे वळण घेऊन वाट किल्ल्याच्या उध्वस्त पायऱ्या जवळ येते. पायथ्याच्या उजव्या बाजूला कातळात खोदलेलली पाण्याची टाकी दिसते. पावसात कातळावरून ओघळणारं पाणी या टाकीत जमा होताना दिसतं. या टाक्यांच्या वरच्या बाजूला कातळात कोरलेल्या दोन गुहा दिसतात. पायऱ्या आणि खोबणींचा आधार घेऊन तिथे जाता येतं. पण खडकावर वाढलेलं शेवाळ आणि निसरड यामुळे ते खूपच धोकादायक असल्याने आम्ही तिथे गेलो नाही.

भिवगड पायथ्याची कातळटाकी, समोर गडावर जाण्याऱ्या उध्वस्त पायऱ्या (Bhivgad Fort)

भिवगड पायथ्याची पाऊलवाट  (Bhivgad Fort)

महादरवाजाकडे जाणाऱ्या उध्वस्त पायऱ्या 

                 या पायथ्याच्या टाकी पासून तुटलेल्या पायऱ्या पार करत पायवाट दोन कातळांच्या मध्ये उध्वस्त केलेल्या महादरवाजात येते. या दरवाजात पोहोचताना पायऱ्या अशा रीतीने उध्वस्त केल्या आहेत की त्या सांभाळूनच चढाव्या लागतात. पायऱ्यांवर वाढलेल्या शेवाळामुळे त्या धोकादायक झाल्या आहेत. या टप्प्यावर विशेष काळजी घ्यावी लागते. आधी या पायऱ्या छान घडीव कोरीव असाव्यात असे वाटते. या टप्प्याव्यतिरिक्त किल्ल्याची चढाई सोपी आहे. 

महादरवाजाच्या उध्वस्त पायऱ्या (Bhivgad Fort)

महादरवाजाच्या उध्वस्त पायऱ्या (Bhivgad Fort)

महादरवाजा, किल्ले भिवगड (Bhivgad Fort)

                 अखंड कातळात कोरलेल्या या महादरवाजाची ठेवण आणि त्याच्या अवशेषांवरून, सुस्थितीत असताना किल्ले भिवगडाने वेगवेगळ्या साम्राज्यात वैभव अनुभवले असावे. या पायऱ्या सांभाळून चढल्यानंतर उजवे वळण घेऊन पायऱ्या गडावर येतात. वाढलेल्या गवतातून वाट गडावरील उजवीकडे कातळात खोदलेल्या मुख्य टाकीजवळ येते. स्थानिक याला 'अर्चना टाकं' म्हणतात. या मोठ्या प्रशस्त टाकीतील पाणी पिण्यायोग्य स्वच्छ दिसतं. टाकीजवळच स्थानिक गावकरी पूजा करतात. फोडलेल्या नारळाच्या करवंट्या इथे विखुरलेल्या दिसतात. या टाकीजवळ थोडा विसावा घेऊन पुढील गडफेरीला सुरुवात करता येते.

भिवगडावरील 'अर्चना टाकी' - मुख्य खोदीव कातळ टाकी (Bhivgad Fort, Karjat, Maharashtra)

                या टाकीपासून उजवा वळसा मारून पायवाट गवतात गायब होते. गडमाथा लहान असला तरी गडाची लांबी दक्षिणेला 'वदप' गावाच्या दिशेला बऱ्यापैकी आहे. ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात आमच्या भेटीदरम्यान गडावर वाढलेले गवत आणि झुडूपांची सफाई आजुन झाली नव्हती. यावर्षी परतीचा पाऊस लांबला हे याचं मुळ कारण असावं. सरासरी आठ ते दहा फूट उंच गवतातून गडावरील अवशेष शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला.

भिवगडावरील घनदाट पावसाळी गवत (Bhivgad Fort)


भिवगडावरील घनदाट पावसाळी गवत (Bhivgad Fort)




 



 
   




 

                 आम्हा चौघांपैकी मुलांना कातळ टाकीजवळ मागे थांबवून आम्ही पती-पत्नी गडावरील वाटा सापडतात का याची खातरजमा करण्यासाठी गवतातून पुढे घुसलो. एकमेकांना हाका देत, मोठ्यानं बोलत, पायाखाली अंदाज घेत सावध चालत राहीलो. चालताना आम्हा दोघांमध्ये पाच ते सात फुटांपेक्षा जास्त अंतर नसावं, पण वाढलेल्या घनदाट गवतात आम्ही एकमेकांना दिसत नव्हतो. कोणत्या दिशेने चाललो आहोत त्याचा अंदाज येत नव्हता. डोळ्यावर आडवं येणारं गवत बाजूला सारूनही काही उपयोग होत नव्हता. नंतर पुढे गवतातून वाकून जाण्याचाही आमचा अनोखा प्रयत्न झाला. 

भिवगडावरील घनदाट पावसाळी गवत 
                इथल्या गवताची उंची आणि घनता इतकी आहे की आमचा पुढे पडणारा प्रत्येक पाय नक्की कुठे आणि कशावर पडतो ते कळत नव्हतं. त्यासोबत सरपटणाऱ्या विषारी प्राण्यांची भीतीही होतीच. आम्ही त्यांच्या अधिवासात घुसलो होतो याची पुरेपूर जाणीव होत होती.

                माजलेल्या प्रचंड गवतात गड माथ्यावर दिशा समजण्यास गोंधळ होत होता. पावसानंतर इकडे कोणी फारसे फिरकले नसावेत. अन्यथा त्यांच्या पायाखाली गवत दबून थोडीफार पायवाट दिसली असती. प्रचंड गवतातील चढ उतारा मधून पंधरा मिनिटांच्या सावध चालीनंतर समोर भगवा दिसला. गडाच्या सर्वोच्च माथ्याच्या बालेकिल्ल्यावर हा भगवा डौलानं फडकतो आहे. 

गवतातून दिसणारा गडमाथ्यावरील भगवा (Bhivgad Fort, Maharashtra)


गडमाथ्यावरी कातळटाक्या, मागे कर्जत डोंगररांग  (Bhivgad Fort, Karjat, Maharashtra)

                 गडाच्या या माथ्यावर कातळात दोन मोठ्या टाक्या खोदल्या आहेत. या टाक्यांच्या समोर पूर्वेला गडमाथ्यावरची तिसरी मोठी कातळ टाकी आहे. या टाकी भोवती सर्वत्र उंच गवत वाढल्याने अंदाज येत नाही. त्यामुळे या टाकीकडे जाताना सावध राहावं लागतं.

गडमाथ्यावरील तिसरी कातळटाकी (Bhivgad Fort)

                   भिवगडाच्या माथ्यावर किल्ल्याचे भग्न अवशेष आहेत. ते गवतातून शोधून काढावे लागतात. किल्ल्याच्या या माथ्यावरून नैऋत्येला उल्हास नदीचे खोरे, पश्चिमेला कर्जत परिसर त्यापलीकडे माथेरान डोंगररांग, दूरवर दाट धुक्यात किल्ले इर्शाळ दिसतात. दक्षिणेला लोणावळा डोंगर रांगेतील किल्ले राजमाची, कोंढाणे लेणी परिसर दिसतो. उत्तरेला किल्ले कोथळीगड, भीमाशंकर परिसर तर पूर्वेला अजस्त्र कर्जत डोंगररांग आणि किल्ले ढाक बहिरीचा परिसर नजरेच्या टप्प्यात येतो. वाढलेल्या गवतातून गडाची चढाई करताना सहसा अंगास वाऱ्याचा स्पर्श होत नाही. हवेतील आद्रता आणि घामामुळे चढाई दरम्यान अंग निथळून जातं. पण किल्ल्याच्या माथ्यावर मात्र छान वारा आहे. या ठिकाणी निवांत बसून आम्ही शिदोरी सोडली. 
उल्हास नदीचे खोरे आणि कर्जत परिसर (Bhivgad Fort, Karjat, Maharashtra)

गडमाथ्यावरून दिसणारी माथेरान डोंगररांग आणि धुक्यातून इर्शाळगड (Bhivgad Fort, Karjat, Maharashtra)

गडमाथ्यावरून दिसणारी मागे लोणावळा डोंगररांग आणि राजमाची परिसर (Bhivgad Fort, Karjat, Maharashtra)
                          
गडमाथ्यावरून दिसणारी कर्जत डोंगररांग (Bhivgad Fort, Karjat, Maharashtra)

                    किल्ल्याच्या माथ्यावर या टाकींच्या पुढे म्हणजे किल्ल्याच्या मागील बाजूस जाताना डावीकडे पुरुषभर उंच जोत्याची भिंत वाढलेल्या गवतातून शोधून काढली. या एकमेव प्राचीन भिंतीस तटबंदीचा भागही समजला जातो. हा डावीकडील जोत्याचा भाग म्हणजे किल्ल्याचा सर्वोच्च माथा आहे. तो गवतातून सहसा दिसत नाही. तोच मुख्य बालेकिल्ला आहे.   

किल्ल्यावरील जोत्याचे अवशेष (Bhivgad Fort)

किल्ल्यावरील जोत्याचे अवशेष (Bhivgad Fort)

किल्ल्यावरील जोत्याचे अवशेष (Bhivgad Fort)




    
                    



                 बालेकिल्ल्याच्या या सर्वोच्च माथ्यावर सपाटी असून त्यावरही प्रचंड वाढलेलं घनदाट गवत आहे. पावसाळ्यानंतर किल्ल्याची साफसफाई करताना ही जागा गवत कापून मोकळी केली जाते. थोडं पुढे आल्यास पायवाट तीव्र उताराने पुरुषभर उंच गवतातून नागमोडी वळणं घेत कर्जत डोंगराच्या दिशेने वदप गावाकडे जाते. जाताना उताराच्या मध्यावर आणखीन दोन मोठ्या पाण्याच्या टाक्या आहेत. पण गवतामुळे तिथपर्यंत जाता आलं नाही. भिवगडाच्या पायथ्यापासून ते बालेकिल्ल्यापर्यंत कातळात खोदलेल्या बारा पाण्याच्या कातळ टाक्या आहेत. त्यात दोन प्रशस्त खांब टाक्याही आहेत. काही कातळ उतारावर आहेत. वाढलेलं प्रचंड गवत ही मोठी अडचण आहे. 'भिवगड अखंड संवर्धन सेवा समिती' ही स्थानिक समिती येत्या तीन-चार वर्षात गडावर संवर्धनाचं काम करते. गडावरील गवत सफाई, टाक्यातील गाळ काढणे, झाडे लावणे इत्यादी उपक्रम राबवत असते. त्यांना इतर गडांवर संवर्धनाचं काम करणाऱ्या संस्था वेळोवेळी मदत करतात.

                   पावसाळ्यानंतर गडावरील सफाई करण्यापूर्वी एकट्या दुकट्याने या घनदाट, उंच गवतातून भटकंती करणं धोकादायक आहे.
                   नंतर पायवाट खिंडीत ढाक बहिरीच्या फाट्यावर उजवं वळण घेऊन डोंगरावरून कोसळणाऱ्या धबधब्याच्या फाट्याजवळ येते. तिथून ती वदप गावात येते.  

वदप गावाकडे उतरणारी पायवाट, मागे कर्जत डोंगर आणि ढाक बहिरी (Bhivgad Fort, Karjat, Maharashtra)

                   गौरकामथ गावातून भिवगड सर करून, गडाच्या मागील बाजूने वदप गावातही उतरता येते. ही तीन साडेतीन तासांची छान, निवांत भटकंती करता येते. पण स्वतःचे वाहन असेल तर पुन्हा गौरकामथ गावात परत येणे गैरसोयीचे आहे.

                काही रेंज ट्रेकर्स कर्जत, कोंढाणे लेणी ते किल्ले राजमाची असा जंगलातील तीन-चार तासांचा ट्रेकही करतात.
                 किल्ले भिवगडाला बुरुज तटबंदी अस्तित्वात नाही. पण कमी उंचीच्या दोन्ही बाजूने खंदक खोदून किल्ल्याला संरक्षण दिल्याचं दिसतं. एरव्ही गडकिल्ले हे तटा बुरुजांनी सुरक्षित केले जातात. पण हे खोदलेले खंदक भिवगडाचं वेगळेपण आहे. हे खंदक 'वदप' गावातून स्पष्ट दिसतात.  

'वदप' गावातून दिसणारा किल्ले भिवगडचा खंदक (Bhivgad Fort, Karjat, Maharashtra)

                  भिववगडचा लिखित इतिहास सापडत नाही. किल्ले ढाक व्यतिरिक्त या परिसरातील ई.स. पूर्व दुसऱ्या शतकात खोदलेली 'कोंढाणे लेणी' आणि बाजूला लोणावळा डोंगर रांगेतील 'किल्ले राजमाची' आहे. त्यांच्याच समकाळात भिवगडाची निर्मिती केली असावी. किल्ले राजमाची ओलांडून पुढे कार्ले आणि भाजे लेणी आहेत. इतिहास जाणकारांच्या मते कल्याण, सोपारा या प्राचीन बंदरात उतरणाऱ्या मालाची ने-आण कोंढाणे लेणी, बोरघाट (लोणावळा), कार्ले, भाजे लेणी ते  पुढे तेर, पैठण असा प्राचीन व्यापारी मार्ग अस्तित्वात होता. या मार्गाला संरक्षण पुरवण्याचे काम किल्ले राजमाची, ढाक बहिरी सोबत भिवगडानेही नक्कीच केले असावे. भिवगडाच्या प्राचीन खुणा हे सिद्ध करुन जातात. 

महादरवाजा, किल्ले भिवगड (Bhivgad Fort, Karjat, Maharashtra)

             साधारणतः सर्वच लढायात आणि किल्ल्याला वेढा घालताना प्राचीन काळापासून वापरले जाणारे सर्वात भेदक शस्त्र म्हणजे 'सुरुंग'. हे सुरुंग सुद्धा सह्याद्रीच्या काळ्या कातळांच्या उंच कड्यावर वसलेल्या गिरी दुर्गांविरुद्ध हतबल ठरले. त्यामुळे मुख्य सह्याद्रीच्या धारेत घाटमाथ्यांवर उभारलेल्या या किल्ल्यांची साखळी, सागरी कोकण प्रदेशांसाठी प्राचीन काळापासून संरक्षणाची गुरुकिल्ली ठरली. शिवछत्रपतींनी अशा किल्ल्यांचं महत्त्व वेळीच ओळखलं. जुन्या किल्ल्यांच्या दुरुस्ती सोबत त्यांनी नवे दुर्गही वसविले. या किल्ल्यांच्या आधाराने लढलेल्या लढाया आणि किल्ल्यांची धास्ती मराठी साम्राज्याशी लढणाऱ्या सर्वच सत्तांनी घेतली. 

महादरवाजा, किल्ले भिवगड (Bhivgad Fort)

किल्ले भिवगड (Bhivgad Fort, Karjat, Maharashtra)

                 इंग्रजांनी तर सह्याद्रीतील या गिरीदुर्गांची इतकी दहशत घेतली की सन १८१८ सालच्या या एकाच वर्षात ताब्यात घेतलेले सर्व गड किल्ले त्यांनी सुरुंग लावून उध्वस्त केले. किल्ल्यांचे सारे संरक्षक अवयव छाटले. त्यानंतर पुढे दीड दोनशे वर्ष ऊन, वारा, पावसाच्या निमित्ताने निसर्गाने ही अखंड प्रक्रिया चालूच ठेवली. भिवगडच्या भेटीत उध्वस्त महादरवाजा समवेत किल्ल्यावरील अवशेष पाहताना या गोष्टींची प्रकर्षाने जाणीव होते..
                                            || श्री कृष्णार्पणमस्तू ||
येथे - जयवंत जाधव

'हम्पी' - विजयनगर साम्राज्याची राजधानी. - 'Hampi' - Medieval history of Vijaynagar dynasty.

                       सतराव्या शतकाच्या मध्यावर पश्चिम महाराष्ट्रात शिवछत्रपतींचं 'स्वराज्य' आकार घेत होतं आणि त्या दरम्यानच कर्नाट...