मुंबईहून नाशिकला जाताना इगतपुरी परिसरातून सह्याद्रीची दक्षिणोत्तर पसरलेली मुख्य रांग दिसते. 'कसारा' घाट म्हणजेच प्राचीन 'थळ' घाट संपल्यानंतर 'इगतपुरी' हे घाटमाथ्यावरचे पहिले गाव लागते. इथून पूर्वेकडे डोंगराला फुटलेला फाटा हा 'कळसुबाई' डोंगररांग म्हणून ओळखला जातो. या रांगेत उत्तरेला 'किल्ले त्रिंगलवाडी' आहे.
'इगतपुरी' म्हणजे रेल्वेचे मोठे जंक्शन. इगतपुरी गावातून लोहमार्गाला समांतर जाणाऱ्या उत्तरेकडील रस्त्याला आंबेडकर चौक दिसतो. चौकातल्या 'विपश्यना' केंद्राजवळ डावं वळण घेऊन जाणारा रस्ता 'त्रिंगलवाडी' किल्ल्याकडे जातो. थोडक्यात, किल्ले 'त्रिंगलवाडी'ची डोंगररांग अगदी इगतपुरी पर्यंत आलेली दिसते.
 |
कल्याण दरवाजा, किल्ले त्रिंगलवाडी, इगतपुरी, जि. नाशिक, महाराष्ट्र. (Tringalwadi Fort, Igatpuri, Maharashtra) |
इगतपुरीपासून अर्ध्या तासाच्या अंतरावर 'त्रिंगलवाडी' गावाला लागूनच विस्तीर्ण जलाशय आणि धरण दिसतं. त्या गावाच्या पुढे जलाशयाला डावा वळसा मारत 'पत्र्याची वाडी' करून रस्ता पुढे गडपायथ्याच्या 'तळ्याच्या वाडी'त येतो.
 |
विपश्यना केंद्र, इगतपुरी (Tringalwadi Fort, Igatpuri, Maharashtra) |
या आधी फक्त त्रिंगलवाडी गावापर्यंतच रस्त्याची सोय होती. त्यामुळे पुढे त्रिंगलवाडी जलाशयाच्या धरणाची भिंत चढून किल्ल्यासाठी उजवा वळसा मारावा लागत असे. सध्या तळ्याच्या वाडी पर्यंत झालेल्या रस्त्यामुळे हा द्रविडी प्राणायाम आणि वेळेची बचत होते.
 |
तळ्याची वाडीतील 'तळं' आणि मागे दिसणारा किल्ले त्रिंगलवाडी (Tringalwadi Fort, Igatpuri, Maharashtra) |
तळ्याची वाडी ही किल्ले 'त्रिंगलवाडी'च्या पायथ्याची वाडी. त्यामागे वस्तीला पाणी पुरवणारं आणि धुण्या भांड्यासाठी मदत करणारं तळं दिसतं. या तळ्यामुळे कदाचित या वस्तीला 'तळ्याची वाडी' म्हणत असावेत. या सगळ्यांच्या मागे डाव्या बाजूस दक्षिणोत्तर आडव्या डोंगरावर 'किल्ले त्रिंगलवाडी' दिसतो.
तळं ओलांडताच पायवाटेवर 'सतीशिळा' स्वागत करते. वाडीतून पंधरा मिनिटांच्या अंतरावर भात शेतीच्या बांधावरून पाऊलवाट प्रथम दहाव्या शतकात कोरलेल्या जैन लेण्यांकडे येते. आणि या लेण्यांपासून डोंगरावर जाणारी वाट किल्ल्यावर घेऊन जाते.
 |
पत्र्याच्या वाडीतील भातमळणीचं पारंपारिक' खळं' आणि मागे दिसणारा किल्ले त्रिंगलवाडी (Tringalwadi Fort, Maharashtra) |
 |
तळ्याची वाडीतील भातकापणी आणि मागे दिसणारा किल्ले त्रिंगलवाडी (Tringalwadi Fort, Igatpuri, Maharashtra) |
आमच्या भेटीदरम्यान गाव वस्तीत सुगीची लगबग दिसत होती. भात कापणी करून ते डोक्यानं खळ्यापर्यंत आणणं आणि भाताची मळणी काढणं चालू होतं.
 |
किल्ल्याच्या पायवाटेवरील 'सतीशिळा' (Tringalwadi Fort) |
वाडी मागे टाकत भातशेतं ओलांडुन येताना डोंगर पायथ्याच्या सखलात हे पूर्वाभिमुख लेणं कोरलेलं दिसतं. लेण्यांच्या समोर प्रशस्त मोकळं आवार असून ओसरी(व्हरांडा), मंडप (विहार) आणि आत गर्भगृह अशी लेण्याची रचना आहे.
 |
किल्ल्याच्या पायथ्याचं १० व्या शतकातील लेणं (Tringalwadi Fort, Igatpuri, Maharashtra) |
ओसरीत मंडपाच्या प्रवेशदाराच्या कातळ चौकटीवर देवतांच्या सुंदर मूर्ती सोबत कोरीव नक्षीकाम आहे. चौकटीवर मध्यभागी सुंदर नाजूक नक्षीसह तीर्थंकरांच्या मुर्त्या कोरलेल्या दिसतात. ओसरीच्या छतावर मध्यभागी वर्तुळात चित्तवेधक यक्ष कोरले आहेत. त्याच्याच बाजूला वर्तुळात दोन दोन सुबक पुष्प कोरली आहेत. छताच्या कातळ तुळ्यांवरही सुंदर नक्षीकाम आहे. दाराच्या दोन्ही बाजूस सुरेख जाळीची गवाक्ष आहेत. चौकटीचा उंबरा तुटलेला दिसतो.
 |
लेण्याच्या मंडपाचे प्रवेशदार, किल्ले त्रिंगलवाडी, इगतपुरी, महाराष्ट्र. (Tringalwadi Fort, Igatpuri, Maharashtra) |
 |
लेण्याची ओसरी आणि मंडपाचे प्रवेशदार, किल्ले त्रिंगलवाडी, इगतपुरी, महाराष्ट्र. (Tringalwadi Fort, Igatpuri, Maharashtra) |
ओसरीला आधार देणारे समोरचे खांब उध्वस्त दिसतात. त्या खांबांचे सुंदर कोरीव अवशेष लेण्यांच्या प्रशस्त आवारातील मध्यभागी रचून ठेवले आहेत. लेण्यांच्या बाहेर डाव्या कोपऱ्यात सुबक भग्न मुर्त्या ओळीने मांडून ठेवल्या आहेत.
 |
लेण्याबाहेर डाव्या कोपऱ्यात मांडलेल्या भग्न मुर्त्या. |
आत प्रशस्त मंडप असून मंडपाला आधार देणारे आठ खांब आहेत. त्यापैकी चार पूर्णाकृती असून चार गाभाऱ्याच्या चौकटी लगत दोन्ही बाजूला अर्धखांब आहेत. मंडपातील चार पूर्ण खांबांपैकी तीन संपूर्ण उध्वस्त दिसतात. तर एक आपलं अस्तित्व आजही राखून आहे.
 |
लेण्याच्या मंडपाचे तुटलेले आधारखांब आणि मागे गर्भगृह. किल्ले त्रिंगलवाडी, इगतपुरी, महाराष्ट्र. (Tringalwadi Fort, Maharashtra) |
 |
खांबावरील 'भारवाहक यक्ष'. किल्ले त्रिंगलवाडी. |
|
गर्भगृहाच्या चौकटी जवळ छताला आधार देणाऱ्या खांबांवर सुंदर 'भारवाहक यक्ष' कोरलेले दिसतात. गर्भगृहाच्या दोन्ही बाजूची चौकट तुटलेली असली तरी शिल्लक चौकटीवरही सुबक आणि नाजूक जाळीदार नक्षी कोरलेली दिसते. मंडपात दोन्ही बाजूला बसण्यासाठी ओटे दिसतात तर उजवीकडील कोपऱ्यात कातळात खोदलेलं गोलाकार पाण्याचं 'कुंड' दिसतं. त्यात बारा महिने पाणी असतं. पावसाळ्यात लेण्यामागील डोंगरातून झिरपून येणारं पाणी लेण्याच्या मंडपात येतं. तिथून ते कातळ जमिनीवरून ओसरीच्या डाव्या बाजूनं लेण्याबाहेर येताना दिसतं. लेण्यात झिरपणाऱ्या पाण्यामुळे आत ओलावा टिकून आहे. उन्हाळ्यात हा ओलावा कमी होत असावा.
 |
लेण्याच्या मंडपातील पाण्याचे 'कुंड'. (Tringalwadi Fort) |
 |
लेण्याच्या मंडपातील कोनाडे. मागे गर्भगृहात ऋषभनाथनांची मूर्ती. किल्ले त्रिंगलवाडी, महाराष्ट्र. (Tringalwadi Fort, Maharashtra) |
 |
मंडपातील एकमेव आधारस्तंभावरील कोरीव काम. त्यामागे दिसणारे लेण्यातील तुटलेले अवशेष. (Tringalwadi Fort) |
आधी या लेण्याचा स्थानिक जनावरे बांधण्यासाठी उपयोग करत. येत्या चार वर्षाच्या कालावधीत पुरातत्व खात्याचं या लेण्यांकडे लक्ष गेलेलं दिसतं. गावातीलच एकाला पुरातत्व खात्यानं या लेण्यांची साफसफाई आणि व्यवस्था ठेवण्याची जबाबदारी दिली आहे. या लेण्याचा आत बाहेर मिळून जवळजवळ ८० टक्के भाग उध्वस्त दिसतो. तुटलेले हे सर्व अवशेष मंडपाच्या डाव्या कोपऱ्यात रचून ठेवले आहेत. तर कोरीव खांबाचे तुटलेले मोठमोठे अवशेष लेण्यांसमोर आवारात मांडून ठेवले आहेत. तुटलेल्या आणि अस्तित्व राखून असलेल्या लेण्याचा भाग यांची कल्पना केल्यास हे एक अजोड कलात्मक लेणं असावं.
प्राचीन चौल, कल्याण, सोपारा (नालासोपारा) या बंदरात उतरणारा माल 'थळ' घाट (कसारा घाट) मार्गे नाशिकला जात असे. या व्यापारी मार्गावर विसावा घेण्यासाठी या लेण्यांचा उपयोग होत असे. आणि किल्ले 'त्रिंगलवाडी'नं या लेण्यास संरक्षण दिलं.
गर्भगृहात चौथर्यावर पहिले जैन तीर्थंकर 'ऋषभनाथां'ची सुबक ध्यानमग्न मूर्ती, पण तीही खांद्यांच्या वर भग्न झालेली आहे. मूर्तीच्या खाली शिलालेख कोरलेला दिसतो. या मूर्तीसाठी गर्भगृहात शिरताना जवळ टॉर्च ठेवणं गरजेचं आहे.
 |
लेण्याच्या गर्भगृहात पहिले जैन तीर्थंकर 'ऋषभनाथ' |
हे एकमेव लेणं 'किल्ले त्रिंगलवाडी' डोंगर पायथ्याशी असल्यामुळे परकीय आक्रमणात किल्ल्यावर ताबा मिळवताना प्रत्येक वेळी पहिला आघात या लेण्यावर झाला असावा असे वाटते.
किल्ले त्रिंगलवाडीसाठी आम्ही राहत्या पनवेलहून सकाळीच घर सोडलं. या वेळी मी आणि पत्नी दोघेच होतो. मोटरसायकलवरून १३५ किमीचा मनमुराद प्रवास करत, किल्ले 'त्रिंगलवाडी' पायथ्याच्या 'तळ्याच्या वाडी'त दुपारी बारा वाजता पोहोचलो. ही लेणी बघून लेण्यांच्या ओसरीतच आम्ही बांधून आणलेली शिदोरी सोडली. आणि त्यानंतर भर उन्हात दुपारी एक वाजता समुद्र सपाटीपासून ३२०० फूट उंचीवर असलेल्या किल्ल्याकडे मोहरा वळवला.
 |
लेण्याच्या डाव्या बाजूने डोंगरसोंडेवर जाणारी वाट. (Tringalwadi Fort) |
या लेण्यांच्या डाव्या बाजूने डोंगरावर चढून गेल्यास वीस मिनिटात आपण डोंगराच्या आडव्या सोंडेवर पोहोचतो. ही डोंगरसोंड डावीकडे उतरती आहे, तर उजवीकडे किल्ल्याच्या दिशेने चढत जाते.
 |
डोंगरसोंडेवरुन किल्ल्यावर येणारी वाट. किल्ले त्रिंगलवाडी, इगतपुरी, महाराष्ट्र. (Tringalwadi Fort, Igatpuri, Maharashtra) |
 |
डोंगरसोंडेवरुन 'किल्ले त्रिंगलवाडी'ची दिसणारी कातळटोपी. किल्ले त्रिंगलवाडी, महाराष्ट्र. (Tringalwadi Fort, Maharashtra) |
या डोंगरसोंडेवरुन उजवीकडे दूरवर किल्ल्याची कातळ टोपी दिसते. पुढच्या वीस मिनिटात चढत जाणारी पायवाट किल्ल्याच्या कातळाखाली येते. या कातळाच्या डावी उजवीकडून दोन्ही बाजूने किल्ल्यावर जाता येतं. पैकी उजवीकडून जाणारी वाट कमी कष्टाची आणि सोपी आहे. तर डावीकडून कातळ टोपीला वळसा मारत ती कातळ काठावरून पुढे जाते. वाट शेवटी किल्ल्याच्या पश्चिमेला दिसणाऱ्या दोन सुळक्यांच्या अवघड टप्प्याजवळ येते.
 |
कातळटोपीच्या डाव्या बाजूच्या डोंगरधारेवरून किल्ल्यावर जाणारी वाट. |
हा टप्पा म्हणजे डोंगराच्या उभ्या घळीमध्ये कातळात कोरलेल्या उभ्या पायऱ्या आणि खाली दरी आहे. सुरुवातीच्या काही पायऱ्या पूर्णतः उध्वस्त आहेत तर त्या पुढील पायऱ्या अर्धवट उध्वस्त आहेत. तोल सांभाळत, कातळाचा आधार घेत इथली चढाई करावी लागते. पुरुषांच्या तुलनेत सरासरी कमी उंची असल्यानं महिला ट्रेकर्सना हा टप्पा जरा धिरानंच सर करावा लागतो.
 |
उध्वस्त पायऱ्यांचा सुरुवातीचा कठीण टप्पा, किल्ले त्रिंगलवाडी (Tringalwadi Fort) |
 |
किल्ले त्रिंगलवाडीच्या उभ्या ५२ पायऱ्या, किल्ले त्रिंगलवाडी |
 |
किल्ले त्रिंगलवाडीच्या उभ्या ५२ पायऱ्या, किल्ले त्रिंगलवाडी |
 |
किल्ले त्रिंगलवाडीच्या उभ्या ५२ पायऱ्या, किल्ले त्रिंगलवाडी, महाराष्ट्र Tringalwadi Fort, Maharashtra
|
हा टप्पा ओलांडून दोन्ही कातळातून वर जाणाऱ्या उभ्या ५२ पायऱ्या दम काढतात. मधे काही पायऱ्या तुटलेल्या आहेत. त्या आणि या सर्वच पायऱ्या गडबड न करता संयमानच चढाव्या लागतात. पुढे या पायऱ्या उजवा वळसा घेत त्याच कातळात उजवीकडे कोरलेल्या किल्ल्याच्या गोमुखी दरवाजात येतात.
 |
पश्चिमेकडील 'कल्याण दरवाजा'. किल्ले त्रिंगलवाडी, महाराष्ट्र (Tringalwadi Fort, Maharashtra) |
या पायऱ्या चढताना 'किल्ले सरसगडा'ची हमखास आठवण येते. पश्चिमेकडील किल्ल्याच्या या दरवाजास 'कल्याण दरवाजा' किंवा 'महादरवाजा'ही म्हटलं जातं. किल्ल्याच्या पश्चिमेला अवघड टप्प्याने या पायऱ्या गडाखाली उतरतात, त्यामुळे या दरवाज्यास काहीजण 'चोर' दरवाजाही म्हणतात.
पायऱ्या चढून वर आल्यास समोर कातळ भिंतीवरच्या कमानीत अंदाजे सहा फूट उंच, शेंदूर लावलेली वीर मारुतीची मूर्ती कोरली आहे. मूर्ती सुरेख प्रमाणबद्ध, सुंदर, सुबक आणि भव्य अशीच म्हणावी लागेल. मूर्तीच्या पायाखाली राक्षस दाबून धरलेला दिसतो. या मूर्तीच्या काटकोनात उजव्या बाजूस हा दरवाजा दिसतो.
 |
कल्याण दरवाजा' |
 |
वीर मारुती, किल्ले त्रिंगलवाडी (Tringalwadi)
|
 |
कातळात आरपार कोरलेला 'कल्याण दरवाजा'. किल्ले त्रिंगलवाडी, महाराष्ट्र (Tringalwadi Fort, Maharashtra) |
दरवाजा भव्य आयताकृती असून, त्याच्या चौकटीवर दोन्ही बाजूस किल्ल्यांचे शक्तिस्थळ असणारे सुंदर 'शरभ' कोरलेले दिसतात. त्याखाली चौकटीवर 'चंद्र' आणि 'सूर्या'च्या प्रतिमा कोरल्या आहेत. चौकटीत नजीकच्या काळात बनवलेले दोन मजबूत सागवानी दरवाजेही दिसतात. हा महादरवाजा आत अंदाजे बारा फूट अखंड कातळात आरपार कोरला आहे. दरवाजाच्या आतील दोन्ही बाजूस सात फूट उंचावर शिपायांसाठी 'देवड्या' कोरलेल्या आहेत. इतर किल्ल्यांच्या तुलनेत इथल्या देवड्या छतालगत इतक्या उंचावर ठेवण्याचा उद्देश मात्र आमच्या लक्षात आला नाही. पुढे बाहेर पडण्यासाठी या दरवाजाला कमान ठेवली आहे. हा दरवाजा ओलांडून त्याच कातळातील दहा बारा पायऱ्या चढून गडावरील समतल जागेवर येता येतं.
 |
किल्ल्यावर येणारा भुयारी 'कल्याण दरवाजा'. किल्ले त्रिंगलवाडी (Tringalwadi Fort) |
 |
भुयारी 'कल्याण दरवाजा'तून किल्ल्यावर येणाऱ्या पायऱ्या |
या टप्प्यावरून जर गडउतार व्हायचं असेल तर आधी या भुयारी पायऱ्या उतरून वाट महादरवाजात येते. उजवीकडे कोरीव मारुती आणि डाव्या बाजूच्या अखंड कातळातील तीव्र उताराच्या पायऱ्या उतराव्या लागतात. किल्ल्यावर असताना अगदी या भुयारी पायऱ्या उतरून पुढे येईपर्यंत जमिनीखालील या दरवाजाचा अंदाज येत नाही. कदाचित यामुळेच या दरवाजास 'चोर दरवाजा'ही म्हणत असावेत.
किल्ल्याचा हा भुयारी दरवाजा, त्याला काटकोनात कोरलेली वीर मारुतीची भव्य मूर्ती आणि त्याच अखंड कातळात कोरलेल्या गडउतार होणाऱ्या पायऱ्यांचा अवघड टप्पा हे या 'किल्ले त्रिंगलवाडी'चे अलौकिक, भव्य असे वास्तूवैशिष्ट्य आणि प्रमुख आकर्षण आहे. ज्या भटक्यांना हा किल्ला सर्वार्थांनं बघायचा आहे त्यांनी किल्ल्याच्या या पश्चिमेकडील दरवाजानं चढाई करावी.
 |
किल्ल्याच्या दक्षिणेकडे जाणारी पाऊलवाट. किल्ले त्रिंगलवाडी (Tringalwadi Fort) |
 |
किल्ल्याच्या दक्षिणेकडे जाणारी पाऊलवाट. किल्ले त्रिंगलवाडी (Tringalwadi Fort) |
 |
किल्ल्याची पश्चिम कडा. समोर सह्याद्रीची मूळ पर्वतरांग. (Tringalwadi Fort, Maharashtra)
|
हा दरवाजा ओलांडून वर आल्यास लगेच डावीकडे कातळात एक पाण्याची उथळ टाकी दिसते. सध्या त्यात पाणी दिसत नाही. इथून गवतातून जाणारी पाऊलवाट डावीकडील बालेकिल्ल्याची टेकडी आणि उजवीकडील पश्चिमेचा कडा यांच्या मधून गडाच्या दक्षिण टोकाकडे येते.
गडावर कमरे इतकं वाढलेलं गवत आणि त्यावरची मोहक खसखशीच्या आकाराची सुकलेली फुलं मोहून टाकतात. त्याचबरोबर गडाच्या पठारावर सर्वत्र 'कुर्डू'च्या भाजीचे तुरे आकर्षून घेतात. या नाजूक गवतातून भटकंती करणं हा एक सुखद अनुभव आहे.
 |
किल्ल्याच्या दक्षिणेकडील उध्वस्त राजवाड्याचे अवशेष. (Tringalwadi Fort, Maharashtra)
|
 |
राजवाड्याचे अवशेष. (Tringalwadi Fort, Maharashtra)
|
|
 |
कातळावरील चौकोनी 'खळगे'. (Tringalwadi Fort)
|
गडाच्या दक्षिण टोकाला पडक्या वाड्याचे अवशेष आहेत. वाड्यासमोर कातळ जमिनीवर खोदलेले चौकोन खळगे दिसतात. असे चौकोनी खळगे वाड्यातही दिसतात. हे कदाचित त्यावेळी गडावर तात्पुरता आडोसा किंवा छप्पर उभारण्यासाठी या खळग्यांचा वापर होत असावा. कातळ टाकींच्या सभोवती दिसणाऱ्या खाळग्यांचा उपयोग हा उष्णतेने पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये यासाठी टाकीवर छत उभारण्यासाठी केला असावा.
हे अवशेष बघून पुन्हा थोडं मागे येऊन पाऊलवाट तीव्र चढाने डाव्या बाजूला गडाचा सर्वोच्च माथा असलेल्या बालेकिल्ल्यावर जाते. बालेकिल्ल्यावर भगवा फडकत असून, पूर्व-पश्चिम पसरलेला निमुळत्या लांबट आकाराचा आहे. बालेकिल्ल्याच्या पूर्व टोकाला जाताना डावीकडे उत्तरेकडील उभा कडा आणि खाली ठाव न लागणारी खोल दरी आहे. दरीत प्रचंड वाढलेलं जंगल दिसतं. बालेकिल्ल्यावर तटबंदी किंवा कोणतेही अवशेष दिसले नाही.
 |
बालेकिल्ल्याची टेकडी. किल्ले त्रिंगलवाडी(Tringalwadi Fort, Maharashtra) |
 |
बालेकिल्ल्याची उत्तर कडा.(Tringalwadi Fort) |
 |
बालेकिल्ला. किल्ले त्रिंगलवाडी(Tringalwadi Fort) |
 |
बालेकिल्ल्याची उत्तर कडा.(Tringalwadi Fort) |
बालेकिल्ल्याच्या या उत्तर कड्यावरून धुक्यातून सह्याद्रीची 'त्र्यंबक' डोंगररांग, किल्ले हरिहर, बसगड नजरेच्या टप्प्यात येतात.
बालेकिल्ल्यावरून सभोवतालचा विहंगम आसमंत दिसतो. दक्षिणेस इगतपुरीची डोंगररांग, आग्नेयेला त्रिंगलवाडी जलाशयाच्या पलीकडे कळसुबाई डोंगररांग नजरेच्या टप्प्यात येते.
 |
बालेकिल्ल्यावरून दिसणारे किल्ल्याचे दक्षिण टोक. त्यापुढे सह्यद्रीची इगतपुरी डोंगररांग. (Tringalwadi Fort, Maharashtra) |
 |
बालेकिल्ल्यावरून दिसणारी सह्याद्रीची कळसुबाई डोंगररांग. (Tringalwadi Fort, Maharashtra)
|
 |
किल्ल्यावरील गुहा. किल्ले त्रिंगलवाडी (Tringalwadi Fort) |
 |
किल्ल्यावरील शिवशंकर मंदिर. किल्ले त्रिंगलवाडी (Tringalwadi Fort)
|
बालेकिल्ल्यावरून पुन्हा खाली येऊन डावा वळसा मारून गवतातून पुढे गेल्यास कातळात खोदलेली गुहा दिसते. तिला कातळ खांबांचा आधार दिसतो. सध्या गुहेत साचलेला गाळ दिसतो. त्यापुढे गडाच्या पूर्व टोकाला छोटसं श्री शिवशंकराचं मंदिर दिसतं. मंदिरापुढे आवारात शिवपिंडी दिसते. आत मंदिरात श्रीगणेशासह, माता पार्वती आहे. बाजूला चतुर्भुज स्वरूपातील श्री तुळजा भवानी असावी.
 |
किल्ल्यावरील शिवशंकर मंदिर. किल्ले त्रिंगलवाडी
|
पुन्हा गडाच्या दक्षिण टोकाकडे खाली उतरल्यास कातळ उतारावर आणखी एक पाण्याची टाकी खोदलेली दिसते. पुढे दक्षिण टोकाकडे खाली आणखी एका वाड्याचे अवशेष दिसतात. या वाड्यात आधी देव राहायचे. वाडा पडल्यानंतर गावकऱ्यांनी देवांना खाली गावात हलविले अशी गावात माहिती मिळते.
 |
किल्ल्याच्या पूर्व उतारावरील कातळटाकी. किल्ले त्रिंगलवाडी (Tringalwadi Fort, Maharashtra) |
 |
किल्ल्यावरील कातळटाकी. (Tringalwadi Fort, Maharashtra) |
या वाड्यापासून कातळावर उजवा वळसा मारून पुढे आल्यास किल्ल्याच्या दक्षिण बाजूनं गडउतार होण्यासाठी कातळात कोरलेल्या पायऱ्या दिसतात. त्यांच्या तुटलेल्या रचनेवरून आधी इथे किल्ल्याचे प्रवेशदार असावे. या उतरणाऱ्या घडीव पायऱ्या झीज होऊन ओबडधोबड झाल्या आहेत.
 |
किल्ल्यावरील वाड्याचे अवशेष. (Tringalwadi Fort)
|
 |
किल्ल्याच्या दक्षिणेकडून गड उतार होणारी वाट. किल्ले त्रिंगलवाडी |
या पायऱ्यांवरून उतरताना उजवीकडे मध्यावर कातळात कोरलेली एक गुहा दिसते. ती या किल्ल्याच्या वाटेवर शिपायांसाठी 'देवडी' असावी.
 |
किल्ल्याच्या दक्षिणेकडून गडउतार होणाऱ्या पायऱ्या. |
पायऱ्या उतरून पायवाट उजवा परतीसाठी वळसा मारते. डाव्या बाजूस वळसा मारल्यास कातळात कोरलेली आणखी एक गुहा दिसते. उजव्या बाजूच्या परतीच्या वाटेवर कातळात काही शेंदूर फासलेले दगड आणि भगवा ध्वज दिसतो. पुढे पायवाट डोंगराच्या सोंडेकडे गड चढाईसाठी सुरुवातीला ज्या ठिकाणी पश्चिमेकडे डावा वळसा मारला होता त्या वाटेवर किल्ल्याच्या कातळटोपी खाली येऊन मिळते आणि गडफेरी पूर्ण होते.
 |
किल्ल्याच्या दक्षिणेकडून गडउतार होणाऱ्या पायऱ्या आणि 'देवडी' (गुहा) (Tringalwadi Fort, Igatpuri, Maharashtra) |
त्रिंगलवाडीचा लिखित इतिहास सापडत नाही. पायथ्याच्या लेण्यात गर्भगृहातील 'ऋषभनाथांच्या' मूर्तीखाली कोरलेल्या शिलालेखानुसार लेण्यांची निर्मिती दहाव्या शतकात झाली. ही लेणी आणि व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी 'किल्ले त्रिंगलवाडी' यांची एकाच कालावधीत निर्मिती केली असावी.
१६८९ ला संभाजी राजांच्या कालावधीत मातब्बर खानाने 'त्रिंबक' किल्ला जिंकल्यानंतर त्याची चावी औरंगजेबकडे पाठवताना त्याने किल्ले 'त्रिंगलवाडी'सही आपण वेढा घातल्याचे कळविले होते. कदाचित त्या दरम्यान हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला असावा. १८१८ ला तो इंग्रजांच्या ताब्यात गेला. या परकीय आक्रमणांत किल्ल्यासह पायथ्याच्या लेण्याचीही वाताहत झाली असावी.
 |
किल्ल्याच्या दक्षिणेकडून गडावर जाणाऱ्या कातळ पायऱ्या. किल्ले त्रिंगलवाडी (Tringalwadi Fort, Igatpuri, Maharashtra) |
सह्याद्रीच्या ताशीव कड्यांवर बुलंद किल्ले, किल्ल्यांवर मंदिरं आणि पायथ्याशी लेणी बसवण्याची स्वप्नं बाळगणारे आपले पूर्वज आणि ती प्रत्यक्षात साकारणारे कलावंत यांच्या कारागिरीला दाद द्यावी तितकी कमीच आहे.
इगतपुरी जवळचा हा किल्ले 'त्रिंगलवाडी' आणि त्याच्या पायथ्याचं लेणं, हे यासाठी तंतोतंत जुळणारं उदाहरण म्हणावं लागेल..
|| श्री कृष्णार्पणमस्तु ||
येथे - जयवंत जाधव