Sunday, 29 December 2024

ऑफबीट - किल्ले घनगड, ता. मुळशी, पुणे. - Offbeat Ghangad, Mulshi, Dist. Pune, Maharashtra.

               महाराष्ट्राला निसर्गानं दिलेली अमूल्य देणगी म्हणजे सह्याद्री. सह्याद्रीच्या दक्षिणोत्तर पसरलेल्या लांबच लांब रांगांमधून पूर्वेला फुटलेले फाटे, त्यामधल्या ठाव न लागणाऱ्या दऱ्या, बेलाग सुळके, काळेभिन्न कातळकडे तसेच देशातून कोकणात उतरणाऱ्या अनवट घाटवाटा आहेत. त्याबरोबरच इथल्या डोंगरदऱ्यात पसरलेली निबिड जंगले, नाना प्रकारच्या हजारो वनस्पती, स्वच्छंद विहार करणारे पशुपक्षी अशी संपत्ती निसर्गाने दिली आहे.

                 तर आपल्या तात्कालीन राज्यकर्त्यांनी या देणगीला सांगड घालत, त्यांचे संरक्षण आणि सभोवतालच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी सह्याद्रीत गडकिल्ले, अद्भुत कलाकुसरीची लेणी, गुंफा, बारामाही टिकून राहणाऱ्या पाण्यासाठी शोध घेऊन निर्माण केलेल्या कातळ टाक्या आणि शिलालेख होत. निसर्ग आणि मानवाने निर्माण केलेला हा सुंदर मिलाफ डोंगरभटके, निसर्गप्रेमी आणि सह्याद्रीतील अभ्यासकांना नेहमीच भुरळ घालत आला आहे. यातील प्रत्येकापर्यंत पोहोचायला आपल्याला वेळ लागलाच. साध्या रायगडचेच उदाहरण घेता सुरवातीचे जवळ जवळ सत्तर वर्षे तो अंधारातच राहिला. इतर अपरिचित (Offbeat) गडकिल्ले, लेण्यांबद्दल तर विचार न केलेलाच बरा.

'मारखिंड' दरीकाठावरील दगडांची थरारक ठेवणं. किल्ले घनगड, मुळशी, जि. पुणे, महाराष्ट्र. ('Markhind', Ghangad Fort, Pune, Maharashtra)
           असाच पुण्याच्या बारा मावळापैकी 'कोरसबारस' मावळाच्या निबीड जंगलातील एक अपरिचित, चढाईच्या बाबतीत मध्यम पण काहीसा अवघड श्रेणीत 'किल्ले घनगड' येतो. पुण्याच्या मुळशी तालुक्यातील 'लोणावळा' व 'ताम्हिणी' घाटाच्या मध्यावर आणि सह्याद्रीच्या लोणावळा डोंगररांगेच्या माथ्यावर 'घनगड' वसला आहे. समुद्रसपाटीपासून उंची साधारणतः ३१५० फूट असावी. कोकणातील पाली - सरसगड - ठाणाळे लेणी - 'वाघजाई घाट' - तैलबैला - कोरीगड अशी एक आणि  पाली - सरसगड -  सुधागड - 'सवाष्णीचा घाट' - घनगड - तैलबैला ते कोरीगड असा दुसरा व्यापारी घाटमार्ग प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. या घाटवाटांवर लक्ष ठेवण्यासाठी वरील दुर्गसाखळी सोबत त्यावेळी 'घनगड'ची निर्मिती झाली.

               पुणे शहरातून 'घनगड' हे साधारण ८५ किमी, तर आमच्या राहत्या पनवेल पासून ९० किमी आहे. पुणे मुंबईकरांना लोणावळा हे मध्यवर्ती ठिकाण आहे. लोणावळ्यापासून दक्षिणेला 'घनगड' सरासरी ३५ किमीवर आहे.
               सध्या मुंबई ठाणेकरांना 'घनगड'ला येण्यासाठी लोणावळा घाट (बोरघाट) चढून जलवायू मार्गाने सह्याद्री माथ्यावरील 'मोराडी' सुळका (सह्याद्रीतील स्वयंभू शिवलिंग), पेठ शहापूरचा कोरीगड करत पुढे 'भांबुर्डे' गावाच्या तिठ्यावरून उजवीकडे दोन किमीवरील 'एकोले' गावात येता येतं. तर भांबूर्ड्याहून पुढे 'ताम्हिणी' घाटातून (लिंग्या घाट) पुन्हा कोकणातील पाली, कोलाडलाही गाडीमार्गाने उतरता येतं.
           'एकोले' हे घनगड'च्या पायथ्याच्या घनदाट जंगलातील गांव. भातशेतीवर जगणारं. सह्याद्रीच्या कड्यावर उन, वारा पावसाशी दोन हात करत, किर्र जंगलात हिंमतीन राहणारी फक्त दहा, बारा कुटुंबाची वस्ती. त्या निबिड जंगलातील आडवाटेवर, डोंगर भटके वगळता फारसा परिचित नसलेला हा किल्ले 'घनगड' म्हणता येईल. 'लोणावळा भांबुर्डे' मार्गे एसटी बसेस आणि इतर वाहतुकीची साधनं इथं फारच कमी आहेत. त्यामुळं भांबुर्ड्याहून गडपायथ्याच्या 'एकोले' गावात येण्यासाठी स्वतःच वाहन असल्यास 'घनगड' एका दिवसात पूर्ण करून मुंबई पुण्याकडे परतता येतं.  

'राजाराणी' सुळके (नवरा नवरी) मारठाण्याचा डोंगर, किल्ले घनगड, महाराष्ट्र. (Ghangad Fort, Pune, Maharashtra)
    
डावीकडे 'GAIA EKOLE' कंपाऊंड, मागे 'किल्ले घनगड', जि. पुणे, महाराष्ट्र. -Ghangad Fort, Pune, Maharashtra)
           भांबुर्डे तिठ्याच्या आधीपासून 'एकोले' गावात प्रवेश करण्यापूर्वी समोर अजस्त्र 'मारठाण्याचा' डोंगर दिसतो. त्या रांगेच्या डाव्या बाजूला राजा-राणी (नवरा नवरी) सुळके लक्ष वेधून घेतात. तर उजव्या टोकाला एकुलत्या उठून दिसणाऱ्या अजस्त्र कातळावर 'घनगड' लक्ष वेधून घेतो.                 
                 'एकोले' गावाबाहेरच डावीकडे पुरुषभर उंचीच्या कंपाउंडवर 'GAIA EKOLE' असा बोर्ड दिसतो. नजीकच्या तीन-चार वर्षात निर्माण झालेलं हे एक विस्तृत प्रायव्हेट 'कॅम्पसाईड' आहे. शनिवार, रविवारी तिथे शहरी पर्यटक विकेंड साजरा करण्यासाठी येतात. आमच्या भटकंतीचा मधलाच दिवस असल्याने आम्हाला तिथे कोणी दिसले नाहीत. पण गुगल सर्च केल्यास या कॅम्पसाईडमध्ये पर्यटकांना सुयोग्य अशा शहरी सुविधांसोबत आत जंगल अनुभव घेता येतो. वेळ मिळालाच तर काही पर्यटक घनगडचीही वाट वाकडी करतात अशी गावात माहिती मिळते. सह्याद्रीचे डोंगर वेडे मात्र क्वचितच अशा कॅम्पसाईडच्या नादी लागत असावेत. असो.

श्री घनेश्वर महादेव मंदिर, किल्ले घनगड, (Ghangad Fort, Maharashtra)

वीरगळी, श्री घनेश्वर महादेव मंदिर, घनगड. (Ghangad Fort)

श्री घनेश्वर महादेव, किल्ले घनगड. (Ghangad Fort)


                 तर या कॅम्पसाईडच्या उजव्या बाजूने कंपाउंडला लागून जाणारी पाऊलवाट घनगडच्या निबिड जंगलात घेऊन जाते. दहा मिनिटात पाऊलवाटेवर डावीकडे 'श्री धनेश्वर महादेव' मंदिर दिसतं. मंदिर म्हणजे पत्र्याच्या उघड्या शेड खाली प्राचीन शिवपिंडी आहे. पिंडी समोर ओळीत वीरगळी मांडल्या आहेत. बाजूला भग्न नंदी आहे. या वीरगळींची माहिती देणारा बोर्डही बाजूला आहे. 'पार्वती पतेय शंभो हर हर..' म्हणत पुढे आल्यास उजव्या बाजूला गच्च झाडीत लहानसं श्री 'वेताळ' मंदिर दिसतं. आत 'तांदळा' स्वरूपातील श्री वेताळाची मूर्ती दिसते.

श्री वेताळ मंदिर, किल्ले घनगड, (Ghangad Fort)

 

                

                तिथून पुढे पाच मिनिटाच्या अंतरावर उजव्या बाजूस डोंगर उतारावर एकोले गाववेशीचं रक्षणकर्ती 'श्री गारजाई' देवीचं मंदिर दिसतं. मंदिरात काळ्या पाषाणावर श्री 'गारजाई' देवीची सुबक मूर्ती कोरली आहे. मंदिराचा जिर्णोद्धार केला असला तरी देवीची मूर्ती मात्र प्राचीन आहे. मंदिरात प्रवेश करतानाच डाव्या बाजूस मंदिराच्या भिंतीवर कोरलेला प्राचीन शिलालेखही दिसतो. मंदिर परिसर प्रशस्त, रम्य आहे. मंदिरासमोर जुन्या घडनावळीचे दोन दीपस्तंभ, एक तेलवातीचा स्तंभ आणि भग्न वीरगळ ओळीत दिसतात.



श्री गारजाई मंदिर, किल्ले घनगड, पुणे, महाराष्ट्र (Ghangad Fort, Pune, Maharashtra)

श्री गारजाई मंदिरासमोरील दीपस्तंभ, श्री गारजाई मंदिर, किल्ले घनगड, पुणे, महाराष्ट्र (Ghangad Fort, Pune, Maharashtra)

श्री गारजाई, किल्ले घनगड (Ghangad Fort)

              परंपरेनुसार ही सर्व मंदिरं 'एकोले' गावापासून दूर दिसतात. आजही पूर्वापार बांधलेली मंदिरं तळ्याकाठी, गावकुस वेशीबाहेर तर नदीकाठावर दिसतात. मंदिर, देवालयांभोवती मानवी वस्ती असू नये असा पूर्वापार पाळला जाणारा दंडक, आज मात्र बऱ्याच ठिकाणी मोडीत निघताना दिसतो.
               पुढे निबीड जंगलातून नागमोडी खड्या चढाची वाट अर्ध्या तासात किल्ल्याच्या घडीव पायऱ्या पर्यंत येते. हे जंगल इतकं घनदाट आहे की, पोहोचणाऱ्या अपुऱ्या प्रकाशामुळे दिवसाचा नीट अंदाज बांधता येत नाही. जंगलातून वानरांच्या हुक्क्यांचा दमदार आवाज कानावर पडताच अंगावर शहारे येतात. सोलो ट्रेकर्सनी वस्तीतून कोणीतरी सोबत घेणे सुरक्षिततेचे आहे.
किल्ले घनगड पायथ्याच्या घडीव पायऱ्या, किल्ले घनगड. 








'मारखिंड', उजवीकडे किल्ले घनगड, डावीकडे मारठाण्याचा डोंगर. (Ghangad Fort, Pune, Maharashtra)

'मारखिंड', किल्ले घनगड, मुळशी, पुणे, महाराष्ट्र. (Ghangad Fort, Pune, Maharashtra)

                गडपायथ्याच्या पायऱ्या चढून वर आल्यास उजव्या बाजूचा घनगड आणि डाव्या बाजूचा 'मारठाण्याचा' डोंगर इथे जुळलेला दिसतो. समोर या दोन्ही डोंगरांच्या सोंडी समांतर उतरत जातात. या डोंगरसोंडेंच्या मध्ये प्रचंड दरी दिसते तिला 'मारखिंड' असे नांव आहे. खिंडीसमोर उजव्या बाजूला खोल दरीकाठावर काही शिळा एकमेकांवर दिसतात. हा बहुदा उध्वस्त केलेल्या किल्ल्याच्या तटबंदीचा शिल्लक राहिलेला भाग असावा असे वाटते किंवा ही नैसर्गिक घडणही असावी. दरीकाठावरच्या या दगडांची ठेवण इतकी चित्तवेधक आहे की, डोंगरभटके धोका पत्करून या दगडांवर चढून फोटो तसेच रील्स करण्याचा प्रयत्न करतात.  हे थरारक, धोकादायक ठिकाण भटक्यांना आकर्षून घेताना दिसतं.

              या दगडांजवळूनच उजवीकडे किल्ल्याचा कातळावर चढून कड्याकाठाने जाणारी पायवाट कातळात खोदलेल्या एका मोठ्या गुहेकडे जाते. या गुहेत आठ ते दहा जण वस्ती करू शकतात. गुहेचा उपयोग मारखिंडीतून वर चढून येणाऱ्या शत्रूवर टेहळणी करण्यासाठी आणि त्यापुढे 'अंधारबन' डोंगर परिसरावर नजर ठेवण्यासाठी करता येतो. पुढे ही वाट कातळकाठाच्या अतिशय धोकादायक टप्प्यावरून पुढे जाते, त्यामुळे त्यापुढे कोणी जात नसावेत.

मारखिंडीकडून किल्ल्याकडे जाणारी पाऊलवाट, किल्ले घनगड, पुणे, महाराष्ट्र. (Ghangad Fort, Pune, Maharashtra)

किल्ल्याचे पहिले प्रवेशद्वार आणि त्याचे बुरुज. घनगड, पुणे, महाराष्ट्र. (Ghangad Fort, Pune, Maharashtra)
             या मारखिंडीत येण्यापूर्वी उजवीकडे कातळ उतारावरून तटबंदीला लागून जाणारी वाट दोन बुरूजांकडे जाताना दिसते. जवळ गेल्यास या दोन्ही बुरुजांच्या मध्ये किल्ले घनगडचे पहिले उध्वस्त प्रवेशद्वार दिसते. अगदी जवळ जाईपर्यंत या प्रवेशद्वाराचा अंदाज येत नाही अशा दरवाजांना 'गोमुखी' दरवाजे म्हटले जाते. किल्ल्यांच्या मुख्य दरवाजासमोर येऊन बाहेरून शत्रूला हल्ला करताना फार हालचाल करता येऊ नये म्हणून मोकळी जागा ठेवली जात नाही. असे दरवाजे एकतर धोकादायक दरीकाठावर निर्माण केले जातात किंवा दरवाजासमोर तटबंदी उभारलेली दिसते. अशा 'गोमुखी' रचनेचे दरवाजे म्हणजे किल्ल्यांच्या लष्करी दृष्ट्या वास्तूरचनेचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो.
किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशद्वारातुन दिसणाऱ्या कोरीव गुहा. घनगड, पुणे, महाराष्ट्र. (Ghangad Fort, Pune, Maharashtra)
                 दरवाजा ओलांडून डावे वळण घेऊन वर आल्यास डावी उजवीकडे सपाट मोकळी जागा दिसते. समोर किल्ल्याच्या कातळात दोन गुहा कोरलेल्या दिसतात. त्यापैकी डावीकडील गुहा मोठी प्रशस्त असून उजवीकडील थोडी लहान दिसते. दहा पंधरा जण या गुहेत रात्री वस्ती करू शकतात.
किल्ले घनगडचा निखळलेला कातळ,किल्ले घनगड, पुणे, महाराष्ट्र. (Ghangad Fort, Pune, Maharashtra)

श्री वाघजाई मंदिर, किल्ले घनगड, पुणे, महाराष्ट्र. (Ghangad Fort, Pune, Maharashtra)

किल्ले घनगडचा निखळलेला कातळ आणि उजवीकडे वाघजाई मंदिर. किल्ले घनगड, पुणे, महाराष्ट्र. (Ghangad Fort, Maharashtra)
                   सपाटीच्या उजव्या बाजूस किल्ल्याचा कातळाचा एक प्रचंड मोठा खडक निखळून या सपाटीवर स्थिरावला आहे. किल्ल्याच्या कातळाला तो रेलून उभा राहिल्याने दोन्हीमधून दुतर्फा जाता येता येतं. ही एक नैसर्गिक कमान बनलेली दिसते. डाव्या बाजूच्या किल्ल्याच्या मुख्य कातळात उंचावर कोरलेल्या चौकोनी गुहेत 'श्रीवाघजाई' देवीची मूर्ती दिसते. इथून मुळशी जलाशयापर्यंत  'कोरसबारस' मावळ खोरं, समोर लोणावळा डोंगररांग तर मागे डावीकडे किल्ले 'तैलबैला' असा विस्तृत भूभाग नजरेच्या टप्प्यात येतो. या हवेशीर कातळ कमानीखाली भटके सावलीत विसावा घेतात तर रात्री मुक्कामासाठी येणाऱ्या भटक्यांची ही आवडती जागा आहे.
कोरीव गुहा आणि समोर कातळावर लावलेली उभी शिडी. किल्ले घनगड, पुणे, महाराष्ट्र. (Ghangad Fort, Pune, Maharashtra)
  
कातळाला लावलेली शिडी (Ghangad Fort)
कातळटाकी. किल्ले घनगड


शिडीचा टप्पा. किल्ले घनगड, महाराष्ट्र. (Ghangad Fort, Maharashtra)

 

झिजलेल्या कातळपायऱ्या (Ghangad Fort)

                                            






          तर सपाटीच्या डाव्या टोकाला उभ्या कातळाला लावलेल्या लोखंडी शिडीवरून वाट किल्ल्यावर जाते. अंदाजे २० फूट उंच शिडी उभ्या खडकात मजबूत बसवली आहे. शिडीच्या वरच्या टोकाजवळ कातळात खोदलेली पाण्याची टाकी दिसते. टाकीतील पाणी पिण्यायोग्य स्वच्छ असून थंड, चवदार आहे. डोंगर भटके आवर्जून या पाण्याची चव चाखतात. या उभ्या शिडीच्या वरच्या टोकाजवळ खडकात धातूची वायर पक्की (fix) केली आहे. तिचा आणि कातळाचा आधार घेत डाव्या बाजूच्या धोकादायक कातळ काठावरून वाट कोरीव पायऱ्यांकडे येते. या कोरीव कातळ पायऱ्यांचीही बऱ्यापैकी झिज झाल्यामुळे इथेही आधारासाठी कातळात धातूची वायर बसविली आहे.

टेहळणीची गुहा आणि कातळ खांबटाक्या. Ghangad Fort, Pune, Maharashtra)

खांबटाकी, किल्ले घनगड, महाराष्ट्र. (Ghangad Fort, Pune, Maharashtra)
          हा टप्पा चढून उजवा वळसा घेऊन वर आल्यास उजवीकडेच कातळात कोरलेली चौकोनी गुहा दिसते. गुहेचा उपयोग टेहळणीसाठी केला जात असावा. या गुहेखाली पाण्यासाठी खोदलेल्या तीन कातळटाक्या आहेत. त्यातील दोन मोठ्या प्रशस्त असून दोन्ही टाक्यांना आधार देणारे कातळखांब दिसतात. या तिन्ही टाकीतील पाणी बाराही महिने टिकून रहातं. या कातळटाक्या आणि टेहळणीच्या गुहेची कल्पकतेने केलेली निर्मिती 'मारठाण्याच्या डोंगर' पार्श्वभूमीवर बघून इथपर्यंत चढाईसाठी केलेली दगदग विसरायला लावणारी आहे.
धोकादायक कातळटप्पा, किल्ले घनगड, महाराष्ट्र.

              पुढे किल्ल्यावर जाणारी वाट मात्र या टेहळणीच्या गुहेवरून उजवा वळसा मारत उभ्या कातळाच्या अवघड टप्प्यावरून जाते. पूर्वी या टप्प्यावर पायऱ्या होत्या पण इंग्रजांनी सुरुंग लावून त्या उध्वस्त केल्यामुळे आणि कालानुरूप इथल्या खडकाची झीज झाल्यामुळे चढाई करताना हा टप्पा धोकादायक बनला आहे. या टप्प्यावर मदतीसाठी खडकातील खोबण्यांचा आधार घेऊन सांभाळून चढाई करणे इतकाच पर्याय उरतो. या टप्प्यावर डावीकडे अवघड जागी असलेली कातळात कोरलेली दुसरी टेहळणीची गुहा दिसते.

टेहळणीची दुसरी गुहा, किल्ले घनगड, महाराष्ट्र. 


                खाली शिडीच्या पहिल्या टप्प्यावरून डावीकडे तोल सांभाळून कातळावर येताना आणि हा दुसरा कातळ टप्पा सर करताना, उतरताना सरासरी सहनशक्ती आणि संयमाची गरज आहे. हे दोन टप्पे वगळता बाकी किल्ल्याची चढाई मात्र मध्यम श्रेणीत मोडते.

बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार, किल्ले घनगड.

बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार, किल्ले घनगड, महाराष्ट्र.
बालेकिल्ल्यावरून दिसणारा दुहेरी रचनेचा बुरुज आणि भुयारी टाकी (कातळगुहा). किल्ले घनगड, महाराष्ट्र. (Ghangad Fort, Maharashtra)

बालेकिल्ल्यावरील भुयारी टाकी. किल्ले घनगड, महाराष्ट्र. (Ghangad Forta)

                हा टप्पा ओलांडून वर आल्यास समोर उभ्या उतारावर किल्ल्याचा दुसरा पूर्वाभिमुख दरवाजा दिसतो. दोन बुरुजांच्या मध्ये असणारा हा दरवाजाही अर्धवट उध्वस्त केलेला दिसतो. दरवाजा ओलांडून वर आल्यास डाव्या बुरुजात घसरणीवर एका खोल, चिंचोळ्या भुयारी टाकीत पायऱ्या उतरताना दिसतात. यावेळी आमच्या सोबत टॉर्च नसल्यामुळे मोबाईलच्या उजेडात टाकीच्या खोलीचा अंदाज घेता आला नाही. तसेच या निबिड जंगलात एकाकी घनगडावर मी आणि पत्नी दोघेच असल्याने आगाऊ धाडस करणेही सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य वाटलं नाही.

बालेकिल्ल्यावरील झेंडा बुरुज, मागे दिसणारा 'मारठाण्याचा' डोंगर. किल्ले घनगड, महाराष्ट्र. (Ghangad Fort, Maharashtra)

दक्षिणेकडील बुरुज आणि समोर दिसणारा बलाढ्य 'मारठाण्याचा' डोंगर. किल्ले घनगड, महाराष्ट्र. (Ghangad Fort, Maharashtra)

                 इथून बालेकिल्ल्याच्या मध्यभागी झेंडा बुरुजावर भगवा फडकताना दिसतो. झेंडा बुरुजाला लागून सदरेचे अवशेष दिसतात. डावीकडे म्हणजे किल्ल्याच्या दक्षिणेकडे जाणारी पाऊलवाट मारखिंडीच्या बाजूला असलेल्या किल्ल्याचा बुरुज आणि तटबंदिकडे जाते. हा दक्षिणेकडील बुरुजाच्या तटबंदीचा बराचसा भाग उध्वस्त आहे. शिल्लक तटबंदीत जंग्या आणि दिवळ्या दिसतात. त्यांची एकावर एक अशी दुमजली पद्धतीची रचना उठून दिसते. या तटबंदी खाली प्रचंड खोल 'मारखिंडी'ची दरी दिसते. दरीसमोर शंकुसारखा दिसणारा अवाढव्य 'मारठाण्याचा' डोंगर नजरेचे पारणे फेडतो.

दुहेरी रचनेचा बुरुज, त्यामागे 'मारठाण्याचा' डोंगर किल्ले घनगड, महाराष्ट्र. (Ghangad Fort, Maharashtra)


बालेकिल्ल्यावरून दिसणारी 'मारखिंड', त्यापुढे अंधारबन डोंगर परिसर. किल्ले घनगड, महाराष्ट्र. (Ghangad Fort, Maharashtra)

किल्ले 'तैलबैला', घनगड, महाराष्ट्र 

               पुढे उजवा वळसा मारत वाट बालेकिल्ल्याच्या पश्चिम काठावरून उत्तरेकडे जाते. या काठावरून खाली खोल उभी दरी दिसते. दरी पलीकडे तैलबैलाची दरीखिंड आणि त्यापलीकडे  सह्याद्रीचं खास आकर्षण असणारे 'किल्ले तैलबैला' डौलात उभा दिसतो. तैलबैलाच्या विशिष्ट रचनेची उभी भिंत डोळ्यात भरते. त्याच्या डाव्या बाजूस किल्ले 'सुधागड' लक्ष वेधून घेतो. इथून सह्याद्रीची रांग, त्यातील प्रचंड खोल दऱ्या, डोंगर माथ्यावरील विस्तीर्ण पठारे डोळ्यात सामावतात.

बालेकिल्ल्यावरून दिसणारा किल्ले तैलबैला, किल्ले सुधागड आणि डोंगर माथ्यावरील विस्तीर्ण पठारे (Ghangad Fort, Maharashtra)

बालेकिल्ल्याच्या ईशान्य टोकावरील कातळटाकी (Ghangad Fort, Maharashtra)

बालेकिल्ल्यावरील उध्वस्त वास्तुंचे अवशेष. किल्ले घनगड, महाराष्ट्र. (Ghangad Fort, Maharashtra)

                    बालेकिल्ल्याच्या ईशान्येला उतारावर एक काठोकाठ भरलेली पाण्याची कातळटाकी दिसते. तर मध्यभागी ठिकठिकाणी काही उध्वस्त वाड्यांचे अवशेष दिसतात. इथून बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वाराकडे आल्यास पूर्व उतारावर खोदलेली आणखी एक मोठी कातळ टाकी दिसते. या टाकीतील पाण्याची पातळी मात्र तळाला गेलेली दिसते. पूर्व काठाने पुढे आल्यास, दुमजली पद्धतीचा आणि विशेष रचनेचा बुरुज दिसतो. थोडक्यात बालेकिल्ल्याच्या दरवाज्याचे दोन आणि दुमजली तटबंदीच्या रचनेचे दोन असे बालेकिल्ल्याच्या पूर्वेस चार बुरुज दिसतात. बुरुजांव्यतिरिक्त बालेकिल्ल्यावर कुठेही तटबंदी दिसत नाही.

बालेकिल्ल्यावरील उध्वस्त वास्तुंचे अवशेष. किल्ले घनगड
 
पूर्व उतारावरील कातळटाकी, किल्ले घनगड

                    किल्ले घनगडास  पायथ्याचे मुख्य आणि बालेकिल्लाचे प्रवेशद्वार असे दोन दरवाजे, एकूण आठ कातळ कोरीव टाक्यांपैकी दोन खांबटाक्या, लहान मोठे मिळून आठ बुरुज आणि तीन टेहळणीच्या गुहा दिसतात. चारही दिशांच्या उभ्या उंच कातळ कड्यांनी किल्ल्यास नैसर्गिक संरक्षण दिले आहे.
                   १७७७ ते १७८३ या काळात महिला कैद्यांसोबत अनेक राजकीय कैदीही 'किल्ले घनगडा'वर कैदेत ठेवल्याच्या इतिहासात नोंदी मिळतात. पेशवाईच्या शेवटी हा किल्ला 'बाळाजी कुंजीर' यांच्या ताब्यात होता. १७ मार्च १८१८ रोजी कर्नल 'प्रॉथरने' कोणतीही लढाई न लढता 'किल्ले घनगड' स्वतःच्या ताब्यात घेतला. 

किल्ले घनगड, महाराष्ट्र. (Ghangad Fort, Maharashtra)

किल्ले घनगड, महाराष्ट्र. (Ghangad Fort, Maharashtra)
          

                 या आधी हा किल्ला कोणी, कधी बांधला याची इतिहासात नोंद सापडत नाही, पण प्रथम हा किल्ला कोळी सामंतांकडून अहमदनगरच्या निजामशाकडे आला. निजामशाही बुडाल्यानंतर पुढे किल्ला आदिलशाहीतील ढमाले देशमुख यांच्या ताब्यात आला. १६४७ ला शिवछत्रपतींनी आदिलशाहीकडून हा किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला. १६६५ च्या पुरंदर तहात तो मुघलांना देण्यात आला. पुन्हा १६७० ला तो शिवछत्रपतींनी जिंकून घेतला. १७०० पर्यंत घनगड 'पंतसचिव' शंकराजी नारायण यांच्या ताब्यात होता. पुढे छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर किल्ला पुन्हा मुघलांच्या ताब्यात गेला. तर पंतसचिवांच्या आदेशाने किल्ले तुंग, तिकोना, राजमाची, कोरीगड समवेत घनगड  'सरखेल' कान्होजी आंग्रेनीं  मराठ्यांच्या ताब्यात घेतला. पुढे १७१४ मध्ये बाळाजी विश्वनाथ यांच्या मध्यस्थीने घनगड आंग्रेनी छ. शाहूंच्या ताब्यात दिला.
               पुढे 'सदाशिव भाऊ' पेशव्यांच्या तोतया प्रकरणातील कनोजी ब्राह्मण 'सुखलाल' यास आणि या प्रकरणाला हातभार लावणारा 'धोंडो गोपाळ केळकर' यालाही 'किल्ले घनगडा'वर काही काळासाठी कैदेत ठेवल्याचे उल्लेख सापडतात.

Blue jewel bug, with brilliant coloration, may produce offensive odour when disturb, are around 450 species worldwide, observed in Western Ghat forest.- Ghangad Fort. किल्ले घनगड, महाराष्ट्र.

                  १७७७ सालच्या पेशवे काळात गाजलेल्या 'बारभाई' प्रकरणातील 'सखाराम हरी गुप्ते' यांनाही किल्ले घनगडा'वर कैदेत ठेवले होते. त्यावेळी किल्ल्याचे किल्लेदार 'अर्जोजी ढमाले' आणि कारखानीस 'रामचंद्र गोविंद' होते. कारखानीस रामचंद्र गोविंद याने, सखाराम गुप्ते यांना फितूर होऊन कैदेतून सोडवण्याची योजना आखली. ही गोष्ट किल्लेदार 'अर्जोजी ढमाले' यांना समजली. या फितूरीत एकूण आठ व्यक्ती सामील होत्या. त्यातील दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले. पकडलेल्या सहा जणांपैकी चौघांना तोफेच्या तोंडी देण्यात आले, तर दोघांचे उजवे हात तोडण्यात आले. फितुरी उघड झाल्यामुळे सखाराम गुप्तेंवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला.

किल्ले घनगड, महाराष्ट्र. (Ghangad Fort, Maharashtra)

             १७७९ ला सखाराम गुप्तेंचा किल्ल्यावर कैदेत असतानाच मृत्यू झाला. सखाराम गुप्तेंची पत्नी त्यांना घनगडावर भेटायला येण्यास निघाली असता, तिला 'तैलबैला' जवळील घाटात त्यांच्या मृत्यूची बातमी समजली. त्या बातमीच्या धक्क्याने तिचे घाटातच निधन झाले. तेव्हापासून या घाटाला 'सवाष्णीचा घाट' किंवा 'सतीचा घाट' म्हणून ओळखलं जाऊ लागलं.. 

                              || श्री कृष्णार्पणमस्तू ||


ऐतिहासिक संदर्भ :१) महाराष्ट्र देशातील किल्ले, चिं. ग. गोगटे, भाग १ व २ (सुधारित आवृत्ती)
                          २) पेशवे रोजनिशी, खंड१ ते९, डेक्कन व्हर्रनॅक्युलर ट्रान्सलेशन सोसायटी, पुणे.


येथे - जयवंत जाधव

'हम्पी' - विजयनगर साम्राज्याची राजधानी. - 'Hampi' - Medieval history of Vijaynagar dynasty.

                       सतराव्या शतकाच्या मध्यावर पश्चिम महाराष्ट्रात शिवछत्रपतींचं 'स्वराज्य' आकार घेत होतं आणि त्या दरम्यानच कर्नाट...