शिवपूर्व काळापासून दख्खनला जोडणाऱ्या व्यापारी घाटवाटांचे रक्षण करून किल्ल्यांच्या आधारे जकात वसुली चालत असे. त्यासाठी किल्ल्यांवर 'शिबंदी'(सैन्य) तैनात करून जकाती सोबत परंपरेनुसार त्या परिसरातील सारा वसुलीही होत असे. उत्तर कोकणचा विचार करता बोरघाट, कुर्वंडे घाट, वाघजाई, सवाष्णी, सवघाट, निसणीचा घाट, भोरप्या, लिंग्या घाट अशा प्राचीन घाटवाटांचे रक्षण करण्यासाठी सह्याद्रीत मृगगड, राजमाची, लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना, कोरीगड, तैलबैला, अनघई, घनगड, कैलासगड, कुर्डूगड, सुधागड, अशी लहानथोर किल्ल्यांची दुर्ग साखळी उभारली गेली. यातील काही सह्याद्री धारेच्या खाली तर काही सह्याद्रीच्या वर आहेत. खड्या फौजेसह जागता पहारा ठेवण्याचं हे काम प्राचीन काळापासून मराठा साम्राज्यापर्यंत या किल्ल्यांनी पार पाडलं.
 |
किल्ले मोरगिरीच्या सर्वोच्च माथ्यावर जाणारा थरारक शिडीचा कातळटप्पा, किल्ले मोरगिरी, जांभुळणे, मुळशी, पुणे. (Offbeat- Morgiri Fort, Jambhulne, Pune, Maharashtra) |
भौगोलिक स्थानाचा विचार करता, या दुर्ग साखळीच्या मध्यावर आणि सह्याद्रीच्या धारेवरून उत्तर कोकण आणि घाटमाथ्यावर पहारा ठेवून प्रसंगी या किल्ल्यांना संदेश आणि संकेत देण्या-घेण्याचं काम एका अपरिचित किल्ल्यानं पार पाडलं. तो म्हणजे 'किल्ले मोरगिरी'!. 'टेहळणीचा' किल्ला आणि इतिहासाच्या नोंदीत अज्ञात राहिल्यानं 'मोरगिरी' प्रसिद्धी पासून दूर राहिला. चढाईच्या बाबतीत कठीण श्रेणीचा असल्यानं तो अपरिचितही राहिला. आजच्या तरुण पिढीमध्ये इतिहासाची ओढ वाढताना दिसते. त्याच ओढीने दुर्ग भटके आवर्जून मोरगिरीला भेट देत खड्या चढाईचा थरार अनुभवताना दिसतात. हे एक चांगलं लक्षण आहे.
 |
किल्ले मोरगिरीच्या माथ्यावरून पवना जलाशय आणि पवन मावळ परिसर. किल्ले मोरगिरी, जांभुळणे, मुळशी, पुणे. (Offbeat- Morgiri Fort, Jambhulne, Pune, Maharashtra) |
यावेळी योग आला बालमित्रांसोबत या मोरगिरीला भेटण्याचा.! एक साताऱ्याचा मित्र, मुंबई एलफिस्टनहून दुसरा आणि पनवेलहून मी स्वतः असे तिघे मित्र लोणावळ्याला जमलो. तसं पाहिलं तर मुंबई पुण्याकडील डोंगर भटक्यांना लोणावळा हे(च) ठिकाण सोईस्कर आहे. 'किल्ले मोरगिरी' लोणावळ्यापासून दक्षिणेला साधारण १८ किमीवर, मुख्य सह्याद्रीच्या धारेपासून घाटमाथ्यावर पूर्वेला फुटलेल्या 'लोणावळा' डोंगर रांगेच्या एका उंच आणि विस्तृत पठारावरच्या पूर्व कड्यावर वसला आहे. उंची साधारणतः ३००० फूट असावी. लोणावळ्याहून सरासरी १७ किमी वर 'घुसळखांब' तिठ्यावर डावीकडे 'अँबेव्हॅली'कडे रस्ता जातो. या रस्त्यावर अंदाजे १०० मीटर अंतरावर पुन्हा काटकोनात डावीकडे वळणारा रस्ता तुंग किल्ल्याकडे घेऊन जातो. या वळणापासून १ किमी अंतरावर 'जांभूळने' गांव लागतं. या गावातून उजव्या बाजूला किल्ले मोरगिरीचा आडवा डोंगर लक्ष वेधून घेतो.
 |
जांभुळणे गांव. किल्ले मोरगिरी, मुळशी, पुणे. (Offbeat- Morgiri Fort, Jambhulne, Pune, Maharashtra)
|
'जांभुळणे' गावाच्या सुरुवातीला दिसणाऱ्या मोकळ्या जागेत वाहने पार्क करता येतात. सरासरी १५, १६ वस्तीच्या डोंगर कुशीतील या गावाची परिस्थिती गरीब बेताचीच दिसते. गावातील अर्धी अधिक घरं 'कारवी'च्या भिंतीची दिसतात. शेतीवर अवलंबून असणारं हे आदिवासी गांव सरपणासाठी (जळणासाठी लागणारी लाकडं) बाजूच्या डोंगराचाच आधार घेताना दिसतं.
 |
जांभुळणे गावातील कारवीची घरे. किल्ले मोरगिरी, जांभुळणे, मुळशी, पुणे. (Offbeat- Morgiri Fort, Jambhulne, Pune, Maharashtra) |
 |
जांभुळणे गावातील कारवीची घरे. किल्ले मोरगिरी, जांभुळणे, मुळशी, पुणे. (Offbeat- Morgiri Fort, Jambhulne, Pune, Maharashtra) |
गावात चौकशी केल्यास, गावाच्या वस्ती मागून जाणारी पाऊलवाट गर्द जंगलात शिरते आणि पुढे तीव्र चढाने समोरच्या आडव्या डोंगर खिंडीतून वर येते. खिंडीतून मळलेली पाऊलवाट डावे वळण घेऊन गावातून दिसणाऱ्या आडव्या डोंगरावर जाताना दिसते. या तीव्र उतारावर कारवीचे रान दिसते. घसरणाऱ्या मातीचा, तीव्र चढाच्या वाटेचा हा टप्पा सुरुवातीलाच दमछाक करतो.
 |
वस्तीमागून जंगलात जाणारी पाऊलवाट. समोर दोन्ही डोंगरांची खिंड. किल्ले मोरगिरी, जांभुळणे, मुळशी, पुणे. (Offbeat- Morgiri Fort, Jambhulne, Pune, Maharashtra) |
 |
तीव्र चढाची पाऊलवाट. किल्ले मोरगिरी. (Offbeat- Morgiri Fort) |
 |
खिंडीतून डावीकडे वळणारी पाऊलवाट (किल्ले मोरगिरी) |
 |
खिंडीतून पठारावर येणारी वाट. समोर खिंडीचा डोंगर. किल्ले मोरगिरी (Offbeat- Morgiri Fort, Pune, Maharashtra) |
हा टप्पा पार करून वर आल्यास समोर डोंगर माथ्यावर लांबलचक पठार दिसते. सरासरी दीड किमी लांब पठाराच्या पूर्वेला डाव्या बाजूला टेकडी पलीकडे उंच डोंगर दिसतो. त्या डोंगरामागे खेटूनच त्यापेक्षाही उंच, कातळटोपी घातलेला डोंगर म्हणजे 'किल्ले मोरगिरी'. पठारावरून किल्ल्याकडे जाणारी पाऊलवाट मळलेली दिसते. पुढे या डोंगरांकडे पठाराची रुंदी वाढताना दिसते. पठारावर फुटभर उंचीच्या गवताखेरीज सावलीसाठी एकही झाड दिसत नाही. पठार दिसायला बऱ्यापैकी समतल दिसते.
 |
पठारावरून डावीकडे दिसणाऱ्या टेकडी मागे दुसरा डोंगर. त्यापलीकडे उंच कातळटोपीचा 'किल्ले मोरगिरी' (Morgiri Fort, Jambhulne, Pune, Maharashtra)
|
 |
इंग्रजी 'C' आकाराचे पठार. सर्वात मागे उंच कातळटोपीचा 'किल्ले मोरगिरी' (Morgiri Fort, Jambhulne, Pune, Maharashtra) |
 |
मोरगिरीच्या डोंगर पायथ्याकडून दिसणारे ओलांडलेले पठार. किल्ले मोरगिरी, पुणे. (Morgiri Fort, Pune, Maharashtra) |
सरासरी अर्ध्या तासाच्या वाटचालीनंतर दिसणारे सर्व डोंगर डावीकडे ठेवत पायवाट उजव्या बाजूच्या डोंगर धारेवरून पुढे जाते. पुढे पायवाट दोन लहान ओढे ओलांडून जाते. सध्या दोन्ही ओढ्यांची डोंगरातून येणाऱ्या पाण्याची धार आटत चाललेली दिसते. या ओढ्यांच्या आसपास डोंगरांच्या पायथ्याला गर्द झाडी दिसते. पठाराच्या उजव्या दरिकाठावरून दक्षिणेला दूरवर उंच आडवा आयताकृती 'कोरीगड', त्याच्या डावीकडे 'अँबेव्हॅली'चा जलाशय आणि विस्तृत 'मावळ खोरं' दिसतं.
 |
पायवाटेवरील आटत चाललेला ओढा. किल्ले मोरगिरी |
 |
पठारावरून मोरगिरी पायथ्याकडे जाणारी पाऊलवाट. किल्ले मोरगिरी |
 |
मोरगिरी पायथा. शिवछत्रपतींच्या 'राजमुद्रे'ची प्रतिकृती. 'किल्ले मोरगिरी' (Morgiri Fort, Jambhulne, Pune, Maharashtra) |
पुढे वाट डोंगर उताराच्या तुरळक झाडाझुडपातून पुढे जाते आणि उंच कातळटोपीचा डोंगर 'किल्ले मोरगिरी'च्या पायथ्याजवळ येते. इथून पायवाट सरळ पुढे न जाता डावीकडे काटकोनात वळून गर्द झाडीत शिरते. इथे आणि इथपर्यंत येणाऱ्या पायवाटेवर जागोजागी दिशादर्शक बाण लावले आहेत.
या डाव्या वळणाजवळ बाजुला उघड्या माळावर दक्षिणेकडे तोंड करुन शिवछत्रपतींच्या 'राजमुद्रे'ची प्रतिकृती ठेवलेली दिसते. मागील सहा महिन्यापूर्वी स्थानापन्न केलेली ही राजमुद्रा आकाराने मोठी आणि फायबरची बनवलेली आहे. राजमुद्रेकडे तोंड केल्यास समोर निबीड जंगलातील मोरगिरीचा महाकाय कातळ दिसतो. तर पाठच्या बाजूला चालून आलेल्या पठाराचा लांबलचक वळणदार दुसरा भाग दिसतो. एकूण या डोंगरावरील हे एकसंघ पठार इंग्रजी 'C' आकाराचे दिसते. आणि त्याच्या मध्यावर पूर्वेला 'मोरगिरी' दिसतो.
 |
पायथ्यापासून दिसणारा मोरगिरीचा कातळ सुळका. 'किल्ले मोरगिरी' (Morgiri Fort, Jambhulne, Pune, Maharashtra) |
 |
मोरगिरी पायथ्याचे घनदाट जंगल. 'किल्ले मोरगिरी' (Morgiri Fort, Jambhulne, Pune, Maharashtra) |
 |
मोरगिरीवर येणारी उभ्या चढाची वाट. 'किल्ले मोरगिरी' (Morgiri Fort, Jambhulne, Pune, Maharashtra)
|
 |
मोरगिरीवर येणारी उभ्या चढाची वाट.
|
इथून खड्या चढाची जंगलातून किल्ल्यावर घेऊन जाणारी वाट दमवणारी, शारीरिक कसोटी घेणारी आहे. झाडांच्या आडव्या मुळ्यांमुळे वाटेवर ठीक ठिकाणी नैसर्गिक पायऱ्या तयार झालेल्या दिसतात. पुरुषभर तर कधी कमरे इतक्या उंचीचे खडे टप्पे दम काढतात. जसजसे वर जाऊ तशी झाडी विरळ होत जाताना दिसते.
 |
दोर लावलेला थरारक कातळटप्पा. किल्ले मोरगिरी' (Morgiri Fort)
|
 |
दोर लावलेला थरारक कातळटप्पा. किल्ले मोरगिरी' (Morgiri Fort)
|
 |
मित्राचे साहस. किल्ले मोरगिरी' (Morgiri Fort) |
मजल दरमजल करत तासाभराचा हा टप्पा सर करून वर आल्यास, त्या पुढची अवघड परीक्षा घेणारा टप्पा स्वागत करतो. या कातळ टप्प्यावर वरून दोर सोडले आहेत आणि खाली दरी आहे. दोरांचा आधार घेत हा उभा, निसरड मातीचा कातळ सांभाळून सर करावा लागतो. गड पायथ्यापासून इथपर्यंतच्या केलेल्या चढाईमुळे दमलेल्या अवस्थेत हा टप्पा सर करताना शारीरिक क्षमतेबरोबर मानसिक कासोटीही घेतो.
यावेळी आमचा मित्र 'संतोष पवार'ने वरून सोडलेल्या दोराचा तसेच हाताने कातळाचाही आधार न घेता हा टप्पा सर केला. आम्ही तिघे या टप्प्याखाली येताच वरचा कातळ बघून त्याने तसं आधीच जाहीर केलं. आणि दोन्ही हात उंचावत त्याने हा टप्पा सर केला.
गड उतार होतानाही हा टप्पा तो वरून दोर सोडत अक्षरशः धावत, उड्या घेत सहज उतरून आला. त्याच्या कौतुकास योग्य असा व्हिडिओ (चित्रफीत) मुद्दाम खाली दिला आहे.
त्यानं असं कसब मागे कलावंतीण दुर्ग सुळक्याच्या सर्वोच्च शिखर माथ्यावर केलं होतं. त्यावेळी त्यानं सर्व ट्रेकर्स समोर जाहीर करून, दोराशिवाय तो अवघड, थरारक टप्पा सहज पार केला होता. हा मित्र एक वेगळंच रसायन आहे.
 |
दोराचा टप्पा ओलांडून शिडीकडे जाणारी पाऊलवाट, किल्ले मोरगिरी, पुणे. (Morgiri Fort, Pune, Maharashtra) |
 |
मुंबई, पनवेल, पुण्याचे शिलेदार. किल्ले मोरगिरी, पुणे. (Morgiri Fort, Pune, Maharashtra) |
 |
मुंबई, पनवेल, पुण्याचे शिलेदार. किल्ले मोरगिरी, पुणे. (Morgiri Fort, Maharashtra) |
पुढे पायवाट मोरगिरीच्या मुख्य सुळक्याला वळसा घालत कातळ काठाने पुढे जाते. या टप्प्यावर दुपारी बारा वाजता आम्हाला गडउतार होणारे सह्याद्रीचे दुसरे चार शिलेदार भेटले. त्यातील एक जण अंधेरी, दुसरा पनवेल तर दोघे पुण्याहून लोणावळ्यात एकत्र जमून भटकंतीस आले होते. त्यांना मोरगिरी उतरून आज पुढे 'किल्ले घनगड'ची भटकंती पूर्ण करायची होती.
मागील (डिसेंबर) महिन्यात मी पत्नीसह 'किल्ले घनगड'ची भटकंती केली होती. आम्ही सर्वांनी एकमेकांची आस्थेनं विचारपूस केली. घनगड बद्दल चर्चाही झाली. एकमेकांचे मोबाईल नंबर घेऊन आभार मानले व आम्ही निरोप घेतला. अशा ठिकाणी सह्याद्रीच्या वारकऱ्यांची अचानक होणारी भेट एक सुखद अनुभव आणि भटकंतीच्या साधनेसाठी उमेद देऊन जातात.
 |
शिडीकडे येणारा कातळटप्पा. किल्ले मोरगिरी, पुणे. (Morgiri Fort, Maharashtra)
|
 |
शिडीकडे येणारा कातळटप्पा. किल्ले मोरगिरी, पुणे. (Morgiri Fort, Maharashtra)
|
या काठावरून पुढे आल्यास वाट दोन अवघड कातळटप्पे चढून वर येते. त्यापैकी एका ठिकाणी दोर लावला आहे. दोन्ही टप्पे चढून वर आल्यास डावीकडे किल्ल्याच्या पायथ्याला ओळीत खोदलेल्या एकूण तीन पाण्याच्या टाक्या दिसतात. त्यापैकी पहिली व दुसरी कातळटाकी प्रमाणबद्ध हंडीसारख्या गोलाकार खोदल्या आहेत. तिसरी टाकी मात्र कातळाच्या आतील गर्भात प्रशस्त खोल खोदलेली दिसते. या तीनही टाकीत पाणी असून ते पिण्यायोग्य दिसत नाही.
तिसऱ्या टाकीच्या डाव्या बाजूस कातळात गुहा कोरलेली आहे. गुहेत 'श्री जाखमाते'ची 'तांदळा' स्वरूपातील मूर्ती दिसते. 'किल्ले मोरगिरी'च्या परिसरातील हे एक जागृत देवस्थान मानलं जातं.
 |
पायथ्याची पहिली कातळटाकी. किल्ले मोरगिरी. (Morgiri Fort, Maharashtra) |
 |
पायथ्याची दुसरी कातळटाकी. किल्ले मोरगिरी, पुणे. (Morgiri Fort, Maharashtra) |
 |
तिसरी कातळटाकी आणि 'जाखमाते'ची गुहा. किल्ले मोरगिरी. (Morgiri Fort) |
जाखमातेच्या गुहेच्या पुढेच तुटलेल्या कातळाला अवघड जागी उभी शिडी लावलेली दिसते. दहा-बारा फूट उंचीचा हा दरीवरचा कातळ चढून जाण्यासाठी सहा पायंड्यांची लोखंडी शिडी खडकात मजबूत बसविली आहे. शिडीच्या खाली खोल दरी दिसते. शिडी चढून उजव्या बाजूच्या उंच काठावर पाय ठेवण्यासाठी शिडीच्या वर दोन फुट अंतरावर एक लोखंडी गजाचा खिळा खडकात बसविला आहे. या खिळ्यावर पूर्ण भार देऊन उजव्या कातळ काठावर येणे हा आजुन एक थरारक अनुभव आहे. त्यापुढे जाण्यासाठी कातळावर दहा-बारा पायऱ्या कोरल्या आहेत. डावा वळसा घेत पुढे आणखी एक दोन कातळ चढून पायवाट गडाच्या सर्वोच्च माथ्यावर येते.
 |
'जाखमाते'च्या गुहेपुढील शिडीचा थरारक टप्पा. किल्ले मोरगिरी, पुणे. (Morgiri Fort, Pune, Maharashtra) |
 |
शिडीच्या टप्प्यानंतर कोरीव पायऱ्या. किल्ले मोरगिरी. (Morgiri Fort) |
 |
शिडीचा थरारक टप्पा. किल्ले मोरगिरी, पुणे. (Morgiri Fort, Pune, Maharashtra) |
 |
शिडीच्या टप्प्यावरून दिसणारी किल्ल्याकडे येणारी पायवाट. किल्ले मोरगिरी, पुणे. (Morgiri Fort, Pune, Maharashtra) |
गडमाथ्यावर दोन ध्वजखांब दिसतात. ध्वजखांबाच्या बाजूला फुलांनी बहरलेली 'रामेठ्या'ची (Gnidia Glauca) झाडं दिसतात. या 'रामेठ्या'ची साल लांब मजबूत टिकाऊ असल्यानं, आदिवासी शेतकरी ऐनवेळी जंगलातून मोळ्या बांधण्यासाठी या झाडाचा वापर करतात. गडमाथ्यावर मात्र सर्वत्र खुरटी झुडूपं आणि सुकलेलं गवत दिसतं.
गडमाथा अगदी लहान असून दहा मिनिटात गडफेरी पूर्ण होते. गडमाथ्यावर अग्नेयेला कातळात कोरलेली प्रशस्त मोठी चौरसाकृती पाण्याची टाकी आहे. या टाकीच्या बाजुलाच दहा फुटावर दुसरी लहान कातळटाकी दिसते. दोन्ही टाक्या पाण्याने भरलेल्या असल्या तरी वापर नसल्यानं दोन्ही टाकीतील पाणी पिण्यायोग्य दिसत नाही. या व्यतिरिक्त गडमाथ्यावर कुठेही बुरुज, तटबंदी किंवा वाड्यांचे अवशेष दिसत नाहीत. त्यामुळे मोरगिरीचा फक्त टेहळणीचा किल्ला म्हणून उपयोग केला गेला असावा.
 |
गडमाथ्यावरील ध्वजस्तंभ. किल्ले मोरगिरी, पुणे. (Morgiri Fort, Pune, Maharashtra) |
 |
गडमाथ्यावरील कातळटाकी आणि मागे दिसणारा 'किल्ले तुंग' सुळका. किल्ले मोरगिरी, पुणे. (Morgiri Fort, Pune, Maharashtra) |
 |
गडमाथ्यावरील दुसरी कातळटाकी. मागे 'किल्ले तुंग' सुळका. किल्ले मोरगिरी, पुणे. (Morgiri Fort, Pune, Maharashtra) |
मोरगिरीच्या या सर्वोच्च माथ्यावरून पश्चिमेला जांभुळणे गांव ओलांडून आलेले लांबलचक पठार, पठारावरील डावीकडील दुसऱ्या डोंगराचा भव्य माथा दिसतो. त्यापलीकडे सुरुवातीच्या खिंडीचा डोंगर आणि दूरवर लोणावळ्याची मुख्य पश्चिम सह्याद्री रांग दिसते.
 |
मोरगिरीच्या सर्वोच्च माथ्यावरून दिसणारे विविध टप्पे. किल्ले मोरगिरी, पुणे. (Morgiri Fort, Pune, Maharashtra)
|
दक्षिणेला मावळ खोऱ्यातील आकाशात उंच घुसलेला आयताकृती 'किल्ले कोरीगड' लक्ष वेधून घेतो. तसेच कोरीगडच्या बाजूचे 'अँबेव्हॅली जलाशय' असा परिसर नजरेच्या टप्प्यात येतो.
 |
मोरगिरीच्या सर्वोच्च माथ्यावरून दिसणारा 'किल्ले कोरीगड', डावीकडे 'अँबेव्हॅली जलाशय' आणि मावळ परिसर. किल्ले मोरगिरी, पुणे. (Morgiri Fort, Pune, Maharashtra) |
गड माथ्यावरून पूर्वेला विस्तीर्ण 'पवना जलाशय', 'पवन मावळ' खोरे आणि जलाशयाच्या अलीकडील काठावर आकाशात घुसलेला 'किल्ले तुंग'चा बलाढ्य सुळका लक्ष वेधून घेतो. तुंगच्या मागे आणि जलाशयाच्या पलीकडे धुक्यातून अस्पष्ट 'किल्ले तिकोना' दिसतो.
 |
मोरगिरीच्या सर्वोच्च माथ्यावरून दिसणारा 'किल्ले लोहगड', विस्तीर्ण 'पवना जलाशय' आणि मावळ परिसर. किल्ले मोरगिरी, पुणे. (Morgiri Fort, Pune, Maharashtra) |
ईशान्येला पवना जलाशयाच्या पलीकडे 'किल्ले लोहगड', लोहगडाच्या 'विंचू कड्या'ची कातळ भिंत स्पष्ट दिसते. त्यापलीकडे 'किल्ले विसापूर' धुक्यात अस्पष्ट दिसतो.
तर मोरगिरीच्या सर्वोच्च माथ्यावरून उत्तरेला पवना जलाशयाचे 'बॅक वॉटर' (Catchment area) परिसर, त्याच्या डावीकडे 'बोर घाटा'वर(लोणावळा) लक्ष ठेवून असलेला 'किल्ले राजमाची' धुक्यातून दिसतो.
 |
मावळ परिसर. किल्ले मोरगिरी, पुणे. (Morgiri Fort, Pune, Maharashtra) |
 |
किल्ले मोरगिरी, पुणे. (Morgiri Fort, Pune, Maharashtra) |
या सर्व किल्ल्यांच्या साखळीत किल्ले मोरगिरीचे भौगोलिक स्थान आणि उंचीचा विचार करता, मोरगिरीच्या सर्वोच्च माथ्यावरून जवळ जवळ सहा किल्ले फक्त उघड्या डोळ्यांनी दिसतात. प्रसंगी अशा केंद्रस्थ मोरगिरीवरून सावधानतेचे इशारे वेळेत गेल्यामुळे पुढील गडकोटांना शस्त्र सज्ज होण्यास अवधी मिळे. सह्याद्रीतील दुर्गम किल्ल्यांनी परकीय आक्रमणं थोपवून स्वराज्याची पताका अबाधित राखली, ती 'मोरगिरी'सारख्या पहारेकर्यांनी पार पाडलेल्या महत्त्वाच्या भूमिकेमुळे..
|| श्री कृष्णार्पणमस्तू ||
येथे - जयवंत जाधव