सरासरी दोन हजार वर्षांपूर्वी सातवाहन काळात (इ.स. पूर्व २३० ते इ.स. २५०) कोकणपट्टीवर वसई पासून दक्षिणेकडे गोव्यापर्यंत अनेक बंदरे भरभराटीला आली. त्यापैकी उत्तर कोकणातील कल्याण, शुर्पारक (सोपारा, नालासोपारा) यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. त्याचप्रमाणे सह्याद्रीच्या डोंगराळ भागातून बाहेर पडल्यावर दूरवर पसरलेल्या सपाट भूप्रदेशावरील उदयास आलेली तेर (तगर नगर), पैठण, जुन्नर (जीर्णनगर) या मोठमोठ्या प्राचीन शहरांना पहिल्यांदा जोडणारे ते म्हणजे सह्याद्रीतील खिंडीचे मार्ग. त्या घाटखिंडींच्या संरक्षणासाठी दुर्ग बांधणी, शिल्प लेणी आणि घाट मार्गांची बांधणी या तिन्ही प्रक्रिया एकाच वेळी चालवल्या. त्यांच्यावर लक्ष ठेवून त्यांचे रक्षण करण्यासाठी त्यांनी सह्याद्रीच्या कडेकपारीत अनेक किल्ल्यांची निर्मिती केली.
सातवाहनांची उपराजधानी जुन्नरकडून कल्याण बंदराकडे जाणाऱ्या 'नाणेघाट' व्यापारी मार्गासाठी त्यांनी नाणेघाट ते जुन्नर पर्यंत जीवधन, निमगिरी, चावंड, हडसर, शिवनेरी अशा गिरीदुर्गांची शृंखला बांधून सह्याद्रीत लढाऊ योध्येच निर्माण केले.
त्यापैकी 'किल्ले हडसर'चा विचार करता निर्माण केलेल्या इतर किल्ल्यांच्या तुलनेत त्याचे स्थापत्यशास्त्र, सौंदर्य आणि कल्पकता उजवी ठरते.
 |
| ऑफबीट - 'किल्ले हडसर' ता. जुन्नर, जि. पुणे, महाराष्ट्र. Offbeat - 'Hadasar Fort', Junnar, Pune, Maharashtra. |
'किल्ले हडसर'ला भेट देण्यासाठी मुंबई, ठाण्याहून कल्याण माळशेज घाटातून गणेश खिंड मार्गे, तर पुण्याहून यायचे झाल्यास चाकण मंचर जुन्नरहून पायथ्याच्या 'हडसर' गावापर्यंत पोहोचता येते.
पायथ्याच्या हडसर गावातून किल्ल्यावर जाणाऱ्या दोन वाटा आहेत. त्यापैकी 'हडसर' गावातून 'खुंटीची' वाट आणि दुसरी पुढे सरासरी पाच किमी किल्ल्याच्या डोंगराला उजवा वळसा मारून, पश्चिमेकडील 'पेठे'च्या वाडीतून. त्यापैकी पूर्वेची खुंटीची वाट ८० अंशाच्या उभ्या कातळावर लोखंडी गज (खुंट्या) आणि खोबण्यांचा आधार घेत चढाई करण्यास कठीण तसेच धोकादायकही आहे. आजच्या भटकंतीत सोबत पत्नी असल्याने हडसर गावात 'खुंटी'च्या वाटेची चौकशी केली. आणि आगाऊ धाडस न करता किल्ल्याच्या पश्चिमेकडील 'पेठे'च्या वाडीतून चढाईची वाट निवडली.
'पेठे'च्या वाडीतून समोर हडसर किल्ल्याची प्रचंड आडवी, रौद्र कातळाची भिंत दिसते. पर्वतासमान दिसणाऱ्या या गिरीदुर्गाची उंची समुद्रसपाटीपासून सरासरी ३२०० फूट आहे. यामुळेही कदाचित या किल्ल्यास 'पर्वतगड' हे दुसरे नाव पडले असावे. वाडीत विचारल्यास किल्ल्यावर जाणारी पाऊलवाट आहे असं सांगितलं जातं. वाडी सोडल्यास थोडं मोकळं खडकाळ पठार लागतं. पठाराच्या पलीकडे दोन-चार घरांची 'डुंबरे वस्ती' आहे. तिथून बाजूला डोंगरातून येणारा ओढा दिसतो. त्याच्या काठावर मोठ-मोठी उंबराची झाडे आहेत. ओढ्याच्या दुतर्फा भातशेती आहे. या ओढ्याच्या बाजूने पुढे शेतातून जाणाऱ्या पाऊलवाटेवर उजव्या बाजूस घडीव दगडांची एक पुरातन आयताकृती विहीर दिसते. या विहिरी जवळून जाणारी पाऊलवाट किल्ल्याच्या पायथ्याकडील जंगलात जाते.
 |
| 'पेठे'च्या वाडीतून दिसणारी 'हडसर किल्ल्या'ची आडवी कातळ भिंत. 'किल्ले हडसर' ता. जुन्नर, जि. पुणे, महाराष्ट्र. Offbeat - 'Hadasar Fort', Junnar, Pune, Maharashtra. |
 |
| पाऊलवाटेवरील पुरातन 'विहीर'. 'किल्ले हडसर' ता. जुन्नर, जि. पुणे, महाराष्ट्र. Offbeat - 'Hadasar Fort', Junnar, Pune, Maharashtra. |
जंगलाच्या सुरुवातीला वाटेवर एका आंब्याच्या झाडाखाली समाधी आहे. समाधीवर 'जबाजी भले, दि. ३०. १९९८' अशी नोंद दिसते. समाधीच्या घुमटीत शिवपिंडी असून त्यापुढे नंदीचे कातळ शिल्प ठेवले आहे. आपल्या प्रिय पूर्वजांची आठवण निरंतर जपण्यासाठी समाधी बांधतो. समाधीचे स्वरूप एक ओटा, चबुतरा किंवा मंदिर (घुमटी) स्वरूपात असते. समाधीवर घुमटी बांधल्यास आणि ती पूर्वज स्त्री असेल तर घुमटीत देवीस्वरूप मूर्ती ठेवतो. त्याचप्रमाणे पुरुष पूर्वजासाठी शिवपिंडी ठेवतो. बऱ्याच समाधीवर (ओट्यावर) घुमटी बांधली जात नाही. पण इथल्या समाधीवर घुमटीत शिवपिंडी आणि समोर नंदी असल्यामुळे दुर्गभटके हे मंदिर असल्याची माहिती देताना दिसतात. असो.. |
| अंब्याच्या झाडाखालची 'समाधी'. 'किल्ले हडसर' ता. जुन्नर, जि. पुणे, महाराष्ट्र. Offbeat - 'Hadasar Fort', Junnar, Pune, Maharashtra. |
पुढे किल्ल्याकडे जाणारी पाऊलवाट झुडपातून आणि जंगलातून जाते. भातशेतीत आणि डोंगर उतारावर वाडीतील गुरं चरतात. त्याने पायथ्याला बऱ्याच 'ढोरवाटा' (पाऊलवाटा) तयार झाल्या आहेत. या वाटांवर दिशादर्शक बाण किंवा खुणा करण्याची गरज आहे. पण तसे दिसत नाही. पुढे दोन चार ठिकाणी मिळणाऱ्या इतर पाऊलवाटा दिशाभूल करतात. चढाच्या दगडांतून लक्ष ठेवल्यास अवघड जागी पायरीसाठी रचलेल्या दगडांवर लोखंडी जाळ्या बसविल्या आहेत. ठिकठिकाणी जाळ्या दिसणारी ही पाऊलवाट सोडायची नाही.
 |
किल्ल्याकडे जाणारी पाऊलवाट. 'किल्ले हडसर' ता. जुन्नर, जि. पुणे, महाराष्ट्र. Offbeat - 'Hadasar Fort', Junnar, Pune, Maharashtra.
|
 |
| डेरेदार झाडाजवळून डोंगरावर जाणाऱ्या पायऱ्या. किल्ले हडसर. |
पुढे एका डेरेदार झाडाजवळ किल्ल्याची माहिती देणारे दोन फलक दिसतात. आणि इथून डोंगरावर जाणाऱ्या पायऱ्या दिसतात. बाजूला भटक्यांना विश्रांती घेण्यासाठी शेड तर त्याच्या बाजूला एक उंच वॉच टॉवर दिसतो. पेठेच्या वाडीतून जाणारी पूर्वीची ही पाऊलवाट पुढे किल्ल्याच्या मुख्य दरवाजातून जाते म्हणून या वाटेला 'राजमार्ग' म्हटले जाते. पूर्वी या पायऱ्या सुस्थितीत असाव्यात. आता त्या ठीकठिकाणी उध्वस्त विखुरल्या आहेत.
 |
| किल्ल्याची माहिती देणारे 'फलक'. 'किल्ले हडसर', महाराष्ट्र. |
या पायरींच्या पुढे नागमोडी वळणे घेत तीव्र चढाने वाट दगड धोंड्यातून पुढे जाते. जसजसे किल्ल्याच्या कातळाकडे जाऊ तसतशी झुडूपं विरळ होत दमछाक करणारा चढ सुरू होतो. या दगडातून पाय मुरगाळून दुखापत होऊ नये म्हणून काळजी घ्यावी.
आज आम्हाला पनवेलहून माळशेज घाट ओलांडून गणेश खिंडीतून सरासरी १६० किमीचे अंतर पार करून किल्ले हडसरच्या पायथ्याला पोहोचण्यास दुपारी बारा वाजून गेले. आमच्या भेटीचा आठवड्यातील मधलाच दिवस असल्याने सोबत किंवा पुढे कोणी भेटले तर ते नंतरच कळणार होते.
पेठेच्या वाडीतून किल्ल्याकडे जाताना किल्ल्याचा कातळ डावीकडे दिसत असला तरी, पुढे या कातळाच्या बाजूला उजवीकडे दुसरा डोंगर दिसतो. पायवाट किल्ल्याच्या कातळ पायाथ्याकडून फिरून उजव्या कातळ पायथ्याकडे येते. पुढे दोन्ही डोंगर एकत्र येतात. झाडांतून उजव्या खड्या चढावर दूरवर कोरीव पायऱ्या आणि त्याचे रेलिंग दिसतात. पुढे त्या खिंडीतून किल्ल्याकडे जाता येते.
 |
दोन्ही डोंगरांमधील 'खिंड'. किल्ले हडसर, ता. जुन्नर, जि. पुणे, महाराष्ट्र. Offbeat - 'Hadasar Fort', Junnar, Pune, Maharashtra.
|
 |
जवीकडील डोंगरावर 'पायऱ्या आणि रेलिंगकडे जाणारी पायवाट'. किल्ले हडसर, ता. जुन्नर, जि. पुणे, महाराष्ट्र. Hadasar Fort, Junnar, Pune, Maharashtra.
|
पायरीचा हा पहिला टप्पा चढून आल्यास वाट दोन्ही खिंडीतील पुन्हा गर्द झुडपातून जाते. त्यापुढे या कातळाच्या पुढच्या कोरीव पायऱ्या सुरू होतात. या पायरीवर बाजूला कातळात लहानशी उघडी गुहा आहे. उन्हात आणि पावसापासून इथे अडोसा घेऊ शकतो. या ठिकाणी आम्ही घरी बांधून आणलेली शिदोरी सोडली. इथे आम्हाला गडउतार होताना पुण्याचे सहा सात दुर्गमावळे भेटले.  |
रेलिंगकडे जाणारी पायवाट. मागे 'किल्ले हडसर', जि. पुणे, महाराष्ट्र. Hadasar Fort, Junnar, Pune, Maharashtra.
|
 |
| पायथ्याच्या खिंडीतील झुडपातील वाट. किल्ले हडसर, ता. जुन्नर, जि. पुणे, महाराष्ट्र. Hadasar Fort, Junnar, Pune, Maharashtra. |
 |
पायऱ्यांचा दुसरा टप्पा'. किल्ले हडसर, ता. जुन्नर, जि. पुणे, महाराष्ट्र. Hadasar Fort, Junnar, Pune, Maharashtra.
|
पायरीचा हा टप्पा संपताच खिंडीतून किल्ल्यावर जाणाऱ्या पायऱ्या आहेत. सुरुवातीला खिंडीत येईपर्यंत या पायऱ्यांचा अंदाज येत नाही. उंच चढाच्या सरासरी १५० ओबडधोबड पायऱ्या एका दमात चढताना अक्षरशः घाम काढतात. वर आल्यास समोर आडव्या तटबंदीने रस्ता अडवून तो डावीकडे किल्ल्याच्या कातळावर वळवला आहे. अडवलेल्या तटबंदीवरून पायरीवर मारा करण्यासाठी 'जंग्या' आणि 'दिवळ्या' ठेवल्या आहेत. तटबंदी जवळ 'मरहट्टे सह्याद्रीचे' आणि 'शिवाजी ट्रेल' या दुर्गसंवर्धन संस्थेच्या सौजन्याने किल्ल्याचा नकाशा फलक इथे लावला आहे.
 |
| किल्ल्याच्या पायऱ्या. समोर आडवी तटबंदी. किल्ले हडसर, ता. जुन्नर, जि. पुणे, महाराष्ट्र. Hadasar Fort, Junnar, Pune, Maharashtra. |
 |
किल्ल्याच्या पायऱ्यावरून - समोर 'किल्ले निमगिरी'. किल्ले हडसर, ता. जुन्नर, जि. पुणे, महाराष्ट्र. Hadasar Fort, Junnar, Pune, Maharashtra.
|
 |
| पहिल्या दरवाजाकडे वळवलेली वाट'. किल्ले हडसर, ता. जुन्नर, जि. पुणे, महाराष्ट्र. Hadasar Fort, Junnar, Pune, Maharashtra. |
डावीकडे अखंड कातळात किल्ल्याचा पहिला कोरीव दरवाजा आहे. खाली पायरीवरून इथे एखादी गुहा असावी असे वाटते. पण दरवाजात आल्यास डाव्या बाजूला कातळात कोरीव अर्धस्तंभ आणि उजव्या बाजूला किल्ल्याचा पहिला मुख्य प्रवेश दरवाजा कोरून काढलेला दिसतो. दरवाजा तिहेरी कमानीत अगदी अप्रतिम कोरला असून समोर मोकळी जागा आहे. चौकटीच्या आतील बाजूस पहारेकऱ्यांसाठी 'देवड्या' दिसतात. त्यापैकी डाव्या बाजूची देवडी मोठी ऐसपैस कलात्मक कोरली आहे.
 |
| कातळातील किल्ल्याचा 'पहिला प्रवेश दरवाजा'. किल्ले हडसर, ता. जुन्नर, जि. पुणे, महाराष्ट्र. Hadasar Fort, Junnar, Pune, Maharashtra. |
 |
| पहिल्या दरवाजातील 'देवडी' आणि वर जाणाऱ्या 'पायऱ्या'. किल्ले हडसर, ता. जुन्नर, जि. पुणे, महाराष्ट्र. Hadasar Fort, Junnar, Pune, Maharashtra. |
या दरवाजातून सरासरी वीस पायऱ्या चढून वर आल्यास वाट दोन्ही कातळ डोंगरांच्या मधील आडव्या तटबंदीवर येते. तटबंदीच्या मध्यभागी ध्वजस्तंभ दिसतो. तटबंदीच्या पलीकडे हडसर गावातून दोन्ही डोंगरांच्या खिंडीतून एक तिसरी वाट किल्ल्यावर येते. तिला 'नळीची वाट' म्हणतात. पाऊलवाट मध्यम असली तरी किल्ल्याजवळ आडव्या तटबंदी जवळचा कातळ चढण्यासाठी जिकरीचे आहे. या तटबंदीवरून पलीकडे दक्षिणेला किल्ल्याचा जोडभाग असलेल्या डोंगराच्या टेकडीवर जाणारी पायवाट आहे. पायवाटेने या टेकडीवर गेल्यास सुरुवातीला दगडांच्या चौथर्यवर गणेश मूर्ती दिसते. ही नजीकच्या काळात मांडली असावी. पुढे टेकडीवर दोन कातळ टाक्या दिसतात. टेकडीवर सगळीकडे गवत असून पुढे पाऊलवाट दिसत नाही. त्यामुळे भटके क्वचितच या बाजूला येत असावेत. या टेकडीवरून किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाजावरील दोन बुरुज आणि आजूबाजूची थोडीफार शिल्लक राहिलेली तटबंदी दिसते.
 |
पहिल्या दरवाजातुन वर जाणाऱ्या 'वळणदार पायऱ्या'. किल्ले हडसर, ता. जुन्नर, जि. पुणे, महाराष्ट्र. Hadasar Fort, Junnar, Pune, Maharashtra.
|
 |
| दोन डोंगरांच्या मधील आडव्या तटबंदीवरील 'ध्वजस्तंभ' आणि समोर 'टेकडीवर जाणारी वाट'. किल्ले हडसर. Hadasar Fort, Maharashtra. |
 |
| आडव्या तटबंदीवरून किल्ल्यावरील दिसणारे दोन बुरुज आणि तटबंदी. किल्ले हडसर, ता. जुन्नर, जि. पुणे, महाराष्ट्र. Hadasar Fort, Junnar, Pune, Maharashtra. |
पुन्हा मधल्या तटबंदी वरून मागे येऊन या दरवाजाच्या डावीकडून नागमोडी वळणे घेत वर जाणाऱ्या वीसएक पायऱ्या पहिल्या दरवाजावर कोरलेल्या दुसऱ्या दरवाजात येतात. दरवाजात येण्यापूर्वी पायऱ्यांसोबत उजवीकडे सुबक कोरलेली कड्याची धारदार भिंत आणि मागे विस्तीर्ण माणिकडोहाच्या पार्श्वभूमीवर लक्षवेधक दिसणारा त्यावर उंच कोनाडा दुर्गभटक्यांना आकर्षून घेतो. भटक्यांची ही आवडती जागा, तिथे रेंगाळून छायाचित्रात कैद करण्यास भाग पाडतो.  |
| दुर्ग भटक्यांची आवडती जागा - 'Jewel Of Hadsar Fort'. किल्ले हडसर, ता. जुन्नर, जि. पुणे, महाराष्ट्र. Hadasar Fort, Junnar, Pune, Maharashtra. |
किल्ल्याचा दुसरा दरवाजाही तिहेरी कमानीत कोरला असून सुंदर भक्कम असा आहे. त्याच्याही आतील बाजूस पहारेकऱ्यांसाठी 'देवड्या' आहेत. इथल्या दोन्ही 'देवड्या' मात्र मोठ्या आणि कलात्मक कोरल्या आहेत. पुढे डावे वळण घेत पायऱ्या चिंचोळ्या कोरीव मार्गातून किल्ल्यावर जातात. २१ डिसेंबर २०२० साली 'सह्याद्री प्रतिष्ठान'च्या वतीने लोकवर्गणीतून इथल्या दोन्ही दरवाजांच्या चौकटींना सुंदर लाकडी दरवाजे बनवण्यात आले.
 |
| किल्ल्याचा 'दुसरा दरवाजा'. किल्ले हडसर, ता. जुन्नर, जि. पुणे, महाराष्ट्र. Hadasar Fort, Junnar, Pune, Maharashtra. |
 |
| 'दुसरा दरवाजा'. किल्ले हडसर, Hadasar Fort, Maharashtra. |
इथल्या कोरीव पायऱ्यांची लांबी अंदाजे सहा फूट असावी. वळणदार कोरीव मार्गीकेतील या पायऱ्या चढता उतरताना जोरात पाय आपटल्यास पायरीतून तबल्यातील 'ता' (किंवा 'ना') चे ध्वनी उमटतात. त्यामुळे पायऱ्यांखाली पोकळी असल्याचा भास होतो. वास्तुशास्त्राचा हा दुर्मिळ नमुना 'किल्ले हडसर'वर अनुभवायला मिळतो.
 |
दुसऱ्या दरवाजातील 'देवड्या'. किल्ले हडसर, ता. जुन्नर, जि. पुणे, महाराष्ट्र. Hadasar Fort, Junnar, Pune, Maharashtra.
|
इथली सुंदर कातळ वळणे, कोरीव भिंती, ध्वनी निर्माण करणाऱ्या इथल्या गुढ पायऱ्या, किल्ल्याचे एकावर एक असे कल्पकतेने कोरून काढलेले बोगद्यातील भक्कम गोमुखी दरवाजे, हे सर्व सलग एकाच कातळात घडवले आहेत. त्यासाठी त्यावेळच्या कारागिरांनी कोणतीही उणीव मागे ठेवलेली दिसत नाही. सह्याद्रीच्या दऱ्या डोंगरात शोधल्यास अशा सुंदर किल्ल्याच्या स्थापत्यशास्त्रांची मोजकीच रत्ने असावीत.
पायऱ्यांवरून वर आल्यास पूर्वेला किल्ल्याचे विस्तीर्ण पठार दिसते. पठाराच्या मध्यभागी उंच टेकडी दिसते. तो किल्ल्याचा 'बालेकिल्ला' आहे. पठारावरील कातळ सोडल्यास बालेकिल्ला आणि आजूबाजूला 'निलगिरींचे' वृक्ष रोपण केले आहे. चढून आलेल्या पायऱ्यांकडे पठाराचा उतार आहे. उतारावरून वाहून आलेले पावसाचे पाणी पायरीवर येऊ नये म्हणून त्यांच्या वर कातळात कल्पकतेने 'चर' खोदून पाणी कड्यावरून खाली सोडण्याची व्यवस्था दिसते.
 |
| गडमाथ्यावर येणाऱ्या पायऱ्या आणि पाण्यासाठी खोदलेला 'चर'. किल्ले हडसर, ता. जुन्नर, जि. पुणे, महाराष्ट्र. Hadasar Fort, Junnar, Pune, Maharashtra. |
 |
| कातळटाकी आणि राजमुद्रा. किल्ले हडसर, महाराष्ट्र. Hadasar Fort, Maharashtra. |
पायऱ्या चढताच उजव्या बाजूला कातळात आयताकृती छोटं पाण्याचं टाकं खोदलं आहे. त्यातील पाणी पिण्यायोग्य दिसत नाही. त्यासमोर फायबरची 'राजमुद्रा' स्थानापन्न केली आहे. 'राजमुद्रे'मागेच भन्नाट वाऱ्यावर किल्ले हडसरचा 'भगवा' डौलाने फडकताना दिसतो. या टप्प्यावरून दक्षिणेला विस्तीर्ण 'माणिकडोह' जलाशय आणि वायव्येला 'किल्ले निमगिरी' आणि माळशेज घाटाची डोंगररांग तर नैऋत्येला जलाशयाच्या पलीकडे 'किल्ले चावंड' डोळ्यांचे पारणे फेडतात.
 |
| गडमाथ्यावर येणाऱ्या पायऱ्या, राजमुद्रा आणि पाण्यासाठी खोदलेला 'चर'. किल्ले हडसर, ता. जुन्नर, जि. पुणे, महाराष्ट्र. Hadasar Fort, Junnar, Pune, Maharashtra. |
पुढे डाव्या बाजूला कातळ उतारावर किल्ल्यावरील तीन सुंदर तोफा मांडल्या आहेत. त्यांचे तोंड माणिकडोह तलाव आणि माळशेज घाटाच्या दिशेने पश्चिमेच्या दरीत वळवलेले दिसते. त्यातील दोन ओतीव तोफा असून मधली 'मगरमुखी' तोफ आहे. सुबक गाड्यावर मांडलेल्या या तोफांचा दरारा किल्ल्याच्या रुबाबात आणखीन भर घालताना दिसतात.
 |
| किल्ल्यावरील 'तोफा'. किल्ले हडसर, ता. जुन्नर, जि. पुणे, महाराष्ट्र. Hadasar Fort, Junnar, Pune, Maharashtra. |
या तोफांच्या मागे पठारावर एक मोठा पाण्याचा कातळ हौद खोदलेला दिसतो. त्याला 'कमानी टाकं' म्हणतात. चार वर्षांपूर्वी 'मरहट्टे सह्याद्रीचे' आणि 'शिवाजी ट्रेल' या दुर्गसंवर्धन संस्थेनी या टाकीतील गाळ काढून त्याची सफाई केली. दरम्यान टाकीतील गाळात 'मगरमुखी' तोफ सापडली, ती किल्ल्यावर मांडून ठेवलेल्या तीन तोफांपैकी एक आहे. तसेच वाहून आलेला गाळ टाकीत पुन्हा जाऊ नये म्हणून टाकीच्या सभोवती बांधकामही करून घेतले. सध्या टाकीत बऱ्यापैकी पाणी असून ते स्वच्छ दिसतं.
 |
| 'कमानी टाकं'. किल्ले हडसर, ता. जुन्नर, जि. पुणे, महाराष्ट्र. Hadasar Fort, Junnar, Pune, Maharashtra. |
या टाकीच्या मागे किल्ल्यावरचा सर्वात मोठा गोल आकाराचा 'तलाव' दिसतो. तलावाच्या पश्चिम काठावर एका अज्ञात समाधीचे अवशेष दिसतात. तलावात थोडेफार पाणी शिल्लक आहे. बाकी तो गाळ आणि गवताने भरला आहे. तलावाच्या पूर्व बाजूला पाणी दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी तलावातच कातळ हौद खोदले आहेत. तलावाच्या पलीकडे पुरातन महादेव मंदिर दिसतं. या मंदिराच्या मागून किल्ल्याच्या उत्तरेला पायवाटेने जाताना हे कातळ हौद स्पष्ट दिसतात.
 |
गडमाथ्यावरील तळं, समोर बालेकिल्ल्याची टेकडी आणि उजवीकडे महादेव मंदिर. किल्ले हडसर, पुणे, महाराष्ट्र. Hadasar Fort, Pune, Maharashtra.
|
 |
| गडमाथ्यावरील तळ्यात खोदलेले 'कातळ हौद'. किल्ले हडसर, ता. जुन्नर, जि. पुणे, महाराष्ट्र. Hadasar Fort, Junnar, Pune, Maharashtra. |
किल्ल्याच्या मध्यावर असलेल्या बालेकिल्ल्याच्या उंच टेकडीवर तटबंदी दिसत नाही.
पुढे कमरे इतक्या पाषाणी चौथर्यावर पुरातन महादेव मंदिर असून मंदिरासमोर सुबक नंदी आहे. मंदिराला गर्भगृह आणि मंडप आहेत. दोन्हीवर सुबक दगडी कळस असून गर्भगृहाचा कळस तुलनेने मोठा उंच आहे. मंदिराच्या चौकटीवर मध्यभागी 'गणेश' तर उंबऱ्यावर 'कीर्तीमुख' कोरले आहे. आत मंडपात समोर दोन्ही बाजूला अष्ट पाकळ्यांच्या नक्षीदार दिवळ्या आहेत. त्यापैकी उजव्या दिवळीत पाषणात कोरलेली श्री गणेशाची मूर्ती आहे. हा सिंदूर चर्चित गणेश इतका सुंदर आणि सुबक आहे की, नजर जाताच त्याच्या चरणी मन लिन होऊन जाते. तर उजवीकडील दिवळीत मारुतीची मूर्ती दिसते. तोही सिंदूर चर्चित सुंदर असून विशेष म्हणजे त्याला 'मिश्या' आणि डोक्यावर 'टोप' कोरला आहे. मारुतीच्या मूर्ती समोर भिंतीतील दिवळीत श्री विष्णूवाहन गरुडाचीही सुंदर मूर्ती हात जोडून आणि उड्डाण घेण्याच्या तयारीत दिसते.
 |
महादेव मंदिर. किल्ले हडसर, ता. जुन्नर, जि. पुणे, महाराष्ट्र. Hadasar Fort, Junnar, Pune, Maharashtra.
|
 |
महादेव मंदिरातील सुबक गणेश मूर्ती आणि गाभाऱ्यात शिवपिंडी. किल्ले हडसर, ता. जुन्नर, जि. पुणे, महाराष्ट्र. Hadasar Fort, Junnar, Pune, Maharashtra.
|
 |
श्री हनुमान मूर्ती. महादेव मंदिर. किल्ले हडसर Hadasar Fort.
|
 |
| श्री गरुड मूर्ती. महादेव मंदिर. किल्ले हडसर Hadasar Fort. |
 |
श्री महादेव. किल्ले हडसर, Hadasar Fort.
|
मंदिराच्या गर्भगृहाची चौकट ठेंगणी असून त्याच्या चौकटीवरही गणेश आणि खाली उंबऱ्यावर कीर्तीमुख कोरले आहे. गाभाऱ्यात श्री महादेवाची सुंदर रेखीव शिवपिंडी दिसते. वाहिलेल्या ताज्या फुलांवरून या अपरिचित ठिकाणी इथल्या देवतांची नित्य पूजा होताना दिसते. महाशिवरात्रीत इथे उत्सव भरतो. या ठिकाणी शिर्डीहून गडभेटीस आलेले तिघे दुर्ग भटके आम्हाला भेटले.
मंदिराच्या पुढे दक्षिणेकडे वाढलेल्या गवतात किल्ल्यावरील उध्वस्त वाड्यांचे अवशेष दिसतात. त्यापुढे पूर्वेला हडसर गावातून कडा चढून येणारी 'खुंटीची वाट' आहे. इथेच किल्ल्याच्या पूर्वेचा बुरुज आणि त्याच्या आजूबाजूची तटबंदी दिसते. जवळच गडमाथ्यावरील दुसरे लहान तळे आणि जमिनीच्या कातळावर खोदलेले पाण्याचे हौद दिसतात. त्यापुढे पठारावर शेंदूर लावलेली मारुतीची मूर्ती उघड्यावर दिसते.
 |
वाड्याचे अवशेष. किल्ले हडसर, महाराष्ट्र. Hadasar Fort, Maharashtra.
|
 |
श्री हनुमान मूर्ती. महादेव मंदिर. किल्ले हडसर Hadasar Fort.
|
 |
पाषाणाचे भांडे. किल्ले हडसर. Hadasar Fort, Maharashtra.
|
किल्ल्याच्या उत्तर पूर्वेला एक सुबक गुहा कोरली आहे. आत चौथर्यावर एका अनामिक देवीचे भग्न अवशेष दिसतात. बालेकिल्ल्याच्या टेकडीला वळसा मारत पुढे उत्तरेकडे गेल्यास पाऊलवाटेवर एक सुंदर अष्टकोनी पाषाणाचे भांडे दिसते.
 |
देवीचे मंदिर. किल्ले हडसर, ता. जुन्नर, जि. पुणे, महाराष्ट्र. Hadasar Fort, Junnar, Pune, Maharashtra.
|
पुन्हा उत्तरेकडून पश्चिमेकडे वळसा मारून चढून आलेल्या पायऱ्यांकडे येताना पाऊलवाटेवर जमिनीच्या सपाटीवरून सहजासहजी दिसणार नाही असा भूअंतर्गत खोल 'चर' आहे. जवळ गेल्यास त्यात कोणी अपघाती पडू नये म्हणून सभोवती दगड मांडलेले दिसतात. किल्ल्याच्या पश्चिमेकडील तीव्र उताराकडून तिथे आत जाता येते. वळणदार खोदलेल्या या चरातून आत आल्यास सुरुवातीची चौकट दिसते. चौकट ओलांडून समोर आणि डावी उजवीकडे अशा तीन आयताकृती गुहा खोदलेल्या दिसतात.
 |
| 'धान्य कोठार' आणि छताजवळ 'दगडी खुंट्या'. किल्ले हडसर, पुणे, महाराष्ट्र. Hadasar Fort. |
तीनही गुहा प्रमाणबद्ध असून त्यांच्या आत आणखीन खोल्या खोदून त्यांचा जमिनीखाली विस्तार केलेला दिसतो. आत अंधार असल्यामुळे प्रत्येक खोलीच्या शेवटपर्यंत जाता आले नाही. हे किल्ल्याचे 'धान्य कोठार' आहे. यांना किल्ल्याची 'लेणी'ही म्हणतात. वरून उघड्या कोठारात पडणारे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी आत येण्याच्या वाटेवरच लहान चर खोदून, पाणी किल्ल्याच्या पश्चिम उतारावरून बाहेर सोडलेले दिसते. तसेच कोठारात वरून पावसाचे पाणी पडू नये यासाठी खबरदारी म्हणून कोठारावर पूर्वी छप्पर असावे. कोठाराच्या छताजवळ आधार देणाऱ्या दगडी 'खुंट्या' दिसतात. त्यातील काही खुंट्या अजूनही अस्तित्व टिकवून आहेत. किल्ल्याच्या पश्चिम उतारावर एका बाजूला जमिनीखाली खोदलेली ही विस्तीर्ण धान्य कोठारे जमिनीवरून सहसा दिसत नाहीत. ही अप्रतिम शिल्पकाला नक्कीच पाहण्यासारखी आहे.
 |
'धान्य कोठाराचा मार्ग'. किल्ले हडसर, ता. जुन्नर, जि. पुणे, महाराष्ट्र. Hadasar Fort, Junnar, Pune, Maharashtra.
|
 |
'धान्य कोठाराचा मार्ग' आणि पाण्यासाठी 'चर'. किल्ले हडसर, पुणे, महाराष्ट्र. Hadasar Fort, Maharashtra.
|
 |
| 'धान्य कोठार' आणि छताजवळ 'दगडी खुंट्या' . किल्ले हडसर, ता. जुन्नर, जि. पुणे, महाराष्ट्र. Hadasar Fort, Pune, Maharashtra. |
 |
'धान्य कोठार'. किल्ले हडसर, ता. जुन्नर, जि. पुणे, महाराष्ट्र. Hadasar Fort.
|
 |
'धान्य कोठारातील खोल्या'. किल्ले हडसर, महाराष्ट्र. Hadasar Fort.
|
१४८३ साली निजामशाहीचा सरदार 'मलिक अहमद' यानं प्राचीन जुन्नर बाजारपेठ काबीज करून 'किल्ले हडसर' सोबत आजूबाजूचे किल्ले ताब्यात घेतले.
१६३७ ला निजामशाहीत असताना मुघलांशी झालेल्या तहात शहाजीराजांनी पाच किल्ल्यांपैकी 'किल्ले हडसर' मोघलांना दिला होता.
स्वराज्य निर्मितीनंतर १६६५ च्या पुरंदर तहात मुघलांकडे गेलेले किल्ले परत मिळवण्यासाठी शिवछत्रपतींनी मोहीम हाती घेतली. १६७१-७२ मध्ये साल्हेरचा किल्ला जिंकल्यानंतर, तो परत मिळवण्यासाठी इख्लासखानच्या नेतृत्वाखाली मुघल सैन्याने साल्हेरला वेढा घातला. त्याला प्रत्युत्तर म्हणून साल्हेर जवळ मराठा सैन्याने मुघलांना खुल्या मैदानात समोरासमोर टक्कर दिली. युद्धातील निर्णयक विजयानंतर अजिंक्य ठरलेल्या मराठा सैन्याने त्यानंतर जुन्नर जवळील किल्ले निमगिरी, चावंड, जीवधन, हरिश्चंद्रगड, सोबतच 'किल्ले हडसर' जिंकून घेतला.
छत्रपतींच्या निधनानंतर पुन्हा तो मुघलांकडे गेला आणि १७४८ ला पेशवाईत पुन्हा मराठ्यांकडे आला. २५ एप्रिल १८१८ रोजी तो इंग्रजांच्या ताब्यात गेला. त्यानंतर इंग्रजांनी किल्ल्याच्या वाटा सुरुंग लावून उध्वस्त केल्या.
 |
'माणिकडोह धरण', पलीकडे 'किल्ले शिवनेरी'. किल्ले हडसर, ता. जुन्नर, जि. पुणे, महाराष्ट्र. Hadasar Fort, Maharashtra.
|
'किल्ले हडसर'च्या पायथ्याला पेठेच्या वाडीत 'पवार खानावळ' आहे. घरगुती आहे. पण येणाऱ्या भटक्यांच्या जेवणाची तसेच गरज पडल्यास राहण्याचीही सोय होते. किल्ल्याचा एकूण आकार त्रिकोणी आहे. किल्ल्याच्या माथ्यावर भटकंतीसाठी दोन तास पुरतात. किल्ल्यावर असलेले प्रचंड मोठे भूअंतर्गत धान्य कोठार, पाण्याची तळी आणि खोदलेले हौद यावरून किल्ल्यावर त्यावेळी मोठा राबता असावा. महाराष्ट्राच्या विशाल पावन भूमीवर सातवाहनानंतर ज्या ज्या राजवटी इथे राज्य करून गेल्या त्यांच्या या साक्षीदाराला एकदा नक्कीच भेटले पाहिजे..
|| श्री कृष्णार्पणमस्तु ||
येथे - जयवंत जाधव