Monday 11 January 2021

येडशी रामलिंग मंदिर (Yedshi Ramling Temple)

                  मराठवाड्यातील बार्शी - लातूर प्रवासात 'येडशी' घाट लागतो. अवर्षणग्रस्त (कमी पाऊस) असलेल्या या भागात हा घाट रस्त्याचा प्रवास मात्र खूप निसर्गरम्य आहे. शासनानं हा अभयारण्य विभाग जाहीर केला आहे. बार्शीहून पूर्वेला सरासरी ४५ किमीवर या अरण्यात लातूरला जाताना 'बीड - उस्मानाबाद' हा आडवा महामार्ग दिसतो. या महामार्गावर डावीकडं वळण घेतल्यास, इथं रामायण काळातील  एक पुरातन महादेव मंदिर आहे. अगदी अभयारण्याच्या मधोमध, हिल स्टेशनवर आणि दरीच्या कोंदणात असलेलं हे मंदिर आणि परिसर निसर्गरम्य आहे. दरीत सरासरी १११ पायऱ्या  उतरून मंदिरात जावं लागतं. त्यामुळं दुरून या मंदिराचा ठावठिकाणा लक्षात येत नाही.
दरीच्या कोंदणातील 'श्री रामलिंग' मंदिर (Yedshi Ramling) 
 
मंदिरामागील दक्षिण प्रवेश बाजू (Yedshi Ramling) 

              'बालाघाट' डोंगररांगेतील हे थंड हवेचं ठिकाण असल्यानं बीड, सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातील निसर्गप्रेमींना हे पर्यटनाचं ठिकाण बनलं आहे. 'येडशी रामलिंग घाट अभयारण्य' नावानं ते प्रसिद्ध आहे.  

              सरासरी कमी पावसाची नोंद असल्यानं इथं आपटा, अर्जुन, अंजनी, बेहडा सारखी मध्यम आकाराची आणि विशेषतः करवंदीची झुडपं मोठ्या प्रमाणात दिसतात. या घाट प्रवासात ससा, मुंगूस, मोर यासारखे वन्य जीव रस्त्यात दर्शन देतातच देतात.

जटायु समाधी (Yedshi Ramling) 

 

मंदिरासमोरील बाजू (Yedshi Ramling) 
  
                सीतेचं अपहरण करून लंकेस जाताना, रामभक्त जटायुनं या अरण्यात रावणाशी झुंज दिली. रावणाशी युध्द करून घायाळ अवस्थेत पडलेल्या जटायूची रामभेट या ठिकाणी झाली. श्री रामांनी इथं बाजूला जमिनीत बाण मारून जलउत्पती केली. जलप्राशन करून जटायुनं प्राण सोडले. पुढील तीन दिवस श्रीरामांनी  या ठिकाणी वास्तव्य केलं आणि दरम्यान शिवलिंगाची स्थापना करून पूजा केली. अशी आख्यायिका देवळातल्या गुरवानं सांगितली. या घटनेमुळं या ठिकाणाला पौराणिक वारसाही मिळाला आहे.   
           
पुरातन शिवलिंग (Yedshi Ramling) 

मंडपातील नंदी (Yedshi Ramling) 
 
   

           मंदिरामागेच जिथं पाण्यासाठी बाण मारला तिथं सध्या गुहेचं स्वरूप आहे. पाण्याची एक संततधार या गुहेतून बाहेर पडताना दिसते. तर बाजूलाच दरडीवरून कोसळणारा धबधबा आहे. पावसाळयात इथं पाण्याचा प्रपात असतो. श्रावणात आणि पावसाळ्यात भाविक आणि पर्यटकांची गर्दी असते. 
              शिवलिंग प्राचीन असून आधी अहिल्याबाई होळकरांनी हे मंदिर बांधलं. सध्या आजूबाजूचा प्राकार वगळून मुळ मंदिराचा नव्यानं  जीर्णोद्धार केलेला दिसतो. गाभाऱ्यात प्राचीन शिवपिंड आहे तर सभामंडप प्रशस्त असून मंडपात सुंदर कलाकुसर केलेला पितळेचा मोठा उभा नंदी आहे.                                                                                                       
मंदिरासमोरील नितळ नदी 
 
धबधबा आणि समोर श्रीराम निर्मित गुहा (Yedshi Ramling) 

                  देवळाला वळसा मारून शांत वाहणारी छोटी नदी, तिचं नितळ पाणी, बाजूलाच धबधबा आणि नदीचं पुढं जंगलात लुप्त होत जाणं खूपच छान आहे. परिसर शांत आणि निवांत आहे. बार्शीहून हा 'तेर'चा प्रवास पूर्ण या  अभयरण्यातून झाला. आमचं 'तेर' हे पुढचं मुख्य नियोजन असल्यानं औटघटकेसाठी या मंदिराचीही भेट झाली.
मंदिराला वळसा मारणारी नदी (Yedshi Ramling) 
    

Yedshi Ramling 

         सूचना :-   इथली माकडं मात्र उच्छादी आहेत.    

                                       || श्री कृष्णार्पणमस्तू ||  

येथे - जयवंत जाधव

4 comments:

  1. तुमच्या फॅमिलीच्या भटकंतीमुळे छान माहिती मिळते.मस्त. short n sweet..����

    ReplyDelete

ऑफबीट - खरोसा लेणी, निलंगा, जि. लातूर Offbeat - Ancient Kharosa caves, Dist. Latur, Maharashtra.

                        महाराष्ट्रात वैशिष्ट्यपूर्ण अशी बरीच लेणी आहेत. काहींची प्रसिद्धी तर जगभर पोहोचली आहे. त्यांची कोरीव कलाकुसर आजही थक...