Wednesday, 12 February 2025

'आनेगुंदी' किल्ला (सेनागुंदीम) : 'किष्किंधा' क्षेत्र - प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास, जि. कोप्पळ, कर्नाटक. Ancient and Medieval history of 'Aanegundi', Dist. Koppal, Karnataka.

                        प्राचीन 'किष्किंधा' क्षेत्रातील 'हम्पी' हे मध्ययुगीन काळात विजयनगरची राजधानी म्हणून प्रसिद्धीस आले. पर्यटकांना नेहमी भुरळ घालणारं हे 'हम्पी' पूर्व कर्नाटकातील 'तुंगभद्रा' नदीच्या दक्षिण तटावर वसले आहे. इथे येण्यासाठी 'मुंबई होस्पेट' रेल्वे सोईस्कर आहे. 'होस्पेट' हा रेल्वेचा शेवटचा थांबा. तिथून १४ किमी ईशान्येला कर्नाटक राज्य परिवहनाची बस किंवा रिक्षाने 'हम्पी' गाठता येते. हम्पीत 'विरुपाक्ष' मंदिराजवळ अनेक गेस्ट हाऊस आहेत, तिथे राहण्याची उत्तम व्यवस्था होते. 

                        मध्ययुगीन काळातील 'हम्पी'च्या आधी तुंगभद्रेच्या पलीकडे उत्तर तटावर 'आनेगुंदी' (प्राचीन सेनागुंदीम) हे शहर होते. आता तिथे त्यामानाने थोडे लोक राहतात. कर्नाटकातील हिंदू राज्यकर्ते 'होयसळां'ची ती शेवटची राजधानी. 'हम्पी' वसवण्यापूर्वी विजयनगर साम्राज्याच्या पहिल्या राजधानीचा मान 'आनेगुंदी'ला जातो. आनेगुंदी गावाला भेट द्यायची झाल्यास हम्पीतून रिक्षाने 'कमलापूरम' मार्गे तुंगभद्रेवरील 'बुक्कासागर' धरण ओलांडून २० किमीच्या 'आनेगुंदी' गावात येता येते. 

आनेगुंदी किल्ला, मुख्य प्रवेशद्वार, आनेगुंदी, किष्किंधा क्षेत्र, जि. कोप्पळ, कर्नाटक. (Aanegundi, Ancient and Medieval History, Karnataka)

                       'त्रेता' युगात 'आनेगुंदी' परिसराचा 'किष्किंधा' क्षेत्र म्हणून उल्लेख सापडतो. चक्रवर्ती 'वाली'चे वानर राज्य असल्याचा रामायणात तसा उल्लेख आहे. लंकाधीश रावणालाही वालीने एकदा युद्धात पराभवाचे पाणी चाखायला लावले होते. त्यानंतर त्या दोघांत मैत्रीपूर्ण संबंध राहिले. सोन्याची लंका निर्माण करण्यासाठी रावणास चक्रवर्ती वालीने त्यावेळी किष्किंधेच्या खाणीतून सोने काढून नेण्याची परवानगी दिली होती.

                           वाली'चा लहान भाऊ 'सुग्रीव' हा राज्याचा प्रमुख मंत्री होता. माता सीतेच्या शोधार्थ प्रभू श्रीराम व लक्ष्मण इथे आले. त्यानंतर हनुमान श्रीराम भेट, वालीचा वध आणि तुंगभद्रेच्या उत्तर तटावरील गुहेत सीतेच्या शोधार्थ सर्वांनी योजना आखणे अशा घटना या क्षेत्रात घडल्याचे उल्लेख आहेत. ही सर्व ठिकाणे आज इथे पहायला मिळतात. 

तुंगभद्रेच्या उत्तर तटावरील गुहा. आनेगुंदी, किष्किंधा क्षेत्र, जि. कोप्पळ, कर्नाटक. (Aanegundi, Ancient and Medieval History, Karnataka)

तुंगभद्रेच्या उत्तर तटावरील गुहा. आनेगुंदी, किष्किंधा क्षेत्र, जि. कोप्पळ, कर्नाटक. (Aanegundi, Ancient and Medieval History, Karnataka)

                    किष्किंधा परिसरात रामभक्त हनुमानाचे जन्मस्थळ 'अंजनाद्री' पर्वत, शबरी गुहा, आनेगुंदी किल्ल्याच्या पहाडावरची 'वालीगुहा' तसेच हेमकुट, ऋषीमुख, मातंग, माल्यवंत असे सर्व पर्वत आणि रामायणातील  घडलेल्या घटनांचे इथे बरेच पुरावे दिसतात. त्याचप्रमाणे तुंगभद्रेच्या दक्षिण तटावर राहत असलेली सुग्रीव गुहा हे सर्व वेगवेगळ्या ठिकाणी तीन चार किमीच्या परिघात आहेत. 

                   वानरराज सुग्रीव राहत असलेल्या गुहेतून एक नैसर्गिक स्फटिकांची लांबलचक किनार गुहेच्या बाहेर येताना दिसते. ती माता सीतेच्या वस्त्राची किनार (साडीच्या पदराची किनार) समजली जाते. सुग्रीवाने माता सीता अपहरणानंतर सीतेचे सापडलेले रत्न श्री रामांना या गुहेत दाखवले होते अशी आख्यायिकाही सांगितली जाते.

सुग्रीवाच्या गुहेतून बाहेर येणाऱ्या स्फटिकांची किनार. आनेगुंदी, किष्किंधा क्षेत्र, जि. होस्पेट (विजयनगर), कर्नाटक. (Aanegundi, Ancient and Medieval History, Karnataka)

सुग्रीव राहत असलेली गुहा. किष्किंधा क्षेत्र. कर्नाटक. 
                     एकदा 'दुंधुंभि' नावाचा मायावी व बलवान राक्षस वालीशी युद्ध करण्यासाठी आला. वालीने राक्षसाशी युद्ध करून त्यास मागे हटविले. तेव्हा तो किष्किंधेच्या जंगलातील एका गुहेत पळून गेला. वालीने सुग्रीवास जोपर्यंत मी परत बाहेर येत नाही तोपर्यंत गुहेच्या तोंडावर पहारा देण्यास सांगितले आणि वाली गुहेत गेला. सहा महिन्यापर्यंत कोणीच परत आले नाही. (यातील सहा महिन्यांचा कालावधी अतर्क्य वाटतो) एक दिवस गुहेच्या तोंडावर रक्त वाहू लागले आणि आतील वालीचा आर्तनाद ऐकून सुग्रीव भ्रमित झाला. राक्षस परत येईल या संभ्रमातच त्याने गुहा एका मोठ्या शिळेने बंद करून तो राजगृही परतला. पुढे तो राजा बनण्याची तयारी करू लागला. 

                      काही दिवसांनी वाली गुहेतून बाहेर आला. बाहेर सुग्रीव नसल्याचे बघून तो राजगृही परततो. तिथे सुग्रीवाला राजा बनण्याच्या तयारीत बघून वाली क्रोधीत होतो व त्याच्या पत्नीला आपल्याजवळ ठेवून त्याला जंगलात हाकलून देतो. पुढे जंगलात हनुमंत, जांबुवंत व इतर वानरसेना सुग्रीवाला मिळतात. याच दरम्यान श्रीराम व लक्ष्मण सीतेचा शोध घेत 'किष्किंधा' क्षेत्रात दाखल होतात. श्रीराम आल्याचे कळताच सर्वजण श्रीरामाची भेट घेतात व वालीच्या अत्याचाराची व्यथा मांडतात. सुग्रीव श्रीरामांना विनंती करतो की, जर त्यांनी वालीचा संहार करून त्याला राजा बनविले तर तो सीतेच्या शोधकार्यात श्रीरामांना मदत करेल. श्रीराम सुग्रीवाच्या म्हणण्याप्रमाणे वालीचा नाश करतात व त्याला किष्किंधेचा राजा म्हणून राज्याभिषेक करतात. 

                     सुग्रीव, जांबुवंत, हनुमान, श्रीराम आणि लक्ष्मण या सर्वांनी इथल्या एका गुहेत सीतेच्या शोधार्थ योजना आखली. ती गुहा तुंगभद्रेच्या उत्तर काठालगत आहे. तसेच या गुहे समोरून सुग्रीव आणि वालीचे युद्ध चालू असताना श्रीरामांनी वालीचा बाण मारून वध केला ते ठिकाण नदीपलीकडे दाखविले जाते. जिथून बाण मारला त्या ठिकाणी खडकावर श्रीरामांच्या पादुका कोरलेल्या दिसतात. तर जिथे वालीचे दहन केले गेले, तिथे 'निंबापूरम'च्या शेजारील गावात भयानक राखेचा एक मोठा ढीग आहे. ते वालीचे दहन केलेले अवशेष मानले जाते.

गुहे समोरून वालीस बाण मारलेली जागा. आनेगुंदी, किष्किंधा क्षेत्र, जि. कोप्पळ, कर्नाटक. (Aanegundi, Ancient and Medieval History, Karnataka)

नदीपलीकडे वाली आणि सुग्रीव युद्ध आणि वालीचे मृत्यू ठिकाण. आनेगुंदी, किष्किंधा क्षेत्र, जि. कोप्पळ, कर्नाटक. (Aanegundi, Ancient and Medieval History, Karnataka)

                    सीतेच्या अपहरणानंतर चिंतेत असताना श्री रामांनी तिथल्या वास्तव्यादरम्यान पूजेसाठी या नदीकाठावर शिवलिंग स्थापित केले. त्याला 'चिंतामणी' शिवमंदिर म्हटले जाते. याव्यतिरिक्त तिथे श्रीविष्णूचा चौथा अवतार नरसिंहाचे प्राचीन मंदिर दिसते. तसेच बाजूला श्री लक्ष्मी, श्री गणेश, श्री हनुमान अशा परिवार देवतांचीही मंदिरे दिसतात. ही सर्व ठिकाणे 'आनेगुंदी' गावात तुंगभद्रेच्या काठावर आहेत. 

आनेगुंदी गावातील तुंगभद्रा काठावरील गुहेकडे जाणारा मार्ग आणि मंदिर समूह. आनेगुंदी, किष्किंधा क्षेत्र, जि. कोप्पळ, कर्नाटक. (Aanegundi, Ancient and Medieval History, Karnataka)

तुंगभद्रा काठावरील 'श्री चिंतामणी' शिव मंदिर. आनेगुंदी, किष्किंधा क्षेत्र, जि. कोप्पळ, कर्नाटक. (Aanegundi, Ancient and Medieval History, Karnataka)

 
 'श्री चिंतामणी' शिव मंदिर. आनेगुंदी, किष्किंधा क्षेत्र, जि. कोप्पळ, कर्नाटक. (Aanegundi, Ancient and Medieval History, Karnataka)

तुंगभद्रा काठावरील 'श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर. आनेगुंदी, कर्नाटक. (Aanegundi, Karnataka)
'श्री लक्ष्मी नृसिंह'. (Aanegundi)
                      'आनेगुंदी'तून या वरील ठिकाणांकडे जाण्यासाठी जिथे डावीकडे वळसा मारतो त्या चौकात श्रीरंगनाथस्वामी (श्री विष्णूंचे) मंदिर आहे. त्याचे भव्य कोरीव प्रवेशद्वार त्याच्या प्राचीनतेची साक्ष देते. मंदिर आवारात उजवीकडे भक्तांसाठी अन्नछत्र मंडप आणि डावीकडे किर्तन मंडप दिसतो. समोर प्रशस्त जागेत दगडी मजबूत खांबांवर तोललेला मंदिराचा सभामंडप आहे. मागे गाभाऱ्यात शेषनागावर विराजमान श्रीविष्णूंची सुंदर प्राचीन मूर्ती दिसते. मंदिराच्या प्रांगणात दोन्ही बाजूला त्या वेळी बांधलेला जुना भक्तनिवास दिसतो. तर मंदिराच्या समोर चौकात रस्त्यावर भगवान विष्णूंचा भव्य कोरीव जुना लाकडी रथ दिसतो. त्या रथाची छोटी सुबक नवीन प्रतिकृती बाजूला उभी दिसते.
आनेगुंदी गावातील श्री रंगनाथस्वामी (श्री विष्णू) रथ आणि समोर मंदिर. आनेगुंदी, किष्किंधा क्षेत्र, जि. कोप्पळ, कर्नाटक. (Aanegundi, Ancient and Medieval History, Karnataka)

प्रवेशद्वार, श्री रंगनाथस्वामी (श्री विष्णू) मंदिर. आनेगुंदी, किष्किंधा क्षेत्र, जि. कोप्पळ, कर्नाटक. (Aanegundi, Ancient and Medieval History, Karnataka)
सभामंडप, श्री रंगनाथस्वामी मंदिर. किष्किंधा क्षेत्र. (Aanegundi)

अन्नछत्र मंडप, श्री रंगनाथस्वामी मंदिर. (Aanegundi)
  
श्री रंगनाथस्वामी (श्री विष्णू). आनेगुंदी, किष्किंधा क्षेत्र, कर्नाटक. (Aanegundi)







                गावातील चौकात डाव्या वळणावर श्रीरंगनाथस्वामी मंदिरासमोर विजयनगर काळातील सोळाव्या शतकात बांधलेला 'गगनमहाल' दिसतो. 'इंडो इस्लामिक' वास्तुशास्त्राचा सुंदर नमुना असलेली ही वास्तू विजयनगर साम्राज्याच्या राजघराण्याची राहती वास्तू होती. मुघलांच्या आक्रमणात ती उध्वस्त केली गेली. सध्या त्याचे पुनरुज्जीवन चालू आहे. 

गगनमहाल'. आनेगुंदी, किष्किंधा क्षेत्र, जि. कोप्पळ, कर्नाटक. (Aanegundi, Ancient and Medieval History, Karnataka)
                      'आनेगुंदी' किल्ला हा गावापासून दोन किमी पश्चिमेला आहे. किल्ल्यापासून दोन अडिज किमी अंतरावर 'पंपा सरोवर' आहे. या सरोवराजवळ श्रीराम हनुमान भेट झाल्याचे सांगितले जाते. सरोवराच्या काठावरील डोंगराच्या उतारावर सरस्वती मातेचे मंदिर आहे. या मंदिराच्या सभामंडपातील डाव्या कोपऱ्यात 'शबरी गुहा' दिसते. गुहा प्राचीन असली तरी मंदिर मात्र विजयनगरच्या मध्ययुगीन काळातील आहे. तिथूनच एक किमी अंतरावर पश्चिमेला श्री हनुमान जन्मस्थळ 'अंजनाद्री' पहाड दिसतो. 
'पंपा सरोवर'. आनेगुंदी, किष्किंधा क्षेत्र, जि. कोप्पळ, कर्नाटक. (Pampa Lake. Aanegundi, Ancient and Medieval History, Karnataka)

पंपा सरोवरासमोरील सरस्वती मंदिर आणि डावीकडे 'शबरी गुहा' . आनेगुंदी, किष्किंधा क्षेत्र, कर्नाटक. (Aanegundi, Ancient and Medieval History, Karnataka)
 
शबरी गुहा. आनेगुंदी, किष्किंधा क्षेत्र, कर्नाटक. (Aanegundi, Karnataka)

                     प्रत्येक शनिवारी अंजनाद्रीवर पर्यटक आणि भाविकांची अक्षरशः जत्रा भरते. पहाटेचा सूर्योदय अंजनाद्रीवरून बघणे ही एक पर्वणीच आहे. पण शनिवार सोडून इतर दिवशी भल्या पहाटे अंजनाद्री चढण्याची तसदी मात्र भाविक घेताना दिसत नाहीत. तेव्हा त्यासाठी आदल्या दिवशीच वाहनाची तजवीज करून ठेवणे चांगले. सरासरी तासाभराची ही चढाई आहे. वर जाण्यासाठी सुघड पायऱ्या आहेत तरीही उभी चढाई दमछाक करते. पहाटेच्या थंडीत झुंजुमुंजु होत असताना दिवस उगवेपर्यंत निसर्गातील दिसणारे विहंगम बदल हे न विसरण्यासारखेच आहेत. त्यामुळे शनिवार वगळता एखाद्या पहाटे थोडी दगदग झाली तरी इथला सूर्योदय चुकवू नये. अंजनाद्री डोंगरावर पूर्व टोकाला श्री हनुमानाचे प्राचीन मंदिर आहे. मंदिराभोवती प्रदक्षिणेचा मार्ग आहे. या पूर्व टोकाकडे दुरून अगदी तुंगभद्रेच्या पलीकडील हम्पी शहरातूनही पाहिल्यास श्री हनुमानाचा उग्र चेहरा दृष्टीस पडतो.

'अंजनाद्री पर्वत'. आनेगुंदी, किष्किंधा क्षेत्र, जि. कोप्पळ, कर्नाटक. (Aanegundi, Ancient and Medieval History, Karnataka)
अंजनाद्री पर्वतावरून सूर्योदय, आनेगुंदी. (Anjanadri Mountain, Aanegundi, Ancient and Medieval History, Karnataka)
  
श्री हनुमान जन्मस्थळ,अंजनाद्री पर्वतावरून सूर्योदय, आनेगुंदी. किष्किंधा क्षेत्र. (Anjanadri Mountain, Aanegundi, Kishkindha. Ancient and Medieval History, Karnataka)


अंजनाद्री पर्वतावरून सूर्योदय, आनेगुंदी. (Anjanadri Mountain, Aanegundi)

                       हम्पी, किष्किंधा परिसर पिंजून काढून 'सानापूर' गावाजवळ निसर्गरम्य डोंगर पायथ्याला निवांत होऊ शकतो. तिथे बांबू, वेतांपासून बनवलेली (इकोफ्रेंडली) घरे व तसे बरेच रिसॉर्ट उपलब्ध आहेत. तसेच गावाबाजूला विस्तृत, निसर्गरम्य असा 'सानापुर जलाशय'ही आहे. या जलाशयात 'कोऱ्याकल राईड्स'ची मजा घेता येते. बांबूच्या टोपलीची गोलाकार नांव व तिच्यातून जलविहार करणे हेही हम्पी'ची भेट घेणाऱ्या पर्यटकाने सहसा चुकवू नये. कर्नाटकच्या 'कोप्पळ' जिल्ह्यात हा प्रदेश येतो तर तुंगभद्रेच्या पलीकडील काठावर असणारी 'हम्पी मात्र 'होसपेट' (विजयनगर) जिल्ह्यात येते.  

'सानापूर जलाशय', सानापूर, आनेगुंदी, किष्किंधा  (Sanapur Lake, Sanapur, Aanegundi, Kishkindha. Ancient and Medieval History, Karnataka)


'सानापूर जलाशय', सानापूर, आनेगुंदी, किष्किंधा  (Sanapur Lake, Kishkindha)

'सानापूर जलाशय', सानापूर, आनेगुंदी, किष्किंधा  (Sanapur Lake)

'सानापूर जलाशय', सानापूर, आनेगुंदी, किष्किंधा  (Sanapur Lake)

                 तुंगभद्रा नदी या प्रदेशासाठी वरदायिनी ठरली आहे. बारामाही वाहणारी तुंगभद्रा, इथली सुपीक जमीन व पूर्वापार विजयनगरच्या राज्यकर्त्यांनी कालव्यांद्वारे (कॅनल) खेळवलेले सर्वत्र पाणी यामुळे इथला शेतकरी आजही कामात व्यस्त, सधन दिसतो. वर्षातून तीन वेळा भातशेतीची पिके काढतो हे इथल्या शेतकऱ्याच्या कष्टाचं नवल आहे. इथल्या नित्याच्या आहारात इडली आणि तांदुळ प्रामुख्याने दिसतात. जमिनीची सुपीकता, पाण्याची उपलब्धता त्यामुळे प्राचीन काळापासून इथल्या शेतकऱ्यांकडून राज्यकर्त्यांना चांगला शेतसारा मिळत असावा. आणि म्हणून हा भूप्रदेश आपल्या अंकित असावा अशी प्रत्येक राजकर्त्याची पूर्वीपासूनची इच्छा असावी.

भातशेती. आनेगुंदी, किष्किंधा क्षेत्र, जि. कोप्पळ, कर्नाटक. (Aanegundi, Ancient and Medieval History, Karnataka)

भातशेती. आनेगुंदी, किष्किंधा क्षेत्र, जि. कोप्पळ, कर्नाटक. (Aanegundi, Ancient and Medieval History, Karnataka)

                     दुंधुंभि राक्षस आणि वालीचे युद्ध ज्या पहाडावरील गुहेत झाले ती गुहा मात्र 'आनेगुंदी किल्ल्या'चा भाग आहे. त्याला किल्ला म्हणून ओळखण्यापेक्षा, 'वालीची गुहा' म्हणूनच स्थानिक जास्त सांगतात. प्राचीन 'होयसळ' व त्यानंतर 'विजयनगर' साम्राज्याच्या इतिहासात मात्र या किल्ल्याचा उल्लेख सापडतो. हे पौराणिक क्षेत्र असल्यानं हम्पीला 'चील' मारण्याच्या उद्देशाने येणारा पर्यटक इथे येइलच याची खात्री नाही.

                  'आनेगुंदी' किल्ल्याला भेट दिली तेव्हा, किल्ल्याच्या पायथ्यापासून डोंगरावर चढणारी पायवाट पायऱ्यांनी सुरू होते. पाच मिनिटांवर किल्ल्याच्या पहिल्या दरवाजाची छोटी चौकट दिसते. ती ओलांडताच दोन चौकोनी बुरुजांतून उजवे वळण घेऊन नुकत्याच जिर्णोद्धार केलेल्या दुर्गा मातेच्या मंदिरासमोर येता येते. विजयनगर साम्राज्याची प्रत्येक लढाई ही या दुर्गामातेच्या आशीर्वादाने लढली गेली. मंदिरासमोर एक इच्छापूर्ती वृक्ष दिसतो. भाविकांनी श्रद्धेने बांधलेल्या त्यांच्या इच्छाबंधनाच्या गाठोड्यांनी वृक्ष लगडलेला दिसतो. बाजूला मंदिर संस्थान व गोशाळेचे कार्यालय दिसते. गोशाळेत गोमातेची उत्पादने विकली जातात. हे सर्व ओलांडून पायऱ्या १५ मिनिटात किल्ल्याच्या मुख्य दरवाजाजवळ येते. 

'आनेगुंदी' किल्ल्यावर जाणाऱ्या पायऱ्या. आनेगुंदी. 
किल्ल्याचा पहिला दरवाजा. (Aanegundi)



किल्ल्याचे चौकोनी बुरुज. (Aanegundi Fort)
किल्ल्याच्या पायथ्याचे दुर्गामाता मंदिर. (Aanegundi Fort, Aanegundi, Ancient and Medieval History, Karnataka)

                      किल्ल्याचा दरवाजा दोन बुरुजातील आडव्या भिंतीत आहे. पूर्वीच्या वाड्यांना दगडी चौकट असावी असा तो दिसतो. लक्ष देऊन पाहिल्यास चौकटीवर भव्य 'मत्स्य' आणि 'नागा'ची प्रतिमा कोरली आहे. दरवाजावर सज्जा असून बुरुजांवर 'चर्या' दिसतात. हा मुख्य दरवाजा अंदाजे १५ फूट आत लांब आहे. आत दोन्ही बाजूला कातळ खांबांनी आधार दिलेल्या प्रशस्त 'देवड्या' आहेत. 

आनेगुंदी किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार, किल्ले आनेगुंदी, कर्नाटक. (Aanegundi Fort, Ancient and Medieval History, Karnataka)
प्रवेशद्वाराच्या 'देवड्या'. किल्ले आनेगुंदी. (Aanegundi Fort)

                    पुढे किल्ल्याच्या सपाटीवर उजव्या हाताकडून चार फूट उंच एक दगडी भिंत किल्ल्याकडे गेलेली दिसते. तिला तटबंदी म्हणता येणार नाही. त्याच्यापुढे किल्ल्याची एकमेव जलव्यवस्था असलेली जमिनीत घडीव दगडांची टाकी दिसते. आत उतरण्यासाठी तिला पायऱ्या आहेत. येणाऱ्या भाविकांनी आत कचरा टाकू नये म्हणून टाकीभोवती जाळीचे कुंपण उभारले आहे. 

किल्ल्यावरील पाण्याची टाकी. किल्ले आनेगुंदी, कर्नाटक.

 

नऊ ग्रहांच्या मुर्त्या. किल्ले आनेगुंदी, कर्नाटक. 

                      


                  

                        डाव्या बाजूला एकत्र नऊ ग्रहांच्या मुर्त्या देवतेंच्या रूपात स्थानापन्न केल्या आहेत. प्रत्येक मूर्ती वेगवेगळी, प्रत्येकी दोन फूट उंच, त्या त्या ग्रहाचा गुणधर्म आणि स्वभाव दर्शवणारी दिसते. सर्वच मुर्त्या सुबक आणि जाळीबंद आहेत. इथे ग्रहांची शांती केली जाते. बाजूला बारा ज्योतिर्लिंगांचे मंदिरही आहे. किल्ल्याची सपाटी खुरटी झुडपं आणि झाडांनी व्यापलेली दिसते. उरलेल्या मोकळ्या जागेत गोशाळेच्या गाई बांधलेल्या दिसतात. 

किल्ल्यावरील 'गोशाळा'. किल्ले आनेगुंदी, कर्नाटक. (Aanegundi Fort, Ancient and Medieval History, Karnataka)

                     किल्ल्याच्या सपाटी समोर मोठमोठ्या आकारांचे गोल दगड एकमेकांवर स्थिरावलेला डोंगर दिसतो. त्याच्या डावीकडे दगडांच्या फटीमध्ये खाली 'वालीची गुहा' असा बोर्ड दिसतो. गुहेचे तोंड अरुंद असून आत जाणारी वाट दिसते. डोक्यावरच्या अजश्र दगडांच्या फटीतून आत येणारा अंधुक उजेड दिसतो. पुढे काळोख आहे. दगड जसे स्थिरावले आहेत त्याप्रमाणे गुहेतील वाट कुठे चिंचोळी तर कुठे ठेंगणी आहे. सरासरी २०० मीटर लांब अर्धवर्तुळाकाराची गुहा दिसते. थोडक्यात गुहेत शिरण्यापूर्वी उजव्या बाजूचा जो प्रचंड गोल दगड दिसतो त्याला गुहेतून वळसा मारून पलीकडे बाहेर येता येतं. 

'वाली' गुहेतून बाहेर येणार मार्ग. किल्ले आनेगुंदी, कर्नाटक. (Aanegundi Fort, Ancient and Medieval History, Karnataka)

'वाली' गुहेत जाणारा मार्ग. किल्ले आनेगुंदी, कर्नाटक. (Aanegundi Fort, Ancient and Medieval History, Karnataka)
'वाली' गुहा. किल्ले आनेगुंदी.

'वाली' गुहा. किल्ले आनेगुंदी, 

                 सुग्रीवाने जेव्हा गुहेचे तोंड बंद करून परत आला, त्यानंतर त्याच्या पलीकडील बाजूने वाली बाहेर आला. भाविक सुद्धा त्याच प्रकारे एका बाजूने आत जाऊन दुसऱ्या बाजूने बाहेर येतात. 

                कुतूहल आणि उत्सुकतेपोटी मी दोन वेळा या गुहेत जाऊन वाली आणि दुंधुंभी यांचे अंधारात, अन्नपाण्यावाचून सतत सहा महिने चाललेल्या युद्धाची क्षणभर कल्पना केली. तात्कालीन ग्रंथकर्त्यांनी पौराणिक पात्रांना अचाट दाखवण्यासाठी केलेल्या चुका अनेक शतके पुढे कशा चालत आल्या हे लक्षात येतं.

               या व्यतिरिक्त किल्ल्यावर विशेष असे दुसरे अवशेष दिसत नाहीत. 

                     इथले आसपासचे सगळे डोंगर कुरुंदाच्या दगडांचे काहीसे विस्कळीत वाटतात. सह्याद्रीतील एकसंघ काळे कातळ आणि दऱ्या पठारांची भटकंती करणाऱ्यांच्या इथले पहाड सहजा सहजी पचनी पडत नाहीत. लहान मोठे तर काही प्रचंड गोल गुळगुळीत पिवळसर दगडांची रास म्हणजे इथले पर्वत पहाड. आपल्या सह्याद्री पुढे थिटेच वाटतात. इथले डोंगरी गडकिल्लेही शत्रूची परीक्षा घेणारे, सह्याद्रीच्या तुलनेने अवघड आणि भक्कम वाटले नाहीत.  


विस्कळीत दगडांचे डोंगर. किल्ले आनेगुंदी, कर्नाटक. (Aanegundi Fort, Ancient and Medieval History, Karnataka)

 


आनेगुंदी गांव. तुंगभद्रा काठावरील राम गुहा आणि मंदिर समूहाकडे जाणारा मार्ग. (Aanegundi Fort, Ancient and Medieval History, Karnataka)

                       इ. स. १३१० मध्ये दिल्ली सुलतान 'मोहम्मद तुघलकने' दक्षिणेत आणलेली प्रचंड फौज आणि त्याचे सामर्थ्य पाहून 'होयसळ' घराण्याचा तिसरा राजा 'बल्लाळ' ह्याने 'आनेगुंदी' किल्ला सोडून निवडक पाच हजार माणसांबरोबर 'कुमटा' (किनमटा) किल्ल्याचा आश्रय घेतला. सुलतानाने 'कुमटा' किल्ल्याला चहूबाजूंनी कसून वेढा दिला. किल्ल्याच्या आतील लोकांची संख्या बरीच असल्याने त्यांची रसद लवकरच संपली. 

                       किल्ल्यातील लोकांचा नाश केल्याशिवाय वेढा उठवायचा नाही हा दिल्ली सुलतानाचा निश्चय पाहून राजाने सर्व लोकांसमोर भाषण दिले. त्याने दिल्ली सुलतानाने आपल्या राज्यात केलेल्या विध्वंसाचे वर्णन केले. शिवाय किल्ल्यातील पाण्याचा आणि अन्नधान्याचा साठाही संपला होता. अशा स्थितीत मरणाखेरीज दुसरा पर्याय नाही हे त्याने आपल्या सैनिकांना सांगितले. आनेगुंदी शहरातील ५० हजारांपैकी पाच हजारांना त्याने निवडले होते.  याचे कारण ते खरे जिव्हाळ्याचे मित्र होते. तेव्हा आतापर्यंत जिवंतपणी जी स्वामिनिष्ठा दाखवली तीच आता ह्या निकराच्या प्रसंगात दाखवा, अशी कळकळीची विनंती राजाने आपल्या सैनिकांना केली. आपले राज्य आणि सत्ता, यापैकी हा कुमटा किल्ला आणि त्यातील सैनिक एवढेच काय ते बाकी उरले असल्याने दिल्ली सुलतानाशी अटीतटीने लढायचे ठरविले. तेव्हा सर्व भूमी हिरावून घेणाऱ्या शत्रूचा सामना करण्यासाठी शस्त्रास्त्रांनी सिद्ध, प्राणार्पणाची तयारी ठेवण्याचे आवाहन राजा बल्लाळने सैनिकांना केले. 

                       हे ऐकून सर्वांना समाधान वाटले आणि त्यांनी शस्त्रे उचलली. राजाने पुन्हा भाषण केले की आपण या युद्धात उडी घेण्यापूर्वी आपल्या बायका मुलांशी आपली लढाई आहे. कारण ते शत्रूच्या हाती पडून शत्रूने त्यांचा वापर करावा हे उचित नव्हे. त्याने स्वतःच त्याच्या बायका व मुलांना प्रथम संपवायचे ठरवले. त्यावेळी ते सर्वजण 'कुमटा' किल्ल्यापुढे असलेल्या मोकळ्या चौकात उभे होते. तिथेच राजाने स्वतःच्या आपल्या ५० च्या वर बायकांना तसेच मुला-मुलींना आपल्या हाताने ठार केले. इतरांनीही आपल्या बायका आणि लहान मुलांना त्याचप्रमाणे बळी दिले. आणि 'कुमटा' किल्ल्याचे दरवाजे उघडले. दरवाजे उघडताच दिल्ली सुलतानाचे सैन्य ताबडतोब आत घुसले आणि त्यांनी सर्वांचे शिरकांड केले. 

                   त्यातून सहा वृद्ध माणसे वाचली. त्यापैकी एक राजाचा मंत्री, दुसरा खजिनदार आणि इतर उरलेले राज्याचे प्रमुख अधिकारी होते. दिल्ली सुलतानाने राजाच्या खजिन्याबद्दल त्यांच्याकडे विचारणा केली आणि मग 'कुमटा' किल्ल्याच्या तळघराला कुदळ फावडी लावली गेली. पुरून ठेवलेला सर्व खजिना सुलतानाच्या हवाली करण्यात आला. राज्याबद्दल सर्व माहिती काढून घेतल्यानंतर सुलतानाने एका अधिकाऱ्याला किल्ल्यातील प्रेते ताब्यात देऊन ती जाळण्याचा हुकूम दिला. त्या सहा जणांच्या विनंतीवरून राजा 'बल्लाळा'चे शव मात्र सन्मानपूर्वक 'आनेगुंदी' शहरात नेण्याची परवानगी सुलतानाने दिली. त्या दिवसापासून पुढे स्थापन झालेल्या विजयनगर राजघराण्याची स्मशानभूमी म्हणून 'आनेगुंदी'चा वापर होऊ लागला. तिकडील लोक आजही त्या राजाची 'पुण्यात्मा' म्हणून पूजा करताना दिसतात.

'हंपी ते आनेगुंदी' विजयनगर कालीन तुंगभद्रा नदीवरील पूल


आनेगुंदीतील विजयनगरकालीन चेकपोस्ट. (प्रवेशदार)

                   'होळसर' राजाच्या मृत्यूनंतर सुलतान दोन वर्षे 'कुमटा' किल्ल्यात राहिला. पुढे उत्तरेत आधी जिंकलेल्या प्रदेशात बंडाळी माजल्याने त्याला घाई घाईने उत्तरेत जाणे भाग पडले. त्याने 'मलिकनईब' नावाच्या एका मुसलमान सेना अधिकाऱ्याकडे राज्याचा ताबा दिला. बरोबर आलेल्या त्यातील प्रत्येकाला उदारपणाने इनामे दिली. त्यामुळे ते सर्वजण उत्तरेत न जाता तिथेच स्थायिक झाले.


विजयनगरचा महान राजा 'राजा कृष्णदेवराया', आनेगुंदी. (Aanegundi Fort, Ancient and Medieval History, Karnataka)

हंपी ते आनेगुंदी येणाऱ्या पुलावरून आनेगुंदी गावातील (नदीकाठावरील) चेकपोस्ट. 
                     पुढे इ.स. १३४५ ला नामधारी राजा असलेला 'चौथा बल्लाळ' मरण पावल्यावर चार शतके दक्षिणेचा राज्यशकट सांभाळणारे 'होयसळ' साम्राज्य संपुष्टात आले. 
                     इ.स. १३४६ मध्ये 'संगमा' घराण्याचा 'हरिहर' हा पहिला स्वतंत्र राजा झाला. त्याने तुंगभद्रेच्या पलीकडे दक्षिण काठावर नवीन राजमहालाचे काम सुरू केले. शहराभोवती तट बांधण्याचे कामही हाती घेतले. हे होताच 'आनेगुंदी' सोडून तो विजयनगरास ('हम्पी'त) रहावयास गेला आणि विजयनगर साम्राज्याची 'राजधानी' म्हणून 'हम्पी'ची मुहूर्तमेढ रोवली गेली..

                                      || श्री कृष्णार्पणमस्तू ||

                   संदर्भ :- विजयनगर साम्राज्यातील किल्ले - श्री आप्पा परब

                                     :- 'रावण' - राजा राक्षसांचा - श्री शरद तांदळे

येथे - जयवंत जाधव 

13 comments:

  1. खूप छान वर्णन केले, खूप खूप धन्यवाद मित्रा!

    ReplyDelete
  2. It is a very beautiful place because of the nature and it feels so good to live there I think we should go there and have fun and reduce all the stress 👍❤️👌

    ReplyDelete
  3. खूप छान लिहिले आहे थँक्स इतकी छान माहिती दिल्या बद्दल 🙏👌👍

    ReplyDelete
  4. मित्र जयवंत, हम्पी भटकंतीचा तुझा लेख वाचला आणि मला असा अनुभव आला की मीच भटकंती करून आलो आहे. तिथल्या पौराणिक आणि ऐतिहासिक संदर्भ देऊन एक प्रकारे उजळनीच करून दिली आहेस. वैविध्यपूर्ण तसेच सविस्तर माहिती देऊन या ठिकाणाचे महत्व उद्धृत केले आहे.

    ReplyDelete
  5. Beautiful information

    ReplyDelete
  6. खूप छान माहीती , सुंदर वर्णन............. 👌👍

    ReplyDelete
  7. मस्त माहितीपूर्ण लेख लिहिला आहेस. तिथे कसं जायचं हे या लेखात कळालं नाही ते . नेहमीपेक्षा वेगळे ठिकाण आणि इतिहास छान सविस्तर मांडले आहे. 💐

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद महेश. आवश्यक तिथे बदल केले आहेत. Thanks for your suggestions and positive feedback please.

      Delete
  8. स्नेहल श्रीरंग कुलकर्णी
    नेहमीप्रमाणे छान सविस्तर माहिती . धन्यवाद .

    ReplyDelete
  9. खूप छान माहिती दिली दादा . इतिहासाचे इतके सुंदर वर्णन केले आहे कि वाचतच राहावे असे वाटते ..रामायणाचे काही किस्से तुम्ही सांगितले ते सुद्धा अवर्णीय आहे...पुढील वाटचालीस तुम्हाला खूप खूप शभेच्छा दादा.. - सौ. वर्षा संदीप कासार.

    ReplyDelete
  10. आपण केलेले इतिहासाचे वर्णन आम्हाला हंप्पी या ठिकाणी स्वतः जाऊन आलो असा अनुभव आला.
    रामायण मधील कथा तेथील आताचे जीवन या विषयी खूप छान माहिती मिळाली
    धनवाद 🙏🚩
    अभिषेक नाईक

    ReplyDelete
  11. Very very nice super

    ReplyDelete
  12. आपण दमत नाही, वारंवार नविन प्रवास करुन त्याची इत्यंभूत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवता. खुप मोठं असं काम करता. तुम्हाला अनेक शुभेच्छा...
    वरील स्थळांची फोटोसह संपूर्ण ऐतिहासिक व रामायण कालीन महिती वाचली. आजचं व पुर्वीचं राहणीमान कळलं. किल्ले, मंदिर, नद्या, घरे यांची सचित्र माहिती मिळाली.
    तुमच्या या व पुढिल अनेक योजनांना खुप खुप शुभेच्छा...

    देवदत्त शेडगे

    ReplyDelete

'हम्पी' - विजयनगर साम्राज्याची राजधानी. - 'Hampi' - Medieval history of Vijaynagar dynasty.

                       सतराव्या शतकाच्या मध्यावर पश्चिम महाराष्ट्रात शिवछत्रपतींचं 'स्वराज्य' आकार घेत होतं आणि त्या दरम्यानच कर्नाट...