दक्षिणोत्तर पसरलेल्या सह्याद्रीची एक पश्चिम डोंगररांग 'रोह्या'कडे आली आहे. 'रोह्या'च्या उत्तरेकडून जाणाऱ्या या डोंगर रांगेवर अंदाजे एक हजार फूट उंचीवर गर्द जंगलात 'किल्ले अवचित'गड वसला आहे. निवांत केली तर तास दोन तासात गडमाथ्याची भटकंती पूर्ण होते. गडावर सध्या अस्तित्वात असलेल्या वास्तू उध्वस्त असल्या तरी, गडावरील त्यांचे उरलेले अस्तित्व आणि गडाची एकूण भौगोलिक ठेवण रम्य अशी आहे. कुंडलिका नदीच्या उगमाकडील 'सूरगडा'पासून ते समुद्र खाडी मुखाकडील 'बिरवाडी' किल्ल्यापर्यंत आणि उत्तरेला 'अंबा' नदीच्या पलीकडील 'सरसगड' ते दक्षिणेला 'घोसाळगडा'पर्यंतच्या विस्तृत प्रदेशावर गडावरून नजर ठेवता येते.
 |
'महादरवाजा', किल्ले अवचितगड, रोहा, जि. रायगड, महाराष्ट्र. (Avchitgad Fort, Raigad, Maharashtra) |
जंजिऱ्याचा सिद्धी आणि चौल, रेवदंड्याचे पोर्तुगीज यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून तसेच त्यांच्या उपद्रवांपासून स्थानिक रयतेचे रक्षण करण्यासाठी शिवछत्रपतींना अवचितगडाचे भौगोलिक स्थान महत्त्वाचे वाटले. त्यामुळे त्यांनी १६५८ मध्ये किल्ला ताब्यात येताच ताबडतोड 'शेख महंमद' या वास्तुविशारदाकडून अवचितगडाची नव्याने उभारणी करून घेतली. मात्र गडाच्या महादरवाज्याच्या आत डाव्या बाजूस दोन घोड्यांसारख्या एकत्रित धडाचे आणि पंख असलेल्या 'शरभा'चे प्राचीन शिल्प आहे.
 |
'शरभ शिल्प', महादरवाजा, अवचितगड. (Avchitgad Fort) |
इतिहास अभ्यासकांच्या मते 'शिलाहार' काळापासून या गडावर राबता असावा. प्राचीन 'चौल' बंदरातून चालणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी अवचितगडाची निर्मिती झाली असावी. पण अवचितगडाचा सतराव्या शतकाच्या पूर्वार्धापासून म्हणजे १६३६ पर्यंत या भागात अहमदनगरच्या निजामाचे 'सुभ्याचे' ठिकाण असल्याचा उल्लेख मिळतो. पुढे मुघल बादशाह शहाजहानने निजामाची सत्ता उलथवून, त्याच्याकडून मोठी खंडणी घेऊन हा प्रदेश विजापूरच्या आदिलशहाकडे सोपवला. शिवछत्रपतींनी घेतलेल्या कोकणातील इतर किल्ल्यांसोबत अवचितगड मग स्वराज्यात सामील झाला.
पुण्याच्या पानशेत खडकवासला या मावळ भागाची 'देशमुखी' असलेल्या 'बाजी पासलकर' या नरवीराने अवचितगडाच्या मोहिमेत सिंहाचा वाटा उचलला. रयतेपोटी असलेली त्यांची कणव, परोपकारी वृत्ती आणि पराक्रम यामुळे पुढील काळात गडासोबत या परिसराची देखरेख त्यांच्याकडेच राहिली. या दुर्गम गडमाथ्यावर उत्तर बुरुजाकडे जाताना डाव्या हाताला चार बुरुजांनी भक्कम केलेल्या वास्तूचे अवशेष दिसतात. ते दुर्ग भटक्यांना बाजी पासलकरांची आठवण सांगतात. त्यांचे वंशज गडाखालील पिंगळसई, धाटाव, शेनवई या गावात आजही आहेत.
पुढे पेशवे काळात गडाची देखभाल, महसूल, दफ्तरी कामकाज यासाठी प्रभू, पटवर्धन यांची नेमणूक झाली. त्यांच्या काळात गडाच्या दक्षिण बुरुजाचे काम केल्याचा 'श्री गणेशाय नमः श्री बापदेव शके १७१८ नळनाम संवत्सरे चैत्रशुद्ध १ प्रतिपदा' अशा उल्लेखाचा दक्षिण बुरुजातून निखळलेला एक शिलालेख गडावर आहे. सध्या तो गडावरील शिव महादेवाच्या मंदिरात जतन करून ठेवलेला दिसतो. त्यानुसार इ.स. १७९६ च्या 'चैत्र शुद्ध १ प्रतिपदा' म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी हा बुरुज वापरात आला असे शिलालेखावरून समजते. त्यांचे वंशजही पायथ्याच्या 'मेढा' गावात असल्याची माहिती मिळते. पुढे १८१८ नंतर अवचितगड इंग्रजांच्या अधिपत्याखाली आला. त्यांनी हा प्रदेश विभागून कुलाबकर आंग्रे आणि भोर संस्थानाचे पंतसचिव यांच्याकडे सोपविला.
पारतंत्र्याच्या काळात अवचितगड विस्मृतीत गेला. विसाव्या शतकाच्या मध्यानंतर दुर्गप्रेमींची पावले या गडाकडे पुन्हा वळू लागली. आज रायगड जिल्ह्यातील 'रोहा' हे तालुक्याचे ठिकाण, औद्योगिक शहर म्हणून उदयास येत आहे. तसेच ते मध्य रेल्वेने मुंबईशीही जोडले आहे. पण किल्ल्याचा इतिहास आणि गडावरील वास्तूंमुळे रोह्यापासून उत्तरेला असलेल्या अवघ्या ५ किमीवरील 'अवचित' गडामुळे आज दुर्गभटके 'रोह्या'ची नव्याने ओळख सांगतात.
मध्य रेल्वेने यायचे झाल्यास रोह्याच्या आधी 'निडी' (लोकल पसेंजर) रेल्वे स्टेशनवर उतरून 'मेढ्या'ला येता येते. एक्सप्रेस रेल्वेने 'रोह्या'ला उतरल्यास 'पिंगळसई' गावातून अवचित गडावर येता येते. रोह्यातून पिंगळसई आणि मेढ्याला येण्यास रिक्षांची ये-जा चालू असते. पिंगळसई गावातून दोन अडीच तासाची मध्यम श्रेणीची एक वाट अवचित गडावर येते. तर 'मेढे' गावातून तास-दीड तासाची पण थोडी दुर्गम गर्द झाडीतून दुसरी पाऊलवाटही या गडावर येते. 'पडम' गावातूनही दोन तासाची तिसरी पाऊलवाट गडावर येते.
खाजगी वाहनाने मुंबई गोवा हायवेला 'नागोठण्यात' उजवा वळसा मारून पुढे रोह्याकडे येता येते. रोह्याच्या आधी पाच किमी अंतरावर डावीकडे वळणाऱ्या रस्त्यावर 'मेढा ग्रुप ग्रामपंचायत' गावाची कमान दिसते. कमानीतून डावा वळसा मारल्यास पुढे मध्य रेल्वेची 'पठरी' ओलांडून रस्ता गडपायथ्याच्या 'मेढा' गावातील विठ्ठल मंदिराजवळ येतो. मंदिराजवळ पार्किंगसाठी जागा आहे. या जागेवर गावातील शाळकरी मुलं क्रिकेट खेळताना दिसतात.
विठ्ठल मंदिराजवळ विचारून गावाच्या दक्षिणेला दिसणाऱ्या डोंगराकडे जाणारी वाट धरावी. गावाच्या या बाजूस दोन जुन्या विहिरी (बारव) आहेत. विहिरींच्या उजव्या बाजूने झाडीतून चढणारी वाट गडावर जाते. गर्द झाडीतून पाऊलवाट पंधरा-वीस मिनिटात एक ओढा ओलांडून पुढे येते. त्यापुढे मात्र नागमोडी वळणाची, उभ्या चढाची दगडधोंड्यातून पाऊलवाट दमछाक करते. पुढील वीस मिनिटात दुर्गम वळणे घेत वाट चढून आलेल्या डोंगराच्या सोंडेवरील लहानशा मोकळ्या सपाटीवर येते. इथून दरीपलीकडे दक्षिणेला दिसणाऱ्या उंच डोंगरावर किल्ले अवचितगडाची उत्तर तटबंदी आणि बुरुजावरील झेंडा दिसतो.
 |
'मेढा' गावाबाहेरील किल्ल्याच्या वाटेवर दिसणाऱ्या दोन विहिरी. किल्ले अवचितगड, रायगड, महाराष्ट्र. (Avchitgad Fort, Maharashtra) |
 |
किल्ल्याच्या गर्द पायवाटेवरील 'ओढा', किल्ले अवचितगड, रायगड, महाराष्ट्र. (Avchitgad Fort, Raigad, Maharashtra) |
 |
डोंगरसोंडेच्या टप्प्यावरून किल्ले अवचितगडाचा दिसणारा 'उत्तर बुरुज', किल्ले अवचितगड, (Avchitgad Fort, Raigad, Maharashtra) |
 |
'पायवाट', किल्ले अवचितगड, (Avchitgad Fort)
|
चढून आलेली डोंगरसोंड आणि किल्ले अवचितगडाचा डोंगर पुढे दहा मिनिटात एकत्र जुळतात. या ठिकाणी दगडांच्या गोलाकार रिंगणात जुन्या 'वीरगळी' मांडून ठेवल्या आहेत. पुढे पायवाट तीव्र चढाने उजवे वळण घेत अर्ध्या तासात गडावर घेऊन जाते.
 |
पायवाटेवरील वीरगळी, स्मृतिशिळा, किल्ले अवचितगड, रायगड, महाराष्ट्र. (Avchitgad Fort, Raigad, Maharashtra)
|
किल्ल्याच्या सुरुवातीला घडीव पायऱ्यांची वाट आहे. सध्या पायऱ्या उध्वस्त दिसतात. पायऱ्या चढून वर आल्यास समोर डावीकडे बुरुज दिसतो आणि उजवीकडे दरी. इथे लक्षात येणार नाही व शत्रूचा थेट मारा चुकविण्यासाठी दोन्ही बुरुजांच्या मध्ये डावीकडे वळणारी वाट किल्ल्याच्या मुख्य पूर्व 'गोमुखी' महादरवाज्यात येते.
 |
किल्ल्याच्या उध्वस्त पायऱ्या, किल्ले अवचितगड, रायगड, महाराष्ट्र. (Avchitgad Fort, Raigad, Maharashtra) |
 |
बुरुजांच्या आडाला महादरवाजात जाणारी पायवाट. किल्ले अवचितगड, रायगड, महाराष्ट्र. (Avchitgad Fort, Raigad, Maharashtra) |
पूर्वेकडील या उत्तरमुखी महादरवाजासमोर थोडी मोकळी जागा असून ती तटबंदीने संरक्षित केली आहे. महादरवाजाच्या कमानीची चौकट सुस्थितीत असून ती रेखीव सुंदर आहे. कमानीच्या डावी उजवीकडे किल्ल्याचे दरवाजे बंद केल्यानंतर 'अडसरा'च्या खोबण्या दिसतात. दरवाज्याच्या डावीकडे आतील बाजूस घोड्यांसारख्या दिसणाऱ्या दोन प्राण्यांचे धड एकत्र असून त्यांना पंख असलेले प्राचीन 'शरभ' शिल्प तटबंदीत बसविले आहे. इतर गडकिल्ल्यांवर आढळणाऱ्या 'शरभ' शिल्पांपेक्षा हे वेगळे वाटते.
 |
महादरवाजासमोरील मोकळी पण बंदिस्त जागा. किल्ले अवचितगड, महाराष्ट्र. (Avchitgad Fort, Raigad, Maharashtra) |
 |
'महादरवाजा', किल्ले अवचितगड, रोहा, जि. रायगड, महाराष्ट्र. (Avchitgad Fort, Raigad, Maharashtra)
|
 |
सदरेसमोरील तोफ, मागे सदरेचा चौथरा. किल्ले अवचितगड. (Avchitgad Fort) |
पुढे सात आठ पायऱ्या चढून मोकळ्या प्रशस्त जागेत आल्यास उजवीकडे छाती इतक्या उंच चौथर्यावर गडाची 'सदर' दिसते. या सदरेवर गडावरील महत्त्वाचे निर्णय व न्यायनिवाडा केला जात असे. सदरेसमोर सुंदर कलाकृतीच्या लाकडी गाड्यावर पूर्वेकडे तोंड करून ठेवलेली तोफ पाहायला मिळते. या तोफेत अडकलेला तोफगोळाही दिसतो.
 |
सदरेसमोरील तोफ, मागे सदरेचा चौथरा. किल्ले अवचितगड, रायगड, महाराष्ट्र. (Avchitgad Fort, Raigad, Maharashtra) |
'सदर' ओलांडून पुढे आल्यास समोर किल्ल्याच्या दक्षिणेला पूर्व पश्चिम पसरलेल्या तटबंदीत उंचावर बालेकिल्ल्याचा पडझड झालेला दरवाजा दिसतो. याच तटबंदीत उजव्या बाजूला पश्चिम उतारावर दुसरा दरवाजाही दिसतो या दरवाज्याची कमान मात्र सुस्थितीत आहे. याला 'दिंडी दरवाजा' असे आतील बाजूस लिहिले आहे. 'दिंडी दरवाजा' समोर किल्ल्याच्या या पश्चिम उतारावर दगडांवर एक तोफ ठेवली आहे. तसेच पश्चिमेच्या दरीकाठावर जमिनीवरील कातळात खोदलेली एक पाण्याची टाकीही दिसते.
 |
बालेकिल्ल्याचा उध्वस्त दरवाजा व त्यावरील तोफ. किल्ले अवचितगड, रायगड, महाराष्ट्र. (Avchitgad Fort, Raigad, Maharashtra) |
 |
'दिंडी' दरवाजा समोरील तोफ. किल्ले अवचितगड, रायगड, महाराष्ट्र. (Avchitgad Fort, Raigad, Maharashtra)
|
 |
किल्ल्याच्या पश्चिमेकडील 'कातळटाकी', समोर 'उत्तर बुरुज'. किल्ले अवचितगड, रायगड, महाराष्ट्र. (Avchitgad Fort, Raigad, Maharashtra) |
किल्ल्याच्या या पश्चिम दरीकाठावरून कुंडलिका नदी, त्यापलीकडे कुंभोशी, चणेरे आणि बिरवाडी किल्ल्यापर्यंतचा प्रदेश नजरेच्या टप्प्यात येतो. इथून डावीकडे बालेकिल्ल्याच्या 'दिंडी' दरवाजाने आत आल्यास उजवीकडे बालेकिल्ल्याची तटबंदी व तटबंदीलगत एक पाण्याची कातळटाकी दिसते.
 |
बालेकिल्ल्याचा आतून दिसणारा पश्चिमेकडील 'दिंडी दरवाजा'. किल्ले अवचितगड, रायगड, महाराष्ट्र. (Avchitgad Fort, Raigad, Maharashtra) |
 |
वीर बाजी पासलकरांचा 'शिल्पस्तंभ' (किल्ले अवचितगड) |
त्यापुढे जमिनीवरील कातळात एकत्र खोदलेले सहा पाण्याचे हौद दिसतात. एकत्र असले तरी प्रत्येक हौदामध्ये अंदाजे फूट दोन फूट जाडीची कातळ भिंत आहे. एखाद्या हौदाला जमिनीखाली नैसर्गिक गळती असल्यास किमान बाजूच्या टाकीतील पाणी टिकून राहील हा या हौदांमध्ये ठेवलेल्या कातळ भिंतींचा उद्देश दिसतो.
सर्व कातळ टाक्यांभोवती गर्द झाडी दिसते. हौदाच्या मागे चौकोनी दगडावर काळया पाषाणातील कोरीव मूर्ती दिसते. ती बहुदा खंडोबाची मूर्ती असावी. हौदाच्या दुसऱ्या कातळ भिंतीवर 'माता पिंगळाई' देवीची घुमटी दिसते पण आत मूर्ती दिसत नाही. तिला 'सतीची घुमटी' म्हणूनही ओळखले जाते. बाजूला हातात ढाल तलवार घेतलेला वीर 'बाजी पासलकरां'चा शिल्पस्तंभ दिसतो.
 |
बालेकिल्ल्यातील कातळ टाकीचा समूह. किल्ले अवचितगड, रायगड, महाराष्ट्र. (Avchitgad Fort, Raigad, Maharashtra)
|
 |
'माता पिंगळाई' देवीची घुमटी (सतीची घुमटी). किल्ले अवचितगड, रायगड, महाराष्ट्र. (Avchitgad Fort, Raigad, Maharashtra) |
 |
बालेकिल्ल्यावर दिसणारे 'शिव महादेव मंदिर'. किल्ले अवचितगड, रायगड, महाराष्ट्र. (Avchitgad Fort, Raigad, Maharashtra) |
या सर्व हौदांच्या मागे बालेकिल्ल्याच्या उंच टेकडीवरील छोट्या शिव महादेवाच्या मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्या दिसतात. या हौदांच्या पुढे बालेकिल्ल्याच्या बाहेर जाण्यासाठी पश्चिम बुरुजात दरवाजाची कोरीव कमान दिसते. या दरवाज्यातून किल्ल्याच्या पश्चिम बाजूकडून दक्षिणेकडे, बालेकिल्ल्याच्या बाहेर पडण्यासाठी पाऊलवाट जाते.
 |
बालेकिल्ल्याच्या पश्चिमेकडून दक्षिण बुरुजाकडे येणारी पायवाट. किल्ले अवचितगड, रायगड, महाराष्ट्र. (Avchitgad Fort, Raigad, Maharashtra) |
या पाऊलवाटेवर पुढे गडाच्या दक्षिण सोंडेवर एक ढासळलेला बुरुज दिसतो. इथे पूर्वी किल्ल्याबाहेर पडण्यासाठी या बुरुजाला धरून बांधलेला दरवाजा असावा. या बुरुजाजवळून एक पायवाट डावीकडे किल्ल्याच्या पूर्व पश्चिम अशा किल्ल्याच्या तिसऱ्या तटबंदीवर जाते. इथून वर आल्यास बालेकिल्ल्याच्या दक्षिणेला उंचावर झेंडा बुरुज दिसतो. बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या दिसतात. बुरुजाची पडझड झाली आहे. याच बुरुजातून निखळलेला पेशवेकालीन शिलालेख सध्या मंदिरात ठेवला आहे.
वातावरणातील दृश्यमानता चांगली असल्यास या बुरुजावरून पिंगळसई, कळसगिरी, कुंडलिका नदी, रोहा शहर, घोसाळगड पर्यंतचा प्रदेश नजरेच्या टप्प्यात येतो. या बुरुजावरून समुद्राच्या खाडी मुखाकडील कुंडलिका नदीपात्रातून समुद्रमार्गे चालणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गावर लक्ष ठेवता येत असे.
 |
किल्ल्याच्या दक्षिणेकडील 'तिसऱ्या तटबंदीतील दरवाजा'. किल्ले अवचितगड, रायगड, महाराष्ट्र. (Avchitgad Fort, Raigad, Maharashtra) |
 |
किल्ल्याचा 'दक्षिण बुरुज' व त्यासमोरील 'तोफ'. किल्ले अवचितगड, रायगड, महाराष्ट्र. (Avchitgad Fort, Raigad, Maharashtra) |
 |
'दक्षिण बुरुज'. किल्ले अवचितगड, (Avchitgad Fort) |
पुढे गडाबाहेर दक्षिणेच्या उतार बाजूस समोर दुसरी टेकडी असून तिथून किल्ल्यास धोका पोहोचू नये म्हणून मधे खोल 'खंदक' खोदला आहे. नजीकच्या काळात या खंदकावर स्थानिक रहिवाशांनी मेहनतीने लाकडी मजबूत पूल बांधलेला दिसतो. या पुलावरून पिंगळसई, पडम गावातून पायवाट किल्ल्यावर येते.
 |
दाट धुक्यातील किल्ल्याबाहेरील दक्षिण बाजू. किल्ले अवचितगड, रायगड, महाराष्ट्र. (Avchitgad Fort, Raigad, Maharashtra) |
 |
दाट धुक्यातील किल्ल्याबाहेरील दक्षिण बाजू. किल्ले अवचितगड, रायगड, महाराष्ट्र. (Avchitgad Fort, Raigad, Maharashtra) |
पुन्हा पाऊलवाटेने मागे महादरवाजा जवळील सदरेसमोर आल्यास बालेकिल्ल्याच्या उध्वस्त दरवाजातून बालेकिल्ल्यावर जाता येते. बालेकिल्ल्यावर उजव्या बाजूस घडीव दगडांचे सुंदर १२ कोनाड्यांचे भव्य तळे दिसते. १२ कोनाडे असल्याने या भव्य तळ्यास 'द्वादशकोनी' तळे म्हटले जाते. तळ्यात पश्चिमेकडून उतरण्यासाठी घडीव पायऱ्यांचा मार्ग आहे. सध्या तळ्यात थोडेफार पाणी आणि गाळ दिसतो.
 |
बालेकिल्ल्यावरील दाट धुक्यातून दिसणारे '१२ कोनांचे तळे'. किल्ले अवचितगड, रायगड, महाराष्ट्र. (Avchitgad Fort, Raigad, Maharashtra) |
 |
तळ्यात उतरणाऱ्या घडीव पायऱ्या. किल्ले अवचितगड, रायगड, महाराष्ट्र. (Avchitgad Fort, Raigad, Maharashtra) |
तळ्याच्या पुढेच बालेकिल्ल्यावरील शिव महादेवाचे छोटे मंदिर दिसते. छोटेखानी मंदिरासमोर काळया पाषाणातील नंदी, मंदिराच्या डाव्या उजव्या बाजूला श्री गणेश, श्रीविष्णू आणि मागे माता पार्वती देवीची मूर्ती दिसते. मंदिराच्या सखल गाभाऱ्यात सुबक घडणीची प्राचीन पिंडी आहे. तर शिवपिंडीच्या शेजारी वर उल्लेख केल्याप्रमाणे दक्षिण बुरुजाचे काम केल्याचा पेशवेकालीन शिलालेख जतन करून ठेवला आहे. मंदिरावर पत्र्याचे शेड असून मंदिराच्या तिन्ही बाजूला जाळीदार भिंत आहे. फूटभर उंचीच्या सर्वच देवतेंच्या काळया पाषाणातील मुर्त्या सुबक घडणावळीच्या असून प्राचीनतेची साक्ष देतात.
 |
बालेकिल्ल्यावरील 'शिव महादेव मंदिर'. किल्ले अवचितगड, रायगड, महाराष्ट्र. (Avchitgad Fort, Raigad, Maharashtra) |
 |
मंदिरासमोरील सुबक 'नंदी'. शिव महादेव मंदिर. किल्ले अवचितगड, रायगड, महाराष्ट्र. (Avchitgad Fort, Raigad, Maharashtra) |
 |
'शिव महादेव मंदिर'. किल्ले अवचितगड, रायगड, महाराष्ट्र. (Avchitgad Fort, Raigad, Maharashtra) |
 |
पेशवेकालीन 'शिलालेख'. किल्ले अवचितगड. |
 |
शिव महादेव आणि मागे माता पार्वती. किल्ले अवचितगड. |
बालेकिल्ल्यावर 'शिवशंभू प्रतिष्ठान'ने स्थानिकांच्या मदतीने वृक्षारोपण केले असून हा परिसर झुडूपांपासून मोकळा, स्वच्छ ठेवला आहे. गडावर साग, आंबा, पळस, जांभूळ, करंज अशा वृक्षांमुळे गडपरीसर रम्य आहे. तसेच प्रत्येक दसरा, दिवाळी पहाट या दिवशी गडावर दिवे लावून देवतेंची पूजा केली जाते. त्याचप्रमाणे १५ ऑगस्ट, २६ जानेवारी आणि १ मे (महाराष्ट्र दिन) या रोजी गडावर ध्वजारोहणही केले जाते. या सर्व सामाजिक कार्यात येत्या दहा वर्षात 'शिवशंभू प्रतिष्ठान'ने विशेष कमर कसली आहे.
बालेकिल्ल्यावरून पुन्हा महादरवाजाकडे मागे आल्यास गडाच्या उत्तर बुरुजाकडे एक पायवाट जाते. मधे डाव्या बाजूला चार बुरुजांनी भक्कम केलेल्या वाड्याच्या चौथऱ्याचे अवशेष दिसतात. इतिहास अभ्यासकांच्या मते तो 'बाजी पासलकरां'चा वाडा आहे. तसे 'मेढा' गावातील स्थानिकही दुजोरा देतात. पुढे उत्तर बुरुजाच्या निमुळत्या तटबंदीवर आणखी एक तोफ ठेवली आहे. गडाच्या या उत्तर बुरुजावर भगवा अभिमानाने फडकतो आहे. या उत्तर तटबंदी वरून खाली मेढा गांव, भिसे खिंड व त्यापलीकडे नागोठणे आणि 'मिरगडा'पर्यंतचा परिसर दिसतो. |
किल्ल्याचा 'उत्तर बुरुज'. किल्ले अवचितगड, रायगड, महाराष्ट्र. (Avchitgad Fort, Raigad, Maharashtra) |
 |
किल्ल्याच्या उत्तर बुरुजावरील 'तोफ'. किल्ले अवचितगड, रायगड, महाराष्ट्र. (Avchitgad Fort, Raigad, Maharashtra) |
 |
किल्ल्याच्या उत्तर बुरुजाकडे येणारी 'पूर्व तटबंदी'. किल्ले अवचितगड, रायगड, महाराष्ट्र. (Avchitgad Fort, Raigad, Maharashtra) |
 |
उत्तर बुरुज. वीर 'बाजी पासलकरां'च्या वाड्याचे अवशेष. |
किल्ल्याचा एकूण गडमाथा आकाराने लांबट असून, दक्षिणोत्तर पसरलेल्या किल्ल्याची रुंदी कमी आहे. किल्ल्याच्या पूर्व तटबंदीवरुन समोर गडाला येऊन भिडलेली डोंगररांग दिसते. ही डोंगररांग पुढे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील 'सुकेळी खिंड' ओलांडून 'वरदायिनी' डोंगरावरून 'खांब' गावाजवळील 'सुरगडा'पर्यंत जाते.
राजधानी किल्ले रायगडावर चढाई करण्यापूर्वी शत्रूला आधी वर उल्लेख केलेल्या या सर्व किल्ल्यांवरील 'शिबंदी'शी संघर्ष करावा लागे. थोडक्यात शिवछत्रपतींनी 'रायगड' ही राजधानी निवडण्यामागे रायगडाभोवती वसलेले हे सर्व छोटे छोटे किल्ले मिळून रायगडाचे सामर्थ्य वाढविण्याचे (बॅक प्रोटेक्शनचे) काम करत.
या मे महिन्याच्या शेवटी जेव्हा आम्ही अवचितगडाला भेट दिली, त्यावेळी वातावरण सुरुवातीच्या मस्त दमदार पावसाचे होते. किल्याचा डोंगर चढ, उतार करताना पावसाचे पाणी आणि त्याच्या खळखळाटामुळे बरीच खेकडी बाहेर आली होती. तर काही खेकडी पिल्ले सोडण्यासाठी दगड चिखलातून बिनधास्त वावरत होती. त्याचा उत्कंठा वाढवणारा व्हिडिओ खाली दिला आहे.
 |
मुसळधार पावसात डोंगरातील पायवाटेवर बाहेर पडलेली 'खेकडी'. (Crab) किल्ले अवचितगड, रायगड, महाराष्ट्र. (Avchitgad Fort, Raigad, Maharashtra) |
तसेच गड भेटीदरम्यान वातावरण दाट धुक्याचे होते. कधी कधी ते इतके दाट होई की आम्हाला समोरचा काहीच अंदाज येत नसे. अशावेळी या निर्जन गडावर बऱ्याचदा दडपण आले. पण हवेसरशी धूक्यातून बदलणारी दृश्यमानता (Visibility) आणि जोरदार पावसाची ये - जा हा निसर्गाचा मजेशीर आणि विलोभनीय खेळ आम्हाला सहकुटुंब अनुभवता आला. तो विसरता येणार नाही. दाट धूक्यामुळे काही फोटो घेता आले नाहीत, तर काही ठिकाणी धूके ओसरण्यासाठी बराच वेळ वाट पहावी लागली.
अवचितगडावर आज अस्तित्व टिकवून असलेला सुरेख 'गोमुखी' महादरवाजा, तिथले शरभ शिल्प, गडाची सदर व त्यासमोर सुंदर तोफ आहे. बालेकिल्ल्याच्या दरवाजांच्या रेखीव तीन कमानी, १२ कोनांचे कलात्मक भव्य तळे, प्राचीन शिव महादेव मंदिर, मंदिरातील देवतेच्या सुबक मुर्त्या व दक्षिण बुरुजावरील शिलालेख आहेत. तसेच सहा एकत्र खोदीव कातळटाक्या, पिंगळसई मातेची घुमटी, गडदेवता खंडोबा आहे.
त्याचप्रमाणे ऊन पावसाशी तोंड देत उभी असलेली गडाची शिल्लक तटबंदी, तटबंदीतील सहा बुरुज, किल्ल्याच्या दक्षिण आणि उत्तर बुरुजासोबत एकूण गडाची राखण करणाऱ्या पाच भेदक तोफा आहेत. बाजी पासलकरांचा पराक्रम सांगणारा त्यांचा वाडा अवशेष रूपात आहे. किल्ल्याच्या पाऊलवाटेवरील वीरगळी आणि गडपायथ्याच्या विहिरी अशा अनेक गोष्टी गडास परिपूर्ण करताना दिसतात. तसेच अवचितगडाची घनदाट झाडी आजही बऱ्यापैकी जैव विविधता राखून आहे. हे सर्व इतर किल्ल्यांच्या तुलनेत 'किल्ले अवचितगड' आपली 'दुर्गश्रीमंती' निर्विवाद सिद्ध करताना दिसतो..
|| श्री कृष्णार्पणमस्तु ||
येथे - जयवंत जाधव
पावसाळी सहकुटुंब गड भटकंती मस्त अनुभव लिहिले. भारीच 👌🌧️🦀💐
ReplyDeleteअप्रतिम फोटोग्राफी आणि लिखाण 👌👌😊😊...सौ विद्या ढेबे.
ReplyDeleteखुप छान, प्रकाश तुझा अभ्यास मनाला खूप भाव तो हे सर्व तु कामाच्या बिझी सेडुल मधून पूर्ण करतो व आम्हाला माहीत नाही आसी सर्व माहिती आम्हाला मिळते आमचे भाग्य वाचताना आगावर काटा येतो छान फोटो गारफी , सुंदर लिखाण, आभिनदन यशस्वी भव्
ReplyDeleteधन्यवाद प्रल्हाद दादा. तुम्ही आजही मला माझ्या लहानपणीच्या प्रकाश या नावाने संबोधन करता. बरे वाटते 🙍🙏💐
DeleteVery Nice 👌
ReplyDeleteगडाचे सुंदर विवरण व सखोल माहिती. एखाद्या लोकल गाईड शिवाय इतकी रोचक व महत्वाची माहिती कशी काय गोळा केली बुवा ? नक्किच गड किल्ल्यांच्या
ReplyDeleteइतिहासाचा गाढा अभ्यास असणार. अभिनंदन. कुटुंब रंगले काव्यात म्हणतात तसेच तुमचे कुटुंब रंगले गड भ्रमंतीत. अनुकरणीय आहे. पुढील मोहिमां साठी खूप खूप शुभेच्छा.
धन्यवाद देसाई साहेब. तुम्हाला लेख आवडला. तुमच्या सकारात्मक प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद 🙏💐
Deleteखूप छान लिखाण आणि फोटोग्राफी अप्रतिम 👌👌
ReplyDeleteVery good blog written by my friend Jaywant. It's very very useful for new trekker as well to experienced one. Thank you very much.
ReplyDeleteखूप छान माहिती, सुंदर फोटोग्राफी... 👍
ReplyDeleteजयवंतराव छान फोटोग्राफी.अवचित गड सुंदर आणि वास्तववादी शब्दांकन, आपल्या वर्णनातून किल्याचे दृश्य डोळ्यासमोर उभे राहते.Very Nice
ReplyDeleteकिल्ले अवचितगड' खूपच छान लेख लिहला आहे दादा ..तुम्हाला पुढील ट्रेकिंग साठी खूप खूप शुभेच्छा ....- सौ. वर्षा कासार
ReplyDelete