Thursday, 27 November 2025

भुईकोट - 'किल्ले नळदुर्ग', जि. धाराशिव, महाराष्ट्र. - Naldurga Fort, Dist. Dharashiv, Maharashtra

                     कुलस्वामिनी 'श्रीतुळजाभवानी'चा आशीर्वाद घेतल्यानंतर आम्ही मराठवाड्यातील 'किल्ले नळदुर्ग'ला भेट दिली. भुईकोटाच्या सर्व वैशिष्ट्यांनी युक्त असणारा महाराष्ट्रातील सर्वात मोठा भुईकोट आणि त्याच्या तीनही बाजूने खंदकातून 'बोरी नदी' वाहत असल्याने म्हणावा तर 'जलकोट' असा हा वैशिष्ट्यपूर्ण 'नळदुर्ग'. तीन वर्षांपूर्वी इथल्या भटकंतीत ठरविलेला पण राहून गेलेल्या या 'भुईकोट' भेटीचा योग यावेळी जुळून आला. 

पहिले प्रवेशद्वार, किल्ले नळदुर्ग, जि. धाराशिव, महाराष्ट्र. (Naldurg Fort, Dist. Dharashiv, Maharashtra)

Naldurg Fort, Dist. Dharashiv, Maharashtra.

                 'नळदुर्ग' गांव हे सोलापूर जिल्ह्याच्या ईशान्येला ४८ किमी तर श्रीक्षेत्र तुळजापूरहून आग्नेयेला ३२ किमी आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यातून सोलापूर हे रस्ते आणि रेल्वेने जोडले आहे. सोलापूर - हैदराबाद रस्त्यावर 'नळदुर्ग' गावात हा किल्ला असल्याने सोलापुरातून एस. टी. किंवा स्वतःच्या वाहनाने 'नळदुर्ग' गावात तास दिड तासात पोहोचता येते. 'धाराशिव' जिल्ह्यातील 'तुळजापूर' तालुक्यात येणाऱ्या या गावात मुस्लिम बहुल वस्ती दिसते. श्रीस्वामींचे अक्कलकोटही 'नळदुर्ग' गावापासून दक्षिणेला ४० किमीवर आहे. दुरून येणाऱ्या पर्यटकांसाठी 'नळदुर्ग' गावात राहण्याची सोय नाही. त्यामुळे तुळजापूर, सोलापूर किंवा अक्कलकोटला वस्तीसाठी आधार घ्यावा लागतो. 

                   'नळदुर्ग' गावाच्या उत्तरेला ३ - ४ किमीवर 'बोरी' नदीपलीकडे किल्ल्याला लागूनच टेकडीवर २० एकर जागेत एक प्रशस्त 'युनीवंडर्स रिसॉर्ट आणि थीम पार्क' सध्या दिसते. तिथे राहण्याची उत्तम सोय आहे. या पार्कमध्ये एडवेंचर पार्क, रॉक गार्डन, विविध खेळासह वॉटर पार्कमध्ये स्विमिंगच्या सोयीसोबत खाण्याचीही उत्तम व्यवस्था आहे. ऐनवेळी भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी हा एक चांगला पर्याय आहे. या पार्कमधून 'नळदुर्ग' किल्ल्याची उत्तर तटबंदी, तटबंदीतील किल्ल्याचा दरवाजा आणि खंदकात सोडलेल्या 'बोरी' नदीचा 'चिलक धबधबा' दिसतो. 

'युनीवंडर्स रिसॉर्ट आणि थीम पार्क'मधून पलीकडील नळदुर्ग किल्ल्याची उत्तरेकडील दिसणारी तटबंदी आणि 'चिलक धबधबा' ठिकाण '. (Naldurg Fort, Dist. Dharashiv, Maharashtra)
                 प्राचीन वारसा आणि पर्यटन लाभलेल्या 'नळदुर्ग' गावात प्रवेश करताच अस्वच्छता दिसते. किल्ल्याची व्यवस्था 'युनिटी' या सोलापूरच्या कंपनीकडे होती. दहा वर्षानंतर मागील वर्षी त्यांचा करार संपुष्टात आल्याने किल्ला पुन्हा 'पुरातत्व खाते महाराष्ट्र शासना'च्या ताब्यात आला. सध्या किल्ल्याचे दरवाजे सकाळी ९ वा. उघडतात आणि संध्याकाळी ५ वा. बंद होतात. किल्ल्याबाहेर पार्किंग वगळता किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही. 

                    किल्ल्यात प्रवेश करताना किल्ल्याचा मूळ खंदक बुजवून जाण्या - येण्यासाठी रस्ता बनवला आहे. या रस्त्यावरून किल्ल्याचा कमान असेलेला दरवाजा स्वागत करतो. हा पहिल्या तटबंदीतील प्रवेश दरवाजा सुरक्षिततेच्या दृष्टीने छोटा असला तरी दोन महाकाय अभेद्य बुरुजांनी सुरक्षित केला आहे. या खंदकाच्या रस्त्यावरून डावी उजवीकडे किल्ल्याची उंच, विशाल पसरलेली तटबंदी आणि अंगावर येणारे बुरुज दिसतात.  प्रत्येक बुरुजात कलात्मक 'सज्जे' आहेत. या मजबूत सज्जावरून युद्धकाळात शत्रूवर तोफमारा तसेच उकळते तेल ओतण्याची व्यवस्था दिसते. तटबंदीत तोफमाऱ्यासाठी 'दिवळ्या' त्याचप्रमाणे बंदूक, बाणांचा वर्षाव करण्यासाठी 'जंग्या' दिसतात. डावीकडील गाव वस्तीला लागून असलेला खंदक गवत झुडुपांनी भरला आहे. गावकऱ्यांनी त्यात कचरा आणि सांडपाणी सोडून त्याला छान साथ दिलेली दिसते. हीच अवस्था आम्हाला मागे भेट दिलेल्या भुईकोट 'किल्ले परांडा' बाबतीत दिसली होती. उजवीकडील खंदकात मात्र शेती दिसते.

'नळदुर्ग गाव' वस्तीला लागून असलेला 'डावीकडील खंदक' (Naldurg Fort, Dist. Dharashiv, Maharashtra)

नळदुर्ग किल्ल्याचा 'उजवीकडील खंदक' (Naldurg Fort, Dist. Dharashiv, Maharashtra)

                 डावे वळण घेत दोन्ही उंच तटबंदीतून वाट पहिल्या तटबंदीतून बाहेर पडण्यासाठी दुसऱ्या ठेंगण्या दरवाजात येते. या दरवाजाबाहेर चिंचोळ्या जागेत शत्रूला कोंडून तटबंदीवरील सज्जातून मारा करण्याची व्यवस्था दिसते. या दरवाजातून आत आल्यास तटबंदीत दोन्ही बाजूला शिपायांसाठी 'देवड्या' दिसतात. 

'दुसरे प्रवेशद्वार', किल्ले नळदुर्ग, महाराष्ट्र. (Naldurg Fort)
'दुसरे प्रवेशद्वार'आणि त्यातील 'देवड्या'.  किल्ले नळदुर्ग, महाराष्ट्र. (Naldurg Fort)

                 पहिल्या तटबंदीतून बाहेर आल्यास उजवीकडे किल्ल्याची त्याहीपेक्षा उंच दुसरी अभेद्य तटबंदी आणि बुरुज दिसतात. समोर दोन्ही तटबंदीमध्ये आडवी भिंत बांधून, वाट अडवून उजवीकडे वळवलेली दिसते. ही वाट किल्ल्याच्या महाकाय बुरुजातील प्रचंड मोठ्या तिसऱ्या 'हलमुख' दरवाजात येते. हा 'हलमुख' दरवाजा आकाराने मोठा आणि कलात्मक असून किल्ल्याच्या वैभवात भर घालताना दिसतो. दरवाजाच्या कमानीत मजबूत दगडी चौकट दिसते. बाहेरील नक्षीदार चौकटीचे काम विशेष लक्ष वेधून घेते. चौकटीचे दोन्ही लाकडी दरवाजे आणि त्यावरील एकमेव 'तुळयी' आजही टिकाऊ धरून आहेत. या महाकाय लाकडी दरवाजांना इतर किल्ल्यात दिसतात तसे 'दिंडी दरवाजे' ठेवलेले दिसत नाहीत. या ठिकाणी पुरातत्व खात्याचा कर्मचारी किल्ल्यात येना जाणाऱ्यांची नोंद ठेवतो. किल्ल्यात अस्वच्छता आणि गैरवर्तवणूक करू नये अशी 'सज्जड सूचना' देतो. 

दुसऱ्या प्रवेशद्वारातुन उजवीकडे वळवलेला किल्ल्याचा रास्ता, किल्ले नळदुर्ग, महाराष्ट्र. (Naldurg Fort, Dist. Dharashiv, Maharashtra)


'तिसरे मुख्य प्रवेशद्वार', किल्ले नळदुर्ग (Naldurg Fort)
तिसऱ्या प्रवेशद्वारावरची लाकडी तुळई, किल्ले नळदुर्ग (Naldurg Fort)
  
तिसऱ्या प्रवेशद्वाराजवळील 'ओवऱ्यां'च्या खोल्या (Naldurg Fort)

                    या दरवाजातून आत आल्यास डावी उजवीकडे चार फूट उंचीच्या चौथर्‍यावर 'ओवऱ्यां'च्या सुंदर खोल्या आहेत. त्यांचे छत आतून नक्षीदार असून वर दगडी सपाट छप्पर दिसते. पुढे किल्ल्याकडे तोंड करून ठेवलेल्या दोन 'ओतीव' तोफा दिसतात. डाव्या बाजूने या मुख्य 'हलमुख' दरवाजावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. वर दरवाजाच्या मध्यावर ध्वजकाठी आहे. इथून दरवाजाच्या दोन्ही बाजूच्या बुरुजांवरही जाता येते. इथून किल्ल्याच्या पश्चिमेकडील मुख्य प्रवेशद्वाराकडील दोन्ही तटबंद्या 'कोट' आणि 'परकोट' तसेच तटबंदीतील मोकळी जागा 'शेरहाजी' दिसते.

(आतून) 'तिसरे मुख्य प्रवेशद्वार', तोफा आणि ध्वज काठी, किल्ले नळदुर्ग, महाराष्ट्र. (Naldurg Fort, Maharashtra)

                  किल्ल्याच्या या दरवाजासमोर मोकळ्या जागेत उजव्या बाजूला 'हत्तीखाना' दिसतो. तिथे हत्तीचे कातळ शिल्प ठेवले आहे. हत्तीखाण्यासमोर हत्तींना पिण्यासाठी पाण्याचा दगडी 'हौद' बांधला आहे. त्यात पाणी दिसते. मुख्य दरवाजावर जाणाऱ्या पायऱ्यांच्या जवळ दगडी खोल्यांचे एक बांधकामही दिसते. ती 'माहुतांना आराम करण्याची जागा' असे सांगितले जाते.

तिसऱ्या प्रवेशदारावरून खाली दिसणाऱ्या 'तोफा' आणि उजवीकडे 'हत्तीखाना' इमारत. (Naldurg Fort, Dist. Dharashiv, Maharashtra)

'हत्तीखाना' आणि 'पाण्याचा हौद'. किल्ले नळदुर्ग, महाराष्ट्र. (Naldurg Fort, Dist. Dharashiv, Maharashtra)

हत्तीचे शिल्प, हत्तीखाना. किल्ले नळदुर्ग. (Naldurg Fort)


'हत्तीखाना'. किल्ले नळदुर्ग. (Naldurg Fort)
                   पुढे उजवीकडे 'मुन्सिफ कोर्ट' नावाची जुनी वास्तू दिसते. तिच्या प्रवेशद्वारातून आत आल्यास समोर मोकळी जागा आहे. त्याच्या मध्यभागी गोल चौथर्‍यावर एक मोठी पंचधातूची तोफ दिसते. तोफेच्या तोंडाजवळील काही तुकडे कापून समाजकंटकांनी पळविलेले दिसतात.

                   त्यापुढे समोर आणि उजवीकडे एकमेकांना काटकोनात जुन्या वास्तू दिसतात. उजवीकडील वास्तू ही किल्ल्याच्या नांदत्या काळात न्यायालयीन कामकाजासाठी वापरली जात असे. या इमारतीस तीन दरवाजे आहेत. सर्वात डावीकडील लहान दरवाजा वादी प्रतिवादी यांच्यासाठी आहे.  मधला दरवाजा वकिलांसाठी तर सर्वात उजवीकडील मोठा दरवाजा न्यायाधीशांसाठी असे. ही माहिती आम्हाला स्थानिक प्रा. वाघमारे यांनी दिली. मुन्सिफ कोर्टाचे छप्पर वरून दिसायला सपाट असले तरी वादी प्रतिवादी, वकील आणि न्यायाधीश यांच्या आतील जागेत तीन भव्य सुंदर नक्षीचे घुमट दिसतात. रिवाजानुसार न्यायाधीशाचे आसन उच्च ठिकाणी, पुरुषभर उंचीच्या चौथर्‍यावर दिसते. चार शतके ओलांडली तरी आजही या वास्तूच्या छपरातून पाणी गळतीचा लवलेशही दिसत नाही. या वास्तूला काटकोनात असणारी वास्तू त्यावेळच्या तुरुंगाची इमारत दिसते.  

'मुन्सिफ कोर्ट', किल्ले नळदुर्ग, महाराष्ट्र. (Naldurg Fort, Dist. Dharashiv, Maharashtra)

'मुन्सिफ कोर्ट' आवारातील तोफ आणि मागे 'न्यायालयीन वास्तू'. किल्ले नळदुर्ग, महाराष्ट्र. (Naldurg Fort, Dist. Dharashiv, Maharashtra)

'मुन्सिफ कोर्टा'ची आतून दिसणारी न्यायालयीन वास्तू. किल्ले नळदुर्ग, (Naldurg Fort, Dist. Dharashiv, Maharashtra)
                   पुढे डावीकडे किल्ल्याच्या इस्लामिक राजवटीत बांधलेली 'जामा मस्जिद' दिसते. प्रशस्त मोठ्या मस्जिदीसमोर 'वजू' हौद दिसतो. आता त्यातील पाण्यात कारंजे बसविलेले दिसतात. सध्या नमाज पठणाच्या वेळी मात्र स्थानिकांचा मस्जिदीत वावर दिसतो. 
'जामा मस्जिद' आणि 'वजू' हौद. किल्ले नळदुर्ग, महाराष्ट्र. (Naldurg Fort, Dist. Dharashiv, Maharashtra)

                   मस्जिदीच्या डावीकडे किल्ल्याच्या काही उध्वस्त वास्तू दिसतात. या वास्तूंच्या पुढे बुरुजात बनवलेला किल्ल्याचा दरवाजा आणि त्याच्या पायऱ्या नदीच्या खंदकात उतरताना दिसतात. इथे पर्यटकांना 'बोरी' नदीच्या विशाल खंदकात 'बोटिंग' करण्याची सोय आहे. सध्या ती बंद दिसते. 

किल्ल्याचा खंदक आणि बोरी नदीच्या पात्रात चालणारे 'बोटिंगचे' ठिकाण. किल्ले नळदुर्ग. (Naldurg Fort, Maharashtra)

'बारादरी' प्रांगणातील तोफ. किल्ले नळदुर्ग. (Naldurg Fort)

                 त्यापुढे 'वजू' हौदाच्या डावीकडे काटकोनात 'बारादरी' नावाची ब्रिटिश राजवटीत बांधलेली इमारत दिसते. त्यावेळी कर्नल 'मेडिज टेलर' हा ब्रिटिश कमिशनर म्हणून 'नळदुर्ग' परगण्याचा कारभार बघत असे. त्याची ही राहती वास्तू आजही सुस्थितीत दिसते. या इमारतीच्या प्रांगणात २१ फूट लांब, दीर्घ पल्ल्याची एक लांबलचक तोफ ठेवली आहे. 


'बारादरी'. ब्रिटिश कमिशनर कर्नल 'मेडिज टेलर'ची वास्तू. किल्ले नळदुर्ग, महाराष्ट्र. (Naldurg Fort, Maharashtra)

                    'नळदुर्ग'चा इतिहास पाहता राजा 'नळ' याने हा किल्ला बांधला. स्थानिक लोक या किल्ल्याचा इतिहास सांगताना राजा 'नळ आणि दमयंती' पर्यंत मागे घेऊन जातात. पण ज्ञात इतिहासानुसार हा किल्ला कल्याणी'च्या (कर्नाटक, बिदर जिल्हा) 'चालुक्य' राजाच्या (इ. स. ९७३ ते १२००) ताब्यात होता. पुढे तो 'बहामनी' सुलतानांच्या ताब्यात आला. बहामनी सुलतानशाहीची शकले झाल्यानंतर त्यातील विजापूरच्या आदिलशहाने नळदुर्गावर ताबा मिळविला. पुढे औरंगजेबाने (मुघल) त्यावर ताबा मिळवून किल्ल्याची जबाबदारी हैदराबादच्या निजामाकडे सोपविली. हे हैद्राबाद संस्थान १७ सप्टेंबर १९४८ मध्ये स्वतंत्र भारतात विलीन झाल्यानंतर हा सर्व परिसर महाराष्ट्र राज्यात सामील झाला.

                    हा प्राचीन 'नळदुर्ग' किल्ला हिंदू शासकाने बांधला असला तरी किल्ल्याने त्यापुढे इस्लामिक, ब्रिटिश आणि मराठा सत्तेची स्थित्यंतरेही अनुभवली. त्यामुळे त्या त्या राजवटीतील गरजेनुसार किल्ल्याच्या स्थापत्य शास्त्रात बदल होत गेलेले आज दिसतात.

किल्ल्याच्या अरुंद ठिकाणची तटबंदी. किल्ले नळदुर्ग.

                 पुढे रुंद मळलेल्या रस्त्याने सरासरी एक किमी चालून येताना डावी उजवीकडे किल्ल्याची तटबंदी दिसते. हा किल्ल्याचा सर्वात अरुंद भाग आहे. 

            इथे डावीकडे नळदुर्ग किल्ल्याचे अचंबित करणारे, स्थापत्य शास्त्राची अति उत्तम परिसीमा गाठणारे आणि दुर्मिळात दुर्मिळ नमुना असा 'पाणी महाल' पहावयास मिळतो. 

        ब्रिटिश राजवटीतील 'बारादरी' इमारतीपासून पुढे एक किमी चालत आल्यानंतर डावीकडे किल्ल्याच्या तटबंदीतून बाहेर पडण्यास दरवाजा दिसतो. हा दरवाजा ओलांडून वाट दोन्ही तटबंदीतील 'शेरहाजी'तून उजवीकडे वळते. दोन्ही तटबंदीतील बुरुज, ओवऱ्या ओलांडत थोडे पुढे आल्यास किल्ल्याच्या खंदकाकडे उतरण्यासाठी डावीकडे बाह्य तटबंदीत मजबूत कातळ दरवाजा दिसतो. हा दरवाजा ओलांडून किल्ल्याच्या खंदकावर मध्ययुगीन काळात बांधलेल्या 'बंधाऱ्या'वर येता येते. 

बंधाऱ्यातील 'पाणी महाल' आणि 'नर मादी धबधब्या'कडे जाणारा किल्ल्याचा दरवाजा. किल्ले नळदुर्ग, जि. धाराशिव, महाराष्ट्र. (Naldurg Fort, Maharashtra)

बाह्य तटबंदीतून बंधाऱ्याकडे येणारा कातळ दरवाजा. किल्ले नळदुर्ग, जि. धाराशिव, महाराष्ट्र. (Naldurg Fort, Maharashtra)

                    बंधारा सुरुवातीला २ मीटर आणि पुढे १४ मीटर रुंद आहे. उंची साधारण २० मीटर तर लांबी जवळजवळ १७४ मीटर आहे. बंधाऱ्यावर पाणी अडवल्यामुळे डावीकडे 'बोरी' नदीचा किल्ल्याच्या या खंदकात वळवलेला प्रचंड तुंब, तर बंधाऱ्याच्या खाली खोल खंदकाचे नदीपात्र दिसते. थोडक्यात 'तुळजापूर'हून वाहत येणारी 'बोरी नदी' ही नळदुर्ग किल्ल्याचे संरक्षण करण्यासाठी किल्ल्याच्या खंदकातच वळवलेली दिसते.

मध्ययुग काळातील 'बंधारा' आणि समोर किल्ले नळदुर्ग. किल्ले नळदुर्ग, जि. धाराशिव, महाराष्ट्र. (Naldurg Fort, Maharashtra)

बंधाऱ्याच्या खालील खंदक (नदी) पात्र आणि समोर किल्ले नळदुर्ग. किल्ले नळदुर्ग, जि. धाराशिव, महाराष्ट्र. (Naldurg Fort, Maharashtra)

                   या बंधाऱ्याच्या पोटात उतरण्यासाठी डावीकडे भुयारी मार्ग दिसतो. भुयारी मार्गाच्या कमानीतून कातळ पायऱ्या उतरून आल्यास बंधाऱ्याच्या उंचीच्या मध्यावर, बंधाऱ्याचाच भाग असलेली मोठी 'खोली' (Room) दिसते. खोलीच्या मध्यावर एकावर एक अशी 'नऊ'कोनांची रचना दिसते. या रचनेत खाचा आणि छिद्रे ठेवलेली दिसतात. तर तळाला मोठे छिद्र दिसते. या छिद्राच्या खालून नदीचे पाणी वेगाने वाहते. या 'नऊकोनी' खाचेत धान्य दळण्याचे जाते अडकवून त्याचा आस (Spindle, Axle) बंधाऱ्याखालून वाहणाऱ्या पाण्यात सोडला जाई. या पवनचक्कीच्या आधारे 'जाते' फिरवून धान्याचे पीठ करून ते सैनिकांना पुरविले जात असे. या खोलीत उजेड येण्यासाठी आणि बंधाऱ्याच्या खालील नदीपात्रावर लक्ष ठेवण्यासाठी मोठ्या कमानीच्या उघड्या खिडक्या ठेवल्या आहेत.

बंधारा आणि बंधाऱ्याकडे येणारा कातळ दरवाजा. किल्ले नळदुर्ग, जि. धाराशिव, महाराष्ट्र. (Naldurg Fort, Maharashtra)

बंधाऱ्याच्या पोटात (पिठाच्या चक्कीकडे) जाणाऱ्या पायऱ्या. 

बंधाऱ्याच्या पोटातील 'पिठाची चक्कीचे'  ठिकाण. किल्ले नळदुर्ग.

                     पुन्हा बंधाऱ्यावर येऊन बंधाऱ्याच्या दुसऱ्या टोकाकडे गेल्यास, इथेही बंधाऱ्याच्या पोटात उतरण्यासाठी अरुंद भुयारी पायऱ्या आहेत. अंधारातून पायऱ्या उतरून आल्यास खाली प्रशस्त मोकळी 'हवेली' दिसते. हवेलीला बंधाऱ्याच्या उतरत्या बाजूला मोठी गवाक्ष (खिडक्या) आहेत. पावसाळ्यात बंधारा पूर्ण भरल्यावर या हवेलीच्या वरून पाण्याचा विसर्ग केला जातो. त्यावेळी या हवेलीच्या गावाक्षात उभे राहून वरून पडणाऱ्या पाण्याचा पडदा बघण्यात एक वेगळाच सुखद अनुभव आहे.

                  उन्हाळ्यात उष्णतेपासून बचाव करण्यासाठी तसेच पावसाळ्यात धबधब्याचे विहंगम दृश्य बघण्यासाठी या हवेलीत त्याकाळी राहण्याची सोय केली होती. त्यासाठी हवेलीच्या एका कोपऱ्यात मध्ययुगीन काळात केलेल्या सौच्चकुपाची (Toilet), स्नानगृह (Bathroom) तसेच कारंज्याची (Fountain) व्यवस्था पाहायला मिळते.

बंधाऱ्याच्या पोटातील 'पाणी महाल'. किल्ले नळदुर्ग. 
बंधाऱ्याच्या पोटातील 'पाणी महाल'. किल्ले नळदुर्ग. 



बंधाऱ्याच्या पोटातील 'पाणी महाल' आणि उजवीकडे भिंतीवरील 'फारशी लेख'. किल्ले नळदुर्ग. (Naldurg Fort)

भिंतीवरील 'फारशी लेख'. किल्ले नळदुर्ग. (Naldurg Fort)

पाणी महालातील 'सौचकुप'. किल्ले नळदुर्ग. (Naldurg Fort)

                     पूर्ण १७४ मीटर लांब या बंधाऱ्याच्या अलीकडील टोकाला वाहत्या धबधब्यावर चक्की चालवून पीठ दळले जाते तर बंधाऱ्याच्या दुसऱ्या टोकाला पाणी महालावरून पडणारे धबधब्याचे पाणी दिसते. दुरून किल्ल्याच्या तटबंदी जवळून पाहिल्यास 'पाणी महाला'वरून पडणारा धबधबा 'पांढऱ्या' रंगाचा तर अलीकडे 'पिठाची चक्की' चालणाऱ्या धबधब्यातून पडणारे पाणी 'हिरव्या' रंगाचे दिसते. पांढऱ्या धबधब्याला 'नर' तर हिरव्या रंगाच्या धबधब्याला 'मादी' धबधबा म्हणून ओळखले जाते. एकाच बंधाऱ्यावरून आणि एकाच जलाशयातील पडणारे पाणी वेगवेगळ्या रंगाचे दिसणे हे इथले वास्तुशास्त्र कोड्यात टाकणारे आहे. हा तीन मजली अद्भुत बंधारा 'मीर इमादिन' या स्थापत्यकाराने 'दुसऱ्या इब्राहिम आदिलशहा'च्या कालावधीत १६१३ मध्ये बांधला.  'मीर इमादिन'चा उल्लेख असणारा फारशी शिलालेख 'पाणी महाला'त आहे. 

                     या दोन्ही धबधब्यांचे चमत्कारिक दृश्य पहायचे असल्यास पावसाच्या मध्यानंतर पाऊस संपण्यापूर्वी लगेचच या किल्ल्याला भेट द्यावी. त्यावेळी बंधारा पूर्ण क्षमतेने भरून दोन्ही धबधब्यातून वाहत असतो. नळदुर्ग किल्ल्याचे हे ठिकाण 'नर-मादी' धबधबा आणि 'पाणी महाल' म्हणून प्रसिद्ध आहे. आमच्या भेटीदरम्यान नोव्हेंबरला बंधाऱ्यात पाणी अडवून पाण्याचा विसर्ग थांबवला होता. 

उजवीकडे बंधाऱ्याच्या पोटात चक्कीकडे उतरणारा 'भुयारी मार्ग', 'कातळ दरवाजा' आणि मागे 'किल्ले नळदुर्ग'. किल्ले नळदुर्ग. (Naldurg Fort)

                    बंधाऱ्याच्या दुसऱ्या टोकाला म्हणजे पाणी महालाच्या दिशेला उध्वस्त तटबंदी आणि  बुरुजांचे अवशेष दिसतात. नळदुर्ग किल्ल्याचा हा जोड किल्ला आहे. त्याला 'रणमंडळ' किंवा 'रामदुर्ग' म्हटले जाते. 

बंधाऱ्यावरून दिसणारा नळदुर्ग किल्ल्याचा जोड किल्ला 'रामदुर्ग' (रणमंडळ). किल्ले नळदुर्ग, जि. धाराशिव, महाराष्ट्र.

 
'बांगडी तोफ', उपळी बुरुज, किल्ले नळदुर्ग.

               पुन्हा किल्ल्याकडे मागे आल्यास रस्त्यावरून समोर किल्ल्याच्या ईशान्येला १५० फूट उंच असा एक अवाढव्य बुरुज दिसतो. याला 'उपळी' बुरुज म्हणतात. किल्ल्यातील तटबंदीच्या मधल्या घेरात आणि सपाट जागेवर हा उभा आहे. या महाकाय उंच बुरुजावरून संपूर्ण नळदुर्ग किल्ला आणि आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवता येते. या बुरुजावर जाण्यासाठी दोन टप्प्यात पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या खाली आरपार अशा तीन 'कमानी' दिसतात. पायऱ्या चढून वर आल्यास  बुरुजाच्या प्रचंड घेरात तीन तोफा ठेवण्याची व्यवस्था दिसते. त्यापैकी बुरुजावर दोन मोठ्या तोफा आहेत. एक 'मगर तोफ' आणि दुसरी 'बांगडी तोफ' आहे. बुरुजावर तोफांच्या बाजूला दोन पाण्याचे  छोटे हौदही दिसतात. त्यात पाणी साठविले जाई. आता ते कोरडे आहेत. तोफ डागल्यानंतर प्रचंड गरम झालेल्या तोफेत लगेच दारुगोळा भरल्यास विस्फोट होऊ नये म्हणून तोफ या हौदातील पाण्याने कपड्याच्या मदतीने थंड केली जात असे.  

'उपळी बुरुज'किल्ले नळदुर्ग, जि. धाराशिव, महाराष्ट्र. (Naldurg Fort, Dist. Dharashiv, Maharashtra)


उपळी बुरुजावरील 'मगर तोफ'. किल्ले नळदुर्ग, जि. धाराशिव, महाराष्ट्र. (Naldurg Fort, Dist. Dharashiv, Maharashtra)

'उपळी बुरुजा'वरून किल्ल्याच्या उत्तरेकडीलकडील दिसणारा परिसर. किल्ले नळदुर्ग, जि. धाराशिव, महाराष्ट्र. (Naldurg Fort, Maharashtra)


'उपळी' बुरुजावरून उतरणारा 'भुयारी मार्ग'. किल्ले नळदुर्ग. (Naldurg Fort)

                  या 'उपळी' बुरुजावरून तोफा हाताळणाऱ्या ('तोपची') सैनिकांसाठी आणि टेहळणी करण्यासाठी वर बुरुजाच्या पोटात एक 'खोली' (Room) बनविली आहे. या बुरुजावरून भुयारी पायऱ्या या खोलीत उतरतात. नक्षीदार आणि कलात्मक रचनेची ही खोली अगदी कल्पकतेने बनवलेली दिसते. या खोलीची पश्चिम बाजू उघडी असल्यामुळे इथून दूरवरच्या प्रदेशावर नजर ठेवता येते.

'उपळी' बुरुजावरील 'भुयारी मार्ग'
 




'उपळी' बुरुजाच्या पोटात निर्माण केलेली कलात्मक 'खोली'. किल्ले नळदुर्ग, महाराष्ट्र. (Naldurg Fort, Maharashtra)

'उपळी' बुरुजावरून दिसणारा मध्ययुगीन 'बंधारा' आणि 'पश्चिमेकडील विस्तीर्ण परिसर'. किल्ले नळदुर्ग, महाराष्ट्र. (Naldurg Fort, Maharashtra)

                     'उपळी' बुरुजाच्या पूर्वेला लागूनच एक कोठार दिसते. ते बहुदा 'दारूकोठार' असावे. तर बुरुजाला लागूनच उत्तरेला जमिनीवर मोठा पाण्याचा हौद दिसतो.

'उपळी' बुरुजाच्या पूर्वेचे 'दारुकोठार'. किल्ले नळदुर्ग, जि. धाराशिव. महाराष्ट्र. (Naldurg Fort, Dist. Dharashiv, Maharashtra)


'उपळी' बुरुजाच्या उत्तरेचा 'हौद'. किल्ले नळदुर्ग.

                     या बुरुजावरील तोफेला बत्ती दिल्यानंतर निर्माण होणाऱ्या विदारक आवाजापासून बचाव करण्यासाठी सैनिक त्यावेळी या बुरुजावरून खाली दिसणाऱ्या हौदात उडी घेत अशी माहिती सांगितली जाते. पण बुरुजाच्या या प्रचंड उंचीवरून जमिनीवरील उथळ हौदात नेमकी उडी घेणे म्हणजे आत्महत्या करण्यासारखेच आहे. त्यामुळे ते पटत नाही. फार तर बत्ती दिल्यानंतर 'तोपची' तोफेच्या बाजूला असलेल्या दोन लहान हौदात बुडी मारत असावा किंवा बुरुजाखाली बनवलेल्या खोलीत धाव घेत असावा. असो.

                     पुन्हा किल्ल्याच्या प्रवेशद्वाराकडे मागे येऊन ब्रिटिशकालीन 'बारादरी' इमारतीसमोर डावीकडे वळून झुडपातील पायवाटेने किल्ल्याच्या दक्षिणेकडील प्रसिद्ध 'नवबुरुजा'वर येता येते. 

                  परत येईपर्यंत दुपार टळून गेली होती. उन्हाचा जोर होताच. या ठिकाणी आम्ही सकाळी पुढे गेल्यानंतर कधीतरी एक सरबतवाला बसलेला येताना आम्हाला दिसला. सरबत पिताना त्याच्याशी गप्पा मारल्या. त्याच्या सांगण्यावरून दक्षिण तटबंदीतील 'नवबुरुज' बघायचा असल्यास तो किल्ल्यावरून न बघता, स्वतःची गाडी असल्यास सोलापूर - हैदराबाद महामार्गावर जाऊन खंदकाबाहेरून बघा म्हणजे त्याची भव्यता कळेल. तसेच पावसानंतर किल्ल्यातील पायवाटेवरील वाढलेल्या गवत झुडपांची सफाई झालेली नाही. त्यामुळे किल्ल्यात साप, घोरपडी सारख्या सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढला आहे तसे त्याचे मत होते. आमच्या पूर्व अनुभवावरून असे स्थानिक किल्ल्याचे चांगले माहितगार असतात. त्यामुळे फारसा विचार आणि वेळ न दवडता किल्ल्याबाहेर पडलो. आणि नळदुर्ग पासून हैदराबादकडे जाणाऱ्या रस्त्यावरून पुढे पाच किमीचा प्रवास करत खंदकाबाहेरून आम्ही किल्ल्याची पश्चिम, दक्षिण आणि पुढे पूर्व तटबंदी न्याहाळली.

किल्ल्याच्या दक्षिण तटबंदीतील 'नवबुरुज'. किल्ले नळदुर्ग, धाराशिव, महाराष्ट्र. (Naldurg Fort, Dharashiv, Maharashtra)

 

किल्ल्याच्या नैऋत्य तटबंदीतील 'फतेह बुरुज'. किल्ले नळदुर्ग, धाराशिव, महाराष्ट्र. (Naldurg Fort, Dharashiv, Maharashtra)

'उपळी' बुरुजाच्या पोटातून. किल्ले नळदुर्ग. (Naldurg Fort)

                     इतर भुईकोटांच्या तुलनेत किल्ले नळदुर्गाचे क्षेत्रफळ जवळजवळ १२० एकर आहे, जे सर्वात जास्त आहे. किल्ल्याचा कोट आणि परकोट यांच्या तटबंदीत गोल, अर्धगोल, चौकोनी, पंचकोनी, षटकोनी अशा विविध आकारांचे लहान मोठे मिळून एकूण ११४ बुरुज आहेत. तर किल्ल्यास जवळजवळ ६ किलोमीटरची तटबंदी आहे. तटबंदी बऱ्यापैकी सुस्थितीत असली तरी वाढलेल्या झुडपामुळे पूर्ण तटबंदीवरून फेरफटका मारता येत नाही. किल्ल्याच्या आकाराचा विचार करता किल्ला प्रवेशद्वाराकडे मोठा चौकोनी मध्ये निमुळता आणि ईशान्येकडे लंबगोल आकाराचा आहे. थोडक्यात तो आकाराने 'पतंगाकृती' आहे.

                         किल्ल्याच्या रक्षणासाठी खंदकात वळवलेले 'बोरी' नदीचे पात्र अचंबित करणारे आहे. तर 'नर-मादी' धबधबा, 'पाणी महाल', 'उपळी बुरुज' हे मध्ययुगीन काळातील स्थापत्य शास्त्राचे आजमितीस अस्तित्वात असलेले उत्तम नमुने 'किल्ले नळदुर्गा'त आहेत.. 

                                               || श्री कृष्णार्पणमस्तु ||

येथे - जयवंत जाधव

12 comments:

  1. खुप छान

    ReplyDelete
  2. छान माहिती. नळदुर्ग किल्ला मस्त, सगळे फोटो माहिती देतात. सगळ्यात मोठा भुईकोट 👌💐

    ReplyDelete
  3. Very useful information

    ReplyDelete
  4. तुमच्या ब्लॉग-पोस्टमधली मांडणी आणि वर्णन अतिशय योग्य वाटतं. नळदुर्ग किल्ल्याचं महत्त्व, त्याचा इतिहास, वास्तुशिल्प आणि निसर्गीय सौंदर्य — सगळं तुमच्या पोस्टमध्ये नीट -प्रकट झालंय.

    ReplyDelete
  5. खूप छान माहिती दिला आहे वर्णन अतिशय चांगला वाटतो

    ReplyDelete
  6. प्रिय जयवंत, जय भवानी, नळदुर्ग वरचा ब्लाग वाचला आणि अतिशय सुंदर, उद्बोधक माहिती आम्हा पर्यंत पोहचवली त्याबद्दल खरंच मनःपूर्वक धन्यवाद, नळदुर्गाचे वैशिष्ट्य अतिशय तपशीलवार पणे मांडले आहेस, आजुबाजुच्या परिसराचे,शहरांचे विशेष स्पष्टीकरण, किल्ल्याच्या आतमधिल तपशीलवार माहिती, तत्कालीन राहण्याची व्यवस्था, सौचकुप वगैरे तसेच स्थानिक लोकांची थोडक्यात पण योग्य माहिती, हे वाचून तू पुन्हा एकदा एक सुंदर अनुभव दिलास. धन्यवाद 🙏🏻

    ReplyDelete
  7. खूप छान वर्णन.

    ReplyDelete
  8. नळदुर्ग किल्ल्याबद्दल थोडेफार ऐकून होतो, परंतु एवढी डिटेल माहिती न्हवती जी आपल्यामुळे आज मिळाली धन्यवाद🙏

    ReplyDelete
  9. खूप छान

    ReplyDelete
  10. जाधव साहेब अप्रतिम. आपली लेखणी व छोटे छोटे पॉईंट्स सुद्धा आपण खूप चांगल्या पद्धतीने मांडले आहेत. मांडणी आणि फोटोग्राफी याला तोड नाही. आपल्याकडून खूप सुंदर पद्धतीने प्रत्येक किल्ल्याची माहिती मिळते. अशीच माहिती सर्वांपर्यंत पोहोचत राहावी हीच अपेक्षा .खूप सुंदर.

    ReplyDelete
  11. Very beautiful photos and information about Fort.Keep it up.

    ReplyDelete
  12. खूप छान, मला पण आवडेल भटकंतीला

    ReplyDelete

भुईकोट - 'किल्ले नळदुर्ग', जि. धाराशिव, महाराष्ट्र. - Naldurga Fort, Dist. Dharashiv, Maharashtra

                     कुलस्वामिनी 'श्रीतुळजाभवानी'चा आशीर्वाद घेतल्यानंतर आम्ही मराठवाड्यातील 'किल्ले नळदुर्ग'ला भेट दिली. भु...