Thursday, 28 October 2021

ऑफबीट - किल्ले सांकशी ( Offbeat - Sankshi Fort )

                  'सांकशी'च्या भेटीनंतर लिहायचे तर, "किल्ले सांकशी" पेण तालुक्यापासून दहा किमीवर अलीकडे आणि आमच्या राहत्या 'पनवेल' पासून ४० किमीवर आहे. उंची साधारण ८५० फूट, सह्याद्रीच्या मूळ रांगेत आणि चढाईच्या बाबतीत कठीण श्रेणीत मोडणारा हा किल्ला.

किल्ले सांकशी (Sankshi Fort)
            'पनवेल'हून निघताना 'गोवा' हायवे धरून 'किल्ले कर्नाळा' ओलांडल्यावर साधारण १५ किमी वरील 'तरनखोप'ला डावं वळण घ्यावं लागतं. तिथून ८-९ किमी असलेलं 'मुंगोशी' मार्गे 'बळीवली' गांव गाठायचं. रस्ता बेताचाच असल्यानं वाहन काळजीपूर्वक चालवावं लागतं. चढाची वळणं घेताना 'मुंगोशी' गावातूनच समोर किल्ल्याचा अजश्र आडवा डोंगर दिसतो. या डोंगराला वळसा मारून 'प्रधानवाडी'तून रस्ता 'बळीवली'त येतो.
मुंगोशीतून दिसणारा किल्ले सांकशी 

           'बळीवली' गांव सोडून डोंगर पायथ्याला 'बद्रूद्दीन दर्गा' आहे. दर्ग्यासमोर पार्किंगसाठी प्रशस्त जागा आहे. "दर्ग्याचा किल्ला" म्हणूनही 'सांकशी'ला ओळखले जाते. किल्ल्याला सध्या प्रवेशदार किंवा बुरूज, तटबंदी अस्तित्वात नाही. कधीकाळी ती असल्यास काळाच्या ओघात नष्टही झाली असावी. पण किल्ल्यावर बऱ्याच प्रमाणात कातळात खोदलेल्या पाण्याच्या टाक्या दिसतात. बहुतेक टाक्या पावसानंतरच्या गाळानं आणि गवतानं भरलेल्या दिसतात. त्यामुळं प्रत्येक टाकिपर्यंत जाणं शक्य होत नाही.

गाडीवाट 

                आम्ही साधारण साडे आठ वाजता तिथं पोहोचून,दर्ग्यात किल्ल्यावर जाण्याच्या वाटेची चौकशी केली. पण हे सांगण्यास कोणी उत्सुक दिसलं नाही. तिथं सकाळी झाडलोट करणाऱ्या एकानं मात्र 'ती समोर दिसणारी गाडीवाट धरून जा' असं सांगितलं. पण ही वाट किल्ल्याकडे न जाता, डोंगराला पुढे समांतर जाणारी दिसली. साधारण पंधरा मिनिटांनी शंका आल्यावर पुन्हा दर्ग्यात येवून विनंती केली. तेव्हा त्यापैकी एकानं 'उधर शिवाजीका लिखा बोर्ड मिलेगा, वहासे जाव' इतकंच सांगितलं. वाढलेल्या झुडूपांच्या आड आम्ही 'सह्याद्री प्रतिष्ठान'चा बोर्ड शोधून काढला आणि मार्गी लागलो.

   
किल्ले सांकशी पायवाट 

            या दर्ग्यासमोर एक मस्जिदीची वास्तु दिसते. पुरातन आणि वास्तूवर वाढलेल्या पावसाळी गवतामुळं त्या वास्तूचा शांत रानात वेगळाच परिणाम जाणवतो. याला 'दिन मस्जिद' म्हणतात. सकाळच्या उन्हात, दवबिंदुनं चमकणाऱ्या  गवतात तिचं वेगळेपण उठून दिसतं. सुघड चौथऱ्यावर, पांढरा रंग उडालेली आणि कुलुपबंद असलेली ही किल्ल्याच्या डोंगर पायथ्याची वास्तु, सुंदर इस्लामिक स्थापत्यशास्त्राचा नमूना म्हणून पाहायला मिळते. नंतर चौकशी करता त्याचे दरवाजे वर्षातून एकदाच ठराविक दिवशी उघडण्यात येतात अशी प्रधानवाडीत माहिती मिळाली. या वास्तूच्या बरोबर समोर गवतातून उजव्या बाजूनं डोंगराकडं गेल्यास, आडाला हा 'सह्याद्री प्रतिष्ठान'चा बोर्ड दिसतो. 

पुरातन मस्जिद वास्तु (Sankshi Fort)  

            या बोर्डाजवळून एक पायवाट दाट झाडीतून किल्ल्यावर जाते. किल्ल्यावर फारसे कोणी फिरकत नसावेत असं वाटेवर वाढलेल्या गवतावरून दिसत होतं. तीव्र चढाची नागमोडी वळणं घेत दगडधोंडयातून पायवाट साधारण अर्ध्या तासात डोंगराच्या काळ्या कातळाजवळ येवून पोहोचते. इथं वाटेवरूनच समोर कातळ कड्याच्या उंच उतारावर अवघड जागी मोठी आयताकृती कोरलेली पाण्याची टाकी दिसते. आणि ही पायवाट तिथं संपते.

कातळवरील टाकी 

चढाईस मदत करणारा मावळा 

sankshi Fort

                 समोर अजश्र कातळ आणि उजवीकडं दरी दिसते. पुढील चढाई मात्र हा खडा कातळ (Rock Pach ) चढून करावी लागते. पावसामुळं खडकावर शेवाळ वाढलेलं दिसतं. खडकावरून ओघळणाऱ्या पाण्यामुळं ही पुढची पंधरा वीस फुटांची चढाई थरारक आणि धोकादायक आहे. आम्ही पोहोचलो त्यावेळी वरुन खाली दोर सोडलेला दिसला. उभ्या कातळावर अगदी मोजक्या ठिकाणी लक्षात न येतील अशा  खोबण्या ठेवल्या आहेत की नीट पायही ठेवता येत नाही. या खोबण्या आणि कातळतील फटींचा आधार घेत, शांत आणि संयमानं इथली चढाई करावी लागते. हा रॉक् पॅच चढताना दरीच्या बाजूनं वर जातो आणि वर शेवटी कोरलेल्या चार पाच पायरीपर्यंत येवून संपतो. 

                 साधारण पंधरा वीस फुटांचा हा टप्पा चढताना शेवाळांमुळं अवघड आहेच पण उतरतानाही खाली दरीत नजर जाताच पाय लटपटायला लावणारा आहे. या थरारक आणि धोकादायक चढाईमुळं या किल्ल्याच्या नादी कोणी फारसं लागत नसावेत. 


                 आम्ही तिथं पोहोचलो त्यावेळी 'सह्याद्री प्रतिष्ठान' च्या सात-आठ मावळ्यांचं किल्ल्यावर गवत सफाईचं काम चालू होतं. आमची चाहूल लागताच त्यांनी वरुन दोर हलवून प्रतिसाद दिला आणि मदतीसाठी चार पायऱ्या उतरून सामोरे आले. पण वर बांधलेल्या दोराची ओढ दरीकडे असल्यानं तो टाळून आम्ही एक एक करून तो कातळटप्पा सर केला. वर आल्यावर त्यांचे आभार मानले. 

सह्याद्री प्रतिष्ठान चे श्री प्रविण पाटील आणि इतर श्रमदान करताना 

                 चढून तर वर आलोय पण उतरतानाचा धोका आणि धास्ती आम्हाला होतीच. इतर ग्रुप बरोबर एक एकटयानं ट्रेकला जावून पत्करलेला धोका आणि आम्ही एकाच कुटुंबानं एकत्र, अपरिचित आणि डोंगरतल्या एकाकी ठिकाणी जावून पत्करलेला धोका अशा वेळी लक्षात येतोच. याआधी कोथळीगड,  इर्शाळ, धोदानीच्या बाजूनं केलेला विकटगड आणि आता सांकशीलाही  तो लक्षात आला. असो.. 

डावीकडील गाळानं भरलेली टाकी (Sankshi Fort)

                 हा अवघड टप्पा पार करून वर आल्यास लहान सपाटी दिसते. इथं डाव्या बाजूला जमिनीवर कातळात  एक पाण्याची टाकी कोरलेली आहे. टाकी गाळानं भरलेली दिसते. तर उजवीकडं समोरच्या कातळ पायथ्याला खोदलेली दुसरी प्रशस्त आणि खोल कोरलेली टाकी दिसते. त्यात स्वच्छ पाणी आहे. ही टाकी इतकी प्रशस्त आहे की, वरील कातळाला आधार देण्यासाठी टाकीत दगडी खांब ठेवलेले दिसतात. टाकीच्या वर चौकटीच्या ठिकाणी कोरीव काम लक्ष वेधून घेतं. या टाकीच्या बाजुनं पुढे कातळच्या पायथ्यानं अशाच कोरलेल्या पाण्याच्या टाक्या दिसतात. पण पावसानंतरच्या वाढलेल्या गवत झुडुपांमुळं आम्हाला तिथं पोहोचता आलं नाही. 

                 या टाकीच्या बाजूलाच कातळात केशरी रंगानं सुशोभित केलेलं चौरसाकृती  मंदिर दिसतं. याला 'वज्राई' किंवा 'जगमातेचं' मंदिर म्हणतात. ज्या 'शांक' राजानं हा किल्ला बांधला, त्याची ही 'जगमाता' मुलगी. कर्नाळयाच्या लढाईत तो मारला गेल्यावर या मुलीनं किल्ल्याच्या कड्यावरून उडी मारून जीव दिला, अशी दंतकथा सांगितली जाते.

दुसऱ्या टप्प्याची शिडी आणि बाजूला जगमाता मंदिर 

 
जगमाता मंदिर (Sankshi Fort)


              नवरात्रीत या मंदिराच्या उंबऱ्यावर रोज नवीन फुलांचा हार घालून दिवाबत्ती आजही केली जाते. दसऱ्यानंतर लगेच तिथं आमचं जाणं झाल्यामुळं आजही तो हार ताजा वाटत होता. 
             हे मावळे पावसाळा संपल्यानंतर प्रत्येक रविवारी पहाटे इथं येवून जमेल तितकं गवत आणि झुडुपं तोडतात. किल्ल्याच्या पायवाटेवर पुन्हा गवत उगवू नये म्हणून रसायन फवारणी करतात. श्री प्रवीण पाटील या ग्रुपचं सारथ्य करत होते. त्यांनी किल्ल्याबद्दल आम्हाला बरीच माहिती दिली. त्यानीच तो दोर खाली  सोडून ठेवला होता.

            'सह्याद्री प्रतिष्ठान'नं स्थानिक मावळे सभासदांना पावसानंतर एक एक गड किल्ला साफ करण्याची जबाबदारी दिली होती. आणि हे मावळे ती प्रामाणिकपणे पार पाडताना दिसत होते. उन्हं आणि उष्णता वाढल्यानं त्यांचं काम थांबवून परत उतरायची तयारी चालली होती. त्यांना पुन्हा पुढील रविवारी पहाटे इथं येवून पुढे काम चालू ठेवायचं होतं. आम्ही एकमेकांचे मोबाईल नंबर घेवून, आभार मानले आणि त्यांनी आमचा निरोप घेतला.  
दुसऱ्या टप्प्याची शिडी आणि प्रतिष्ठान चे मावळे 

               जगमातेचं मंदिर बघून, आणखी एक अवघड कातळ टप्पा चढून वर यावं लागतं. या टप्प्याला लावलेली शिडी चढून वर आल्यास वाट छोट्या खिंडीतून पुढे येते आणि डावी उजवीकडे अशी किल्ल्याच्या डोंगरमाथ्यावर जाते. आधी या कातळ टप्प्याला शिडी लावली नव्हती, त्यामुळं हा टप्पाही थरारक होता. पण या टप्प्याखाली दरी नसल्यानं जीवावरचा धोका नव्हता.  तशी या टप्प्याला मुळी शिडीची आवश्यकता नव्हती, मागील वर्षीच ती तिथं लावली गेली. या दोन कातळटप्प्यामुळंच किल्ल्याची चढाई कठीण श्रेणीत येत होती. अजूनही पहिल्या टप्प्यामुळं पावसाळ्यात ती धोकादायक आहे. त्यामुळं पावसात आणि त्यानंतर लगेच हा ट्रेक टाळावा. 

           

कातळतील कोरलेली चौकट 

               या खिंडीपुढे समोर कातळात कोरलेली चौकट दिसते. हे अर्धवट राहिलेलं काम असावं किंवा पहारेकऱ्यांना विसावा घेण्याची जागा असावी. या जागेत एका वेळेस तीन चार जण बसु शकतील किंवा एकजण आरामात झोपू शकेल इतकी जागा आहे. ऊन पावसापासून या जागेत बचाव होवू शकतो अशी ही जागा आहे. त्यापुढेच  जमिनीवरील कातळात दोन पाण्याच्या टाक्या दिसतात.
पाण्याच्या दोन टाक्या (Sankshi Fort)

     उजवीकडील पायवाटेनं एक लहानसा चढ चढून वाट किल्ल्याच्या सर्वोच्च माथा असलेल्या बालेकिल्ल्यावर येते. बालेकिल्ल्यावर भगवा फडकत असून उजवीकडं उद्ध्वस्त वाड्याचे अवशेष दिसतात. स्थानिक लोक याला 'राजदरबार' म्हणतात. राजदरबाराचे अवशेष कमरेइतक्या वाढलेल्या गवतात शोधावे लागतात. 
(Sankshi Fort)

बालेकिल्ल्यावरील भगवा 

सांकशीवरून दिसणारा माणिकगड 

         


                या बालेकिल्ल्यावरून उत्तरेला 'कर्नाळा' तर ईशान्येला 'माणिकगड' दिसतो. मागे 'माणिकगड' ट्रेक केला त्यावेळी हा 'सांकशी' आम्ही तिथून पाहिल्याच आज आठवलं. तसा 'माणिकगड'च्या ब्लॉगमध्ये उल्लेखही केला आहे. बालेकिल्ल्यावरून पश्चिमेला डोंगर उतारावर कोरलेली मोठी पाण्याची टाकी दिसते. वाढलेल्या गवतामुळं उतार जमिनीचा अंदाज येत नाही, त्यामुळं या टाकीपर्यंत उतरताना प्रत्येक पाऊल सावध टाकावं लागतं. या टाकीतील पाणी पिण्यायोग्य स्वच्छ दिसतं. 
पश्चिमेकडील टाकी 

               बालेकिल्ल्यापासून मागे, वर आलेल्या खिंडीपासून डावीकडे वळल्यास कातळात खोदलेल्या एकत्र पाच टाक्या दिसतात. त्यापैकी एका टाकीत पाणी भरलेलं आहे तर बाकी चार कोरड्या दिसतात. कदाचित या चार टाकींना खाली कातळात नैसर्गिक गळती असावी. भटकंती दरम्यान बऱ्याच किल्ल्यांवर जशी टाक्यांची निर्मिती दिसली, तशी इथल्या पाचही टाक्यांमध्ये खोदतानाच मध्ये कातळभिंती ठेवून निर्माण केलेल्या दिसतात. पाणिगळती झाल्यास किमान बाजूंच्या टाकीतील पाणी टिकून राहावे हा उद्देश असावा. आणि तो इथं साध्य झाल्याचं दिसतं. या टाकीत पाणी जमा होण्यासाठी कातळातच एकमेकांना आणि टाकींना जोडणारे चर दिसतात. तर या चरांमध्येच खोल खळगे ठेवलेले दिसतात. पाण्यावाटे वाहून आलेला गाळ या खोल खळग्यात साठून फक्त स्वच्छ पाणी या चरातून टाकीत जमा होईल अशी व्यवस्था केलेली दिसते. 

गडमाथ्यावर कातळात खोदलेल्या पाण्याच्या पाच टाक्या 

किल्ले सांकशी 

          या पाच टाक्यांपासून बालेकिल्ल्याच्या दिशेने दिसणाऱ्या पश्चिमेकडील दरीत पाहिल्यास, उभ्या कड्यावर आणखी एक पाण्याची टाकी दिसते. त्या अवघड ठिकाणी ती कोणत्या उद्देशानं व कशी निर्माण केली, हे एक कोडं आहे. कदाचित परकीय हल्ल्यात किल्ल्यावरील पाणी विष टाकून दूषित केल्यास तो राखीव पाणीसाठा अशा अवघड जागी सुरक्षित रहवा, किंवा उन्हाळ्याच्या सरत्या दिवसात निर्माण होणारी पाण्याची गरज भागवण्यासाठी त्यामागील उद्देशही असावा. कदाचित त्यावेळी त्या टाकीपर्यंत जाण्याची वाट अस्तित्वात असेलही, आणि कालानुरूप ती ढासळलीही असावी. पण सध्या त्या टाकीपर्यंत कड्यावरून उतरण्यासाठी गिर्यारोहण तंत्राची कला अवगत असणे आवश्यक आहे. 

                   सध्या किल्ल्यावर पावसानंतरची सफाई पूर्ण झालेली नसल्यामुळं गडमाथ्यावर सर्वत्र कमरेइतकं गवत वाढलं आहे. त्यामुळं चालताना प्रत्येक पाऊल सावध टाकावं लागतं. 

पश्चिम कड्यावरची टाकी 

गडमाथा (Sankshi Fort)

                      बालेकिल्ल्यावरून किल्ल्याचा डोंगर एकूण इंग्रजी 'L' आकाराचा दिसतो. पण या पाच टाक्यांच्या पुढे डोंगराला प्रचंड मोठी नैसर्गिक दरी असल्यानं पुढं जाता येत नाही. त्यामुळं गडमाथा आटोपशीर राहीला आहे. किल्ल्याच्या या दक्षिण आणि पश्चिम बाजूला अशा उभ्या ताशीव कड्यांमुळं नैसर्गिक संरक्षण मिळालं आहे. 
दोन डोंगरांमधील नैसर्गिक दरी 

कातळ कडा (Sankshi Fort)

'L' आकारात दिसणारा किल्ल्याचा डोंगरमाथा (Sankshi Fort)

               हा किल्ला आधी गुजरातच्या सुलतानाच्या ताब्यात होता. अहमदनगरच्या निजामाने तो जिंकून घेतला. पुढे पोर्तुगीजांची मदत घेवून,सुलतानाने तो परत ताब्यात घेतला. सुलतान किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात देऊन परत गुजरातला निघून गेला. दरम्यान निजामाने पुन्हा हल्ले सुरू ठेवले. सततच्या हल्ल्यांना कंटाळून शेवटी पोर्तुगीजांनी हा 'सांकशी' आणि 'कर्नाळा' किल्ला निजामाकडून विकत घेतला. १६४४ ला छत्रपतींनी कल्याण, रायरी सोबत 'किल्ले सांकशी' स्वराज्यात आणला.  

                गडपायथ्याला असलेल्या 'बद्रूद्दीन दर्ग्या'बद्दल तर फार चमत्कारिक माहिती मिळते. ज्यांच्या नावानं हा दर्गा बांधला ते 'हजरत सय्यद बद्रूद्दिन हुसेनी' हे इस्लामिक राजवटीतील 'चीशती' घराण्यातील होते. 'सांकशी' दरम्यान झालेल्या लढाईत ते मारले गेले. घोड्यावर स्वार असलेल्या बद्रूद्दिन हुसेनींचं मुंडकं 'सांकशी' च्या पायथ्याला पडलं. उरलेलं धड शत्रूसैन्याशी लढत सध्याच्या 'किल्ले परांडा' इथं कोसळलं. जिथं किल्ले 'सांकशी'च्या पायथ्याला त्यांचं मुंडकं पडलं, तिथंच हा सध्याचा दर्गा बांधला गेला. तर जिथं त्यांचं धड घोड्यावरून खाली कोसळलं तिथं परांड्यालाही असाच एक दर्गा उभारला गेला. 

बद्रूद्दिन दर्गा (Sankshi Fort)
मागील वर्षीच आम्ही मराठवाड्याच्या भटकंतीत 'किल्ले परांड्या'ला भेट दिली होती. 'किल्ले सांकशी' ते 'किल्ले परांडा' हे साधारण ३३५ किलोमीटर इतकं दूर अंतर आहे. त्या काळची ही चमत्कारिक घटना जर खरोखर घडली असेल, तर ते त्या खुदालाच माहीत. पण 'किल्ले परांड्या'लाही आज याच नावानं आणि याच घटनेच्या आधारे तिथंही दर्गा आहे..   

                               || श्री कृष्णार्पणमस्तू ||
येथे - जयवंत जाधव  

Saturday, 1 May 2021

ऑफबीट - धाराशीव (उस्मानाबाद) लेणी आणि पुरातन महादेव मंदिर. जि. धाराशिव, महाराष्ट्र. Offbeat - Dharashiv Caves and Shiv Temple. Dist. Dharashiv, Maharashtra.

                गोरोबा काकांच्या 'तेर' गावानंतर आमचं पुढचं नियोजन कुलदैवत श्री 'तुळजाभवानी' होतं. 'तेर' नंतर धाराशिव मार्गे (उस्माणाबाद) 'तुळजापूर'ला जाणं हा जवळचा एकमेव पर्याय होता. धाराशिव शहराजवळच 'धाराशीव'(उस्मानाबाद) लेणी आहेत. 'तेर'ला आमचा पूर्ण दिवस गेलाच. 'धाराशीव लेणी' नियोजनात नसल्यानं तिथून जाता जाताच संध्याकाळी वाट वाकडी करून लेणी गाठायचं ठरवलं. 

               आजपर्यंत भेट दिलेली घारापुरी, अनेकदा भेट दिलेली कान्हेरी, वेरूळ, अजिंठा, भाजे, बेडसे लेणी, कार्ल्याची लेणी इत्यादि नजरेसमोर होतीच. मग औटघटकेसाठी आम्ही इथंही भेट द्यायचं ठरलं. 

मंदिरासमोरील समाध्या (Dharashiv Caves -Usmanabad)

              'तेर'हुन नैऋत्येला असलेलं २२ किमीचं 'धाराशिव' तासाभरात गाठलं. लेण्याकडं जाण्यासाठी धाराशिव शहराच्या मध्यवर्ती भागातूनच जावं लागतं. गल्लीबोळातल्या या रस्त्यांचं काम त्यावेळी चालू होतं. आज सलग प्रवास आणि उन्हातून भटकंतीचा आमचा दूसरा दिवस होता. स्वतः ड्रायव्हिंग करणं, ही इथली शनिवारची ट्रॅफ़ीक मधली संध्याकाळ, रस्त्याची दुर्दशा आणि स्थानिक रिक्षावाले या सर्वांनी मेटाकुटीला आणलं. या अपरिचित लेण्यांना भेट देता येईल या उमेदीनं अडचणींना तोंड देत होतो. 

              उस्मानाबादच्या वायव्येला ५ किमीवर असलेल्या लेण्यांकडे शहर सोडून पुढे पठारावरून उतार रस्ता बऱ्यापैकी आहे. रस्ता संपतो तिथेच डावीकडं लेण्यांसाठी चेकपोस्ट आहे. तिथून खाली उतरणाऱ्या पायऱ्या सुरू होतात. वेळ उशीरा संध्याकाळची असल्यानं एखादं कुटुंब वगळता आम्ही पोहाचेपर्यंत तिथून सर्वजण परतले असावेत. चेकपोस्टवर कोणी कर्मचारी किंवा पहारेकरी तसं कोणीच दिसलं नाही. पुढं आम्ही फक्त चौघेच उरलो.      

 लेण्यांकडे जाणाऱ्या पायऱ्या (Dharashiv Caves) 
                   इथली लेणी एकूण दोन ठिकाणी विभागली आहेत. पायऱ्या उतरून सरळ डावीकडं झाडीतून जाणाऱ्या डोंगरऊतारावर सरासरी पाऊण किमीवर तीन लेणी आणि या पायऱ्या उतरतानाच उजवीकडं वळून जाणाऱ्या पायऱ्यांवरून गेल्यास जवळच चार लेणी आहेत. ही चार आणि सरळ समोरच्या डोंगरातील तीन अशी एकूण सात लेणी या बालाघाट डोंगररांगेत दिसतात. दोन्ही लेण्यांच्या मध्ये सखल जमिनीवर गवत आणि तुरळक झुडपं आहेत. त्यामुळं समोरासमोर आसणारी ही लेणी एकमेकांपासून दिसतात.   

                या उजवीकडच्या चार लेण्यांच्या समोर एक जुनं महादेव मंदिर दिसतं. याला समाधी मंदिरही म्हणतात. लेण्यांसमोर उतारावर हे मंदिर आहे. मंदिराच्या समोर एक चिंचेच प्रचंड झाड आहे. झाडाखाली चौथऱ्यावर तीन जुन्या समाध्या दिसतात. समाध्यांच्या  अलीकडे शेंदूर लावलेली हनुमान मूर्ती आणि दुसऱ्या एका देवतेची भग्न मूर्ती दिसते. समाधीच्या चौथाऱ्यावरच एक प्रचंड झाड कोसळलेलं दिसत होतं. 

   
समाधी मंदिर (Dharashiv) 

    

समोर समाधी मंदिर आणि उजवीकडे पहिली लेणी 

     

 
     
वाड्याच्या मधील मंदिर (Dharashiv) 
 
    

           
डावीकडे मंदिराचे प्रवेशद्वार आणि समोर वाड्याच्या ओवऱ्या 
                    आत समाधी मंदिरात गाभारा मधोमध असून सभोवती दगडी ओवऱ्यांची रचना असलेल्या  जुन्या वाड्यासारखं बांधकाम दिसतं. मधोमध असूनही मंदिर वाड्यापासून अलिप्त दिसतं. कळसाचं दर्शन घेण्यासाठी या वाड्याच्या छतावर जावं लागतं. वर जाण्यासाठी जेमतेम अरुंद चिंचोळ्या दगडी पायऱ्या आहेत.

               मंदिराची दगडी ठेंगणी चौकट ओलांडून आत मंडपात आल्यास उजवीकडं शिवपिंड दिसते. पिंडीची रचना एकावर एक गोल दगडी चकत्या ठेवल्याप्रमानं वर निमुळती आहे. तर गाभाऱ्यात असलेली शिवपिंड ही वर निमुळत्या होत जाणाऱ्या चार चौरस दगडी चकत्या दिसतात. सभामंडप आणि गाभारा अशा दोन्ही ठिकाणी या विशिष्ट आकाराच्या शिवपिंड्या दिसतात. क्वचित ठिकाणीच आशा रचनेच्या पिंड्या असाव्यात. सभामंडपात आणि गाभाऱ्यात काळोख असून बॅटरीची गरज आहे. शिवपिंडिंना अर्पण केलेल्या हार - फुलांवरून या निर्जन ठीकाणी मंदिरात नित्य पूजा होत असावी.  

सभामंडपातील शिवपिंडी (Dharashiv Caves) 

     

मंदिराच्या सभामंडपातून गाभारा 
    
समाधी मंदिरातील ओवऱ्या (Dharashiv)

             
                  चिंचोळ्या पायऱ्या चढून वर मंदिराच्या छतावर येता येतं. आम्ही इथं आलेल्या संध्याकाळी इथलं वातावरण विहिंगम होतं. अस्ताला जाणाऱ्या सूर्याच्या केशरी रंगछटा आकाशात विलोभनीय पसरल्या होत्या. तीन-चारशे वर्षापूर्वीचं  हे समाधी मंदिर, छतावरून दिसणारा त्याचा कळस, समोर खडकात कोरलेली लेणी आणि समोर सखलातलं तुरळक जंगल हे सगळं या छतावरून एका दृष्टिक्षेपात येतं. अंधारून आलं आणि पुढं लेणी बघण्यासाठी आमची धावपळ उडाली. 

छतावरून दिसणारं दृश्य (Dharashiv)
    
गाभाऱ्यातील मूळ शिवपिंडी (Dharashiv Caves) 
               
                 पहिल्या लेण्याच्या पायऱ्या चढून गेल्यास ओसरी दिसते. समोर कोरीव दगडी चौकट ओलांडून गेल्यास आत गुहेसारखी खोली दिसते. दगडी चौकटीच्या वर अर्धवट सोडलेलं कोरीव काम दिसतं. वेळ संध्याकाळची असल्यानं आत अंधार दिसला. टॉर्च चालू केल्यास समोर भव्य कोरीव पण ओबडधोबड मूर्ती दिसते. कालानुरूप मूर्तीची झीज झाल्यानं अंदाज येत नाही. ही बुद्ध मूर्ती असावी. 

पहिल्या लेण्यातील बुद्ध मूर्ती (Dharashiv Caves) 

   

पहिली लेणी (Dharashiv Caves)

             
                    पुढे दुसरी लेणी ही सुरवातीलाच बांधीव दगडी खांबांनी छताला आधार दिलेली दिसते. एकूण सोळा खांबांनी आधार दिला असून ढासळणाऱ्या लेण्यांना आधार देण्यासाठी हे काम अलीकडेच केलेलं दिसतं.

दुसरी लेणी (Dharashiv Caves)
दुसरी लेणी 

 


तिसरी लेणी (Dharashiv Caves)

 
तिसऱ्या लेण्याची प्रवेश कमान 

                          पायऱ्या चढून तिसऱ्या लेण्याच्या ओसरीवर जाण्यापूर्वी सुरवातीला दगडात कोरलेली सुंदर कमान  दिसते. कमानीच्या डावी उजवीकडं द्वारपाल कोरले आहेत. उजवीकडील द्वारपालाची कोरीव मूर्ती नष्ट झाली असून, डावीकडील बऱ्यापैकी शाबूत दिसते. या लेण्याचीही दुरुस्ती चालू असून, त्याच्याही छताला आधार देणारे आणि सिमेंटचा गिलावा  केलेले नक्षीदार गोल खांब दिसतात. तर आत चौरस दगडी खांब छताला आधार देतात. ही लेणी सर्वात मोठी दिसते. आत काळोख असून वटवाघूळांच राज्य दिसतं. आत प्रवेश करतानाच वटवाघूळांमुळं निर्माण झालेली उष्णता जाणवते. 


चौथी लेणी (Dharashiv Caves)

     

तिसऱ्या लेण्यातील दुरुस्ती (Dharashiv Caves) 
            



                      




              

                


                तर पुढची चौथी लेणी आकारानं लहान असून, तिचीही दुरुस्ती चालू असल्याचं दिसतं. 

               या चार लेण्यांपैकी पहिली लेणी वगळता, पुढची तीन लेणी कधीकाळी ढासळली असावीत. सध्या त्यांच्या दुरुस्तीचं काम घेतलेलं दिसतं. त्यांचं मूळ सौंदर्य नष्ट झाल्याचं जाणवतं. दुसरी आणि तिसरी लेणी भव्य आहेत. काळाच्या ओघात त्यांचीही पडझड झाली असून कोरीव काम नष्ट झालेलं दिसतं. एकंदर या लेण्यांकडे सुरुवातीला शासनाचं दूर्लक्ष झाल्याचं दिसतं. स्थानिक तरुण पर्यटकांनीही या लेण्यांच्या आणि मंदिराच्या भिंतींवर आपल्या भावना लिहून प्रताप दाखवलेले दिसतात.  

               ही पाचव्या शतकातील बौद्ध लेणी बाराव्या शतकात जैन लेण्यात परावर्तित झाली असावीत. 

              या लेण्यांबद्दल विस्तृत माहिती 'लोकसत्ता'च्या 'लोकभ्रमंती' सदरात 'श्री अमित सामंत 'यांनी लिहिलेला लेख ७ डिसेंबर २०१६ ला प्रसिद्ध झाला होता. डोंबिवलीचे श्री अमित सामंत यांचा विविध गड किल्ले, प्राचीन मंदिरं, लेणी या बाबत गाढा अभ्यास असून, या लेखानिमित्त इथं या इतिहास अभ्यासकाचा उल्लेख येणं हा बहुमान समजतो. धाराशीव आणि आजूबाजूच्या ऐतिहासिक ठिकाणांबद्दल  https://samantfort.blogspot.com/2017/10/blog-post.html?m=1 या त्यांच्या लिंकवर अभ्यासपूर्ण माहिती मिळते.

                आधी 'किल्ले परांडा' या लेखातून उल्लेख केल्याप्रमाणे 'धाराशिव' हे  दक्षिण आणि उत्तरेच्या प्राचीन व्यापारी मार्गावरील महत्वाचं ठिकाण होतं. तर आम्ही आता जिथून आलो ते 'तेर' म्हणजेच 'तगर' हे प्राचीन काळी व्यापार, संस्कृती आणि धर्म प्रचाराचे एक प्रमुख केंद्र असल्याचा उल्लेख गोरोबा काकांच्या ब्लॉगमध्ये केला आहेच. त्यामुळं बाजूला संरक्षणासाठी भुईकोट 'किल्ले परांडा' आणि व्यापार प्रवासादरम्यान आरामासाठी ही 'धाराशिव लेणी' त्यावेळी वापरात आली असावीत. 

                    वाढणारा अंधार आणि तुळजापूर मुक्काम वेळेत गाठण्यासाठी आम्ही पलीकडील तीन लेण्यांना भेट देवू  शकलो नाही याची हुरहूर राहिलीच..    

                                             || श्री कृष्णार्पणमस्तू ||

येथे - जयवंत जाधव           

Saturday, 3 April 2021

लोहगड ( Lohagad )

                   'उंबर खिंडी'चा रणसंग्राम इ. स. १६६१ ला झाला. मूठभर मराठा सैन्यानं हजारो मुघल सैन्याची दाणादाण उडवली. त्यावेळी मुघल सरदार करतलब खान, स्त्री सरदार रायबाघन यांना शिवछत्रपतींनी जीवदान देऊन सोडून दिलं. स्वराज्याच्या मुळावर उठलेलं हे संकट आणि ती भरभक्कम तयारीची मोघल फौज राजांनी पुढं गनिमी काव्यानं उंबरखिंडीत गाठण्यासाठी  लोहगड - विसापूर खिंडीतून जाऊ दिली. या खिंडीत आल्यास उजवीकडं लोहगड आणि डावीकडं विसापूर किल्ला दिसतो.

लोहगडावरून - किल्ले विसापूर (Lohagad)

       जुना मुंबई - पुणे हायवे'न लोणावळा सोडून ८ किमीवर एक चौक दिसतो. पुण्याकडं जाताना या चौकात डावं वळल्यास सरळ एकविरा देवीला पोहचतो, तर तिथूनच उजवं वळल्यास रस्ता लोहगडला घेऊन जातो. या हायवेवरून एकमेकांसमोर असलेल्या लोहगड - विसापूर किल्ल्यांची जोडी दिसते. उजवं वळून दोन किमीवर मुंबई - पुणे लोहमार्गावरील 'मळवली' स्टेशन दिसतं. मळवलीच्या पुढं एक्सप्रेस हायवे ओलांडून दोन किमीवर डावीकडं प्रसिध्द 'भाजे लेणी' आहेत. संध्याकाळी ५ वा. या लेण्यात प्रवेश बंद होतो. त्यामुळं लोहगडला जातानाच ती बघून जाणं सोईस्कर होतं.  

भाजे लेणी (Bhaja Caves)
 
Bhaja Caves

       महाराष्ट्रातले बहुतेक किल्ले इंग्रजांनी तोफा, सुरुंग लावून उध्वस्त केलेत. पण कालानुरूप दुरुस्ती आणि बांधकामं होत राहिल्यानं लोहगड बऱ्यापैकी शिल्लक राहिलाय आणि आजही तो सुस्थितीत दिसतो. सह्याद्रीच्या लोणावळा डोंगररांगेत येणारा, ३४०० फूट उंचीवरील, सुंदर आणि लष्करीदृष्ट्या मजबूत असलेला हा किल्ला भटकंतीत समाधान देऊन जातो. 


लोहगड तटबंदी, चर्या, झरोके आणि समोर दिसणारा किल्ले विसापूर (Lohagad) 

    
किल्ल्यावर जाणाऱ्या पायऱ्या 

                                        

           

        


        

     

   तर, ही लोहगड - विसापूरची खिंड ओलांडली की, डावीकडं वळून रस्ता विसापूरला जातो. तर सरळ जाणारा रस्ता लोहगडला. खिंडी आधी एक घाटरस्ता लागतो. उभ्या चढाचा आणि धोकादायक वळणांचा अरुंद कच्चा रस्ता वाहन चालवताना कसोटी घेतो. लोहगडला एस. टी. बसची आजून सोय नाही पण, घाटातला फुट - फूटभर खड्ड्यांचा रस्ता नवख्या वाहनचालकांना गाड्या बाजूला पार्क करून पायी जाण्यास भाग पाडताना दिसतो.   वर लोहगडवाडीत पार्किंगची सोय आहे. तिथं जेवणाचीही सोय होते.  

        लोहगडवाडीतून अवघ्या अर्ध्या तासात गडमाथा गाठता येतो. 

        सुरवातीपासूनच किल्ल्यावर जाण्यासाठी सुघड पायऱ्या आहेत. वळणावळणाच्या पायऱ्या चढत गेल्यास भव्य तटबंदी आणि बुरुज दिसतात. 

       पहिलाच भव्य दगडी चौकट आणि भक्कम लाकडी दारावर टोकदार खिळे असलेला 'गणेश दरवाजा' स्वागत करतो. चौकटीच्या दोन्ही बाजूस गणेशमूर्ती कोरल्या आहेत. त्यांच्याच वर दोन्हीकडं कोरलेली 'कमळं' दिसतात. दरवाजाच्या आतील बाजूस बांधकाम थोडंफार उध्वस्त असून बऱ्यापैकी शाबूत आहे. समोर उजवीकडं खाली एक शिलालेख असून त्यावर सावळे कुटुंबातील नरबळी देण्यात आला असून, त्याबदली त्यांच्या वंशजांना लोहगडवाडीची पाटीलकी देण्यात आली होती असा उल्लेख आहे. 

गणेश दरवाजा 

        त्यावेळी महत्वाचा बुरुज, प्रवेशदार बांधकामानंतर वारंवार ढासळत असता, ते कायम टिकून राहण्यासाठी असा नरबळी देण्याची प्रथा असावी. पूर्वी लहानपणी कोल्हापूरच्या माझ्या गावी आम्ही दिवसभर नदीपात्रातून उन्हात हुंदडत असता, वडीलधारी मंडळी बाजूला धरणाच्या बांधकामात मुलांना धरून जिवंत घालतात अशी धडकी भरवणारी भीती आम्हाला घालत. ते इथं आठवलं. असो.. 

        गणेश दरवाजाच्या आतील बाजूलाच एक लहान खोली आहे. खोलीत दोन प्रशस्त झरोके दिसतात. त्यांचा रोख लोहगडवाडीच्या दिशेनं किल्ल्याचा रस्ता जिथून सुरू होतो, तिथं तोफमारा करण्यासाठी रोखलेला दिसतो.

            या  गणेश दरवाजाला मजबूत, रुंद तटबंदी असून, तोफमारा करण्यासाठी झरोके दिसतात. तसेच बंदूक आणि बाणांचा मारा करण्यासाठी जंग्या आहेत. या सर्व जंग्यांचा रोख गडावर येणाऱ्या पायऱ्यांवर वेगवेगळ्या कोनातून ठेवलेला दिसतो.   

नारायण दरवाजा 

      या दरवाजाच्या पुढेच पायऱ्या चढून गेल्यास दुसरा भव्य, दगडी 'नारायण दरवाजा' दिसतो. यालाही मजबूत तटबंदी आणि बाजूला बुरुज आहेत. हा दरवाजा नानासाहेब पेशव्यांनी बांधवून घेतल्याचा इतिहासात उल्लेख मिळतो. दरवाजा ओलांडून पायऱ्या चढून वर आल्यास उजवीकडं दोन कातळात कोरलेल्या मोठ्या गुहा दिसतात. या गुहेत त्याकाळी धान्य साठवलं जाई. सध्या तिथं आत कातळातून झिरपणारं पाणी साठून राहिलेलं दिसतं. 

       यापुढील तिसरा 'हनुमान दरवाजा' भव्य आणि सर्वात प्राचीन आहे. दरवाजाच्या दगडी चौकटीवर दोन्ही बाजूस हनुमान मुर्त्या कोरलेल्या दिसतात. आणि त्यांच्याच वर दोन्हीकडे 'शरभ' कोरलेले दिसतात. याही दरवाजांच्या लाकडी दारांवर लोखंडी खिळे आणि साखळदंड आहेत. दरवाजाच्या आतील बाजूस पहारेकर्यांसाठी असणाऱ्या देवड्या दिसतात, तर समोर त्यांना राहण्यासाठी देवड्या दिसतात. सध्या त्या थोड्याफार उध्वस्त दिसतात.    

पहारेकऱ्यांच्या देवड्या 

      लोहगडच्या सुरवातीच्या परिसरात माकडांचा खूप वावर आहे. बरोबर काही खायचं असल्यास इथली माकडं धिटाईनं पिच्छा पुरवतात. सीलबंद बिसलेरी बाटल्यांची झकाणं उघडणं आणि बॅगेंची सहजपणे तपासणी करतानाही दिसतात.   

तटबंदीतील झरोके आणि चर्या (Lohagad Fort)

       इथून वळणावळणांचा गडावर येणारा पायऱ्यांचा मार्ग दिसतो. इथल्या तटबंदीवरून आणि जंग्यातून किल्ल्यात येणाऱ्यांवर सहज मारा करू शकतो. गडावर येण्याच्या सुरवातीपासून ते मुख्य दरवाजात येईपर्यंत शत्रूवर नजर ठेवण्यासाठी आणि मारा करण्याची अप्रतिम लष्करी व्यवस्था या किल्ल्यास आहे. त्यामुळंच कदाचित छत्रपतींच्या पहिल्या सुरत लुटीचा सर्व खजिना सरसेनापती नेतोजी पालकरांनी या किल्ल्यावर ठेवला असावा. 

खाली लोहगडवाडी 
Lohagad Fort 

           
       पुढील पायऱ्या चढून गेल्यास समोर 'सदर' दिसते. सदरेवर न्यायनिवाडा आणि इतर महत्वाचे निर्णय घेतले जात. सदरेवरच गाड्यांवर ठेवलेल्या इंग्रज बनावटीच्या दोन छोट्या सुंदर तोफा आहेत. तिसरी तुटलेली तोफ या दोन तोफांच्या मध्यभागी जमिनीवर बसवलेली दिसते.   
दर्ग्याच्या अलीकडील 'सदर'
सदरेवरील तोफ 
      सदरेच्या डावीकडं दर्गा दिसतो. दर्ग्यात दोन समाध्याही दिसतात. त्या कोणाच्या असाव्यात याचा ठोस पुरावा मिळत नाही. या सदरेपासून डावी उजवीकडून गडफेरी करू शकतो. उजवीकडं फलकावर गडावरील महत्वाची ठिकाणं आणि त्यांची दिशा दाखवलेली दिसते. 

 

पाण्याची टाकी (बुजलेली)

         उजव्या बाजूनं तटबंदीवरुन पुढे गेल्यास डावीकडं जमिनीतील बुजलेल्या पाण्याच्या टाक्या दिसतात. त्याच्याच पुढं 'लक्ष्मीकोठी' दिसते. लक्ष्मीकोठी ही एक कातळात कोरलेली प्रशस्त मोठी गुहा असून, आत दगडी खांबांनी आधार दिलेल्या बऱ्याच खोल्या आहेत. आत अंधार असल्यानं तिथं टॉर्चची गरज आहे. सुरवातीची खोली मोठी हॉलसारखी दिसते. सरासरी शंभर माणसं एकावेळी राहतील इतकी ही गुहा मोठी दिसते. देवळाच्या गाभाऱ्यात समई विझल्यानंतर जसा गंध येतो, तसा एक विशिष्ट तेलकट गंध इथं नेहमी अनुभवास येतो. पहिल्या सुरत लुटीचा खजिना या लक्ष्मीकोठीत ठेवला होता. या गोष्टीवरून लोहगडची सुरक्षितता आणि अभेद्यतता लक्षात यावी. 

लक्ष्मीकोठी (Lohagad) 
   
         या कोठीच्या अलीकडेच आणखी एक प्रशस्त गुहा असून , गुहेतील जमिनीवरील कातळात ओळीनं कोरलेले चौरस हौद दिसतात. या सर्व गुहेंना दगडी चौकट व समोर बांधीव दगडी भिंती दिसतात. बाजूलाच घोड्यांच्या पागा असलेला फलक दिसतो. या सर्वांसमोर तटबंदिखाली लोहगडवाडी दिसते तर समोर बुलंद 'किल्ले विसापूर' लक्ष वेधून घेत राहतो. 

लोहगडावरून - किल्ले विसापूर 

 

पवना जलाशय आणि पलीकडे किल्ले तुंग 

    गडावरून समोर आग्नेयेला पुणे शहरास पाणीपुरवठा करणारा अवाढव्य 'पवना जलाशय' दिसतो. या जलाशयाच्या डावीकडं धुक्यात 'किल्ले तिकोना' तर उजवीकडं 'किल्ले तुंग' दिसतात.                लक्ष्मीकोठीकडून तटबंदी धरून डावीकडं वळल्यास किल्ल्याच्या पश्चिमेकडे जाण्यासाठी पठार लागतं. पुढे चालत राहिल्यास किल्ल्याच्या मागे पश्चिमेला एक लांबलचक, अरुंद माची दिसते. याला 'विंचूकडा' म्हणतात. सरासरी दीड किलोमीटर लांबीची आणि तीस मीटर रुंदीची डोंगराची नैसर्गिक सोंड जणू आजूबाजू आणि समोरच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यास असावी तशी आहे. 'विंचूकडा' हे लोहगडचं प्रमुख वैशिष्ठय आणि आकर्षण आहे. या विंचूकड्याच्या माचीला दोन्ही बाजूनं मजबूत तटबंदी आहे. तटबंदीवर चढण्या उतरण्यासाठी ठीकठिकाणी पायऱ्यांची व्यवस्था दिसते.  

विंचुकडा (Lohagad)
विंचुकड्यावरील टाकी 
Lohagad Fort 

            या माचीवर घरांचे भग्न अवशेष दिसतात. तटबंदीत ठिकठिकाणी छोट्या छोट्या खोल्या असून सौचकूपांची व्यवस्थाही दिसते. या माचीच्या सुरवातीलाच खडकात कोरलेली एक मोठी पाण्याची टाकी दिसते. त्यात पाणी आहे पण सध्या पिण्यायोग्य नाही. वरील या सर्व व्यवस्थेवरून बहुतेक पहारेकऱ्यांच्या राहण्याची ही जागा असावी. किल्ल्याच्या पश्चिमेला या माचीचा आकार निमुळता होत पुढे टोकाला गोलाकार विंचवाच्या नांगीसारखा दिसतो. त्यामुळं या माचीला 'विंचूकडा' नांव पडलं असावं. मूळ किल्ल्याच्या उंचीपेक्षा या माचीची उंची थोडी कमी असल्यानं, माचीवर येण्यासाठी एक कातळटप्पा सांभाळून उतरावा लागतो. 

       विंचूकड्याच्या शेवटी गोलाकार टोकाला बाहेरील तटबंदीच्या आत अंदाजे तीन चार फूट अंतर सोडून दुसरी मजबूत तटबंदी आणि दगडी बांधकाम दिसतं. दोन्ही तटबंदीच्या जागेमधून अर्धगोलाकार वळसा मारू शकतो. तटबंदीत उतरण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था असून दोन्ही बाजूला अतिशय ठेंगणे म्हणजेच तीन - साडेतीन फुटांच्या चौकटीतून वाकून जावं लागतं. या टोकाला दुहेरी तटबंदीनं संरक्षित केलं असून शिल्पकलेचा हा एक उत्तम नमुना आहे.      

           
दुहेरी तटबंदी - विंचुकडा 
दगडी चौकट - विंचुकडा 

      बरेच भटके हा 'विंचूकडा' किल्ल्यावरून दुरूनच बघतात आणि परततात. पण लोहगड ज्यांना पूर्णत्वानं बघायचा आहे त्यांनी विंचूकड्याच्या शेवटच्या टोकाला आवश्य भेट द्यावी. या कड्यावर वाऱ्याचा जोरदार मारा आहे. तटबंदीखाली प्रचंड दरी आणि दरीत जंगल दिसतं. पावसात लोहगडची भटकंती मस्त आहे, पण इथला जोरदार पाऊस आणि वाऱ्याच्या माऱ्यामुळं माचीवर विशेष काळजी घ्यावी. 
      या विंचूकड्यानंतर उजवीकडून गेल्यास गडफेरी पूर्ण करू शकतो. इथं गडमाथ्यावरचं पठार लागतं, ते ओलांडलं की उतारावर एक 'सोळा कोन' असलेलं तळं दिसतं. तळ्यात उतरण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. तळं नानासाहेब पेशव्यांनी बांधवून घेतल्याचा इतिहासात उल्लेख आढळतो. 


सोळा कोनी तळं (Lohagad) 

     तर पठारावरून पुढे दुसरं अष्टकोनी 'त्रंबक तळं' दिसतं. याच्या बाजूलाच कातळात कोरलेली आणखी एक पाण्याची टाकी दिसते. या दोन्हीतील पाणी स्वच्छ आणि पिण्यायोग्य दिसतं. किल्ल्यावर कातळात कोरलेल्या अशा बऱ्याच पाण्याच्या टाक्या दिसतात.


  

त्र्यंबक तळं 



 
       या तालावापासून अलीकडे येताना एक पुरातन महादेव मंदिर लागतं. मंदिर उंचीला लहान आणि साधं, अलीकडेच बांधलेलं दिसतं. आतील शिवपिंड मात्र प्राचिन आहे. मंदिरासमोर काळ्या पाषाणातील भग्न नंदी दिसतो. या मंदिराकडून पुढं चालत आल्यास गडफेरी पूर्ण होऊन पुन्हा दर्गा आणि सदरेजवळ येतो.     
दूरवर महादेव मंदिर 

       एकूण या किल्ल्याची रचना त्रिकोणी आहे. पूर्वेकडून किल्ल्यावर प्रवेश होतो, पश्चिमेकडं विंचूकडा आहे. साधारण दोन तीन तासात गडफेरी पूर्ण होते. गडमाथ्याच्या पठारावर मध्यभागी एक उंच टेकडी असून, या टेकडीवर दर्गा दिसतो. 

     

गडमाथ्यावरील पठार (Lohagad)

टेकडीवरील दर्गा 

     हा किल्ला सरासरी सत्तावीसशे वर्षांपूर्वी म्हणजे ईसवीसन पूर्व ७ व्या शतकात बांधला असावा. सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव या सर्व राजवटी या किल्ल्यानं पहिल्या. १४८९ ला मलिक अहमदनं निजामशाहीची स्थापना करून बरेच किल्ले जिंकले होते. त्यातील हा लोहगड महत्वाचा किल्ला होता. १५६४ ला अहमदनगरचा सातवा राजा, दुसरा बुऱ्हाण निजाम या किल्ल्यात कैदेत होता. १६३० ला किल्ला आदिलशाहीत आला. १६५७ मध्ये शिवछत्रपतींनी कल्याण, भिवंडी, रायरी सोबत जिंकून 'लोहगड' स्वराज्यात आणला. १६६५ ला पुरंदरच्या तहात मुघलांना दिला तर १६७० मध्ये जिंकून पुन्हा ताब्यात घेतला. 

Lohagad Fort 

       पुढे १७१३ मध्ये शाहूमहाराजांनी किल्ल्याचा ताबा दर्यासारंग 'कान्होजी आंग्रे'स दिला. १७२० मध्ये तो पेशव्याकडं आला. दरम्यान नानासाहेबांनी किल्ल्यावरील सोळा कोनी विहीर, नारायण दरवाजा आणि किल्ला आणखी मजबूत करण्यासाठी इतर बांधकामं करून घेतली. त्यानंतर त्यांनी सर्व संपत्ती लोहगडावर हलवली. १८०३ ला लोहगड इंग्रजांनी घेतला, पण दुसऱ्या बाजीरावांनी तो पुन्हा जिंकून घेतला. १८१८ मध्ये 'जनरल प्रॉथर' लोहगड घेण्यासाठी आला. त्याने प्रथम विसापूर जिंकला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी मराठे स्वतःहून लोहगड सोडून निघून गेले.

       नांव सार्थ करणाऱ्या या किल्ल्यास दैदिप्यमान इतिहास असून जास्तीत जास्त काळ 'लोहगड' मराठेशाहीत राहिला..

                             || श्री कृष्णार्पणमस्तु ||

येथे - जयवंत जाधव  

'किल्ले विसापूर' - मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Pune, Maharashtra.

                           उन्हाळ्यात शुष्क झालेल्या धरतीला पावसाने तजेला दिल्यानंतर सह्याद्रीतल्या दऱ्या डोंगरांचे रूप विलोभनीय असेच दिसते....