Saturday, 29 January 2022

प्रबळगड (Prabalgad Fort)

                    बरेच भटके कलावंतीण सुळका आणि 'प्रबळ' ठरवून येतात, पुढे प्रबळचा पसारा बघून  त्यातूनही बरेच माघार  घेताना दिसतात. किल्ले प्रबळचा स्वतःचा आवाका मोठाच म्हणावा लागेल. पायथ्याच्या ठाकुरवाडीपासून प्रबळवाडी आणि पुढे 'बैलशिंग' खिंडीतून प्रबळमाथा ही चढाई मुळी  तीन - चार तासांची आहे. पुढे दाट जंगलातून प्रबळचं पठार फिरण्यास दोन तीन तास लागतातच. प्रबळमाथ्यावर जाऊन येवून पाच किलोमीटर असलेल्या काळ्या बुरुजाला भेट देवून, पुन्हा पायथ्याची ठाकूरवाडी गाठणं नक्कीच सोप्पं नाही. दिवसभर तंगडतोड करायला लावणारी ही भटकंती आहे. 

'प्रबळ' (कलावंतीण वरुन)

                    सह्याद्रीच्या माथेरान डोंगररांगेतील या २३०० फुट उंचीच्या प्रबळचं प्रथम दर्शनच मुळी अवाढव्य, राकट, त्याचे नियम मोडल्यास निर्दयी आणि आजपर्यंत आम्ही सहकुटुंब केलेल्या प्रयत्नात हुलकावणी देणारा म्हणावा लागेल. जुना मुंबई पुणे हायवेवर पनवेल सोडल्यास पहिलं डावीकडं लक्ष वेधून घेतो तो किल्ले प्रबळ आणि त्यापुढेच अगदी समोर किल्ले ईर्शाळगड.

कलावंतीण कडून बैलशिंग खिंडीकडे जाणारी कातळवाट 

प्रबळमाचीवरुण डावीकडे कलावंतीण, उजवीकडे प्रबळ (Prabalgad Fort)
           

               प्रबळ आणि कलावंतिणचा रस्ता मुंबई - पुणे हायवेवर पनवेल सोडल्यास, १० किमी वरील 'शेडुंग' फाट्यापासून डावीकडं गडपायथ्याची ठाकूरवाडी आणि त्यापुढं तासभर प्रबळवाडी पर्यंत एकच आहे. सध्या प्रबळवाडीत जेवणाची राहण्याची सोय आहे. प्रबळवाडी पासून तासाभराची एक पायवाट पश्चिमेकडे प्रबळला समांतर जाते ती 'बैलशिंग' खिंडीत येते. तर कलावंतिण कडून यायचं झाल्यास, कलावंतिण - प्रबळमधील इंग्रजी 'V' आकाराच्या खिंडीपासून कातळकाठानं, दगडधोंडयातून दुसरी तासाभराची वाट याच 'बैलशिंग' खिंडीत येऊन मिळते. कातळापासून सुटलेल्या या धारदार दगडांच्या वाटेवर सावध पावलं टाकावी लागतात.

             गडाच्या उत्तरेकडील 'बैलशिंग' खिंड हीच प्रबळच्या माथ्यावर जाणारी एकमेव वाट म्हणावी लागेल. या खिंडीचा दुरून अंदाज येत नाही. दोन कातळ डोंगरांच्या मध्ये मोठमोठ्या दगडांची झालेली घसरण आणि चहाची टपरी, हीच या खिंडीतून प्रबळ माथ्यावर जाणाऱ्या वाटेची ओळख समजावी. ही वाट म्हणजे एकावर एक उभे दगड, आणि ते सर करत गडमाथा गाठणं इतकंच म्हणावं लागेल. दमछाक झाल्यावर खिंडीतला हा तिसरा उभा टप्पा शरीर पिळवटून टाकणारा आहे. आणि कदाचित या कारणामुळंच बरेच ट्रेकर्स प्रबळ समोर गूढघे टेकत असावेत.

कलावंतीण ते बैलशिंग खिंडीकडे 

      

                 प्रबळवर पाण्याचं दुर्भिक्षच म्हणावं लागेल. माथेरान आधी इंग्रजांनी थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रबळचा विचार केला होता, पण तिथल्या पाण्याच्या कमतरतेमुळं ते झालं नाही. सध्या माथेरानच्या सनसेट पॉइंटवरून पश्चिमेचा सूर्य, दूरवर एका इंग्रजी 'V' आकाराच्या डोंगरखाचेत अस्ताला जाताना दिसतो. ही खाच म्हणजेच प्रबळगड आणि त्या लगत खेटलेला कलावंतिण शिखराचा सुळका होय.
 
माथेरानच्या सनसेट पॉइंटवरून दिसणारी प्रबळ आणि कलावंतीणची 'V' आकाराची खाच (Prabalgad Fort)

 

                 या खाचेलगत डावीकडं कातळात खोदलेली गुहा दिसते. एका वेळी एकजण गूढघ्यावर रांगत आत शिरेल इतकी ती अरुंद, तर आत दूरवर खोदलेल्या गुहेत खोलीसारखी कमी उंचीची जागा दिसते. तर अशीच दुसरी कातळात खोदलेली गुहा बैलशिंग खिंडीच्या तोंडावर, डाव्या बाजूला, खिंड चढायला सुरुवात करण्यापूर्वी दिसते. प्रबळच्या कातळ पायथ्याला असणाऱ्या या दोन गुहा बौद्धकालीन असाव्यात असा अनुमान निघतो.

बैलशिंग खिंडीजवळील गुहा (Prabal Fort)

 

   
कलावंतीण जवळील बौद्धकालीन गुहा  

    
           या बौद्ध कालखंडानंतर येणारे शिलाहार, यादव राजवटींनी या गडास लष्करी चौकी बनवून त्यास 'मुरंजन' नांव दिलं. त्यावेळी पनवेल, कल्याण या प्राचीन बंदरांवर लक्ष ठेवण्यासाठी या चौकीचा वापर केला असावा. पुढे बहामणी काळात तो अधिक उदयास आला. नंतर तो अहमदनगरच्या निजामानं ताब्यात घेतला. मुघल सम्राट शहाजहान आणि विजापूरच्या आदिलशाहनं तह करून निजामशाही बुडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी निजामशाहीत असताना, शहाजीराजांनी निजामशाही वाचविण्यासाठी त्याच्या वारसाला घेवून कोंढाणा, मुरुंबदेवाच्या डोंगरात निघून गेले. 

                पुढे जंजिऱ्याच्या सिद्धीनं आणि चौलच्या पोर्तुगीजांनी शहाजीराजांना मदत नाकारल्यावर, ते जिजाऊ आणि बाल शिवरायांना घेवून ससैन्य मुरंजनवर गेले. शिवाजीराजे अवघे सहा वर्षाचे असतानाच त्यांचे पाऊल मुरंजन म्हणजे प्रबळला लागले होते. पुढे माहुलीच्या तहानुसार गड मुघलांच्या ताब्यात राहिला, पण प्रत्यक्षात सत्ता विजापूरच्या आदिलशाहचीच राहिली. 
                 १६५६ ला शिवरायांनी जावळीच्या चंद्रराव मोरेंना हरवून जावळी ताब्यात घेतली, त्याचवेळी शिवरायांचे शूर सरदार आबाजी महादेव यांनी कल्याण, भिवंडी ते रायरी पर्यंतचा मुलुख स्वराज्यात आणला आणि मुरंजन स्वराज्यात सामील झाला. गड ताब्यात आल्यावर शिवरायांनी मुरंजनचे नांव बदलून 'प्रबळगड' असे ठेवले. १६६५ च्या पुरंदर तहानुसार प्रबळगड मुघलांना देण्यात आला. पण औरंगजेबच्या आग्र्यातील कपटी घटनेनंतर तो तह मोडीत काढून मराठ्यांनी प्रबळ पुन्हा जिंकून घेतला. त्यावेळच्या लढाईत राजा जयसिंगाने नेमलेला प्रबळचा किल्लेदार केशरसिंह हाडा हा राजपूत धारातीर्थी पडला. तत्पूर्वी किल्ल्यावर राजपूत स्त्रियांनी जोहर केला. किल्ल्याच्या झडतीत सापडलेल्या केशरसिंहची आई आणि दोन मुलांना राजांनी देऊळगावी असलेल्या मोघली छावणीत सन्मानानं पाठवून दिलं. पुढे किल्ल्याच्या खोदकामात बरीच संपत्ति राजांच्या हाती आली. 
बैलशिंग खिंड (Prabalgad Fort)
बैलखिंडीची टपरी, प्रबळगड 

                    











                   बैलशिंग खिंडीतून गडमाथा गाठताना वर सुरुवातीला उध्वस्त महादरवाजा दिसतो. आधी तो मातीखाली दबला गेला होता, स्थानिकांच्या मदतीनं तो आता थोडाफार मोकळा केल्याचं दिसतं. या दरवाजाच्या उजव्या बाजूला उतारावर कातळात कोरलेली पाण्याची टाकी दिसते. महादरवाजाच्या आतील बाजूस चहाची आणि विसावा घेण्यासाठी टपरी दिसते. प्रबळवाडीतील एक दाम्पत्य ही टपरी चालवताना दिसतं. शेगडीसाठी लागणारं गॅस सिलेंडर प्रबळवाडीतून ही बैलशिंग खिंड चढून डोक्यावरून आणलं जातं. त्यांची मेहनत बघून, तिथं पोहोचणारा प्रत्येक भटक्या त्यांना सलाम करत असावा.
महादरवाजा (Prabalgad Fort)

उद्ध्वस्त महादरवाजा (Prabalgad Fort)
   
 

महादरवाजातुन दिसणारा किल्ले कर्नाळा (Prabalgad Fort)

             महादरवाजाच्या वरच्या बाजुनं डावी उजवीकडं  पायवाटा जातात. डावीकडील पायवाट दाट झाडीतून गडावरुन नैऋत्येला कलावंतिण सुळक्याच्या दिशेनं जाते, आणि वीस मिनिटात एका कड्यावर येऊन संपते. कलावंतिण सुळका प्रबळपेक्षा उंचीनं काहीसा कमी असल्यानं, प्रबळच्या ईशान्य कड्यावरून कलावंतिणचं धडकी भरवणारं दृश्य दिसतं. या कड्याला संरक्षित कुंपण नसल्यानं काळजी आणि सावधानता बाळगावी लागते. 

प्रबळच्या कड्यावरून कलावंतीण 

 

                 महादरवाजाकडे मागे येऊन उजवीकडील पायवाटेवर अर्ध्या तासाच्या चालीनंतर गडावरील उध्वस्त अवस्थेतील चार वाड्यांचे अवशेष दिसतात. वाड्यांच्या अवतीभोवती मोठमोठी झाडं आणि घनदाट वाढलेलं जंगल दिसतं. वाड्यासमोरून जाणाऱ्या पायवाटेवर जंगलातून पुढे उजवीकडं वळल्यास, ढासळलेल्या आणि त्यावर वाढलेल्या झाडांनी एक समाधी दिसते.

वाड्याचे अवशेष (Prabalgad Fort)

  

उद्ध्वस्त समाधी (Prabalgad Fort)
   

उद्ध्वस्त वाड्याचे अवशेष (Prabal Fort) 
                त्यापुढेच जंगलात उघड्यावर पडकं गणेश मंदिर दिसतं. मंदिराचा चौथरा, भिंती उध्वस्त असून, लाकडी मंडपावर पत्रे बसवून आडोसा केलेला दिसतो. गाभाऱ्याच्या ठिकाणी शेंदूर लावलेली गणेश मूर्ती आणि दुसऱ्या एका देवतेची भग्न मूर्ती दिसते. गणेश मूर्तीच्या मागे भग्नावस्थेतील शिवलिंग दिसतं. मंदिरासमोर मंडपात भग्न नंदी आणि मंदिराबाहेरच वाटेवर आणि मंदिराकडे तोंड करून दूसरा भग्न नंदी दिसतो. मंदिर मंडपातील दिसणाऱ्या पताका आणि आकाश कंदिलावरून, दसरा दिवाळीत आणि सणावाराला इथं पूजा होत असावी.                   
गणेश मंदिर (Prabalgad Fort)

                              मंदिराच्या पुढे दोन मिनिटांवर डावीकडं गडावरील सर्वात मोठं तळं दिसतं. आता ते गाळ आणि गवतानं भरलेलं आहे.

Prabalgad Fort 

 
प्रबळवरील तळं (Prabalgad Fort)

               
प्रबळवरील जंगल (Prabalgad Fort)

                 










                   या तळ्यापुढेच वीस मिनिटांवर एक किल्ले ईर्शाळ कडे जाणारी डोंगराची सोंड असून बाजूलाच उद्ध्वस्त दरवाजा दिसतो. 'बोरीची सोंड' म्हणून तिला ओळखलं जातं. या डोंगराच्या सोंडेवरून किल्ले ईर्शाळ दोन तासात गाठता येतो. हा मार्ग खूपच धोकादायक असून, इथून ईर्शाळला जाताना बरेच ट्रेकर्स फसले आहेत तर काहींना रेस्क्यू ऑपरेशन करून वाचविलेल्या बातम्या मिळतात. रेंज ट्रेकर्स इथून प्रयत्न करताना दिसतात. या  सोंडेवरून किल्ले कर्नाळा, ईर्शाळगड, मोरबे जलाशय आणि माणिकगड असा भव्य परिसर दिसतो.

 

बोरीची सोंड, समोर ईर्शाळ आणि डावीकडे मोरबे जलाशय (Prabalgad Fort) 

 

काळ्या बुरुजाजवळून दिसणारा इर्शाळ   

                   त्यापुढेच अर्ध्या तासाच्या अथक वाटचालीनंतर प्रबळच्या पूर्वेचं शेवटचं टोक आणि नामचीन 'काळा बुरूज' दिसतो. काळ्या कातळचे दगड बुरुजाला वापरले असल्यानं एकूण बुरुज काळाभिन्न दिसतो. रंगावरून याला 'काळा बुरूज' नांव पडलं असावं. या बुरुजाजवळूनही गडउतार होण्यासाठी चोर वाट आहे. सध्या तिची पडझड झाल्यानं धोकादायक आहे. काळ्या बुरुजावरून ईर्शाळ, मोरबे जलाशय आणि माथेरानचे विविध पॉईंट्स दिसतात.    

              प्रबळची भव्यता किल्ले ईर्शाळवरून दिसते. मागील ईर्शाळच्या भेटीत ती आम्ही अनुभवलीच. किल्ले ईर्शाळच्या भटकंतीचा अनुभव https://sahyadri300.blogspot.com/2020/11/irshalgad.html या लिंकवर लिहिला आहे. 
 
 ईर्शाळच्या भेटीत ईर्शाळवरून दिसणारा किल्ले प्रबळ आणि ईर्शाळकडे येणारी बोरीची सोंड 

                किल्ले प्रबळच्या चढाईचे टप्पे आणि त्याच्या पसाऱ्यामुळं, 'रेंज ट्रेकर्स' वगळता भटक्यांची भटकंती प्रबळच्या गडमाथ्यापर्यंतच थांबताना दिसते. प्रबळला प्राचीन इतिहास असूनही त्याचा शोध, अभ्यास अपुराच राहिलाय. प्रबळच्या निबीड जंगलातल्या फसव्या वाटा, उद्ध्वस्त तटबंदी, वाडे तसेच पाण्याचं दुर्भिक्ष हे सगळं मुंबई - ठाण्यापासून जवळ आणि मोक्याच्या जागी असूनही' किल्ले प्रबळ' दुर्लक्षित राहिलाय असं म्हणावं लागेल.. 
                                     || श्री कृष्णार्पणमस्तु ||
येथे - जयवंत जाधव     
     

Friday, 10 December 2021

कलावंतिण दुर्ग - (Kalavantin Pinnacle)

                साहस आणि थरार यांचा सुरेख संगम म्हणजेच "कालावंतीण दुर्ग" सुळका. 

         अगदी सांगायचंच झालं तर तीन वर्षापूर्वी इथं आमचा सहकुटुंब प्रयत्न झाला होता. पण पायथ्याच्या ठाकुरवाडीपासून प्रबळवाडी आणि या 'वाडी' पासून 'कलावंतीण'च्या खिंडीची दमछाक करणारी उभी चढण, यात बरीच ऊर्जा खर्ची पडली. एका दिवसात कमीतकमी 'कलावंतीण' सुळका तरी गाठून परत येऊ या प्रयासानं आम्ही गेलो होतो. आमचं तिथं जाणंही अचानक आणि पूर्वतयारी न करताच झालं होतं. ऑफिसला जाताना ऐनवेळी ते स्थगित करून भरलेला टिफिन तिकडे वळवला होता. असा वेडेपणा बऱ्याचदा आमच्याकडून झालाय. आणि तो काम करूनही गेलाय..

कलावंतिण दुर्ग शिखर (Kalavantin Pinnacle)

             एरव्ही शनिवार रविवारी वरच्या प्रबळवाडीतील काही आदिवासी काकडी, लिंबूपाणी, सीलबंद पाणी टपऱ्यावर विकायला ठेवतात. पण तिथं जाण्याचा मधलाच दिवस असल्यानं पायवाटेवरच्या टपऱ्या बंद होत्या. त्यामुळं वाट सांगणारं कोणीच नव्हतं. आम्हा चौघा नवख्यांन शिवाय त्या डोंगरात त्यावेळी कोणीच दिसलं नाही. पायथ्याच्या 'ठाकूरवाडी'पासूनची जाणारी पायवाट पुढे भरकटून, मधल्या घनदाट डोंगराची उभी चढण चढावी लागली. परत अंधार पडण्याआधी परतायचं असल्यानं घाई करावी लागलीच. अशा दमलेल्या अवस्थेत 'कलावंतीण' सुळक्याचं धाडस करणं वेडेपणाचं होईल ही जाणीव ठेवून, सुळक्याच्या पायथ्यापासून परत फिरण्याचा निर्णय घेतला. त्यावेळचा आमचा अंदाज फसला होता.


  

कलावंतिण-प्रबळ पायवाट  

              '


             


              

              पनवेल रिजन' मध्ये आणि सह्याद्रीच्या माथेरान डोंगररांगेतील हा २२०० फुटाचा थरारक सुळका आणि त्यालाच खेटून असलेला २३०० फूट उंचीचा 'प्रबळ' हे दोन दुर्ग पुढे बरेच दिवस आम्हाला हुलकावणी देत राहिले.

              मागील महिन्यात केलेल्या 'सांकशी' नंतर घरात सरशिखर 'कळसूबाई'ची चर्चा घडत होती. आणि असाच एक दिवस 'पुण्या'तून मित्राचा फोन आला आणि आम्ही पाच बालमित्र 'कलावंतीण' आणि 'प्रबळ'साठी तयार झालो.

डावीकडे कलावंतिण आणि उजवीकडे किल्ले प्रबळ  
               

             यावेळी मात्र पूर्ण तयारी आणि नियोजन केलं. शनिवारी रात्री आम्ही 'प्रबळवाडी' गाठून, 'कलावंतीण'च्या सुळक्याखालीच तंबू टाकले. सकाळी नाष्टा करून लवकरच सुरुवात करायचं ठरलं.

            पनवेलच्या वेशीवर अगदी २० किमीवर असणारा हा 'दुर्ग सुळका' आणि 'प्रबळ' पूर्ण करण्यास पट्टीच्या ट्रेकर्सना पूर्ण एक दिवस लागतोच. मात्र मुंबई, ठाणे आणि पुण्याहून यायचं झाल्यास, आदल्या रात्री 'प्रबळवाडीत'  वस्तीसाठी यावं. मुंबई-पुणे जुन्या हायवेवर पनवेलपासून पुण्याकडं जाताना १० किमीवर 'शेडुंग' फाट्यावर डावं वळणं घेवून रस्ता पुढे ८-१० किमी असलेल्या 'ठाकूरवाडी'त येवून संपतो. पनवेल पासून ठाकूरवाडी एकूण १८-२० किमी असावी. 

           पनवेलहून एसटी नं 'शेडुंग' फाट्यावर उतरल्यास, पुढे रिक्षा किंवा 'वढाप'नंही गडपायथ्याच्या 'ठाकूरवाडी' पर्यंत जाता येतं. स्वतःचं वाहन असल्यास पनवेलहून तासाभरात हे अंतर गाठता येतं. गडपायथ्याला ठाकूरवाडीच्या जंगलात पार्किंगसाठी ऐसपैस जागा आहे. शनिवार रविवारी मात्र ही जागा अपुरी पडते. इथचं बाजूला एक मोठी टपरी असून, तिथं जाण्या-येणाऱ्या ट्रेकर्सना मॅगी, भजी, वडापाव, चहा, सरबत, सीलबंद पाणी इत्यादी मिळतं. 

              गडपायथ्याच्या 'ठाकूरवाडी'तून समोर उजव्या बाजूला अंगावर येणारा अजश्र आडवा 'प्रबळ' आणि त्याला खेटून उभा असलेला 'कलावंतीण सुळका' दिसतो. इथूनच मध्यावर एका सपाटीवर दोन भगवे फडकताना दिसतात. याला 'प्रबळमाची' म्हणतात. या' माची'पासून पाच मिनिटांवर 'ठाकरी-आदिवाशीं'ची डोंगरकड्यावर 'प्रबळवाडी' दिसते.

पायवाट प्रबळवाडी 

 

प्रबळवाडी 





              

                पायथ्याची 'ठाकूरवाडी' ते 'प्रबळवाडी' थोडीफार मळलेली वाट आहे. सरासरी तासाभराची वळणावळणाची आणि नंतर तीव्र चढाची वाट दमछाक करते. शनिवार रविवार मात्र अधूनमधून दिसणाऱ्या या टपऱ्या उघड्या असतात.


          वर 'प्रबळवाडीत' पोहोचण्याआधी वाटेवर उजव्या बाजूला कातळात कोरलेले आणि शेंदूर लावलेले गणेश आणि हनुमान दिसतात. पूर्वी 'वाडीत' प्रवेश करण्यापूर्वी चेकपोष्ट होता. माणसी तीस रुपये घेवून, गड आणि प्लॅस्टिक कचऱ्यापासून 'प्रबळवाडी'ची साफसफाई तसेच कलावंतीणवर दोराची व्यवस्था राखली जाई. सध्या तेच पैसे कलावंतीणच्या सर्वोच्च कातळ टप्प्याला दोर लावून देणाऱ्या आदिवाशी मुलांना दिले जातात.  

             ३० - ३५ उंबऱ्यांच्या या 'प्रबळवाडी'तील 'ठाकर' जमातीचे काही आदिवाशी  शनिवार रविवारी येणाऱ्या ट्रेकर्सना राहण्या-खाण्याची व्यवस्था करतात, तर काहीजण 'ठाकुरवाडी' ते 'प्रबळवाडी' आणि 'कलावंतीण', 'प्रबळ'वर टपऱ्या लावतात. इतर दिवशी ते शेतीच करतात. काही आदिवाशी खाली फार्महाऊसवर रोजंदारी करतात. पनवेल शहर जवळ असूनही शिक्षण आणि इतर सुविधांपासून दूर असल्यानं त्यांचं आयुष्य खडतर गरीबीचं दिसतं.          

कलावंतिण दुर्ग (किल्ले प्रबळवरून) Kalavantin Pinnacle 

               या 'प्रबळवाडी'च्या मागूनच 'कलावंतीण'कडे एक पायवाट जाते. बऱ्याच ठिकाणी आता दिशादर्शक बाण झाडांना ठोकलेले दिसतात. अर्ध्या तासात हा खडा चढ चढून आम्ही प्रबळ आणि कलावंतीणच्या खिंडीत पोहोचलो आणि 'आई भवानीचं' नांव घेवून मनोमन दुर्ग सुळक्याला वंदन केलं.

कलावंतिण-पायऱ्या 

             पहिल्या कातळ टप्प्यात पायऱ्यांची व्यवस्था नसून हा टप्पा सांभाळून चढावा लागतो. पुढे मात्र सुळक्याच्या मध्यापर्यंत फुटभर रुंदीच्या आणि दोन तर कधी तीन फुट लांबीच्या कातळात कोरलेल्या पायऱ्या सुळक्याच्या उभ्या कातळासोबत वर जातात. पहिल्या टप्प्यानंतर जिथे पायऱ्या सुरू होतात त्याच ठिकाणी एका जागी पायरीची ऊंची छातीइतकी आहे आणि खाली उजवीकडं ठाव न लागणारी दरी दिसते. 



             सुळक्याच्या मध्यानंतर एका लहान सपाटीवर अवघड जागी एक टपरी दिसते. या ठिकाणी पायऱ्या संपतात. जसं वर जाऊ तसा मानसिक कस लागत जातो. सुळक्याच्या मध्यावर पायऱ्या सोडून धोकादायक जागी एक आणि त्यावरीलच टप्प्यावर दुसरी अशा दोन पाण्याच्या टाक्या कातळात कोरलेल्या आहेत. या दोन टाक्या 'किल्ले प्रबळच्या' ईशान्य कड्यावरून स्पष्ट दिसतात. सध्या दोन्ही टाकीत पाणी दिसतं. 

              इथून पुढे साधारण दहा मिनिटांच्या चढाईनंतर दुसऱ्या  लहान सपाटीवर पोहोचतो. या जागी दुसरी टपरी दिसते. या दोन टपरींच्या दरम्यान पायऱ्या नसून घसरणाऱ्या मातीचा धोकादायक चढ लागतो. या दुसऱ्या टपरी समोरच  पुढे सुळक्याचा सर्वोच्च माथ्याचा खडा, अवघड कातळ दिसतो. कातळाला दोर लावलेला आहे. इथपर्यंत आलेला ट्रेकर या दोरानं सर्वोच्च माथा सर करण्याचा प्रयत्न करतोच करतो.

दोराशिवाय सुळका सर करताना 

               यावेळी साताऱ्याचा माझा बालमित्र संतोष पवार हा कातळटप्पा दोराशिवाय सहज चढून गेला, आणि त्यावेळच्या तिथल्या उपस्थित सर्व ट्रेकर्सनी टाळ्या वाजवून त्याच्या धाडस आणि हिंमतीचं कौतुक केलं.   

              दुर्ग सुळक्याच्या पायऱ्यांना सुरक्षिततेसाठी कोणतीच व्यवस्था नाही. ज्यांना जोखीम घेऊन थरार अनुभवायचाय तेच इथं धाडस करताना दिसतात. बाकीचे खाली खिंडीतील टपरीवर थांबताना दिसतात. पायऱ्यांवरून ये-जा करताना आणि इतरांना बाजू देताना पाठीची सॅक कातळाला घासून अरुंद पायऱ्यांवरून इथं तोल जाण्याची खूपच शक्यता आहे. अशा वेळी सावरुन बचाव करण्याची शक्यता जवळ जवळ शून्य आहे. अशा वेळी विशेष काळजी घ्यावी लागते.

शेवटच्या टप्प्यावरून 


प्रबळचे कातळ आणि मध्ये दरी (Kalavantin)

               सुळक्याच्या सर्वोच्च माथ्यावर साधारण पन्नास साठ जण उभे राहतील इतकी जागा आहे. माथ्यावरून पश्चिमेला कर्नाळा तर पूर्वेला पेबचा विकटगड, माथेरान डोंगर, उत्तरेकडे किल्ले चंदेरी, म्हैसमाळ आणि मलंगगड अशी उतुंग पर्वतशीखरे ढगातून वर आलेली ओळीनं दिसतात. किल्ले प्रबळ चे भीषण, काळेकभिन्न, ताशीव कातळकडे आणि काळदरी बघायची असल्यास, या सुळक्यावर येवून बघावी.

                शिमग्याला प्रबळवाडीचे रहिवाशी या दुर्ग शिखरावर येवून 'ठाकरी' नृत्य करण्याची परंपरा आहे. या वर्षीच म्हणजे मार्च २०२१ ला या कलावंतीण च्या सर्वोच्च माथ्यावर शिवछत्रपतींच सुंदर स्मारक बनवलं आहे. छत्रपतींच्या मागेच भन्नाट वाऱ्यावर भगवा डौलानं फडकताना दिसतो. 

छत्रपतींच स्मारक - Kalavantin pinnacle 
 




'किल्ले कर्नाळा' सुळका 
पेब, माथेरान,चंदेरी, म्हैसमाळ, मलंगगड सुळके (कलावंतिणवरुन)  

              या सुळक्यावरून आतापर्यंत बरेच जीवघेणे अपघात झालेत. काही 'सोलो ट्रेकर'ही इथून बळी पडलेत. शनिवार रविवार व्यतिरिक्त आणि अज्ञात वेळी घडणाऱ्या दुर्घटनेंची पहिली खबर तिथं पसरणाऱ्या दुर्घंदीमुळं स्थानिकांना मिळते. तिथं पोहोचण्यासाठी कराव्या लागणाऱ्या दगदगीमुळं पोलिसांनी इथल्या आदिवाशी मुलांना तिथं सुळक्याला दोर लावण्याची परवानगी दिली आहे. जेणेकरून त्यांच्याही पोटपाण्याची सोय होते. आम्ही ज्यांच्याकडे थांबलो, ते 'श्री गोमा गणू शिद' यांनी आतापर्यंत झालेल्या बऱ्याच अपघातांची आम्हाला माहिती दिली. 


             हे सर्व ठीक असलं तरी  'कलावंतीण'चं आव्हान स्विकारून स्वतःला आजमवण्यासाठी प्रत्येक शनिवार रविवारी तरुण ट्रेकर्सची इथं रीघ लागलेली दिसते..  

                                 || श्री कृष्णार्पणमस्तु ||

येथे - जयवंत जाधव

Thursday, 28 October 2021

ऑफबीट - किल्ले सांकशी ( Offbeat - Sankshi Fort )

                  'सांकशी'च्या भेटीनंतर लिहायचे तर, "किल्ले सांकशी" पेण तालुक्यापासून दहा किमीवर अलीकडे आणि आमच्या राहत्या 'पनवेल' पासून ४० किमीवर आहे. उंची साधारण ८५० फूट, सह्याद्रीच्या मूळ रांगेत आणि चढाईच्या बाबतीत कठीण श्रेणीत मोडणारा हा किल्ला.

किल्ले सांकशी (Sankshi Fort)
            'पनवेल'हून निघताना 'गोवा' हायवे धरून 'किल्ले कर्नाळा' ओलांडल्यावर साधारण १५ किमी वरील 'तरनखोप'ला डावं वळण घ्यावं लागतं. तिथून ८-९ किमी असलेलं 'मुंगोशी' मार्गे 'बळीवली' गांव गाठायचं. रस्ता बेताचाच असल्यानं वाहन काळजीपूर्वक चालवावं लागतं. चढाची वळणं घेताना 'मुंगोशी' गावातूनच समोर किल्ल्याचा अजश्र आडवा डोंगर दिसतो. या डोंगराला वळसा मारून 'प्रधानवाडी'तून रस्ता 'बळीवली'त येतो.
मुंगोशीतून दिसणारा किल्ले सांकशी 

           'बळीवली' गांव सोडून डोंगर पायथ्याला 'बद्रूद्दीन दर्गा' आहे. दर्ग्यासमोर पार्किंगसाठी प्रशस्त जागा आहे. "दर्ग्याचा किल्ला" म्हणूनही 'सांकशी'ला ओळखले जाते. किल्ल्याला सध्या प्रवेशदार किंवा बुरूज, तटबंदी अस्तित्वात नाही. कधीकाळी ती असल्यास काळाच्या ओघात नष्टही झाली असावी. पण किल्ल्यावर बऱ्याच प्रमाणात कातळात खोदलेल्या पाण्याच्या टाक्या दिसतात. बहुतेक टाक्या पावसानंतरच्या गाळानं आणि गवतानं भरलेल्या दिसतात. त्यामुळं प्रत्येक टाकिपर्यंत जाणं शक्य होत नाही.

गाडीवाट 

                आम्ही साधारण साडे आठ वाजता तिथं पोहोचून,दर्ग्यात किल्ल्यावर जाण्याच्या वाटेची चौकशी केली. पण हे सांगण्यास कोणी उत्सुक दिसलं नाही. तिथं सकाळी झाडलोट करणाऱ्या एकानं मात्र 'ती समोर दिसणारी गाडीवाट धरून जा' असं सांगितलं. पण ही वाट किल्ल्याकडे न जाता, डोंगराला पुढे समांतर जाणारी दिसली. साधारण पंधरा मिनिटांनी शंका आल्यावर पुन्हा दर्ग्यात येवून विनंती केली. तेव्हा त्यापैकी एकानं 'उधर शिवाजीका लिखा बोर्ड मिलेगा, वहासे जाव' इतकंच सांगितलं. वाढलेल्या झुडूपांच्या आड आम्ही 'सह्याद्री प्रतिष्ठान'चा बोर्ड शोधून काढला आणि मार्गी लागलो.

   
किल्ले सांकशी पायवाट 

            या दर्ग्यासमोर एक मस्जिदीची वास्तु दिसते. पुरातन आणि वास्तूवर वाढलेल्या पावसाळी गवतामुळं त्या वास्तूचा शांत रानात वेगळाच परिणाम जाणवतो. याला 'दिन मस्जिद' म्हणतात. सकाळच्या उन्हात, दवबिंदुनं चमकणाऱ्या  गवतात तिचं वेगळेपण उठून दिसतं. सुघड चौथऱ्यावर, पांढरा रंग उडालेली आणि कुलुपबंद असलेली ही किल्ल्याच्या डोंगर पायथ्याची वास्तु, सुंदर इस्लामिक स्थापत्यशास्त्राचा नमूना म्हणून पाहायला मिळते. नंतर चौकशी करता त्याचे दरवाजे वर्षातून एकदाच ठराविक दिवशी उघडण्यात येतात अशी प्रधानवाडीत माहिती मिळाली. या वास्तूच्या बरोबर समोर गवतातून उजव्या बाजूनं डोंगराकडं गेल्यास, आडाला हा 'सह्याद्री प्रतिष्ठान'चा बोर्ड दिसतो. 

पुरातन मस्जिद वास्तु (Sankshi Fort)  

            या बोर्डाजवळून एक पायवाट दाट झाडीतून किल्ल्यावर जाते. किल्ल्यावर फारसे कोणी फिरकत नसावेत असं वाटेवर वाढलेल्या गवतावरून दिसत होतं. तीव्र चढाची नागमोडी वळणं घेत दगडधोंडयातून पायवाट साधारण अर्ध्या तासात डोंगराच्या काळ्या कातळाजवळ येवून पोहोचते. इथं वाटेवरूनच समोर कातळ कड्याच्या उंच उतारावर अवघड जागी मोठी आयताकृती कोरलेली पाण्याची टाकी दिसते. आणि ही पायवाट तिथं संपते.

कातळवरील टाकी 

चढाईस मदत करणारा मावळा 

sankshi Fort

                 समोर अजश्र कातळ आणि उजवीकडं दरी दिसते. पुढील चढाई मात्र हा खडा कातळ (Rock Pach ) चढून करावी लागते. पावसामुळं खडकावर शेवाळ वाढलेलं दिसतं. खडकावरून ओघळणाऱ्या पाण्यामुळं ही पुढची पंधरा वीस फुटांची चढाई थरारक आणि धोकादायक आहे. आम्ही पोहोचलो त्यावेळी वरुन खाली दोर सोडलेला दिसला. उभ्या कातळावर अगदी मोजक्या ठिकाणी लक्षात न येतील अशा  खोबण्या ठेवल्या आहेत की नीट पायही ठेवता येत नाही. या खोबण्या आणि कातळतील फटींचा आधार घेत, शांत आणि संयमानं इथली चढाई करावी लागते. हा रॉक् पॅच चढताना दरीच्या बाजूनं वर जातो आणि वर शेवटी कोरलेल्या चार पाच पायरीपर्यंत येवून संपतो. 

                 साधारण पंधरा वीस फुटांचा हा टप्पा चढताना शेवाळांमुळं अवघड आहेच पण उतरतानाही खाली दरीत नजर जाताच पाय लटपटायला लावणारा आहे. या थरारक आणि धोकादायक चढाईमुळं या किल्ल्याच्या नादी कोणी फारसं लागत नसावेत. 


                 आम्ही तिथं पोहोचलो त्यावेळी 'सह्याद्री प्रतिष्ठान' च्या सात-आठ मावळ्यांचं किल्ल्यावर गवत सफाईचं काम चालू होतं. आमची चाहूल लागताच त्यांनी वरुन दोर हलवून प्रतिसाद दिला आणि मदतीसाठी चार पायऱ्या उतरून सामोरे आले. पण वर बांधलेल्या दोराची ओढ दरीकडे असल्यानं तो टाळून आम्ही एक एक करून तो कातळटप्पा सर केला. वर आल्यावर त्यांचे आभार मानले. 

सह्याद्री प्रतिष्ठान चे श्री प्रविण पाटील आणि इतर श्रमदान करताना 

                 चढून तर वर आलोय पण उतरतानाचा धोका आणि धास्ती आम्हाला होतीच. इतर ग्रुप बरोबर एक एकटयानं ट्रेकला जावून पत्करलेला धोका आणि आम्ही एकाच कुटुंबानं एकत्र, अपरिचित आणि डोंगरतल्या एकाकी ठिकाणी जावून पत्करलेला धोका अशा वेळी लक्षात येतोच. याआधी कोथळीगड,  इर्शाळ, धोदानीच्या बाजूनं केलेला विकटगड आणि आता सांकशीलाही  तो लक्षात आला. असो.. 

डावीकडील गाळानं भरलेली टाकी (Sankshi Fort)

                 हा अवघड टप्पा पार करून वर आल्यास लहान सपाटी दिसते. इथं डाव्या बाजूला जमिनीवर कातळात  एक पाण्याची टाकी कोरलेली आहे. टाकी गाळानं भरलेली दिसते. तर उजवीकडं समोरच्या कातळ पायथ्याला खोदलेली दुसरी प्रशस्त आणि खोल कोरलेली टाकी दिसते. त्यात स्वच्छ पाणी आहे. ही टाकी इतकी प्रशस्त आहे की, वरील कातळाला आधार देण्यासाठी टाकीत दगडी खांब ठेवलेले दिसतात. टाकीच्या वर चौकटीच्या ठिकाणी कोरीव काम लक्ष वेधून घेतं. या टाकीच्या बाजुनं पुढे कातळच्या पायथ्यानं अशाच कोरलेल्या पाण्याच्या टाक्या दिसतात. पण पावसानंतरच्या वाढलेल्या गवत झुडुपांमुळं आम्हाला तिथं पोहोचता आलं नाही. 

                 या टाकीच्या बाजूलाच कातळात केशरी रंगानं सुशोभित केलेलं चौरसाकृती  मंदिर दिसतं. याला 'वज्राई' किंवा 'जगमातेचं' मंदिर म्हणतात. ज्या 'शांक' राजानं हा किल्ला बांधला, त्याची ही 'जगमाता' मुलगी. कर्नाळयाच्या लढाईत तो मारला गेल्यावर या मुलीनं किल्ल्याच्या कड्यावरून उडी मारून जीव दिला, अशी दंतकथा सांगितली जाते.

दुसऱ्या टप्प्याची शिडी आणि बाजूला जगमाता मंदिर 

 
जगमाता मंदिर (Sankshi Fort)


              नवरात्रीत या मंदिराच्या उंबऱ्यावर रोज नवीन फुलांचा हार घालून दिवाबत्ती आजही केली जाते. दसऱ्यानंतर लगेच तिथं आमचं जाणं झाल्यामुळं आजही तो हार ताजा वाटत होता. 
             हे मावळे पावसाळा संपल्यानंतर प्रत्येक रविवारी पहाटे इथं येवून जमेल तितकं गवत आणि झुडुपं तोडतात. किल्ल्याच्या पायवाटेवर पुन्हा गवत उगवू नये म्हणून रसायन फवारणी करतात. श्री प्रवीण पाटील या ग्रुपचं सारथ्य करत होते. त्यांनी किल्ल्याबद्दल आम्हाला बरीच माहिती दिली. त्यानीच तो दोर खाली  सोडून ठेवला होता.

            'सह्याद्री प्रतिष्ठान'नं स्थानिक मावळे सभासदांना पावसानंतर एक एक गड किल्ला साफ करण्याची जबाबदारी दिली होती. आणि हे मावळे ती प्रामाणिकपणे पार पाडताना दिसत होते. उन्हं आणि उष्णता वाढल्यानं त्यांचं काम थांबवून परत उतरायची तयारी चालली होती. त्यांना पुन्हा पुढील रविवारी पहाटे इथं येवून पुढे काम चालू ठेवायचं होतं. आम्ही एकमेकांचे मोबाईल नंबर घेवून, आभार मानले आणि त्यांनी आमचा निरोप घेतला.  
दुसऱ्या टप्प्याची शिडी आणि प्रतिष्ठान चे मावळे 

               जगमातेचं मंदिर बघून, आणखी एक अवघड कातळ टप्पा चढून वर यावं लागतं. या टप्प्याला लावलेली शिडी चढून वर आल्यास वाट छोट्या खिंडीतून पुढे येते आणि डावी उजवीकडे अशी किल्ल्याच्या डोंगरमाथ्यावर जाते. आधी या कातळ टप्प्याला शिडी लावली नव्हती, त्यामुळं हा टप्पाही थरारक होता. पण या टप्प्याखाली दरी नसल्यानं जीवावरचा धोका नव्हता.  तशी या टप्प्याला मुळी शिडीची आवश्यकता नव्हती, मागील वर्षीच ती तिथं लावली गेली. या दोन कातळटप्प्यामुळंच किल्ल्याची चढाई कठीण श्रेणीत येत होती. अजूनही पहिल्या टप्प्यामुळं पावसाळ्यात ती धोकादायक आहे. त्यामुळं पावसात आणि त्यानंतर लगेच हा ट्रेक टाळावा. 

           

कातळतील कोरलेली चौकट 

               या खिंडीपुढे समोर कातळात कोरलेली चौकट दिसते. हे अर्धवट राहिलेलं काम असावं किंवा पहारेकऱ्यांना विसावा घेण्याची जागा असावी. या जागेत एका वेळेस तीन चार जण बसु शकतील किंवा एकजण आरामात झोपू शकेल इतकी जागा आहे. ऊन पावसापासून या जागेत बचाव होवू शकतो अशी ही जागा आहे. त्यापुढेच  जमिनीवरील कातळात दोन पाण्याच्या टाक्या दिसतात.
पाण्याच्या दोन टाक्या (Sankshi Fort)

     उजवीकडील पायवाटेनं एक लहानसा चढ चढून वाट किल्ल्याच्या सर्वोच्च माथा असलेल्या बालेकिल्ल्यावर येते. बालेकिल्ल्यावर भगवा फडकत असून उजवीकडं उद्ध्वस्त वाड्याचे अवशेष दिसतात. स्थानिक लोक याला 'राजदरबार' म्हणतात. राजदरबाराचे अवशेष कमरेइतक्या वाढलेल्या गवतात शोधावे लागतात. 
(Sankshi Fort)

बालेकिल्ल्यावरील भगवा 

सांकशीवरून दिसणारा माणिकगड 

         


                या बालेकिल्ल्यावरून उत्तरेला 'कर्नाळा' तर ईशान्येला 'माणिकगड' दिसतो. मागे 'माणिकगड' ट्रेक केला त्यावेळी हा 'सांकशी' आम्ही तिथून पाहिल्याच आज आठवलं. तसा 'माणिकगड'च्या ब्लॉगमध्ये उल्लेखही केला आहे. बालेकिल्ल्यावरून पश्चिमेला डोंगर उतारावर कोरलेली मोठी पाण्याची टाकी दिसते. वाढलेल्या गवतामुळं उतार जमिनीचा अंदाज येत नाही, त्यामुळं या टाकीपर्यंत उतरताना प्रत्येक पाऊल सावध टाकावं लागतं. या टाकीतील पाणी पिण्यायोग्य स्वच्छ दिसतं. 
पश्चिमेकडील टाकी 

               बालेकिल्ल्यापासून मागे, वर आलेल्या खिंडीपासून डावीकडे वळल्यास कातळात खोदलेल्या एकत्र पाच टाक्या दिसतात. त्यापैकी एका टाकीत पाणी भरलेलं आहे तर बाकी चार कोरड्या दिसतात. कदाचित या चार टाकींना खाली कातळात नैसर्गिक गळती असावी. भटकंती दरम्यान बऱ्याच किल्ल्यांवर जशी टाक्यांची निर्मिती दिसली, तशी इथल्या पाचही टाक्यांमध्ये खोदतानाच मध्ये कातळभिंती ठेवून निर्माण केलेल्या दिसतात. पाणिगळती झाल्यास किमान बाजूंच्या टाकीतील पाणी टिकून राहावे हा उद्देश असावा. आणि तो इथं साध्य झाल्याचं दिसतं. या टाकीत पाणी जमा होण्यासाठी कातळातच एकमेकांना आणि टाकींना जोडणारे चर दिसतात. तर या चरांमध्येच खोल खळगे ठेवलेले दिसतात. पाण्यावाटे वाहून आलेला गाळ या खोल खळग्यात साठून फक्त स्वच्छ पाणी या चरातून टाकीत जमा होईल अशी व्यवस्था केलेली दिसते. 

गडमाथ्यावर कातळात खोदलेल्या पाण्याच्या पाच टाक्या 

किल्ले सांकशी 

          या पाच टाक्यांपासून बालेकिल्ल्याच्या दिशेने दिसणाऱ्या पश्चिमेकडील दरीत पाहिल्यास, उभ्या कड्यावर आणखी एक पाण्याची टाकी दिसते. त्या अवघड ठिकाणी ती कोणत्या उद्देशानं व कशी निर्माण केली, हे एक कोडं आहे. कदाचित परकीय हल्ल्यात किल्ल्यावरील पाणी विष टाकून दूषित केल्यास तो राखीव पाणीसाठा अशा अवघड जागी सुरक्षित रहवा, किंवा उन्हाळ्याच्या सरत्या दिवसात निर्माण होणारी पाण्याची गरज भागवण्यासाठी त्यामागील उद्देशही असावा. कदाचित त्यावेळी त्या टाकीपर्यंत जाण्याची वाट अस्तित्वात असेलही, आणि कालानुरूप ती ढासळलीही असावी. पण सध्या त्या टाकीपर्यंत कड्यावरून उतरण्यासाठी गिर्यारोहण तंत्राची कला अवगत असणे आवश्यक आहे. 

                   सध्या किल्ल्यावर पावसानंतरची सफाई पूर्ण झालेली नसल्यामुळं गडमाथ्यावर सर्वत्र कमरेइतकं गवत वाढलं आहे. त्यामुळं चालताना प्रत्येक पाऊल सावध टाकावं लागतं. 

पश्चिम कड्यावरची टाकी 

गडमाथा (Sankshi Fort)

                      बालेकिल्ल्यावरून किल्ल्याचा डोंगर एकूण इंग्रजी 'L' आकाराचा दिसतो. पण या पाच टाक्यांच्या पुढे डोंगराला प्रचंड मोठी नैसर्गिक दरी असल्यानं पुढं जाता येत नाही. त्यामुळं गडमाथा आटोपशीर राहीला आहे. किल्ल्याच्या या दक्षिण आणि पश्चिम बाजूला अशा उभ्या ताशीव कड्यांमुळं नैसर्गिक संरक्षण मिळालं आहे. 
दोन डोंगरांमधील नैसर्गिक दरी 

कातळ कडा (Sankshi Fort)

'L' आकारात दिसणारा किल्ल्याचा डोंगरमाथा (Sankshi Fort)

               हा किल्ला आधी गुजरातच्या सुलतानाच्या ताब्यात होता. अहमदनगरच्या निजामाने तो जिंकून घेतला. पुढे पोर्तुगीजांची मदत घेवून,सुलतानाने तो परत ताब्यात घेतला. सुलतान किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात देऊन परत गुजरातला निघून गेला. दरम्यान निजामाने पुन्हा हल्ले सुरू ठेवले. सततच्या हल्ल्यांना कंटाळून शेवटी पोर्तुगीजांनी हा 'सांकशी' आणि 'कर्नाळा' किल्ला निजामाकडून विकत घेतला. १६४४ ला छत्रपतींनी कल्याण, रायरी सोबत 'किल्ले सांकशी' स्वराज्यात आणला.  

                गडपायथ्याला असलेल्या 'बद्रूद्दीन दर्ग्या'बद्दल तर फार चमत्कारिक माहिती मिळते. ज्यांच्या नावानं हा दर्गा बांधला ते 'हजरत सय्यद बद्रूद्दिन हुसेनी' हे इस्लामिक राजवटीतील 'चीशती' घराण्यातील होते. 'सांकशी' दरम्यान झालेल्या लढाईत ते मारले गेले. घोड्यावर स्वार असलेल्या बद्रूद्दिन हुसेनींचं मुंडकं 'सांकशी' च्या पायथ्याला पडलं. उरलेलं धड शत्रूसैन्याशी लढत सध्याच्या 'किल्ले परांडा' इथं कोसळलं. जिथं किल्ले 'सांकशी'च्या पायथ्याला त्यांचं मुंडकं पडलं, तिथंच हा सध्याचा दर्गा बांधला गेला. तर जिथं त्यांचं धड घोड्यावरून खाली कोसळलं तिथं परांड्यालाही असाच एक दर्गा उभारला गेला. 

बद्रूद्दिन दर्गा (Sankshi Fort)
मागील वर्षीच आम्ही मराठवाड्याच्या भटकंतीत 'किल्ले परांड्या'ला भेट दिली होती. 'किल्ले सांकशी' ते 'किल्ले परांडा' हे साधारण ३३५ किलोमीटर इतकं दूर अंतर आहे. त्या काळची ही चमत्कारिक घटना जर खरोखर घडली असेल, तर ते त्या खुदालाच माहीत. पण 'किल्ले परांड्या'लाही आज याच नावानं आणि याच घटनेच्या आधारे तिथंही दर्गा आहे..   

                               || श्री कृष्णार्पणमस्तू ||
येथे - जयवंत जाधव  

'किल्ले विसापूर' - मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Pune, Maharashtra.

                           उन्हाळ्यात शुष्क झालेल्या धरतीला पावसाने तजेला दिल्यानंतर सह्याद्रीतल्या दऱ्या डोंगरांचे रूप विलोभनीय असेच दिसते....