Sunday, 29 December 2024

ऑफबीट - किल्ले घनगड, ता. मुळशी, पुणे. - Offbeat Ghangad, Mulshi, Dist. Pune, Maharashtra.

               महाराष्ट्राला निसर्गानं दिलेली अमूल्य देणगी म्हणजे सह्याद्री. सह्याद्रीच्या दक्षिणोत्तर पसरलेल्या लांबच लांब रांगांमधून पूर्वेला फुटलेले फाटे, त्यामधल्या ठाव न लागणाऱ्या दऱ्या, बेलाग सुळके, काळेभिन्न कातळकडे तसेच देशातून कोकणात उतरणाऱ्या अनवट घाटवाटा आहेत. त्याबरोबरच इथल्या डोंगरदऱ्यात पसरलेली निबिड जंगले, नाना प्रकारच्या हजारो वनस्पती, स्वच्छंद विहार करणारे पशुपक्षी अशी संपत्ती निसर्गाने दिली आहे.

                 तर आपल्या तात्कालीन राज्यकर्त्यांनी या देणगीला सांगड घालत, त्यांचे संरक्षण आणि सभोवतालच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी सह्याद्रीत गडकिल्ले, अद्भुत कलाकुसरीची लेणी, गुंफा, बारामाही टिकून राहणाऱ्या पाण्यासाठी शोध घेऊन निर्माण केलेल्या कातळ टाक्या आणि शिलालेख होत. निसर्ग आणि मानवाने निर्माण केलेला हा सुंदर मिलाफ डोंगरभटके, निसर्गप्रेमी आणि सह्याद्रीतील अभ्यासकांना नेहमीच भुरळ घालत आला आहे. यातील प्रत्येकापर्यंत पोहोचायला आपल्याला वेळ लागलाच. साध्या रायगडचेच उदाहरण घेता सुरवातीचे जवळ जवळ सत्तर वर्षे तो अंधारातच राहिला. इतर अपरिचित (Offbeat) गडकिल्ले, लेण्यांबद्दल तर विचार न केलेलाच बरा.

'मारखिंड' दरीकाठावरील दगडांची थरारक ठेवणं. किल्ले घनगड, मुळशी, जि. पुणे, महाराष्ट्र. ('Markhind', Ghangad Fort, Pune, Maharashtra)
           असाच पुण्याच्या बारा मावळापैकी 'कोरसबारस' मावळाच्या निबीड जंगलातील एक अपरिचित, चढाईच्या बाबतीत मध्यम पण काहीसा अवघड श्रेणीत 'किल्ले घनगड' येतो. पुण्याच्या मुळशी तालुक्यातील 'लोणावळा' व 'ताम्हिणी' घाटाच्या मध्यावर आणि सह्याद्रीच्या लोणावळा डोंगररांगेच्या माथ्यावर 'घनगड' वसला आहे. समुद्रसपाटीपासून उंची साधारणतः ३१५० फूट असावी. कोकणातील पाली - सरसगड - ठाणाळे लेणी - 'वाघजाई घाट' - तैलबैला - कोरीगड अशी एक आणि  पाली - सरसगड -  सुधागड - 'सवाष्णीचा घाट' - घनगड - तैलबैला ते कोरीगड असा दुसरा व्यापारी घाटमार्ग प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. या घाटवाटांवर लक्ष ठेवण्यासाठी वरील दुर्गसाखळी सोबत त्यावेळी 'घनगड'ची निर्मिती झाली.

               पुणे शहरातून 'घनगड' हे साधारण ८५ किमी, तर आमच्या राहत्या पनवेल पासून ९० किमी आहे. पुणे मुंबईकरांना लोणावळा हे मध्यवर्ती ठिकाण आहे. लोणावळ्यापासून दक्षिणेला 'घनगड' सरासरी ३५ किमीवर आहे.
               सध्या मुंबई ठाणेकरांना 'घनगड'ला येण्यासाठी लोणावळा घाट (बोरघाट) चढून जलवायू मार्गाने सह्याद्री माथ्यावरील 'मोराडी' सुळका (सह्याद्रीतील स्वयंभू शिवलिंग), पेठ शहापूरचा कोरीगड करत पुढे 'भांबुर्डे' गावाच्या तिठ्यावरून उजवीकडे दोन किमीवरील 'एकोले' गावात येता येतं. तर भांबूर्ड्याहून पुढे 'ताम्हिणी' घाटातून (लिंग्या घाट) पुन्हा कोकणातील पाली, कोलाडलाही गाडीमार्गाने उतरता येतं.
           'एकोले' हे घनगड'च्या पायथ्याच्या घनदाट जंगलातील गांव. भातशेतीवर जगणारं. सह्याद्रीच्या कड्यावर उन, वारा पावसाशी दोन हात करत, किर्र जंगलात हिंमतीन राहणारी फक्त दहा, बारा कुटुंबाची वस्ती. त्या निबिड जंगलातील आडवाटेवर, डोंगर भटके वगळता फारसा परिचित नसलेला हा किल्ले 'घनगड' म्हणता येईल. 'लोणावळा भांबुर्डे' मार्गे एसटी बसेस आणि इतर वाहतुकीची साधनं इथं फारच कमी आहेत. त्यामुळं भांबुर्ड्याहून गडपायथ्याच्या 'एकोले' गावात येण्यासाठी स्वतःच वाहन असल्यास 'घनगड' एका दिवसात पूर्ण करून मुंबई पुण्याकडे परतता येतं.  

'राजाराणी' सुळके (नवरा नवरी) मारठाण्याचा डोंगर, किल्ले घनगड, महाराष्ट्र. (Ghangad Fort, Pune, Maharashtra)
    
डावीकडे 'GAIA EKOLE' कंपाऊंड, मागे 'किल्ले घनगड', जि. पुणे, महाराष्ट्र. -Ghangad Fort, Pune, Maharashtra)
           भांबुर्डे तिठ्याच्या आधीपासून 'एकोले' गावात प्रवेश करण्यापूर्वी समोर अजस्त्र 'मारठाण्याचा' डोंगर दिसतो. त्या रांगेच्या डाव्या बाजूला राजा-राणी (नवरा नवरी) सुळके लक्ष वेधून घेतात. तर उजव्या टोकाला एकुलत्या उठून दिसणाऱ्या अजस्त्र कातळावर 'घनगड' लक्ष वेधून घेतो.                 
                 'एकोले' गावाबाहेरच डावीकडे पुरुषभर उंचीच्या कंपाउंडवर 'GAIA EKOLE' असा बोर्ड दिसतो. नजीकच्या तीन-चार वर्षात निर्माण झालेलं हे एक विस्तृत प्रायव्हेट 'कॅम्पसाईड' आहे. शनिवार, रविवारी तिथे शहरी पर्यटक विकेंड साजरा करण्यासाठी येतात. आमच्या भटकंतीचा मधलाच दिवस असल्याने आम्हाला तिथे कोणी दिसले नाहीत. पण गुगल सर्च केल्यास या कॅम्पसाईडमध्ये पर्यटकांना सुयोग्य अशा शहरी सुविधांसोबत आत जंगल अनुभव घेता येतो. वेळ मिळालाच तर काही पर्यटक घनगडचीही वाट वाकडी करतात अशी गावात माहिती मिळते. सह्याद्रीचे डोंगर वेडे मात्र क्वचितच अशा कॅम्पसाईडच्या नादी लागत असावेत. असो.

श्री घनेश्वर महादेव मंदिर, किल्ले घनगड, (Ghangad Fort, Maharashtra)

वीरगळी, श्री घनेश्वर महादेव मंदिर, घनगड. (Ghangad Fort)

श्री घनेश्वर महादेव, किल्ले घनगड. (Ghangad Fort)


                 तर या कॅम्पसाईडच्या उजव्या बाजूने कंपाउंडला लागून जाणारी पाऊलवाट घनगडच्या निबिड जंगलात घेऊन जाते. दहा मिनिटात पाऊलवाटेवर डावीकडे 'श्री धनेश्वर महादेव' मंदिर दिसतं. मंदिर म्हणजे पत्र्याच्या उघड्या शेड खाली प्राचीन शिवपिंडी आहे. पिंडी समोर ओळीत वीरगळी मांडल्या आहेत. बाजूला भग्न नंदी आहे. या वीरगळींची माहिती देणारा बोर्डही बाजूला आहे. 'पार्वती पतेय शंभो हर हर..' म्हणत पुढे आल्यास उजव्या बाजूला गच्च झाडीत लहानसं श्री 'वेताळ' मंदिर दिसतं. आत 'तांदळा' स्वरूपातील श्री वेताळाची मूर्ती दिसते.

श्री वेताळ मंदिर, किल्ले घनगड, (Ghangad Fort)

 

                

                तिथून पुढे पाच मिनिटाच्या अंतरावर उजव्या बाजूस डोंगर उतारावर एकोले गाववेशीचं रक्षणकर्ती 'श्री गारजाई' देवीचं मंदिर दिसतं. मंदिरात काळ्या पाषाणावर श्री 'गारजाई' देवीची सुबक मूर्ती कोरली आहे. मंदिराचा जिर्णोद्धार केला असला तरी देवीची मूर्ती मात्र प्राचीन आहे. मंदिरात प्रवेश करतानाच डाव्या बाजूस मंदिराच्या भिंतीवर कोरलेला प्राचीन शिलालेखही दिसतो. मंदिर परिसर प्रशस्त, रम्य आहे. मंदिरासमोर जुन्या घडनावळीचे दोन दीपस्तंभ, एक तेलवातीचा स्तंभ आणि भग्न वीरगळ ओळीत दिसतात.



श्री गारजाई मंदिर, किल्ले घनगड, पुणे, महाराष्ट्र (Ghangad Fort, Pune, Maharashtra)

श्री गारजाई मंदिरासमोरील दीपस्तंभ, श्री गारजाई मंदिर, किल्ले घनगड, पुणे, महाराष्ट्र (Ghangad Fort, Pune, Maharashtra)

श्री गारजाई, किल्ले घनगड (Ghangad Fort)

              परंपरेनुसार ही सर्व मंदिरं 'एकोले' गावापासून दूर दिसतात. आजही पूर्वापार बांधलेली मंदिरं तळ्याकाठी, गावकुस वेशीबाहेर तर नदीकाठावर दिसतात. मंदिर, देवालयांभोवती मानवी वस्ती असू नये असा पूर्वापार पाळला जाणारा दंडक, आज मात्र बऱ्याच ठिकाणी मोडीत निघताना दिसतो.
               पुढे निबीड जंगलातून नागमोडी खड्या चढाची वाट अर्ध्या तासात किल्ल्याच्या घडीव पायऱ्या पर्यंत येते. हे जंगल इतकं घनदाट आहे की, पोहोचणाऱ्या अपुऱ्या प्रकाशामुळे दिवसाचा नीट अंदाज बांधता येत नाही. जंगलातून वानरांच्या हुक्क्यांचा दमदार आवाज कानावर पडताच अंगावर शहारे येतात. सोलो ट्रेकर्सनी वस्तीतून कोणीतरी सोबत घेणे सुरक्षिततेचे आहे.
किल्ले घनगड पायथ्याच्या घडीव पायऱ्या, किल्ले घनगड. 








'मारखिंड', उजवीकडे किल्ले घनगड, डावीकडे मारठाण्याचा डोंगर. (Ghangad Fort, Pune, Maharashtra)

'मारखिंड', किल्ले घनगड, मुळशी, पुणे, महाराष्ट्र. (Ghangad Fort, Pune, Maharashtra)

                गडपायथ्याच्या पायऱ्या चढून वर आल्यास उजव्या बाजूचा घनगड आणि डाव्या बाजूचा 'मारठाण्याचा' डोंगर इथे जुळलेला दिसतो. समोर या दोन्ही डोंगरांच्या सोंडी समांतर उतरत जातात. या डोंगरसोंडेंच्या मध्ये प्रचंड दरी दिसते तिला 'मारखिंड' असे नांव आहे. खिंडीसमोर उजव्या बाजूला खोल दरीकाठावर काही शिळा एकमेकांवर दिसतात. हा बहुदा उध्वस्त केलेल्या किल्ल्याच्या तटबंदीचा शिल्लक राहिलेला भाग असावा असे वाटते किंवा ही नैसर्गिक घडणही असावी. दरीकाठावरच्या या दगडांची ठेवण इतकी चित्तवेधक आहे की, डोंगरभटके धोका पत्करून या दगडांवर चढून फोटो तसेच रील्स करण्याचा प्रयत्न करतात.  हे थरारक, धोकादायक ठिकाण भटक्यांना आकर्षून घेताना दिसतं.

              या दगडांजवळूनच उजवीकडे किल्ल्याचा कातळावर चढून कड्याकाठाने जाणारी पायवाट कातळात खोदलेल्या एका मोठ्या गुहेकडे जाते. या गुहेत आठ ते दहा जण वस्ती करू शकतात. गुहेचा उपयोग मारखिंडीतून वर चढून येणाऱ्या शत्रूवर टेहळणी करण्यासाठी आणि त्यापुढे 'अंधारबन' डोंगर परिसरावर नजर ठेवण्यासाठी करता येतो. पुढे ही वाट कातळकाठाच्या अतिशय धोकादायक टप्प्यावरून पुढे जाते, त्यामुळे त्यापुढे कोणी जात नसावेत.

मारखिंडीकडून किल्ल्याकडे जाणारी पाऊलवाट, किल्ले घनगड, पुणे, महाराष्ट्र. (Ghangad Fort, Pune, Maharashtra)

किल्ल्याचे पहिले प्रवेशद्वार आणि त्याचे बुरुज. घनगड, पुणे, महाराष्ट्र. (Ghangad Fort, Pune, Maharashtra)
             या मारखिंडीत येण्यापूर्वी उजवीकडे कातळ उतारावरून तटबंदीला लागून जाणारी वाट दोन बुरूजांकडे जाताना दिसते. जवळ गेल्यास या दोन्ही बुरुजांच्या मध्ये किल्ले घनगडचे पहिले उध्वस्त प्रवेशद्वार दिसते. अगदी जवळ जाईपर्यंत या प्रवेशद्वाराचा अंदाज येत नाही अशा दरवाजांना 'गोमुखी' दरवाजे म्हटले जाते. किल्ल्यांच्या मुख्य दरवाजासमोर येऊन बाहेरून शत्रूला हल्ला करताना फार हालचाल करता येऊ नये म्हणून मोकळी जागा ठेवली जात नाही. असे दरवाजे एकतर धोकादायक दरीकाठावर निर्माण केले जातात किंवा दरवाजासमोर तटबंदी उभारलेली दिसते. अशा 'गोमुखी' रचनेचे दरवाजे म्हणजे किल्ल्यांच्या लष्करी दृष्ट्या वास्तूरचनेचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो.
किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशद्वारातुन दिसणाऱ्या कोरीव गुहा. घनगड, पुणे, महाराष्ट्र. (Ghangad Fort, Pune, Maharashtra)
                 दरवाजा ओलांडून डावे वळण घेऊन वर आल्यास डावी उजवीकडे सपाट मोकळी जागा दिसते. समोर किल्ल्याच्या कातळात दोन गुहा कोरलेल्या दिसतात. त्यापैकी डावीकडील गुहा मोठी प्रशस्त असून उजवीकडील थोडी लहान दिसते. दहा पंधरा जण या गुहेत रात्री वस्ती करू शकतात.
किल्ले घनगडचा निखळलेला कातळ,किल्ले घनगड, पुणे, महाराष्ट्र. (Ghangad Fort, Pune, Maharashtra)

श्री वाघजाई मंदिर, किल्ले घनगड, पुणे, महाराष्ट्र. (Ghangad Fort, Pune, Maharashtra)

किल्ले घनगडचा निखळलेला कातळ आणि उजवीकडे वाघजाई मंदिर. किल्ले घनगड, पुणे, महाराष्ट्र. (Ghangad Fort, Maharashtra)
                   सपाटीच्या उजव्या बाजूस किल्ल्याचा कातळाचा एक प्रचंड मोठा खडक निखळून या सपाटीवर स्थिरावला आहे. किल्ल्याच्या कातळाला तो रेलून उभा राहिल्याने दोन्हीमधून दुतर्फा जाता येता येतं. ही एक नैसर्गिक कमान बनलेली दिसते. डाव्या बाजूच्या किल्ल्याच्या मुख्य कातळात उंचावर कोरलेल्या चौकोनी गुहेत 'श्रीवाघजाई' देवीची मूर्ती दिसते. इथून मुळशी जलाशयापर्यंत  'कोरसबारस' मावळ खोरं, समोर लोणावळा डोंगररांग तर मागे डावीकडे किल्ले 'तैलबैला' असा विस्तृत भूभाग नजरेच्या टप्प्यात येतो. या हवेशीर कातळ कमानीखाली भटके सावलीत विसावा घेतात तर रात्री मुक्कामासाठी येणाऱ्या भटक्यांची ही आवडती जागा आहे.
कोरीव गुहा आणि समोर कातळावर लावलेली उभी शिडी. किल्ले घनगड, पुणे, महाराष्ट्र. (Ghangad Fort, Pune, Maharashtra)
  
कातळाला लावलेली शिडी (Ghangad Fort)
कातळटाकी. किल्ले घनगड


शिडीचा टप्पा. किल्ले घनगड, महाराष्ट्र. (Ghangad Fort, Maharashtra)

 

झिजलेल्या कातळपायऱ्या (Ghangad Fort)

                                            






          तर सपाटीच्या डाव्या टोकाला उभ्या कातळाला लावलेल्या लोखंडी शिडीवरून वाट किल्ल्यावर जाते. अंदाजे २० फूट उंच शिडी उभ्या खडकात मजबूत बसवली आहे. शिडीच्या वरच्या टोकाजवळ कातळात खोदलेली पाण्याची टाकी दिसते. टाकीतील पाणी पिण्यायोग्य स्वच्छ असून थंड, चवदार आहे. डोंगर भटके आवर्जून या पाण्याची चव चाखतात. या उभ्या शिडीच्या वरच्या टोकाजवळ खडकात धातूची वायर पक्की (fix) केली आहे. तिचा आणि कातळाचा आधार घेत डाव्या बाजूच्या धोकादायक कातळ काठावरून वाट कोरीव पायऱ्यांकडे येते. या कोरीव कातळ पायऱ्यांचीही बऱ्यापैकी झिज झाल्यामुळे इथेही आधारासाठी कातळात धातूची वायर बसविली आहे.

टेहळणीची गुहा आणि कातळ खांबटाक्या. Ghangad Fort, Pune, Maharashtra)

खांबटाकी, किल्ले घनगड, महाराष्ट्र. (Ghangad Fort, Pune, Maharashtra)
          हा टप्पा चढून उजवा वळसा घेऊन वर आल्यास उजवीकडेच कातळात कोरलेली चौकोनी गुहा दिसते. गुहेचा उपयोग टेहळणीसाठी केला जात असावा. या गुहेखाली पाण्यासाठी खोदलेल्या तीन कातळटाक्या आहेत. त्यातील दोन मोठ्या प्रशस्त असून दोन्ही टाक्यांना आधार देणारे कातळखांब दिसतात. या तिन्ही टाकीतील पाणी बाराही महिने टिकून रहातं. या कातळटाक्या आणि टेहळणीच्या गुहेची कल्पकतेने केलेली निर्मिती 'मारठाण्याच्या डोंगर' पार्श्वभूमीवर बघून इथपर्यंत चढाईसाठी केलेली दगदग विसरायला लावणारी आहे.
धोकादायक कातळटप्पा, किल्ले घनगड, महाराष्ट्र.

              पुढे किल्ल्यावर जाणारी वाट मात्र या टेहळणीच्या गुहेवरून उजवा वळसा मारत उभ्या कातळाच्या अवघड टप्प्यावरून जाते. पूर्वी या टप्प्यावर पायऱ्या होत्या पण इंग्रजांनी सुरुंग लावून त्या उध्वस्त केल्यामुळे आणि कालानुरूप इथल्या खडकाची झीज झाल्यामुळे चढाई करताना हा टप्पा धोकादायक बनला आहे. या टप्प्यावर मदतीसाठी खडकातील खोबण्यांचा आधार घेऊन सांभाळून चढाई करणे इतकाच पर्याय उरतो. या टप्प्यावर डावीकडे अवघड जागी असलेली कातळात कोरलेली दुसरी टेहळणीची गुहा दिसते.

टेहळणीची दुसरी गुहा, किल्ले घनगड, महाराष्ट्र. 


                खाली शिडीच्या पहिल्या टप्प्यावरून डावीकडे तोल सांभाळून कातळावर येताना आणि हा दुसरा कातळ टप्पा सर करताना, उतरताना सरासरी सहनशक्ती आणि संयमाची गरज आहे. हे दोन टप्पे वगळता बाकी किल्ल्याची चढाई मात्र मध्यम श्रेणीत मोडते.

बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार, किल्ले घनगड.

बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार, किल्ले घनगड, महाराष्ट्र.
बालेकिल्ल्यावरून दिसणारा दुहेरी रचनेचा बुरुज आणि भुयारी टाकी (कातळगुहा). किल्ले घनगड, महाराष्ट्र. (Ghangad Fort, Maharashtra)

बालेकिल्ल्यावरील भुयारी टाकी. किल्ले घनगड, महाराष्ट्र. (Ghangad Forta)

                हा टप्पा ओलांडून वर आल्यास समोर उभ्या उतारावर किल्ल्याचा दुसरा पूर्वाभिमुख दरवाजा दिसतो. दोन बुरुजांच्या मध्ये असणारा हा दरवाजाही अर्धवट उध्वस्त केलेला दिसतो. दरवाजा ओलांडून वर आल्यास डाव्या बुरुजात घसरणीवर एका खोल, चिंचोळ्या भुयारी टाकीत पायऱ्या उतरताना दिसतात. यावेळी आमच्या सोबत टॉर्च नसल्यामुळे मोबाईलच्या उजेडात टाकीच्या खोलीचा अंदाज घेता आला नाही. तसेच या निबिड जंगलात एकाकी घनगडावर मी आणि पत्नी दोघेच असल्याने आगाऊ धाडस करणेही सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य वाटलं नाही.

बालेकिल्ल्यावरील झेंडा बुरुज, मागे दिसणारा 'मारठाण्याचा' डोंगर. किल्ले घनगड, महाराष्ट्र. (Ghangad Fort, Maharashtra)

दक्षिणेकडील बुरुज आणि समोर दिसणारा बलाढ्य 'मारठाण्याचा' डोंगर. किल्ले घनगड, महाराष्ट्र. (Ghangad Fort, Maharashtra)

                 इथून बालेकिल्ल्याच्या मध्यभागी झेंडा बुरुजावर भगवा फडकताना दिसतो. झेंडा बुरुजाला लागून सदरेचे अवशेष दिसतात. डावीकडे म्हणजे किल्ल्याच्या दक्षिणेकडे जाणारी पाऊलवाट मारखिंडीच्या बाजूला असलेल्या किल्ल्याचा बुरुज आणि तटबंदिकडे जाते. हा दक्षिणेकडील बुरुजाच्या तटबंदीचा बराचसा भाग उध्वस्त आहे. शिल्लक तटबंदीत जंग्या आणि दिवळ्या दिसतात. त्यांची एकावर एक अशी दुमजली पद्धतीची रचना उठून दिसते. या तटबंदी खाली प्रचंड खोल 'मारखिंडी'ची दरी दिसते. दरीसमोर शंकुसारखा दिसणारा अवाढव्य 'मारठाण्याचा' डोंगर नजरेचे पारणे फेडतो.

दुहेरी रचनेचा बुरुज, त्यामागे 'मारठाण्याचा' डोंगर किल्ले घनगड, महाराष्ट्र. (Ghangad Fort, Maharashtra)


बालेकिल्ल्यावरून दिसणारी 'मारखिंड', त्यापुढे अंधारबन डोंगर परिसर. किल्ले घनगड, महाराष्ट्र. (Ghangad Fort, Maharashtra)

किल्ले 'तैलबैला', घनगड, महाराष्ट्र 

               पुढे उजवा वळसा मारत वाट बालेकिल्ल्याच्या पश्चिम काठावरून उत्तरेकडे जाते. या काठावरून खाली खोल उभी दरी दिसते. दरी पलीकडे तैलबैलाची दरीखिंड आणि त्यापलीकडे  सह्याद्रीचं खास आकर्षण असणारे 'किल्ले तैलबैला' डौलात उभा दिसतो. तैलबैलाच्या विशिष्ट रचनेची उभी भिंत डोळ्यात भरते. त्याच्या डाव्या बाजूस किल्ले 'सुधागड' लक्ष वेधून घेतो. इथून सह्याद्रीची रांग, त्यातील प्रचंड खोल दऱ्या, डोंगर माथ्यावरील विस्तीर्ण पठारे डोळ्यात सामावतात.

बालेकिल्ल्यावरून दिसणारा किल्ले तैलबैला, किल्ले सुधागड आणि डोंगर माथ्यावरील विस्तीर्ण पठारे (Ghangad Fort, Maharashtra)

बालेकिल्ल्याच्या ईशान्य टोकावरील कातळटाकी (Ghangad Fort, Maharashtra)

बालेकिल्ल्यावरील उध्वस्त वास्तुंचे अवशेष. किल्ले घनगड, महाराष्ट्र. (Ghangad Fort, Maharashtra)

                    बालेकिल्ल्याच्या ईशान्येला उतारावर एक काठोकाठ भरलेली पाण्याची कातळटाकी दिसते. तर मध्यभागी ठिकठिकाणी काही उध्वस्त वाड्यांचे अवशेष दिसतात. इथून बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वाराकडे आल्यास पूर्व उतारावर खोदलेली आणखी एक मोठी कातळ टाकी दिसते. या टाकीतील पाण्याची पातळी मात्र तळाला गेलेली दिसते. पूर्व काठाने पुढे आल्यास, दुमजली पद्धतीचा आणि विशेष रचनेचा बुरुज दिसतो. थोडक्यात बालेकिल्ल्याच्या दरवाज्याचे दोन आणि दुमजली तटबंदीच्या रचनेचे दोन असे बालेकिल्ल्याच्या पूर्वेस चार बुरुज दिसतात. बुरुजांव्यतिरिक्त बालेकिल्ल्यावर कुठेही तटबंदी दिसत नाही.

बालेकिल्ल्यावरील उध्वस्त वास्तुंचे अवशेष. किल्ले घनगड
 
पूर्व उतारावरील कातळटाकी, किल्ले घनगड

                    किल्ले घनगडास  पायथ्याचे मुख्य आणि बालेकिल्लाचे प्रवेशद्वार असे दोन दरवाजे, एकूण आठ कातळ कोरीव टाक्यांपैकी दोन खांबटाक्या, लहान मोठे मिळून आठ बुरुज आणि तीन टेहळणीच्या गुहा दिसतात. चारही दिशांच्या उभ्या उंच कातळ कड्यांनी किल्ल्यास नैसर्गिक संरक्षण दिले आहे.
                   १७७७ ते १७८३ या काळात महिला कैद्यांसोबत अनेक राजकीय कैदीही 'किल्ले घनगडा'वर कैदेत ठेवल्याच्या इतिहासात नोंदी मिळतात. पेशवाईच्या शेवटी हा किल्ला 'बाळाजी कुंजीर' यांच्या ताब्यात होता. १७ मार्च १८१८ रोजी कर्नल 'प्रॉथरने' कोणतीही लढाई न लढता 'किल्ले घनगड' स्वतःच्या ताब्यात घेतला. 

किल्ले घनगड, महाराष्ट्र. (Ghangad Fort, Maharashtra)

किल्ले घनगड, महाराष्ट्र. (Ghangad Fort, Maharashtra)
          

                 या आधी हा किल्ला कोणी, कधी बांधला याची इतिहासात नोंद सापडत नाही, पण प्रथम हा किल्ला कोळी सामंतांकडून अहमदनगरच्या निजामशाकडे आला. निजामशाही बुडाल्यानंतर पुढे किल्ला आदिलशाहीतील ढमाले देशमुख यांच्या ताब्यात आला. १६४७ ला शिवछत्रपतींनी आदिलशाहीकडून हा किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला. १६६५ च्या पुरंदर तहात तो मुघलांना देण्यात आला. पुन्हा १६७० ला तो शिवछत्रपतींनी जिंकून घेतला. १७०० पर्यंत घनगड 'पंतसचिव' शंकराजी नारायण यांच्या ताब्यात होता. पुढे छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर किल्ला पुन्हा मुघलांच्या ताब्यात गेला. तर पंतसचिवांच्या आदेशाने किल्ले तुंग, तिकोना, राजमाची, कोरीगड समवेत घनगड  'सरखेल' कान्होजी आंग्रेनीं  मराठ्यांच्या ताब्यात घेतला. पुढे १७१४ मध्ये बाळाजी विश्वनाथ यांच्या मध्यस्थीने घनगड आंग्रेनी छ. शाहूंच्या ताब्यात दिला.
               पुढे 'सदाशिव भाऊ' पेशव्यांच्या तोतया प्रकरणातील कनोजी ब्राह्मण 'सुखलाल' यास आणि या प्रकरणाला हातभार लावणारा 'धोंडो गोपाळ केळकर' यालाही 'किल्ले घनगडा'वर काही काळासाठी कैदेत ठेवल्याचे उल्लेख सापडतात.

Blue jewel bug, with brilliant coloration, may produce offensive odour when disturb, are around 450 species worldwide, observed in Western Ghat forest.- Ghangad Fort. किल्ले घनगड, महाराष्ट्र.

                  १७७७ सालच्या पेशवे काळात गाजलेल्या 'बारभाई' प्रकरणातील 'सखाराम हरी गुप्ते' यांनाही किल्ले घनगडा'वर कैदेत ठेवले होते. त्यावेळी किल्ल्याचे किल्लेदार 'अर्जोजी ढमाले' आणि कारखानीस 'रामचंद्र गोविंद' होते. कारखानीस रामचंद्र गोविंद याने, सखाराम गुप्ते यांना फितूर होऊन कैदेतून सोडवण्याची योजना आखली. ही गोष्ट किल्लेदार 'अर्जोजी ढमाले' यांना समजली. या फितूरीत एकूण आठ व्यक्ती सामील होत्या. त्यातील दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले. पकडलेल्या सहा जणांपैकी चौघांना तोफेच्या तोंडी देण्यात आले, तर दोघांचे उजवे हात तोडण्यात आले. फितुरी उघड झाल्यामुळे सखाराम गुप्तेंवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला.

किल्ले घनगड, महाराष्ट्र. (Ghangad Fort, Maharashtra)

             १७७९ ला सखाराम गुप्तेंचा किल्ल्यावर कैदेत असतानाच मृत्यू झाला. सखाराम गुप्तेंची पत्नी त्यांना घनगडावर भेटायला येण्यास निघाली असता, तिला 'तैलबैला' जवळील घाटात त्यांच्या मृत्यूची बातमी समजली. त्या बातमीच्या धक्क्याने तिचे घाटातच निधन झाले. तेव्हापासून या घाटाला 'सवाष्णीचा घाट' किंवा 'सतीचा घाट' म्हणून ओळखलं जाऊ लागलं.. 

                              || श्री कृष्णार्पणमस्तू ||


ऐतिहासिक संदर्भ :१) महाराष्ट्र देशातील किल्ले, चिं. ग. गोगटे, भाग १ व २ (सुधारित आवृत्ती)
                          २) पेशवे रोजनिशी, खंड१ ते९, डेक्कन व्हर्रनॅक्युलर ट्रान्सलेशन सोसायटी, पुणे.


येथे - जयवंत जाधव

Friday, 29 November 2024

किल्ले 'त्रिंगलवाडी', इगतपुरी, जि. नाशिक - Tringalwadi Fort, Dist. Nashik, Maharashtra.

                  मुंबईहून नाशिकला जाताना इगतपुरी परिसरातून सह्याद्रीची दक्षिणोत्तर पसरलेली मुख्य रांग दिसते. 'कसारा' घाट म्हणजेच प्राचीन 'थळ' घाट संपल्यानंतर 'इगतपुरी' हे घाटमाथ्यावरचे पहिले गाव लागते. इथून पूर्वेकडे डोंगराला फुटलेला फाटा हा 'कळसुबाई' डोंगररांग म्हणून ओळखला जातो. या रांगेत उत्तरेला 'किल्ले त्रिंगलवाडी' आहे. 

                     'इगतपुरी' म्हणजे रेल्वेचे मोठे जंक्शन. इगतपुरी गावातून  लोहमार्गाला समांतर जाणाऱ्या उत्तरेकडील रस्त्याला आंबेडकर चौक दिसतो. चौकातल्या 'विपश्यना' केंद्राजवळ डावं वळण घेऊन जाणारा रस्ता 'त्रिंगलवाडी' किल्ल्याकडे जातो. थोडक्यात, किल्ले 'त्रिंगलवाडी'ची डोंगररांग अगदी इगतपुरी पर्यंत आलेली दिसते.

कल्याण दरवाजा, किल्ले त्रिंगलवाडी, इगतपुरी, जि. नाशिक, महाराष्ट्र. (Tringalwadi Fort, Igatpuri, Maharashtra)

               इगतपुरीपासून अर्ध्या तासाच्या अंतरावर 'त्रिंगलवाडी' गावाला लागूनच विस्तीर्ण जलाशय आणि धरण दिसतं. त्या गावाच्या पुढे जलाशयाला डावा वळसा मारत 'पत्र्याची वाडी' करून रस्ता पुढे गडपायथ्याच्या 'तळ्याच्या वाडी'त येतो. 

विपश्यना केंद्र, इगतपुरी (Tringalwadi Fort, Igatpuri, Maharashtra)

               या आधी फक्त त्रिंगलवाडी गावापर्यंतच रस्त्याची सोय होती. त्यामुळे पुढे त्रिंगलवाडी जलाशयाच्या धरणाची भिंत चढून किल्ल्यासाठी उजवा वळसा मारावा लागत असे. सध्या तळ्याच्या वाडी पर्यंत झालेल्या रस्त्यामुळे हा द्रविडी प्राणायाम आणि वेळेची बचत होते.

तळ्याची वाडीतील 'तळं' आणि मागे दिसणारा किल्ले त्रिंगलवाडी (Tringalwadi Fort, Igatpuri, Maharashtra) 

             तळ्याची वाडी ही किल्ले 'त्रिंगलवाडी'च्या पायथ्याची वाडी. त्यामागे वस्तीला पाणी पुरवणारं आणि धुण्या भांड्यासाठी मदत करणारं तळं दिसतं. या तळ्यामुळे कदाचित या वस्तीला 'तळ्याची वाडी' म्हणत असावेत. या सगळ्यांच्या मागे डाव्या बाजूस दक्षिणोत्तर आडव्या डोंगरावर 'किल्ले त्रिंगलवाडी' दिसतो. 

                  तळं ओलांडताच पायवाटेवर 'सतीशिळा' स्वागत करते. वाडीतून पंधरा मिनिटांच्या अंतरावर भात शेतीच्या बांधावरून पाऊलवाट प्रथम दहाव्या शतकात कोरलेल्या जैन लेण्यांकडे येते. आणि या लेण्यांपासून डोंगरावर जाणारी वाट किल्ल्यावर घेऊन जाते. 

पत्र्याच्या वाडीतील भातमळणीचं पारंपारिक' खळं' आणि मागे दिसणारा किल्ले त्रिंगलवाडी (Tringalwadi Fort, Maharashtra)
तळ्याची वाडीतील भातकापणी आणि मागे दिसणारा किल्ले त्रिंगलवाडी (Tringalwadi Fort, Igatpuri, Maharashtra)

                   आमच्या भेटीदरम्यान गाव वस्तीत सुगीची लगबग दिसत होती. भात कापणी करून ते डोक्यानं खळ्यापर्यंत आणणं आणि भाताची मळणी काढणं चालू होतं.

किल्ल्याच्या पायवाटेवरील 'सतीशिळा' (Tringalwadi Fort)

             वाडी मागे टाकत भातशेतं ओलांडुन येताना डोंगर पायथ्याच्या सखलात हे पूर्वाभिमुख लेणं कोरलेलं दिसतं. लेण्यांच्या समोर प्रशस्त मोकळं आवार असून ओसरी(व्हरांडा), मंडप (विहार) आणि आत गर्भगृह अशी लेण्याची रचना आहे. 

किल्ल्याच्या पायथ्याचं १० व्या शतकातील लेणं  (Tringalwadi Fort, Igatpuri, Maharashtra)

                 ओसरीत मंडपाच्या प्रवेशदाराच्या कातळ चौकटीवर देवतांच्या सुंदर मूर्ती सोबत कोरीव नक्षीकाम आहे. चौकटीवर मध्यभागी सुंदर नाजूक नक्षीसह तीर्थंकरांच्या मुर्त्या कोरलेल्या दिसतात. ओसरीच्या छतावर मध्यभागी वर्तुळात चित्तवेधक यक्ष कोरले आहेत. त्याच्याच बाजूला वर्तुळात दोन दोन सुबक पुष्प कोरली आहेत. छताच्या कातळ तुळ्यांवरही  सुंदर नक्षीकाम आहे. दाराच्या दोन्ही बाजूस सुरेख जाळीची गवाक्ष आहेत. चौकटीचा उंबरा तुटलेला दिसतो.

लेण्याच्या मंडपाचे प्रवेशदार,  किल्ले त्रिंगलवाडी, इगतपुरी, महाराष्ट्र. (Tringalwadi Fort, Igatpuri, Maharashtra)

लेण्याची ओसरी आणि मंडपाचे प्रवेशदार, किल्ले त्रिंगलवाडी, इगतपुरी, महाराष्ट्र. (Tringalwadi Fort, Igatpuri, Maharashtra)

                   ओसरीला आधार देणारे समोरचे खांब उध्वस्त दिसतात. त्या खांबांचे सुंदर कोरीव अवशेष लेण्यांच्या प्रशस्त आवारातील मध्यभागी रचून ठेवले आहेत. लेण्यांच्या बाहेर डाव्या कोपऱ्यात सुबक भग्न मुर्त्या ओळीने मांडून ठेवल्या आहेत. 

लेण्याबाहेर डाव्या कोपऱ्यात मांडलेल्या भग्न मुर्त्या.

            आत प्रशस्त मंडप असून मंडपाला आधार देणारे आठ खांब आहेत. त्यापैकी चार पूर्णाकृती असून चार गाभाऱ्याच्या चौकटी लगत दोन्ही बाजूला अर्धखांब आहेत. मंडपातील चार पूर्ण खांबांपैकी तीन संपूर्ण उध्वस्त दिसतात. तर एक आपलं अस्तित्व आजही राखून आहे.

लेण्याच्या मंडपाचे तुटलेले आधारखांब आणि मागे गर्भगृह. किल्ले त्रिंगलवाडी, इगतपुरी, महाराष्ट्र. (Tringalwadi Fort, Maharashtra)
 
खांबावरील 'भारवाहक यक्ष'. किल्ले त्रिंगलवाडी.
                  गर्भगृहाच्या चौकटी जवळ छताला आधार देणाऱ्या खांबांवर सुंदर 'भारवाहक यक्ष' कोरलेले दिसतात. गर्भगृहाच्या दोन्ही बाजूची चौकट तुटलेली असली तरी शिल्लक चौकटीवरही सुबक आणि नाजूक जाळीदार नक्षी कोरलेली दिसते. मंडपात दोन्ही बाजूला बसण्यासाठी ओटे दिसतात तर उजवीकडील कोपऱ्यात कातळात खोदलेलं गोलाकार पाण्याचं 'कुंड' दिसतं. त्यात बारा महिने पाणी असतं. पावसाळ्यात लेण्यामागील डोंगरातून झिरपून येणारं पाणी लेण्याच्या मंडपात येतं. तिथून ते कातळ जमिनीवरून ओसरीच्या डाव्या बाजूनं लेण्याबाहेर येताना दिसतं. लेण्यात झिरपणाऱ्या पाण्यामुळे आत ओलावा टिकून आहे. उन्हाळ्यात हा ओलावा कमी होत असावा. 
लेण्याच्या मंडपातील पाण्याचे 'कुंड'. (Tringalwadi Fort)




लेण्याच्या मंडपातील कोनाडे. मागे गर्भगृहात ऋषभनाथनांची मूर्ती. किल्ले त्रिंगलवाडी, महाराष्ट्र. (Tringalwadi Fort, Maharashtra)
  

मंडपातील एकमेव आधारस्तंभावरील कोरीव काम. त्यामागे दिसणारे लेण्यातील तुटलेले अवशेष. (Tringalwadi Fort)

                 आधी या लेण्याचा स्थानिक जनावरे बांधण्यासाठी उपयोग करत. येत्या चार वर्षाच्या कालावधीत पुरातत्व खात्याचं या लेण्यांकडे लक्ष गेलेलं दिसतं. गावातीलच एकाला पुरातत्व खात्यानं या लेण्यांची साफसफाई आणि व्यवस्था ठेवण्याची जबाबदारी दिली आहे. या लेण्याचा आत बाहेर मिळून जवळजवळ ८० टक्के भाग उध्वस्त दिसतो. तुटलेले हे सर्व अवशेष मंडपाच्या डाव्या कोपऱ्यात रचून ठेवले आहेत. तर कोरीव खांबाचे तुटलेले मोठमोठे अवशेष लेण्यांसमोर आवारात मांडून ठेवले आहेत. तुटलेल्या आणि अस्तित्व राखून असलेल्या लेण्याचा भाग यांची कल्पना केल्यास हे एक अजोड कलात्मक लेणं असावं. 

                 प्राचीन चौल, कल्याण, सोपारा (नालासोपारा) या बंदरात उतरणारा माल 'थळ' घाट (कसारा घाट) मार्गे नाशिकला जात असे. या व्यापारी मार्गावर विसावा घेण्यासाठी या लेण्यांचा उपयोग होत असे. आणि किल्ले 'त्रिंगलवाडी'नं या लेण्यास संरक्षण दिलं.

                गर्भगृहात चौथर्‍यावर पहिले जैन तीर्थंकर 'ऋषभनाथां'ची सुबक ध्यानमग्न मूर्ती, पण तीही खांद्यांच्या वर भग्न झालेली आहे. मूर्तीच्या खाली शिलालेख कोरलेला दिसतो. या मूर्तीसाठी गर्भगृहात शिरताना जवळ टॉर्च ठेवणं गरजेचं आहे.

लेण्याच्या गर्भगृहात पहिले जैन तीर्थंकर 'ऋषभनाथ' 

    हे एकमेव लेणं 'किल्ले त्रिंगलवाडी' डोंगर पायथ्याशी असल्यामुळे परकीय आक्रमणात किल्ल्यावर ताबा मिळवताना प्रत्येक वेळी पहिला आघात या लेण्यावर झाला असावा असे वाटते.

            किल्ले त्रिंगलवाडीसाठी आम्ही राहत्या पनवेलहून सकाळीच घर सोडलं. या वेळी मी आणि पत्नी दोघेच होतो. मोटरसायकलवरून १३५ किमीचा मनमुराद प्रवास करत, किल्ले 'त्रिंगलवाडी' पायथ्याच्या 'तळ्याच्या वाडी'त दुपारी बारा वाजता पोहोचलो. ही लेणी बघून लेण्यांच्या ओसरीतच आम्ही बांधून आणलेली शिदोरी सोडली. आणि त्यानंतर भर उन्हात दुपारी एक वाजता समुद्र सपाटीपासून ३२०० फूट उंचीवर असलेल्या किल्ल्याकडे मोहरा वळवला. 

लेण्याच्या डाव्या बाजूने डोंगरसोंडेवर जाणारी वाट. (Tringalwadi Fort)

              या लेण्यांच्या डाव्या बाजूने डोंगरावर चढून गेल्यास वीस मिनिटात आपण डोंगराच्या आडव्या सोंडेवर पोहोचतो. ही डोंगरसोंड डावीकडे उतरती आहे, तर उजवीकडे किल्ल्याच्या दिशेने चढत जाते.  

डोंगरसोंडेवरुन किल्ल्यावर येणारी वाट. किल्ले त्रिंगलवाडी, इगतपुरी, महाराष्ट्र. (Tringalwadi Fort, Igatpuri, Maharashtra)
डोंगरसोंडेवरुन 'किल्ले त्रिंगलवाडी'ची दिसणारी कातळटोपी. किल्ले त्रिंगलवाडी, महाराष्ट्र. (Tringalwadi Fort, Maharashtra)

                    या डोंगरसोंडेवरुन उजवीकडे दूरवर किल्ल्याची कातळ टोपी दिसते. पुढच्या वीस मिनिटात चढत जाणारी पायवाट किल्ल्याच्या कातळाखाली येते. या कातळाच्या डावी उजवीकडून दोन्ही बाजूने किल्ल्यावर जाता येतं. पैकी उजवीकडून जाणारी वाट कमी कष्टाची आणि सोपी आहे. तर डावीकडून कातळ टोपीला वळसा मारत ती कातळ काठावरून पुढे जाते. वाट शेवटी किल्ल्याच्या पश्चिमेला दिसणाऱ्या दोन सुळक्यांच्या अवघड टप्प्याजवळ येते. 

कातळटोपीच्या डाव्या बाजूच्या डोंगरधारेवरून किल्ल्यावर जाणारी वाट.
               हा टप्पा म्हणजे डोंगराच्या उभ्या घळीमध्ये कातळात कोरलेल्या उभ्या पायऱ्या आणि खाली दरी आहे. सुरुवातीच्या काही पायऱ्या पूर्णतः उध्वस्त आहेत तर त्या पुढील पायऱ्या अर्धवट उध्वस्त आहेत. तोल सांभाळत, कातळाचा आधार घेत इथली चढाई करावी लागते. पुरुषांच्या तुलनेत सरासरी कमी उंची असल्यानं महिला ट्रेकर्सना हा टप्पा जरा धिरानंच सर करावा लागतो. 
उध्वस्त पायऱ्यांचा सुरुवातीचा कठीण टप्पा, किल्ले त्रिंगलवाडी (Tringalwadi Fort)

किल्ले त्रिंगलवाडीच्या उभ्या ५२ पायऱ्या, किल्ले त्रिंगलवाडी 
 
किल्ले त्रिंगलवाडीच्या उभ्या ५२ पायऱ्या, किल्ले त्रिंगलवाडी

किल्ले त्रिंगलवाडीच्या उभ्या ५२ पायऱ्या, किल्ले त्रिंगलवाडी, महाराष्ट्र Tringalwadi Fort, Maharashtra

                  हा टप्पा ओलांडून दोन्ही कातळातून वर जाणाऱ्या उभ्या ५२ पायऱ्या दम काढतात. मधे काही पायऱ्या तुटलेल्या आहेत. त्या आणि या सर्वच पायऱ्या गडबड न करता संयमानच चढाव्या लागतात. पुढे या पायऱ्या उजवा वळसा घेत त्याच कातळात उजवीकडे कोरलेल्या किल्ल्याच्या गोमुखी दरवाजात येतात. 
पश्चिमेकडील 'कल्याण दरवाजा'. किल्ले त्रिंगलवाडी, महाराष्ट्र (Tringalwadi Fort, Maharashtra)

              या पायऱ्या चढताना 'किल्ले सरसगडा'ची हमखास आठवण येते. पश्चिमेकडील किल्ल्याच्या या दरवाजास 'कल्याण दरवाजा' किंवा 'महादरवाजा'ही म्हटलं जातं. किल्ल्याच्या पश्चिमेला अवघड टप्प्याने या पायऱ्या गडाखाली उतरतात, त्यामुळे या दरवाज्यास काहीजण 'चोर' दरवाजाही म्हणतात. 

          पायऱ्या चढून वर आल्यास समोर कातळ भिंतीवरच्या कमानीत अंदाजे सहा फूट उंच, शेंदूर लावलेली वीर मारुतीची मूर्ती कोरली आहे. मूर्ती सुरेख प्रमाणबद्ध, सुंदर, सुबक आणि भव्य अशीच म्हणावी लागेल. मूर्तीच्या पायाखाली राक्षस दाबून धरलेला दिसतो. या मूर्तीच्या काटकोनात उजव्या बाजूस हा दरवाजा दिसतो. 

कल्याण दरवाजा'
वीर मारुती, किल्ले त्रिंगलवाडी (Tringalwadi)


कातळात आरपार कोरलेला 'कल्याण दरवाजा'. किल्ले त्रिंगलवाडी, महाराष्ट्र (Tringalwadi Fort, Maharashtra)

                 दरवाजा भव्य आयताकृती असून, त्याच्या चौकटीवर दोन्ही बाजूस किल्ल्यांचे शक्तिस्थळ असणारे सुंदर 'शरभ' कोरलेले दिसतात. त्याखाली चौकटीवर 'चंद्र' आणि 'सूर्या'च्या प्रतिमा कोरल्या आहेत. चौकटीत नजीकच्या काळात बनवलेले दोन मजबूत सागवानी दरवाजेही दिसतात. हा महादरवाजा आत अंदाजे बारा फूट अखंड कातळात आरपार कोरला आहे. दरवाजाच्या आतील दोन्ही बाजूस सात फूट उंचावर शिपायांसाठी 'देवड्या' कोरलेल्या आहेत. इतर किल्ल्यांच्या तुलनेत इथल्या देवड्या छतालगत इतक्या उंचावर ठेवण्याचा उद्देश मात्र आमच्या लक्षात आला नाही. पुढे बाहेर पडण्यासाठी या दरवाजाला कमान ठेवली आहे. हा दरवाजा ओलांडून त्याच कातळातील दहा बारा पायऱ्या चढून गडावरील समतल जागेवर येता येतं.

किल्ल्यावर येणारा भुयारी 'कल्याण दरवाजा'. किल्ले त्रिंगलवाडी (Tringalwadi Fort)

भुयारी 'कल्याण दरवाजा'तून किल्ल्यावर येणाऱ्या पायऱ्या
              



















                 या टप्प्यावरून जर गडउतार व्हायचं असेल तर आधी या भुयारी पायऱ्या उतरून वाट महादरवाजात येते. उजवीकडे कोरीव मारुती आणि डाव्या बाजूच्या अखंड कातळातील तीव्र उताराच्या पायऱ्या उतराव्या लागतात. किल्ल्यावर असताना अगदी या भुयारी पायऱ्या उतरून पुढे येईपर्यंत  जमिनीखालील या दरवाजाचा अंदाज येत नाही. कदाचित यामुळेच  या दरवाजास 'चोर दरवाजा'ही म्हणत असावेत. 
               किल्ल्याचा हा भुयारी दरवाजा, त्याला काटकोनात कोरलेली वीर मारुतीची भव्य मूर्ती आणि त्याच अखंड कातळात कोरलेल्या गडउतार होणाऱ्या पायऱ्यांचा अवघड टप्पा हे या 'किल्ले त्रिंगलवाडी'चे अलौकिक, भव्य असे वास्तूवैशिष्ट्य आणि प्रमुख आकर्षण आहे. ज्या भटक्यांना हा किल्ला सर्वार्थांनं बघायचा आहे त्यांनी किल्ल्याच्या या पश्चिमेकडील दरवाजानं चढाई करावी. 
किल्ल्याच्या दक्षिणेकडे जाणारी पाऊलवाट. किल्ले त्रिंगलवाडी (Tringalwadi Fort)



किल्ल्याच्या दक्षिणेकडे जाणारी पाऊलवाट. किल्ले त्रिंगलवाडी (Tringalwadi Fort)


किल्ल्याची पश्चिम कडा. समोर सह्याद्रीची मूळ पर्वतरांग. (Tringalwadi Fort, Maharashtra)

                   हा दरवाजा ओलांडून वर आल्यास लगेच डावीकडे कातळात एक पाण्याची उथळ टाकी दिसते. सध्या त्यात पाणी दिसत नाही. इथून गवतातून जाणारी पाऊलवाट डावीकडील बालेकिल्ल्याची टेकडी आणि उजवीकडील पश्चिमेचा कडा यांच्या मधून गडाच्या दक्षिण टोकाकडे येते. 

                गडावर कमरे इतकं वाढलेलं गवत आणि त्यावरची मोहक खसखशीच्या आकाराची सुकलेली फुलं मोहून टाकतात. त्याचबरोबर गडाच्या पठारावर सर्वत्र 'कुर्डू'च्या भाजीचे तुरे आकर्षून घेतात. या नाजूक गवतातून भटकंती करणं हा एक सुखद अनुभव आहे.

किल्ल्याच्या दक्षिणेकडील उध्वस्त राजवाड्याचे अवशेष. (Tringalwadi Fort, Maharashtra)


राजवाड्याचे अवशेष. (Tringalwadi Fort, Maharashtra)


कातळावरील चौकोनी 'खळगे'. (Tringalwadi Fort)
                   

                  गडाच्या दक्षिण टोकाला पडक्या  वाड्याचे अवशेष आहेत. वाड्यासमोर कातळ जमिनीवर खोदलेले चौकोन खळगे दिसतात. असे चौकोनी खळगे वाड्यातही दिसतात. हे कदाचित त्यावेळी गडावर तात्पुरता आडोसा किंवा छप्पर उभारण्यासाठी या खळग्यांचा वापर होत असावा. कातळ टाकींच्या सभोवती दिसणाऱ्या खाळग्यांचा उपयोग हा उष्णतेने पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये यासाठी टाकीवर छत उभारण्यासाठी केला असावा.

                   हे अवशेष बघून पुन्हा थोडं मागे येऊन पाऊलवाट तीव्र चढाने डाव्या बाजूला गडाचा सर्वोच्च माथा असलेल्या बालेकिल्ल्यावर जाते. बालेकिल्ल्यावर भगवा फडकत असून, पूर्व-पश्चिम पसरलेला निमुळत्या लांबट आकाराचा आहे. बालेकिल्ल्याच्या पूर्व टोकाला जाताना डावीकडे उत्तरेकडील उभा कडा आणि खाली ठाव न लागणारी खोल दरी आहे. दरीत प्रचंड वाढलेलं जंगल दिसतं. बालेकिल्ल्यावर तटबंदी किंवा कोणतेही अवशेष दिसले नाही.

बालेकिल्ल्याची टेकडी. किल्ले त्रिंगलवाडी(Tringalwadi Fort, Maharashtra)

बालेकिल्ल्याची उत्तर कडा.(Tringalwadi Fort)


बालेकिल्ला. किल्ले त्रिंगलवाडी(Tringalwadi Fort)

बालेकिल्ल्याची उत्तर कडा.(Tringalwadi Fort)

                  





              बालेकिल्ल्याच्या या उत्तर कड्यावरून धुक्यातून सह्याद्रीची 'त्र्यंबक' डोंगररांग, किल्ले हरिहर, बसगड नजरेच्या टप्प्यात येतात.

            बालेकिल्ल्यावरून सभोवतालचा विहंगम आसमंत दिसतो. दक्षिणेस इगतपुरीची डोंगररांग, आग्नेयेला त्रिंगलवाडी जलाशयाच्या पलीकडे कळसुबाई डोंगररांग नजरेच्या टप्प्यात येते.


बालेकिल्ल्यावरून दिसणारे किल्ल्याचे दक्षिण टोक. त्यापुढे सह्यद्रीची इगतपुरी डोंगररांग. (Tringalwadi Fort, Maharashtra)

बालेकिल्ल्यावरून दिसणारी सह्याद्रीची कळसुबाई डोंगररांग. (Tringalwadi Fort, Maharashtra)

किल्ल्यावरील गुहा. किल्ले त्रिंगलवाडी (Tringalwadi Fort)

किल्ल्यावरील शिवशंकर मंदिर. किल्ले त्रिंगलवाडी (Tringalwadi Fort)
                  
                         बालेकिल्ल्यावरून पुन्हा खाली येऊन डावा वळसा मारून गवतातून पुढे गेल्यास कातळात खोदलेली गुहा दिसते. तिला कातळ खांबांचा आधार दिसतो. सध्या गुहेत साचलेला गाळ दिसतो. त्यापुढे गडाच्या पूर्व टोकाला छोटसं श्री शिवशंकराचं मंदिर दिसतं. मंदिरापुढे आवारात शिवपिंडी दिसते. आत मंदिरात श्रीगणेशासह, माता पार्वती आहे. बाजूला चतुर्भुज स्वरूपातील श्री तुळजा भवानी असावी. 
किल्ल्यावरील शिवशंकर मंदिर. किल्ले त्रिंगलवाडी 

        पुन्हा गडाच्या दक्षिण टोकाकडे खाली उतरल्यास कातळ उतारावर आणखी एक पाण्याची टाकी खोदलेली दिसते. पुढे दक्षिण टोकाकडे खाली आणखी एका वाड्याचे अवशेष दिसतात. या वाड्यात आधी देव राहायचे. वाडा पडल्यानंतर गावकऱ्यांनी देवांना खाली गावात हलविले अशी गावात माहिती मिळते. 

 

किल्ल्याच्या पूर्व उतारावरील कातळटाकी. किल्ले त्रिंगलवाडी (Tringalwadi Fort, Maharashtra)


किल्ल्यावरील कातळटाकी. (Tringalwadi Fort, Maharashtra)
             या वाड्यापासून कातळावर उजवा वळसा मारून पुढे आल्यास किल्ल्याच्या दक्षिण बाजूनं गडउतार होण्यासाठी कातळात कोरलेल्या पायऱ्या दिसतात. त्यांच्या तुटलेल्या रचनेवरून आधी इथे किल्ल्याचे प्रवेशदार असावे. या उतरणाऱ्या घडीव पायऱ्या झीज होऊन ओबडधोबड झाल्या आहेत.


 

किल्ल्यावरील वाड्याचे अवशेष. (Tringalwadi Fort)

किल्ल्याच्या दक्षिणेकडून गड उतार होणारी वाट. किल्ले त्रिंगलवाडी 

               या पायऱ्यांवरून उतरताना उजवीकडे मध्यावर कातळात कोरलेली एक गुहा दिसते. ती या किल्ल्याच्या वाटेवर शिपायांसाठी 'देवडी' असावी.

किल्ल्याच्या दक्षिणेकडून गडउतार होणाऱ्या पायऱ्या. 

                   पायऱ्या उतरून पायवाट उजवा परतीसाठी वळसा मारते. डाव्या बाजूस वळसा मारल्यास कातळात कोरलेली आणखी एक गुहा दिसते. उजव्या बाजूच्या परतीच्या वाटेवर कातळात काही शेंदूर फासलेले दगड आणि भगवा ध्वज दिसतो. पुढे पायवाट डोंगराच्या सोंडेकडे गड चढाईसाठी सुरुवातीला ज्या ठिकाणी पश्चिमेकडे डावा वळसा मारला होता त्या वाटेवर किल्ल्याच्या कातळटोपी खाली येऊन मिळते आणि गडफेरी पूर्ण होते.

किल्ल्याच्या दक्षिणेकडून गडउतार होणाऱ्या पायऱ्या आणि 'देवडी' (गुहा) (Tringalwadi Fort, Igatpuri, Maharashtra)

                त्रिंगलवाडीचा लिखित इतिहास सापडत नाही. पायथ्याच्या लेण्यात गर्भगृहातील 'ऋषभनाथांच्या' मूर्तीखाली कोरलेल्या शिलालेखानुसार लेण्यांची निर्मिती दहाव्या शतकात झाली. ही लेणी आणि व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी 'किल्ले त्रिंगलवाडी' यांची एकाच कालावधीत निर्मिती केली असावी. 

                १६८९ ला संभाजी राजांच्या कालावधीत मातब्बर खानाने 'त्रिंबक' किल्ला जिंकल्यानंतर त्याची चावी औरंगजेबकडे पाठवताना त्याने किल्ले 'त्रिंगलवाडी'सही आपण वेढा घातल्याचे कळविले होते. कदाचित त्या दरम्यान हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला असावा. १८१८ ला तो इंग्रजांच्या ताब्यात गेला. या परकीय आक्रमणांत किल्ल्यासह पायथ्याच्या लेण्याचीही वाताहत झाली असावी.

किल्ल्याच्या दक्षिणेकडून गडावर जाणाऱ्या कातळ पायऱ्या. किल्ले त्रिंगलवाडी (Tringalwadi Fort, Igatpuri, Maharashtra)

                  सह्याद्रीच्या ताशीव कड्यांवर बुलंद किल्ले, किल्ल्यांवर मंदिरं आणि पायथ्याशी लेणी बसवण्याची स्वप्नं बाळगणारे आपले पूर्वज आणि ती प्रत्यक्षात साकारणारे कलावंत यांच्या कारागिरीला हा किल्ला फिरताना दाद द्यावी तितकी कमीच आहे. 

               इगतपुरी जवळचा हा किल्ले 'त्रिंगलवाडी' आणि त्याच्या पायथ्याचं लेणं हे यासाठी तंतोतंत जुळणारं उदाहरण म्हणावं लागेल..

                                                || श्री कृष्णार्पणमस्तु ||

येथे - जयवंत जाधव

'किल्ले विसापूर' - मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Pune, Maharashtra.

                           उन्हाळ्यात शुष्क झालेल्या धरतीला पावसाने तजेला दिल्यानंतर सह्याद्रीतल्या दऱ्या डोंगरांचे रूप विलोभनीय असेच दिसते....