Sunday, 19 January 2025

ऑफबीट - 'मोरगिरी', जांभुळणे, ता. मावळ, पुणे. Offbeat - Morgiri Fort, Jambhulne, Dist. Pune, Maharashtra.

                      शिवपूर्व काळापासून दख्खनला जोडणाऱ्या व्यापारी घाटवाटांचे रक्षण करून किल्ल्यांच्या आधारे जकात वसुली चालत असे. त्यासाठी किल्ल्यांवर 'शिबंदी'(सैन्य) तैनात करून जकाती सोबत परंपरेनुसार त्या परिसरातील सारा वसुलीही होत असे. उत्तर कोकणचा विचार करता बोरघाट, कुर्वंडे घाट, वाघजाई, सवाष्णी, सवघाट, निसणीचा घाट, भोरप्या, लिंग्या घाट अशा प्राचीन घाटवाटांचे रक्षण करण्यासाठी सह्याद्रीत मृगगड, राजमाची, लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना, कोरीगड, तैलबैला, अनघई, घनगड, कैलासगड, कुर्डूगड, सुधागड, अशी लहानथोर किल्ल्यांची दुर्ग साखळी उभारली गेली. यातील काही सह्याद्री धारेच्या खाली तर काही सह्याद्रीच्या वर आहेत. खड्या फौजेसह जागता पहारा ठेवण्याचं हे काम प्राचीन काळापासून मराठा साम्राज्यापर्यंत या किल्ल्यांनी पार पाडलं. 

किल्ले मोरगिरीच्या सर्वोच्च माथ्यावर जाणारा थरारक शिडीचा कातळटप्पा, किल्ले मोरगिरी, जांभुळणे, मुळशी, पुणे. (Offbeat- Morgiri Fort, Jambhulne, Pune, Maharashtra)

                     भौगोलिक स्थानाचा विचार करता, या दुर्ग साखळीच्या मध्यावर आणि सह्याद्रीच्या धारेवरून उत्तर कोकण आणि घाटमाथ्यावर पहारा ठेवून प्रसंगी या किल्ल्यांना संदेश आणि संकेत देण्या-घेण्याचं काम एका अपरिचित किल्ल्यानं पार पाडलं. तो म्हणजे 'किल्ले मोरगिरी'!. 'टेहळणीचा' किल्ला आणि इतिहासाच्या नोंदीत अज्ञात राहिल्यानं 'मोरगिरी' प्रसिद्धी पासून दूर राहिला. चढाईच्या बाबतीत कठीण श्रेणीचा असल्यानं तो अपरिचितही राहिला. आजच्या तरुण पिढीमध्ये इतिहासाची ओढ वाढताना दिसते. त्याच ओढीने दुर्ग भटके आवर्जून मोरगिरीला भेट देत खड्या चढाईचा थरार अनुभवताना दिसतात. हे एक चांगलं लक्षण आहे. 

किल्ले मोरगिरीच्या माथ्यावरून पवना जलाशय आणि पवन मावळ परिसर. किल्ले मोरगिरी, जांभुळणे, मुळशी, पुणे. (Offbeat- Morgiri Fort, Jambhulne, Pune, Maharashtra)

                         यावेळी योग आला बालमित्रांसोबत या मोरगिरीला भेटण्याचा.! एक साताऱ्याचा मित्र, मुंबई एलफिस्टनहून दुसरा आणि पनवेलहून मी स्वतः असे तिघे मित्र लोणावळ्याला जमलो. तसं पाहिलं तर मुंबई पुण्याकडील डोंगर भटक्यांना लोणावळा हे(च) ठिकाण सोईस्कर आहे. 'किल्ले मोरगिरी' लोणावळ्यापासून दक्षिणेला साधारण १८ किमीवर, मुख्य सह्याद्रीच्या धारेपासून घाटमाथ्यावर पूर्वेला फुटलेल्या 'लोणावळा' डोंगर रांगेच्या एका उंच आणि विस्तृत पठारावरच्या पूर्व कड्यावर वसला आहे. उंची साधारणतः ३००० फूट असावी. लोणावळ्याहून सरासरी १७ किमी वर 'घुसळखांब' तिठ्यावर डावीकडे 'अँबेव्हॅली'कडे रस्ता जातो. या रस्त्यावर अंदाजे १०० मीटर अंतरावर पुन्हा काटकोनात डावीकडे वळणारा रस्ता तुंग किल्ल्याकडे घेऊन जातो. या वळणापासून १ किमी अंतरावर 'जांभूळने' गांव लागतं. या गावातून उजव्या बाजूला किल्ले मोरगिरीचा आडवा डोंगर लक्ष वेधून घेतो. 

जांभुळणे गांव. किल्ले मोरगिरी, मुळशी, पुणे. (Offbeat- Morgiri Fort, Jambhulne, Pune, Maharashtra)

                       'जांभुळणे' गावाच्या सुरुवातीला दिसणाऱ्या मोकळ्या जागेत वाहने पार्क करता येतात. सरासरी १५, १६ वस्तीच्या डोंगर कुशीतील या गावाची परिस्थिती गरीब बेताचीच दिसते. गावातील अर्धी अधिक घरं 'कारवी'च्या भिंतीची दिसतात. शेतीवर अवलंबून असणारं हे आदिवासी गांव सरपणासाठी (जळणासाठी लागणारी लाकडं) बाजूच्या डोंगराचाच आधार घेताना दिसतं. 

जांभुळणे गावातील कारवीची घरे. किल्ले मोरगिरी, जांभुळणे, मुळशी, पुणे. (Offbeat- Morgiri Fort, Jambhulne, Pune, Maharashtra)

जांभुळणे गावातील कारवीची घरे. किल्ले मोरगिरी, जांभुळणे, मुळशी, पुणे. (Offbeat- Morgiri Fort, Jambhulne, Pune, Maharashtra)

                      गावात चौकशी केल्यास, गावाच्या वस्ती मागून जाणारी पाऊलवाट गर्द जंगलात शिरते आणि पुढे तीव्र चढाने समोरच्या आडव्या डोंगर खिंडीतून वर येते. खिंडीतून मळलेली पाऊलवाट डावे वळण घेऊन  गावातून दिसणाऱ्या आडव्या डोंगरावर जाताना दिसते. या तीव्र उतारावर कारवीचे रान दिसते. घसरणाऱ्या मातीचा, तीव्र चढाच्या वाटेचा हा टप्पा सुरुवातीलाच दमछाक करतो.

वस्तीमागून जंगलात जाणारी पाऊलवाट. समोर दोन्ही डोंगरांची खिंड. किल्ले मोरगिरी, जांभुळणे, मुळशी, पुणे. (Offbeat- Morgiri Fort, Jambhulne, Pune, Maharashtra)
   

तीव्र चढाची पाऊलवाट. किल्ले मोरगिरी. (Offbeat- Morgiri Fort)


खिंडीतून डावीकडे वळणारी पाऊलवाट (किल्ले मोरगिरी)

खिंडीतून पठारावर येणारी वाट. समोर खिंडीचा डोंगर. किल्ले मोरगिरी (Offbeat- Morgiri Fort, Pune, Maharashtra)

                   हा टप्पा पार करून वर आल्यास समोर डोंगर माथ्यावर लांबलचक पठार दिसते. सरासरी दीड किमी लांब पठाराच्या पूर्वेला डाव्या बाजूला टेकडी पलीकडे उंच डोंगर दिसतो. त्या डोंगरामागे खेटूनच त्यापेक्षाही उंच, कातळटोपी घातलेला डोंगर म्हणजे 'किल्ले मोरगिरी'. पठारावरून किल्ल्याकडे जाणारी पाऊलवाट मळलेली दिसते. पुढे या डोंगरांकडे पठाराची रुंदी वाढताना दिसते. पठारावर फुटभर उंचीच्या गवताखेरीज सावलीसाठी एकही झाड दिसत नाही. पठार दिसायला बऱ्यापैकी समतल दिसते. 
पठारावरून डावीकडे दिसणाऱ्या टेकडी मागे दुसरा डोंगर. त्यापलीकडे उंच कातळटोपीचा 'किल्ले मोरगिरी' (Morgiri Fort, Jambhulne, Pune, Maharashtra)
इंग्रजी 'C' आकाराचे पठार. सर्वात मागे उंच कातळटोपीचा 'किल्ले मोरगिरी' (Morgiri Fort, Jambhulne, Pune, Maharashtra)

मोरगिरीच्या डोंगर पायथ्याकडून दिसणारे ओलांडलेले पठार. किल्ले मोरगिरी, पुणे. (Morgiri Fort, Pune, Maharashtra)

                      सरासरी अर्ध्या तासाच्या वाटचालीनंतर दिसणारे सर्व डोंगर डावीकडे ठेवत पायवाट उजव्या बाजूच्या डोंगर धारेवरून पुढे जाते. पुढे पायवाट दोन लहान ओढे ओलांडून जाते. सध्या दोन्ही ओढ्यांची डोंगरातून येणाऱ्या पाण्याची धार आटत चाललेली दिसते. या ओढ्यांच्या आसपास डोंगरांच्या पायथ्याला गर्द झाडी दिसते. पठाराच्या उजव्या दरिकाठावरून दक्षिणेला दूरवर उंच आडवा आयताकृती 'कोरीगड', त्याच्या डावीकडे 'अँबेव्हॅली'चा जलाशय आणि विस्तृत 'मावळ खोरं' दिसतं.
पायवाटेवरील आटत चाललेला ओढा. किल्ले मोरगिरी
पठारावरून मोरगिरी पायथ्याकडे जाणारी पाऊलवाट. किल्ले मोरगिरी

  

मोरगिरी पायथा. शिवछत्रपतींच्या 'राजमुद्रे'ची प्रतिकृती. 'किल्ले मोरगिरी' (Morgiri Fort, Jambhulne, Pune, Maharashtra)

                 पुढे वाट डोंगर उताराच्या तुरळक झाडाझुडपातून पुढे जाते आणि उंच कातळटोपीचा डोंगर 'किल्ले मोरगिरी'च्या पायथ्याजवळ येते. इथून पायवाट सरळ पुढे न जाता डावीकडे काटकोनात वळून गर्द झाडीत शिरते. इथे आणि इथपर्यंत येणाऱ्या पायवाटेवर जागोजागी दिशादर्शक बाण लावले आहेत. 

                 या डाव्या वळणाजवळ बाजुला उघड्या माळावर दक्षिणेकडे तोंड करुन शिवछत्रपतींच्या 'राजमुद्रे'ची प्रतिकृती ठेवलेली दिसते. मागील सहा महिन्यापूर्वी स्थानापन्न केलेली ही राजमुद्रा आकाराने मोठी आणि फायबरची बनवलेली आहे. राजमुद्रेकडे तोंड केल्यास समोर निबीड जंगलातील मोरगिरीचा महाकाय कातळ दिसतो. तर पाठच्या बाजूला चालून आलेल्या पठाराचा लांबलचक वळणदार दुसरा भाग दिसतो. एकूण या डोंगरावरील हे एकसंघ पठार इंग्रजी 'C' आकाराचे दिसते. आणि त्याच्या मध्यावर पूर्वेला 'मोरगिरी' दिसतो. 

पायथ्यापासून दिसणारा मोरगिरीचा कातळ सुळका. 'किल्ले मोरगिरी' (Morgiri Fort, Jambhulne, Pune, Maharashtra)

मोरगिरी पायथ्याचे घनदाट जंगल. 'किल्ले मोरगिरी' (Morgiri Fort, Jambhulne, Pune, Maharashtra)
मोरगिरीवर येणारी उभ्या चढाची वाट. 'किल्ले मोरगिरी' (Morgiri Fort, Jambhulne, Pune, Maharashtra)

मोरगिरीवर येणारी उभ्या चढाची वाट. 

                     इथून खड्या चढाची जंगलातून किल्ल्यावर घेऊन जाणारी वाट दमवणारी, शारीरिक कसोटी घेणारी आहे. झाडांच्या आडव्या मुळ्यांमुळे वाटेवर ठीक ठिकाणी नैसर्गिक पायऱ्या तयार झालेल्या दिसतात. पुरुषभर तर कधी कमरे इतक्या उंचीचे खडे टप्पे दम काढतात. जसजसे वर जाऊ तशी झाडी विरळ होत जाताना दिसते.

दोर लावलेला थरारक कातळटप्पा. किल्ले मोरगिरी' (Morgiri Fort)

 

दोर लावलेला थरारक कातळटप्पा. किल्ले मोरगिरी' (Morgiri Fort)
मित्राचे साहस. किल्ले मोरगिरी' (Morgiri Fort)

                    मजल दरमजल करत तासाभराचा हा टप्पा सर करून वर आल्यास, त्या पुढची अवघड परीक्षा घेणारा टप्पा स्वागत करतो. या कातळ टप्प्यावर वरून दोर सोडले आहेत आणि खाली दरी आहे. दोरांचा आधार घेत हा उभा, निसरड मातीचा कातळ सांभाळून सर करावा लागतो. गड पायथ्यापासून इथपर्यंतच्या केलेल्या चढाईमुळे दमलेल्या अवस्थेत हा टप्पा सर करताना शारीरिक क्षमतेबरोबर मानसिक कासोटीही घेतो.

                    यावेळी आमचा मित्र 'संतोष पवार'ने वरून सोडलेल्या दोराचा तसेच हाताने कातळाचाही आधार न घेता हा टप्पा सर केला. आम्ही तिघे या टप्प्याखाली येताच वरचा कातळ बघून त्याने तसं आधीच जाहीर केलं. आणि दोन्ही हात उंचावत त्याने हा टप्पा सर केला. 

                   गड उतार होतानाही हा टप्पा तो वरून दोर सोडत अक्षरशः धावत, उड्या घेत सहज उतरून आला. त्याच्या कौतुकास योग्य असा व्हिडिओ (चित्रफीत) मुद्दाम खाली दिला आहे. 

                त्यानं असं कसब मागे कलावंतीण दुर्ग सुळक्याच्या सर्वोच्च शिखर माथ्यावर केलं होतं. त्यावेळी त्यानं सर्व ट्रेकर्स समोर जाहीर करून, दोराशिवाय तो अवघड, थरारक टप्पा सहज पार केला होता. हा मित्र एक वेगळंच रसायन आहे. 

दोराचा टप्पा ओलांडून शिडीकडे जाणारी पाऊलवाट, किल्ले मोरगिरी, पुणे. (Morgiri Fort, Pune, Maharashtra)


मुंबई, पनवेल, पुण्याचे शिलेदार.  किल्ले मोरगिरी, पुणे. (Morgiri Fort, Pune, Maharashtra)

मुंबई, पनवेल, पुण्याचे शिलेदार.  किल्ले मोरगिरी, पुणे. (Morgiri Fort, Maharashtra)

                    पुढे पायवाट मोरगिरीच्या मुख्य सुळक्याला वळसा घालत कातळ काठाने पुढे जाते. या टप्प्यावर दुपारी बारा वाजता आम्हाला गडउतार होणारे सह्याद्रीचे दुसरे चार शिलेदार भेटले. त्यातील एक जण अंधेरी, दुसरा पनवेल तर दोघे पुण्याहून लोणावळ्यात एकत्र जमून भटकंतीस आले होते. त्यांना मोरगिरी उतरून आज पुढे 'किल्ले घनगड'ची भटकंती पूर्ण करायची होती. 

                   मागील (डिसेंबर) महिन्यात मी पत्नीसह 'किल्ले घनगड'ची भटकंती केली होती. आम्ही सर्वांनी एकमेकांची आस्थेनं विचारपूस केली. घनगड बद्दल चर्चाही झाली. एकमेकांचे मोबाईल नंबर घेऊन आभार मानले व आम्ही निरोप घेतला. अशा ठिकाणी सह्याद्रीच्या वारकऱ्यांची अचानक होणारी भेट एक सुखद अनुभव आणि भटकंतीच्या साधनेसाठी उमेद देऊन जातात.

शिडीकडे येणारा कातळटप्पा. किल्ले मोरगिरी, पुणे. (Morgiri Fort, Maharashtra)


शिडीकडे येणारा कातळटप्पा. किल्ले मोरगिरी, पुणे. (Morgiri Fort, Maharashtra)

                         




या काठावरून पुढे आल्यास वाट दोन अवघड कातळटप्पे चढून वर येते. त्यापैकी एका ठिकाणी दोर लावला आहे. दोन्ही टप्पे चढून वर आल्यास डावीकडे किल्ल्याच्या पायथ्याला ओळीत खोदलेल्या एकूण तीन पाण्याच्या टाक्या दिसतात. त्यापैकी पहिली व दुसरी कातळटाकी प्रमाणबद्ध हंडीसारख्या गोलाकार खोदल्या आहेत. तिसरी टाकी मात्र कातळाच्या आतील गर्भात प्रशस्त खोल खोदलेली दिसते. या तीनही टाकीत पाणी असून ते पिण्यायोग्य दिसत नाही. 

                    तिसऱ्या टाकीच्या डाव्या बाजूस कातळात गुहा कोरलेली आहे. गुहेत 'श्री जाखमाते'ची 'तांदळा' स्वरूपातील मूर्ती दिसते. 'किल्ले मोरगिरी'च्या परिसरातील हे एक जागृत देवस्थान मानलं जातं.

 

पायथ्याची पहिली कातळटाकी. किल्ले मोरगिरी. (Morgiri Fort, Maharashtra)

पायथ्याची दुसरी कातळटाकी. किल्ले मोरगिरी, पुणे. (Morgiri Fort,  Maharashtra)
तिसरी कातळटाकी आणि 'जाखमाते'ची गुहा. किल्ले मोरगिरी. (Morgiri Fort)

            











                    जाखमातेच्या गुहेच्या पुढेच तुटलेल्या कातळाला अवघड जागी उभी शिडी लावलेली दिसते. दहा-बारा फूट उंचीचा हा दरीवरचा कातळ चढून जाण्यासाठी सहा पायंड्यांची लोखंडी शिडी खडकात मजबूत बसविली आहे. शिडीच्या खाली खोल दरी दिसते. शिडी चढून उजव्या बाजूच्या उंच काठावर पाय ठेवण्यासाठी शिडीच्या वर दोन फुट अंतरावर एक लोखंडी गजाचा खिळा खडकात बसविला आहे. या खिळ्यावर पूर्ण भार देऊन उजव्या कातळ काठावर येणे हा आजुन एक थरारक अनुभव आहे. त्यापुढे जाण्यासाठी कातळावर दहा-बारा पायऱ्या कोरल्या आहेत. डावा वळसा घेत पुढे आणखी एक दोन कातळ चढून पायवाट गडाच्या सर्वोच्च माथ्यावर येते. 

'जाखमाते'च्या गुहेपुढील शिडीचा थरारक टप्पा. किल्ले मोरगिरी, पुणे. (Morgiri Fort, Pune, Maharashtra)

शिडीच्या टप्प्यानंतर कोरीव पायऱ्या. किल्ले मोरगिरी. (Morgiri Fort)

शिडीचा थरारक टप्पा. किल्ले मोरगिरी, पुणे. (Morgiri Fort, Pune, Maharashtra)
    


शिडीच्या टप्प्यावरून दिसणारी किल्ल्याकडे येणारी पायवाट. किल्ले मोरगिरी, पुणे. (Morgiri Fort, Pune, Maharashtra)
 

             गडमाथ्यावर दोन ध्वजखांब दिसतात. ध्वजखांबाच्या बाजूला फुलांनी बहरलेली 'रामेठ्या'ची (Gnidia Glauca) झाडं दिसतात. या 'रामेठ्या'ची साल लांब मजबूत टिकाऊ असल्यानं, आदिवासी शेतकरी ऐनवेळी जंगलातून मोळ्या बांधण्यासाठी या झाडाचा वापर करतात. गडमाथ्यावर मात्र सर्वत्र खुरटी झुडूपं आणि सुकलेलं गवत दिसतं. 

                        गडमाथा अगदी लहान असून दहा मिनिटात गडफेरी पूर्ण होते. गडमाथ्यावर अग्नेयेला कातळात कोरलेली प्रशस्त मोठी चौरसाकृती पाण्याची टाकी आहे. या टाकीच्या बाजुलाच दहा फुटावर दुसरी लहान कातळटाकी दिसते. दोन्ही टाक्या पाण्याने भरलेल्या असल्या तरी वापर नसल्यानं दोन्ही टाकीतील पाणी पिण्यायोग्य दिसत नाही. या व्यतिरिक्त गडमाथ्यावर कुठेही बुरुज, तटबंदी किंवा वाड्यांचे अवशेष दिसत नाहीत. त्यामुळे मोरगिरीचा फक्त टेहळणीचा किल्ला म्हणून उपयोग केला गेला असावा.

गडमाथ्यावरील ध्वजस्तंभ. किल्ले मोरगिरी, पुणे. (Morgiri Fort, Pune, Maharashtra)






                   




गडमाथ्यावरील कातळटाकी आणि मागे दिसणारा 'किल्ले तुंग' सुळका. किल्ले मोरगिरी, पुणे. (Morgiri Fort, Pune, Maharashtra)
                                                                               
गडमाथ्यावरील दुसरी कातळटाकी. मागे 'किल्ले तुंग' सुळका. किल्ले मोरगिरी, पुणे. (Morgiri Fort, Pune, Maharashtra)
                    मोरगिरीच्या या सर्वोच्च माथ्यावरून पश्चिमेला जांभुळणे गांव ओलांडून आलेले लांबलचक पठार, पठारावरील डावीकडील दुसऱ्या डोंगराचा भव्य माथा दिसतो. त्यापलीकडे सुरुवातीच्या खिंडीचा डोंगर आणि दूरवर लोणावळ्याची मुख्य पश्चिम सह्याद्री रांग दिसते. 
मोरगिरीच्या सर्वोच्च माथ्यावरून दिसणारे विविध टप्पे. किल्ले मोरगिरी, पुणे. (Morgiri Fort, Pune, Maharashtra)

                    दक्षिणेला मावळ खोऱ्यातील आकाशात उंच घुसलेला आयताकृती 'किल्ले कोरीगड' लक्ष वेधून घेतो. तसेच कोरीगडच्या बाजूचे 'अँबेव्हॅली जलाशय' असा परिसर नजरेच्या टप्प्यात येतो. 

मोरगिरीच्या सर्वोच्च माथ्यावरून दिसणारा 'किल्ले कोरीगड', डावीकडे 'अँबेव्हॅली जलाशय' आणि मावळ परिसर. किल्ले मोरगिरी, पुणे. (Morgiri Fort, Pune, Maharashtra)

                     गड माथ्यावरून पूर्वेला विस्तीर्ण 'पवना जलाशय', 'पवन मावळ' खोरे आणि जलाशयाच्या अलीकडील काठावर आकाशात घुसलेला 'किल्ले तुंग'चा बलाढ्य सुळका लक्ष वेधून घेतो. तुंगच्या मागे आणि जलाशयाच्या पलीकडे धुक्यातून अस्पष्ट 'किल्ले तिकोना' दिसतो.

मोरगिरीच्या सर्वोच्च माथ्यावरून दिसणारा 'किल्ले लोहगड', विस्तीर्ण  'पवना जलाशय' आणि मावळ परिसर. किल्ले मोरगिरी, पुणे. (Morgiri Fort, Pune, Maharashtra)

                    ईशान्येला पवना जलाशयाच्या पलीकडे 'किल्ले लोहगड', लोहगडाच्या 'विंचू कड्या'ची कातळ भिंत स्पष्ट दिसते. त्यापलीकडे 'किल्ले विसापूर' धुक्यात अस्पष्ट दिसतो.

                    तर मोरगिरीच्या सर्वोच्च माथ्यावरून उत्तरेला पवना जलाशयाचे 'बॅक वॉटर' (Catchment area) परिसर, त्याच्या डावीकडे 'बोर घाटा'वर(लोणावळा) लक्ष ठेवून असलेला 'किल्ले राजमाची' धुक्यातून दिसतो.

मावळ परिसर. किल्ले मोरगिरी, पुणे. (Morgiri Fort, Pune, Maharashtra)


किल्ले मोरगिरी, पुणे. (Morgiri Fort, Pune, Maharashtra)

                  या सर्व किल्ल्यांच्या साखळीत किल्ले मोरगिरीचे भौगोलिक स्थान आणि उंचीचा विचार करता, मोरगिरीच्या सर्वोच्च माथ्यावरून जवळ जवळ सहा किल्ले फक्त उघड्या डोळ्यांनी दिसतात. प्रसंगी अशा केंद्रस्थ मोरगिरीवरून इशारे वेळेत गेल्यामुळे पुढील गडकोटांना शस्त्र सज्ज होण्यास अवधी मिळे. सह्याद्रीतील या दुर्गम किल्ल्यांनी परकीय आक्रमणं थोपवली, ती 'मोरगिरी'सारख्या पहारेकर्‍यांनी पार पाडलेल्या महत्त्वाच्या भूमिकेमुळे.. 

                                                || श्री कृष्णार्पणमस्तू ||
येथे - जयवंत जाधव

Sunday, 29 December 2024

ऑफबीट - किल्ले घनगड, ता. मुळशी, पुणे. - Offbeat Ghangad, Mulshi, Dist. Pune, Maharashtra.

               महाराष्ट्राला निसर्गानं दिलेली अमूल्य देणगी म्हणजे सह्याद्री. सह्याद्रीच्या दक्षिणोत्तर पसरलेल्या लांबच लांब रांगांमधून पूर्वेला फुटलेले फाटे, त्यामधल्या ठाव न लागणाऱ्या दऱ्या, बेलाग सुळके, काळेभिन्न कातळकडे तसेच देशातून कोकणात उतरणाऱ्या अनवट घाटवाटा आहेत. त्याबरोबरच इथल्या डोंगरदऱ्यात पसरलेली निबिड जंगले, नाना प्रकारच्या हजारो वनस्पती, स्वच्छंद विहार करणारे पशुपक्षी अशी संपत्ती निसर्गाने दिली आहे.

                 तर आपल्या तात्कालीन राज्यकर्त्यांनी या देणगीला सांगड घालत, त्यांचे संरक्षण आणि सभोवतालच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी सह्याद्रीत गडकिल्ले, अद्भुत कलाकुसरीची लेणी, गुंफा, बारामाही टिकून राहणाऱ्या पाण्यासाठी शोध घेऊन निर्माण केलेल्या कातळ टाक्या आणि शिलालेख होत. निसर्ग आणि मानवाने निर्माण केलेला हा सुंदर मिलाफ डोंगरभटके, निसर्गप्रेमी आणि सह्याद्रीतील अभ्यासकांना नेहमीच भुरळ घालत आला आहे. यातील प्रत्येकापर्यंत पोहोचायला आपल्याला वेळ लागलाच. साध्या रायगडचेच उदाहरण घेता सुरवातीचे जवळ जवळ सत्तर वर्षे तो अंधारातच राहिला. इतर अपरिचित (Offbeat) गडकिल्ले, लेण्यांबद्दल तर विचार न केलेलाच बरा.

'मारखिंड' दरीकाठावरील दगडांची थरारक ठेवणं. किल्ले घनगड, मुळशी, जि. पुणे, महाराष्ट्र. ('Markhind', Ghangad Fort, Pune, Maharashtra)
           असाच पुण्याच्या बारा मावळापैकी 'कोरसबारस' मावळाच्या निबीड जंगलातील एक अपरिचित, चढाईच्या बाबतीत मध्यम पण काहीसा अवघड श्रेणीत 'किल्ले घनगड' येतो. पुण्याच्या मुळशी तालुक्यातील 'लोणावळा' व 'ताम्हिणी' घाटाच्या मध्यावर आणि सह्याद्रीच्या लोणावळा डोंगररांगेच्या माथ्यावर 'घनगड' वसला आहे. समुद्रसपाटीपासून उंची साधारणतः ३१५० फूट असावी. कोकणातील पाली - सरसगड - ठाणाळे लेणी - 'वाघजाई घाट' - तैलबैला - कोरीगड अशी एक आणि  पाली - सरसगड -  सुधागड - 'सवाष्णीचा घाट' - घनगड - तैलबैला ते कोरीगड असा दुसरा व्यापारी घाटमार्ग प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. या घाटवाटांवर लक्ष ठेवण्यासाठी वरील दुर्गसाखळी सोबत त्यावेळी 'घनगड'ची निर्मिती झाली.

               पुणे शहरातून 'घनगड' हे साधारण ८५ किमी, तर आमच्या राहत्या पनवेल पासून ९० किमी आहे. पुणे मुंबईकरांना लोणावळा हे मध्यवर्ती ठिकाण आहे. लोणावळ्यापासून दक्षिणेला 'घनगड' सरासरी ३५ किमीवर आहे.
               सध्या मुंबई ठाणेकरांना 'घनगड'ला येण्यासाठी लोणावळा घाट (बोरघाट) चढून जलवायू मार्गाने सह्याद्री माथ्यावरील 'मोराडी' सुळका (सह्याद्रीतील स्वयंभू शिवलिंग), पेठ शहापूरचा कोरीगड करत पुढे 'भांबुर्डे' गावाच्या तिठ्यावरून उजवीकडे दोन किमीवरील 'एकोले' गावात येता येतं. तर भांबूर्ड्याहून पुढे 'ताम्हिणी' घाटातून (लिंग्या घाट) पुन्हा कोकणातील पाली, कोलाडलाही गाडीमार्गाने उतरता येतं.
           'एकोले' हे घनगड'च्या पायथ्याच्या घनदाट जंगलातील गांव. भातशेतीवर जगणारं. सह्याद्रीच्या कड्यावर उन, वारा पावसाशी दोन हात करत, किर्र जंगलात हिंमतीन राहणारी फक्त दहा, बारा कुटुंबाची वस्ती. त्या निबिड जंगलातील आडवाटेवर, डोंगर भटके वगळता फारसा परिचित नसलेला हा किल्ले 'घनगड' म्हणता येईल. 'लोणावळा भांबुर्डे' मार्गे एसटी बसेस आणि इतर वाहतुकीची साधनं इथं फारच कमी आहेत. त्यामुळं भांबुर्ड्याहून गडपायथ्याच्या 'एकोले' गावात येण्यासाठी स्वतःच वाहन असल्यास 'घनगड' एका दिवसात पूर्ण करून मुंबई पुण्याकडे परतता येतं.  

'राजाराणी' सुळके (नवरा नवरी) मारठाण्याचा डोंगर, किल्ले घनगड, महाराष्ट्र. (Ghangad Fort, Pune, Maharashtra)
    
डावीकडे 'GAIA EKOLE' कंपाऊंड, मागे 'किल्ले घनगड', जि. पुणे, महाराष्ट्र. -Ghangad Fort, Pune, Maharashtra)
           भांबुर्डे तिठ्याच्या आधीपासून 'एकोले' गावात प्रवेश करण्यापूर्वी समोर अजस्त्र 'मारठाण्याचा' डोंगर दिसतो. त्या रांगेच्या डाव्या बाजूला राजा-राणी (नवरा नवरी) सुळके लक्ष वेधून घेतात. तर उजव्या टोकाला एकुलत्या उठून दिसणाऱ्या अजस्त्र कातळावर 'घनगड' लक्ष वेधून घेतो.                 
                 'एकोले' गावाबाहेरच डावीकडे पुरुषभर उंचीच्या कंपाउंडवर 'GAIA EKOLE' असा बोर्ड दिसतो. नजीकच्या तीन-चार वर्षात निर्माण झालेलं हे एक विस्तृत प्रायव्हेट 'कॅम्पसाईड' आहे. शनिवार, रविवारी तिथे शहरी पर्यटक विकेंड साजरा करण्यासाठी येतात. आमच्या भटकंतीचा मधलाच दिवस असल्याने आम्हाला तिथे कोणी दिसले नाहीत. पण गुगल सर्च केल्यास या कॅम्पसाईडमध्ये पर्यटकांना सुयोग्य अशा शहरी सुविधांसोबत आत जंगल अनुभव घेता येतो. वेळ मिळालाच तर काही पर्यटक घनगडचीही वाट वाकडी करतात अशी गावात माहिती मिळते. सह्याद्रीचे डोंगर वेडे मात्र क्वचितच अशा कॅम्पसाईडच्या नादी लागत असावेत. असो.

श्री घनेश्वर महादेव मंदिर, किल्ले घनगड, (Ghangad Fort, Maharashtra)

वीरगळी, श्री घनेश्वर महादेव मंदिर, घनगड. (Ghangad Fort)

श्री घनेश्वर महादेव, किल्ले घनगड. (Ghangad Fort)


                 तर या कॅम्पसाईडच्या उजव्या बाजूने कंपाउंडला लागून जाणारी पाऊलवाट घनगडच्या निबिड जंगलात घेऊन जाते. दहा मिनिटात पाऊलवाटेवर डावीकडे 'श्री धनेश्वर महादेव' मंदिर दिसतं. मंदिर म्हणजे पत्र्याच्या उघड्या शेड खाली प्राचीन शिवपिंडी आहे. पिंडी समोर ओळीत वीरगळी मांडल्या आहेत. बाजूला भग्न नंदी आहे. या वीरगळींची माहिती देणारा बोर्डही बाजूला आहे. 'पार्वती पतेय शंभो हर हर..' म्हणत पुढे आल्यास उजव्या बाजूला गच्च झाडीत लहानसं श्री 'वेताळ' मंदिर दिसतं. आत 'तांदळा' स्वरूपातील श्री वेताळाची मूर्ती दिसते.

श्री वेताळ मंदिर, किल्ले घनगड, (Ghangad Fort)

 

                

                तिथून पुढे पाच मिनिटाच्या अंतरावर उजव्या बाजूस डोंगर उतारावर एकोले गाववेशीचं रक्षणकर्ती 'श्री गारजाई' देवीचं मंदिर दिसतं. मंदिरात काळ्या पाषाणावर श्री 'गारजाई' देवीची सुबक मूर्ती कोरली आहे. मंदिराचा जिर्णोद्धार केला असला तरी देवीची मूर्ती मात्र प्राचीन आहे. मंदिरात प्रवेश करतानाच डाव्या बाजूस मंदिराच्या भिंतीवर कोरलेला प्राचीन शिलालेखही दिसतो. मंदिर परिसर प्रशस्त, रम्य आहे. मंदिरासमोर जुन्या घडनावळीचे दोन दीपस्तंभ, एक तेलवातीचा स्तंभ आणि भग्न वीरगळ ओळीत दिसतात.



श्री गारजाई मंदिर, किल्ले घनगड, पुणे, महाराष्ट्र (Ghangad Fort, Pune, Maharashtra)

श्री गारजाई मंदिरासमोरील दीपस्तंभ, श्री गारजाई मंदिर, किल्ले घनगड, पुणे, महाराष्ट्र (Ghangad Fort, Pune, Maharashtra)

श्री गारजाई, किल्ले घनगड (Ghangad Fort)

              परंपरेनुसार ही सर्व मंदिरं 'एकोले' गावापासून दूर दिसतात. आजही पूर्वापार बांधलेली मंदिरं तळ्याकाठी, गावकुस वेशीबाहेर तर नदीकाठावर दिसतात. मंदिर, देवालयांभोवती मानवी वस्ती असू नये असा पूर्वापार पाळला जाणारा दंडक, आज मात्र बऱ्याच ठिकाणी मोडीत निघताना दिसतो.
               पुढे निबीड जंगलातून नागमोडी खड्या चढाची वाट अर्ध्या तासात किल्ल्याच्या घडीव पायऱ्या पर्यंत येते. हे जंगल इतकं घनदाट आहे की, पोहोचणाऱ्या अपुऱ्या प्रकाशामुळे दिवसाचा नीट अंदाज बांधता येत नाही. जंगलातून वानरांच्या हुक्क्यांचा दमदार आवाज कानावर पडताच अंगावर शहारे येतात. सोलो ट्रेकर्सनी वस्तीतून कोणीतरी सोबत घेणे सुरक्षिततेचे आहे.
किल्ले घनगड पायथ्याच्या घडीव पायऱ्या, किल्ले घनगड. 








'मारखिंड', उजवीकडे किल्ले घनगड, डावीकडे मारठाण्याचा डोंगर. (Ghangad Fort, Pune, Maharashtra)

'मारखिंड', किल्ले घनगड, मुळशी, पुणे, महाराष्ट्र. (Ghangad Fort, Pune, Maharashtra)

                गडपायथ्याच्या पायऱ्या चढून वर आल्यास उजव्या बाजूचा घनगड आणि डाव्या बाजूचा 'मारठाण्याचा' डोंगर इथे जुळलेला दिसतो. समोर या दोन्ही डोंगरांच्या सोंडी समांतर उतरत जातात. या डोंगरसोंडेंच्या मध्ये प्रचंड दरी दिसते तिला 'मारखिंड' असे नांव आहे. खिंडीसमोर उजव्या बाजूला खोल दरीकाठावर काही शिळा एकमेकांवर दिसतात. हा बहुदा उध्वस्त केलेल्या किल्ल्याच्या तटबंदीचा शिल्लक राहिलेला भाग असावा असे वाटते किंवा ही नैसर्गिक घडणही असावी. दरीकाठावरच्या या दगडांची ठेवण इतकी चित्तवेधक आहे की, डोंगरभटके धोका पत्करून या दगडांवर चढून फोटो तसेच रील्स करण्याचा प्रयत्न करतात.  हे थरारक, धोकादायक ठिकाण भटक्यांना आकर्षून घेताना दिसतं.

              या दगडांजवळूनच उजवीकडे किल्ल्याचा कातळावर चढून कड्याकाठाने जाणारी पायवाट कातळात खोदलेल्या एका मोठ्या गुहेकडे जाते. या गुहेत आठ ते दहा जण वस्ती करू शकतात. गुहेचा उपयोग मारखिंडीतून वर चढून येणाऱ्या शत्रूवर टेहळणी करण्यासाठी आणि त्यापुढे 'अंधारबन' डोंगर परिसरावर नजर ठेवण्यासाठी करता येतो. पुढे ही वाट कातळकाठाच्या अतिशय धोकादायक टप्प्यावरून पुढे जाते, त्यामुळे त्यापुढे कोणी जात नसावेत.

मारखिंडीकडून किल्ल्याकडे जाणारी पाऊलवाट, किल्ले घनगड, पुणे, महाराष्ट्र. (Ghangad Fort, Pune, Maharashtra)

किल्ल्याचे पहिले प्रवेशद्वार आणि त्याचे बुरुज. घनगड, पुणे, महाराष्ट्र. (Ghangad Fort, Pune, Maharashtra)
             या मारखिंडीत येण्यापूर्वी उजवीकडे कातळ उतारावरून तटबंदीला लागून जाणारी वाट दोन बुरूजांकडे जाताना दिसते. जवळ गेल्यास या दोन्ही बुरुजांच्या मध्ये किल्ले घनगडचे पहिले उध्वस्त प्रवेशद्वार दिसते. अगदी जवळ जाईपर्यंत या प्रवेशद्वाराचा अंदाज येत नाही अशा दरवाजांना 'गोमुखी' दरवाजे म्हटले जाते. किल्ल्यांच्या मुख्य दरवाजासमोर येऊन बाहेरून शत्रूला हल्ला करताना फार हालचाल करता येऊ नये म्हणून मोकळी जागा ठेवली जात नाही. असे दरवाजे एकतर धोकादायक दरीकाठावर निर्माण केले जातात किंवा दरवाजासमोर तटबंदी उभारलेली दिसते. अशा 'गोमुखी' रचनेचे दरवाजे म्हणजे किल्ल्यांच्या लष्करी दृष्ट्या वास्तूरचनेचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो.
किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशद्वारातुन दिसणाऱ्या कोरीव गुहा. घनगड, पुणे, महाराष्ट्र. (Ghangad Fort, Pune, Maharashtra)
                 दरवाजा ओलांडून डावे वळण घेऊन वर आल्यास डावी उजवीकडे सपाट मोकळी जागा दिसते. समोर किल्ल्याच्या कातळात दोन गुहा कोरलेल्या दिसतात. त्यापैकी डावीकडील गुहा मोठी प्रशस्त असून उजवीकडील थोडी लहान दिसते. दहा पंधरा जण या गुहेत रात्री वस्ती करू शकतात.
किल्ले घनगडचा निखळलेला कातळ,किल्ले घनगड, पुणे, महाराष्ट्र. (Ghangad Fort, Pune, Maharashtra)

श्री वाघजाई मंदिर, किल्ले घनगड, पुणे, महाराष्ट्र. (Ghangad Fort, Pune, Maharashtra)

किल्ले घनगडचा निखळलेला कातळ आणि उजवीकडे वाघजाई मंदिर. किल्ले घनगड, पुणे, महाराष्ट्र. (Ghangad Fort, Maharashtra)
                   सपाटीच्या उजव्या बाजूस किल्ल्याचा कातळाचा एक प्रचंड मोठा खडक निखळून या सपाटीवर स्थिरावला आहे. किल्ल्याच्या कातळाला तो रेलून उभा राहिल्याने दोन्हीमधून दुतर्फा जाता येता येतं. ही एक नैसर्गिक कमान बनलेली दिसते. डाव्या बाजूच्या किल्ल्याच्या मुख्य कातळात उंचावर कोरलेल्या चौकोनी गुहेत 'श्रीवाघजाई' देवीची मूर्ती दिसते. इथून मुळशी जलाशयापर्यंत  'कोरसबारस' मावळ खोरं, समोर लोणावळा डोंगररांग तर मागे डावीकडे किल्ले 'तैलबैला' असा विस्तृत भूभाग नजरेच्या टप्प्यात येतो. या हवेशीर कातळ कमानीखाली भटके सावलीत विसावा घेतात तर रात्री मुक्कामासाठी येणाऱ्या भटक्यांची ही आवडती जागा आहे.
कोरीव गुहा आणि समोर कातळावर लावलेली उभी शिडी. किल्ले घनगड, पुणे, महाराष्ट्र. (Ghangad Fort, Pune, Maharashtra)
  
कातळाला लावलेली शिडी (Ghangad Fort)
कातळटाकी. किल्ले घनगड


शिडीचा टप्पा. किल्ले घनगड, महाराष्ट्र. (Ghangad Fort, Maharashtra)

 

झिजलेल्या कातळपायऱ्या (Ghangad Fort)

                                            






          तर सपाटीच्या डाव्या टोकाला उभ्या कातळाला लावलेल्या लोखंडी शिडीवरून वाट किल्ल्यावर जाते. अंदाजे २० फूट उंच शिडी उभ्या खडकात मजबूत बसवली आहे. शिडीच्या वरच्या टोकाजवळ कातळात खोदलेली पाण्याची टाकी दिसते. टाकीतील पाणी पिण्यायोग्य स्वच्छ असून थंड, चवदार आहे. डोंगर भटके आवर्जून या पाण्याची चव चाखतात. या उभ्या शिडीच्या वरच्या टोकाजवळ खडकात धातूची वायर पक्की (fix) केली आहे. तिचा आणि कातळाचा आधार घेत डाव्या बाजूच्या धोकादायक कातळ काठावरून वाट कोरीव पायऱ्यांकडे येते. या कोरीव कातळ पायऱ्यांचीही बऱ्यापैकी झिज झाल्यामुळे इथेही आधारासाठी कातळात धातूची वायर बसविली आहे.

टेहळणीची गुहा आणि कातळ खांबटाक्या. Ghangad Fort, Pune, Maharashtra)

खांबटाकी, किल्ले घनगड, महाराष्ट्र. (Ghangad Fort, Pune, Maharashtra)
          हा टप्पा चढून उजवा वळसा घेऊन वर आल्यास उजवीकडेच कातळात कोरलेली चौकोनी गुहा दिसते. गुहेचा उपयोग टेहळणीसाठी केला जात असावा. या गुहेखाली पाण्यासाठी खोदलेल्या तीन कातळटाक्या आहेत. त्यातील दोन मोठ्या प्रशस्त असून दोन्ही टाक्यांना आधार देणारे कातळखांब दिसतात. या तिन्ही टाकीतील पाणी बाराही महिने टिकून रहातं. या कातळटाक्या आणि टेहळणीच्या गुहेची कल्पकतेने केलेली निर्मिती 'मारठाण्याच्या डोंगर' पार्श्वभूमीवर बघून इथपर्यंत चढाईसाठी केलेली दगदग विसरायला लावणारी आहे.
धोकादायक कातळटप्पा, किल्ले घनगड, महाराष्ट्र.

              पुढे किल्ल्यावर जाणारी वाट मात्र या टेहळणीच्या गुहेवरून उजवा वळसा मारत उभ्या कातळाच्या अवघड टप्प्यावरून जाते. पूर्वी या टप्प्यावर पायऱ्या होत्या पण इंग्रजांनी सुरुंग लावून त्या उध्वस्त केल्यामुळे आणि कालानुरूप इथल्या खडकाची झीज झाल्यामुळे चढाई करताना हा टप्पा धोकादायक बनला आहे. या टप्प्यावर मदतीसाठी खडकातील खोबण्यांचा आधार घेऊन सांभाळून चढाई करणे इतकाच पर्याय उरतो. या टप्प्यावर डावीकडे अवघड जागी असलेली कातळात कोरलेली दुसरी टेहळणीची गुहा दिसते.

टेहळणीची दुसरी गुहा, किल्ले घनगड, महाराष्ट्र. 


                खाली शिडीच्या पहिल्या टप्प्यावरून डावीकडे तोल सांभाळून कातळावर येताना आणि हा दुसरा कातळ टप्पा सर करताना, उतरताना सरासरी सहनशक्ती आणि संयमाची गरज आहे. हे दोन टप्पे वगळता बाकी किल्ल्याची चढाई मात्र मध्यम श्रेणीत मोडते.

बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार, किल्ले घनगड.

बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार, किल्ले घनगड, महाराष्ट्र.
बालेकिल्ल्यावरून दिसणारा दुहेरी रचनेचा बुरुज आणि भुयारी टाकी (कातळगुहा). किल्ले घनगड, महाराष्ट्र. (Ghangad Fort, Maharashtra)

बालेकिल्ल्यावरील भुयारी टाकी. किल्ले घनगड, महाराष्ट्र. (Ghangad Forta)

                हा टप्पा ओलांडून वर आल्यास समोर उभ्या उतारावर किल्ल्याचा दुसरा पूर्वाभिमुख दरवाजा दिसतो. दोन बुरुजांच्या मध्ये असणारा हा दरवाजाही अर्धवट उध्वस्त केलेला दिसतो. दरवाजा ओलांडून वर आल्यास डाव्या बुरुजात घसरणीवर एका खोल, चिंचोळ्या भुयारी टाकीत पायऱ्या उतरताना दिसतात. यावेळी आमच्या सोबत टॉर्च नसल्यामुळे मोबाईलच्या उजेडात टाकीच्या खोलीचा अंदाज घेता आला नाही. तसेच या निबिड जंगलात एकाकी घनगडावर मी आणि पत्नी दोघेच असल्याने आगाऊ धाडस करणेही सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य वाटलं नाही.

बालेकिल्ल्यावरील झेंडा बुरुज, मागे दिसणारा 'मारठाण्याचा' डोंगर. किल्ले घनगड, महाराष्ट्र. (Ghangad Fort, Maharashtra)

दक्षिणेकडील बुरुज आणि समोर दिसणारा बलाढ्य 'मारठाण्याचा' डोंगर. किल्ले घनगड, महाराष्ट्र. (Ghangad Fort, Maharashtra)

                 इथून बालेकिल्ल्याच्या मध्यभागी झेंडा बुरुजावर भगवा फडकताना दिसतो. झेंडा बुरुजाला लागून सदरेचे अवशेष दिसतात. डावीकडे म्हणजे किल्ल्याच्या दक्षिणेकडे जाणारी पाऊलवाट मारखिंडीच्या बाजूला असलेल्या किल्ल्याचा बुरुज आणि तटबंदिकडे जाते. हा दक्षिणेकडील बुरुजाच्या तटबंदीचा बराचसा भाग उध्वस्त आहे. शिल्लक तटबंदीत जंग्या आणि दिवळ्या दिसतात. त्यांची एकावर एक अशी दुमजली पद्धतीची रचना उठून दिसते. या तटबंदी खाली प्रचंड खोल 'मारखिंडी'ची दरी दिसते. दरीसमोर शंकुसारखा दिसणारा अवाढव्य 'मारठाण्याचा' डोंगर नजरेचे पारणे फेडतो.

दुहेरी रचनेचा बुरुज, त्यामागे 'मारठाण्याचा' डोंगर किल्ले घनगड, महाराष्ट्र. (Ghangad Fort, Maharashtra)


बालेकिल्ल्यावरून दिसणारी 'मारखिंड', त्यापुढे अंधारबन डोंगर परिसर. किल्ले घनगड, महाराष्ट्र. (Ghangad Fort, Maharashtra)

किल्ले 'तैलबैला', घनगड, महाराष्ट्र 

               पुढे उजवा वळसा मारत वाट बालेकिल्ल्याच्या पश्चिम काठावरून उत्तरेकडे जाते. या काठावरून खाली खोल उभी दरी दिसते. दरी पलीकडे तैलबैलाची दरीखिंड आणि त्यापलीकडे  सह्याद्रीचं खास आकर्षण असणारे 'किल्ले तैलबैला' डौलात उभा दिसतो. तैलबैलाच्या विशिष्ट रचनेची उभी भिंत डोळ्यात भरते. त्याच्या डाव्या बाजूस किल्ले 'सुधागड' लक्ष वेधून घेतो. इथून सह्याद्रीची रांग, त्यातील प्रचंड खोल दऱ्या, डोंगर माथ्यावरील विस्तीर्ण पठारे डोळ्यात सामावतात.

बालेकिल्ल्यावरून दिसणारा किल्ले तैलबैला, किल्ले सुधागड आणि डोंगर माथ्यावरील विस्तीर्ण पठारे (Ghangad Fort, Maharashtra)

बालेकिल्ल्याच्या ईशान्य टोकावरील कातळटाकी (Ghangad Fort, Maharashtra)

बालेकिल्ल्यावरील उध्वस्त वास्तुंचे अवशेष. किल्ले घनगड, महाराष्ट्र. (Ghangad Fort, Maharashtra)

                    बालेकिल्ल्याच्या ईशान्येला उतारावर एक काठोकाठ भरलेली पाण्याची कातळटाकी दिसते. तर मध्यभागी ठिकठिकाणी काही उध्वस्त वाड्यांचे अवशेष दिसतात. इथून बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वाराकडे आल्यास पूर्व उतारावर खोदलेली आणखी एक मोठी कातळ टाकी दिसते. या टाकीतील पाण्याची पातळी मात्र तळाला गेलेली दिसते. पूर्व काठाने पुढे आल्यास, दुमजली पद्धतीचा आणि विशेष रचनेचा बुरुज दिसतो. थोडक्यात बालेकिल्ल्याच्या दरवाज्याचे दोन आणि दुमजली तटबंदीच्या रचनेचे दोन असे बालेकिल्ल्याच्या पूर्वेस चार बुरुज दिसतात. बुरुजांव्यतिरिक्त बालेकिल्ल्यावर कुठेही तटबंदी दिसत नाही.

बालेकिल्ल्यावरील उध्वस्त वास्तुंचे अवशेष. किल्ले घनगड
 
पूर्व उतारावरील कातळटाकी, किल्ले घनगड

                    किल्ले घनगडास  पायथ्याचे मुख्य आणि बालेकिल्लाचे प्रवेशद्वार असे दोन दरवाजे, एकूण आठ कातळ कोरीव टाक्यांपैकी दोन खांबटाक्या, लहान मोठे मिळून आठ बुरुज आणि तीन टेहळणीच्या गुहा दिसतात. चारही दिशांच्या उभ्या उंच कातळ कड्यांनी किल्ल्यास नैसर्गिक संरक्षण दिले आहे.
                   १७७७ ते १७८३ या काळात महिला कैद्यांसोबत अनेक राजकीय कैदीही 'किल्ले घनगडा'वर कैदेत ठेवल्याच्या इतिहासात नोंदी मिळतात. पेशवाईच्या शेवटी हा किल्ला 'बाळाजी कुंजीर' यांच्या ताब्यात होता. १७ मार्च १८१८ रोजी कर्नल 'प्रॉथरने' कोणतीही लढाई न लढता 'किल्ले घनगड' स्वतःच्या ताब्यात घेतला. 

किल्ले घनगड, महाराष्ट्र. (Ghangad Fort, Maharashtra)

किल्ले घनगड, महाराष्ट्र. (Ghangad Fort, Maharashtra)
          

                 या आधी हा किल्ला कोणी, कधी बांधला याची इतिहासात नोंद सापडत नाही, पण प्रथम हा किल्ला कोळी सामंतांकडून अहमदनगरच्या निजामशाकडे आला. निजामशाही बुडाल्यानंतर पुढे किल्ला आदिलशाहीतील ढमाले देशमुख यांच्या ताब्यात आला. १६४७ ला शिवछत्रपतींनी आदिलशाहीकडून हा किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला. १६६५ च्या पुरंदर तहात तो मुघलांना देण्यात आला. पुन्हा १६७० ला तो शिवछत्रपतींनी जिंकून घेतला. १७०० पर्यंत घनगड 'पंतसचिव' शंकराजी नारायण यांच्या ताब्यात होता. पुढे छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर किल्ला पुन्हा मुघलांच्या ताब्यात गेला. तर पंतसचिवांच्या आदेशाने किल्ले तुंग, तिकोना, राजमाची, कोरीगड समवेत घनगड  'सरखेल' कान्होजी आंग्रेनीं  मराठ्यांच्या ताब्यात घेतला. पुढे १७१४ मध्ये बाळाजी विश्वनाथ यांच्या मध्यस्थीने घनगड आंग्रेनी छ. शाहूंच्या ताब्यात दिला.
               पुढे 'सदाशिव भाऊ' पेशव्यांच्या तोतया प्रकरणातील कनोजी ब्राह्मण 'सुखलाल' यास आणि या प्रकरणाला हातभार लावणारा 'धोंडो गोपाळ केळकर' यालाही 'किल्ले घनगडा'वर काही काळासाठी कैदेत ठेवल्याचे उल्लेख सापडतात.

Blue jewel bug, with brilliant coloration, may produce offensive odour when disturb, are around 450 species worldwide, observed in Western Ghat forest.- Ghangad Fort. किल्ले घनगड, महाराष्ट्र.

                  १७७७ सालच्या पेशवे काळात गाजलेल्या 'बारभाई' प्रकरणातील 'सखाराम हरी गुप्ते' यांनाही किल्ले घनगडा'वर कैदेत ठेवले होते. त्यावेळी किल्ल्याचे किल्लेदार 'अर्जोजी ढमाले' आणि कारखानीस 'रामचंद्र गोविंद' होते. कारखानीस रामचंद्र गोविंद याने, सखाराम गुप्ते यांना फितूर होऊन कैदेतून सोडवण्याची योजना आखली. ही गोष्ट किल्लेदार 'अर्जोजी ढमाले' यांना समजली. या फितूरीत एकूण आठ व्यक्ती सामील होत्या. त्यातील दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले. पकडलेल्या सहा जणांपैकी चौघांना तोफेच्या तोंडी देण्यात आले, तर दोघांचे उजवे हात तोडण्यात आले. फितुरी उघड झाल्यामुळे सखाराम गुप्तेंवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला.

किल्ले घनगड, महाराष्ट्र. (Ghangad Fort, Maharashtra)

             १७७९ ला सखाराम गुप्तेंचा किल्ल्यावर कैदेत असतानाच मृत्यू झाला. सखाराम गुप्तेंची पत्नी त्यांना घनगडावर भेटायला येण्यास निघाली असता, तिला 'तैलबैला' जवळील घाटात त्यांच्या मृत्यूची बातमी समजली. त्या बातमीच्या धक्क्याने तिचे घाटातच निधन झाले. तेव्हापासून या घाटाला 'सवाष्णीचा घाट' किंवा 'सतीचा घाट' म्हणून ओळखलं जाऊ लागलं.. 

                              || श्री कृष्णार्पणमस्तू ||


ऐतिहासिक संदर्भ :१) महाराष्ट्र देशातील किल्ले, चिं. ग. गोगटे, भाग १ व २ (सुधारित आवृत्ती)
                          २) पेशवे रोजनिशी, खंड१ ते९, डेक्कन व्हर्रनॅक्युलर ट्रान्सलेशन सोसायटी, पुणे.


येथे - जयवंत जाधव

'किल्ले विसापूर' - मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Pune, Maharashtra.

                           उन्हाळ्यात शुष्क झालेल्या धरतीला पावसाने तजेला दिल्यानंतर सह्याद्रीतल्या दऱ्या डोंगरांचे रूप विलोभनीय असेच दिसते....