गोरोबा काकांच्या 'तेर' गावानंतर आमचं पुढचं नियोजन कुलदैवत श्री 'तुळजाभवानी' होतं. 'तेर' नंतर धाराशिव मार्गे (उस्माणाबाद) 'तुळजापूर'ला जाणं हा जवळचा एकमेव पर्याय होता. धाराशिव शहराजवळच 'धाराशीव'(उस्मानाबाद) लेणी आहेत. 'तेर'ला आमचा पूर्ण दिवस गेलाच. 'धाराशीव लेणी' नियोजनात नसल्यानं तिथून जाता जाताच संध्याकाळी वाट वाकडी करून लेणी गाठायचं ठरवलं.
आजपर्यंत भेट दिलेली घारापुरी, अनेकदा भेट दिलेली कान्हेरी, वेरूळ, अजिंठा, भाजे, बेडसे लेणी, कार्ल्याची लेणी इत्यादि नजरेसमोर होतीच. मग औटघटकेसाठी आम्ही इथंही भेट द्यायचं ठरलं.
 |
| मंदिरासमोरील समाध्या (Dharashiv Caves -Usmanabad) |
'तेर'हुन नैऋत्येला असलेलं २२ किमीचं 'धाराशिव' तासाभरात गाठलं. लेण्याकडं जाण्यासाठी धाराशिव शहराच्या मध्यवर्ती भागातूनच जावं लागतं. गल्लीबोळातल्या या रस्त्यांचं काम त्यावेळी चालू होतं. आज सलग प्रवास आणि उन्हातून भटकंतीचा आमचा दूसरा दिवस होता. स्वतः ड्रायव्हिंग करणं, ही इथली शनिवारची ट्रॅफ़ीक मधली संध्याकाळ, रस्त्याची दुर्दशा आणि स्थानिक रिक्षावाले या सर्वांनी मेटाकुटीला आणलं. या अपरिचित लेण्यांना भेट देता येईल या उमेदीनं अडचणींना तोंड देत होतो.
उस्मानाबादच्या वायव्येला ५ किमीवर असलेल्या लेण्यांकडे शहर सोडून पुढे पठारावरून उतार रस्ता बऱ्यापैकी आहे. रस्ता संपतो तिथेच डावीकडं लेण्यांसाठी चेकपोस्ट आहे. तिथून खाली उतरणाऱ्या पायऱ्या सुरू होतात. वेळ उशीरा संध्याकाळची असल्यानं एखादं कुटुंब वगळता आम्ही पोहाचेपर्यंत तिथून सर्वजण परतले असावेत. चेकपोस्टवर कोणी कर्मचारी किंवा पहारेकरी तसं कोणीच दिसलं नाही. पुढं आम्ही फक्त चौघेच उरलो.
 |
| लेण्यांकडे जाणाऱ्या पायऱ्या (Dharashiv Caves) |
इथली लेणी एकूण दोन ठिकाणी विभागली आहेत. पायऱ्या उतरून सरळ डावीकडं झाडीतून जाणाऱ्या डोंगरऊतारावर सरासरी पाऊण किमीवर तीन लेणी आणि या पायऱ्या उतरतानाच उजवीकडं वळून जाणाऱ्या पायऱ्यांवरून गेल्यास जवळच चार लेणी आहेत. ही चार आणि सरळ समोरच्या डोंगरातील तीन अशी एकूण सात लेणी या बालाघाट डोंगररांगेत दिसतात. दोन्ही लेण्यांच्या मध्ये सखल जमिनीवर गवत आणि तुरळक झुडपं आहेत. त्यामुळं समोरासमोर आसणारी ही लेणी एकमेकांपासून दिसतात.
या उजवीकडच्या चार लेण्यांच्या समोर एक जुनं महादेव मंदिर दिसतं. याला समाधी मंदिरही म्हणतात. लेण्यांसमोर उतारावर हे मंदिर आहे. मंदिराच्या समोर एक चिंचेच प्रचंड झाड आहे. झाडाखाली चौथऱ्यावर तीन जुन्या समाध्या दिसतात. समाध्यांच्या अलीकडे शेंदूर लावलेली हनुमान मूर्ती आणि दुसऱ्या एका देवतेची भग्न मूर्ती दिसते. समाधीच्या चौथाऱ्यावरच एक प्रचंड झाड कोसळलेलं दिसत होतं.
 |
| समाधी मंदिर (Dharashiv) |
 |
| समोर समाधी मंदिर आणि उजवीकडे पहिली लेणी |
 |
| वाड्याच्या मधील मंदिर (Dharashiv) |
 |
| डावीकडे मंदिराचे प्रवेशद्वार आणि समोर वाड्याच्या ओवऱ्या |
आत समाधी मंदिरात गाभारा मधोमध असून सभोवती दगडी ओवऱ्यांची रचना असलेल्या जुन्या वाड्यासारखं बांधकाम दिसतं. मधोमध असूनही मंदिर वाड्यापासून अलिप्त दिसतं. कळसाचं दर्शन घेण्यासाठी या वाड्याच्या छतावर जावं लागतं. वर जाण्यासाठी जेमतेम अरुंद चिंचोळ्या दगडी पायऱ्या आहेत.
मंदिराची दगडी ठेंगणी चौकट ओलांडून आत मंडपात आल्यास उजवीकडं शिवपिंड दिसते. पिंडीची रचना एकावर एक गोल दगडी चकत्या ठेवल्याप्रमानं वर निमुळती आहे. तर गाभाऱ्यात असलेली शिवपिंड ही वर निमुळत्या होत जाणाऱ्या चार चौरस दगडी चकत्या दिसतात. सभामंडप आणि गाभारा अशा दोन्ही ठिकाणी या विशिष्ट आकाराच्या शिवपिंड्या दिसतात. क्वचित ठिकाणीच आशा रचनेच्या पिंड्या असाव्यात. सभामंडपात आणि गाभाऱ्यात काळोख असून बॅटरीची गरज आहे. शिवपिंडिंना अर्पण केलेल्या हार - फुलांवरून या निर्जन ठीकाणी मंदिरात नित्य पूजा होत असावी.
 |
| सभामंडपातील शिवपिंडी (Dharashiv Caves) |
 |
| मंदिराच्या सभामंडपातून गाभारा |
 |
| समाधी मंदिरातील ओवऱ्या (Dharashiv) |
चिंचोळ्या पायऱ्या चढून वर मंदिराच्या छतावर येता येतं. आम्ही इथं आलेल्या संध्याकाळी इथलं वातावरण विहिंगम होतं. अस्ताला जाणाऱ्या सूर्याच्या केशरी रंगछटा आकाशात विलोभनीय पसरल्या होत्या. तीन-चारशे वर्षापूर्वीचं हे समाधी मंदिर, छतावरून दिसणारा त्याचा कळस, समोर खडकात कोरलेली लेणी आणि समोर सखलातलं तुरळक जंगल हे सगळं या छतावरून एका दृष्टिक्षेपात येतं. अंधारून आलं आणि पुढं लेणी बघण्यासाठी आमची धावपळ उडाली.
 |
| छतावरून दिसणारं दृश्य (Dharashiv) |
 |
| गाभाऱ्यातील मूळ शिवपिंडी (Dharashiv Caves) |
पहिल्या लेण्याच्या पायऱ्या चढून गेल्यास ओसरी दिसते. समोर कोरीव दगडी चौकट ओलांडून गेल्यास आत गुहेसारखी खोली दिसते. दगडी चौकटीच्या वर अर्धवट सोडलेलं कोरीव काम दिसतं. वेळ संध्याकाळची असल्यानं आत अंधार दिसला. टॉर्च चालू केल्यास समोर भव्य कोरीव पण ओबडधोबड मूर्ती दिसते. कालानुरूप मूर्तीची झीज झाल्यानं अंदाज येत नाही. ही बुद्ध मूर्ती असावी.
 |
| पहिल्या लेण्यातील बुद्ध मूर्ती (Dharashiv Caves) |
 |
| पहिली लेणी (Dharashiv Caves) |
पुढे दुसरी लेणी ही सुरवातीलाच बांधीव दगडी खांबांनी छताला आधार दिलेली दिसते. एकूण सोळा खांबांनी आधार दिला असून ढासळणाऱ्या लेण्यांना आधार देण्यासाठी हे काम अलीकडेच केलेलं दिसतं.
 |
| दुसरी लेणी (Dharashiv Caves) |
 |
| दुसरी लेणी |
 |
| तिसरी लेणी (Dharashiv Caves) |
 |
| तिसऱ्या लेण्याची प्रवेश कमान |
पायऱ्या चढून तिसऱ्या लेण्याच्या ओसरीवर जाण्यापूर्वी सुरवातीला दगडात कोरलेली सुंदर कमान दिसते. कमानीच्या डावी उजवीकडं द्वारपाल कोरले आहेत. उजवीकडील द्वारपालाची कोरीव मूर्ती नष्ट झाली असून, डावीकडील बऱ्यापैकी शाबूत दिसते. या लेण्याचीही दुरुस्ती चालू असून, त्याच्याही छताला आधार देणारे आणि सिमेंटचा गिलावा केलेले नक्षीदार गोल खांब दिसतात. तर आत चौरस दगडी खांब छताला आधार देतात. ही लेणी सर्वात मोठी दिसते. आत काळोख असून वटवाघूळांच राज्य दिसतं. आत प्रवेश करतानाच वटवाघूळांमुळं निर्माण झालेली उष्णता जाणवते.
 |
| चौथी लेणी (Dharashiv Caves) |
 |
| तिसऱ्या लेण्यातील दुरुस्ती (Dharashiv Caves) |
तर पुढची चौथी लेणी आकारानं लहान असून, तिचीही दुरुस्ती चालू असल्याचं दिसतं.
या चार लेण्यांपैकी पहिली लेणी वगळता, पुढची तीन लेणी कधीकाळी ढासळली असावीत. सध्या त्यांच्या दुरुस्तीचं काम घेतलेलं दिसतं. त्यांचं मूळ सौंदर्य नष्ट झाल्याचं जाणवतं. दुसरी आणि तिसरी लेणी भव्य आहेत. काळाच्या ओघात त्यांचीही पडझड झाली असून कोरीव काम नष्ट झालेलं दिसतं. एकंदर या लेण्यांकडे सुरुवातीला शासनाचं दूर्लक्ष झाल्याचं दिसतं. स्थानिक तरुण पर्यटकांनीही या लेण्यांच्या आणि मंदिराच्या भिंतींवर आपल्या भावना लिहून प्रताप दाखवलेले दिसतात.
ही पाचव्या शतकातील बौद्ध लेणी बाराव्या शतकात जैन लेण्यात परावर्तित झाली असावीत.
या लेण्यांबद्दल विस्तृत माहिती 'लोकसत्ता'च्या 'लोकभ्रमंती' सदरात 'श्री अमित सामंत 'यांनी लिहिलेला लेख ७ डिसेंबर २०१६ ला प्रसिद्ध झाला होता. डोंबिवलीचे श्री अमित सामंत यांचा विविध गड किल्ले, प्राचीन मंदिरं, लेणी या बाबत गाढा अभ्यास असून, या लेखानिमित्त इथं या इतिहास अभ्यासकाचा उल्लेख येणं हा बहुमान समजतो. धाराशीव आणि आजूबाजूच्या ऐतिहासिक ठिकाणांबद्दल https://samantfort.blogspot.com/2017/10/blog-post.html?m=1 या त्यांच्या लिंकवर अभ्यासपूर्ण माहिती मिळते.
आधी 'किल्ले परांडा' या लेखातून उल्लेख केल्याप्रमाणे 'धाराशिव' हे दक्षिण आणि उत्तरेच्या प्राचीन व्यापारी मार्गावरील महत्वाचं ठिकाण होतं. तर आम्ही आता जिथून आलो ते 'तेर' म्हणजेच 'तगर' हे प्राचीन काळी व्यापार, संस्कृती आणि धर्म प्रचाराचे एक प्रमुख केंद्र असल्याचा उल्लेख गोरोबा काकांच्या ब्लॉगमध्ये केला आहेच. त्यामुळं बाजूला संरक्षणासाठी भुईकोट 'किल्ले परांडा' आणि व्यापार प्रवासादरम्यान आरामासाठी ही 'धाराशिव लेणी' त्यावेळी वापरात आली असावीत.
वाढणारा अंधार आणि तुळजापूर मुक्काम वेळेत गाठण्यासाठी आम्ही पलीकडील तीन लेण्यांना भेट देवू शकलो नाही याची हुरहूर राहिलीच..
|| श्री कृष्णार्पणमस्तू ||
येथे - जयवंत जाधव
छान माहिती दिली आहे👌👌
ReplyDeleteमस्त 👌👍👍
ReplyDeleteखुप छान माहिती दिली दादा !!! धन्यवाद
ReplyDeleteGood nice information ☺️☺️
ReplyDeleteजाधव साहेब
ReplyDeleteसुंदर व सोपे वर्णन ही तुमची खासीयत. त्या जोडीला योग्य छायाचित्र परिसराची सुंदर महिती देते. छायाचित्र उत्कृष्ठ आहेत, विशेष प्रशिक्षण घेतले असावे. असेच खूप भ्रमंती करा व आम्हाला प्रत्यक्ष भेट दिल्याची अनुभूती द्या. God bless you and your family.
माहिती खूप छान आहे.👌👌👍
ReplyDeleteI enjoyed the information which is very precise.
ReplyDeleteAwesome👌
ReplyDeleteखुप सुरेख माहिती दिली आहे, तुमच्या मुळे श्री. अमीत सावंत यांचे लेख वाचण्याची संधी मिळाली.
ReplyDelete