Wednesday 22 February 2023

प्राचीन 'बेडसे लेणी' (Ancient Bedse Caves)

                     लोणावळ्याचा 'बोरघाट' चढून वर आल्यास पुढे डावीकडे 'कार्ले' तर उजवीकडे 'भाजे',  'बेडसे' इत्यादी लेणी डोंगरात कोरली आहेत.

प्राचीन बेडसे लेणी (Ancient Bedse Caves) - Bedse

                     कोकण किनारपट्टीत 'कल्याण' (प्राचीन कलियन), 'शुर्पारक' म्हणजे सध्याचा नाला सोपारा, 'चौल' (महाभारतातील चंपावती, तसेच चेमुल्ल, चीमोलो, चेऊल ही या बंदराची काही प्राचीन नावं), रायगड जिल्ह्यातील 'मांदाड' सारखी तसेच 'दाभोळ' आणि इतर बरीच लहान मोठी प्राचीन बंदरं उदयास येऊन गेली.

विहारातील एक कोरीव सदनिका - बेडसे लेणी

                     सिंधू, सरस्वती खोऱ्यातील संस्कृती लयास गेल्यानंतर या बंदरांवरील व्यापार काही काळ थंडावला. त्यानंतर पुन्हा मौर्य आणि सातवाहनांच्या काळात राजकीय स्थैर्य आणि आर्थिक सुबत्ता आल्यानंतर या बंदरांतून रोम, इजिप्त आणि इतर पश्चिमात्य साम्राज्यांशी आंतर राष्ट्रीय व्यापार वाढीस लागला. या काळात या सर्व बंदरांनी पुन्हा सुवर्णकाळ अनुभवला.   

चैत्यगृहाच्या व्हरांड्याचे कोरीव अष्टकोनी स्तंभ (बेडसे लेणी)
                      कोकण किनारपट्टीवरील ही प्राचीन बंदरं सहयाद्री घाटावरील आणि दक्षिणेकडील व्यापारी बाजारपेठांशी छोट्या छोट्या घाटवाटेनं जोडली होती. या वाटेवर विसावा घेण्यासाठी सह्याद्रीतील या लेण्यांचा उपयोग होत असे.  या घाटवाटांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यांचं रक्षण करण्यासाठी पर्यायाने किल्ल्यांची निर्मिती झाली.

                     कार्ले, भाजे लेण्यांना यापूर्वीच आमची भेट झाली होती. त्यापैकी पुणे जिल्ह्यातील प्राचीन काळी 'मामड' प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मावळ तालुक्यातील आणि  'बेडसे' गावाजवळ पश्चिमेच्या डोंगरात खोदलेल्या लेण्यांना भेटण्याचा योग आला.
                      मुंबई पुणे हायवेला लोणावळ्याहून सरासरी २२ किमीवर उजवं वळण घेऊन पुढे चार किमीवर 'बेडसे' गावात ही लेणी दिसतात. तर पुणे शहरापासून लोणावळ्याकडे सरासरी ५० किमीवर ही लेणी आहेत. डोंगर पायथ्याला बेडसे गावच्या जिल्हा परिषद शाळेसमोर पार्किंगची सोय आहे.

बेडसे गावातून डोंगरातील लेण्यांकडे जाणाऱ्या पायऱ्या

                     बेडसे गावापासून १०३ मीटर उंचीवरील डोंगरावर ४४५ पायऱ्या चढुन गेल्यास, सुमारे १५० मीटर लांबीच्या अखंड कातळात कोरलेला या लेण्यांचा एक संच दिसतो.

बेडसे लेणी (Bedse Caves)

                       लेण्यांच्या प्रशस्त प्रांगणात समोर चैत्यगृह आणि उजवीकडे मुख्य विहार ठळकपणे दिसतात. डाव्या बाजूला छोटया कातळ गुहेत गोल पारावर कोरलेला चौकोनी स्तंभ छताला आधार देताना दिसतो. त्या भोवती एकजण प्रदक्षिणा करू शकेल अशी गोलाकार जागा दिसते. हे अर्धवट राहिलेलं काम असावं, पण ते रेखीव आणि प्रमाणबद्ध दिसतं. गुहेच्या बाहेर उजवीकडे कातळाच्या खाली दोन  अडीज फूट चौकोन छिद्र असलेली आणि  काठोकाठ पाण्याने भरलेली कोरीव पाण्याची टाकी दिसते.

लेण्यांच्या प्रांगणातील स्तूप आणि बाजूला दिसणाऱ्या पाण्याच्या 'पोडी' (Bedse Caves)

                                        उजवीकडे बाजूला कातळात कोरलेला अंदाजे सहा फूट उंचीचा छोटा स्तूप आहे. स्तुपाच्या दोन्ही बाजूलाही खाली कातळात कोरलेल्या पाण्याच्या  टाकींची छिद्र दिसतात.

चैत्यगृहासमोरील आडवी कातळ भिंत  - बेडसे लेणी (Bedse Caves)

                      









                  

                  उजवीकडे लेण्याचं चैत्यगृह आहे. कातळात सरासरी दोन मीटर रुंद खोदलेल्या वाटेतून आत आल्यास लेण्याची मुख्य वास्तू नजरेस पडते. लेणी कोरल्यानंतर समोरील उरलेला कातळ तसाच सोडलेला दिसतो. समोर उभा केलेल्या एखाद्या पडद्याप्रमाणे या कातळ भिंतीच काम दिसतं. दर्शनी चैत्यगृहाच्या ३० फूट लांब आणि १२ फूट रुंदीच्या व्हरांड्याचं छत एकूण चार अष्टकोनी दगडी स्तंभांवर तोललं आहे. त्यातील दोन खांब पूर्णाकृती आहेत तर डावी उजवीकडील दोन खांब अर्धदृश्य कातळ भिंतीत आहेत.

                वर निमुळत्या होत जाणाऱ्या चारही स्तंभांवर जमिनीच्या दिशेने उमलणाऱ्या कमळांचे शिल्प कोरलेले दिसतात. कमळांवर चौरंगाकृती मांडणी असून त्यावर बसलेले घोडे, हत्ती, बैल यासारखे प्राणी कोरलेले दिसतात. या प्रत्येक प्राण्यावर स्त्री-पुरुष जोडीनं स्वार आहेत. त्यांच्या अंगावरील कोरीव दागिने, चेहरे, शरीर आणि डोळ्यांची ठेवण सुबकतेनं कोरलेली दिसते.

स्तंभावरील कोरीव प्राणी आणि मुर्त्या (Bedse Caves)

 

                       तसेच स्तंभांवरील कोरीव प्राण्यांमध्ये घोडे हे बसलेले दाखवले असून त्यांचा गळा विशेष भारदस्त, रुंद कोरलेला दिसतो. सुरवातीला स्तंभांवर मुर्त्या, प्राणी कोरण्याची कल्पकता आपल्याकडील स्थानिक नव्हती. हे स्तंभ मौर्य काळातील असले तरी, 'पर्शिपोलिटन' धरतीवर कोरले आहेत. 'पर्शिपोलीस' हे इराणमधील प्राचीन शहर असून मौर्य, सातवाहन साम्राज्यांचा तिथपर्यंत आंतर राष्ट्रीय संबंध असल्याचं या लेणी सिद्ध करतात.

व्हरांड्यातील सुबक कोरीव नक्षी - बेडसे लेणी (Bedse Caves)

                       व्हरांड्याच्या डावी उजवीकडे खोल्या असून त्यावरील भिंतीतही नालाकृती कमान असलेले बहुमजली प्रासादांचे देखावे कोरले आहेत. आजूबाजूला पट्टीत चौकोनी, सुबक नक्षीकाम कोरलेले दिसतं. दोन्ही बाजूकडील कमानी लहान मोठ्या असल्या तरी त्या चारच्या पटीत कोरलेल्या दिसतात. प्रत्येक कमानीच्या अंतःवक्र भागात दाते (Gear) कोरलेले दिसतात. हे सर्व दाते चारच्या पटीतच ठेवण्याचा प्रयत्न केलेला दिसतो.

चैत्यगृहाची कमान - प्रवेश दार - बेडसे लेणी

                      स्तंभांच्या समोर चैत्यगृहाची दर्शनी कोरीव, सुबक भिंत दिसते. भिंत एकमजली पद्धतीत विभागली असून, वरील भागात प्रचंड पिंपळपान किंवा नालेच्या (घोड्याची नाल) आकारातील कमान कोरलेली दिसते. भिंतीच्या खालील भागात एकूण तीन नालेच्या आकारातील चौकटींच्या कमानी कोरल्या आहेत. या तीन कमानीपैकी मधली आणि डाव्या बाजूच्या चौकटीतून चैत्यगृहात प्रवेश दिसतो. उजवीकडील कमान जाळीदार, कोरीव दगडी पडद्याने बंदिस्त दिसते. 

चैत्यगृह आणि मुख्य स्तूप - बेडसे लेणी chatya, Bedse Caves

स्तूपाच्या डावीकडील पाच खांबावरील वैशिष्ठ्यपूर्ण कोरलेली नक्षी

                                    आत सुमारे २८ फूट उंचीचं प्रशस्त आणि कातळात खोल कोरलेलं चैत्यगृह दिसतं. चैत्यगृहाला एकूण २६ षटकोनी स्तंभांनी आधार दिलेला दिसतो. चैत्यगृहातील स्तूप भव्य असून हर्मिकेवरील त्यावेळचा लाकडी छत्रीचा खांब आणि खांबावर लाकडी कमळ घडविलेलं दिसतं. स्तूपा जवळ उजवीकडील पाच स्तंभांच्या वरील भागात विशिष्ट नक्षी कोरली असून बाकीचे २१ स्तंभ नक्षी विरहित दिसतात. चैत्यगृहाचं छत गजपृष्ठाकार (हत्तीच्या पाठीसारखा आकार) दिसतं. सध्या कार्ला लेण्यातील चैत्यगृहात दिसतात त्याप्रमाणे इथंही छताला लाकडी तुळया (Beams) असाव्यात, पण कालानुरूप त्या गायब केलेल्या दिसतात.

मुख्य विहार - बेडसे लेणी Vihar, Bedse Caves

विहारातील सदनिका आणि कोरीव काम (Bedse Caves)
विहारातील धान्य साठवण्याची सदनिका - बेडसे लेणी (Bedse Caves)

तिसऱ्या खोलीतील अग्नी राखून ठेवण्याची जागा

                        चैत्यगृहाच्या बाजूला उजवीकडे मुख्य विहार दिसतं. या विहाराची वास्तूही प्रशस्त मोठी असून आत कातळात खोलवर खोदलेली दिसते.  विहाराचंही छत गजपृष्ठ आकारात दिसतं. विहारात एकूण ११ सदनिका खोदलेल्या दिसतात. त्यापैकी डावीकडून चौथ्या सदनिकेचा धान्य साठ्यासाठी उपयोग केला जात असावा असं तिच्या अंतर्गत रचनेवरून लक्षात येतं. तर त्या आधीच्या तिसऱ्या सदनिकेत, प्रज्वलित अग्नी पर्जन्य काळात राखून ठेवण्यासाठी केला असावा असं आतील जमिनीवर खोदलेल्या यज्ञाकार चौकोण खड्ड्यामुळं लक्षात येतं. उरलेल्या खोल्या भिक्षूंच्या निवासासाठी वापरात असाव्यात.

डावीकडे भिक्षुंसाठी अन्न शिजवण्याची खोली (Bedse Caves)
                      विहाराबाहेर डावीकडे कातळात खोदलेली आणखी एक वेगळी सदनीका दिसते. कदाचित ती त्यावेळी भिक्षुंसाठी अन्न शिजवण्याची खोली असावी.
नाशिकच्या देणगीदाराचा शिलालेख (बेडसे लेणी)
पोडी - पाण्याच्या भूमिगत टाक्या (बेडसे लेणी)


                       चैत्यगृह, मुख्य विहार यांच्या डावी उजवीकडे जमिनीखाली कातळात पाण्याच्या टाक्या खोदलेल्या दिसतात. या टाक्यांना त्याकाळी 'पोडी' असे संबोधले जाई. बेडसे लेणी संकुलात अंदाजे १० बाय १२ फुटाच्या एकूण ७ 'पोडी' आहेत. त्यातील एक 'पोडी' खोदण्यासाठी दिलेल्या नाशिकच्या देणगीदाराचा उल्लेख त्या पोडीच्या प्राचीन कातळ भिंतीवर कोरलेला दिसतो. या सर्व पोडीतील पाण्याचा उपसा केल्यानंतरही त्या पुन्हा काठोकाठ भरताना दिसतात. तसेच पावसाचं पाणी या पोडीत जाणार नाही अशा पद्धतीनं त्या कातळ छताखाली कोरल्या आहेत. गाव सपाटीपासून १०३ मी. उंचीवर असूनही या टाक्या डोंगरातला कातळ पाझरून सर्वकाळ काठोकाठ भरून राहतात. हे इथलं वैशिष्ठ्य आजही टिकून राहिलेलं दिसतं.

'किल्ले तुंग' कातळ डोंगरतून पाईप द्वारे खाली आणलेलं पाणी - बेडसे लेणी

'किल्ले तुंग' वरील खांब टाकी (बेडसे लेणी)







'किल्ले तुंग' पायथ्याच्या पायऱ्यांची दुरुस्ती (बेडसे लेणी)

                    हे असंच दुसरं जवळचं वैशिष्ठ्य 'किल्ले तुंगी'च्या उभ्या डोंगरावरील मध्यावर कातळात खोदलेल्या प्रशस्त खांब टाकीचं दिसतं. किल्ले तुंगीला डोंगर पायथ्याच्या पायऱ्यांची सध्या डागडुगी सुरू आहे. आणि त्या बांधकामासाठी लागणारं पाणी हजार फूट उंचीवरील किल्ल्याच्या कातळ टाकीतून तोटीद्वारे (Flexible pvc pipe) वापरताना आम्ही पाहिलंय. हे काम नक्कीच उन्हाळभर चालणारं आहे. पाण्याचा सतत उपसा सुरू असूनही टाकी फेब्रुवारी मध्यावर काठोकाठ  भरलेली दिसते.

बेडसे लेणी - मुख्य विहार (Bedse Caves)

                       सर्वसाधारणपणे लेणी खोदून तिथं पाण्याची व्यवस्था केली जाते असं समजलं जातं. पण कातळडोंगरात आधी पाणी शोधून, पाण्याची सोय असेल त्या ठिकाणीच लेणी खोदली जातात. त्यासाठी आधी प्रायोगिक तत्त्वावर कातळात खड्डे खोदून पाणी साठवलं जातं. बाराही महिने ते साठवलेलं पाणी टिकून राहिल्यास तो कातळ लेणी खोदण्या योग्य समजला जात असावा. 

                   त्याचप्रमाणं लेणी पूर्ण खोदण्याआधी कातळाचा काही अंश खोदून असाच सोडला जातो. त्यानंतर तिन्ही ऋतूतील ऊन, पाऊस, वारा असा त्या खडकावर होणाऱ्या वातावरणीय परिणामांचा विचार केला जात असावा. जर बाह्य वातावरणाचा त्या दगडावर परिणाम झाला तर ती जागा सोडली जात असावी. आजही काही लेणी अर्धवट सोडलेली दिसतात. यामागे वरील दोन कारणं निश्चितच असावीत.

बेडसे लेण्यांचा प्राचीन 'मारकुड' पर्वत - बेडसे लेणी

                           श्री संतोष दहिभाते हा पुरातत्व खात्याचा तरुण कर्मचारी या लेण्यांची साफसफाई व व्यवस्था चोख राखताना दिसतो. प्राचीन काळी या लेण्यांना 'मारकूड पर्वत लेणी' या नावानं ओळखलं जात असे. इसवीसन पूर्व पहिल्या शतकातील ही लेणी असावीत.

लेण्यांबद्दल चर्चा करताना (Bedse caves)

                   लेणी वरून खाली कोरलेली असल्यानं लेण्यांच्या छताकडील भागाचा कालावधी, त्याचप्रमाणे लेण्याच्या तळाकडील भागाचा कालावधी निश्चित केला जातो. या दोन्ही गोष्टीवरून लेणी कोरण्यास लागलेल्या कालावधीचा अंदाज बांधणं शक्य आहे. 

                    'हिनयान' पद्धतीने 'मारकुड' पर्वतात कोरलेल्या या बौद्ध लेण्यात कुठेही बौद्ध प्रतिमा किंवा चिन्हे कोरलेली दिसत नाहीत. 

                        बेडसे लेणी इसवीसन पूर्व पहिल्या शतकात कोरून पूर्ण झाली. त्याआधी १५० वर्षे आधी या लेण्याचं काम चालू केलं असावं. यावरून सुमारे २२०० वर्षे इतकी ही लेणी पुरातन असावीत असा अंदाज बांधता येतो. इतक्या वर्षानंतरही इथल्या नक्षीचे बारकावे आणि कलाकुसर थक्क करते. १८१८ ला या लेण्यांचा शोध लागला असून, २६ मे १९०९ ला भारत सरकारनं 'बेडसे' लेण्यांना 'राष्ट्रीय संरक्षित स्मारक' म्हणून घोषित केलं.

बेडसे लेणी (Bedse caves)

                     बेडसे आणि आजूबाजूच्या लेण्यांवर तसेच कोकणात उतरणाऱ्या इथल्या घाट वाटांवर त्याकाळी खडा पहारा देणारे लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना सारखे गिरिदुर्ग आजही सह्याद्रीत पाय रोवून उभे आहेत..

                                    || श्री कृष्णार्पणमस्तू ||

येथे - जयवंत जाधव



11 comments:

  1. खुप सुंदर आणी अभ्यासपूर्ण लिखाण

    ReplyDelete
  2. खूप छान माहिती दिल्याबद्दल आभार मानले पाहिजे आपले, धन्यवाद मित्रा!

    ReplyDelete
  3. Khup mst mahiti👍👏👏

    ReplyDelete
  4. Khup chhan information. I like it.

    ReplyDelete
  5. खूप अभ्यासपूर्ण लेख आहे कधी जायचं योग आला तर याची नक्कीच मदत होईल धन्यवाद दादा

    ReplyDelete
  6. संपूर्ण लेखाचं वैशिष्ट्य म्हणजे लेखकाचा दांडगा अभ्यास. सर्व गोष्टी बारकाईने तपासून मगच त्यावर लेखन केलं गेलंय हे विशेष. आपल्या शेजारीच इतक्या वैविध्य पूर्ण गोष्टी असताना इतर ठिकाणी जायची गरजच नाही. पुन्हा एकदा धन्यवाद जे के साहेब. अशीच ठेवणीतील प्रवास वर्णने पुन्हा एकदा सादर केल्याबद्दल.

    ReplyDelete
  7. Very Nice
    Great Information 👍

    ReplyDelete
  8. छान तुंग किल्ल्याचे exampl. सर्व छान माहिती दिली आहे. Great doing Hemlata..👌👏

    ReplyDelete

ऑफबीट - खरोसा लेणी, निलंगा, जि. लातूर Offbeat - Ancient Kharosa caves, Dist. Latur, Maharashtra.

                        महाराष्ट्रात वैशिष्ट्यपूर्ण अशी बरीच लेणी आहेत. काहींची प्रसिद्धी तर जगभर पोहोचली आहे. त्यांची कोरीव कलाकुसर आजही थक...