Thursday 16 March 2023

गत वैभवाची साक्ष देणारा - 'वितंडगड' उर्फ 'किल्ले तिकोना' - Vitandgad Fort (Tikona Fort)

                  कोकणातील वेगवेगळ्या बंदरावर उतरणारा माल प्राचीन काळी व्यापारी छोट्या छोट्या घाट वाटांनी देशावर आणि पुढे दक्षिणेकडे घेऊन जात. त्यावेळच्या त्या त्या साम्राज्यांनी व्यापाऱ्यांना सुरक्षा आणि विश्वास देऊन व्यापार वाढीस पूरक वातावरण निर्माण केलं. लेण्यांबरोबरच सह्याद्रीतील या दुर्गम  घाट वाटांवर नजर ठेवण्यासाठी तसेच त्यांचं रक्षण करण्यासाठी ठिकठिकाणी दुर्गांचीही निर्मिती केली.  पुण्याच्या 'मावळ' प्रांतातील (प्राचीन 'मामड' प्रदेश) 'बेडसे' लेण्यांच्या भेटीनंतर त्याच दिवशी पुणे जिल्ह्यातील सहयाद्रीच्या लोणावळा डोंगर रांगेत ३५०० फूट उंचीवरील 'किल्ले तिकोना' हे आमचं पुढील नियोजन होतं. 

किल्ले तिकोना - बालेकिल्ला पायऱ्या (Tikona Fort )

                      बेडसे लेण्यांच्या डोंगरावर दुपारचे एक वाजले. हा डोंगर उतरून पुढे 'किल्ले तिकोना' गाठायचा होताच. तासा दोन तासात ही लेणी आटोपून पुढे तिकोना चढू या विश्वासानं आम्ही, आधी येणारी बेडसे लेणी ठरवली होती. पण तिथल्या कर्मचाऱ्यांशी रंगलेली लेण्यांबद्दल चर्चा संपत नव्हती. आम्हाला कळत होतं पण वेळही जात होता आणि उन्हं तापत होती. एरवी फेब्रुवारी इतका तापदायक नसतो पण या शेवटच्या तिसऱ्या आठवड्यात अचानक उष्णता वाढली होती. पुढे लेण्यांच्या दक्षिणेकडील सरासरी १५ किमीचा प्रवास करून तापत्या उन्हातून डोंगर चढून तिकोनाही गाठायचा होता.
किल्ले तिकोना डोंगर (Tikona Fort)


तिकोना पायथा, पवनेच्या काठावरून दिसणारे विहिंगम - किल्ले तुंग आणि मोरगिरी (Tikona Fort)

                            पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य 'पवना जलाशया'च्या काठानं, वळणा वळणांचा घाट चढत दुपारी तीन वाजता 'तिकोनापेठ' गावची कमान ओलांडून पायथ्याला पोहोचलो. जाताना उजवीकडे अफाट पवनेच्या पलीकडे 'किल्ले तुंगी'चं उत्तुंग शिखर भुरळ घालतं. तर समोर त्रिकोणी आकाराच्या डोंगरावर 'किल्ले तिकोना' दिसतो. त्रिकोणी आकारामुळेच त्याला 'तिकोना' म्हटलं जातं. पुढे शिवरायांनी त्याचं नाव 'वितंडगड' असं ठेवलं. किल्ला उजवीकडे ठेवत डाव्या बाजूने सरासरी एक किमी गावापासून पुढे आल्यास गड पायथ्याला पोहोचतो. गड पायथ्याला गावकरी शेतात टपऱ्या बांधून येण्याऱ्या डोंगर भटक्यांसाठी पार्किंग आणि पिठलं भाकरीची सोय करून देतात. त्यांच्या शेतात पिकणाऱ्या चवळी, पावटा, दबड्याच्या शेंगा काढून विकताना दिसतात. इथून उजवीकडे जंगलात घुसणारी पायवाट तिकोना किल्ल्यावर घेऊन जाते.

मांडवी डोंगर आणि तिकोनाची डोंगरसोंड (Tikona Fort)


तिकोना किल्ल्यावर जाणारी पायथ्याची पायवाट (Tikona Fort)
       

                      नागमोडी चढाची पायवाट अर्ध्या तासात सह्याद्रीच्या अजश्र 'मांडवी'चा डोंगर आणि 'तिकोना' किल्ल्याच्या डोंगराला जोडणाऱ्या सोंडेवर घेऊन येते. या सोंडेवरून उजवीकडे वळल्यास वाट किल्ल्यावर जाते. पायवाट मळलेली, वहिवाटीची असल्यानं अजिबात चुकण्याची शक्यता नाही. या टप्प्यावर मागे वळून पाहिल्यास ईशान्येला 'माळवंडी' जलाशय दिसतो.
समोर दिसणारा माळवंडी जलाशय (Tikona Fort)
किल्ल्याचं 'मेटं' (Tikona Fort)
                      पुढे वाट किल्ल्याच्या मेट्यावर येते. हे 'मेटं' म्हणजे गडावर जाण्यापूर्वी पहिल्यांदा तपासणी करण्याचं तसेच गडावर किंवा गडावरून खाली तातडीचा निरोप देण्याचे ठिकाण असायचं. गडावर हल्ला झाल्यास तो परतवून लावण्याचं पहिलं काम या मेट्यावर केलं जात असे. सध्या मेट्यावर पहारेकऱ्यांच्या चौकीचे अवशेष दिसतात. इथून उजवीकडे दूर डोंगरावर किल्ल्याच्या तटबंदीचा बुरुज दिसतो. मेट्यानंतर छोटी कातळ टेकडी ओलांडून आणि किल्ला उजवीकडे ठेवत डोंगर धारेवरून चढत वाट दहा मिनिटांत छोट्या कातळ खिंडीतून नागमोडी वळसा घेते. 
किल्ल्याचा पहिला दरवाजा (Tikona Fort)
तिकोना वाटेवरची कातळखिंड (Tikona Fort)

 

किल्ल्याचा पहिला दरवाजा (Tikona Fort)
                       खिंडीतून चढून वर आल्यास डाव्या बाजूस कातळात कोरलेला किल्ल्याचा पहिला दरवाजा दिसतो. सध्या त्याची  दुरुस्ती केल्याचं दिसतं तसेच त्याचे लाकडी दरवाजेही नवीन दिसतात. गुहेत कोरावी तशी दरवाजाच्या आतील डाव्या बाजूस पहारेकऱ्यांची मोठी देवडी दिसते.
उध्वस्त पायवाटेवरून दिसणारे वेताळ दरवाजाचे बुरुज (Tikona Fort)
पहिल्या दरवाजाच्या आतील उध्वस्त तटबंदीतून पायवाट 



उध्वस्त 'वेताळ दरवाजा' (Tikona Fort)
वेताळेश्वर मंदिर (Tikona Fort)

                      या दरवाज्यातून उजवं वळण घेऊन वाट दगडांतून चढत डाव्या बाजूला दिसणाऱ्या दोन बुरुजातून माचीवर येते. बुरुजात उध्वस्त दगडी चौकट आणि पडझड झालेलं आजूबाजूचं बांधकाम दिसतं. किल्ल्याच्या या दुसऱ्या दरवाजाला 'वेताळ' दरवाजा म्हणतात. दरवाज्याच्या डाव्या हाताला समोर 'वेताळेश्वर' मंदिर दिसतं. मंदिर पूर्णतः उध्वस्त असून त्याच्या चौथऱ्याचे शेवटचे अवशेष जमिनीवर दिसतात. डावीकडे मंदिरापुढे किल्ल्याची प्रशस्त लांब माची असून माचीच्या टोकाला तटबंदीचा बुरुज दिसतो.  बुरुजावरून समोर मांडवीचा डोंगर दिसतो. खाली डोंगरसोंडेवरून किल्ल्याकडे येताना मेट्यावरून समोर दिसणारा हा तटबंदीचा बुरुज दिसतो. बुरुजाखाली दरी आणि दुरुन किल्ल्यावर येणारी पायवाट दिसते.

'वेताळ दरवाजा' (Tikona Fort)

तिकोना बालेकिल्ला सुळका - Tikona Fort 

तळं आणि लेण्यातील तुळजाई मंदिर (Tikona Fort)


                      वेताळ दरवाजातून उजवीकडे वळल्यास समोर बालेकिल्ल्याचा सुळका नजरेस पडतो.  पुढे पायवाट किल्ल्यात जाताना दिसते. आत किल्ल्यात डाव्या बाजूला उध्वस्त वाडे दिसतात. उजव्या बाजूला डावीकडील कातळात कोरलेली 'पणवती' वध करताना मारुतीची भव्य मूर्ती दिसते. मूर्तीच्या डाव्या पायाखाली ही राक्षसीन दाबली असून उजव्या हाताने चापट मारण्याच्या आवेशात असलेल्या या मूर्तीला 'चपेटदान' मारुती म्हणतात.

चपेटदान' मारुती - Tikona Fort

 लेण्यातील तुळजाई मंदिर (Tikona Fort)

 तळं आणि लेण्याचे कोरीव खण (Tikona Fort)

                      मारुतीच्या मूर्ती पुढे डाव्या बाजूला कातळात खोदलेलं मोठं पाण्याचं तळ दिसतं. तळ्यावर कातळात खोदलेली लेणी आहेत. लेण्यात तांदळा स्वरूपातील श्री तुळजाई देवीचं मंदिर आणि बाजूला ध्यान साधनेसाठी खोदलेली खोली दिसते. मंदिर आणि इतर खोल्या त्याकाळी एकूण सहा खण्यांच्या असाव्यात, पण आता त्यांची पडझड झालेली दिसते. तळं पाण्यानं काटोकाठ भरलेलं असून स्वच्छ दिसतं. तळ्या काठावर पाणी उपसण्यासाठी इंजिन दिसतं. गडाच्या डागडुगीसाठी या पाण्याचा उपयोग होत असावा.

तळ्यासमोरील वाड्यांचे अवशेष (Tikona Fort)

                      तळं आणि लेण्यांच्या गुहेसमोर उध्वस्त वाड्यांचे अवशेषही दिसतात. कदाचित गडावरील ती 'सदर' असावी. सदरेच्या बाजूला 'रामाची गादी' असा फलक दिसतो. जेव्हा गडावर राबता होता त्यावेळी या सदरेवर रामाच्या पादुका ठेवून राज्यकारभार चालविला जात असे. श्रावण महिना, दसरा, दिवाळी, रामनवमी, हनुमान जयंती आणि भक्ती पारायण असे उत्सव त्यावेळी इथे उत्साहाने पार पडत. त्याबद्दलचा माहिती फलक बाजूला दिसतो.

रोपला जोडलेलं इंजिन (Tikona Fort)

                      या वाड्यांच्या मागे तटबंदीवर गडाच्या दुरुस्तीसाठी रोपच्या सहाय्याने सामान वर आणण्यासाठी बसवलेलं इंजिन दिसतं.

                      पुढे डाव्या बाजुला गडाच्या बांधकामासाठी वापरलेला चुना मळण्याचा घाणा लक्ष वेधून घेतो. 
 

चुन्याचा घाणा (Tikona Fort)

तिसऱ्या महादरवाजासमोरील तुटलेल्या पायऱ्या (Tikona Fort)

                      घाण्याच्या पुढे डावीकडे बालेकिल्ल्यावर जाणाऱ्या पायऱ्या दिसतात. तर इथून उजवीकडे दहा मिनिटांची एक सरळ पायवाट दाट झाडीतून पुढे जाऊन गडाखालच्या तटबंदीकडे उतरते. या तटबंदीत गडाचा तिसरा महादरवाजा आणि बाजूलाच एक चोरवाट खाली उतरताना दिसते. महादरवाजा तटबंदीतील दोन्ही बुरुजात निर्माण केला असून, इथे गडाखाली उतरणाऱ्या पायऱ्या उध्वस्त, धोकादायक आहेत.

तिसरा महादरवाजा (Tikona Fort)

चोर दरवाजा - तटबंदीच्या आतून (Tikona Fort)

चोर दरवाजा - तटबंदीच्या बाहेरून (Tikona Fort)

तटबंदीबाहेरील खांब टाकी  (Tikona Fort)
बालेकिल्ल्यावर जाणाऱ्या पायऱ्या (Tikona Fort)

                     महादरवाजातून खाली खोल दरी, तिकोनापेठ गांव, पवना जलाशय आणि समोर माळवंडी जलाशय दिसतो. महादरवाज्याच्या आत तटबंदीलगत उध्वस्त घरांचे काही जोते दिसतात. त्याच्या अलीकडेच बाजूला चोर दरवाजा दिसतो. या दरवाज्यातून  किल्ल्याबाहेर आल्यास उजवीकडे तटबंदी खाली कातळात एक प्रशस्त मोठी पाण्याची खांब टाकी खोदलेली दिसते. या टाकीतील पाण्याचा नित्य उपसा होत असावा असं त्यात सोडलेल्या पाईपवरून लक्षात येतं. गडाच्या या टोकाला भटके फारसे फिरकत नसावेत असं पाऊल वाटेवर वाढलेल्या गवतावरून लक्षात येतं. या पाऊल वाटेवर सुंदर रीतीनं मुंग्यांनी निर्माण केलेली वारूळं दिसतात.

मोहक बांधणीचं मुंग्यांचं वारूळ (Tikona Fort)


गगनाला भिडणारे बालेकिल्ल्याचे बुरुज (Tikona Fort)
बालेकिल्ल्याच्या आत सुरुवातीची उजवीकडील टाकी आणि वरती खांब लेणं
बालेकिल्ल्याच्या उजवीकडील टाकी आणि खांब लेण्यांसमोरील टेहळणी माची - किल्ले तिकोना

बालेकिल्ल्याच्या उभ्या सरळसोट कोरलेल्या पायऱ्या (Tikona Fort)
                      तर पुन्हा चुन्याच्या घाण्याकडे मागे येऊन डावीकडे वळून चढणाऱ्या पायऱ्या बालेकिल्ल्याच्या प्रचंड उंच बुरुजात बनवलेल्या दरवाज्यात येतात. दरवाज्याच्या आत उजव्या बाजूला खडकात कोरलेली मोठी पाण्याची टाकी दिसते. टाकीच्या वर कातळ खांबांचा आधार घेतलेल्या अधांतरी गुहेत लेण्यांचे खण (खोल्या) दिसतात. कदाचित पूर्वी या खोल्यांमध्ये धान्य साठा केला जात असावा. या टाकीच्या समोर पायऱ्यांच्या पलीकडे मध्यावर अवघड जागी टेहळणीची छोटी माची दिसते. बालेकिल्ल्यावर ८० अंशात उभ्या चढानं जाणाऱ्या गुडघाभर उंचीच्या ४० पायऱ्या आहेत. जेमतेम एक पाय रुंदीच्या पायऱ्या दमछाक करतातच पण काळजी घेऊन चढाव्या लागतात. या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला सुरक्षेसाठी कातळात बोल्ट ठोकून त्यांना दोर लावले आहेत. बाहेरून आक्रमण झालंच तर या अवघड जागी शत्रूला नेस्तनाबूत करण्यासाठी बुरुजात पल्लेदार जंग्या ठेवलेल्या दिसतात.
बालेकिल्ल्यावर घेऊन जाणारा दरवाजा - किल्ले तिकोना


बालेकिल्ला दरवाजा (आतून) - किल्ले तिकोना

बालेकिल्ल्याची बुरुज माची  (Tikona Fort)
                       पायऱ्या नंतर दोन्ही बुरुजात बसवलेल्या दगडी कोरीव कमानीतून बालेकिल्ल्यावर प्रवेश होतो. या दाराच्या चौकटीवर उजव्या बाजूला सुंदर उठावदार कमळ कोरलेलं दिसतं. डाव्या बाजूचं कमळ ढासळलेलं दिसतं. चौकटीवरील बांधकामात 'चऱ्यां' ठेवलेल्या दिसतात.

बालेकिल्ल्याच्या कातळात कोरलेली टाकी आणि लेणं 
बालेकिल्ल्याच्या कातळात कोरलेली टाकी आणि लेणं (Tikona Fort) 

                       दरवाजा ओलांडून वर आल्यास समोर बालेकिल्ल्याच्या तटबंदीत प्रशस्त बुरुजाची माची दिसते. बालेकिल्ल्याच्या दरवाजा जवळच उजवीकडे १८० अंशात मागे वळून कातळ सुळक्याच्या काठावरून जाणाऱ्या कोरीव पायऱ्या दिसतात. या बालेकिल्ल्याच्या मुख्य कातळ सुळक्यात कोरलेल्या पाण्याच्या टाकीपर्यंत पोहोचतात. ही टाकी प्रशस्त मोठी असून टाकीच्या बाजूला लेण्यासारखी गुहा कोरलेली दिसते. बालेकिल्ल्याच्या सुरुवातीच्या पायऱ्या चढताना दिसणारी उजवीकडील टाकी आणि ही टाकी एकमेकींच्या बरोबर वर खाली कमीत कमी जागेत अगदी कल्पकतेनं घडवलेल्या दिसतात.

माचीवरून बालेकिल्ल्यावर जाणाऱ्या पायऱ्या (Tikona Fort)


पायऱ्या आणि डावीकडे खोल दरी - Tikona Fort
श्री वितंडेश्वर मंदिर आणि भूमिगत पाण्याच्या टाक्या (Tikona Fort)

                       या माचीवरून आडबाजूला उजवीकडे मुख्य बालेकिल्ल्यावर वळून जाणाऱ्या दगडात बांधलेल्या पायऱ्या दिसतात. डावीकडे खोल दरी दिसते. पायऱ्या चढून वर आल्यास उजवीकडे पुरातन 'श्री वितंडेश्वर' महादेव मंदिर दिसतं. मंदिराखाली पाण्याची मोठी खांब टाकी दिसते. या खांब टाकीवर अनोख्या पद्धतीनं हे मंदिर उभारलेले दिसतं. खांब टाकीच्या डाव्या बाजूला आणखी दोन भूमिगत टाक्या कातळात खोदलेल्या दिसतात. मंदिरासमोर टाकींच्या पुढे शिवपिंडी आणि भग्न नंदी दिसतो. तर टाकीवरील मंदिराच्या दारासमोर दुसरा सुस्थितीतला सध्या बसवलेला नंदी दिसतो. मंदिर जुनं असलं तरी छतावर सध्या स्लॅब घातलेलं दिसतं.

              आत मंदिरात सुरेख मोठी शिवपिंडी स्थापित असून, पिंडीभोवतीही दगडी 'अंकन' दिसतं. पिंडीवर पितळेच्या पाच फण्यांच्या नागदेवतेनं सावली धरली आहे.

खांब टाकीवरील श्री वितंडेश्वर मंदिर (Tikona Fort)
श्री वितंडेश्वर महादेव  (Tikona Fort)

 

                  वितंडेश्वर मंदिराच्या मागे बालेकिल्ल्याची सर्वोच्च टेकडी दिसते. टेकडीवर जाण्यासाठी मंदिराला उजवा वळसा मारून उत्तरेकडे गेल्यास समोर ध्वजकाठीचा बुरुज दिसतो. बुरुजावर फडकणारा मोठा भगवा लक्ष वेधून घेतो. या बुरुजाजवळून बालेकिल्ल्याच्या माथ्यावर चढणारी वाट दिसते. किल्ल्याच्या हा सर्वोच्च माथा आकारानं लहान असून त्यावर उध्वस्त बांधकामाचे जोते दिसतात.
बालेकिल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावरील उध्वस्त जोते (Tikona Fort)

तिकोना बालेकिल्ला - ध्वजकाठी बुरुज  (Tikona Fort)

ध्वजकाठी बुरुज, पुढे पवना धरण आणि मावळ परिसर   (Tikona Fort)

                  ३८०० फूट उंचीवरील किल्ल्याच्या या सर्वोच्च माथ्यावरून वायव्येला पवनेचा विस्तृत जलाशय दिसतो. जलाशयाच्या मागे वर उगवलेला किल्ले तुंगीचा उत्तुंग टोकदार सुळका , तुंगच्या मागे डावीकडे किल्ले मोरगिरी, बाजूला किल्ले लोहगड, लोहगडचा विंचू कडा, त्याच्याच बाजूला उत्तरेला किल्ले विसापूर, भातराशीचा डोंगर आणि आजूबाजूची पर्वत शिखरे एका नजरेत येतात. ईशान्येला माळवंडी जलाशय आणि संपूर्ण मावळ परिसरावर लक्ष ठेवता येतं. तर दक्षिणेला सह्याद्रीतील मांडवीचा अजस्त्र डोंगर आणि डोंगराच्या उजवीकडे 'हडशी' तलाव दिसतो. हा गडमाथा कलावंतीण शिखराची आठवण करून देतो.

बालेकिल्ल्यावरून दिसणारा हडशी तलाव (Tikona Fort)

                       बुरुजाजवळून बालेकिल्ल्याच्या टेकडीला पुन्हा डावा वळसा मारून पुढे आल्यास समोर किल्ल्याच्या सर्वोच्च उंचीवरील बुरुज दिसतो. या बुरुजावर डावीकडे कातळात खोदलेला एक प्रशस्त पाण्याचा तलाव दिसतो. तलावात उतरण्यासाठी दगडी पायऱ्या दिसतात. फेब्रुवारी शेवटच्या आठवड्यातही या तलावातील पाण्याची पातळी बऱ्यापैकी दिसते. 

                        श्री सुजित मोहोळ सध्या तिकोनाचे गडपाल आहेत. इथे येण्यापूर्वी 'बेडसे' लेण्यांत असतानाच आम्ही मोबाइलद्वारे त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. पण बेडसे डोंगरावर लेण्यांच्या चर्चेत आणि पुढील प्रवासात वेळ गेला. त्या संध्याकाळी तिकोनावर दुसऱ्या दिवशीच्या महाशिवरात्री निमित्त श्री वितंडेश्र्वर महादेव मंदिरातून प्रज्वलित ज्योती आजूबाजूच्या गावात जायच्या असल्यानं, पायथ्याला तिकोनाचे गडपाल म्हणून त्यांच्यावर जबाबदारी  होती. आमची वाट बघून ते गडपायथ्याला थांबले होते. आम्ही दिलगिरी व्यक्त करून त्यांचा अधिक वेळ घेतला नाही. त्यांनी तिकोना पायथ्याला त्यांच्या 'तिकोना हॉलिडे होम आणि कॅम्पिंग' येथे रात्री मुक्काम करण्यास आम्हाला आमंत्रण दिलं. दुसऱ्या दिवशी सकाळी 'किल्ले तुंगी' नियोजित असल्यानं आम्ही त्यांना नम्र नकार दिला. शक्य तितकं पवनेला वळसा मारून पलिकडील किल्ले तुंगी जवळ करायचा होता.


सर्वोच्च माथ्यावरून दिसणारे वितंडेश्वर मंदिर आणि समोर मांडवी डोंगर (Tikona Fort)
बालेकिल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावरून दिसणारे किल्ले आणि पवनमाळ (Tikona Fort)
                      मुंबई, ठाणे शहरांपासून सरासरी सव्वाशे किमी आणि पुण्यातून ६० किमी वर सह्याद्रीच्या लोणावळा डोंगर रांगेतील लोणावळ्याच्या अग्नेयेस असणारा हा किल्ला ट्रेकर्सना नेहमीच भुरळ घालतो.

                        तिकोना'चा फारसा इतिहास सापडत नाही. हा किल्ला आजूबाजूला कोरलेल्या लेण्यांच्या कालखंडावरून इसवीसन पूर्व पहिल्या शतकानंतर कधीतरी लेणी आणि दुर्गम व्यापारी घाट रस्त्यांच्या रक्षणासाठीच निर्माण केला असावा. 

                        १४८३ साली निजामशाहीचा सरदार मलिक अहमद यानं जुन्नरची प्राचीन बाजारपेठ काबीज करून तिकोना जवळील लोहगड ताब्यात घेतला. पुढे १४८५ साली त्यानं तुंग आणि तिकोना किल्लेही निजामशाहीत आणले. त्यानंतर १६५७ साली छत्रपतींनी बराच कोकण प्रांत जिंकून तिकोना स्वराज्यात आणला आणि त्याचं 'वितंडगड' असं नामकरण केलं. १६६० साली हा किल्ला आणि परिसराच्या संरक्षणाची जबाबदारी सरनोबत नेतोजींवर सोपवली होती.

बालेकिल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावरील बुरुज, समोर मांडवी डोंगर आणि पावनमाळ (Tikona Fort)

बालेकिल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावरील तलाव (Tikona Fort)

                        जून १६६५ च्या पुरंदर तहात तिकोना मुघलांना देण्यात आला. १६७० साली शिवरायांनी तिकोना पुन्हा स्वराज्यात आणला. १६८२ साली संभाजी राजे आणि औरंगजेब पुत्र अकबरची तिकोनावर ऐतिहासिक भेट झाली होती.

                         १८१८ साली तिकोना इंग्रज कर्नल प्रॉथरच्या ताब्यात गेला आणि तिकोनाची वाताहत झाली.

बालेकिल्ल्याच्या दमवणाऱ्या धोकादायक कोरीव पायऱ्या - किल्ले तिकोना (Tikona Fort)









मांडवी डोंगर आणि हडशी तलाव - किल्ले तिकोना (Tikona Fort)

                  'शिवदुर्ग संवर्धन' ही संस्था गेली पंधरा वर्षांपासून आणि अलीकडील सहा सात वर्षांपासून 'गडभटकंती संस्था' लोक वर्गणीतून उध्वस्त तिकोनाच्या दुरुस्तीचा प्रयत्न करताना दिसतात.
                         आज शिल्लक राहिलेल्या बालेकिल्ल्याच्या घडीव दगडी चौकटी, त्याचे अवघड जागचे आकाशाला भिडणारे बुरुज, बालेकिल्ल्याच्या कोरीव उभ्या पायऱ्या, तिथली कोरलेली खांब लेणी आणि त्याखाली पाण्याच्या टाक्या तसेच खांब टाकीवरील वितंडेश्वर मंदिर हे बऱ्यापैकी आहेत. त्यावेळच्या साम्राज्यांनी व्यापारी घाट वाटांच्या सुरक्षेबरोबर, किल्ल्यांच्या सुरक्षेचाही दीर्घ विचार केलेला दिसतो. त्या दृष्टीनं केलेल्या या गिरिदुर्गाच्या स्थापत्य शास्त्राबरोबरच त्यांच्या अजोड कल्पकतेचीही खात्री पटते..
                                                      
                                                     || श्री कृष्णार्पणमस्तू ||
येथे - जयवंत जाधव 

15 comments:

  1. खुप सुंदर...

    ReplyDelete
  2. प्रत्येक गोष्टीचे बारकाईनं वर्णन...लेखन शैलीही उत्कृष्ट...खूप छान.

    ReplyDelete
  3. Lakshvedhi pravasachya hardik subhechha. Sundar lekhani.

    ReplyDelete
  4. Nice information.good photography 👍🙏

    ReplyDelete
  5. गडकोट भ्रमंती खुप छान... आजच्या समाजाला अशी चांगली माहिती देऊन जागृत करणे खुप गरजेचे आहे.

    ReplyDelete
  6. Vishwas Bavdekar17 March 2023 at 21:34

    Very informative in less words. Superb photography.
    तो घाणा चुन्याचा आहे हे कशावरून कळले. Best wishes for your future treks.

    ReplyDelete
    Replies
    1. हा घाणा जवळ जवळ सर्व गडांवर, गड बांधनिसाठी असतोच असतो. त्यात चुनखडी, गूळ, मेथी बिया आणि वाळूचं मिश्रण घाण्याला बैल जोडून पूर्वी मळलं जायचं.

      Delete
  7. उत्कृष्ट माहिती

    ReplyDelete
  8. हेमा तुमच कौतुक करते. हा किल्ला खूप वर्षापूर्वी पहिला गेले होता. इतक्या गोष्टी बघता येतात ते विसरलो. Blog खूप छान माहिती मिळाली. फोटो तर खूप छानच. मस्त 👌👌

    ReplyDelete
  9. बारीसारीक माहिती छान. कॉमेंट मध्ये चुन्याच्या घाण्याची माहिती मस्त नवीन कळली. फोटो superb शुभेच्छा..👏💐

    ReplyDelete
  10. खूपच छान माहिती. घर बसल्या गड फिरून आल्याचा आनंद मिळाला.

    ReplyDelete
  11. मस्त लिहितोस असाच लिहीत रहा

    ReplyDelete

ऑफबीट - खरोसा लेणी, निलंगा, जि. लातूर Offbeat - Ancient Kharosa caves, Dist. Latur, Maharashtra.

                        महाराष्ट्रात वैशिष्ट्यपूर्ण अशी बरीच लेणी आहेत. काहींची प्रसिद्धी तर जगभर पोहोचली आहे. त्यांची कोरीव कलाकुसर आजही थक...