कुलस्वामिनी 'श्री तुळजाभवानी'. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठातील हे आद्यपीठ. श्रीभवानी ज्या डोंगरावर वसली आहे त्या बालाघाट डोंगराचे जूने नाव 'यमुनाचल' (यमन गुड्डू - यमाईचा डोंगर) आहे. याचा कर्नाटक (कन्नड) संस्कृतीशी संबंध येतो. महाराष्ट्रातील श्रीक्षेत्र तुळजापूर हे आज आंध्र, कर्नाटकाच्या सीमेजवळ असले तरी पूर्वकाळी दक्षिण क्षेत्राशी याचा जवळचा संबंध दिसून येतो. कर्नाटकातील सेन, कर्नाट आणि कदंब ही राजकुळे भवानीची उपासना करत. त्यापैकी सेन आणि कर्नाट या कुळांनी तिचा महिमा बंगाल, मिथिला, हिमाचल आणि नेपाळ असा सर्वदूर पोहोचविला.
सतराव्या शतकात भवानीचे उरी, शिरी आणि आपल्या अंतःकरणात 'हार्द' धारण करणारे शिवछत्रपती आपल्या स्वराज्य निर्मितीचा संकल्प, ते निर्माण करण्याचे सामर्थ्य, स्वराज्य विस्तार आणि त्याच्या रक्षणासाठी जे दैवी अधिष्ठान हवे ते भवानीचेच आहे, असे मनोमन मानत. त्यांच्यामुळे श्रीभवानी आत्मस्वातंत्र्याबरोबरच राजकीय स्वातंत्र्याचीही प्रेरणा ठरली. आणि पुढे भारतीय स्वातंत्र्यात ती 'वंदे मातरम' आणि 'भगवती' होऊन अवतरली. युगायुगांच्या अनिष्ठांचा, अमंगलाचा महिषासुर नष्ट करण्याची प्रेरक शक्ती ठरली.
![]() |
| श्री तुळजाभवानी मंदिर भुईकोट, श्रीक्षेत्र तुळजापूर, जि. धाराशिव. Shri Tuljabhavani Temple, Tuljapur, Dist. Dharashiv. |
![]() |
| '१०८, भक्तनिवास तुळजापूर'. श्रीक्षेत्र तुळजापूर, जि. धाराशिव. Shri Tuljabhavani Temple, Tuljapur, Dist. Dharashiv. |
महिषासुराच्या धडाच्या उजवीकडे भवानीचे वाहन 'सिंह' आहे. त्याखाली भागी 'मार्कंडेय' ऋषी आहेत. डावीकडे भवानीने तारलेली शीर्षासनात तपोमग्न सती 'अनुभूती' आहे. देवीच्या मूर्तीवर चक्राकार कुंडले, केयूर, अंगद, काकणे, कंठा, माळा, मेखला आणि साखळ्या कोरल्या आहेत.
![]() |
| जगदंबा 'श्री तुळजाभवानी'. Shri Tuljabhavani |
![]() |
| जगदंबा 'श्री तुळजाभवानी'. Shri Tuljabhavani |
मंदिरात गर्भगृह, गुढमंडप आणि पुढे सोळाखांबी बांधलेला विस्तीर्ण सभामंडप दिसतो. मंदिराला आधार देणाऱ्या कोरीव कातळ खांबावर आणि मंदिरातील फरसबंदीवर लहान लहान 'खळगे' कोरलेले दिसतात. मंदिरात प्रवेश करतानाही असे असंख्य खळगे बऱ्याच पायऱ्यांवर दिसतात. नवस सांगण्यासाठी आणि फेडण्यासाठी येणारे भक्तजन पूर्वी या खळग्यात नाणी ठोकून बसवत. कधीकाळी या खळग्यात सोन्या चांदीची नाणीही ठोकून बसविली जात असत असे इथले पुजारी सांगतात. आता काही भक्तजन या खळग्यात श्रद्धेने नाणी चिटकविताना दिसतात.
![]() |
| 'गुढमंडप', श्री तुळजाभवानी मंदिर. Shri Tuljabhavani Temple |
![]() |
| 'सभामंडप', श्री तुळजाभवानी मंदिर. |
![]() |
| श्री तुळजाभवानी मंदिर गोपुर, श्रीक्षेत्र तुळजापूर, जि. धाराशिव. Shri Tuljabhavani Temple, Tuljapur, Dist. Dharashiv. |
![]() |
| 'राजे शहाजी महाद्वार' भवानी मंदिर, श्रीक्षेत्र तुळजापूर, जि. धाराशिव. Shri Tuljabhavani Temple, Dist. Dharashiv. |
![]() |
| मंदिराच्या आतून दिसणारे उजवीकडे 'राजे शहाजी महाद्वार' आणि डावीकडे 'राजमाता जिजाऊ महाद्वार'. श्रीक्षेत्र तुळजापूर. |
या कल्लोळ तीर्थाची महती आरत्या, भुपाळ्या, स्तोत्रांतून आणि भक्ती रचनातून गायलेली दिसते.
![]() |
| राजे शहाजी महाद्वारातुन - 'कल्लोळतीर्थ' श्रीक्षेत्र तुळजापूर, जि. धाराशिव. Shri Tuljabhavani Temple. |
![]() |
| 'कल्लोळतीर्थ'. श्री तुळजाभवानी मंदिर. श्रीक्षेत्र तुळजापूर, जि. धाराशिव. Shri Tuljabhavani Temple. |
![]() |
| डावीकडे 'गोमुख तीर्थ' आणि उजवीकडे 'कल्लोळ तीर्था'कडे जाणाऱ्या पायऱ्या. श्रीक्षेत्र तुळजापूर, जि. धाराशिव. |
![]() |
| गोमुख तिर्थासमोरील 'शिवपिंडी'. |
![]() |
| 'गोमुख तीर्थ'. श्री तुळजाभवानी मंदिर. श्रीक्षेत्र तुळजापूर. |
पुढे मंदिरात प्रवेश करताना समोर अतिशय सुबक, कातळात घडविलेला 'सरदार निंबाळकर दरवाजा' दिसतो. तुळजाभवानीचे हे देवस्थान प्राचीन असले तरी मंदिराचे बांधकाम शिवकालीन आणि उत्तर काळातील दिसते. पूर्वी हे क्षेत्र हैदराबाद निजामाच्या राज्यात होते. निजामाचे त्यावेळचे मराठा सरदार करमाळ्याचे 'निंबाळकर' यांनी आपल्या या कुलस्वामिनीच्या मंदिर बांधणीत मोठे योगदान दिले. त्यांच्या नावाचे हे भव्य प्रवेशद्वार आज मंदिराच्या प्राकारात प्रवेश करताना दिसते.
![]() |
| 'सरदार निंबाळकर दरवाजा'. भवानी मंदिर, श्रीक्षेत्र तुळजापूर, जि. धाराशिव. Shri Tuljabhavani Temple, Dist. Dharashiv. |
![]() |
| 'सरदार निंबाळकर दरवाजा'. (आतून) भवानी मंदिर, श्रीक्षेत्र तुळजापूर, जि. धाराशिव. Shri Tuljabhavani Temple, Dist. Dharashiv. |
![]() |
| 'सरदार निंबाळकर दरवाजा'. भवानी मंदिर, श्रीक्षेत्र तुळजापूर, जि. धाराशिव. Shri Tuljabhavani Temple, Dist. Dharashiv. |
या दरवाज्याच्या डाव्या बाजूस उजव्या सोंडेचा जागृत गणपती आहे. तर दरवाजाच्या उजव्या बाजूस आदिमाया, आदिशक्ती 'मातंगी'चे ठाणे आहे. मूळ दुर्गेच्या रूपात दिसणाऱ्या या महाराष्ट्राच्या अधिष्ठात्रीने प्रथम दर्शनाचा मान 'मातंगी'ला दिला आहे. त्यामुळे समाजातील अठरापगड जाती तिने एकत्र आणल्या. मातंगी, यमाई, यल्लमा, रेणुका ही एकाच प्राचीन मातृदेवतेची नावे आहेत. यमाई नावातील 'यम्म' (महिष) या शब्दामुळे आई तुळजाभवानीचे महिषमर्दिनीत सहज रूपांतर घडलेले दिसते.
![]() |
| आदिमाया, आदिशक्ती 'श्री मातंगी' माता. भवानी मंदिर, श्रीक्षेत्र तुळजापूर, जि. धाराशिव. |
![]() |
| आदिमाया, आदिशक्ती 'श्री मातंगी' माता. |
![]() |
| आदिमाया, आदिशक्ती 'श्री मातंगी' माता. |
निंबाळकर दरवाजा उतरून डाव्या बाजूने आई भवानीच्या दर्शनाला जाण्यास रस्ता आहे. तर समोर मंदिराचा 'यज्ञ मंडप' दिसतो. यज्ञ मंडपात तेरात्रिकाळ अग्नी प्रज्वलित दिसतो. या यज्ञ मंडपाच्या बाजूला आणखी एक उंच गोपूर दिसतो. मंदिरा सभोवती तटबंदी असून मंदिराच्या मागे पश्चिमेला 'श्री छत्रपती शिवाजी राजद्वार' हा तिसरा उत्तुंग आणि सुंदर कातळ कोरीव दरवाजा आहे. या पश्चिमेकडील दरवाजातून पायऱ्या उतरून मागील बाजूने मंदिरा बाहेर पडता येते. मंदिराच्या तटबंदीत ठिकठिकाणी बुरुजही स्पष्ट दिसतात.
![]() |
| 'यज्ञ मंडप' श्रीतुळजाभवानी मंदिर. श्रीक्षेत्र तुळजापूर. |
![]() |
| पश्चिमेकडील मंदिराची तटबंदी. श्रीतुळजाभवानी मंदिर. |
थोडक्यात सकल जगताची जननी आणि पराक्रमी भोसले राजकुळाची कुलस्वामिनी तिला शोभेल अशाच 'भुईकोटा'त वसली आहे.
कोटातील या मंदिर प्राकाराला आतून अनेक 'ओवऱ्या' आणि त्यात परिवार देवता आहेत.
![]() |
| मंदिराच्या पश्चिमेचे 'श्री छत्रपती शिवाजी राजद्वार'. श्रीतुळजाभवानी मंदिर. श्रीक्षेत्र तुळजापूर. |
![]() |
| मंदिराच्या मागे दिसणारे पश्चिमेचे 'श्री छत्रपती शिवाजी राजद्वार'. |
मंदिराच्या प्राकारात यज्ञ मंडपाच्या पलीकडे आणि भवानी मंदिरासमोर मोठ्या लिंबाच्या झाडाखाली चौथरा आहे. या झाडाच्या सावलीत चौथर्यावर येणारे भक्तगण आणि कुटुंबीय भवानीचा 'गोंधळविधी' करताना दिसतात.
उजव्या बाजूला ओवऱ्यांमध्ये भवानीला नेसवलेली वस्त्रे दिसतात. ठराविक रक्कम देणगी दिली असता ती वस्त्रे प्रसाद म्हणून देतात.
![]() |
| भवानीचा 'गोंधळविधी' करण्याचे ठिकाण. श्री तुळजाभवानी मंदिर, श्रीक्षेत्र तुळजापूर, जि. धाराशिव. Shri Tuljabhavani Temple, Dist. Dharashiv. |
![]() |
| प्रसादस्वरूप भवानीला नेसवलेली वस्त्रे. श्री तुळजाभवानी मंदिर, श्रीक्षेत्र तुळजापूर, जि. धाराशिव. Shri Tuljabhavani Temple, Dist. Dharashiv. |
![]() |
| श्री तुळजाभवानी मंदिर. |
महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक या प्रदेशांच्या सीमेवरच तुळजापूर क्षेत्र असल्यामुळे भवानी विषयीचा समान भक्तीभाव या तीनही प्रदेशातील भक्तांच्या मनात दिसतो. भवानी मंदिराच्या पायऱ्या चढता - उतरताना मराठी भक्तांबरोबरच तेलगू, कन्नड भक्तांचेही नामलेख त्यांच्या लिप्यांमधून कोरलेले दिसतात. दर्शन, पूजन, नवस फेडीसाठी करायची विधीविधाने हे सारे मराठी भाविकांप्रमाणेच तेलुगु, कन्नड भाविकही तितक्याच तन्मयतेने करताना दिसतात. भवानी चरणी आपल्या भक्तीभावनेचे अर्ध्य अर्पण करण्यासाठी ते तुळजापुरात येतात.
![]() |
| भक्तांचे 'नामलेख'. श्री तुळजाभवानी मंदिर. |
नवी झेप, नवे विक्रम आणि नव्या दिशा चोखाळण्यासाठी भक्तांनी आधी विश्राम घ्यावा असे ही आदिशक्ती सुचित करताना दिसते.
![]() |
| दसरा पालखी मिरवणूक. साळगांव, ता. आजरा, जि. कोल्हापूर. |
![]() |
| दसरा पालखी मिरवणूक. साळगांव, ता. आजरा, जि. कोल्हापूर. |
दसऱ्यात तुळजापूर मंदिरात भवानीच्या शिमोल्लंघनाची तयारी नवमीच्या मध्यरात्रीपासून करतात. भवानीला पंचामृत स्नान घालून मूर्ती सिंहासनावरून पालखीत ठेवण्यापूर्वी एक लांबच लांब वस्त्र पीळ देऊन मूर्तीभोवती गुंडाळतात. याला 'साखळी करणे' किंवा 'दिंड करणे' म्हणतात. बहुदा ते मूर्तीच्या सुरक्षिततेसाठी असावे. पालखी मंदिराबाहेर शमीच्या पारावर आणतात आणि मूर्ती नवीन पालखीत ठेवतात.
ही नवीन पालखी आणि सोबत भवानीचा नवा पलंग अहमदनगरचे 'जनकोजी देवकर' या तेली भक्ताकडून तुळजापुरात दरवर्षी येत असतात. आता ही परंपरा त्यांचे वंशज निष्ठेने सांभाळत आले आहेत. आदल्या दिवशीच तुळजापूरच्या सीमेवर येऊन थांबलेल्या नगरच्या या भक्तमंडळींना नवमीच्या मध्यरात्री समारंभपूर्वक, वाद्यांच्या गजरात मंदिरात आणतात. मंदिर प्रकारात त्यावेळी पालखीजवळ मंदिर व्यवस्थापनाचे मातबर अधिकारी, मानकरी, सेवेकरी, पुजारी, मठाधीश, आराधी, भुत्ये, गोंधळी उपस्थित राहतात. शमीच्या पारावर ठेवलेल्या नवीन पालखीत पुजारी त्या अष्टभुजा महिषमर्दिनीला ठेवतात आणि असंख्य भाविकांच्या मुखातून जगदंबेचा 'उदोकार' घुमवत, वाद्यांच्या घोषात मंदिर प्राकारातील दक्षिण मार्गाने (मंदिराबाहेर न पडता) कुंकवाच्या सड्यावरून भवानीचे शिमोल्लंघन घडते. मिरवणूक पुन्हा पारावर आल्यावर या सोहळ्याची सांगता होते. यानंतर भवानी नव्या पलंगावर शयन करते. जुना पलंग दसऱ्याच्या होमात विसर्जित केला जातो. मूर्ती नव्या पालखीत ठेवल्यानंतर मानकरी घराण्यातील एक व्यक्ती आपल्या करंगळीला शस्त्राने जखम करून रक्ताचा टिळा भवानीच्या मस्तकी लावते. दसऱ्याच्या या मिरवणुकीत हजारो भाविक सामील होताना दिसतात.
भवानीचे शिमोल्लंघन मंदिराच्या प्राकारातच करण्याची प्रथा पूर्वी असुरक्षित राजकीय वातावरणामुळे सुरू झाली. तरीही तुळजापुरचे नागरिक गावाच्या सीमेबाहेर दोन कोसावर असलेल्या शमीवृक्षापर्यंत शिमोल्लंघन करण्यासाठी जातात.
अहमदनगरहून तुळजापूरला येणारा भवानीचा नवा पलंग आणि पालखीयात्रा मार्गात ठराविक ठिकाणी मुक्काम करत येते. तिथे भाविक त्यांचे स्वागत करून दर्शन घेतात. या यात्रेतील मुक्कामाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणजे 'जुन्नर'चा. शिवनेरीच्या पायथ्याचा. हा मुक्काम अधिक काळ घडून जुन्नरमध्ये 'पलंगोत्सव' साजरा व्हावा अशी मुद्दाम व्यवस्था शिवछत्रपतींनी केली होती. आज जुन्नरचे भवानीभक्त ही परंपरा निष्ठेने पाळताना दिसतात.
भवानी मंदिराच्या मागे भिंतीला लागून 'चिंतामणी' दगड प्रसिद्ध आहे. त्याला 'सुकनावती' असेही म्हटले जाते. येणारे भाविक इथे गर्दी करताना दिसतात. या दगडावर दहा रुपयाचे नाणे ठेवून मनातील इच्छा किंवा चिंता मनोमन व्यक्त करत, दोन्ही हात दगडावर स्थिर ठेवल्यास हा दगड उजवीकडे किंवा डावीकडे सरकतो. विशेषतः संवेदनशील मनाच्या माता भगिनी आपल्या संसारीक अडचणींची इथे चाचपणी करत असाव्यात असे दिसते.
![]() |
| 'सुकनावती'. श्रीक्षेत्र तुळजापूर, धाराशिव, महाराट्र. |
![]() |
| 'सुकनावती'. श्रीक्षेत्र तुळजापूर, धाराशिव, महाराट्र. |
'काठ्या' आणि 'कावडी' हे महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या क्षेत्रातील यात्रांचे खास वैशिष्ट्य आहे. जसे कोल्हापूरला जोतिबाच्या विविध ठिकाणाहून देवस्थानांच्या काठ्या येतात तशा तुळजापुरातही येतात.
तुळजापुरात 'भातंगळी' ता. उमरगा येथील काठी तर साताऱ्याच्या 'शिरवळ'मधून आई अंबेची आणि शिरवळच्या'च भैरवनाथाची काठी चैत्री पौर्णिमेच्या उत्सवासाठी तुळजापुरात येतात.
सोलापूरहून येणाऱ्या दोन काठ्या मात्र नवरात्रौत्सवाच्या सांगतेसाठी म्हणजे अश्विनी पौर्णिमेच्या उत्सवासाठी येतात. सोलापुरातील शुक्रवारपेठेत जे अंबाबाईचे मंदिर आहे त्या मंदिराकडून निघणारी एक आणि याच मंदिराशी संबंधित असलेल्या 'शिवलाड तेली समाजा'च्या संस्थेकडून निघणारी दुसरी काठी.
साताऱ्याहून 'शिरवळ'च्या दोन काठ्या मात्र मुक्काम करत करत आठ दिवसात सुमारे २७५ किमीचे अंतर तोडून तुळजापूरला पोहोचतात आणि ऐन उन्हाळ्यात ही काठीयात्रा अक्षरशः रात्रीचा दिवस करते. काठ्यांचे प्रचंड वजन खांद्यावर पेलीत येणाऱ्या या यात्रिकांच्या निष्ठेला शतशः प्रणाम. या सर्व काठ्या भाविकजन देवतुल्य मानतात. काठ्यांच्या प्रथेमुळे ती ती स्थाने तुळजापूर आणि भवानीशी शतकानूशतके श्रद्धेने जोडली आहेत.
![]() |
| 'कवड्यांची माळ' आणि आईचा जोगवा मागण्यासाठी 'परडी'. श्रीक्षेत्र तुळजापूर, जि. धाराशिव. Shri Tuljabhavani Temple, Dist. Dharashiv. |
![]() |
| तुळजापूरचे वैशिष्ठ्य - 'हिरवी कांकणे' श्रीक्षेत्र तुळजापूर, जि. धाराशिव. |
इतिहासातील संदर्भ शोधले तर महाराष्ट्राचा इतिहास तुळजाभवानीच्या संदर्भात चौदाव्या शतकाच्या मागे जात नाही. परंतु कर्नाटकातील राजघराण्यांतील इतिहासाच्या आधारे तो आकराव्या शतकाच्याही मागे प्राचीन काळात जातो.
नेपाळमधील 'काठमांडू आणि 'भक्तपुर' या दोन शहरात तुळजाभवानीची मंदिरे भाविकांना आकर्षून घेताना बघून आनंद, आश्चर्य आणि अभिमान वाटल्याशिवाय राहत नाही. स्थानिक लोक तिथल्या देवीला 'तलेजु' या नावाने संबोधित करतात. ती मूळची दक्षिणेतील 'तुळजा'भवानीच आहे याची त्यांना जाणीव आहे.
नेपाळच्या काठमांडू येथील तुळजाभवानीचे मंदिर प्रथम 'मिथिले'चा (बिहार) राजा 'हरीसिंहदेव' याने इ.स. १३२४ मध्ये उभारले. त्याआधी त्याचा प्रधान 'चंडेश्वर' याने इ.स. १३१४ मध्ये नेपाळवर स्वारी करून तिथे 'हरीसिंहा'ची सत्ता स्थापित केली. १३२४ ला दिल्लीचा सुलतान 'घियाउद्दीन तुघलक'ने मिथिलेवर (सध्याचे 'बिहार') स्वारी केली. त्यावेळी हरीसिंहाने नेपाळचा आश्रय घेतला आणि त्याने कुलस्वामिनी तुळजाभवानीचे मंदिर प्रथम 'भक्तपुर' येथे उभारले. मिथिलेचा अधिपती हरीसिंह हा 'कर्नाट' वंशाचा होता.
त्याआधीही इ.स. १०९७ मध्ये मिथिलेत आपली सत्ता स्थापित करणारा 'नान्यदेव' हा या 'कर्नाट' वंशातील पहिला राजपुरुष आहे. या काळात दक्षिण आणि पूर्व भारताचे राजनैतिक संबंध दृढ राहिले होते. बंगालच्या 'पाल' राजांच्या पदरी अनेक 'कर्नाट' वंशीय अधिकारी होते. 'नान्यदेव' हाही पालांच्या पदरी असावा. आणि अनुकूल संधी मिळताच तो स्वतंत्र झाला असावा असा इतिहास तज्ञांचा कयास आहे. 'कर्नाट'वंशीय नान्यदेवाचे मूळचे आडनाव 'परमार' होते. तो आपली कुलस्वामिनी 'श्रीतुळजाभवानी'ला नव्या सत्तास्थानातही विसरला नाही. म्हणजेच वर उल्लेख केल्याप्रमाणे तुळजाभवानीचे दक्षिणेतील 'आदिक्षेत्र' हे अकराव्या शतकाच्याही आधीपासून प्रख्यात होते याला आधार मिळतो.
श्री तुळजाभवानीच्या अलौकिक सामर्थ्याच्या कथा ऐकून 'तिबेटी' लोकांनी तिची मूर्ती तिथून चोरून नेण्याचा प्रयत्न केला. पण ते यशस्वी झाले नाहीत. ही हकीकत नेपाळच्या परंपरेत सांगतात.
![]() |
| नेपाळच्या काठमांडू येथील तुळजाभवानीचे 'तलेजु मंदिर'. (Photo courrtesy - Google) |
![]() |
| 'श्री तलेजु' (तुळजाभवानी). काठमांडू, नेपाळ. |
पुढे 'कर्नाट' वंशीयांची सत्ता संपल्यावर मल्ल, गोरखा या पुढच्या राजवंशांनी श्रीतुळजाभवानीचा 'कुलस्वामिनी' म्हणूनच स्वीकार केला. त्यांची भवानी संदर्भात श्रद्धा इतकी घट्ट होती की, दरवर्षी राजपदावरील पुरुष भवानीच्या (देवीस्वरूप कुमारीकेच्या) हातून मस्तकावर 'राजतिलक' लावून घेत. आणि तरच पुढील वर्षभर राजपदावर राहण्याचा त्याला अधिकार मिळत असे. या 'परंपरेचा'चा अर्थ असा निघतो की, 'हे राज्य तिचे आहे. राजा तिचा प्रतिनिधी म्हणूनच तिच्या राज्याचा कारभार पाहतो.' नेपाळमधील या 'तिलकविधी'वरून इथे शिवछत्रपतींची स्वाभाविकपणे आठवण होते.
"राज्य श्रीचे आहे आणि आपण तिचे भोपे (भक्त, पुजारी) आहोत. तिच्यासाठीच आपण प्रतिनिधीच्या रूपात तिच्या राज्याचा भार वाहत आहोत." असे मानणारे शिवाजीराजे नेपाळातील 'तिलकविधी'चा पूर्ववारसा सतराव्या शतकात आईभवानीच्या नावे महाराष्ट्रात चालवीत होते हे सिद्ध होते.
नेपाळ आणि तुळजापुरातील आणखी एक साम्य म्हणजे दोन्हीकडे अश्विनीतला नवरात्र उत्सव दसऱ्यानंतरही पुढे पाच दिवस म्हणजे कोजागिरी पौर्णिमेपर्यंत चालू राहतो. दोन्ही ठिकाणी भवानीदेवीचे क्षेत्रपाल 'भैरवां'चे महत्त्व आहे. नेपाळात कालभैरव - श्वेतभैरव आहेत तर तुळजापुरात काळभैरव - टोळभैरव (बाळभैरव) आहेत.
![]() |
| तुळजापूरचा क्षेत्रपाल 'श्री काळभैरव मंदिर'. श्रीक्षेत्र तुळजापूर, जि. धाराशिव. Shri Tuljabhavani Temple, Dist. Dharashiv. |
![]() |
| तुळजापूरचा क्षेत्रपाल 'श्री काळभैरव आणि बाळभैरव'. श्रीक्षेत्र तुळजापूर, जि. धाराशिव. Shri Tuljabhavani Temple, Dist. Dharashiv. |
इ. स. १०७० पासून १११९ पर्यंत बाजूच्या बंगालमध्ये 'सेन' घराण्याचे राज्य होते. या घराण्याच्या ताम्रपटातून ते 'ब्रह क्षत्रिय', 'कर्नाट क्षत्रिय' असल्याचा उल्लेख आढळतो. या वंशात 'बल्लाळ' नावाचा राजा झाला. 'बल्लाळ' शब्दाला 'पराक्रमी पुरुष' असा कन्नड अर्थ निघतो. 'बल्लाळपूर' नावाचे एक गाव बंगालच्या या भागात होते. पुढे ते 'विक्रमपूर' असे बदलल्याचे कागदपत्रांवरून समजते. नेपाळमधील 'कर्नाट' हरीसिंहदेव आणि हिमाचलात प्रभावी असणाऱ्या 'सेन' या कर्नाटकीय कुळांचा त्यावेळी निकटचा राजकीय संबंध होता.
१९९४ मध्ये 'पिंगुळी'चे श्री ना. बा. रणसिंग आणि श्री मोहन रणसिंग या 'ठाकर' बंधूनी आपल्या जमातीविषयी एक पुस्तक लिहून 'ग्रंथाली'च्या पुढाकाराने प्रकाशित केले. त्यांच्या मते 'भवानीच्या गोंधळाचा उगम 'राजस्थाना'त झाला आणि 'कदम' (की 'कदंब') नावाचे आद्य गोंधळी घराणे राजस्थानातून महाराष्ट्रात आले'.
कदम गोंधळयांनी ठाकर जमातीतील 'मराठे' आडनावाच्या घराण्याकडे हा गोंधळ सोपविला. 'मराठ्यां'नी त्याचे सातत्य राखण्याचा प्रयत्न केला असे रणसिंग बंधू लिहितात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 'कुडाळ' जवळच्या 'पिंगुळी' गावात हे 'मराठे' आडनावाचे 'ठाकर' राहतात. या जमातीतून काही उच्चशिक्षितांना आपल्या जमातीतल्या या अनमोल ठेव्याचे महत्त्व जाणवले आणि त्यांनी भारत आणि भारताबाहेरही त्याचा महिमा गाजवला. 'पिंगुळी' पासून ९ किमीवरील 'हुमरमळा' या गावीही 'मराठे' आडनावाचे गोंधळी घराणे आहे. तेही स्वतःला 'मूळ गोंधळी' समजतात. मालवण तालुक्यातील 'वारड' गावाजवळ 'हडपेवाडी' आहे. या वाडीवरही 'रणशूर' आडनावाचे गोंधळी घराणे आहे.
इतर कुणाला हे गोंधळाचे कौशल्य शिकायचे असल्यास 'मराठे' यांच्याकडून 'टिळा' लावून घ्यावा लागतो. त्यानुसार इतर गोंधळी त्यांचे 'चेले' समजले जातात.
![]() |
| श्री तुळजाभवानी मंदिर, श्रीक्षेत्र तुळजापूर, जि. धाराशिव. |
महाराष्ट्रातील ज्या कुटुंबांची कुलदेवता तुळजाभवानी आहे आणि 'गोंधळ' घालण्याचा परंपरागत कुलाचार आहे, ते यजमान वरील गोंधळ्यांना किंवा 'चेल्यांना' आमंत्रित करतात. काही घराण्यात वार्षिक, द्वैवार्षिक किंवा काही खास कारणास्तव गोंधळ करून घेतात. गोंधळ हा बहुतेक रात्रीचा असतो. धार्मिक विधी म्हणूनच तो केला जातो.
या गोंधळ विधीसाठी गोंधळयांचा चार-पाच जणांचा वृंद (Group) असतो. एक नायक, एक संबळवाला, नायकाचा सहकारी, तुनतुनेवाला आणि टाळवाला. यापैकी नायक आणि संबळ्या (संबळ वाजवणारा) या दोघांची भूमिका महत्त्वाची असते. गोंधळी अंगात झब्बा आणि पायघोळ धोतर किंवा तंग विजार परिधान करतात. डोक्यावर पागोटे किंवा फेटा असतो. फेट्याचा शेमला पाठीवर रुळत असतो. आजकाल टोपीही घालतात. गळ्यात मण्यांच्या आणि कवड्यांच्या माळा धारण केल्या जातात. ज्या गोंधळ्यांना आमंत्रित केले जाते ते येताना सोबत देव्हारा आणतात. देव्हाऱ्यात मूर्ति ऐवजी नारळ, सुपारी, देवाचे तांदळे (गोल दगड), धातूचे टाक हे देव रुपात असतात.
![]() |
| गोंधळविधी - भवानीचा 'मांड'. साळगांव, आजरा, जि. कोल्हापूर. |
ज्या घरात गोंधळ असतो ते घर व खळे (अंगण) सारवून स्वच्छ करतात. खळ्यात मंडप घालून सजावट केली जाते. तुळशीवृंदावनासमोर 'मांड' भरताना घोंगड्याची घडी अंथरतात. त्यावर हिरवा खण, खणावर पाचशेर तांदूळ, तांदळावर नागवेलीची पाने आणि पाच प्रकारची फळे मांडली जातात. मध्यभागी पाणी भरलेला तांब्याचा घट, त्यावर आंब्याची पाने आणि नारळ ठेवतात. घोंगड्याच्या चार कोनांना उसाची चार (किंवा पाच) 'धाटे' उभी करून त्यांच्या आतील बाजूची पाती मध्यभागी बांधतात. हे सगळे सोपस्कार गोंधळी करतात. हा 'मांड' मांडल्यावर गोंधळी यजमानाला बरोबर घेऊन गावात 'मानकरी' असलेल्या पाच घरी जोगवा मागून धान्य आणतात. पाचवे घर हे स्वतः यजमानाचे असते. त्यावेळी त्यांच्या मुखी,
जोगवा दे अंबे, जोगवा दे !
श्री भवानीमातेचे नाव घेता, जोगवा दे !
![]() |
| 'भवानीचा जोगवा'. साळगांव, ता. आजरा, जि. कोल्हापूर. |
जोगवा मागून आल्यानंतर देवीला गाऱ्हाणे घालून बकरा बळी देतात. हा बळी महिषासुरासाठी असतो. प्राण सोडण्यापूर्वी महिषासुराने दुर्गेची प्रार्थना केली की 'मला तुझे सानिध्य दे'. दुर्गेने ते मान्य करून गोंधळविधीत त्याच्यासाठी बकऱ्याचा बळी देण्याची आज्ञा भक्तांना केली. देवीचा हा आदेश गोंधळीविधीत पाळला जातो. विधीत बळी दिलेल्या बकऱ्याचा पुढचा पाय गुडघ्यात तोडून, धडापासून मुंडी वेगळी करतात आणि त्या मुंडीच्या तोंडात एक पाय ठेवून ते मुंडके मांडाच्या बाजूला ताटात ठेवतात.
यानंतर सुरू होते ते नेत्रदीपक, रोमहर्षक दिवटीनृत्य. गोंधळातला 'नायक' मोठा पोत पाजळतो. दिवटीच्या टोकाशी नरसाळ्याच्या आकाराचा खोलगट भाग करून त्यात चिंध्या घालून त्यावर उडदाचे पीठ मळून थापतो. आणि त्यात भरपूर गोडेतेल रिचवून दिवटी पेटवतो. या मोठ्या दिवटीवर आणखी दहा- पंधरा लहान दिवट्या पेटविल्या जातात. त्या 'दिंड्यां'च्या काठीच्या असतात.
अशी तयारी झाल्यावर यजमान आणि त्यांचे पुरुष आत्मीयजन मंडपात येतात. देवीला पुन्हा गाऱ्हाणे घालतात. त्यानंतर नायक संबळाच्या तालावर अनेक देवतांना गोंधळासाठी येण्यास आवाहन करतो..
आरंभ झाला, आरंभ झाला यावे |
गोंधळ मांडीला, गोंधळाला यावे ||
भोळ्या भक्ताच्या गोंधळाला यावे |
भक्ता घरी गोंधळाला यावे ||
अंबाबाई, गोंधळाला यावे |
गोंधळ मांडीला गोंधळाला यावे ||
महालक्ष्मी गोंधळाला यावे ||
गोंधळ्यांच्या या आवाहनानंतर गोंधळात देवता अवतीर्ण होतात अशी सर्व उपस्थितांची श्रद्धा असते. यानंतर तरुण पुरुष पुढे येऊन नायकाच्या मोठ्या दिवटीवर पेटवलेल्या लहान दिवट्या हातात घेतात. आणि मांड व तुळशीवृंदावन यांच्याभोवती फेर धरून 'उदो उदो'चा घोष घुमवीत नाचत राहतात. गोंधळ्यांचे खणखणीत स्वरातले गाणे, संबळीचा दणदणाट आणि भडकणाऱ्या दिवट्यांचा रिंगण धरलेला फेर, या भारलेल्या वातावरणात अनेकांच्या अंगात देवता संचारताना दिसतात.
![]() |
| 'भवानीचा गोंधळ - दिवटी नृत्य'. साळगांव, ता. आजरा, जि. कोल्हापूर. |
![]() |
| 'भवानीचा गोंधळ - दिवटी नृत्य'. साळगांव, ता. आजरा, जि. कोल्हापूर. |
नायकाच्या गीतात त्यातीलच एक दिवट्या म्हणून 'देवीचा परशुराम बाळ' याचाही ओघाने उल्लेख येतो. गोंधळाची देवी महेिषमर्दिनी, 'भवानीचा बाळ' म्हणून 'परशुरामा'चा होणारा हा उल्लेख म्हणजे रेणुका आणि तुळजाभवानी यांच्या एकत्वाची 'भवानी हीच रेणुका' असल्याची खात्री देतो.
जसे मातृभक्त 'परशुराम' हा आई रेणुकेचा पुत्र आणि रेणुकेच्याच नवसातून सिंदखेडच्या जाधवांच्या घरी जन्मलेली राजमाता जिजाऊ. पुढे जिजाऊच्या नवसातून शिवनेरीवर जन्मलेले मातृभक्त 'शिवछत्रपती'. दोघेही उदंड कीर्तीचे. हा काळाचा घटीत योग दिसतो.
दक्षिण भारतातील अभ्यासक डॉ. एम. शेषाद्री यांनी १९६३ मध्ये पेन्सिलवानिया विद्यापीठातील साउथ एशिया सोसायटीत 'महिषमर्दिनी' या विषयावर एक प्रदीर्घ शोधनिबंध सादर केला. ते लिहितात 'संकट काळात अनेक थोर पुरुषांनी तिला (भवानीला) आवाहन केले आहे. १७ व्या शतकात शिवाजीराजांनी तिला हाक दिली. १९ व्या शतकात १८७० मध्ये बंकिमचंद्र चटोपाध्याय यांनी 'वंदे मातरम' हे प्रख्यात गीत रचून दुर्गा भवानीचे जागरण घडविले. आणि १८९० मध्ये अरविंद घोष यांनी 'भवानीमंदिरा'च्या राष्ट्रउभारणी संकल्पनेतून बंगाल आणि उर्वरित भारतातील जनतेच्या अंतकरणात 'सामर्थ्याची जननी' म्हणून तिची प्रतिमा निर्माण केली. त्यांनी राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या आंदोलनामागे तिचे सामर्थ्य उभे केले'.
![]() |
| श्री महालक्ष्मी यात्रा उत्सव, स.न. २००९. साळगांव, ता. आजरा, जि. कोल्हापूर. |
बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांना वंदे मातरम हे गीत स्फूरले ते ७ ऑक्टोबर १८७५ च्या दुर्गोत्सवात. नवरात्रातील अष्टमी ही 'दुर्गाष्टमी' म्हणून देवी उपासनेची अत्यंत पवित्र मानली जाते. दुसऱ्या दिवशी 'महानवमी' किंवा 'अक्षयनवमी'. 'दशमी' हा दुर्गोत्सवाचा शेवटचा दिवस. महाराष्ट्रात हा दिवस 'दसरा' म्हणून साजरा होतो. पूर्व बंगाल, पश्चिम बंगाल आणि ओरिसा या तीन जिल्ह्यांचा समावेश असलेल्या बंगाल प्रांताचे उच्च प्रशासन अधिकारी असलेल्या ऋषीतुल्य बंकिमचंद्रांना जगदंबा दुर्गेचे दर्शन घडले ते अष्टमीच्या दिवशी आणि 'वंदे मातरम' गीत स्फूरले ते महानवमीच्या दिवशी. मातृभूमीच्या मुक्ततेसाठी आसुसलेल्या तिच्या एका प्रतिभाशाली पुत्राला दुर्गोत्सवात मातृभूमीच्या भौगोलिक सौंदर्याच्याही पलीकडील जे विराट रुप दिसले ते 'असुरसंहारिणी दुर्गे'चे..
।। श्री कृष्णार्पणमस्तु ।।
येथे - जयवंत जाधव












































छान...
ReplyDelete🙏🙏
ReplyDeleteखूप छान माहिती मिळवले आहे सुंदर जानकारी दिल्याबद्दल धन्यवाद सर
ReplyDeleteखूप छान! आई तुळजा भवानी माता कि जय.
ReplyDeleteएवढ्या सुंदर माहितीपूर्ण लेखासाठी धन्यवाद!
ReplyDeleteया लेखात श्री तुळजाभवानी देवस्थानाची सविस्तर माहिती आहेच पण त्याचबरोबर अन्य मातृदेवतांचे साधर्म्य, विविध भौगोलिक प्रदेशांतील मातेची स्थाने आणि त्या सर्वांचे ऐतिहासिक संदर्भ याचा मोठा तपशीलवार खजिना आपल्या लेखात आहे.
भविष्यात या सर्वांची विस्तृत माहिती संकलन करून पुस्तक प्रकाशित करावे ही विनंती आणि त्याकरिता शुभेच्छा!
धन्यवाद श्री ओजाळे साहेब..🙏
Deleteइत्यंभूत माहिती मिळाली, अनेकदा जाऊनही वास्तूची नव्याने ओळख झाली. सोप्या भाषेत केलेले स्थान वर्णन.
ReplyDeleteखूप सुंदर माहीती.....🙏
ReplyDeleteआमची ही कुलस्वामिनी आहे. भवानीचा गोंधळ चा इतिहास अगदी मस्त. मंदिराचा इतिहास ओघवता सुंदर मांडला आहे. इतर देवस्थानची माहिती, परंपरा सर्व माहित नसलेले details छान दिले आहे. 👌
ReplyDeleteतुझे सगळे लेख, छंद छान आहे. भटकताना काळजी घ्या तुमच्या सर्व फॅमिलीला शुभेच्छा. भवानीचा उदो 🙏💐
Khup chaan ani sampoorna mahiti. Very nice. Thank you so much. 💓
ReplyDelete