Friday, 30 January 2026

'किल्ले कर्नाळा' - ता. पनवेल जि. रायगड, महाराष्ट्र. 'Karnala Fort', Panvel, Dist. Raigad, Maharashtra.

                       रोजच्या धावपळीतून थोडी मोकळीक मिळाली की, दूर निवांत निसर्गाच्या सानिध्यात जाण्यास सर्वजण उत्सुक असतात. पण सर्वांनाच हा योग जुळतो असे नाही. याबाबत मुंबई ठाण्यापासून जवळच रायगड जिल्ह्यातील पनवेलबद्दल सांगायचे तर, पनवेल हे घाटमाथ्यावरून बोरघाट (लोणावळा) उतरून मुंबईकडे आणि तळकोकणातून गोवा महामार्गावरून मुंबईत प्रवेश करण्याचे दक्षिणेचे मुख्य प्रवेशद्वार. देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या उंबरठ्यावर आणि भौगोलिक दृष्ट्या सह्याद्रीच्या धारेतील माथेरान, कर्जत, लोणावळा अशा निसर्गरम्य डोंगररांगेंच्या जवळचे ठिकाण. 

                        माथेरान रांगेतील विकटगड, चंदेरी, सोंडाई, कर्नाळा, ईर्शाळ, प्रबळगड, कलावंतीण तर कर्जत डोंगररांगेतील कोथळीगड, भिवगड, ढाकबहिरी तसेच माणिकगड, सांकशी असे अनेक गिरीदुर्ग पनवेलच्या अगदी जवळच म्हणता येतील. चढाईच्या श्रेणीत यातील काही मध्यम, काही अवघड तर काही धडकी भरवणारे अत्यंत अवघड आणि प्रसंगी जीवावर बेतणारे असेही आहेत. यातील चंदेरी, ढाकबहिरी वगळता इतर सर्व गिरीदुर्गांची चढाई आजपर्यंत पत्नी आणि मुलांसमवेत केली. त्यांचे भन्नाट अनुभव लिहिण्याचा योगही त्या त्या वेळी आला. त्या आठवणी नक्कीच विसरता येणार नाहीत. विशेष म्हणजे यातील काही गिरीदुर्ग हे अगदी पनवेल रेल्वे स्टेशनवरूनही दिसतात. आणि हे सर्वच येणाऱ्या डोंगरभटक्यांना चढाईचे आव्हान देतात. 

                    त्यापैकी 'किल्ले कर्नाळा' हा पनवेल तालुक्याच्या दक्षिणेला १५ किमीवर, माथेरान डोंगररांगेच्या निसर्गरम्य गर्द झाडीत आणि पर्यटनाच्या बाबतीत अग्रगण्य असा गिरिदुर्ग म्हणता येईल. पनवेल सोडल्यास 'पळस्पे' फाट्यावर उजवा वळसा घेऊन मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून 'पेण'ला जाताना आजूबाजूचे राखीव आणि संवर्धित अभयारण्य पर्यटकांना चांगलेच परिचित आहे. या जंगलाच्या मध्यावर डावीकडे डोंगरावर हा विशिष्ट आकाराचा सुळका लक्ष वेधून घेतो. इतिहासाच्या प्राचीन आठवणी सांभाळत समुद्र सपाटीपासून २५०० फूट उंच आणि त्यावर त्याचा अंदाजे १८० फुट उंच अंगठ्याच्या आकाराचा कातळ सुळका (Thumbs Up) एखाद्या स्थितप्रज्ञासारखा उभा आहे. 

                  बरेच पर्यटक इथून जाता येताना आजूबाजूच्या ढाब्यावर चहापाण्यासाठी थांबतात. घाईत असल्यामुळे त्यांना या ठिकाणास भेट देता येत नाही. पण इथे येणाऱ्या पर्यटकांसाठी 'पेण'कडे जाणा-येणाऱ्या एसटी बससाठी विनंती थांबाही आहे. मुंबई ठाण्यापासून जवळच आणि किल्ल्यास अभयारण्याची जोड मिळाल्याने बऱ्याच शैक्षणिक सहली निसर्ग अभ्यासा सोबत इतिहासाची ओळख करून घेण्याच्या निमित्ताने इथे येताना दिसतात. स्वतःचे वाहन असल्यास पनवेलहून अवघ्या अर्ध्या तासात हे ठिकाण गाठता येते. आमच्या राहत्या पनवेल तालुक्यातच हा असल्याने आजपर्यंत बऱ्याच वेळा आमची या गिरीदुर्गास भेट झाली आहे. त्यानेच आम्हाला डोंगरी किल्ले आणि भटकंतीचं बाळकडू दिलं असं आम्ही मानतो.

'किल्ले कर्नाळा' - 'लिंगोबाचा डोंगर' सुळका, किल्ले कर्नाळा, ता. पनवेल, रायगड, महाराष्ट्र. Karnala Fort Pinnacle, Karnala Fort, Raigad, Maharashtra.

                      जानेवारी २०२६ ला मुंबईच्या एल्फिस्टनला राहणारा मित्र विजय केळकर सोबत पुन्हा एकदा किल्ले कर्नाळ्यास भेट दिली. पनवेलहून किल्ल्याच्या अलीकडे ५ कीमी पायथ्याच्या 'शिरढोण' गावापासूनच या जंगलाची सुरुवात होते. त्यापुढे गर्द झाडांमधून जाणाऱ्या रस्त्यावर लाल, काळ्या तोंडाची माकडे आणि वानरांचा वावर दिसू लागतो. महामार्गावर जंगलाच्या मध्यावर डावीकडे 'कर्नाळा पक्षी अभयारण्याची कमान दिसते. अभयारण्यास भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी इथे रु.६० आणि मुलांसाठी ३० रु. प्रवेश शुल्क, तर त्यांच्या वाहनांसाठी वेगळे पार्किंग शुल्क आकारले जाते. किल्ल्यावर जाणाऱ्या पर्यटकांनी सोबत आणलेल्या प्लास्टिक पाण्याच्या बाटल्यांसाठी गेटजवळ प्रत्येक बाटलीमागे २० रुपये ठेव (Deposit) घेतले जाते. परत येताना त्या रिकाम्या बाटल्या दाखवल्यास घेतलेली रक्कम परत दिली जाते.

                       १२ चौरस किमी पेक्षाही जास्त विस्तारलेल्या या अभयारण्यात जवळजवळ २०० पक्ष्यांच्या जाती आणि प्रजाती वावरताना आढळतातत. त्यात मलबार ट्रोगॉन, राखट धनेश यांच्या बरोबर मोर, खंड्या (Kingfisher), भारद्वाज, सुतारपक्षी, मैना असे बरेच पक्षी तर माकड, ससा, रानडुक्कर, मुंगूस, साप, घोरपड असे प्राणी जंगलात आहेत. किल्ल्यावर जाणाऱ्या पायवाटे सोबतच हरियाळ, गारमाळ, मोरटाका, ताडंबा अशा राखीव निसर्ग वाटांवरूनही इथल्या पक्षी आणि प्राण्यांचे अवलोकन करता येते. विशेषता ऑक्टोबर ते फेब्रुवारी या हिवाळी महिन्यात स्थलांतर करून येणारे दुर्मिळ आणि सहसा इतरत्र न दिसणारे पक्षीही इथे दिसतात. सकाळी ६.३० ते ८.०० या शांत वेळेत इथे पक्षांची विशेष लगबग असते. यासाठी दूर दूरचे पक्षी निरीक्षक, अभ्यासक आणि निसर्गप्रेमी आपली दुर्बीण आणि कॅमेऱ्यांसोबत पहाटेच या जंगलात हजेरी लावताना दिसतात. 


कर्नाळा पक्षी अभयारण्य. Karnala Bird Sanctuary 

कर्नाळा पक्षी अभयारण्य. Karnala Bird Sanctuary 
                     कर्नाळ्याच्या पायथ्याचे 'कल्हे' गावातील महिला बचतगट इथे येणाऱ्या पर्यटकांसाठी माफक दरात दुपारचे शाकाहारी आणि मांसाहारी जेवण तसेच नाश्त्याची उत्तम सोय करताना दिसतात. या हॉटेलच्या डाव्या बाजूने पायवाट किल्ल्यावर जाते. 

 

'कल्हे' गावातील महिला 'बचत गटाचे हॉटेल'. Karnala Fort, Raigad, Maharashtra.

'पायवाट'. किल्ले कर्नाळा, रायगड, महाराष्ट्र.

                      पायथा ते किल्ल्याचा दक्षिणेकडील शेवटचा टेहळणी बुरुज इथपर्यंत तीन टप्प्यात जाणारी ही पाऊलवाट जवळ जवळ दोन तास दमछाक करते. पाऊलवाटेचा पहिलाच टप्पा मोठमोठे दगड धोंडे ओलांडत तीव्र चढाने आणि वाटेत येणाऱ्या झाडांच्या आडव्या मुळ्यांमधून जाते. सध्या वनविभागाने वाटेवर आडव्या येणाऱ्या ओढ्यांच्या ठिकाणी पायऱ्यांसाठी दगड रचून त्यावर लोखंडी जाळ्या बसविल्या आहेत. पावसात वाहून येणारी माती, गाळ या दगडांमध्ये जमून त्या पायऱ्या पुढे पक्क्या होतील. हा पाऊण तासाचा टप्पा दमवणारा असला तरी गर्द झाडांमुळे गारवा देतो. या वाटेवर झाडांच्या आडव्या मुळ्या आणि झाडांवर चढलेल्या वर्षानुवर्षाच्या वेली चांगल्याच फोफावलेल्या असून लक्ष वेधून घेतात. वाटेवर ठीक ठिकाणी वनविभागाने पर्यटकांना बसण्यासाठी बाकडे आणि शेडची व्यवस्थाही केली आहे.  




'पायवाट'. किल्ले कर्नाळा, रायगड, महाराष्ट्र. Karnala Fort, Maharashtra.
 











                                                        या टप्प्यानंतर पाऊलवाट उजवीकडे वळून डोंगरसोंडेवर येते. या वळणावर पलीकडून रसायनीच्या 'पोसरी' गावातून डोंगर चढून येणारी एक पाऊलवाट किल्ल्याकडे जाणाऱ्या वाटेला मिळते. पण ती फारशी प्रचलित नाही. या डोंगरसोंडे पुढील दुसरी टेकडी ओलांडत वाट पुढच्या डोंगरसोंडेवर येते. इथून समोर दूर डोंगरावर किल्ले कर्नाळ्याची तटबंदी आणि त्याचा नयनरम्य सुळका नजरेस पडतो. 

पोसरी गावातून येणारी आणि उजवीकडे वळून डोंगर सोंडेवर जाणारी पाऊलवाट.
                                  पुढे वाट गर्द झाडीत घुसते आणि अर्ध्या तासानंतर  'श्री कर्नाई' मातेच्या घुमटी जवळ येते. घुमटीत चौथर्‍यावर 'कर्णाई' मातेची सिंहारुढ सुंदर मूर्ती आहे. समोरच दमून आलेल्या पर्यटकांना बसण्यासाठी शेड आणि बाकड्यांची व्यवस्था आहे. 
डोंगर सोंडेवरुन - किल्ले 'कर्नाळा सुळका'. 'Karnala Pinnacle', Karnala Fort, Raigad, Maharashtra.

श्री 'कर्णाई माता' मंदिर. किल्ले कर्नाळा, ता. पनवेल, रायगड, महाराष्ट्र. Karnala Fort, Raigad, Maharashtra.

श्री 'कर्णाई माता' मंदिर. किल्ले कर्नाळा. Raigad, Maharashtra.

                      पुढे दगड धोंड्यातून चढत पाऊलवाट किल्ल्याच्या तटबंदीत येते. पूर्वी इथे किल्ल्याचा दरवाजा असावा. या दरवाजाचे दोन्ही चौकटीचे अवशेष वगळता तो उध्वस्त झालेला दिसतो. पुढे नागमोडी वळणे घेत येणारी वाट किल्ल्याच्या उत्तर पायथ्याशी असलेल्या सपाटीवर येते. इथून किल्ल्याचा मुख्य भाग सुरू होतो.




                          पुढची वाट कातळ उतारावरून किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाजातून वर येते. दरवाजासमोर जेमतेम अरुंद वाट आणि उजव्या बाजूस खोल दरी दिसते. नजीकच्या काळात या दरवाजासमोर दगडी पायऱ्या रचल्या आहेत. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी रेलिंगही बसविले आहे. दहा-बारा वर्षांपूर्वी इथे या दोन्ही गोष्टी नव्हत्या. त्यामुळे या टप्प्याची चढाई साहसी आणि पावसाळ्यात विशेषतः कातळावरील शेवाळ्यामुळे धोकादायक वाटायची. आजही पावसाळ्यात या टप्प्यावर नवख्यांनी विशेष खबरदारी घ्यावी. 

'किल्ले कर्नाळा', ता. पनवेल, रायगड, महाराष्ट्र. Karnala Fort, Panvel, Raigad, Maharashtra.

किल्ल्याचा 'पहिला दरवाजा'. किल्ले कर्नाळा, ता. पनवेल, रायगड, महाराष्ट्र. Karnala Fort, Panvel, Raigad, Maharashtra.


'दुसरा दरवाजा'. किल्ले कर्नाळा. Karnala Fort.
                      किल्ल्याचा हा दुसरा दरवाजा मोडकळीस आला असून त्याला लोखंडी खांबांचा आधार दिला आहे. या दरवाजाच्या उजव्या बाजूला किल्ल्याचा बुरुज आणि चौकटीच्या बाजूला कोरलेला 'व्याल' स्पष्ट दिसतो. डाव्या बाजूची तटबंदी झाडांच्या मुळ्यांनी पोखरली असल्याने इथला 'व्याल' निखळला असावा.

  

'दुसरा दरवाजा'. किल्ले कर्नाळा, ता. पनवेल, रायगड, महाराष्ट्र. Karnala Fort, Panvel, Raigad, Maharashtra.

सुळक्याखाली गवतात पूर्वेचे 'बुरुज आणि तटबंदी'.


                       दरवाजातून डावा वळसा घेत, उध्वस्त पायऱ्या चढून वाट किल्ल्याच्या पुढच्या तटबंदीतील तिसऱ्या 'गोमुखी' दरवाजात येते. 

             तर उजवीकडे कातळ सुळक्याखाली किल्ल्याची पश्चिम तटबंदी, तटबंदीतील बुरुज आणि खाली दरी दिसते. इथे वाढलेल्या गवतामुळे जमिनीलगतच्या तटबंदीपुढील धोकादायक दरीचा अंदाज येत नाही. त्यामुळे भटके आणि पर्यटक या बाजूला सहसा फिरकत नाहीत. अपघात होऊ नये म्हणून उजवीकडील ही बाजू बंद ठेवली आहे. 

  

तिसरा  'गोमुखी' दरवाजा. किल्ले कर्नाळा, ता. पनवेल, रायगड, महाराष्ट्र. Karnala Fort, Panvel, Raigad, Maharashtra.

                     डाव्या बाजूच्या गोमुखी दरवाजासमोर फारच कमी जागा ठेवली आहे. तसेच या जागेस उतार दिल्यामुळे बाहेरून शत्रूला फार हालचाल करता येत नाही. हा दरवाजा बऱ्यापैकी शाबूत असून कोरीव कमानदार आहे. याच्या चौकटीला टोकदार खिळ्यांचे सुंदर लाकडी दरवाजे नव्याने बसविले आहेत. 

                     या दरवाजाच्या भुई अंतर्गत चिंचोळ्या पायऱ्या चढून वर आल्यास किल्ल्याच्या सपाटीवर येता येते. दरवाजावरून तोफमाऱ्यासाठी तटबंदीत दिवळ्या ठेवलेल्या दिसतात. या माचीवर भगवा फडकताना दिसतो. किल्ल्यात प्रवेश करण्याचा हा एकमेव उत्तरेकडील दरवाजा किल्ल्याचे बलस्थान असून, किल्ल्याची शोभा वाढवताना दिसतो.  

'तिसरा दरवाजा'. किल्ले कर्नाळा.
'भुई अंतर्गत पायऱ्या'. तिसरा दरवाजा, किल्ले कर्नाळा.

तिसऱ्या दरवाजातून वर येणाऱ्या 'भुई अंतर्गत पायऱ्या'. किल्ले कर्नाळा, ता. पनवेल, रायगड, महाराष्ट्र. Karnala Fort, Panvel, Raigad, Maharashtra.
तिसऱ्या दरवाजातुन दिसणारे किल्ल्यावर येणारे 'उत्तरेकडील पायवाटेचे टप्पे'. किल्ले कर्नाळा, ता. पनवेल, रायगड, महाराष्ट्र. Karnala Fort, Panvel, Raigad, Maharashtra.

तिसऱ्या दरवाजातुन - 'डावीकडे धान्य कोठार आणि सुळका'. किल्ले कर्नाळा, ता. पनवेल, रायगड, महाराष्ट्र. Karnala Fort, Panvel, Raigad, Maharashtra.

                       समोर किल्ल्याच्या पठारावर डावीकडे छप्पर नसलेले वाड्याचे अवशेष आहेत. कदाचित ते धान्य कोठार असावे. पूर्वी आमच्या अनेक भेटीत या वाड्याजवळ एक भली मोठी शिवपिंडी दिसायची. पण आता ती दिसत नाही. वाड्यासमोर आणखीन दुसऱ्या वाड्याचे अवशेष दिसतात. याच्या पलीकडे किल्ल्याच्या पूर्व कड्याची तटबंदी दिसते.  

कातळ टाक्यांकडे जाणारी 'उध्वस्त तटबंदीतून वाट'.
Karnala Fort, Panvel, Raigad, Maharashtra.

                        यानंतर उजवीकडे किल्ल्याच्या पश्चिम कड्यावर भटक्यांना आकर्षित करणारा आणि गिर्यारोहकांना नेहमीच आव्हान देणारा किल्ले कर्नाळ्याचा प्रचंड कातळ सुळका दिसतो. सुळक्याच्या पायथ्याला कातळात टाक्या खोदल्या आहेत. पूर्वी या टाक्यांकडे येण्यासाठी तटबंदीतून वाट असावी. टाक्या शत्रूच्या हल्ल्यापासून तटबंदीने सुरक्षित केल्या असाव्यात. आता ती उध्वस्त दिसते. सुळक्यावरून ओघळून खाली येणारे पावसाचे पाणी या टाक्यांमध्ये जमा होते. काही टाक्या इतक्या प्रशस्त मोठ्या आहेत की त्यांना वरच्या सुळक्याला आधार देणारे कातळखांब ठेवले आहेत. सुळक्यावर चढाई करण्यासाठी मात्र प्रस्तरारोहण साहित्य आणि ती कला अवगत असणे गरजेचे आहे.  

सुळक्याच्या पायथ्याच्या 'खोदीव कातळ टाक्या'. किल्ले कर्नाळा, Karnala Fort.


सुळक्याच्या पायथ्याच्या 'खोदीव कातळ टाक्या'. किल्ले कर्नाळा, Karnala Fort.


सुळक्याच्या पश्चिमेकडील 'खोदीव कातळ टाक्या' आणि खाली 'मुंबई गोवा महामार्ग'. किल्ले कर्नाळा, Karnala Fort. Maharashtra.


                       सुळक्याच्या उत्तरेला मध्यावर मधमाशांचा वर्षानुवर्षांचा अधिवास आहे. पर्यटकांनी फार गोंगाट केल्यास अथवा तिथे आजूबाजूला आग पेटविल्यास मधमाशांनी हल्ला केल्याच्या घटना आजवर झाल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी योग्य ती खबरदारी घ्यावी. 

                  दुर्गमहर्षी गो. नी. दांडेकर यांची 'जैत रे जैत' ही कादंबरी इथल्या मधमाशांच्या पोळ्यावर आधारित आहे. पुढे या कादंबरीवरच 'जैत रे जैत' या मराठी चित्रपटाची निर्मिती झाली. चित्रपटात मधमाशांचे पोळे, पोळ्याची राणीमाशी, चिंधी, नाग्या आणि लिंगोबाचा डोंगर यांच्याभोवती पूर्ण चित्रपटाचे कथानक फिरते. चित्रपटातील प्रसिद्ध  'लिंगोबाचा डोंगर' म्हणजेच 'किल्ले कर्नाळा'. कै स्मिता पाटील आणि डॉ. मोहन आगाशे या कलाकारांनी या चित्रपटात ताकदीने भूमिका साकारल्या. चित्रपटातील चिंधीच्या अविस्मरणीय भूमिकेमुळे १९७८ ला कै. स्मिता पाटील यांना पहिले 'राष्ट्रीय फिल्म पारितोषिक' (National Film award) देण्यात आले. तर कथानकातील सावळ्या आदिवासी 'नाग्या'च्या भूमिकेसाठी, गोऱ्या गोमट्या डॉ. मोहन आगाशें'ना चित्रीकरण दरम्यान उन्हात उभे केले जात असे. ही माहिती काही वर्षांपूर्वी माझ्या सासूबाईंनी गप्पांच्या ओघात दिली होती. असो..         

                        सुळक्याच्या दक्षिणेकडे काही पायऱ्या उतरल्यास किल्ल्याचा चौथा दरवाजा दिसतो. त्याच्या उजव्या बाजूस पहारेकऱ्यांची सुंदर देवडी आहे. पण सध्या ती जीर्ण दिसते. दरवाजासमोरच तीव्र उतार असून त्यापलीकडे तटबंदीने संरक्षित केलेला कातळ बुरुज दिसतो. समोरच्या त्या बुरुजापर्यंत पोहोचण्यासाठी मध्ये दगडी भिंतीचा पूल बनविला आहे. काही पायऱ्या चढून वर आल्यास या पुढच्या बुरुजावर जमिनीच्या कातळात आयताकृती पाण्याचा हौद खोदलेला दिसतो. या हौदाजवळून दक्षिणेकडील पुढच्या बुरुजावर जाण्यासाठी जमिनीखाली पायऱ्या बनविल्या आहेत. या पायऱ्यांची रचना सुंदर बघण्यासारखी आहे. 

दक्षिणेकडील 'चौथ्या दरवाजाकडे'. किल्ले कर्नाळा, Karnala Fort. Maharashtra.


दक्षिणेकडील 'चौथा दरवाजा'. किल्ले कर्नाळा, Karnala Fort. Maharashtra.

बाहेरून - दक्षिणेकडील चौथा दरवाजा आणि तटबंदी. किल्ले कर्नाळा, Karnala Fort, Panvel, Raigad, Maharashtra.

तटबंदीने संरक्षित केलेला 'दक्षिणेकडील बुरुज'. किल्ले कर्नाळा, Karnala Fort, Panvel, Raigad, Maharashtra.

                         किल्ल्याच्या दक्षिणेकडील या पाचव्या आणि शेवटच्या दरवाजाची रचनाही विशेष सुंदर आहे. दरवाजाच्या चौकटीवर घडीव दगडांची सुंदर कमान असून चौकटीच्या दोन्ही बाजूला शक्तीची प्रतीके 'शरभ' शिल्पे कोरली आहेत. दरवाजा ओलांडून पायऱ्या उतरून आल्यास समोर किल्ल्याच्या पुढच्या दक्षिण बुरुजावर जाता येते.

                       किल्ल्याच्या दक्षिणेकडील या दोन उंच नैसर्गिक टेकड्या वर टोकाला सपाट तासून, तटबंदीने संरक्षित करून अगदी अप्रतिम आणि कल्पकतेने किल्ल्यास जोडले आहेत. सध्या इथल्या तटबंदीचा बराचसा भाग ढासळलेला दिसतो. किल्ल्याच्या या बुरुजावरून उत्तरेला मलंगगड, पूर्वेला प्रबळगड,  इरशाळगड, अग्नेयेला माणिकगड, दक्षिणेला सांकशी, सागरगड यांच्या सोबतच मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग अप्रतिम दिसतात.  

दक्षिण बुरुजावरील 'कातळटाकी'. किल्ले कर्नाळा, Karnala Fort, Maharashtra.



दक्षिणेकडील दुसऱ्या बुरुजावर जाणारा दरवाजा - 'अंतर्गत पायऱ्या'. किल्ले कर्नाळा, Karnala Fort, Maharashtra. 

दक्षिणेकडील दुसऱ्या बुरुजावर येणार 'पाचवा दरवाजा'. किल्ले कर्नाळा, ता. पनवेल, रायगड, महाराष्ट्र. Karnala Fort Pinnacle, Karnala Fort, Raigad, Maharashtra.
                      पर्यटन आणि जैवविविधतेच्या बाबतीत अग्रस्थानी असणाऱ्या या किल्ल्याने इतिहासातही मोलाची भूमिका निभावली. तेराव्या शतकात देवगिरीच्या यादवांचे आणि पुढील काळात गुजरातच्या सुलतानाचे उत्तर कोकणातील एक प्रांत मुख्यालय या किल्ल्यावर होते. यादवांच्या काळात बांधलेला हा किल्ला १५४० ला अहमदनगरच्या निजामाने गुजरातच्या सुलतानाकडून जिंकून घेतला. त्यामुळे चिडलेल्या सुलतानाने पोर्तुगीज सैन्याच्या मदतीने किल्ला परत जिंकून घेतला. त्यानंतर किल्ल्याच्या रक्षणाची जबाबदारी त्याने पोर्तुगीजांवर सोपवून तो पुन्हा गुजरातला गेला. पण पोर्तुगीजांच्या ताब्यातील या किल्ल्यावर निजामाने पुन्हा पुन्हा हल्ले सुरूच ठेवले. त्यामुळे कंटाळून पोर्तुगीज कप्तान 'डी मेन्जेस' याने 'किल्ले कर्नाळा' आणि बाजूचा 'किल्ले सांकशी' निजामाकडून विकत घेतले. पुढे कधीकाळी हा करार तुटला आणि 'किल्ले कर्नाळा' निजामाने पुन्हा आपल्या ताब्यात घेतला. १६३६ पर्यंत निजामाच्या ताब्यात असलेला हा किल्ला नंतर आदिलशहाच्या ताब्यात आला. 
                         १६५७ मध्ये कोकण स्वारीत कल्याण, भिवंडी सोबत शिवछत्रपतींनी किल्ले कर्नाळा स्वराज्यात सामील करून घेतला. त्यानंतर १६६५ च्या पुरंदर तहात किल्ले कर्नाळा औरंगजेबास द्यावा लागला. तहात दिलेले हे किल्ले पुढील काळात छत्रपतींनी जिंकून घेतले. पुढे पेशवाई लयास जाऊन दुसऱ्या बाजीरावांच्या कालखंडात मे १८०३ मध्ये कर्नाळ्याचा ताबा इंग्रजांकडे आला. १८१८ पर्यंत किल्ले कर्नाळ्यावर वहिवाट होती. तसेच १८१८ पर्यंत आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे आजोबा 'अनंतराव फडके' हे या गडाचे किल्लेदार होते. पुढे इंग्रजांनी गडावरील वहिवाट पूर्णपणे बंद केली. पुढील भारताच्या स्वतंत्र्यसंग्रामात 'वासुदेव बळवंत फडके' यांनी भूमिगत होऊन किल्ले कर्नाळा आणि आजूबाजूच्या निबिड जंगल परिसराचा पुरेपूर उपयोग केला. 
दक्षिणेकडील 'दुसऱ्या बुरुजावरून दिसणारा किल्ले कर्नाळा सुळका'. किल्ले कर्नाळा, ता. पनवेल, रायगड, महाराष्ट्र. Karnala Fort Pinnacle, Karnala Fort, Raigad, Maharashtra.

 

दक्षिणेकडील दुसऱ्या बुरुजाची 'उध्वस्त तटबंदी'. किल्ले कर्नाळा. 

                       परतीच्या वेळी आम्ही किल्ले कर्नाळ्याच्या पायथ्याचे, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या 'शिरढोण' गावास भेट दिली. गावातील 'वासुदेव फडकें'चा ऐतिहासिक वाडा ग्रामपंचायतीने काळजी घेऊन छान संवर्धुन ठेवला आहे. कमरेइतक्या उंच चौथर्‍यावर आणि दगडी कुंपणात हा भक्कम वाडा बांधला आहे. वाड्याला आधार देणारे मोठमोठे रुंद सागाचे खांब, त्याखालचे तळखडे आणि रुंद तुळया तसेच वाड्यातील त्या वेळच्या गरजेनुसार असलेली खोल्यांची ठेवण, जमिनीवरील शेणाचे सारवन हे सर्व भारावून टाकणारे आहे. वाड्याच्या मागच्या बाजूस त्यावेळची स्वतंत्र विहीर असून पाणी शेंदण्याची उत्तम व्यवस्थाही दिसते.   

आद्य क्रांतिकारक 'वासुदेव बळवंत फडकेंचा वाडा''शिरढोण', ता. पनवेल, रायगड, महाराष्ट्र. Karnala Fort Pinnacle, Karnala Fort, Raigad, Maharashtra.


फडकेंच्या वाड्यामागील 'विहीर'. 'शिरढोण', ता. पनवेल, रायगड, महाराष्ट्र. Karnala Fort Pinnacle, Karnala Fort, Raigad, Maharashtra.
                        दीड वर्षांपूर्वीच आम्ही सातारा जिल्ह्यातील 'वाई' जवळ नाना फडणवीसांच्या 'मेणवली' वाड्यास भेट दिली होती. मेणवली'च्या वाड्याचा पसारा या वाड्यापेक्षा नक्कीच मोठा आहे. पण दोन्ही वाड्यांच्या अंतर्गत रचनेत बरेच साम्य दिसते. तो कृष्णेकाठी तर हा कर्नाळ्याच्या पायथ्याला, भेटीस येणाऱ्यांना इतिहास सांगत उभे आहेत..

                                                      || श्री कृष्णार्पणमस्तू ||

येथे - जयवंत जाधव

17 comments:

  1. ​" कर्नाळा किल्ल्याचा हा प्रवास तुमच्या लेखणीतून पुन्हा एकदा डोळ्यासमोर उभा राहिला. निसर्ग आणि इतिहास यांचा अतिशय सुंदर मेळ तुम्ही या लेखात घातला आहे. तुमच्यासोबत या ट्रेकला असणं हा एक अविस्मरणीय अनुभव होता. असेच माहितीपूर्ण लेख लिहित राहा. खूप खूप शुभेच्छा!"

    ReplyDelete
  2. Helpful information

    ReplyDelete
  3. Good observation will guide to new commerce

    ReplyDelete
  4. खूप छान, मला पण आवडेल, किल्ले भटकंतीला.

    ReplyDelete
  5. Khup Chhan,Good observation.👍👍

    ReplyDelete
  6. खूप छान वर्णन, धन्यवाद

    ReplyDelete
  7. मित्र जयवंत नमस्कार, कर्नाळा किल्ल्याची भटकंती आणि तुझ्या सोबतीने केल्याचा अनुभव अतिशय रोचक आणि माहितीपूर्ण होता.खरोखरच तुझ्या बरोबर किल्ल्यांची भटकंती करणे म्हणजे रोमहर्षक अनुभव असतो. आपला पहिला मोरगिरीचा अनुभव ही खुपचं छान होता. कर्नाळा किल्ल्यावरिल हा ब्लॉग म्हणजे माहितीपूर्ण भटकंती आहे,जी मी प्रत्यक्ष अनुभवली आहे. कर्नाळा किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व,आजुबाजुच्या डोंगर रांगा,तसेच किल्ल्याच्या जवळून जाणारे येणारे महामार्ग, महानगरं यांचं माहितीपूर्ण मार्गदर्शन जेणेकरून उत्तर गिरीप्रेमीनां उपयोग होऊ शकतो. किल्ल्या कडे जाणाऱ्या पायवाटा, नैसर्गिक आणि मानवनिर्मित पद्धतीने झालेल्या वाटा,किल्ल्यांचे द्रव,जिर्ण वाडा, पर्यटकांना बसण्यासाठी केलेली सोय अशा आणि वैशिष्ट्यपूर्ण रित्या केलेलं वर्णन खुपचं उद्बोधक आहे.आद्याक्रातिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या पुण्यस्मृतीनां उजाळा देणारि त्यांच्या वाड्याला दिलेली भेट. खरंच खुपचं छान आज पुन्हा एकदा मी दुर्ग भटकंतीचा केल्याच प्रत्यक्ष अनुभव आला. मी आशा करतो की पुन्हापुन्हा तुझ्या बरोबर घेण्यास आवडेल. धन्यवाद 🙏🏻🙏🏻 तुझाच मित्र विजय

    ReplyDelete
  8. जयवंत फार सुंदर मित्रा......👌👌👍👍😊..
    तुझ्या लेखणीतुनच संपुर्ण कर्नाळ किल्ला फिरुन आलो....🥰😍👌👌🙏🙏🙏

    ReplyDelete
  9. खुप छान. किल्ला फिरल्याचा आनंद अनुभवता आला. तुमच्या लेखांचे पुस्तक आल्यास वाचायला नक्कीच आवडेल.

    ReplyDelete
  10. अभिषेक नाईक, नेसरी कोल्हापूर4 February 2026 at 08:49

    प्रत्येक वेळी आपल्याला वाचताना त्या डोंगर रांगा आणि किल्या वर स्वतः चढाई केल्याचा अनुभव येतो.
    सुभेदार नावाच ऐक पुस्तकं वाचायला खुप आवडेल 🚩🚩

    खुप छान साहेब

    ReplyDelete
  11. अजून कर्नाळ्याला गेलो नाही. तुमच्या लेखातून किल्ल्याची रचना, इतिहास, आजूबाजूचा जंगल भागाची माहिती परिसर, जैत रे जैत मराठी picture आणि फडके वाडा खूप परिपूर्ण माहिती मिळाली. आता नक्की जाऊन येऊ. लेखात माहित नसलेले सगळे विषय छान मांडले. किल्ल्याचे सर्व फोटो माहिती देणारे एकदम मस्त आहेत. All the best JK..💐👌

    ReplyDelete
  12. किल्ले कर्नाळा ट्रेक बेस्टच्या सहकाऱ्यांसोबत केला होता. किल्ल्याची खरी ओळख. नैसर्गिक खडकाचा उंच सुळका, जो दुरून पाहिल्यास thumps up च्या आकाराचा आहे
    महाराष्ट्रातला दुर्मिळ किल्ला जो पूर्णपणे पक्षी अभयारण्याच्या आत आहे. जयवंत तुझ्या सोबत ट्रेक करायला नक्की आवडेल.

    ReplyDelete
  13. Khupach masst. Konkanat jatana nehmi karnala cross karto amhi pan kadhi visit kela nahi. He sagla vachlya nantar sagla kahi nazre samor disat hota. He kadhi mahit navhta ki Jayt re jayt picture chi shooting tikde zali hoti. Woww! Thank you 💛

    ReplyDelete
  14. खूपच छान सुंदर लिखाण .........👍

    ReplyDelete

  15. प्रत्येक वेळेसारखा हा लेखही माहिती, निरीक्षणपुर्वक व अभ्यासपूर्ण असा आहे. प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिल्याचा वाचुन प्रत्यय आला. असेच आम्हाला नवनविन लेख वाचायला मिळोत ह च सदिच्छा.....
    देवदत्त शेडगे.

    ReplyDelete
  16. खुप छान वर्णन केलंय , टप्प्याटप्प्याने छायाचित्रं ही पोस्ट केल्याने हे वाचताना वेगळीच मजा येते.
    पनवेल, कर्जत व माथेरान परिसरातील असलेल्या इतर किल्ल्यांची नावं , कर्नाळा किल्ल्याचा इतिहास व ह्या पर्यटनस्थळा बद्दल ची माहीती मिळाली.
    खुप छान लेख आहे.

    ReplyDelete

ऑफबीट - 'किल्ले हडसर', ता. जुन्नर, जि. पुणे, महाराष्ट्र. Offbeat - 'Hadasar Fort', Junnar, Pune, Maharashtra.

                      सरासरी दोन हजार वर्षांपूर्वी सातवाहन काळात (इ.स. पूर्व २३० ते इ.स. २५०) कोकणपट्टीवर वसई पासून दक्षिणेकडे गोव्यापर्यंत ...