Friday, 5 February 2021

ऑफबीट - 'माणिकगड', रायगड, महाराष्ट्र. - Gherakilla 'Manikgad', Raigad, Maharashtra.

                'माणिकगड'ला भेट द्यायची तर दिवसभर पायपीट करायची तयारी ठेवावी.  डोंगरतल्या टेकड्या, ओढे-नाले, आडवी झालेली झाडं ओलांडत गड चढाई करून अंधार पडण्याआधी परतून येण्यासाठी वेळेवर लक्ष ठेवावं लागतं. मोजकंच थांबत दिवसभर न थकता चालायला लावणारा हा ट्रेक म्हणता येईल.
बालेकिल्ल्यावरील दुहेरी उद्ध्वस्त तटबंदितील हनुमान दरवाजा (Manikgad Fort)

            अडीज-तीन तास झाडीतून वाट काढत दमछाक करून गडपायथ्याला पोहोचल्यावर शेवटचा तासाभराचा टप्पा शारीरिक, मानसिक परीक्षा घेतोच. 

             'माणिकगड'ला येण्यासाठी पनवेल पासून अंदाजे २५ किमीवर असलेल्या रसायनी मार्गे 'वाशिवली' गाठावी. एस.टी, वढाप किंवा स्वतःच्या वाहनानंही येऊ शकतो. 'वाशिवली' गावामागील टेकडी ओलांडली की पायवाट दिसते. दूरवर जंगलाच्या मध्यावर माणिकगडचा सुळका लक्ष वेधून घेतो. या टेकडीनंतर साधारण पंधरा मिनिटांवर जनावरांचा 'गोठा' दिसतो. 'गोठ्या'च्या अलीकडे डावी-उजवीकडुन जाणाऱ्या दोन पाऊलवाटा आहेत. त्यापैकी डावीकडून जाणारी पायवाट माणिकगडाला जाते. पूर्वानुभव किंवा निघतानाच गावात चौकशी न केल्यास इथं नक्कीच फसगत होते. 

               गोठ्याच्या उजवीकडून जाणारी वाट दाट जंगलात जाते. या वाटेवरून अधूनमधून 'माणिकगड'चा माथा दिसत राहतो आणि पाला पाचोळ्यातून वाट पुढे दिसेनाशी होते. तोपर्यंत बरीच पायपीट आणि वेळ खर्ची होतो.  

जळालेलं पठार आणि समोर माणिकगड (Manikgad) 
                                           

                      आमच्याही बाबतीत नेमकं हेच घडलं. पण सुदैवानं वाट चुकलेला एक ट्रेकर्सचा ग्रुप भेटला. पठारावरची वाट पुन्हा गाठण्यासाठी बहुधा ते मधला अवघड टप्पा चढून जात होते. 

 

    

                आम्ही त्यांच्या मागे असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. ते ती अवघड घळ न चढता पुन्हा मागे फिरुन पठारावर येणाऱ्या वाटेनं येण्यास आम्हाला सांगितलं. पुन्हा पाऊण तासाची मागं पायपीट करून आम्ही नेमकी वाट गाठली.

             गावामागील टेकडीनंतर गोठा ओलांडल्यावर हे एक लांबलचक पठार दिसतं. पठारावरुन दूरवर धुक्यात किल्ले माणिक खुणावतो. पावसात या पठारावर कमरेइतकं गवत असावं. पण यावेळी जंगलात लागणाऱ्या वणव्यात ते बरंच जळालेलं दिसलं.  

               पठार संपून जंगलात शिरण्यापूर्वी गडमाथा दिसत राहतो. गडाचा डोंगर डावीकडं ठेवत पायथ्याच्या दुरून ही वाट बऱ्याच टेकड्या, ओढे आणि दगड धोंडे ओलांडत जाते.  तीनएक तासाच्या अथक वाटचालीनंतर गडाला डावा वळसा मारत गडपायथ्याला पोहचते. 

            वाट मधे बऱ्याचदा  दिसेनाशीही  होते आणि गोंधळून जातो. काही ठिकाणी एकावर एक असे तीन लहान दगड किंवा खडे ठेवलेले दिसतात. जंगलात हे एकमेकांवर ठेवलेले दगड-खडे ही याआधी वापरलेल्या मानवी वाटेची खात्रीशीर खूण समजावी. अशा खुणा शोधत पुढे रेटून चालत राहणं हाच एक पर्याय उरतो.  

पायवाटेतील  ओढे 
                

              बऱ्याच वेळानं समोरुन दोघेजन येताना दिसले. त्यांच्याकडे किल्ल्यावर जाणाऱ्या वाटेची चौकशी केली.  त्यांच्या माहितीनुसार  अर्ध्या तासात पुढं जंगलात आम्हाला मारुतीचं देऊळ लागणार होतं. सरासरी पन्नास जणांचा त्यांचा फॅमीली ग्रुप 'अष्ट्या'हून 'माणिकगड'ची मागील बाजुनं चढाई करत होता. 'पेण'च्या अष्ट्या'हूनही तासाभरात येणारी एक पाऊलवाट या देवळाजवळून गडावर जाणारी आहे.  

मारुती मंदिर (Manikgad)
               मारुतीच्या देवळाजवळ आम्हाला त्यांचा ग्रुप दिसला आणि विचारपूस झाली. त्या ग्रुपमध्ये वयस्क आणि मुलं असल्यानं त्यांना मागे सोडून आम्ही चढाई सुरू ठेवली. 
       हे देऊळ म्हणजे लोखंडी पाईपाच्या सांगाड्यावर टाकलेला पत्रा. पत्र्याखाली शेंदूर लावलेली मारुतीची मूर्ती दिसते. 
मागे 'अष्टया'चा ग्रुप, माणिकगड.

              

              

                             इथून पुढची चढाई दाट जंगलातल्या मोठमोठ्या दगडांतून सुरू होते. कधी दरीच्या काठानं घसरणाऱ्या वाटेनं घेवून जाते. आम्ही आतापर्यंत ओलांडलेले ओढे-नाले पावसात दुथडी भरून वाहत असावेत. दरी उतारावरची ही वाटही धोकादायक असावी. त्यामुळं जोरदार पावसात हा ट्रेक टाळावा.   

 

            इथून अर्धीअधिक चढाई केल्यानंतर गडाची तटबंदी आणि त्यापुढे बुरूज दिसू लागतात. तटबंदी बऱ्याच ठिकाणी ढासळलेली दिसते. 

           या टप्प्यावर दुपारी आम्हाला गडाच्या तटबंदीखाली धोकादायक दरीउतारावर काही मुलांचा ग्रुप दिसला. चौकशी करता मारुतीच्या देवळाजवळून येण्याआधी गडाच्या लिंगीला बुरूज समजून तिथंच कुठेतरी वाट शोधण्यासाठी ते अवघड जागी चढले. पुढची वाट न सापडल्यानं तिथून बाजूबाजुनं पुढं सरकत राहिले. सकाळी आम्हाला पठारावरची सांगणारे ते हेच होते. 

             ठाण्याच्या 'रामचंद्र' नगर मधून आलेला तो आठ-दहा जणांचा ग्रुप होता. त्यांची आत्ता प्रत्यक्ष भेट होत होती. ते दुसऱ्यांदा वाट भरकटले होते. त्यातील 'नचिकेत' ज्यानं आम्हाला मार्गदर्शन केलं, तो आमच्या पनवेलला डेन्टल'च्या तिसऱ्या वर्षाला आहे. यांना आणि 'अष्ट्या'हून आलेल्यांना पुढे जाण्यास वाट देवून आम्ही वाटेतच शिदोरी सोडली. 



माणिकगडाला असलेल्या दोन्ही बाजूच्या लिंगी, माणिकगड.

           जंगलातून एक पूर्ण वळसा मारून अंदाजे तीन-साडेतीन  तासात वाट गडाच्या मागे पोहचते. गडामागुन आणि मंदिरासमोरून किल्ल्यास असणाऱ्या दोन नैसर्गिक लिंगी दिसतात. आणि मंदिरानंतर पुन्हा तासाभराचा डोंगराला मागून वळसा मारत वाट शेवटच्या टप्प्यात पुन्हा वर समोर येते. थोडक्यात माणिकगड म्हणजे जंगलातून डोंगराला दोन वळसे मारत गडमाथा गाठणारा एक द्राविडी प्राणायाम आहे. गडमाथ्यावर पोहोचण्यापूर्वी समोर 'रसायनी' दिसते.  

           पूर्वाभिमुख असलेला किल्ल्याचा महादरवाजा पूर्ण उद्ध्वस्त दिसतो. दाराजवळ लावलेल्या फलकामुळंच  तो ओळखता येतो.

किल्ल्याचं मुख्य प्रवेश दार Manikgad
         महादरवाजा पार करून पुढे गेल्यास डोंगर उतारावर कातळात खोदलेली एक मोठी पाण्याची टाकी  दिसते. टाकीच्या पुढेच डोंगरउतारावरुन वाट अर्धवर्तुळाकार वळण घेत पुढे उजवीकडुन तीव्र चढानं तुटलेल्या तटबंदीतून गडाच्या सर्वोच्च उंचीवर असलेल्या  बालेकिल्ल्यात येते. 

बालेकिल्ल्यात येताना 
किल्ल्यावरील अर्धवर्तुळाकार वळण (Manikgad Fort) 

बालेकिल्ल्याची वाट (Manikgad Fort) 
पाण्याची टाकी (Manikgad)


     बालेकिल्ल्याची तटबंदीही उद्ध्वस्त दिसते.  डावीकडेच चुन्याच्या घाण्याची जागा दिसते. सध्या तिथं कातळात कोरलेला वर्तुळाकार चर दिसतो. किल्ल्याच्या बांधकामासाठी दगड सांधताना या घाण्यात त्यावेळी चुना मळला असावा. 

चुन्याचा घाणा (Manikgad Fort)

बालेकिल्ला (Manikgad Fort)

        घाण्याच्या डावीकडे पुढे किल्ल्याची अर्धवट उद्ध्वस्त तटबंदी दिसते. शाबूत राहिलेल्या तटबंदीत काही ठिकाणी जंग्याही दिसतात.  पुढे गडमाथ्यावर उद्ध्वस्त मंदिराची जागा दिसते. सध्या त्याच्या गाभाऱ्यातील घूमटी तेवढी जागेवर दिसते. घूमटित देवतेची मूर्ती दिसते. त्यापुढेच डावीडे पश्चिमेकडील तटबंदीत उद्ध्वस्त प्रवेशदार आणि खाली दरीत उतरणाऱ्या अर्धवट पायऱ्या दिसतात. त्याखाली ठाव न लागणारी दरी असल्यानं ही वाट खूपच  धोकादायक वाटते.   

मंदिराची घुमटी (Manikgad Fort) 

          







            



पश्चिमेकडील उद्ध्वस्त दरवाजा 

                                                   डावीकडे समोर पश्चिमेला तोंड असलेला तिसरा दरवाजा दिसतो. दरवाजाच्या सभोवतीची तटबंदी उद्ध्वस्त दिसते. सध्या त्याच्या दगडी चौकटीची कमान जागेवर शिल्लक दिसते. चौकटीच्या माथ्यावर  एक सुंदर गणेशमूर्ती कोरलेली दिसते. याला 'हनुमान दरवाजा' म्हणतात. दरी काठावरच्या या दरवाजाची सुंदर कमान म्हणजे माणिकगडचा 'ट्रेडमार्क' समजला जातो. या गडाच्या बालेकिल्ल्यावरही तटबंदी असल्याचं दिसतं. बालेकिल्ल्यास दुहेरी तटबंदी असलेलं हे दुर्मिळ उदाहरण म्हणता येईल.   

             'हनुमान' दरवाजा ओलांडल्यास उजवीकडं वाड्याचे अवशेष दिसतात. वाडा उद्ध्वस्त असून त्याच्या पायऱ्या आणि चौथऱ्याच्या मूळ आराखड्याचे दगड मात्र जागेवरच दिसतात. वाड्यासमोरून प्रचंड दरीपलीकडचे इर्शाळगड, प्रबळगड आणि माथेरान डोंगर दिसतात. 

              वाड्याच्या पुढे गडाच्या सर्वोच्च माथ्यावर असलेला सर्वात मोठा तलाव खोदलेला दिसतो. त्यातील पाण्याची पातळी तळाला गेली असून पाणी पिण्यालायक नाही. या तलावाच्या बाजूला आणखी एक छोटी पाण्याची टाकी कोरलेली दिसते. 

वाड्याचे अवशेष 

 
उद्ध्वस्त वाडा 

             




              

गडमाथ्यावरचा तलाव (Manikgad Fort) 

           तलावापासून उजवीकडे वळल्यास गडाच्या पूर्वेकडील तटबंदिवर येतो. बुरुजापासून खाली ढासळलेल्या तटबंदिच्या बाजुनं काही पायऱ्या उतरल्यास, वाट किल्ल्यात प्रवेश करताना पहिल्या मुख्य प्रवेश दारासमोरुन जो बुरूज दिसतो त्या बुरुजावर येते.

बुरूज आणि पलीकडील खोल दरी (Manikgad Fort)  

वाड्यासमोरून दिसणारे प्रबळगड,ईरशाळगड,माथेरान डोंगर  
बुरुजाकडून तटबंदीवर येणाऱ्या तुटलेल्या पायऱ्या 
              पुढे चालत राहिल्यास डावीकडे कातळात बाजूबाजूलाच कोरलेल्या पाण्याच्या  टाक्या दिसतात. या टक्यांच्या जवळ उघड्यावर छोटं महादेव मंदिर आहे. त्यातील गाभाऱ्याच्या ठिकाणी शिवपिंडी असून मागे दगडात कोरलेली गणेश मूर्ती दिसते. पिंडीसामोरच नंदी आहे. 
           मंदिराकडं पाठ करून उभं राहिल्यास समोर प्रचंड दरीपलीकडचे डोंगरमाथे आणि दूरवर 'सांकशीचा' किल्ला असं सुंदर दृश्य दिसतं.   
पाण्याच्या टाक्या Manikgad Fort) 

 

महादेव मंदिर 

समोर किल्ले सांकशी 

          
          इथं आम्हाला पुढे आलेला 'अष्टया'चा ग्रुप पुन्हा भेटला. पुढे येऊन, जेवण बनवून, सर्व जेवायच्या तयारीत होते. आम्हालाही आग्रह झाला, पण आमचं जेवण आधीच उरकल्यानं नम्र नकार दिला. फारच आग्रह झाल्यानं आम्ही उभयतांनी दोन दोन घास घेतले. थोड्या गप्पाही झाल्या. ते सर्वजण अष्टयाच्या 'भेसरे' कुटुंबातील होते. खोपोली, ठाणे तर काहीजण उल्हासनगरहुन एकत्र आले होते.                        
            आज त्यांचं या दुर्गम किल्ल्यावर 'गेट टूगेदर' होतं. मागील ३१ डिसेंबरला ते सगळे मिळून रायगडला गेले होते. तर त्यामागील वर्षी शेगावला. 
         त्यांचा आग्रही पाहुणचार आणि कुटुंबाची एकी बघून कौतुक वाटलं. नऊ गावचे सरपंच असलेले श्री भेसरे आम्हाला पिण्यालायक पाण्याची टाकी दाखवण्यासाठी स्वतः गडाच्या पश्चिमेला धोकादायक दरीकाठाच्या  कातळ उतारावर आले. ती पाण्याची टाकी त्यावेळी आम्हाला दाखवली नसती तर खाली परतेपर्यंत आम्हाला नक्कीच पाण्याची अडचण आली असती. त्यांची जेवणं आटोपायची असल्यानं आम्ही त्यांचा निरोप घेतला. 
कातळातील दरिकाठावरची टाकी 

          या किल्ल्याचं बांधकाम नौदलप्रमुख, सरखेल 'कान्होजी आंग्रें'नी केलं. इंग्रज, पोर्तुगीज आरमारानं अथक प्रयत्न करूनही मराठा आरमार या दर्यासारंगानं अजिंक्य ठेवलं. त्यांनी संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर अनिर्बंध सत्ता गाजविली. त्यादरम्यानच कान्होजींनी हा किल्ला बांधला असावा. नंतर १७१८ ला पेशव्यांनी या किल्ल्याचा ताबा कान्होजींनाच दिला.

            दुपारचे तीन वाजले होते. गडमाथा आटोपशीर असल्यानं तासाभरात गडफेरी पूर्ण झाली. अंधाराच्या आधी 'वाशिवली' गाठायची होती. २५०० फुट उंचीवरील सह्याद्रीच्या मुळ पर्वतरांगेत येणारा हा किल्ला आणि त्याचा  शेवटचा अवघड टप्पा उतरून पुन्हा तेवढीच पायपीट करून आम्हाला परत जायचं होतं. 

           खाली उतरून मारुतीचं देऊळ गाठल्यावर बरं वाटलं. पुढं दोन तीन तासाची पायपीट अजून शिल्लक होतीच पण धोका नव्हता. 

            मजल दरमजल करत पुन्हा पठार गाठलं. उरलेलं पठार आज पुन्हा जळताना दिसलं. उन्हाळ्यातील उष्णतेनं कोरडी पानं आणि गवतानं पेट घेतला असावा किंवा हा मानवी निष्काळजीपणाही असावा, हे एक न सुटलेलं कोडं आहे. दिवसभर उन्हात तापलेलं गवत, झुडूपं  कापसासारखं पेटताना दिसत होतं. फुलपाखरं आणि कीटकांची होणारी तडफड, धावाधाव आम्ही प्रत्यक्ष जवळून पाहिली..

Manikgad 
Manikgad 

 


                                 || श्री कृष्णार्पणमस्तु || 
येथे - जयवंत जाधव   

Monday, 11 January 2021

येडशी रामलिंग मंदिर (Yedshi Ramling Temple)

                  मराठवाड्यातील बार्शी - लातूर प्रवासात 'येडशी' घाट लागतो. धाराशिव जिल्ह्याच्या (उस्मानाबाद) अवर्षणग्रस्त (कमी पाऊस) असलेल्या या भागात हा घाट रस्त्याचा प्रवास मात्र निसर्गरम्य आहे. शासनानं हा अभयारण्य विभाग जाहीर केला आहे. बार्शीहून पूर्वेला सरासरी ४५ किमीवर या अरण्यात लातूरला जाताना 'बीड - उस्मानाबाद' हा आडवा महामार्ग दिसतो. महामार्गावर डावं वळण घेतल्यास, या ठिकाणी रामायण काळातील  एक पुरातन महादेव मंदिर आहे. अगदी अभयारण्याच्या मधोमध, हिल स्टेशनवर, दरीच्या कोंदणात असलेलं हे मंदिर आणि परिसर निसर्गरम्य आहे. दरीत सरासरी १११ पायऱ्या  उतरून मंदिरात जावं लागतं. त्यामुळं दुरून या मंदिराचा ठावठिकाणा लक्षात येत नाही.
दरीच्या कोंदणातील 'श्री रामलिंग' मंदिर (Yedshi Ramling) 
 
मंदिरामागील दक्षिण प्रवेश बाजू (Yedshi Ramling) 

              'बालाघाट' डोंगररांगेतील हे थंड हवेचं ठिकाण असल्यानं बीड, सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातील निसर्गप्रेमींना हे पर्यटनाचं ठिकाण बनलं आहे. 'येडशी रामलिंग घाट अभयारण्य' नावानं ते प्रसिद्ध आहे.  

              सरासरी कमी पावसाची नोंद असल्यानं आपटा, अर्जुन, अंजनी, बेहडा सारखी मध्यम आकाराची आणि विशेषतः करवंदीची झुडपं इथं मोठ्या प्रमाणात दिसतात. या घाट प्रवासात ससा, मुंगूस, मोर यासारखे वन्य जीव रस्त्यात दर्शन देतातच देतात.

जटायु समाधी (Yedshi Ramling) 

 

मंदिरासमोरील बाजू (Yedshi Ramling) 
  
                सीतेचं अपहरण करून रावण लंकेस जाताना, रामभक्त जटायुनं या अरण्यात त्याच्याशी झुंज दिली. रावणाशी युध्द करून घायाळ अवस्थेत पडलेल्या जटायूची रामभेट या ठिकाणी झाली. श्री रामांनी इथं बाजूला जमिनीत बाण मारून जलउत्पती केली. जलप्राशन करून जटायुनं प्राण सोडले. पुढील तीन दिवस श्रीरामांनी  या ठिकाणी वास्तव्य केलं आणि दरम्यान शिवलिंगाची स्थापना करून पूजा केली. देवळातल्या गुरवानं ही आख्यायिका सांगितली. या घटनेमुळं या ठिकाणाला पौराणिक वारसाही मिळाला आहे.   
           
पुरातन शिवलिंग (Yedshi Ramling) 

मंडपातील नंदी (Yedshi Ramling) 
 
   

           मंदिरामागेच जिथं श्री रामाने पाण्यासाठी बाण मारला तिथं सध्या गुहेचं स्वरूप आहे. पाण्याची एक संततधार या गुहेतून बाहेर पडताना दिसते. तर बाजूलाच दरडीवरून कोसळणारा धबधबा आहे. पावसाळयात इथं पाण्याचा प्रपात असतो. श्रावणात आणि पावसाळ्यात भाविक आणि पर्यटकांची गर्दी असते. 
              शिवलिंग प्राचीन असून आधी अहिल्याबाई होळकरांनी हे मंदिर आणि प्राकार बांधला. सध्या आजूबाजूचा प्राकार वगळून मुळ मंदिराचा नव्यानं जीर्णोद्धार केलेला दिसतो. गाभाऱ्यात शिवपिंडी आहे तर प्रशस्त सभामंडपात सुंदर कलाकुसर केलेला पितळेचा मोठा नंदी आहे.                                                                                                       
मंदिरासमोरील नितळ नदी 
 
धबधबा आणि समोर श्रीराम निर्मित गुहा (Yedshi Ramling) 

                  देवळाला वळसा मारून शांत वाहणारी छोटी नदी, तिचं नितळ पाणी, बाजूलाच धबधबा आणि नदीचं पुढं जंगलात लुप्त होत जाणं खूपच छान आहे. परिसर शांत आणि निवांत आहे. बार्शीहून 'तेर'ला जाणारा हा प्रवास पूर्ण या  अभयरण्यातून झाला. आणि त्या निमित्तानं  या मंदिराचीही भेट झाली.
मंदिराला वळसा मारणारी नदी (Yedshi Ramling) 
    

Yedshi Ramling 

         सूचना :-   इथली माकडं उच्छादी आहेत. काळजी घ्यावी.

                                       || श्री कृष्णार्पणमस्तू ||  

येथे - जयवंत जाधव

Friday, 1 January 2021

बुलंद भुईकोट - "किल्ले परांडा" (Paranda Fort)

                 भुईकोट किल्ल्याचा दरारा आणि रुबाब बघायचा, तर एकदा "परांडया"ला भेट द्यावीच. नळदुर्ग आणि आमचं कुलदैवत राजराजेश्वरी 'श्री तुळजा भवानी' इतकंच ठरवून निघालो होतो. पण अर्ध अंतर कापेपर्यंत बऱ्याचशा मराठवाड्याची जुळणी झाली.

              आधी 'पुणं' सोडून 'उजनी धरण प्रकल्प' लागेपर्यंत, मराठवाडा हा उजाड, मैदानी, भकास रानमाळ असा समज होता.

किल्ले परांडा (Paranda Fort )

               पण 'उजनी' प्रकल्पानं मराठवाड्यास काही प्रमाणात संजीवनी दिली आहे. पुढचं काम इथल्या कष्टाळू आणि मेहनती लोकांनी पूर्ण केलंय. पुणे - सोलापूर महामार्ग टेंभुर्णीत सोडून, परांड्यासाठी डावीकडं वळण घेतल्यास, छोट्या पण व्यापारी तत्वावर इथं तूर, द्राक्षं, पपई, कांदा, बोरं, पेरू आणि सर्वाधिक केल्या जाणाऱ्या उस लागवडीतून 'विठ्ठल' सहकारी साखर कारखाना, यामुळं इथला शेतकरी सधन झाल्याचं दिसतो.

             शहरीकरणाच्या बाबतीत उस्मानाबाद सर्वात वेगानं वाढणारं शहर असलं तरी, प्राचीन इतिहास असूनही पर्यटनाच्या बाबतीत  मागेच राहिलं असं म्हणावं  लागेल. इथले गड किल्ले आणि इतर धार्मिक  स्थळं एकमेकांपासून आणि मुंबई - पुण्यापासून दूर असल्यानं काहीशी उपेक्षित राहिली. पण इथं आल्यावर हा गैरसमज दूर झाला. असो..

          'परांडा' हे तालुक्याचं गांव आहे. गावात शिरून किल्ल्याची चौकशी करत अगदी मुख्य दाराजवळ पोहोचेपर्यंत किल्ल्याचा अंदाज येत नाही. तिथं पोहोचण्यासाठी गजबजलेली आणि अरुंद रस्त्यावर वाढलेली बाजारपेठ ओलांडावी लागते. आणि ही कसरत करून इथं पोहचलो की, 'परांड्या'च्या पहिल्याच दर्शनानं धडकी भरते.. 

                   किल्ल्या सभोवती ठेवलेला रुंद, खोल पाण्याचा खंदक, तिथल्या भेदक तोफा आणि किल्ल्याच्या मजबूत दुहेरी तटबंदीनं या किल्ल्यास अजिंक्य ठेवलं आहे. आक्रमण करण्यापूर्वी शत्रूला दहादा विचार करायला लावणारा आहे. जमीनीवरील किल्ल्यास लागणारं लष्करी स्थापत्यशास्त्र आणि उत्कृष्ट शिल्पकलेचा सुरेख संगम इथं दिसतो. 

             किल्ल्यात जाण्यासाठी खंदकावर सध्या पक्का पूल बनवला आहे. पूर्वी तो लाकडी होता. युद्धप्रसंगी उचलून घेतला जाई. चहू बाजुनं पाण्याचा खंदक आणि त्यात सोडलेल्या मगरींमुळं पहिली आक्रमणाची लाट किल्ल्याबाहेरच थोपवली जाई. किल्ल्याच्या चहू बाजुनं दुहेरी उंच तटबंदी आहे. तटबंदीत चऱ्यां आणि किल्ल्यातून खंदकापलीकडं शत्रूवर वेगवेगळ्या कोनातून मारा करण्यासाठी जंग्या ठेवल्या आहेत. 

            इ. स. १५९९ ला मुघलांनी अहमदनगरच्या निजामाचा पराभव केला. पण आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी, निजामाच्या सरदारांनी शाह अलीचा वयानं लहान असलेला मुलगा 'मूर्तझा' यास गादीचा वारस ठरवून अहमदनगरपासून दक्षिण पूर्वेला १३० किमीवर असलेल्या 'परीमंडा' (परांडा) किल्ल्यावर आणले. त्यामुळं परांडा काही काळ राजधानी बनून राहिली.

              इ.स. १६२८ दरम्यान हा किल्ला दोन वर्षांसाठी निजामशाहीत असताना शहाजी राजांच्या ताब्यात होता. पुढे आदिलशाही, मुघल, आदिलशाही आणि पुन्हा मुघल असा या किल्ल्यानं बराच मुस्लिम राजवटींचा काळ  बघितला. त्यामुळंच कदाचित त्याच्या स्थापत्यशैलीत बदल होत गेला असावा. 

               किल्ल्याच्या मुख्य दरवाजाची दगडी कमान भव्य असून, दारं नजीकच्या काळात बनवलेली दिसतात. या दारात छोटा दिंडी दरवाजा केला आहे. इथून आत प्रवेश केल्यानंतर, उजवीकडे कमानदार ठेंगण्या आणि अंधाऱ्या बोळातून वळण घेत रस्ता दुसऱ्या दरवाजातून बाहेर पडतो. या बोळातून खंदकापलीडील शत्रूवर तोफमारा करण्यासाठी, तटबंदीत दिवळ्यांची रचना केलेली आहे. 

                  दुसऱ्या दरवाजातून आत आल्यावर, समोर चहू बाजूंनी वेढलेली एक प्रशस्त मोकळी जागा दिसते. यालाच 'रणमंडळ' म्हटलं जातं. आणि हेच 'रणमंडळ' या किल्ल्याचं बलस्थान आहे.

रणमंडळातील देवड्या 
अंधार बोळ आणि तोफांची जागा  
        
               इथं 'रणमंडळात' डावी उजवीकडं पहारेकऱ्यांच्या देवड्या असून समोर अंगावर येणारे महाकाय अर्धगोल बुरूज आहेत. या बुरुजातून जागोजागी आणि वरुन समोरून चहू बाजुनं मारा करण्यासाठी जंग्या ठेवल्या आहेत. सध्या इथं समोरच्या प्रत्येक जंगीतून, रणमंडळात तोफांची तोंडं डोकावताना दिसतात. इथं पोहचल्यावर पुढं  किल्ल्यात कुठून घुसावं याचा विचार करु लागणाऱ्या शत्रूला, या जागेवर मारा करून सहजच नेस्तनाबूत केलं जायचं.

               'रणमंडळात' उजवीकडं बुरूजाच्या तटबंदीत वरील भागात अप्रतिम शिल्पकलेनं बनवलेले सुंदर सज्जे दिसतात. सज्जाच्या दोन्ही बाजूला, किल्ल्याचे राजचिन्ह असलेले 'व्याल' कोरले आहेत. इथंच किल्ल्याच्या मुख्य प्रवेश दाराचा एक लाकडी दरवाजा ठेवला असून, ऊन पावसामुळं तो आता जीर्ण झालेला दिसतो. 

रणमंडळातून दिसणारे व्याल (Paranda Fort)  
रणमंडळात ठेवलेला दरवाजा 

             या बुरूजांच्याच आडाला उजवीकडं किल्ल्याचा तिसरा दरवाजा आहे. या तिसऱ्या महाकाय दरवाजाच्या लाकडी दाराचे अवशेष मात्र अजूनही जागेवर शाबूत आहेत. दारावर लोखंडी सुळे असलेल्या आडव्या पट्ट्या असून, बलदंड साखळदंडाने जखडला आहे.

               

तिसरा दरवाजा 
रणमंडळातील बुरूज आणि डावीकडे देवड्या  

          या दरवाजातून आत आल्यावर समोर किल्ल्याचा अर्धगोलाकृती महाकाय 'ढाल काठी' बुरूज दिसतो. बुरुजावर अप्रतिम शिल्पकलेचा सज्जा आणि सज्जावरच नगारखाना दिसतो.


ढाल  काठी बुरूज आणि समोर नगारखाना 
      
          इथून मात्र दोन्ही तटबंदीमधून डावी उजवीकडं जाण्यास मार्ग आहेत. डावीकडील मार्गातून खंदकानंतरची पहिली आणि मध्ये ४० फुट अंतर ठेवून किल्ल्याची मुख्य दुसरी तटबंदी, यामधून किल्ल्याला वळसा मारू शकतो. खंदकालाच लागून असलेल्या तटबंदीत चर्या आणि बाहेरील शत्रूवर मारा करण्यासाठी जंग्या ठेवल्या आहेत.

तटबंदीतील चर्या आणि जंग्या  
भुयारी मार्ग 
 बुरुजातील सज्जे (Paranda Fort) 

 
          
               पुढे जाताना बाजूच्या दुसऱ्या मुख्य तटबंदीत अर्धगोल आणि वर निमुळते होत जाणारे उंचच उंच बुरूज आहेत. बुरुजांवर  बाहेर काढलेले सज्जे आहेत. इथून मुख्य तटबंदीखालून किल्ल्यात जाणारे भूयारी मार्ग आहेत. सध्या वाढलेल्या झुडपांमुळे आत जावू शकलो नाही. पुढे किल्ल्यामागे दोन्ही तटबंदीच्या मध्ये प्राचीन महादेव मंदिर आहे.

दुहेरी तटबंदीतील महादेव मंदिर (Mahadeo Temple)

   पुन्हा मागे येऊन तिसऱ्या दरवाजाजवळून उजवीकडे वळताच,महाकाय बुरुजांना आणि तटबंदिला वळसा मारून रस्ता किल्ल्याच्या सर्वात उंच, महाकाय चौथ्या दरवाजात येतो. चौथ्या दरवाज्यासमोर एक अंदाजे ५० फुट खोल आणि अरुंद विहीर आहे. विहिरीत बारमाही पाणी आहे. दारासमोरच असल्याने पुरातत्व विभागाने ती लोखंडी जाळी ठेवून सुरक्षित केली आहे. चौथा दरवाजा अतिशय भव्य, सुबक आणि किल्ल्याच्या वैभवात भर घालणारा असून दरवाजाच्या चौकटीवर फारशी शिलालेख आहे. 

चौथ्या दरवाजा समोरील विहीर
 


           चौथा दरवाजा ओलांडून रस्ता उजवीकडे कमानीवजा पाचव्या दरवाज्यातून मुख्य किल्ल्यात येतो. समोरच डावीकडे दगडी प्रशस्त मस्जिद दिसते. मस्जिदिसमोरच रणमंडळातून दिसणाऱ्या, नगारखाना असलेल्या 'ढाल काठी' बुरुजावर जाण्यास पायऱ्या दिसतात. आत मस्जिदीत जाताच डावीकडे 'वजू' करण्यासाठी पाण्याचा हौद दिसतो.

मस्जिदिसमोरील ढाल काठी बुरुजासाठी पायऱ्या  




मस्जिदी समोरील 'वजू' हौद  


किल्ल्यातील मस्जिद 

मस्जिदिवरील मिनार   

 सध्या तो कोरडा आहे. हौदासमोरच उजवीकडं मस्जिद आहे. मस्जिदीच्या छताला आधार देणारे नक्षीचे सुबक दगडी खांब आहेत. दगडी छतालाही सुंदर त्रिमितीची नक्षी आहे. खांबावरील आणि छतावरील कोरलेली नक्षी ही मंदिरात कोरलेल्या चिन्हांची दिसते. पूर्वी तिथं 'मानकेश्वर मंदिर' होतं. 


मस्जिदीतील सुबक खांब  

                कर्नाटकातील धारवाड येथील 'होन्नती' गावी इ. स. ११२४ चा एक शिलालेख आढळतो. त्या शिलालेखानुसार या किल्ल्याचे नाव 'पलियंडा' असून, इथं 'महामंडलेश्वर सिंघनदेव'च राज्य होतं. यावरुन हा किल्ला इ. स. ११२४ च्या आधीचा आणि हिंदू राजवटीतील असावा. पुढे बहामणी काळात सुलतानचा वजीर 'महमुद गवान'नं पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात पुन्हा नव्यानं बांधला. त्याकाळानंतर मंदिराचं मस्जिदित रुपांतर झालं असावं.
              वर मस्जिदीवर जाण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था असून, वर चार कोपऱ्यात चार आणि मध्ये दोन असे सहा छोटे मिनार दिसतात.


 
मस्जिदिवर जाण्यासाठी पायऱ्या  

              बाहेर, मस्जिदीच्या समोरच उजवीकडं नगारखान्याच्या बुरुजावर पायऱ्या चढून गेल्यास पंच धातूची, वीस फुट लांब, सुंदर नक्षी असलेली एक प्रचंड तोफ ठेवली आहे. तोफेवर एकूण ६ फारशी लेख कोरले असून तोफेच्या वर्तुळाकार तोंडावरही लेख आढळतो. तोफेवर वितभर उंचीचे दोन सिंह आहेत पण, त्यापैकी एकाचे तोंड मानेपासून कापून नेले आहेत. रणरणत्या उन्हात देखील ही तोफ थंड राहते.




मस्जिद (Paranda Fort)

 पंचधातूची तोफ  


           या 'ढाल काठी' बुरूजावरून किल्ल्यातली सुंदर मस्जिद आणि पूर्ण किल्ला नजरेच्या टप्यात येतो. तर मागे येऊन पाचव्या कमानीवजा दराजवळून उजवीकडं वळल्यास बाजूला दारुगोळा कोठार दिसतं. कोठारात वेगवेगळ्या आकाराचे तोफगोळे असून काही ओतीव तोफा ठेवल्या आहेत. कोठार जाळीनं कुलूप बंद केलं आहे. सध्या तिथं आत वाटवाघूळांचं राज्य दिसतं.
 
दारुगोळा कोठार 
            कोठाराच्या पुढंच हमामखाना असून, किल्ल्याची साफसफाई करताना सापडलेल्या मुर्त्या तिथं ठेवल्या आहेत. त्यामध्ये पाच फुट उंचीची आणि सहा हात असलेली गणेश मूर्ती, पाच फन्याची नागदेवता, पार्श्वनाथांची मूर्ती, विरगळ, गद्धेगळ ओळीनं मांडून ठेवल्या आहेत.


             समोरच प्रशस्त अष्टकोणी आणि बहुमजली विहीर आहे. विहीरीच्या प्रत्येक मजल्यावर  उतरण्यासाठी व चकवा देण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था आहे. आत उतरण्याचा रस्ता सध्या झुडपांनी भरला आहे. पण प्रयत्न करून आत जाता येतं. या विहीरीचं पाणी हत्तीनं उपसलं जायचं असं म्हणतात. विहीरीच्या दगडांवर ठिकठिकाणी नक्षी कोरली असून ही विहीर किल्ल्याच्या वैभवात भर घालते. 
    
अष्टकोणी विहीर (Paranda Fort) 


              





               
       सध्या तिथं आजूबाजूला खूप रान माजलं आहे. विहीरीच्या पुढेच दगडी उंच कमान ओलांडून गणेश मंदिर आहे. मंदिरात गरुडावरील श्री विष्णूची मूर्तीहि आहे. मंदिरासमोरच एक समाधीही दिसते.


विहिरीत उतरण्याच्या पायऱ्या 
गणेश मंदिरासमोरील समाधी


                 किल्ल्याच्या तटावरून पावसानंतरची झुडपं आणि वाढलेल्या रानामुळं गडफेरी करण्यास अडचण येते. सध्या किल्ल्याची साफसफाई दुर्लक्षितच दिसते. 
               किल्ल्याच्या तटबंदीत एकूण सव्वीस बुरूज असून प्रत्येक बुरुजावर वेगवेगळ्या घडणीच्या आणि धडकी भरवणाऱ्या तोफा ठेवल्या आहेत. 'लांडा कासम', 'खडक', 'बांगडी तोफ', 'अझद पैकर'(सर्परूप) अशा नावांच्या, पूर्ण बुरूज व्यापणाऱ्या अजश्र तोफा आजही तिथं आहेत. त्यांची विध्वंस करण्याची आणि होणाऱ्या आवाजाची फक्त कल्पना करू शकतो.

photo courtesy :- Google
photo courtesy :- Google
   

                 'मलिक-मैदान' तोफ मुळची इथलीच सांगितली जाते. ती तर निजामशाहीची ताकद मानली जायची. पण नंतरच्या काळात अदिलशाहीचा सेनापति 'मुरार जगदेव'नं ती किल्ला ताब्यात येताच आदिलशहाला भेट दिली. सध्या ती विजापूर किल्ल्यातील उखळी बुरुजावर विसावली आहे. चारशे बैल, दहा हत्ती आणि शेकडो सैनिक लावून ती त्यावेळी विजापूरला हलविल्याचं सांगितलं जातं.

                इथल्या तोफा, दुहेरी गुंतागुंतीची तटबंदी, रणमंडळ आणि किल्ल्याचा खंदक हे 'परांडा' चं खास वैशिष्ट्य आणि ताकद आहे. शिवाय 'रणमंडळ' आणि जंग्यातुन ठेवलेल्या तोफा हे सगळं बघण्यासारखं आहे. किल्ल्याचा आकार एकूण आयताकृती असून, सभोवती दुहेरी गुंतागुंतीची तटबंदी आणि खोल रुंद खंदकानं किल्ल्याला अभेद्य केलेलं दिसतं. लष्करी दृष्ट्या अत्यंत कौशल्यानं किल्ल्याची बांधणी केली असून, इथं शिल्पकलेचे सुंदर नमुने आहेत. 
           सध्या किल्ल्याच्या खंदकात गावभरच्या गटाराचं सांडपाणी सोडलं असून, झुडूपांनी खंदक व्यापलेल्या दिसतो. गावच्या राहिवाशांनी खंदकाबाहेरच मातीचे ढिगारे लावले आहेत. पुरातत्व खात्याचंही म्हणावं तितकं लक्ष दिसत नाही.
झुडुपांनी भरलेला खंदक 

किल्ल्याबाहेरील मातीचे ढिगारे (Paranda Fort)
       

                 
                









               या वरील गोष्टी नजरअंदाज केल्यास, इतिहासाचा साक्षीदार म्हणून हा किल्ला बघण्यासाठी खरोखर अप्रतिम आहे. 
                
               छत्रपतींचं स्वराज्य त्या काळी सह्याद्री आणि कोकण, असं मर्यादित राहिल्यानं हा किल्ला मराठी साम्राज्यात सामील झाला नाही. पण स्वराज्याचे सरसेनापती नेतोजी पालकरांनी त्या वेळी परांड्याच्या आजूबाजूला छापे घालून जरब ठेवल्याची नोंद मिळते.
 
               उत्तर आणि दक्षिणेतील प्राचीन व्यापारी मार्गावरील 'परांडा' महत्त्वाचं ठाणं असल्याचं जवळच असलेल्या 'धाराशिव' लेण्यानं (उस्मानाबाद) सिद्ध केलं आहे. त्यामुळं प्रत्येक राजवटीला 'परांडा' आपल्या ताब्यात ठेवण्याचा हव्यास होताच. हे जमीनीवरील 'ठाणं' किती सशक्त आणि दरारा निर्माण करणारं होतं, याची कल्पना 'परांड्या'च्या भेटीतच कळते..   

                                  || श्री कृष्णार्पणमस्तू ||

येथे - जयवंत जाधव      

'किल्ले विसापूर' - मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Pune, Maharashtra.

                           उन्हाळ्यात शुष्क झालेल्या धरतीला पावसाने तजेला दिल्यानंतर सह्याद्रीतल्या दऱ्या डोंगरांचे रूप विलोभनीय असेच दिसते....