Thursday, 22 December 2022

ऑफबीट - 'भेलीव'चा किल्ला - 'मृगगड' (Offbeat - Mrugagad)


                        डिसेंबरच्या तिसऱ्या रविवारी 'भेलीव'च्या 'मृगगडा'स आम्ही सहकुटुंब भेट दिली. पुण्याचा पन्नाशी ओलांडलेल्या अकरा जणांचा ग्रुप, मुंबईच्या विक्रोळीतून आलेला एक सोलो ट्रेकर आणि आम्ही तिघे, याव्यतिरिक्त रविवार असूनही किल्ल्याची चढाई करणारे विशेष असं कोणी दिसलं नाही.
  
किल्ले मृगगड (Mrugagad Fort)

                           मराठ्यांचा जाज्वल्य इतिहास सांगणारे बेलाग गडकिल्ले सह्याद्रीत आहेतच. ते आपलं दुर्ग वैभव टिकवूनही आहेत. पर्यटकांची तिथं नेहमी वर्दळ दिसते. पण याच सह्याद्रीत असेही छोटे दुर्गम आणि कडवं आव्हान देणारे किल्ले आहेत की ज्यांनी परकीय आक्रमणं थोपवून स्वराज्याची पताका अबाधित राखली. या गडकिल्ल्यांच्या बाबतीत डोंगरभटके वगळता, गडपायथ्याचे स्थानिक रहिवाशीही उदासीन दिसतात. या किल्ल्यांची पर्यटकांना एकतर नावं, ठिकाणं माहीत नसावीत किंवा एकाकी दुर्गम धोकादायक ठिकाणांमुळं आणि सुविधा नसल्यामुळं ते इकडे फिरकत नसावेत.

                             'मृगगड'.  रायगडच्या सुधागड तालुक्यात सह्याद्रीखाली खोपोली पासून पालीकडे २३ किमीवर (NH 92) जांभूळपाड्याला डावं वळण घ्यायचं. पुढे नऊ किमीच्या 'भेलीव' गावात डावीकडे जंगलाच्या पलीकडं 'मृगगड' दिसतो. मुंबई, ठाणे आणि पुण्याकडील डोंगर भटक्यांना खोपोली मध्यवर्ती ठिकाण आहे. खोपोलीहून गडपायथ्याचं 'भेलीव' हे गांव सरासरी 32 किमी आहे. तर आमच्या राहत्या पनवेल पासून खोपोली मार्गे ६०-६५ किमी. खोपोलीहून 'पाली'ला जाणाऱ्या एसटी बसेस जांभूळपाड्याला थांबतात. तिथून मोजक्याच एसटी बसेस असल्यानं, भेलीवसाठी रिक्षा किंवा वडाप शोधावं लागतं. स्वतःचं वाहन असेल तर मृगगड वेळेत, एका दिवसात करण्यासारखा आहे.

गावाबाहेरील टेकडीवरून दिसणारं मंदिर आणि शाळा (Mrugagad)

                   'भेलीव' हे मृगगडाच्या पायथ्याचं 'अंबा' नदीजवळ लोणावळ्याच्या दरीकोंदनातलं गांव. गावात प्रवेश करताच डावीकडं शाळा दिसते. शाळेजवळ पार्किंगची सोय आहे. सरासरी चार पाचशे लोकवस्तीचं गांव असावं. सह्याद्रीच्या डोंगररांगेखालीच असल्यानं गांव परिसरात धुव्वाधार पाऊस पडतो. प्रामुख्यानं इथं भात शेतीच दिसते. गांव दिसायला बेताचं असलं तरी गावातील लोक उद्यमशील मदत करणारे दिसतात. गावकऱ्यांनी एकजुटीनं जुन्या मंदिराचा जीर्णोद्धार करून सध्या गावाच्या उत्तरेला भव्य, सुबक 'भवानी' मातेचं मंदिर उभारलं आहे.  आमच्या भेटी दरम्यान मंदिराची रंगरंगोटी चालू होती. येत्या माघ महिन्यातील पौर्णिमेला मंदिराचं कळसारोहन आणि वास्तूपुजा नियोजित आहे. शाळा आणि मंदिर एकमेकांना पाठमोरे आहेत. आणि या दोन्हींच्या उजव्या बाजूस गाव वसलं आहे. 'मृगगड' नावाचा गिरिदुर्ग सहयाद्रीच्या याच लोणावळा दरीकोंदणात बाजुला १७५० फूट उंचीवर वसला आहे. 'भेलीवचा किल्ला' म्हणूनही मृगगडास ओळखलं जातं. 

रस्त्यावरून दिसणारा किल्ले मृगगड आणि मोराडी सुळका (Mrugagad Fort)

                     गडावर जाणारा रस्ता मंदिर आणि शाळेच्या मधून उत्तरेकडील गावाबाहेरच्या कातळ टेकडीवरुन जातो. टेकडीवर सपाटी दिसते. त्या समोर जंगल आणि जंगलाच्या पलीकडे ईशान्येला एकसारखे दिसणारे ओळीत चार लहानमोठे डोंगरसुळके लोणावळा डोंगररांगेला काटकोनात भेलीवपर्यंत निमुळते होताना दिसतात. त्यातील तिसऱ्या सुळक्यावर दुरून भगवा दिसतो. चौकशी केल्यावर एकानं सरळ सगळ्याच सुळ्यांकडे बोट दाखवलं आणि आम्ही जे समजून घ्यायचं ते घेतलं. टेकडी पठारानंतर दिसणाऱ्या जंगलात उजवीकडून की समोरून सुळक्यांना वळसा मारून पुढं जायचं हे कळलं नाही. उजवीकडे एकावर एक असे तीन मोठे दगड रचलेले दिसले. मागील अनुभवावरून हीच पायवाट असावी असं समजून आम्ही उजवीकडून जंगलात घुसलो. पाच दहा मिनिटांनी एक मळलेली पायवाट आणि किल्ले मृगगड असा बोर्ड झाडाला ठोकलेला दिसला.

किल्ल्याकडे जाणारी पायवाट (Mrugagad Fort)
Mrugagad Fort

                     घनदाट झाडीतून जाणारी ही पायवाट रम्य वाटते. प्रबळ गडावरील जंगलाची आठवण करून देते. आंबा, पळस, जनावरांवर माशा बसू नये म्हणून शेतकरी वापरतात त्या 'निंगडी'ची, करवंदीची झुडपं यांनी हा परिसर व्यापलेला दिसतो. त्यामुळे अर्ध्या तासाच्या चालीतही उन्हाचा त्रास जाणवला नाही. एक एक करत पायवाटेनं तिसरा सुळका ओलांडला की वाट डाव्या बाजूच्या डोंगर भिंतीकडे सरकते आणि दगडधोंड्यातून कातळाकडे जाते.

Mrugagad Fort
कातळाकडे जाणारी पायवाट (Mrugagad Fort)
  
 
                       कातळाच्या पायथ्याला उजवीकडं चौरसाकृती दिसणारी गुहा खोदलेली दिसते. वाट मात्र समोर डावी उजवीकडं दिसणाऱ्या महाकाय डोंगर जिथं येऊन मिळतात त्या तीव्र उताराच्या घळीतून वर चढताना दिसते. पुढे घळ अगदीच चिंचोळी होत जाते. त्यात भरीस भर म्हणून घळीत उताराच्या अंतरा अंतरावर मोठे दगड अडकले आहेत. घळीत जेमतेम जागा असल्यानं फार हालचाल करता येत नाहीच पण एकमेकांना मदतही करता येत नाही. नवख्यांना हा टप्पा दमवत असावा. नंतर चौकशी केली असता या टप्प्यावर दोर लावून देण्यास गावातील तरुण तयार असल्याचं समजलं. 
 
घळीकडे येणारी पायवाट (Mrugagad Fort)
 

दोन्ही डोंगरमधील घळ (Mrugagad Fort)

घळीवरून दिसणारी दरी (Mrugagad Fort)

दोन्ही डोंगरमधील घळ (Mrugagad Fort)
                       या टप्प्यानंतर वाट कातळ उतारावर डावीकडून वळसा मारत उजवीकडे वळते. समोर किल्ल्याचा भिमकाय काळा कातळ नजरेस येतो. कातळावरची सरकणारी माती आणि डावीकडं दरी असल्यानं सावध पावलं टाकावी लागतात. पुढे वळून उजवीकडे आल्यास वाट तिसऱ्या आणि चौथ्या डोंगर सुळक्यांमधील सपाटीवर येते. उजवीकडे समोर एका दगडावर कोरलेल्या अस्पष्ट पादुका दिसतात. बाजूला किल्ल्याची माहिती देणारा बोर्ड दिसतो. सध्या त्यावरील सर्व अक्षरं उडालेली आहेत. पादुकांच्या दगडामागे चौथी टेकडी गवतानं व्यापलेली दिसते. तिकडे कोणी फिरकत नसावेत. मात्र डावीकडील किल्ल्याच्या तिसऱ्या डोंगराची उंची आणि व्याप्ती जास्त दिसते.
 
तिसऱ्या आणि चौथ्या डोंगरमाथ्यावरील सपाटी (Mrugagad)
किल्ल्याचा कातळ (Mrugagad Fort)
         
पादुका (Mrugagad Fort)
                      डावीकडे मुख्य किल्ल्याचा खडा कातळ दिसतो. कातळावर सुरुवातीला रुंद तर वर छोट्या अस्पष्ट होत नागमोडी वळणं घेत कोरलेल्या पायऱ्या गडमाथ्यावर जातात. मध्यानंतर पायऱ्यांमधील अंतर आणि उंची कमी जास्त दिसते. काही पायऱ्या मध्ये तुटलेल्याही आहेत. दरीकाठावरून जाणाऱ्या या पायऱ्या आणि ठराविक ठिकाणी खोबण्यांचा आधार घेत सावकाश संयमानं हा टप्पा पार करावा लागतो. एखादं चुकीचं पडलेलं पाऊल इथं जीवावर बेतू शकतं. मध्येच जवळ जवळ ८० अंशाच्या कोनातून वर जाणाऱ्या या पायऱ्यांचा छोटा टप्पा आणि त्याखाली खोल दरी मानसिक कसोटी घेतात.  क्षणभर 'कलावंतीण'ची आठवण करून देतात.
किल्ल्याचा कातळ आणि पायऱ्या (Mrugagad Fort)


Steep Steps
     
                   गडमाथ्यावर कातळावरून गडचढाई करण्यापूर्वी या कातळाच्या उजवीकडे समोर कातळ काठावरून जाणाऱ्या अरुंद पायऱ्या दिसतात. गडाच्या कातळात असलेल्या समोरील गुहेकडे त्या जातात. जेमतेम एक पाऊल ठेवता येईल इतक्या अरुंद आणि खाली खोल दरी दिसते. सध्या गुहेत फारसं काही बघण्यासारखं दिसत नाही. पण थरार मात्र अनुभवता येतो.
उजवीकडील गुहेत जाणाऱ्या पायऱ्या (Mrugagad Fort)
गुहा (Mrugagad Fort)


कातळ पायऱ्या (Mrugagad Fort)
कातळ पायऱ्या (Mrugagad Fort)

                       किल्ल्याचा उभा कातळ चढून वर आल्यास उजवीकडं अर्धवट तटबंदी दिसते. तटबंदीला उजवा वळसा मारून वाट माथ्यावर येते. उजवीकडे कड्याच्या काठावर 'महिषासुर मर्दिनी'चं छोटं उध्वस्त मंदिर दिसतं. मंदिराच्या घुमटीवर सध्या पत्र्याचा आडोसा दिसतो. देवीच्या बाजुला दुसऱ्या एका स्त्री देवतेची मूर्ती आणि शिवपिंडी दिसते. वेगवेगळ्या दगडावर कोरलेल्या या दोन्ही मुर्त्या सुबक आहेत.
महिषासुर मर्दिनी मंदिर (Mrugagad Fort)
पूर्वेची तटबंदी (Mrugagad Fort)
मोराडी सुळका 'स्वयंभू शिवलिंग' लोणावळा घाट (Mrugagad Fort)
                    किल्ल्याच्या या पूर्व कड्यावरून लोणावळ्याचा आकाशात घुसलेला 'मोराडी सुळका' आणि 'लायन्स पॉइंट' तसेच लोणावळा डोंगररांग छान विलोभनीय दिसतात. इथून लोणावळा घाटमाथ्यावर नजर ठेवता येते. मोराडी सुळका हा शिवलिंगाच्या आकाराचा दिसतो. सह्याद्रीतून वर उठलेला हा महाकाय सुळका 'स्वयंभू शिवलिंग' मानलं जातं.
                    तर मंदिराच्या डावीकडं समोर उध्वस्त दगडी चौथरा दिसतो. कदाचित ते सदरेचे अवशेष असावेत. बाजूला डावीकडे मध्यम आकाराच्या पाण्याच्या तीन टाक्या दिसतात. त्यापैकी एका टाकीत पाणी शिल्लक असून बाकी दोन कोरड्या दिसतात. टाकीतील पाणी पिण्यायोग्य दिसत नाही. कदाचित या दोन टक्यांना खाली काताळात नैसर्गिक गळती असावी.
किल्ल्यावरील सुरुवातीच्या पाण्याच्या टाक्या (Mrugagad Fort)


किल्ल्यावरील सुरुवातीच्या पाण्याच्या टाक्या (Mrugagad Fort)
                     या टाक्यांच्या आजूबाजूला टाकींची सफाई करताना निघालेल्या दगडांचे ढीग दिसतात. तर काही दगड अस्ताव्यस्त विखुरलेले दिसतात. किल्ल्याबद्दल अधिक चौकशी करता लॉकडाऊन दरम्यान गडावर जमिनीखाली पूर्वी लपवलेली तांब्याची भांडी शोधण्याचा प्रयत्न झाला होता अशी खाली गावात खबर मिळते. असो..
            या टाकींच्या समोर उत्तरेला आणखी एका वाड्याचे अवशेष दिसतात.
बालेकिल्ल्याची टेकडी (Mrugagad Fort)


बालेकिल्ल्यावरील वाड्याचे अवशेष (Mrugagad)

बालेकिल्ल्यावरील दगडी भांडे (Mrugagad Fort)

                        पुढे गडमाथ्याच्या टेकडीवर जाणारी पायवाट दिसते. टेकडीवरही असेच एका वाड्याच्या चौथऱ्याचे अवशेष आहेत. वाड्यात एक मोठं दगडी घडीव वाटोळ्या आकाराचं भांडं दिसतं. कदाचित हा किल्ल्याचा बालेकिल्ला असावा. या टेकडी पलीकडे डाव्या बाजूला म्हणजेच भेलीवच्या दिशेनं उतार कातळावर खोदलेल्या आणखी दोन पाण्याचे हौद दिसतात. त्यातील एका हौदात पाण्याचा काही अंश शिल्लक असून दुसरी टाकी गाळाने भरलेली दिसते. आजूबाजूला गुडघ्याइतकं सुकलेलं गवत दिसतं.

किल्ल्याच्या दक्षिणेकडील उतारावरील पाण्याच्या टाक्या (Mrugagad Fort)

                       त्यापुढे शेवटी किल्ल्यावर थोडाफार सपाट म्हणता येईल असा काळा कातळ दिसतो. हे मृगगडाचं शेवटचं पश्चिम टोक असून या कातळावरही आणखी तीन पाण्याच्या टाक्या कोरलेल्या दिसतात. तिसऱ्या टाकीचं काम अर्धवट राहिलं आहे. या तिन्ही टाक्या कातळावर आडव्या उभ्या काटकोनात कोरलेल्या चरांनी एकमेकांना जोडलेल्या दिसतात. कातळावर ठिकठिकाणी गोल हळगेही दिसतात. खळग्यांचा उपयोग लाकडी खांब उभा करून किल्ल्यावर आडोसा उभारण्यासाठी तसेच पावसाच्या पाण्यातून वाहून आलेला गाळ या खळग्यात साठून फक्त पाणी टाकीत जमा होईल या उद्देशानं केला असावा. यातल्या दोन टाक्या गाळाणं भरल्या असून, पैकी एका टाकीत पाण्याचा अंश शिल्लक दिसतो. इथल्या टाकींची व्यवस्था बघून 'किल्ले सांकशी'वर असलेलं जलव्यवस्थापन आठवतं. या टाकींच्या बाजूला झाडावर फडकणारा भगवा आहे तो दुरुन 'भेलीव' गावातून दिसतो.

टाकिंना असलेली चर व्यवस्था (Mrugagad Fort)
किल्ल्याच्या शेवटच्या टोकावरील पाण्याच्या टाक्या (Mrugagad Fort)
किल्ल्यावरून दिसणारा वाघदरी परिसर (Mrugagad Fort)

किल्ल्यावरून दिसणारा वाघदरी परिसर आणि समोर किल्ले अनघई (Mrugagad Fort)
  
उंबरखिंड (Mrugagad Fort)


                               गडमाथ्याच्या या टोकावरून पश्चिमेला कोकण, दक्षिणेला 'अंबा' नदीचा 'वाघदरी' परिसर, अग्नेयेला अनघई किल्ल्याचा डोंगर, तर उत्तरेला 'उंबरखिंड' परिसरावर नजर ठेवता येते. याच उंबरखिंडीत १६६१ ला शिवरायांनी हजारोंची मुघल फौज घेवून स्वराज्यावर चालून आलेल्या सरदार 'कर्तलबखान' आणि त्याच्या फौजेची मूठभर मावळ्यांनिशी दाणादाण उडवली होती. मृगगडाचे भौगोलिक स्थान लक्षात घेता, शिवरायांनी त्यावेळी इथून त्या फौजेवर नक्कीच नजर ठेवली असावी. 

                      गडाला पूर्वेला सुरुवातीची थोडीफार तटबंदी दिसते. जर किल्ल्याच्या इतर कड्याकाठावर पूर्वी ती असल्यास ढासळलीही असावी. किंवा पोर्तुगीज, इंग्रज राजवटीत ती उध्वस्तही केली असावी. बाकी उभ्या कड्यांमुळं किल्ल्याला नैसर्गिक संरक्षण मिळालं आहे. त्यामुळं इतर कुठेच बुरुजांची आवश्यकता दिसत नाही. पावसाळ्यात मात्र निसरडा कातळ आणि पायऱ्यांमुळं शक्यतो हा ट्रेक टाळावा.

किल्ले मृगगड (Mrugagad Fort)


किल्ले मृगगड (Mrugagad Fort)

                        किल्ल्याचा एकूण आकार लांबट गोलाकार असून किल्ला काळ्या कातळाच्या डोंगरमाथ्यावर पूर्व पश्चिम असा वसला आहे. किल्ल्याच्या निर्मितीचा इतिहास मात्र आजही अज्ञात आहे, पण कदाचित मध्ययुगीन काळात हा किल्ला निर्माण केला असावा. गडमाथा पाऊण तासात फिरून आटोपणारा आहे. किल्ल्यास चारही बाजूंनी उभे कडे असून त्यापैकी पूर्वेकडचा धोकादायक कडा आणि दरिजवळून गडप्रवेश आहे. त्यामुळं बाहेरून किल्ल्यावर चालून जाणं तितकं सोपं दिसत नाही. 'मृगगड'च्या चढाईची श्रेणी मध्यम असली तरी नवख्या डोंगर भटक्यांसाठी नक्कीच धाडसाची ठरावी..

                                     || श्री कृष्णार्पणमस्तू ||                          

येथे - जयवंत जाधव

Friday, 25 November 2022

किल्ले रोहिडा (विचित्र गड) Fort Rohida (Vichitragad)

                       दसरा गेला आणि परतीच्या पावसानं पुन्हा जोर धरला. तीन दिवस झोडपून काढलं. पुढली चार दिवस उसंत घेऊन परत कोसळू लगला. पनवेल परिसरातील भातं पोसवुन गळ्याशी आली. दिवाळी सरली तसा पाऊस सरला. ऑक्टोबर उष्णतेच्या आधीच हवेत गारठा जाणवू लागला. दिवसभर उष्णता आणि पहाटे गारठा अशा नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात हवामान खात्यानं 'मुंबई आणि परिसरातील हवामान वाईट, अति वाईट..' जाहीर केलं.

                        आणि या दरम्यान 'बाजी बांदल' अर्थात इतिहासात 'बाजीप्रभू देशपांडे' नावाचं रत्न शिवरायांना जिथं गवसलं, त्या सह्याद्रीच्या 'महाबळेश्वर डोंगर' रांगेत ३६६५ फूट उंचीवरील 'किल्ले रोहिड्या'चं नियोजन केलं. रोहिड्याला 'विचित्रगड' किंवा 'बिनीचा किल्ला' म्हणूनही ओळखलं जातं.
                      

किल्ले रोहिडा (विचित्र गड) (Rohida Fort)

                 साताऱ्याचे दोन, पुण्याचा एक आणि पनवेलहून मी असे चार बालमित्र नोव्हेंबरच्या तिसऱ्या शुक्रवारी, संध्याकाळी पुण्याच्या रोहिड खोऱ्यातल्या 'बाजारवाडी' गावात जमलो. आधी कलावंतीण आणि प्रबळच्या भटकंतीसाठी आम्ही एकत्र आलो होतो.

                    किल्ले रोहिड्याला भेट द्यायची झाल्यास, पुणे - भोर - बाजारवाडी अशा एस टी बसेस आहेत. पण पुढील भटकंती सोईची व्हावी म्हणून आम्ही प्रत्येकजण स्वतः च्या वाहनांन तिथं जमलो.

गडपायथ्याचं घर आणि मागे किल्ले रोहिडा (Rohida Fort)
                    'बाजारवाडी' हे पुणे जिल्ह्यातील भोरपासून दक्षिणेला ८ किमीवर आणि किल्ल्याच्या पूर्व पायथ्याला असलेल्या 'दशरथ शिंदे' या बालमित्राचं गांव. गावात वडिलोपार्जित शेती आणि त्या ठिकाणीच सध्या दोन्ही भावांनी मिळून कौतुक करण्यासारखं टुमदार घर बांधलं. शे शंभर माणसं राहतील असं आधुनिक सुविधा असलेल्या या घराच्या अंगणातूनच 'किल्ले रोहिड्याचं' मनोहारी दृश्य दिसतं. आमची तिथं राहण्याची सोय झालीच. 'निरा' नदीच्या खोऱ्यात वसलेली आणि 'भाटगर' धरणामुळं ही गावं विज, पाणी आणि दळणवळणांच्या साधनांमुळं आज संपन्न दिसतात.
भाटगर धरण, तालुका भोर (Rohida)
                आम्ही सकाळी सात वाजता डोंगर चढाईला सुरुवात केली. घराच्या बाजूलाच 'किल्ले रोहीड्या'ची  पायवाट दाखवणारा ठळक बोर्ड दिसतो. बोर्डाच्या बाजूला किल्ल्याबद्दल माहिती लिहिलेले मोठे फलक फॉरेस्ट खात्याच्या हद्दीत उभे आहेत. गावाबाहेर किल्ल्याच्या पायवाटेवर, गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीजवळ पर्यटकांना एक रुपयात पाण्याची बाटली देणारी स्वयंचलित मशीन 'गोदरेज कंपनी'नं उभारली आहे. गांव पंचायतीनं येणाऱ्या पर्यटकांसाठी पार्किंगचीही सोय केली आहे. 
दुसऱ्या  टप्प्यावरील आसन व्यवस्था (Rohida)
दुसऱ्या टप्प्याची चढाई (Rohida)
रोप'च्या इंजिनाचे अवशेष (Rohida Fort)
                      गड चढाई एकूण तीन टप्प्यांची असून, गांव सोडल्यानंतर चढाईचा पहिला पंधरा मिनिटांचा टप्पा सोपा आहे. या टप्प्यानंतर गवताळ पठार दिसतं. पठारावर गावातील जनावरं चरताना दिसतात. पुढील चढाई तीव्र असून दमछाक करते. डोंगराच्या तीव्र उतारावर कमरे इतक्या गवतातून नागमोडी वळणं घेत दुसऱ्या टप्प्याची चढाई संपते. या टप्प्यावर उतारावरच्या तीव्र वळणांवर संरक्षक रेलिंग बसविले आहेत. याच टप्प्यावरील सपाटीवर गड चढाई करणाऱ्याना 'गोदरेज' कंपनीनं बाकड्यांची व्यवस्था केलेली आहे. बाकड्यांच्या बाजूलाच जुनी लोखंडी बैठक आणि काही इंजिनाचे अवशेष दिसतात. पाच सहा वर्षांपूर्वी किल्ल्याच्या डागडुगीसाठी लागणारं बांधकाम साहित्य, इथून 'रोप'च्या सहाय्यानं किल्ल्यावर पोहोचवल्याची माहिती मित्राकडून समजली. 
कारवीची झुडुपं (Rohida Fort)

                    तिसऱ्या टप्प्याची चढाई आणखी तीव्र असून दमछाक करते. या टप्प्यात मुरुमावर उगवणारी आणि भूजलस्तर धरून ठेवणारी 'कारवी'ची झुडपं (Strobilanthes sessilis) दिसतात. सह्याद्रीच्या शुष्क उतारावर दिसणाऱ्या या कारवीच्या काठ्यांपासून बनवलेल्या 'कुडाच्या' भिंती आजही आदिवासी पाड्यांवर दिसतात. कारवीच्या  झुडपांमुळे पुढची चढाई थोडी सुसह्य वाटते. 
गणेश दरवाजा
गणेश दरवाजा (Rohida Fort)
                             या शेवटच्या खड्या चढाईनंतर किल्ल्यावर जाण्यासाठी एकूण तीन दरवाजांपैकी पहिला 'गणेश' दरवाजा लागतो.  कातळ कडा संपतो त्या अवघड टोकावर या दरवाज्याची उभारणी दिसते. या दरवाजासमोर अगदीच अरुंद तोकडी जागा दिसते आणि त्यासमोर खोल दरी. बाहेरून हल्ला करणाऱ्या शत्रूला फार हालचाल करता येऊ नये या कल्पकतेने या दरवाज्याची उभारणी केल्याचं दिसतं. 
                          दरवाजा  गोमुखी असून चौकटीवर गणेशपट्टी असावी. सध्या तिची झीज झाल्यानं अस्पष्ट दिसते.  दरवाज्यावर तटबंदीत शत्रुवर मारगिरी करण्यासाठी जंग्या ठेवल्या आहेत. चौकटीवर तटबंदीत वाऱ्यावर भगवा फडकताना दिसतो. लाकडी दरवाजे जुने दिसत असले तरी नजीकच्या काळात बसवलेले असावेत. 
 
गणेश दरवाजा - आतून घेतलेला फोटो
देवळीतील देवता (Rohida)
                                   दरवाजा ओलांडून आत डाव्या बाजूला कड्याच्या काठावर संरक्षणासाठी तटबंदी दिसते. उजवीकडे चौकटीलगत दिवळीत तांदळा स्वरूपातील देवतेची मूर्ती दिसते.  पुढे उजवीकडे वीसएक पायऱ्या चढून गेल्यास समोर 'फत्ते' बुरुज दिसतो. या बुरुजातून, पहिला दरवाजा ओलांडून आलेल्या शत्रूवर मारा करण्यासाठी दोन जंग्या आणि त्या वरील बाजूस हत्तीच्या तोंडाचं कोरलेले उठावदार शिल्प दिसतं. त्यानंतर लगेच डावीकडे दुसरा प्रशस्त, मजबूत आणि सुस्थितीतला गोमुखी दरवाजा दिसतो. चौकटीच्या दोन्ही बाजूस किल्ल्यांच्या सामर्थ्याचं प्रतीक असलेली 'शरभ' शिल्पे कोरलेली दिसतात.
फत्ते बुरुजातील जंग्या , हस्तिमुख आणि डावीकडे दुसरा दरवाजा
चौकटीवर कोरलेली शरभ शिल्पं (Rohida)
 
                       हा दुसरा दरवाजा ओलांडून आत आल्यास समोर कातळ आणि उजवीकडे भूमिगत पाण्याची टाकी दिसते. टाकीत उतरण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था असून अंधाऱ्या टाकीत उजेड येण्यासाठी पलीकडे वर तिसऱ्या दरवाजाकडे जाणाऱ्या पायऱ्यांच्या ठिकाणी कातळात झरोका दिसतो. सध्या या  टाकीतील पाणी पिण्यालायक नाही. अगदी अरुंद, अवघड जागेत पाषाणात कोरलेली ही प्रशस्त भूमिगत टाकी उत्कृष्ट कातळशिल्पाचा नमुना वाटते. या दरवाज्याच्या डावीकडे पहारेकऱ्यांसाठी देवडी असावी पण ती उध्वस्त दिसते. 
भूमिगत पाण्याची टाकी (Rohida)

                     







                       इथून पुन्हा काटकोनात उजवीकडे ३०-४० पायऱ्या चढून वर गेल्यास समोर  किल्ल्याच्या वैभवात भर घालणारा तिसरा दरवाजा दिसतो. पाषाणात घडवलेली चौकट आणि दोन्ही बाजूच्या पाषाणी भिंती वगळता बाकीचं बांधकाम उध्वस्त दिसतं. ही उध्वस्त करण्याची किमया नक्कीच इंग्रज डोक्यांची असावी. शिल्लक राहिलेलं बांधकाम अजूनही मजबूत दिसतं. 
                    मुख्य चौकटीवर दोन्ही बाजूस कमळ पुष्प, तर दरवाज्याच्या चौकटी बाहेर दोन्ही बाजूस  पाषाणी हत्तीमुखांची सुंदर उठावदार शिल्प कोरलेली आहेत. या शिल्पांच्या बाजूला डावीकडे देवनागरी आणि उजवीकडे फारसी भाषेतील शिलालेख कोरलेले दिसतात. फारशी शिलालेखावरून या तिसऱ्या दरवाज्याचं बांधकाम मोहम्मद आदिलशहाने सोळाव्या शतकात केलं असा इतिहास संशोधकांचा अनुमान निघतो. या दरवाज्याची कोरीव पाषाणी कमान, उठावदार हस्त शिल्प आणि चौकटीवरील कोरलेले दोन्हीं शिलालेख हे खूप सुंदर आणि बघण्यासारखं आहे. 
 
अप्रतिम तिसरा दरवाजा (Rohida Fort)

               या दरवाजातून आत आल्यास उजवीकडे पहारेकऱ्यांची देवडी दिसते. आणि अगदी समोर गडावर महत्वाची समजली जाणारी आणि जिथे न्यायनिवाडा व इतर महत्वाचे निर्णय घेतले जात त्या 'सदरे'च्या वास्तूचा चौथरा दिसतो.
                    सदरेच्या मागे गडसपाटीवर 'रोहिडमल्ला'चं जिर्णोद्धार केलेलं सुस्थितीतील मंदिर दिसतं. मंदिराच्या व्हरांड्यात दहा पंधराजण वस्ती राहू शकतात. मंदिरासमोर स्वच्छ पाण्याचं तळं आहे. तळं सध्या जाळीच्या कुंपणांन बंदिस्त दिसतं. मंदिर आणि या तळ्याच्या उजवीकडील बाजूस गडावरील आणखी एक प्रशस्त तळं आहे. या तळ्याकाठावर बसण्यास बाकड्याची व्यवस्था आहे.
 
सदरेचे अवशेष (Rohida Fort)


रोहिडमल्ल (भैरव) मंदिर 
राजवाड्याचे अवशेष (Rohida)
रोहिडमल्ल (भैरव) मंदिर (Rohida Fort)
रोहिडमल्ल मंदिराच्या उजवीकडील तळं (Rohida Fort)

जुन्या भांड्यांचे अवशेष (Rohida Fort)


                  सदरेच्या डावीकडे किल्लेदाराच्या वाड्याचे अवशेष दिसतात. बाजूलाच गडावर सापडलेली जुन्या पाषाणी, खापरांच्या भांड्यांचे तुकडे, पाटा वरवंटा आणि शिवलिंग बैठकीवर मांडून ठेवलेले आहेत.
                          इथे डावीकडून गडफेरी सुरूवात केल्यास गडाच्या दक्षिणेस सुंदर सोपान मार्गाचा आणि वैशिष्ठ्यपूर्ण बांधकाम केलेला 'शिरवले' बुरुज दिसतो. बुरुज थोडा सखलात असून बुरुजावर उतरणाऱ्या पायऱ्या उध्वस्त आहेत. सध्या तिथं जाण्यासाठी अलीकडे डावीकडून पायवाट आहे. या बुरुजापासून अंदाजे तीन फुटावर पुन्हा बाहेरून बांधकाम केल्याचं दिसतं. कदाचित नंतर या बुरुजाचं मजबुतीकरण केलं असावं. त्यामुळं पहिल्या बुरुजाच्या मुळ जंग्या बंद दिसतात. नंतर केलेल्या बांधकामात फक्त वरच्या बाजूला जंग्या आहेत. 
शिरवले बुरुज (Rohida Fort)
 
जामगुडे बुरुज (Rohida Fort)

                    शिरवले बुरुजापासून जवळच डावीकडे 'दामगुडे' बुरुज दिसतो. साध्या आणि तटबंदी सदृश्य दिसणाऱ्या या बुरुजात जंग्या ठेवलेल्या दिसतात. 
                    दामगुडे बुरुजाच्या पुढेच किल्ल्याच्या बांधकामाच्या वेळी दगडांचे सांधे भरण्यासाठी वापरण्यात आलेला चुना मळण्याचा घाणा दिसतो. कातळात कोरलेल्या या चरात सध्या अवजड पाषाणी चाक विसावलेलं दिसतं. 
चुन्याचा घाणा (Rohida Fort)

      
पश्चिम उतारावरील एकत्रित पाण्याच्या टाक्या
                     या घाण्याजवळच गडाच्या पश्चिमेला कातळात कोरलेली पाण्याची टाकी दिसते. टाकीत उतरण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था दिसते. सध्या या टाकीभोवतीही जाळीदार कुंपण असून आजूबाजूला डोक्याइतकं उंच गवत माजलं आहे. या पाण्याच्या टाकीजवळच गडाच्या पश्चिम उतारावर आणखी पाच ते सहा टाक्या एकत्र दिसतात. या टाक्यांतील पाणीसाठा गडावरील इतर टाकींच्या मानाने जास्तच दिसतो. यातील काही टाक्या पाषाणात कोरलेल्या तर काही बांधवलेल्या दिसतात. या सर्व टाक्यातील पाणी सध्या पिण्यालायक स्वच्छ दिसत नाही. 
पश्चिम उतारावरील एकत्रित पाण्याच्या टाक्या
पाटणे बुरुज (Rohida Fort)
               त्या पुढेच हाकेच्या अंतरावर 'पाटणे' बुरुज दिसतो. बुरुजाची रचना जमिनी पासून थोड्या उंचीवर उठाव दिल्याप्रमाणे भासते.
                   किल्ल्याच्या वायव्य दिशेला 'वाघजाई' बुरुज दिसतो. याचं बांधकाम शिरवले बुरुजाप्रमाणेच वैशिष्ट्यपूर्ण, सुंदर आहे. शत्रूवर मारगिरी करण्यासाठी ठेवलेल्या आधीच्या जंग्या नंतर केलेल्या मजबुतीकरणामुळं बंद दिसतात. या बुरुजावरून, बुरुजाकडे येणाऱ्या डोंगराच्या सोंडेवर सरासरी दीड किमीवर वाघजाई देवीचे देऊळ दिसतं. देवीच्या नावावरून या बुरुजाला हे नांव दिलं असावं. 
वाघजाई बुरुज (Rohida Fort)

वाघजाई बुरुज (Rohida Fort)
                वाघजाई बुरुजाच्या पुढेच गडाच्या उत्तरेला एकमेव आणि सुस्थितीत दिसणारी लांबलचक तटबंदी दिसते. या तटबंदीच्या टोकाला गडावरून खाली वाघजाई देवळाकडे उतरण्यासाठी 'चोर' दरवाज्याची व्यवस्था केलेली दिसते. या दरवाज्यातून आत गेल्यास गडाखाली प्रचंड खोल दरी आणि दरीत घनदाट जंगल दिसतं. वैशिष्ट्यपूर्ण अशी या चोर दरवाज्याची रचना दिसते. 
चोर (गुप्त) दरवाजा (Rohida Fort)
                  भोरहून बाजारवाडीला येताना बाजारवाडी आधी ५ किमीवर 'हातनोशी' गाव लागतं. या गावातून 'रामोशीवाडी'मार्गे वाघजाई मंदिर आणि पुढे या गुप्त चोर दरवाजातून एक पायवाट किल्ल्यावर येते. हातनोशीतून दीड दोन तास पायी अंतर असलेली ही पायवाट या खोल दरीमुळं खूपच धोकादायक आहे. त्यामुळं सध्या ट्रेकर्स बाजारवाडी मार्गे रोहिडा सर करताना दिसतात.
              पुढे चालत राहिल्यास पूर्वेला 'सर्जा' बुरुज नजरेस पडतो. हा बुरुजही रेखीव, सुंदर आहे. बुरुजात जागोजागी आवश्यकतेनुसार जंग्या ठेवलेल्या दिसतात. बुरुजावर ध्वजकाठीच्या चौथऱ्याची पडझड झालेली दिसते. बाजूलाच बसण्यासाठी बाकड्यांची व्यवस्था दिसते. 
सर्जा बुरुज (Rohida Fort)

सदरेच्या बुरुज (Rohida Fort)
             पुढे सदरेसमोर बुरुज आहे. याला 'सदरेचा' बुरुज म्हणतात. इथे गडफेरी पूर्ण होते. गडावर स्वच्छ्ता राखलेली दिसते. प्रत्येक बुरुजाजवळ नांव लिहिलेला फलक आणि बसण्यासाठी लोखंडी आरामदायी बाकडयांची सोय दिसते. मित्रानं दिलेल्या माहितीनुसार पावसात या गडाच्या दरडीवरून कोसळणारे धबधबे, इथली हिरवळ आणि झोंबणारा वारा अनुभवण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते. गडमाथा आटोपशीर असून, तासाभरात गडफेरी पूर्ण होते. आम्ही डावीकडून गडफेरी केली. ती उजवीकडूनही करता येते. गडावर सध्या पावसानंतर डोक्याइतकं उंच वाढलेलं गवत दिसतं. 
                      किल्ल्याचा आकार अंदाजे चौकोनाकृती किंवा पंचकोनी असून किल्ल्याच्या पूर्व दिशेनं गडप्रवेश होतो. किल्ल्यास असलेले मुख्य तीन दरवाजे, शिरवले बुरुज, वाघजाई बुरुज, सर्जा बुरुज, रोहिडमल्ल मंदिर, त्या समोरील पाण्याचं तळं आणि वैशिष्ठ्यपूर्ण तटबंदीतील गुप्त (चोर) दरवाजा किल्ल्याच्या वैभवात विशेष भर घालताना दिसतात. गडाला एकूण सहा बुरुज असून त्यांचं बांधकाम अजूनही मजबूत दिसतं. गडावरील पाण्याची तळी आणि कोरलेल्या टाक्या, त्यावेळी गडावर असणारी शिबंदी आणि राबता सिद्ध करतात.
 
सर्जा बुरुजावरून दिसणारे किल्ल्याचे दरवाजे (Rohida Fort)
                 किल्ले रोहिड्याची बांधणी यादव कालीन आहे. फारशी शिलालेखावरून सोळाव्या शतकात रोहिडा मोहम्मद आदिलशहाच्या ताब्यात असावा. स्वराज्य स्थापनेनंतर १६५६ ला रोहिड्याच्या कृष्णाजी बांदल देशमुखांनी स्वराज्यात सामील होण्यास विरोध केला. त्यामुळं स्वकियांच्या अंतर्गत कारवाया रोखून त्यांच्या बंदोबस्तासाठी शिवरायांनी रोहिड्यावर हल्ला केला. झालेल्या हातघाईत कृष्णाजी बांदल कामी आले. बाजीप्रभू देशपांडे या कृष्णाजींच्या कारभाऱ्याचा पराक्रम त्यावेळी शिवरायांनी पहिला. बाजीप्रभू आणि त्यांच्या सहकाऱ्यांना राजांनी त्यावेळी स्वराज्यात सामील करून घेतलं. शेवटपर्यंत बाजीप्रभूंनी आपलं ईमान राजांच्या पायी वाहिलं. 
                    तर कृष्णाजी बांदलांचा मृत्यू १६४८ लाच झाला होता. १६५६ ला राजांनी गड आदिलशाहीचे किल्लेदार विठ्ठल मुदगल यांच्या कडून जिंकून घेतला होता. या दोन्ही गोष्टींबद्दल इतिहासात तफावत आढळते.
                        बांदल या शब्दाची उत्पत्ती 'बाण दल' पासून झाली असावी. 
हस्तशिल्प आणि शिलालेख -तिसरा दरवाजा 

                   १६६६ ला पुरंदर तहात रोहिडा मुघलांकडे गेला. २४ जुन १६७० ला तो राजांनी परत जिंकून घेतला. संभाजीराजांनंतर गड पुन्हा मुघलांकडे गेला. १६८९ ला स्वराज्याचे पंत सचिव शंकराजी नारायण यांनी रोहिडा पुन्हा स्वराज्यात आणला. अगदी भारताला स्वातंत्र्य मिळून संस्थाने खालसा होईपर्यंतपर्यंत हा किल्ला 'भोर'च्या संस्थानिकांकडे होता. सध्या भोर तालुक्यात संस्थानिकांचा राजवाडा सुस्थितीत पाहायला मिळतो. 
भोर संस्थानिकांचा वाडा (Bhor Rohida)
                 त्याचप्रमाणे कान्होजी नाईक - जेध्यांकडे या भोर मावळ प्रांतातील देशमुखी होती. शहाजी राजांच्या मर्जीतील आणि त्यांचे समवयस्कर कान्होजींनी आदिलशाही सरदार अफजल खान आक्रमणाच्या वेळी शिवाजी राजांना सर्वतो मदत केली. आदिलशहानं मावळ प्रांतातील सर्व देशमुखांना अफझलखानास सहाय्य करण्याची धमकीची पत्रे दिली होती. आदिलशहाच्या धमकीमुळे बिथरलेल्या मावळ प्रांतातील सर्व देशमुखांना कान्होजींनी संघटित करून राजांच्या पाठीशी उभे केले. प्रतापगडाच्या युद्धात त्यांनी विशेष पराक्रम गाजवला. 
                  कान्होजी 'तलवारीच्या पहिल्या पानाचे मानकरी' होते. त्यांचं प्रचंड संघटन कौशल्य राजांच्या नेहमीच उपयोगी पडलं. आग्र्याहून औरंगजेबच्या नजर कैदेतून शिवाजीराजांना परत आणण्यासही कान्होजींचं योगदान होतं. शहाजीराजे, शिवाजी राजे आणि संभाजी राजे अशा तीन पिढ्यांना जेध्यांची प्रामाणिक साथ लाभली. 
भोर शहरातील शिवरायांचा अश्वारूढ श्वेत पुतळा
                       कान्होजींचे वंशज केशवराव जेधे 'संयुक्त महाराष्ट्र चळवळ समिती'चे अध्यक्ष होते. मुंबईतील 'हुतात्मा चौक' हे नाव आणि महाराष्ट्राला अभिमान वाटावा असा १ मे रोजीचा दरवर्षी साजरा होणारा 'महाराष्ट्र दिन' यासाठी केशवराव जेधेंचं नेतृत्व लाभलं.
                       येसाजी कंक, सुभेदार तानाजी मालुसरे अशी कितीतरी लढावू वीररत्नं या मावळ खोऱ्यात जन्मली. इथल्या डोंगर मातीत भटकताना त्यांनी स्वराज्यासाठी केलेल्या पराक्रमांचे, बलिदानाचे पोवाडे डोक्यात घुमू लागतात आणि भटकंतीला वेगळाच रंग चढतो..
                                      || श्री कृष्णार्पणमस्तू ||
येथे - जयवंत जाधव 

'किल्ले विसापूर' - मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Pune, Maharashtra.

                           उन्हाळ्यात शुष्क झालेल्या धरतीला पावसाने तजेला दिल्यानंतर सह्याद्रीतल्या दऱ्या डोंगरांचे रूप विलोभनीय असेच दिसते....