Sunday, 27 March 2022

ऑफबीट - 'चिरनेर', रायगड, महाराष्ट्र. Offbeat - 'Chirner', Raigad, Maharashtra.

              'चिरनेर'. रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्याचे एक अपरंपरागत, निसर्गरम्य समुद्रालगत आणि पुरातन इतिहास सांगणारं छोटं गांवखेडं. चिरनेरचा ऐतिहासिक सत्याग्रह, पुरातन जागृत महागणपती आणि श्रीशंभू महादेव प्रसिद्ध आहे. नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान 'पोपटी'चा हंगाम, बऱ्याच प्रमाणात इथं असलेली शेततळी आणि इथली मातीची भांडी हे सर्व नजीकच्या काळात मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे शहरातील निसर्गप्रेमी आणि भाविकांना आकर्षित करताना दिसतं. 
श्री महागणपती. चिरनेर, रायगड. (Chirner, Raigad)

गाभाऱ्याच्या चौकटीवरील शिल्प गणेशपट्टी 

           द्रोणागिरी किल्ला, सागरी वाहतुकीचं जवाहरलाल नेहरू पोर्ट (जेएनपीटी), शहरीकरणात अग्रेसर असलेलं उल्वे शहर, अटल सागरी सेतु (न्हावा शेवा) आणि पनवेल नजीक होणारं आंतरराष्ट्रीय विमानतळ यामुळं उरण परिसर सध्या लक्षणीय प्रगती करताना दिसतो. 
               उरणच्या पूर्वेला १४ किमी आणि पनवेलच्या पश्चिमेला २४ किमी असलेलं हे 'चिरनेर' मध्यवर्ती ठिकाण म्हणता येईल. १२०० वर्षापूर्वी शिलाहार घराण्यातील 'बिंबी' राजाची इथल्या कोकण प्रांतावर सत्ता होती. चिरनेर हे त्यावेळीही मुंबई बंदराशी व्यापारी संबंध ठेवून होतं. त्यामुळं या खेड्यात आठरापगड जातीच्या लोकांची वस्ती एकवटली. मंदिरं उभारली. कदाचित त्यावेळचं इथलं गणपती आणि शंभू महादेव मंदिर  असावं.
श्री महागणपती मंदिर. चिरनेर, रायगड. (Chirner, Raigad)

                 सरासरी शंभर वर्षांपर्यंत इथं घनदाट जंगल होतं. स्थानिक आगरी समाज जंगलातून मध, जळाऊ लाकूड, पशुपालन, फळे, रानभाज्या आणि शिकार यावर गुजराण करत. १८७८ च्या जंगल कायद्यात सुधारणा करून १९२७ ला इंग्रजांनी स्थानिकांना जंगलात बंदी घातली. त्यांच्या पोटापाण्याचे हाल होऊ लागले. साऱ्या भारतवर्षात थोड्याअधिक फरकानं स्थानिकांवर हीच वेळ आली. देशभर जंगल सत्याग्रह पुकारला गेला. त्या सत्याग्रहास उरण, चिरनेरच्या आगरी जनतेने भरघोस पाठिंबा दिला. 
हुतात्मा स्मारक. चिरनेर.(Chirner)

            अहिंसेच्या मार्गानं चाललेल्या या आंदोलनाला हिंसेचं वळण मिळालं. २५ सप्टेंबर १९३० ला चिरनेरच्या 'अक्कादेवी'च्या माळरानावर ब्रिटिशांनी गोळीबार केला. त्यात काही स्थानिक मारले गेले. घटनेच्या चौकशी दरम्यान चिरनेरचे काही आरोपी ठरवून पकडले. गावात पोलिस चौकी नसल्यानं या गणपतीच्या देवळात त्यांना कोंडून मारहाण करण्यात आली. 

               या घटनेचा निषेध करण्यासाठी गावातील बाळाराम रामजी ठाकूर हा तरुण देवळाजवळ आला. त्यावेळी पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला. बाळारामचा हात जखमी झाला. त्या दरम्यान एक गोळी देवळाच्या लोखंडी गजाला लागली होती. चिरनेर ग्रामस्थांनी हा लोखंडी गज आठवण म्हणून आजही जपून ठेवला आहे. 

                देवळात प्रवेश करताना डाव्या बाजूला हा गोळी लागलेला गज सर्वांना स्पष्ट दिसेल असा खिडकीत बंदिस्त करून ठेवला आहे. 

१९३० चा गोळी लागलेला लोखंडी गज. चिरनेर.

 

  
 

               त्यावेळी एकूण आठ क्रांतिकारक शहीद झाले. त्यांच्या स्मरणार्थ जानेवारी १९३२ ला स्मृतिस्तंभ बांधला गेला. पण जून १९३२ ला लगेच तो इंग्रज सरकारनं पाडला. पुन्हा जानेवारी १९३९ ला मुंबई जिल्ह्याचे प्रमुख प्रधान श्री खेर यांच्या हस्ते तो उभारण्यात आला. हा भव्य सुंदर शिल्पस्तंभ स्मारक मंदिराला लागूनच दक्षिणेला दिसतो. 
हुतात्मा स्तंभ (Chirner)

                सप्टेंबर २००५ साली तळ्याकाठावर राखीव जागेत हुतात्मा क्रांतीकारकांचे भव्य बोलके पुतळे उभारलेले आहेत. प्रत्येक पुतळ्याखाली त्यांचे नांव, गांव आणि कोणत्या क्षणी त्यांना वीरमरण आलं, त्याचा उल्लेख लिहिलेला दिसतो. श्री महागणपतीचा आशीर्वाद घेणारा प्रत्यक भाविक इथं ओढला जातो आणि या हुतात्म्यापुढे नतमस्तक होतो.

           बाराव्या शतकापासून इस्लामिक आणि त्यानंतर पोर्तुगीजांनी केलेली आक्रमणं आणि जबरदस्तीचं धर्मपरिवर्तन यातून मंदिरं आणि मुर्त्याही सुटल्या नाहीत. मंदिरं तुटली पण त्यावेळच्या पूजाऱ्यांनी मुर्त्या वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. कुठे तळघरात, विहिरीत, तळ्यात तर कुठे जमिनीखाली मुर्त्या लपविल्या गेल्या. शिवछत्रपतींनी लावलेला स्वराज्याचा वटवृक्ष पेशवेकाळात अगदी अटकेपार फोफावला. आणि पुन्हा देव, देश आणि स्वधर्म वाढीस लागला. 

           जसे नानासाहेब पेशवे गणेशभक्त होते, तसे उरण प्रांताचे त्यांचे सुभेदार रामजी महादेव फडकेही गणेशभक्त होते. धर्मांतरासाठी छळणाऱ्या पोर्तुगीजांचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला. त्यांनी उरण, पाली पोर्तुगीज मुक्त केली. त्यांना तळ्यातल्या गणेशाचा दृष्टान्त झाला आणि या महागणपतीची पुन्हा स्थापना झाली. 

            तळ्याकाठावर श्री महागणपती मंदिर बांधलं. मंदिराच्या पूर्वेस असलेल्या तळ्यास 'देवाचं तळं' नांव पडलं. पाच फुट उंचीची श्री महागणपतीची सिंदूरचर्चित भव्य मूर्ती पूर्वाभिमुख आहे. महडचा स्वयंभू श्री वरदविनायक आणि या मूर्तीत बरंच साम्य दिसतं. मूर्ती इतकी प्रसन्न, सुंदर आहे की, बघताक्षणी भाविक सुखावून जातो. गाभाऱ्यासमोर उंच पितळी रेखीव स्तंभावर मोठा नक्षीदार मूषक श्री महागणपतीकडे तोंड करून दोन पायावर उभा आहे.

गाभाऱ्यासमोरील पितळी मूषक 
           

मंदिराचं नवीन बांधलेलं सभामंडप (Chirner) 

             मंदिराचा गाभारा दगडी असून, अंतराळ गोल घुमटाकार आहे. गाभाऱ्याच्या चौकटीवर दगडात कोरलेली गणेशपट्टि दिसते. गाभाऱ्यावर पितळी कळस आहे. गाभाऱ्याच्या चार कोपऱ्यात चार चबुतरेही ठेवले आहेत. सध्या मूळ गाभाऱ्याला बाहेरून प्लास्टर केले असून, पूर्ण मंदिराला आतून बाहेरून उठावदार रंग लावलेला दिसतो. पुढे कालांतरानं गाभाऱ्यापुढील सभामंडप बांधलेला दिसतो. 

           या सभामंडपास लागूनच नजीकच्या काळात आणखी एक प्रशस्त मंडप बांधलेला दिसतो. हा नवीन सभामंडप इतका मोठा आहे की, गावातील लग्न आणि इतर शुभकार्य या मंडपातच केली जातात. तळ्याकाठच्या या मंदिरासमोर प्रशस्त समतल मोकळी जागा दिसते. मंदिराच्या उजवीकडे दक्षिणेला जुनं कौलारू मारुती मंदिर दिसतं. 

            तळ्याकाठावरच गणपती मंदिरासमोर पुरातन श्रीशंभू महादेवाचं मंदिर आहे. मंदिराचा सभामंडप नजीकच्या काळात बांधला आहे. गाभारा लहान असून गाभाऱ्याच्या उजवीकडे दिवडीत गणेश तर डावीकडील दिवडीत कार्तिक स्वामींची सुबक मूर्ती दिसते. गाभाऱ्यात शिवपिंडी आणि पिंडीवर कलशातून पडणारी अखंड जलधार दिसते. पिंडीमागे पाषाणी दिवडीत माता पार्वती स्थापित दिसते. गाभाऱ्यासमोरच सभामंडपात पाषाणात घडविलेला नंदी दिसतो. 

    

श्री शंभू महादेव मंदिर. चिरनेर. रायगड. (Chirner)
गद्धेगळ (Chirner)

            मंदिराच्या बाजूलाच जमिनीत उभी शेंदूर लावलेली गद्धेगळ दिसते. अगदी तळ्याकाठावर हे मंदिर आहे. 

नंदी 

         इ. स. १७३९ ला वसईच्या स्वारीवर निघता ना चिमाजी आप्पांनी हा महागणपती आणि श्रीशंभू महादेवाचे आशीर्वाद घेतल्याची माहिती चिरनेर गावात मिळते. 

शिवलिंग आणि मागे माता पार्वती (Chirner)

              




           

           या भव्य तळ्याला एकूण चार दगडी घाट आहेत. काही स्थानिक घाटावर झाडांच्या सावलीत मासेमारीसाठी पाण्यात गळ टाकून निवांत बसलेले दिसतात. 

मासेमारी करणारे स्थानिक (Chirner)

देवाचं तळं (Chirner)

देवाचं तळं - डावीकडे महादेव आणि समोर महागणपती मंदिर (Chirner)

             चिरनेर गावात मातीची भांडी तयार करून येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांना विकण्याचा व्यवसायही दिसतो. त्यासाठी लागणारी माती इथल्या शेतातून काढली जाते. माती काढल्यानंतर तयार झालेल्या खड्ड्यात पाणी साठवून शेततळी तयार करतात. या शेततळ्यात मस्त्योद्योग करताना स्थानिक दिसतात. 

  

पोपटी पार्टीचा आस्वाद घेताना पनवेलचं महिला मंडळ (Chirner)

भांडी विकणारी चिरनेर'ची भगिनी 

 

मातीची भांडी बनवताना (Chirner)

  

             निसर्गाच्या सानिध्यात इथली शेततळी, तळ्याकाठी प्रशस्त जागेतील महागणपती, श्रीशंभू महादेव, कौलारू मारुती मंदिर, हुतात्म्याचे बोलके भावूक पुतळे आणि भव्य शिल्प स्मारक त्याचबरोबर इथली शांतता, हे रोजच्या धावपळीतुन एकदा तरी अनुभवावं असंच आहे..

                                      || श्री कृष्णार्पणमस्तु ||

येथे - जयवंत जाधव 

Saturday, 12 March 2022

श्री लक्ष्मी नृसिंह - श्रीक्षेत्र निरा नृसिंहपूर (Shri Neera Nrusinhpur)

          'नरसिंह होऊनिया, घुमवित गर्जनांसी; शतसूर्य तेज दावा, अज्ञात या जणांशी'..या श्रीधर फडकेंच्या भक्ति गीतातील नरसिंह अवतारातील भगवान विष्णूंची मंदिरं महाराष्ट्रात खूप कमी दिसतात. प्राचीन आणि ठराविक मुख्य मंदिरांपैकी 'निरा नृसिंहपुर' हे एक आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्य प्रदेशातील अनेक भक्तांचा 'श्री नृसिंह' कुलस्वामी आहेच पण ज्यांचा कुलस्वामी नाही, त्यांनाही भयमुक्त करणारा हा श्री विष्णू अवतार आकर्षित करताना दिसतो.   

 श्री विष्णू (Neera Nrusinhpur)

           श्रीक्षेत्र निरा नृसिंहपुर हे आमच्या राहत्या पनवेलहून २८५ किमी तर पुणे जिल्ह्यात, पुणे शहरापासून अंदाजे १८५ किमी, अग्नेयेस, इंदापूर तालुक्यात, सोलापूर जिल्ह्याच्या काठावर भिमा आणि निरा नदीच्या पवित्र संगमावर स्थापित आहे. रेल्वेनं यायचं झाल्यास कुर्डुवाडी स्टेशनवर उतरून, सोलापूर महामार्गावरील टेंभूर्णी आणि पुढे अकलुजला जाणाऱ्या एस्. टी. बसनं 'संगम चौक'ला उतरावं. पुढे रिक्षानं दीड किमी वरील भीमा नदीचा पूल ओलांडल्यास डावीकडं हे पुरातन श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर लक्ष वेधून घेतं. स्वतःचं वाहन असल्यास हेच अंतर पाच सहा तासात गाठता येतं. 

भीमा नदीवरील पूल 
श्रीक्षेत्र निरा नृसिंहपूर (Neera Nrusinhpur)


श्री लक्ष्मी नृसिंह (Neera Nrusinhpur)

            भिमा नदीनं पश्चिम - उत्तर - पूर्व असा वळणदार घेतलेला वळसा आणि दक्षिणेकडून भिमेला पूर्वेस मिळालेली निरा नदी, यामुळं निरा नृसिंहपुर हा अगदी सिंहाच्या नखाच्या आकारातील भूप्रदेश दिसतो. आणि या अवतारी ठिकाणाबद्दल हेही एक वैशिष्ठ्य म्हणावं लागेल.

           दैत्यासुर हिरण्यकश्यपू वधासाठी घेतलेला श्री विष्णूंचा नृसिंह हा चौथा अवतार मानलं गेलं आहे. तर याआधी हिरण्यकश्यपूचा भाऊ हिरणाक्ष, ज्यानं अत्याचारानं पृथ्वी रसातळाला नेली होती, त्याच्या निर्दालनसाठी तिसऱ्या अवतारात श्री विष्णूंनी वराह अवतार घेतला. आपला बंधू  हिरणाक्षाच्या वधामुळं हिरण्यकश्यपू सुडानं पेटून उठला. श्री विष्णूला संपविण्यासाठी त्यानं ब्रह्मदेवाची घोर आराधना सुरू केली.

       दरम्यान इंद्रानं त्याच्या राज्यावर हल्ला चढवून हिरण्यकश्यपूची पत्नी 'कयाधू'चं हरण केलं. गर्भावस्थेत असलेल्या कयाधूची नारदांनी सुटका केली आणि आपल्या आश्रमात नेलं. त्रिकालज्ञानी नारदांनी कयाधूच्या गर्भातील प्रल्हादाला दिव्यज्ञानाचा उपदेश केला.

        ब्रम्हदेवाकडून अमरत्वाचा वर घेवून हिरण्यकश्यपू परतल्यानंतर प्रल्हादाचा जन्म झाला. नारद कृपेनं असुरपुत्र प्रल्हाद विष्णुभक्त झाला. पुढे नारदांकडे तो भीमा निरेच्या संगमावर येऊन भक्ति करू लागला. तिथं त्यानं वाळूची नृसिंहाची मूर्ती बनवून मनोभावे पूजु लागला. कालांतरानं श्री विष्णु प्रसन्न होऊन त्यास वर मागण्यास सांगितले. प्रह्लादानं श्री विष्णूना त्या मूर्तीत कायम वास्तव्य करण्यास सांगितलं. श्री विष्णूनी विनंती मान्य करून, मूर्तीचं दर्शन घेणाऱ्या भक्तांचे नित्य रक्षण करण्याचं वचन प्रल्हादास दिलं. 

दक्षिण प्रवेशद्वार (Shri Neera Nrusinhpur)

   

मंदिर मंडपातून गाभारा (Neera Nrusinhpur)

         







         आपला बंधु हिरणाक्षचा वध करणाऱ्या विष्णूप्रती प्रल्हादाची भक्ति बघून हिरण्यकश्यपू संतापून उठत असे. अनेक प्रयासांनी प्रल्हाद विष्णूभक्तिपासून ढळत नसल्याचं पाहून त्यानं प्रल्हादास जीवे मारण्याचे प्रयत्न केले. अंती भरसभेत हिरण्यकश्यपूनं प्रल्हादास विष्णूचं अस्तित्व विचारलं. सर्वव्यापी असल्यानं प्रल्हादानं समोर दिसणाऱ्या खांबाकडं बोट दाखवलं. 

            संतापून हिरण्यकश्यपूनं हातातील गदेनं त्या खांबावर प्रहार केले. त्यावेळी ब्रह्मांड फुटावेत असे खांबातून अति भयंकर आवाज झाले. मानवी धड आणि सिंहाचं तोंड असं श्रीहरी विष्णू भयंकर रुपात प्रकटले. कराल दाढा, चंचल तीक्ष्ण जीभ, कान शंकुसारखे ताठ होते. नाकपुड्या पर्वतातील गुहेसारख्या, तर मस्तक आणि वक्षस्थळ विशाल दिसत होतं.  चढवलेल्या भुवयांमुळं चेहरा उग्र झाला होता.  नखं हीच त्यांची शस्त्र होती. त्यांच्या जवळ जाणंही अशक्य होतं. तरीसुद्धा हिरण्यकश्यपूनं धाव घेवून त्यांना ललकारलं. 

           नृसिंह रूपातील श्री विष्णुंनी त्याला गदेसह अलगद उचलून, श्री ब्रम्हाच्या वरदानाचा मान राखत, ना घरात ना दरात तर  दोन्ही दारांच्या उंबऱ्यावर बसून; ना जमीन ना आकाश तर आपल्या मांडीवर उताणा पाडून; ना दिवसा ना रात्री तर संध्याकाळी; ना मानव ना प्राणी तर नर आणि सिंहाचा जोड अवतार घेऊन हिरण्यकश्यपूची छाती विदीर्ण केली. त्याला दूर फेकून दिलं. आजूबाजूच्या शस्त्रधारी राक्षासांनाही त्यांनी क्षणात संपविलं. 

         क्रोधानं तप्त, लाल झालेल्या नृसिंह मुखातून बाहेर आग पडू लागली. त्यांना शांत करण्यासाठी प्रत्यक्ष देवांचीही तारांबळ उडाली. शेवटी देवांनी प्रल्हादाला विनवणी केली. 

          प्रल्हाद उग्ररूपी नृसिंहाकडे गेला आणि नमस्कार घातला. लोक भयमुक्तीसाठी या आवताराचं स्मरण करतील अशी नरहरीस ग्वाही दिली. तेव्हा त्यांनी शांत होऊन देवी लक्ष्मी आणि शेषनागासह सर्वांना दर्शन दिलं. प्रल्हादास अनेक आशीर्वाद देऊन निघून गेले. 

              श्री विष्णुंनी घेतलेल्या या चौथ्या चमत्कारिक अवतार कथेवर भगवान व्यासांनी स्वतंत्र नृसिंहपुराण लिहिलं आहे. पद्मपुराणात निरा नृसिंहपुर हे सुदर्शनीय क्षेत्र असून, पृथ्वीच्या नाभिचं केंद्र असल्याचं भू वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालं आहे. हे भक्तांना आकर्षून घेणारं आणखी एक कारण असावं.

परिवार देवता मंदिरं (Neera Nrusinhpur)
 

          विष्णूभक्त ब्रम्हदेवाकृत आणि विष्णूभक्त प्रल्हादाकृत अशा दोन नृसिंह मूर्ती आज नीरा नृसिंहपूरच्या मंदिरातील एकाच गाभाऱ्यात स्थापित दिसतात. गाभाऱ्यातील प्रल्हादाकृत वाळूची मूर्ती ही आद्य मूर्ती मानली जाते. ती पश्चिमाभिमुख आहे. त्यामुळं मंदिराच्या पश्चिमेकडील दरवाज्याला 'महादरवाजा' म्हटलं जातं. या वाळूच्या मूर्तीची झीज होऊ नये म्हणून, मूर्तीवर वज्रलेप केल्याची माहिती आम्हाला मंदिरातील पुजाऱ्यांनी दिली. ब्रम्हदेवाकृत काळ्या पाषाणातील दुसरी श्रीमुर्ती या मूळ मूर्तीच्या डाव्या बाजूस त्याच गाभाऱ्यात उत्तराभिमुख दिसते. श्री विष्णुंचं नृसिंह अवतारातील भीषण रूप शांत झालेलं या मूर्तीत दिसतं. त्यामुळं या मूर्तीस 'शामराज' म्हणतात.

 

समोर प्रल्हादाकृत नृसिंह आणि उजवीकडे ब्रम्हदेवकृत नृसिंह 

 

               'श्री'च्या मूर्तीसमोर चांदीनं मढवलेली आडवी दांडी दिसते. समई, पूजा साहित्य ठेवण्यासाठी तिचा वापर होतो. चांदीत मढवलेल्या दांडीवर शंख, चक्र कमळ, गदा अशी श्री विष्णूची शुभ चिन्हे कोरलेली दिसतात. 

                श्री नृसिंह मंदिराच्या डाव्या बाजूलाच श्री लक्ष्मी मंदिर दिसतं. मंदिरावर दगडी शिखर आहे. शिखराच्या दोन दगडी फटीतून दिवस रात्र पाणी झिरपताना दिसतं. हा लहानसा पाझर 'गुप्त गंगा' म्हणून ओळखला जातो. या मंदिराचं शिखर नदीपात्रापासून सरासरी १५० फुट उंचीवर आहे. हा एक चमत्कार असून, तर्कशास्त्रानेही याचा आजपर्यंत उलगडा झालेला नाही.

 

मागे, समोर दिसणारे श्री लक्ष्मी मंदिर 

             निरा, भीमा आणि ही गुप्त गंगा असा त्रिवेणी संगम असल्यानं निरा नृसिंहपूर हे 'दक्षिण प्रयाग' म्हणून ओळखले जाते. ही प्रल्हादाची जन्मभूमी आणि तपोभूमी मानली जाते. या पवित्र क्षेत्राला महर्षि व्यास, आद्य शंकराचार्य, आद्य माधवाचार्य असे महात्मे येवून गेले. संत तुकाराम, त्यांची शिष्या बहिणाबाई कुलकर्णी,अहिल्याबाई होळकर, तात्या टोपे, दुसरे बाजीराव पेशवे इत्यादि इथे नृसिंह दर्शनास येऊन गेले. 

काशी विश्वेश्वर मंदिर (shri Neera Nrusinhpur)
श्री काशी विश्वेश्वर शिवलिंग 
    

            श्री नृसिंह मंदिरासमोर लाकडी मंडपात, 'श्री'च्या मूर्तीकडे तोंड करून प्रल्हाद मूर्ती दिसते.  प्रल्हाद मंडपात वर व आजूबाजूला लाकडी कपाटात दशावतार ठेवलेले दिसतात. मंदिराची मुख्य चौकट आणि दरवाजे पितळी असून, त्यावर अतिशय सुबक नक्षी कोरलेली दिसते. सभामंडप अनेक दगडी कोरीव खांबांवर तोललेला दिसतो.
श्री प्रल्हाद मूर्ती (Neera Nrusinhpur)

 

प्रल्हाद मंदिर (shri Neera Nrusinh)

          गाभाऱ्याच्या दोन्ही बाजूस दोन खोल्या असून त्यापैकी एक 'श्री'च शेजघर आहे. पहाटे साडे पाच वाजता मंदिर उघडले जाते. रात्री नऊ वाजता 'श्री' ची शेजारती होऊन ते बंद होतं. मंदिर व्यवस्थापनाची स्वतंत्र पाठशाळा असून, तिथं लहान मुलांना वेदाअभ्यास शिकविला जातो. धोतर आणि  पांढऱ्या बंडीत ही मुलं तिथं बागडताना दिसतात. 
  
'श्री' चे शेजघर 
                सरासरी इ. स. ८७० वर्षापूर्वी इथं मूळ मंदिर असावं. त्यानंतर १७८७ च्या पेशवेकाळात नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील, सरदार विठ्ठल शिवदेव विंचुरकरांच्या घराण्यानं पुढं टप्प्याटप्प्यानं या मंदिराचा जीर्णोद्धार करून सध्या दिसणारं मंदिर बांधल्याचं निरा नृसिंहपुरचा इतिहास सांगतो. यंत्राकर बांधलेल्या चबुतऱ्यावर श्रीमुर्ती विराजित असून त्यावर 'श्री'चे अंतराळ व गर्भगृह बांधलेलं दिसतं. पुढे विठ्ठल शिवदेवांचे पुत्र शिवाजी विठ्ठल यांनी मंदिराच्या अंतराळापुढील दगडी मंडप, पश्चिम दरवाजा व नगारखाना बांधवून घेतला. त्यांचे पणतू विठ्ठल नरसिंह यांनी मंदिराचा लाकडी सभामंडप, धर्मशाळा आणि पूर्वेकडील अभेद्य तटात दोन्ही बाजूचे भक्कम दिसणारे बुरूज बांधले. 

              हेमाडपंथी बांधणीच्या या मंदिरास भक्कम असा तट दिसतो. मंदिराच्या दक्षिण, पूर्व आणि उत्तरेस ओवऱ्या दिसतात. विठ्ठल शिवदेवांचे खापर पणतू रघुनाथरावांनी मंदिराच्या शिखराचा जीर्णोद्धार केला. त्यांनीच 'श्री'चे सिंहासन चांदीनं मढविल्याची इतिहासात नोंद मिळते. 

सोळखांबी मंदिर - भीमा निरा संगम 

भीमा निरा संगम 
           












              दादोजी मुधोजींनी १५२७ ला संगमावरील पुरातन दिसणारा घाट बांधला. त्यानीच संगमावरील सोळाखांबी दिसणारं ओवऱ्यांचं अश्वस्थ नृसिंह मंदिर बांधलं. 
१५२७ चा संगमावरील घाट 

संगमाकडे येणारा पदपथ बांधकाम 

               




           सध्या निरेच्या काठी मंदिराच्या दक्षिणेकडील उर्वरित घाट आणि पदरस्ता बांधण्याचं काम चालू दिसतं.

सध्या निरेकाठावरील घाट बांधणी काम 
    

         मंदिराच्या प्राकारात मंदिर उभारणी वेळी बसविलेला मुहूर्त गणपती, काशी विश्वेश्वर शिवलिंग, विठ्ठल रुक्मिणी, श्री दत्त अशा परिवार देवता दिसतात. मंदिराच्या डाव्या बाजूस जतन केलेला दुर्मिळ असा 'तरटी' वृक्ष दिसतो. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाचा मुक्काम नृसिंहपुर जवळील अकलूज येथे पडला होता. परधर्माचा तिरस्कार आणि धर्मस्थळे उद्ध्वस्त करण्यात त्याचा हातखंडा होताच. त्यावेळी पूजाऱ्यांनी दोन्ही नृसिंहाच्या मूर्ती या तरटी वृक्षाखाली तळघरात लपविल्या होत्या. 
डावीकडे विश्वेश्वर मंदिर, समोर मूळ नृसिंह मंदिर आणि उजवीकडे दुर्मिळ 'तरटी' वृक्ष 
  

पश्चिम दारावरील घाट 

        मंदिर उंच जोत्यावर बांधलं असून, मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन टप्प्यात पायऱ्या दिसतात. पैकी पावसाळ्यात भीमा निरेच्या महापुरात पाणी पहिल्या टप्प्यापर्यंत वर चढतं. पश्चिम दरवाज्यातून आत मंदिर प्राकारात आत आल्यास दोन्ही बाजूस तटबंदीत पहारेकऱ्यांच्या देवड्या दिसतात. त्यापुढेच एक प्रचंड घंटा दिसते. इ.स. १७३९ ला चिमाजी अप्पांनी पोर्तुगीजांकडून वसईचा किल्ला जिंकल्यावर, त्या किल्ल्यावरील चार प्रचंड मोठ्या घंटा ताब्यात घेतल्या. त्यापैकी ही एक आहे. याच पेशवेकाळात तिथं बाबा सोनार नावाचा प्रख्यात पैलवान होऊन गेला. मोठमोठी झाडं तो मूळापासून सहज उपटत असे. या पैलवानानं ही प्रचंड घाट डाव्या हातानं उचलून, उजव्या हातानं तिथल्या लाकडी तुळीला बांधली. त्यांच्या गौरवानिमित्त मंदिराच्या लाकडी माडीजवळ वर दर्शनी भागात त्याचा पुतळा दिसतो. 

प्राकारातील दीपमाळ, डावीकडे माडीवर पै. बाबा सोनार पुतळा 

                    वैशाख शुक्ल षष्ठी ते चतुर्दशी असे नऊ दिवस नृसिंह उत्सव साजरा होतो. १७९५ ला निजामाशी झालेल्या घनघोर युद्धात खंडेराव विंचुरकरांनी अतुलनीय पराक्रम गाजवला. नंतर ते निरा नृसिंहपूरी आले. पण त्यानंतर अचानक त्यांचं निधन झालं. विंचुरकर घराण्याचं या देवस्थानास अमोल योगदान मिळालं. त्यांच्या अचानक निधनामुळं आजही श्री नृसिंहाचा नवरात्र उत्सव वैशाख षष्ठी ऐवजी सप्तमीस सुरू होतो..                                              

                                   || श्री कृष्णार्पणमस्तू ||

येथे - जयवंत जाधव     

Saturday, 29 January 2022

प्रबळगड (Prabalgad Fort)

                    बरेच भटके कलावंतीण सुळका आणि 'प्रबळ' ठरवून येतात, पुढे प्रबळचा पसारा बघून  त्यातूनही बरेच माघार  घेताना दिसतात. किल्ले प्रबळचा स्वतःचा आवाका मोठाच म्हणावा लागेल. पायथ्याच्या ठाकुरवाडीपासून प्रबळवाडी आणि पुढे 'बैलशिंग' खिंडीतून प्रबळमाथा ही चढाई मुळी  तीन - चार तासांची आहे. पुढे दाट जंगलातून प्रबळचं पठार फिरण्यास दोन तीन तास लागतातच. प्रबळमाथ्यावर जाऊन येवून पाच किलोमीटर असलेल्या काळ्या बुरुजाला भेट देवून, पुन्हा पायथ्याची ठाकूरवाडी गाठणं नक्कीच सोप्पं नाही. दिवसभर तंगडतोड करायला लावणारी ही भटकंती आहे. 

'प्रबळ' (कलावंतीण वरुन)

                    सह्याद्रीच्या माथेरान डोंगररांगेतील या २३०० फुट उंचीच्या प्रबळचं प्रथम दर्शनच मुळी अवाढव्य, राकट, त्याचे नियम मोडल्यास निर्दयी आणि आजपर्यंत आम्ही सहकुटुंब केलेल्या प्रयत्नात हुलकावणी देणारा म्हणावा लागेल. जुना मुंबई पुणे हायवेवर पनवेल सोडल्यास पहिलं डावीकडं लक्ष वेधून घेतो तो किल्ले प्रबळ आणि त्यापुढेच अगदी समोर किल्ले ईर्शाळगड.

कलावंतीण कडून बैलशिंग खिंडीकडे जाणारी कातळवाट 

प्रबळमाचीवरुण डावीकडे कलावंतीण, उजवीकडे प्रबळ (Prabalgad Fort)
           

               प्रबळ आणि कलावंतिणचा रस्ता मुंबई - पुणे हायवेवर पनवेल सोडल्यास, १० किमी वरील 'शेडुंग' फाट्यापासून डावीकडं गडपायथ्याची ठाकूरवाडी आणि त्यापुढं तासभर प्रबळवाडी पर्यंत एकच आहे. सध्या प्रबळवाडीत जेवणाची राहण्याची सोय आहे. प्रबळवाडी पासून तासाभराची एक पायवाट पश्चिमेकडे प्रबळला समांतर जाते ती 'बैलशिंग' खिंडीत येते. तर कलावंतिण कडून यायचं झाल्यास, कलावंतिण - प्रबळमधील इंग्रजी 'V' आकाराच्या खिंडीपासून कातळकाठानं, दगडधोंडयातून दुसरी तासाभराची वाट याच 'बैलशिंग' खिंडीत येऊन मिळते. कातळापासून सुटलेल्या या धारदार दगडांच्या वाटेवर सावध पावलं टाकावी लागतात.

             गडाच्या उत्तरेकडील 'बैलशिंग' खिंड हीच प्रबळच्या माथ्यावर जाणारी एकमेव वाट म्हणावी लागेल. या खिंडीचा दुरून अंदाज येत नाही. दोन कातळ डोंगरांच्या मध्ये मोठमोठ्या दगडांची झालेली घसरण आणि चहाची टपरी, हीच या खिंडीतून प्रबळ माथ्यावर जाणाऱ्या वाटेची ओळख समजावी. ही वाट म्हणजे एकावर एक उभे दगड, आणि ते सर करत गडमाथा गाठणं इतकंच म्हणावं लागेल. दमछाक झाल्यावर खिंडीतला हा तिसरा उभा टप्पा शरीर पिळवटून टाकणारा आहे. आणि कदाचित या कारणामुळंच बरेच ट्रेकर्स प्रबळ समोर गूढघे टेकत असावेत.

कलावंतीण ते बैलशिंग खिंडीकडे 

      

                 प्रबळवर पाण्याचं दुर्भिक्षच म्हणावं लागेल. माथेरान आधी इंग्रजांनी थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रबळचा विचार केला होता, पण तिथल्या पाण्याच्या कमतरतेमुळं ते झालं नाही. सध्या माथेरानच्या सनसेट पॉइंटवरून पश्चिमेचा सूर्य, दूरवर एका इंग्रजी 'V' आकाराच्या डोंगरखाचेत अस्ताला जाताना दिसतो. ही खाच म्हणजेच प्रबळगड आणि त्या लगत खेटलेला कलावंतिण शिखराचा सुळका होय.
 
माथेरानच्या सनसेट पॉइंटवरून दिसणारी प्रबळ आणि कलावंतीणची 'V' आकाराची खाच (Prabalgad Fort)

 

                 या खाचेलगत डावीकडं कातळात खोदलेली गुहा दिसते. एका वेळी एकजण गूढघ्यावर रांगत आत शिरेल इतकी ती अरुंद, तर आत दूरवर खोदलेल्या गुहेत खोलीसारखी कमी उंचीची जागा दिसते. तर अशीच दुसरी कातळात खोदलेली गुहा बैलशिंग खिंडीच्या तोंडावर, डाव्या बाजूला, खिंड चढायला सुरुवात करण्यापूर्वी दिसते. प्रबळच्या कातळ पायथ्याला असणाऱ्या या दोन गुहा बौद्धकालीन असाव्यात असा अनुमान निघतो.

बैलशिंग खिंडीजवळील गुहा (Prabal Fort)

 

   
कलावंतीण जवळील बौद्धकालीन गुहा  

    
           या बौद्ध कालखंडानंतर येणारे शिलाहार, यादव राजवटींनी या गडास लष्करी चौकी बनवून त्यास 'मुरंजन' नांव दिलं. त्यावेळी पनवेल, कल्याण या प्राचीन बंदरांवर लक्ष ठेवण्यासाठी या चौकीचा वापर केला असावा. पुढे बहामणी काळात तो अधिक उदयास आला. नंतर तो अहमदनगरच्या निजामानं ताब्यात घेतला. मुघल सम्राट शहाजहान आणि विजापूरच्या आदिलशाहनं तह करून निजामशाही बुडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी निजामशाहीत असताना, शहाजीराजांनी निजामशाही वाचविण्यासाठी त्याच्या वारसाला घेवून कोंढाणा, मुरुंबदेवाच्या डोंगरात निघून गेले. 

                पुढे जंजिऱ्याच्या सिद्धीनं आणि चौलच्या पोर्तुगीजांनी शहाजीराजांना मदत नाकारल्यावर, ते जिजाऊ आणि बाल शिवरायांना घेवून ससैन्य मुरंजनवर गेले. शिवाजीराजे अवघे सहा वर्षाचे असतानाच त्यांचे पाऊल मुरंजन म्हणजे प्रबळला लागले होते. पुढे माहुलीच्या तहानुसार गड मुघलांच्या ताब्यात राहिला, पण प्रत्यक्षात सत्ता विजापूरच्या आदिलशाहचीच राहिली. 
                 १६५६ ला शिवरायांनी जावळीच्या चंद्रराव मोरेंना हरवून जावळी ताब्यात घेतली, त्याचवेळी शिवरायांचे शूर सरदार आबाजी महादेव यांनी कल्याण, भिवंडी ते रायरी पर्यंतचा मुलुख स्वराज्यात आणला आणि मुरंजन स्वराज्यात सामील झाला. गड ताब्यात आल्यावर शिवरायांनी मुरंजनचे नांव बदलून 'प्रबळगड' असे ठेवले. १६६५ च्या पुरंदर तहानुसार प्रबळगड मुघलांना देण्यात आला. पण औरंगजेबच्या आग्र्यातील कपटी घटनेनंतर तो तह मोडीत काढून मराठ्यांनी प्रबळ पुन्हा जिंकून घेतला. त्यावेळच्या लढाईत राजा जयसिंगाने नेमलेला प्रबळचा किल्लेदार केशरसिंह हाडा हा राजपूत धारातीर्थी पडला. तत्पूर्वी किल्ल्यावर राजपूत स्त्रियांनी जोहर केला. किल्ल्याच्या झडतीत सापडलेल्या केशरसिंहची आई आणि दोन मुलांना राजांनी देऊळगावी असलेल्या मोघली छावणीत सन्मानानं पाठवून दिलं. पुढे किल्ल्याच्या खोदकामात बरीच संपत्ति राजांच्या हाती आली. 
बैलशिंग खिंड (Prabalgad Fort)
बैलखिंडीची टपरी, प्रबळगड 

                    











                   बैलशिंग खिंडीतून गडमाथा गाठताना वर सुरुवातीला उध्वस्त महादरवाजा दिसतो. आधी तो मातीखाली दबला गेला होता, स्थानिकांच्या मदतीनं तो आता थोडाफार मोकळा केल्याचं दिसतं. या दरवाजाच्या उजव्या बाजूला उतारावर कातळात कोरलेली पाण्याची टाकी दिसते. महादरवाजाच्या आतील बाजूस चहाची आणि विसावा घेण्यासाठी टपरी दिसते. प्रबळवाडीतील एक दाम्पत्य ही टपरी चालवताना दिसतं. शेगडीसाठी लागणारं गॅस सिलेंडर प्रबळवाडीतून ही बैलशिंग खिंड चढून डोक्यावरून आणलं जातं. त्यांची मेहनत बघून, तिथं पोहोचणारा प्रत्येक भटक्या त्यांना सलाम करत असावा.
महादरवाजा (Prabalgad Fort)

उद्ध्वस्त महादरवाजा (Prabalgad Fort)
   
 

महादरवाजातुन दिसणारा किल्ले कर्नाळा (Prabalgad Fort)

             महादरवाजाच्या वरच्या बाजुनं डावी उजवीकडं  पायवाटा जातात. डावीकडील पायवाट दाट झाडीतून गडावरुन नैऋत्येला कलावंतिण सुळक्याच्या दिशेनं जाते, आणि वीस मिनिटात एका कड्यावर येऊन संपते. कलावंतिण सुळका प्रबळपेक्षा उंचीनं काहीसा कमी असल्यानं, प्रबळच्या ईशान्य कड्यावरून कलावंतिणचं धडकी भरवणारं दृश्य दिसतं. या कड्याला संरक्षित कुंपण नसल्यानं काळजी आणि सावधानता बाळगावी लागते. 

प्रबळच्या कड्यावरून कलावंतीण 

 

                 महादरवाजाकडे मागे येऊन उजवीकडील पायवाटेवर अर्ध्या तासाच्या चालीनंतर गडावरील उध्वस्त अवस्थेतील चार वाड्यांचे अवशेष दिसतात. वाड्यांच्या अवतीभोवती मोठमोठी झाडं आणि घनदाट वाढलेलं जंगल दिसतं. वाड्यासमोरून जाणाऱ्या पायवाटेवर जंगलातून पुढे उजवीकडं वळल्यास, ढासळलेल्या आणि त्यावर वाढलेल्या झाडांनी एक समाधी दिसते.

वाड्याचे अवशेष (Prabalgad Fort)

  

उद्ध्वस्त समाधी (Prabalgad Fort)
   

उद्ध्वस्त वाड्याचे अवशेष (Prabal Fort) 
                त्यापुढेच जंगलात उघड्यावर पडकं गणेश मंदिर दिसतं. मंदिराचा चौथरा, भिंती उध्वस्त असून, लाकडी मंडपावर पत्रे बसवून आडोसा केलेला दिसतो. गाभाऱ्याच्या ठिकाणी शेंदूर लावलेली गणेश मूर्ती आणि दुसऱ्या एका देवतेची भग्न मूर्ती दिसते. गणेश मूर्तीच्या मागे भग्नावस्थेतील शिवलिंग दिसतं. मंदिरासमोर मंडपात भग्न नंदी आणि मंदिराबाहेरच वाटेवर आणि मंदिराकडे तोंड करून दूसरा भग्न नंदी दिसतो. मंदिर मंडपातील दिसणाऱ्या पताका आणि आकाश कंदिलावरून, दसरा दिवाळीत आणि सणावाराला इथं पूजा होत असावी.                   
गणेश मंदिर (Prabalgad Fort)

                              मंदिराच्या पुढे दोन मिनिटांवर डावीकडं गडावरील सर्वात मोठं तळं दिसतं. आता ते गाळ आणि गवतानं भरलेलं आहे.

Prabalgad Fort 

 
प्रबळवरील तळं (Prabalgad Fort)

               
प्रबळवरील जंगल (Prabalgad Fort)

                 










                   या तळ्यापुढेच वीस मिनिटांवर एक किल्ले ईर्शाळ कडे जाणारी डोंगराची सोंड असून बाजूलाच उद्ध्वस्त दरवाजा दिसतो. 'बोरीची सोंड' म्हणून तिला ओळखलं जातं. या डोंगराच्या सोंडेवरून किल्ले ईर्शाळ दोन तासात गाठता येतो. हा मार्ग खूपच धोकादायक असून, इथून ईर्शाळला जाताना बरेच ट्रेकर्स फसले आहेत तर काहींना रेस्क्यू ऑपरेशन करून वाचविलेल्या बातम्या मिळतात. रेंज ट्रेकर्स इथून प्रयत्न करताना दिसतात. या  सोंडेवरून किल्ले कर्नाळा, ईर्शाळगड, मोरबे जलाशय आणि माणिकगड असा भव्य परिसर दिसतो.

 

बोरीची सोंड, समोर ईर्शाळ आणि डावीकडे मोरबे जलाशय (Prabalgad Fort) 

 

काळ्या बुरुजाजवळून दिसणारा इर्शाळ   

                   त्यापुढेच अर्ध्या तासाच्या अथक वाटचालीनंतर प्रबळच्या पूर्वेचं शेवटचं टोक आणि नामचीन 'काळा बुरूज' दिसतो. काळ्या कातळचे दगड बुरुजाला वापरले असल्यानं एकूण बुरुज काळाभिन्न दिसतो. रंगावरून याला 'काळा बुरूज' नांव पडलं असावं. या बुरुजाजवळूनही गडउतार होण्यासाठी चोर वाट आहे. सध्या तिची पडझड झाल्यानं धोकादायक आहे. काळ्या बुरुजावरून ईर्शाळ, मोरबे जलाशय आणि माथेरानचे विविध पॉईंट्स दिसतात.    

              प्रबळची भव्यता किल्ले ईर्शाळवरून दिसते. मागील ईर्शाळच्या भेटीत ती आम्ही अनुभवलीच. किल्ले ईर्शाळच्या भटकंतीचा अनुभव https://sahyadri300.blogspot.com/2020/11/irshalgad.html या लिंकवर लिहिला आहे. 
 
 ईर्शाळच्या भेटीत ईर्शाळवरून दिसणारा किल्ले प्रबळ आणि ईर्शाळकडे येणारी बोरीची सोंड 

                किल्ले प्रबळच्या चढाईचे टप्पे आणि त्याच्या पसाऱ्यामुळं, 'रेंज ट्रेकर्स' वगळता भटक्यांची भटकंती प्रबळच्या गडमाथ्यापर्यंतच थांबताना दिसते. प्रबळला प्राचीन इतिहास असूनही त्याचा शोध, अभ्यास अपुराच राहिलाय. प्रबळच्या निबीड जंगलातल्या फसव्या वाटा, उद्ध्वस्त तटबंदी, वाडे तसेच पाण्याचं दुर्भिक्ष हे सगळं मुंबई - ठाण्यापासून जवळ आणि मोक्याच्या जागी असूनही' किल्ले प्रबळ' दुर्लक्षित राहिलाय असं म्हणावं लागेल.. 
                                     || श्री कृष्णार्पणमस्तु ||
येथे - जयवंत जाधव     
     

'किल्ले विसापूर' - मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Pune, Maharashtra.

                           उन्हाळ्यात शुष्क झालेल्या धरतीला पावसाने तजेला दिल्यानंतर सह्याद्रीतल्या दऱ्या डोंगरांचे रूप विलोभनीय असेच दिसते....