Sunday, 15 October 2023

श्रीक्षेत्र कोळे नृसिंहपुर, ता. वाळवा, सांगली - Shri Kole Nrisinhpur, Walva, Dist. Sangli

                       मागील वर्षी भीमा निरेच्या पवित्र संगमावरील श्री लक्ष्मीनृसिंह मंदिराची भेट झाली. त्यानंतर या वर्षी सांगलीच्या वाळवा तालुक्यातील इस्लामपूर जवळ 'श्री कोळे नृसिंह' या अद्भुत स्थापत्य शैलीच्या प्राचीन मंदिराला भेटण्याचा योग आला. नृसिंह मंदिरांपैकी पश्चिम महाराष्ट्रातील कोळे नृसिंह, निरा नृसिंह आणि धोम नृसिंह ही मंदिरं पुरातन आहेत. त्यापैकी कोळे नृसिंहपुरला कृष्णेकाठी १४ फूट खोल भुयारात स्थापलेली नृसिंहाची शोडस मूर्ती आहे. गंडकी (Brimstone) शिळेतील  मूर्तीचं सौंदर्य आणि हेमाडपंथी मंदिराची त्रिस्तरीय अद्भुत स्थापत्यशैली बघण्यासारखी आहे. महाराष्ट्र आणि बाहेरील बऱ्याच भाविकांची ही स्फूर्तिदेवता कुलदैवत आहे.

                      इस्लामपूर पासून उत्तरेला १३ किमी आणि सातारा जिल्ह्यातील कराड पासून अग्नेयेला २१ किमी अंतरावर हे पुरातन मंदिर आहे.

श्री नृसिंह, श्रीक्षेत्र कोळे नृसिंहपूर 
                     इस्लामपूरहून इथे नियमित एसटी बसेसची सोय आहे. खाजगी किंवा स्वतःचं वाहन असणाऱ्या कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि पुढे कर्नाटकाकडील पुणे, मुंबईकरांना जाता - येता इथे सहज भेट देता येईल. या मंदिरापुढेच अगदी दोन किमीवर कृष्णेच्या दक्षिण प्रवाही, विस्तृत पात्रातील 'बहे'च्या बेटावर श्रीराम स्थापित प्राचीन शिवलिंग आणि श्री समर्थ रामदासांनी स्थापन केलेल्या मारुतीलाही भेट देता येते.
                   आणि थोडी अधिक तयारी असल्यास या नृसिंह मंदिराआधी येताना अवघ्या ५ किमीवर रस्त्याच्या डाव्या बाजूलाच डोंगरावर दिसणारा मच्छिंद्रगडही करता येईल.

                   मुंबई, पुण्याहून येताना कराड शहरात मुख्य बेंगलोर हायवेला डावं आणि त्यापुढे लगेच वाठार - रेठरे फॅक्टरीला उजवं वळण घेऊन पुणे बेंगलोर हायवेला समांतर जाणारा रस्ता कोळे नृसिंहपूरला येतो. पुढे बोरगावच्या 'बेट बहे' मारुतीच दर्शन घेऊन पुन्हा बेंगलोर हायवेवरून कोल्हापूरला येता येतं. किंवा आल्या पावली पुन्हा पुणे मुंबईकडे वळता येतं.

कृष्णा नदी, कोळे नृसिंहपूर

श्री नृसिंह मंदिर नवीन सभामंडप 


पूर्व प्रवेश दारामागून दिसणाऱ्या देवड्या
                   दुसऱ्या शतकात 'कौडिण्यपुर'चा राजा (सध्या 'तासगाव' तालुक्यातील 'कुंडल' गांव) 'भीमदेव'नं ही प्राचिन श्रीनृसिंह मूर्ती कृष्णेच्या डोहातून बाहेर काढली.

                   या मुर्तीची कथा रोचक आहे. महाभारत लिहिणारे वेद 'व्यासां'चे पिता 'पराशर' ऋषी कृष्णेकाठी दंडकारण्यात होते. त्यांनी नृसिंह दर्शनाची मनीषा धरून श्री विष्णूंची आराधना केली. श्री विष्णूंनी शोडसभुजा(सोळा हात), उग्रतेजस्वी, कृद्ध, भूमंडळ हादरवणारं आणि तोंडातून अग्निज्वाला निघणारं नृसिंहरूप दाखवलं. त्यांनी श्री नृसिंहाची मनोभावे पूजा केली. भूतलाला न पेलवणारं देवाचं हे मानस रूप त्यांनी कृष्णेच्या डोहात विसर्जित केलं.
                  काळ लोटला. कर्नाटकातील 'अंजन' गावचं एक शापित ब्राम्हण कुटुंब कृष्णेकाठी आश्रम बांधून श्री विष्णूंची आराधना करू लागले. जवळ जवळ बारा वर्ष त्यांनी तिथे उपासना केली. श्री विष्णूंनी त्यांस दृष्टांत देऊन राजा भीमदेवच्या मदतीनं कृष्णेच्या डोहातील ही मूर्ती बाहेर काढण्यास सांगितले. मूर्ती कशी सापडेल तेही सांगितले. ब्राह्मण पती-पत्नीच्या सांगण्यावरून उत्सुकतेपोटी राजा भीमदेव नावाड्यांना घेऊन कृष्णेच्या पात्रात उतरला. नावेतून सुकलेल्या तुरकाट्यांची एक एक पेंडी पाण्यात सोडत शोध सुरू झाला. ज्या ठिकाणी पेंडी पाण्यात पेट घेईल त्या ठिकाणी मूर्तीचं अस्तित्व सापडणार होतं. पेंडीनं पेट घेतलेल्या ठिकाणी नृसिंह मूर्ती सोबत आणखी चार मुर्त्या सापडल्या.
                 त्या मुर्तीपैकी तंबव्याला केशवराजाची मूर्ती, कोळे गावात कोळजाई, रेठऱ्याला पिंपळाई देवीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. पाचवी मूर्ती तोंडातून ज्वाळा निघणाऱ्या मारुतीची निघाली. ज्वालाग्राही मारुतीची उपासना झेपणार नसल्यामुळे ती पुन्हा कृष्णेत विसर्जित करण्यात आली. पुढे या घटनेमुळे  'कोळे' गावास 'ज्वाला नृसिंहपुर' हे दुसरे नांवही रूढ झाले.
                  सापडलेल्या मूर्तींची स्थापना कृष्णे काठी जंगलात न करता आपल्या राज्यात करावी हा राजाचा हेतू होता. पण त्यानंतर देव दृष्टांतानुसार राजानं नृसिंह मूर्ती कृष्णेकाठीच स्थापण केली. तिथं लहान मंदिर बांधलं. राजाने त्या ब्राह्मण दांपत्यास तिथेच राहण्यास सांगितले. मूर्तीची पूजाअर्चा व मंदिराच्या देखभालीसाठी राजाने कोळे, मच्छिंद्रगड, येडे शिर्डी या गावातील काही जमिनी त्यांना दान दिल्या. ही घटना सरासरी इ.स. दुसऱ्या शतकातील १७८ ला घडली. कोळे नृसिंहपुर जवळ असलेल्या 'सागरेश्वर  महादेव' देवस्थानाची माहिती आणि महती सांगणारी 'समुद्रेश्वर महात्म्य' या पोथीतील या राजा भिमदेवचा सातवा पूर्वज 'भिष्मक' राजा होता.  
                  'कौंडिण्यपुर' आणि  'भीमदेव'चा पूर्वज राजा 'भिष्मक' यांचा उल्लेख आल्यामुळे इथे नमूद करावेसे वाटते की, श्रीकृष्ण पत्नी माता 'रुक्मिणी'देवी यांचं 'कौंडिण्यपूर' हे माहेर. राजा भीष्मक रुक्मिणीचे पिता. रुक्मिणी स्वयंवराच्या नाट्यमय प्रसंगावेळी श्रीकृष्ण हे दंडकारण्य ओलांडून दक्षिणेला आले होते. तर कंस वधानंतर चिढलेल्या कंसाचे सासरे जरासंध आणि शिशुपाल यांना पाठीवर घेत हेच दंडकारण्य पहिल्यांदा ओलांडले होते. श्रीकृष्णाच्या मथुरेवर जरासंधाने केलेल्या त्यावेळच्या सतराव्या आक्रमणाचं शेपूट पार दक्षिणेपर्यंत ताणलं गेलं होतं. आणि त्यामुळेच नंतर मथुरावासींची जरासंधाच्या जाचातून सुटका करण्यासाठी 'द्वारका' निर्माण झाली. त्यावेळी भगवान परशुरामांनी श्रीकृष्णांना 'सुदर्शन' बहाल केलं. पुढे 'पद्मावत' राज्यांतर्गत करवीर (कोल्हापूर) नगरीचा उन्मत आणि उद्धत झालेल्या 'शृगाल' राजावर श्रीकृष्णांनी प्रथमच सुदर्शन यंत्रचक्राचा प्रयोग केला होता.
                   चौथ्या विष्णू अवतारातील श्री नृसिंह आणि नवव्या अवतारातील श्रीकृष्ण तसेच श्रीकृष्णांचे सासर कौंडण्यपूरचे वंशज राजा भिमदेव या तिन्ही गोष्टींचा योग मिलाप या स्थळाशी असल्यामुळं हे सर्व इथे मुद्दाम अधोरेखित केले आहे. सह्याद्रीतील गड किल्ले, लेण्यांबरोबरच इथल्या देवभूमीतील प्राचीन मंदिरं आणि त्यांचा इतिहास या कारणांसाठीच मांडला जातो. गायला जातो.
                   सध्या दिसणाऱ्या इथल्या हेमाडपंथी शैलीच्या या मंदिराची उभारणी ज्ञानेश्वरांच्या समकालीन यादव काळात इ.स.१२६० ला झाली. यादवांचं श्री नृसिंह हे कुलदैवत. देवगिरीचा राजा 'रामदेवराय'चा प्रधान 'हेमाद्री' (हेमाड) यांनी त्यांच्या 'हेमाड' शैलीत उभारलेल्या बऱ्याच मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे. भूयाराच्या पहिल्याच पायरीवर दिसणारा 'भानू तुकदेव त्याचा पुत्र गोपाळ भास्कर त्याचा पुत्र भानु गोपाळ' या शिलालेखानुसार या मंदिराचे बांधकाम त्यांच्या तीन पिढ्यांनी पूर्ण केल्याचे कळते.

पूर्वेकडील प्रवेशद्वार 
 

                     कृष्णेच्या वळणदार पूर्व तीरावर वसलेल्या या मंदिराला पूर्व, पश्चिम आणि उत्तरेला असे एकूण तीन भव्य दगडी दरवाजे आहेत. एखाद्या किल्ल्याला शोभावेत अशी या दरवाजांची रचना दिसते. पूर्वेकडील दारातून मंदिरात प्रवेश आहे. या दाराच्या भव्य दगडी कमानीतील चौकटीवर दोन्ही बाजूस घोड्यांच्या तोंडांची उठावदार कोरीव शिल्पे आहेत. चौकटीच्या मध्यभागी सुबक गणेश कोरला असून गणेशाच्या वर किर्तीमुख आहे. या दरवाजाच्या आत दोन्ही बाजूला पहारेकऱ्यांच्या देवड्या दिसतात. किल्ल्याच्या दरवाजांच्या आतील बाजूस या स्वरूपाच्या देवड्या असतात.
पूर्व दरवाजातून दिसणारा दिंडी दरवाजा 



नवीन RCC सभामंडप

उत्तरेकडील दरवाजाजवळील दीपमाळा 

गरुड दीपमाळ
हनुमान दीपमाळ 
                     पूर्वेच्या या दारातून समोर डाव्या लांबलचक दगडी भिंतीला लागून लहान दिंडी दरवाजा दिसतो. या दरवाजाच्या चौकटीवर सुध्दा गणेश पट्टी कोरलेली दिसते. नजीकच्या काळात मंदिर दुरुस्ती अंतर्गत समोरील दिंडी दरवाजाच्या आधी दगडी भिंतीत उत्तरेला नवीन प्रवेशद्वार ठेवलं आहे. हा दरवाजा सध्या बांधलेल्या भव्य आरसीसी मंडपात घेऊन जातो. या मंडपातून पुढे डावीकडून दोन दीपमाळेच्या मधून उजवीकडील उत्तरेच्या भव्य पुरातन दाराकडे जातो. या दरवाजाच्या वर नगारखाना दिसतो. वर नगारखाण्यात जाण्यासाठी दाराच्या आत उजव्या भिंतीत घडीव पायऱ्यांची व्यवस्था केली आहे. या उत्तरेच्या दारासमोरच गुहेत उतरणाऱ्या आधुनिक ग्रॅनाईट लाद्या बसवून पायऱ्यांचा सध्या सुसज्ज मार्ग बनवलेला दिसतो. या पायऱ्यांचा दोन टप्प्यात बनवलेला मार्ग श्री दर्शनासाठी  आबालवृद्धांना खूपच सोईस्कर आहे.

नवीन RCC सभामंडप


भुयारात जाणारा नवीन मार्ग 
भुयारात जाणारा नवीन मार्ग 
             

                    पूर्वापार दिंडी दरवाजातून येणारा प्राचीन मार्ग मात्र पश्चिमेकडून तीन टप्प्यात गुहेत उतरतो. दिंडी दरवाजाच्या आत दगडी मंडप असून मंदिराच्या एकूण तीन टप्प्यांच्या रचनेतील जमीन पातळीवरील हा मंडप आहे. या मंडपाच्या दगडी कमानीतून उजवीकडे वळल्यास अंदाजे पुरुषभर उंचीची दोन तुळशी वृंदावन आहेत. वृंदावनांच्या वर लाकडी मंडप आहे. या मंडपावर देवाची पालखी ठेवलेली दिसते. मंडपाचे वासे, तुळ्यांना आकर्षक रंग लावलेला दिसतो. आता हा पुरातन लाकडी मंडप मोडकळीस आलेला आहे.

 

भुयारातील नृसिंह मूर्तीवरील वृंदावन आणि त्यावरील लाकडी मंडप

भुयारात पश्चिमेकडून जाणारा मार्ग 
पहिल्या पायरीवरील शिलालेख

चौदा फूट खोल भुयारातील नृसिंह मूर्तीवरील वृंदावन आणि त्यावरील प्राचीन लाकडी मंडप 




                               

                    

            दोन्ही वृंदावनांना उजवी प्रदक्षिणा घालून पश्चिमेकडून भूगर्भात उतरणाऱ्या नऊ पायऱ्यांनी अंबाबाई मंडपात येता येतं. या भव्य मंडपात श्री अंबाबाई, सरस्वतीची मूर्ती आहे. एक लक्ष्मीनारायण आणि विठ्ठल मूर्ती आहे. तसेच गरुडस्थित गोविंदाची यानाकमुर्ती आहे. या वैशिष्ट्यपूर्ण रचनेच्या भुयारी मंडपात कोल्हापूर दरबाराचे राजगुरू सिद्धेश्वर महाराजांनी अनेक वर्षे साधना केली. इथे डाव्या हाताला त्यांच्या सान्निध्याने पूनित झालेले त्यांचे दगडी आसन आणि त्यापुढे त्यांची समाधी आहे. इथल्या गरुड खांबाला प्रदक्षिणा घालून पुढे भुयारात उतरण्याची रीत आहे. गरुड खांबाच्या पूर्वेला उजवीकडील चिंचोळ्या दगडी चौकटीतून दुसऱ्या भुयारात उतरता येतं. डावीकडे वळसा मारल्यावर समोर भैरवाची मूर्ती दिसते. पुढे तीन पायऱ्या उतरून ठेंगण्या चौकटीतून श्री नृसिंहाच्या गर्भगृहात येता येतं.

                            हा पुरातन मार्ग आणि सध्या अबालवृद्धांच्या सोईसाठी बनवलेला मार्ग जमिनीखाली देवाच्या गर्भगृहाबाहेर एकत्र मिळतात.

  

श्री सिद्धेश्वर महाराज समाधी

जमिनीखाली दुसऱ्या भुयारात उतरणारा मार्ग 

 
यानाकमुर्ती 

श्री लक्ष्मी नारायण 

विठ्ठल मूर्ती 
अंबाबाई आणि सरस्वती मूर्ती

                  गर्भगृह अंदाजे ६ फूट लांब आणि ८ फूट रुंदीचे आहे. देवाच्या मूर्तीसमोर स्टीलच्या जाळीचे दरवाजे आहेत. दरवाजाच्या आत मूर्तीसमोर अनुष्ठानाला बसण्या इतपत जागा दिसते. आत पूजा पाठ करणारे कुलकर्णी देवाचं पावित्र्य कसोशीनं पाळताना दिसतात. तीर्थ प्रसाद घेण्यासाठी भाविकांचा पुढे येणारा हात सुध्दा स्टीलच्या दाराबाहेरच राहील अशी खबरदारी इथं घेतली जाते.
गर्भगृहाची ठेंगणी चौकट 
गर्भगृह 

गर्भगृहातील वायुविजनासाठी झरोका

                   जमिनीखालच्या तिसऱ्या भुयारातील या गर्भगृहात प्राणवायूचा पुरवठा होण्यासाठी गर्भगृहाच्या पश्चिम भिंतीवर कोनाड्यात एक झरोका दिसतो. तो थेट पहिल्यांदा प्रवेश करताना जमीन पातळीवर दिसणाऱ्या तुळशी वृंदावनाच्या  गावाक्षांना जोडलेला आहे. या वृंदावनापासून गर्भगृहातील व्यक्तींची शब्द संवाद साधला जातो. तसेच भक्ताने वर वृंदावनातुन अर्पण केलेली दक्षिणा किंवा सुपारी थेट नृसिंह मूर्तीच्या चरणाशी येऊन पडते.

                   श्री नृसिंह महाराजांची चलाचल, उग्र, तामस रूपातील ही मूर्ती एका अखंड शाळीग्राम शिळेवर कोरलेली आहे. देवाच्या मागे प्रभावळ दिसते. डोक्याच्या मागे महिरप आहे. प्रभावळीवर दशावतार कोरलेले दिसतात. मूर्तीच्या उजव्या बाजूस मत्स्य, कुर्म (कासव), वराह, नृसिंह आणि वामन अवतार कोरले आहेत. श्रींच्या डाव्या बाजूस परशुराम, श्रीराम, श्रीकृष्ण, बुद्ध व कल्की असे एकूण दहा अवतार कोरलेले दिसतात. देवाच्या डोक्यावर आणि या दशावतारांच्या मध्यभागी भव्य किर्तीमुख आहे. किर्तीमुखाच्या खाली सात फण्यांची नागदेवता दिसते. देवाच्या पायाशी उजव्या बाजूला अंदाजे सव्वा फूट उंच भूदेवी आणि बाजूला विरासनातील गरुड मूर्ती दिसते. देवाच्या डाव्या बाजूला पायाशी एक फूट उंचीची किरीटधारी भक्त प्रल्हाद मूर्ती तर सव्वा फूट उंचीची माता लक्ष्मी मूर्ती आहे.
                  श्री नृसिंहाचे मुख उग्र असून नजर विस्फारलेली दिसते. सिंहमुखी मानेभोवती आयाळ आहे. कान शंकू सारखे उभे दिसतात. बाहू बलदंड आणि शरीर अतिशय प्रमाणबद्ध दिसतं. मुखातून गर्जना करण्यास उत्कट अशी लवलवणारी जीभ दिसते. छाती विशाल असून मूर्ती सालंकृत दिसते. डोक्यावर किरीट आहे. दंडात बाजूबंद आहेत. हातात कडी, पायात तोडे दिसतात. गळ्यात रत्नहार असून तो हिरण्यकश्यपुशी झालेल्या झटापटीत पायापर्यंत पोहोचला आहे. देवाच्या कमरेला मेखला दिसतो.

श्री मूर्तीभोवती कोरलेले दशावतार आणि मध्यभागी कीर्तिमुख
                  या मूर्तीतील हिरण्यकश्यपूही सालंंकृत असून किरीटधारी आहे. देवाच्या डाव्या मांडीवरील त्याचे मुख रेखीव असून गळ्यातील माळ घरंगळलेली दिसते. कानात कुंडले व कमरेचे भरजरी काठाचे वस्त्र कोरले आहे.
                   देवाच्या शोडस (सोळा) भुजांत विष्णूची शंख, चक्र, गदा, पद्म तसेच विष्णूच्या पुढील वामन अवतारातील कलश, परशुराम अवतारातील परशु, श्रीरामांचे धनुष्य, श्रीकृष्णाची मुरली तसेच एका हातात ढाल आहे. एक हात वरद मुद्रेत आहे. मूर्तीच्या डोक्याच्या डाव्या बाजूचे तीन हात मूर्ती पाण्यातून काढताना निसटले आहेत. देवाने डाव्या हाताने दैत्याचा उजवा खडगधारी हात धरलेला आहे. दैत्याचा उजवा पाय उजव्या हाताने धरलेला असून डावा पाय आपल्या उजव्या मांडीखाली मुडपून ठेवला आहे. अशा प्रकारे श्री नृसिंह हिरण्यकश्यपूस जखडून दोन्ही हातांनी त्याची छाती विदीर्ण करत आहे.
                  या मंदिरात सिद्धेश्वर महाराजांच्या भेटीसाठी महान कवी 'केकावलीकार मोरोपंत' हेही नृसिंहपुरास आले होते. सेनाधुरंदर महादजी शिंदे यांनीही नृसिंह पुरी येऊन श्रींचे दर्शन घेतले होते. संत शिरोमणी नामदेव महाराजांचे सहावे पूर्वज यदुशेठ हे आपल्या कुलदेवतेचे नेहमी दर्शन व्हावे यासाठी येथे राहावयास आले होते. संत नामदेवांनीही या तीर्थक्षेत्रास भेट दिली होती. या आधी संभाजी महाराजांनी या देवस्थानास सढळ हस्ते मदत केली होती. महम्मद आदिलशहाने देखील या देवस्थानास देणगी दिल्याची नोंद मंदिराच्या इतिहासात मिळते.
उत्तरेकडील दरवाजावरील नगारखाना
उत्तर दरवाजाबाहेरील पुजाऱ्यांची घरे 

मंदिर परिसरातील कुलकर्ण्यांची घरे
मंदिर परिसरातील पुजाऱ्यांची घरे


               वैशाख शुद्ध सप्तमीपासून नृसिंह जयंतीचा उत्सव सुरू होऊन पुढे वैशाख वद्य प्रतिपदेच्या दहाव्या दिवशी उत्सवाची सांगता होते. मूळ कोळे गावातून मंदिर देखभाल आणि पूजेसाठी पूर्वी इथे आलेल्या कुलकर्ण्यांची आताची पिढी पूजापाठ, अनुष्ठान करताना दिसतात. निवडक पुजाऱ्यांचा त्यावेळचा वंश वृद्धिंगत होऊन सर्वांची मंदिर परिसराभोवती घरे दिसतात. श्री नृसिंह मूर्ती, मंदिर आणि त्याच्या प्राचीन इतिहासाबद्दल जोशी, कुलकर्णी भरभरून बोलताना दिसतात.

                  कोयना परिसरात होणाऱ्या वारंवार भूकंपामुळे मंदिराची अंतर्गत रचना सध्या कमकुवत झाली आहे. येत्या ८-१० वर्षापासून भुयारात पाण्याचे उमाळे फुटून भूयाराच्या तळ वाटेवर पाणी दिसतं. त्यावर आजुन उपाय सापडलेला नाही. सध्या लोकवर्गणीतून व देणगीतून मंदिर दुरुस्ती आणि जीर्णोद्धार चालू आहे. सध्या मूळ प्राचीन मंदिराभोवती प्रशस्त ओवरींचे भव्य आरसीसी मंडप बांधले आहेत. जुन्या आणि नवीन वास्तूतंत्राचा मेळ घालण्याचा प्रयत्न केलेला दिसतो.

                    महाभारत पर्वाच्याही आधीची अख्याइका सांगणारी, दुर्मिळ अशा गंडकी शिळेतील पाच सव्वा पाच फूट उंचीची रेखीव सुंदर आणि पुरातन मूर्ती, तसेच या मंदिराची त्रिस्तरीय स्थापत्य शैली एकदा नक्कीच बघावी अशी आहे..                                                                                                                                                       || श्री कृष्णार्पणमस्तु ||

येथे - जयवंत जाधव

Wednesday, 12 April 2023

उत्तुंग उंचीचा - 'किल्ले तुंग' (कठीणगड), मावळ - Tung Fort (Kathingad Fort) Maharashtra

                      तापत्या उन्हातून 'बेडसे लेणी' आणि 'किल्ले तिकोना' असे दोन डोंगर चढ उतार केले होते. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी 'किल्ले तुंग' करायचा ठरलं. त्यासाठी 'पवना' जलाशयाला वळसा मारून 'तुंग' जवळ मुक्काम शोधायचा ठरलं. आणि तेच पुढे सोईस्कर होतं. दिवसभराची दमछाक आणि वाढणारा अंधार यामुळं फार शोधाशोध न करता, तिकोना पायथ्याला 'जवण' गावाच्या बाजूला तंबू (Tent) आणि जेवणाची सोय मिळाली.

                     दुसऱ्या दिवशी तुंगला स्वतः च्या वाहनानं प्रयाण केलं. तुंग ते तिकोना सरासरी २२ किमी पवने'काठानं सकाळचा प्रवास सुखद, निसर्गरम्य आहे. उजवीकडे जलाशय आणि पलीकडे तुंगीचा सुळका मोहून टाकतो. काल दिवसभरच्या दमछाकीमुळं हाच 'तुंग' आज उन्हातून कसोटी घेणार होता. लोणावळा डोंगर रांगेतील साडेतीन हजार फुटाचा सुळका दुप्पट तयारीनं गाठावा लागणार होता.

महादरवाजा (दिंडी दरवाजा)- किल्ले तुंग (Tung Fort)

                   तिकोनाकडून 'तुंग'ला यायचं झाल्यास पवणेला वळसा घेत घुसळखांब तिठ्ठ्यावर उजवं वळण घेऊन रस्ता तुंगवाडीकडे येतो.

                 लोणावळ्याहून 'तुंग'ला यायचं असल्यास 'आंबवणे' किंवा 'अँबे' व्हॅलीकडे जाणारं वाहन पकडून १५ कीमीवरच्या 'घुसळखांब' तिठ्यावर उतरावं. तिथून डावीकडे जाणाऱ्या ८ कीमी तुंगवाडी पर्यंत एसटीची सोय नगण्य असल्यानं वडाप, रिक्षा किंवा स्वतःच्या खाजगी वाहना शिवाय पर्याय नाही. पूणे, मुंबईकडून येणाऱ्या डोंगर भटक्यांना लोणावळा घुसळखांब मार्गे रस्ता जवळचा सोयीस्कर पडतो.

लोणावळा 'लायन्स पॉईंट'वरून - स्वयंभू शिवलिंग 'मोराडी' सुळका आणि मागे 'मृगगड' (Tung Fort)

                 आदल्या दिवशी बेडसे, तिकोना'साठी आमचा दीर्घ फेरा झाला होता. पण परतीचा प्रवास घुसळखांब, लोणावळा मार्गे निश्चित केला. या मागचं कारणही तसंच होतं. भटकंतीच्या दुसऱ्या दिवशी तुंग नंतर सह्याद्रीच्या लोणावळा डोंगर रांगेतील 'स्वयंभू शिवलिंग' म्हणून ओळखला जाणारा 'मोराडी' सुळका आज 'लायन्स पॉइंट'वरून बघता येणार होता. आधी डिसेंबरला आम्ही तो सहयाद्री खालून भेलिव'च्या 'मृगगडा'वरुन पहिला होता. निसर्गातील उंची, आकारानं पारणं फेडणारं हे भव्य 'शिवलिंग' तसेच त्या मागचा घाटाखालील 'मृगगड' घाट माथ्यावरून बघता येणार होता. आणि त्यासाठी आजची 'महाशिवरात्र' हा जुळून आलेला योग होता. 

पवना जलाशय आणि पलीकडे किल्ले तुंग (Tung Fort)

                       किल्ले तुंगचे भौगोलिक स्थान लक्षात घेता, उत्तर कोकणात साम्राज्य निर्माण करण्यासाठी तुंगच्या बाजूचे लोहगड, विसापूर महत्वाचे किल्ले आहेत. ते ताब्यात घेण्याआधी तुंग, तिकोनाचा विरोध होत असे. दरम्यान लोहगड, विसापुरला शस्त्र सज्ज होण्यास अवधी मिळे. कोकणात उतरणाऱ्या घाट वाटांवर लक्ष ठेवण्यास लोहगड, विसापूरनंतर बारा मावळांपैकी पवन मावळ आणि प्राचीन बोर घाटातून चालणाऱ्या व्यापारी वाहतुकीवर देखरेख करण्यासाठी तुंगचा उपयोग होत असे. 

                      किल्ले तुंगचा फारसा इतिहास सापडत नाही. १४८३ साली निजामशाहीचा सरदार मलिक अहमद यानं प्राचीन जुन्नर बाजारपेठ काबीज करून तुंग जवळील लोहगड ताब्यात घेतला. पुढे १४८५ साली त्यानं तुंग आणि तिकोना किल्ले निजामशाहीत आणले. त्यानंतर १६५७ साली छत्रपतींनी तुंग स्वराज्यात आणला. १६६० साली हा किल्ला आणि परिसराच्या संरक्षणाची जबाबदारी सरनोबत नेतोजींकडे होती. 

                   जून १६६५ च्या पुरंदर तहात तुंग मुघलांना देण्यात आला. १६७० साली शिवरायांनी तुंग पुन्हा स्वराज्यात आणला.

                         १८१८ साली तुंग इंग्रज कर्नल प्रॉथरनं ताब्यात घेतला आणि उध्वस्त केला.

पायथ्याचं मारुती मंदिर (Tung Fort)

                  'किल्ले तुंग'साठी तुंगवाडीत न जाता या वाडीच्या वरच्या बाजूस मुख्य रस्त्यालगत असलेल्या मारुतीच्या मंदिराजवळ मोफत पार्किंगची सोय आहे. बाजूला टपरीवर गरम कांदा भजी, पोहे मिळतात. रस्त्यालगत डावीकडे जंगलात आधी ही छोटी टपरी दिसते. या टपरीजवळून खड्या डोंगराकडे जाणारी पायवाट किल्ल्यावर जाते.

 

पायथ्याच्या स्मृतिशिळा, वीरगळी,सतीशिळा (Tung Fort)

                    गड पायथ्याला वाटेवर जुन्या स्मृतीशिळा, वीरगळी जतन करून, त्यामागे त्यांची माहिती सांगणारा फलक दिसतो. पायथ्याच्या या वाटेवर सध्या पायऱ्या बनवण्यासाठी पाथरवटांचं काम सुरू आहे. सुरुवातीच्या पाहिल्या टप्प्यावर सुरू केलेलं हे काम हळूहळू पायथ्यापर्यंत पोहोचलेलं दिसतं.

सुरुवातीच्या गुहेतील 'चपेटदान' मारुती (Tung Fort)

                     या सुरुवातीच्या टप्प्यावर डावीकडे छोट्या गुहेत कोरलेला मारुती आहे. मूर्तीच्या कमरेला खंजीर असून उजव्या हाताने चापट मारण्याच्या आवेगात असलेली ही मूर्ती 'चपेटदान' मारुती म्हणून ओळखली जाते. असाच चपेटदान मारुती किल्ले 'तिकोना' माचीवर दिसतो. तिकोनाची कातळ मूर्ती बरीच मोठी आणि उघड्यावर आहे. ही मूर्ती छोट्या कातळ गुहेत आहे.

                    छत्रपतींच्या ताब्यात असलेल्या किल्ल्यावर रक्षणासाठी शिबंदी तैनात असे. हे सैन्य ऊन पावसाची तमा न बाळगता पहारा देत. रात्री अपरात्री गडावर वावरणाऱ्या तथाकथित भुताखेतांपासून संरक्षणासाठी अंजनीपुत्र वीर मारुतीचा त्यांना मोठा आधार वाटे. गांव वेशींचं रक्षण करणारा हा देव आपलं रक्षण करेल अशी त्यांची गाढ श्रद्धा होती. त्यामुळं १६ - १७ व्या शतकात मराठ्यांचं प्राबल्य असलेल्या गड किल्ल्यांवर मारुतीची मंदिरं, देवळं, घुमट्या स्थापलेल्या दिसतात.

कोरीव उभ्या पायऱ्या Rock Patch - (Tung Fort)

                          या पुढचा टप्पा उभ्या कोरीव पायऱ्यांचा दिसतो. तीव्र चढाच्या या पायऱ्यांना आधार घेण्यासाठी दोर लावला आहे. दोर खडकाला घासून सध्या कमकुवत दिसतो. या टप्प्यानंतर नागमोडी पायवाटेची दगडांतून चढण दिसते. दमछाक करणाऱ्या या टप्प्याच्या मध्यावर तुंगवाडीतील एक भगिनी झाडाखाली लिंबूपाणी आणि ताक विकताना दिसते.  

तुंगवाडीतील भगिनी (Tung Fort)

दरिकाठावरून जाणारे तीव्र चढाचे टप्पे (Tung Fort)
तीव्र चढाचे टप्पे (Tung Fort)

                    अर्ध्या तासाच्या खड्या चढाईनंतर उजवीकडे कातळात खोदलेलं चौरसाकृती गुहेचं 'मेटं' दिसतं. मेट्याच्या गुहेतून समोर पवनमाळ, जलाशय आणि किल्ल्यावर येणाऱ्या पाय वाटेवर लक्ष ठेवता येतं. मेट्याच्या पहारेकऱ्याला पाण्यासाठी जागा सोडायला लागू नये म्हणून मेट्याच्याच डोक्यावर कातळात पाण्याची टाकी (पोडी) कोरली आहे. इतर किल्ल्यांच्या मानानं इथली ही एक वेगळी पद्धत दिसते. टाकीतील पाणीही चांगलं टिकाव धरून स्वच्छ दिसतं. त्याशिवाय वरच्या टाकीमुळं रणरणत्या उन्हात 'मेटं'ही थंडावा धरून आहे.

'मेटं' (Tung Fort)

मेट्यावरील पाण्याची कोरीव टाकी (Tung Fort)
तीव्र चढाचे टप्पे Rock Patch, Steep Slope - (Tung Fort) 
                   या मेट्या जवळून उजवीकडे डोंगर काठावरून पूर्वेकडे जाणारी पायवाट दिसते. एका प्रशस्त मोठ्या खांब टाकीजवळ ही वाट येते. वर डोंगराला एकूण चार दगडी खांबांचा आधार देऊन कातळाच्या पोटात खोल कोरलेली ही पाण्याची टाकी अवाढव्य असून पाणी एकदम स्वच्छ दिसतं. टाकीतील पाण्यामुळं इथं आजूबाजूला गारवा जाणवतो. इथपर्यंतच्या चढाईचा थकवा दूर करण्यासाठी या खांब टाकीजवळ जरूर विसावा घ्यावा. या टाकीतील पाणी पाईप द्वारे गडपायथ्याला पायऱ्यांच्या दुरुस्तीसाठी वापरताना दिसतं.
पूर्वेकडील प्रशस्त पाण्याची खांब टाकी (Tung Fort)


महादरवाजा आणि आतील बांधकाम साहित्य (Tung Fort)
                      पुन्हा मेट्याकडे मागे येऊन कातळ उजवीकडे ठेवत चढत जाणारी वाट किल्ल्याच्या पहिल्या महादरवाजात येते. या दरवाजाच्या चौकटीची कमान वगळता बाजूचं सर्व बांधकाम उध्वस्त केलेलं दिसतं. उरलेलं बांधकाम कोसळू नये म्हणून चौकट दोरखंडानं तात्पुरती बांधून ठेवलेली दिसते. दरवाजा ओलांडल्यास आतील बाजूस हा दरवाजा आणि बाजूच्या तटबंदीची डागडुगी करण्यासाठी आणलेलं बांधकाम साहित्य ठेवलेलं दिसतं.
पहिल्या माचीकडे जाणारी वाट (Tung Fort)


पहिली माची आणि एकदम मागे दिसणारा मोरगिरी किल्ला (Tung Fort)

                  इथून वाट गडाच्या उजव्या कातळावर चढून वर दिसणाऱ्या बुरुजात असलेल्या हनुमान दरवाज्याकडे जाते. तर दुसरी पायवाट समोर डोंगर धारेच्या अरुंद पायवाटेवरून किल्ल्याच्या पश्चिमेस असलेल्या लांबलचक पहिल्या माचीवर जाते. माचीची तटबंदी पूर्ण उध्वस्त आहे. आजूबाजूचं बांधकामही नामशेष केलेलं दिसतं. या माचीवरून समोर 'किल्ले मोरगिरी' दिसतो.

पहिल्या माचीवरून दिसणारी दुसरी माची आणि मागे दूरवर बालेकिल्ला (Tung Fort)

                   मागे वळून पाहिल्यास वर कातळावर किल्ल्याच्या दुसऱ्या माचीची तटबंदी दिसते. मागे दूरवर बालेकिल्ला दिसतो.

कातळावरील बुरुज हनुमान दरवाजा(Tung Fort)

बुरुजातील जिभी रचनेचा हनुमान दरवाजा (Tung Fort)

बुरुजातील हनुमान दरवाजा (Tung Fort)
पहारेकर्यांची देवडी (Tung Fort)
      

                     महादरवाजापासुन उजवीकडे चढून येणारी वाट कातळाच्या अवघड ठिकाणी निर्माण केलेल्या बुरुजातील 'हनुमान' दरवाजात येते. दोन बुरुज आणि त्यातील डाव्या बाजूस तटबंदी वाढवून आडाला असलेला हा दरवाजा आहे. या डावीकडील तटबंदीमुळं आतील हालचाली शत्रूला कळत नाहीत. कातळ चढून दोन्ही बुरुजातील मोकळ्या जागेत आल्यास, शत्रूवर वरून मारा करण्यासाठी समोर जंग्या ठेवलेल्या दिसतात. 'जिभी' रचनेचा हा दरवाजा लष्करी दृष्ट्या चांगलाच प्रभावी वाटतो. उजव्या बाजूच्या बुरुजात पवनपुत्र हनुमानाची छोटी शिळा बसविलेली दिसते. दरवाजा ओलांडून आत आल्यास डाव्या बाजूस पहारेकऱ्यासाठी देवडी दिसते. 

दुसऱ्या माचीवरील सपाटी - समोर बालेकिल्ला (Tung Fort)

                         या दरवाज्यातून वर आल्यास समोर प्रशस्त सपाटी दिसते. डावीकडे किल्ल्याची दुसरी माची दिसते. पहिल्या माचीवरून दिसणाऱ्या या माचीची तटबंदी नामशेष केली आहे. या माचीवर कमरे इतकं वाढलेलं गवत दिसतं. इथून दूरवर बालेकिल्ल्याचा कातळ सुळका दिसतो. तर हनुमान दरवाजातून उजवीकडे वळल्यास गवतात काही उध्वस्त सदरेचे आणि कचेरीचे अवशेष दिसतात. 

कचेरीचे अवशेष (Tung Fort)


उजव्या सोंडेची पुरातन श्री गणेश मूर्ती (Tung Fort)
पाण्याचं तळं, डावीकडे गणेश मंदिर (Tung Fort) 

               त्यापलीकडे किल्ल्यावरील सर्वात मोठं खोदीव पाण्याचं तळं दिसतं. तळ्यातील पाण्याची पातळी बऱ्यापैकी असून त्यावर गाळ साचलेला दिसतो. तळ्यात उतरण्यासाठी दगडी पायऱ्यांची व्यवस्था दिसते. या तळ्याकाठावर डाव्या बाजूस श्री गणेश मंदिर दिसतं. मंदिर साधं आणि छोटसं असलं तरी आतील उजव्या सोंडेची गणेश मूर्ती पुरातन असावी. किल्ल्याची ही दुसरी माची प्रशस्त मोठी दिसते. मंदिराला डावा वळसा घेऊन वाट बालेकिल्ल्याकडे जाते.  

बालेकिल्ल्याच्या कातळाखालील खांबटाकी (Tung Fort)

बालेकिल्ल्याखालील पूर्वेचं टोक, समोर किल्ले तिकोना (Tung Fort)
                      

               बालेकिल्ल्याचा उभा कातळ चढण्यापूर्वी वाट उजवीकडे वळून बालेकिल्ल्याच्या कातळाखाली कोरलेल्या खांब टाकीजवळ येते. या टाकीच्या पुढेच दुसरी टाकी दिसते. दोन्ही टाकीत पाणी असून त्यात गाळही भरलेला दिसतो. पुढे वाट बालेकिल्ल्याला वळसा मारून पूर्वेला येते आणि समोर कड्याच्या काठाजवळ संपते. ही वाट उजव्या बाजूला तीव्र घसरणीची असून वाटेवर आणि पुढच्या कड्याकाठावर गवत आणि झुडपं माजलेली दिसतात. किल्ल्याच्या या टोकाला डोंगर भटके फारसे फिरकत नसावेत. प्रामुख्यानं किल्ल्यावर सर्वत्र रानकेळी बऱ्याच दिसतात.

श्री तुंगी देवी (Tung Fort)
बालेकिल्ल्याची चढण (Tung Fort)

श्री तुंगी देवी मंदिर (Tung Fort)
    
बालेकिल्ल्यावरून दिसणारा किल्ले तिकोना (Tung Fort)

              पुन्हा मागे येऊन वाट उत्तरेकडून किल्ल्याचा खडा कातळ चढून बालेकिल्ल्यावर येते. वर किल्ल्याचा सर्वोच्च माथा अगदीच लहान दिसतो. माथ्यावर तांदळा स्वरूपातील श्रीतुंगी देवीचं पश्चिमाभीमुख असलेलं छोटं मंदिर दिसतं. बालेकिल्ल्यावर कातळात खोदलेली आणि सध्या फुटलेल्या अवस्थेत पाण्याची टाकी दिसते. या टाकीला पाण्याचा नैसर्गिक स्तोत्र नसल्यानं पुर्वी या टाकीत पाणी कावडीनं भरलं जायचं. या बालेकिल्ल्यावर भगवा डौलानं फडकताना दिसतो.

बालेकिल्ल्यावरील पाण्याची टाकी (Tung Fort)

बालेकिल्ला आणि मागे डावीकडे दिसणारा 'किल्ले मोरगिरी' (Tung Fort)

                      बालेकिल्ला गाठण्यासाठी डोंगराची कातळ चढण चढावी लागते. सुरुवातीला पायथ्याच्या उभ्या कोरीव पायऱ्यांचा टप्पा, मधले तीन चार कातळ टप्पे आणि शेवटी हा बालेकिल्ल्याचा कातळ विशेषतः सांभाळून, सावध चढावा लागतो. त्यामुळेच कदाचित ४ सप्टेंबर १६५६ रोजी गुरुवारी या गडास शिवछत्रपतींनी 'कठीणगड' नांव दिलं असावं.

बालेकिल्ल्यावरून जलाशयापलीकडे दिसणारे लोहगड, विसापूर, भातराशी डोंगर (Tung Fort)

                      ३५०० फूट उत्तुंग उंची आणि चढाईत दमवणाऱ्या या 'तुंगी'वरून पश्चिमेला किल्ले मोरगिरी, उत्तर पूर्व दक्षिणेला वेढलेला पवना जलाशय, जलाशयाच्या पलीकडे उत्तरेला लोहगड, विसापूर, ईशान्येला भातराशीचा डोंगर तसेच आग्नेयेला किल्ले तिकोना असा आसमंत दिसतो. इथून संपूर्ण पवनमावळ नजरेच्या टप्प्यात येतो. 

बालेकिल्ल्यावरून दिसणारे तुंग किल्ल्याचे टप्पे आणि मागे किल्ले मोरगिरी (Tung Fort)






                     सध्या किल्ल्याच्या हनुमान दरवाजा व्यतिरिक्त पूर्ण किल्ला उध्वस्त दिसतो. किल्ल्यावरील पाण्याच्या टाकींची गाळापासून सुटका करणं गरजेचं आहे. सह्याद्री प्रतिष्ठान, मावळ विभाग लोक वर्गणीतून आणि श्रमदानातून किल्ल्याच्या संवर्धनासाठी सतत प्रयत्नशिल आहेत. असाच प्रयत्न सध्या २ एप्रिल २०२३ रोजी झाला होता..

                                 || श्री कृष्णार्पणमस्तू ||

येथे - जयवंत जाधव

ऑफबीट - 'किल्ले हडसर', ता. जुन्नर, जि. पुणे, महाराष्ट्र. Offbeat - 'Hadasar Fort', Junnar, Pune, Maharashtra.

                      सरासरी दोन हजार वर्षांपूर्वी सातवाहन काळात (इ.स. पूर्व २३० ते इ.स. २५०) कोकणपट्टीवर वसई पासून दक्षिणेकडे गोव्यापर्यंत ...