Wednesday, 12 April 2023

उत्तुंग उंचीचा - 'किल्ले तुंग' (कठीणगड), मावळ - Tung Fort (Kathingad Fort) Maharashtra

                      तापत्या उन्हातून 'बेडसे लेणी' आणि 'किल्ले तिकोना' असे दोन डोंगर चढ उतार केले होते. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी 'किल्ले तुंग' करायचा ठरलं. त्यासाठी 'पवना' जलाशयाला वळसा मारून 'तुंग' जवळ मुक्काम शोधायचा ठरलं. आणि तेच पुढे सोईस्कर होतं. दिवसभराची दमछाक आणि वाढणारा अंधार यामुळं फार शोधाशोध न करता, तिकोना पायथ्याला 'जवण' गावाच्या बाजूला तंबू (Tent) आणि जेवणाची सोय मिळाली.

                     दुसऱ्या दिवशी तुंगला स्वतः च्या वाहनानं प्रयाण केलं. तुंग ते तिकोना सरासरी २२ किमी पवने'काठानं सकाळचा प्रवास सुखद, निसर्गरम्य आहे. उजवीकडे जलाशय आणि पलीकडे तुंगीचा सुळका मोहून टाकतो. काल दिवसभरच्या दमछाकीमुळं हाच 'तुंग' आज उन्हातून कसोटी घेणार होता. लोणावळा डोंगर रांगेतील साडेतीन हजार फुटाचा सुळका दुप्पट तयारीनं गाठावा लागणार होता.

महादरवाजा (दिंडी दरवाजा)- किल्ले तुंग (Tung Fort)

                   तिकोनाकडून 'तुंग'ला यायचं झाल्यास पवणेला वळसा घेत घुसळखांब तिठ्ठ्यावर उजवं वळण घेऊन रस्ता तुंगवाडीकडे येतो.

                 लोणावळ्याहून 'तुंग'ला यायचं असल्यास 'आंबवणे' किंवा 'अँबे' व्हॅलीकडे जाणारं वाहन पकडून १५ कीमीवरच्या 'घुसळखांब' तिठ्यावर उतरावं. तिथून डावीकडे जाणाऱ्या ८ कीमी तुंगवाडी पर्यंत एसटीची सोय नगण्य असल्यानं वडाप, रिक्षा किंवा स्वतःच्या खाजगी वाहना शिवाय पर्याय नाही. पूणे, मुंबईकडून येणाऱ्या डोंगर भटक्यांना लोणावळा घुसळखांब मार्गे रस्ता जवळचा सोयीस्कर पडतो.

लोणावळा 'लायन्स पॉईंट'वरून - स्वयंभू शिवलिंग 'मोराडी' सुळका आणि मागे 'मृगगड' (Tung Fort)

                 आदल्या दिवशी बेडसे, तिकोना'साठी आमचा दीर्घ फेरा झाला होता. पण परतीचा प्रवास घुसळखांब, लोणावळा मार्गे निश्चित केला. या मागचं कारणही तसंच होतं. भटकंतीच्या दुसऱ्या दिवशी तुंग नंतर सह्याद्रीच्या लोणावळा डोंगर रांगेतील 'स्वयंभू शिवलिंग' म्हणून ओळखला जाणारा 'मोराडी' सुळका आज 'लायन्स पॉइंट'वरून बघता येणार होता. आधी डिसेंबरला आम्ही तो सहयाद्री खालून भेलिव'च्या 'मृगगडा'वरुन पहिला होता. निसर्गातील उंची, आकारानं पारणं फेडणारं हे भव्य 'शिवलिंग' तसेच त्या मागचा घाटाखालील 'मृगगड' घाट माथ्यावरून बघता येणार होता. आणि त्यासाठी आजची 'महाशिवरात्र' हा जुळून आलेला योग होता. 

पवना जलाशय आणि पलीकडे किल्ले तुंग (Tung Fort)

                       किल्ले तुंगचे भौगोलिक स्थान लक्षात घेता, उत्तर कोकणात साम्राज्य निर्माण करण्यासाठी तुंगच्या बाजूचे लोहगड, विसापूर महत्वाचे किल्ले आहेत. ते ताब्यात घेण्याआधी तुंग, तिकोनाचा विरोध होत असे. दरम्यान लोहगड, विसापुरला शस्त्र सज्ज होण्यास अवधी मिळे. कोकणात उतरणाऱ्या घाट वाटांवर लक्ष ठेवण्यास लोहगड, विसापूरनंतर बारा मावळांपैकी पवन मावळ आणि प्राचीन बोर घाटातून चालणाऱ्या व्यापारी वाहतुकीवर देखरेख करण्यासाठी तुंगचा उपयोग होत असे. 

                      किल्ले तुंगचा फारसा इतिहास सापडत नाही. १४८३ साली निजामशाहीचा सरदार मलिक अहमद यानं प्राचीन जुन्नर बाजारपेठ काबीज करून तुंग जवळील लोहगड ताब्यात घेतला. पुढे १४८५ साली त्यानं तुंग आणि तिकोना किल्ले निजामशाहीत आणले. त्यानंतर १६५७ साली छत्रपतींनी तुंग स्वराज्यात आणला. १६६० साली हा किल्ला आणि परिसराच्या संरक्षणाची जबाबदारी सरनोबत नेतोजींकडे होती. 

                   जून १६६५ च्या पुरंदर तहात तुंग मुघलांना देण्यात आला. १६७० साली शिवरायांनी तुंग पुन्हा स्वराज्यात आणला.

                         १८१८ साली तुंग इंग्रज कर्नल प्रॉथरनं ताब्यात घेतला आणि उध्वस्त केला.

पायथ्याचं मारुती मंदिर (Tung Fort)

                  'किल्ले तुंग'साठी तुंगवाडीत न जाता या वाडीच्या वरच्या बाजूस मुख्य रस्त्यालगत असलेल्या मारुतीच्या मंदिराजवळ मोफत पार्किंगची सोय आहे. बाजूला टपरीवर गरम कांदा भजी, पोहे मिळतात. रस्त्यालगत डावीकडे जंगलात आधी ही छोटी टपरी दिसते. या टपरीजवळून खड्या डोंगराकडे जाणारी पायवाट किल्ल्यावर जाते.

 

पायथ्याच्या स्मृतिशिळा, वीरगळी,सतीशिळा (Tung Fort)

                    गड पायथ्याला वाटेवर जुन्या स्मृतीशिळा, वीरगळी जतन करून, त्यामागे त्यांची माहिती सांगणारा फलक दिसतो. पायथ्याच्या या वाटेवर सध्या पायऱ्या बनवण्यासाठी पाथरवटांचं काम सुरू आहे. सुरुवातीच्या पाहिल्या टप्प्यावर सुरू केलेलं हे काम हळूहळू पायथ्यापर्यंत पोहोचलेलं दिसतं.

सुरुवातीच्या गुहेतील 'चपेटदान' मारुती (Tung Fort)

                     या सुरुवातीच्या टप्प्यावर डावीकडे छोट्या गुहेत कोरलेला मारुती आहे. मूर्तीच्या कमरेला खंजीर असून उजव्या हाताने चापट मारण्याच्या आवेगात असलेली ही मूर्ती 'चपेटदान' मारुती म्हणून ओळखली जाते. असाच चपेटदान मारुती किल्ले 'तिकोना' माचीवर दिसतो. तिकोनाची कातळ मूर्ती बरीच मोठी आणि उघड्यावर आहे. ही मूर्ती छोट्या कातळ गुहेत आहे.

                    छत्रपतींच्या ताब्यात असलेल्या किल्ल्यावर रक्षणासाठी शिबंदी तैनात असे. हे सैन्य ऊन पावसाची तमा न बाळगता पहारा देत. रात्री अपरात्री गडावर वावरणाऱ्या तथाकथित भुताखेतांपासून संरक्षणासाठी अंजनीपुत्र वीर मारुतीचा त्यांना मोठा आधार वाटे. गांव वेशींचं रक्षण करणारा हा देव आपलं रक्षण करेल अशी त्यांची गाढ श्रद्धा होती. त्यामुळं १६ - १७ व्या शतकात मराठ्यांचं प्राबल्य असलेल्या गड किल्ल्यांवर मारुतीची मंदिरं, देवळं, घुमट्या स्थापलेल्या दिसतात.

कोरीव उभ्या पायऱ्या Rock Patch - (Tung Fort)

                          या पुढचा टप्पा उभ्या कोरीव पायऱ्यांचा दिसतो. तीव्र चढाच्या या पायऱ्यांना आधार घेण्यासाठी दोर लावला आहे. दोर खडकाला घासून सध्या कमकुवत दिसतो. या टप्प्यानंतर नागमोडी पायवाटेची दगडांतून चढण दिसते. दमछाक करणाऱ्या या टप्प्याच्या मध्यावर तुंगवाडीतील एक भगिनी झाडाखाली लिंबूपाणी आणि ताक विकताना दिसते.  

तुंगवाडीतील भगिनी (Tung Fort)

दरिकाठावरून जाणारे तीव्र चढाचे टप्पे (Tung Fort)
तीव्र चढाचे टप्पे (Tung Fort)

                    अर्ध्या तासाच्या खड्या चढाईनंतर उजवीकडे कातळात खोदलेलं चौरसाकृती गुहेचं 'मेटं' दिसतं. मेट्याच्या गुहेतून समोर पवनमाळ, जलाशय आणि किल्ल्यावर येणाऱ्या पाय वाटेवर लक्ष ठेवता येतं. मेट्याच्या पहारेकऱ्याला पाण्यासाठी जागा सोडायला लागू नये म्हणून मेट्याच्याच डोक्यावर कातळात पाण्याची टाकी (पोडी) कोरली आहे. इतर किल्ल्यांच्या मानानं इथली ही एक वेगळी पद्धत दिसते. टाकीतील पाणीही चांगलं टिकाव धरून स्वच्छ दिसतं. त्याशिवाय वरच्या टाकीमुळं रणरणत्या उन्हात 'मेटं'ही थंडावा धरून आहे.

'मेटं' (Tung Fort)

मेट्यावरील पाण्याची कोरीव टाकी (Tung Fort)
तीव्र चढाचे टप्पे Rock Patch, Steep Slope - (Tung Fort) 
                   या मेट्या जवळून उजवीकडे डोंगर काठावरून पूर्वेकडे जाणारी पायवाट दिसते. एका प्रशस्त मोठ्या खांब टाकीजवळ ही वाट येते. वर डोंगराला एकूण चार दगडी खांबांचा आधार देऊन कातळाच्या पोटात खोल कोरलेली ही पाण्याची टाकी अवाढव्य असून पाणी एकदम स्वच्छ दिसतं. टाकीतील पाण्यामुळं इथं आजूबाजूला गारवा जाणवतो. इथपर्यंतच्या चढाईचा थकवा दूर करण्यासाठी या खांब टाकीजवळ जरूर विसावा घ्यावा. या टाकीतील पाणी पाईप द्वारे गडपायथ्याला पायऱ्यांच्या दुरुस्तीसाठी वापरताना दिसतं.
पूर्वेकडील प्रशस्त पाण्याची खांब टाकी (Tung Fort)


महादरवाजा आणि आतील बांधकाम साहित्य (Tung Fort)
                      पुन्हा मेट्याकडे मागे येऊन कातळ उजवीकडे ठेवत चढत जाणारी वाट किल्ल्याच्या पहिल्या महादरवाजात येते. या दरवाजाच्या चौकटीची कमान वगळता बाजूचं सर्व बांधकाम उध्वस्त केलेलं दिसतं. उरलेलं बांधकाम कोसळू नये म्हणून चौकट दोरखंडानं तात्पुरती बांधून ठेवलेली दिसते. दरवाजा ओलांडल्यास आतील बाजूस हा दरवाजा आणि बाजूच्या तटबंदीची डागडुगी करण्यासाठी आणलेलं बांधकाम साहित्य ठेवलेलं दिसतं.
पहिल्या माचीकडे जाणारी वाट (Tung Fort)


पहिली माची आणि एकदम मागे दिसणारा मोरगिरी किल्ला (Tung Fort)

                  इथून वाट गडाच्या उजव्या कातळावर चढून वर दिसणाऱ्या बुरुजात असलेल्या हनुमान दरवाज्याकडे जाते. तर दुसरी पायवाट समोर डोंगर धारेच्या अरुंद पायवाटेवरून किल्ल्याच्या पश्चिमेस असलेल्या लांबलचक पहिल्या माचीवर जाते. माचीची तटबंदी पूर्ण उध्वस्त आहे. आजूबाजूचं बांधकामही नामशेष केलेलं दिसतं. या माचीवरून समोर 'किल्ले मोरगिरी' दिसतो.

पहिल्या माचीवरून दिसणारी दुसरी माची आणि मागे दूरवर बालेकिल्ला (Tung Fort)

                   मागे वळून पाहिल्यास वर कातळावर किल्ल्याच्या दुसऱ्या माचीची तटबंदी दिसते. मागे दूरवर बालेकिल्ला दिसतो.

कातळावरील बुरुज हनुमान दरवाजा(Tung Fort)

बुरुजातील जिभी रचनेचा हनुमान दरवाजा (Tung Fort)

बुरुजातील हनुमान दरवाजा (Tung Fort)
पहारेकर्यांची देवडी (Tung Fort)
      

                     महादरवाजापासुन उजवीकडे चढून येणारी वाट कातळाच्या अवघड ठिकाणी निर्माण केलेल्या बुरुजातील 'हनुमान' दरवाजात येते. दोन बुरुज आणि त्यातील डाव्या बाजूस तटबंदी वाढवून आडाला असलेला हा दरवाजा आहे. या डावीकडील तटबंदीमुळं आतील हालचाली शत्रूला कळत नाहीत. कातळ चढून दोन्ही बुरुजातील मोकळ्या जागेत आल्यास, शत्रूवर वरून मारा करण्यासाठी समोर जंग्या ठेवलेल्या दिसतात. 'जिभी' रचनेचा हा दरवाजा लष्करी दृष्ट्या चांगलाच प्रभावी वाटतो. उजव्या बाजूच्या बुरुजात पवनपुत्र हनुमानाची छोटी शिळा बसविलेली दिसते. दरवाजा ओलांडून आत आल्यास डाव्या बाजूस पहारेकऱ्यासाठी देवडी दिसते. 

दुसऱ्या माचीवरील सपाटी - समोर बालेकिल्ला (Tung Fort)

                         या दरवाज्यातून वर आल्यास समोर प्रशस्त सपाटी दिसते. डावीकडे किल्ल्याची दुसरी माची दिसते. पहिल्या माचीवरून दिसणाऱ्या या माचीची तटबंदी नामशेष केली आहे. या माचीवर कमरे इतकं वाढलेलं गवत दिसतं. इथून दूरवर बालेकिल्ल्याचा कातळ सुळका दिसतो. तर हनुमान दरवाजातून उजवीकडे वळल्यास गवतात काही उध्वस्त सदरेचे आणि कचेरीचे अवशेष दिसतात. 

कचेरीचे अवशेष (Tung Fort)


उजव्या सोंडेची पुरातन श्री गणेश मूर्ती (Tung Fort)
पाण्याचं तळं, डावीकडे गणेश मंदिर (Tung Fort) 

               त्यापलीकडे किल्ल्यावरील सर्वात मोठं खोदीव पाण्याचं तळं दिसतं. तळ्यातील पाण्याची पातळी बऱ्यापैकी असून त्यावर गाळ साचलेला दिसतो. तळ्यात उतरण्यासाठी दगडी पायऱ्यांची व्यवस्था दिसते. या तळ्याकाठावर डाव्या बाजूस श्री गणेश मंदिर दिसतं. मंदिर साधं आणि छोटसं असलं तरी आतील उजव्या सोंडेची गणेश मूर्ती पुरातन असावी. किल्ल्याची ही दुसरी माची प्रशस्त मोठी दिसते. मंदिराला डावा वळसा घेऊन वाट बालेकिल्ल्याकडे जाते.  

बालेकिल्ल्याच्या कातळाखालील खांबटाकी (Tung Fort)

बालेकिल्ल्याखालील पूर्वेचं टोक, समोर किल्ले तिकोना (Tung Fort)
                      

               बालेकिल्ल्याचा उभा कातळ चढण्यापूर्वी वाट उजवीकडे वळून बालेकिल्ल्याच्या कातळाखाली कोरलेल्या खांब टाकीजवळ येते. या टाकीच्या पुढेच दुसरी टाकी दिसते. दोन्ही टाकीत पाणी असून त्यात गाळही भरलेला दिसतो. पुढे वाट बालेकिल्ल्याला वळसा मारून पूर्वेला येते आणि समोर कड्याच्या काठाजवळ संपते. ही वाट उजव्या बाजूला तीव्र घसरणीची असून वाटेवर आणि पुढच्या कड्याकाठावर गवत आणि झुडपं माजलेली दिसतात. किल्ल्याच्या या टोकाला डोंगर भटके फारसे फिरकत नसावेत. प्रामुख्यानं किल्ल्यावर सर्वत्र रानकेळी बऱ्याच दिसतात.

श्री तुंगी देवी (Tung Fort)
बालेकिल्ल्याची चढण (Tung Fort)

श्री तुंगी देवी मंदिर (Tung Fort)
    
बालेकिल्ल्यावरून दिसणारा किल्ले तिकोना (Tung Fort)

              पुन्हा मागे येऊन वाट उत्तरेकडून किल्ल्याचा खडा कातळ चढून बालेकिल्ल्यावर येते. वर किल्ल्याचा सर्वोच्च माथा अगदीच लहान दिसतो. माथ्यावर तांदळा स्वरूपातील श्रीतुंगी देवीचं पश्चिमाभीमुख असलेलं छोटं मंदिर दिसतं. बालेकिल्ल्यावर कातळात खोदलेली आणि सध्या फुटलेल्या अवस्थेत पाण्याची टाकी दिसते. या टाकीला पाण्याचा नैसर्गिक स्तोत्र नसल्यानं पुर्वी या टाकीत पाणी कावडीनं भरलं जायचं. या बालेकिल्ल्यावर भगवा डौलानं फडकताना दिसतो.

बालेकिल्ल्यावरील पाण्याची टाकी (Tung Fort)

बालेकिल्ला आणि मागे डावीकडे दिसणारा 'किल्ले मोरगिरी' (Tung Fort)

                      बालेकिल्ला गाठण्यासाठी डोंगराची कातळ चढण चढावी लागते. सुरुवातीला पायथ्याच्या उभ्या कोरीव पायऱ्यांचा टप्पा, मधले तीन चार कातळ टप्पे आणि शेवटी हा बालेकिल्ल्याचा कातळ विशेषतः सांभाळून, सावध चढावा लागतो. त्यामुळेच कदाचित ४ सप्टेंबर १६५६ रोजी गुरुवारी या गडास शिवछत्रपतींनी 'कठीणगड' नांव दिलं असावं.

बालेकिल्ल्यावरून जलाशयापलीकडे दिसणारे लोहगड, विसापूर, भातराशी डोंगर (Tung Fort)

                      ३५०० फूट उत्तुंग उंची आणि चढाईत दमवणाऱ्या या 'तुंगी'वरून पश्चिमेला किल्ले मोरगिरी, उत्तर पूर्व दक्षिणेला वेढलेला पवना जलाशय, जलाशयाच्या पलीकडे उत्तरेला लोहगड, विसापूर, ईशान्येला भातराशीचा डोंगर तसेच आग्नेयेला किल्ले तिकोना असा आसमंत दिसतो. इथून संपूर्ण पवनमावळ नजरेच्या टप्प्यात येतो. 

बालेकिल्ल्यावरून दिसणारे तुंग किल्ल्याचे टप्पे आणि मागे किल्ले मोरगिरी (Tung Fort)






                     सध्या किल्ल्याच्या हनुमान दरवाजा व्यतिरिक्त पूर्ण किल्ला उध्वस्त दिसतो. किल्ल्यावरील पाण्याच्या टाकींची गाळापासून सुटका करणं गरजेचं आहे. सह्याद्री प्रतिष्ठान, मावळ विभाग लोक वर्गणीतून आणि श्रमदानातून किल्ल्याच्या संवर्धनासाठी सतत प्रयत्नशिल आहेत. असाच प्रयत्न सध्या २ एप्रिल २०२३ रोजी झाला होता..

                                 || श्री कृष्णार्पणमस्तू ||

येथे - जयवंत जाधव

Thursday, 16 March 2023

गत वैभवाची साक्ष देणारा - 'वितंडगड' उर्फ 'किल्ले तिकोना', महाराष्ट्र. - Vitandgad Fort (Tikona Fort), Pune, Maharashtra.

                  कोकणातील वेगवेगळ्या बंदरावर उतरणारा माल प्राचीन काळी व्यापारी छोट्या छोट्या घाट वाटांनी देशावर आणि पुढे दक्षिणेकडे घेऊन जात. त्यावेळच्या त्या त्या साम्राज्यांनी व्यापाऱ्यांना सुरक्षा आणि विश्वास देऊन व्यापार वाढीस पूरक वातावरण निर्माण केलं. लेण्यांबरोबरच सह्याद्रीतील या दुर्गम  घाट वाटांवर नजर ठेवण्यासाठी तसेच त्यांचं रक्षण करण्यासाठी ठिकठिकाणी दुर्गांचीही निर्मिती केली.
                   पुण्याच्या 'मावळ' प्रांतातील (प्राचीन 'मामड' प्रदेश) 'बेडसे' लेण्यांच्या भेटीनंतर त्याच दिवशी पुणे जिल्ह्यातील सहयाद्रीच्या लोणावळा डोंगर रांगेत ३५०० फूट उंचीवरील 'किल्ले तिकोना' हे आमचं पुढील नियोजन होतं. 

किल्ले तिकोना - बालेकिल्ला पायऱ्या (Tikona Fort )

                      बेडसे लेण्यांच्या डोंगरावर दुपारचे एक वाजले. हा डोंगर उतरून पुढे 'किल्ले तिकोना' गाठायचा होताच. तासा दोन तासात ही लेणी बघून पुढे तिकोना चढू या विश्वासानं आम्ही, आधी येणारी बेडसे लेणी ठरवली होती. पण तिथल्या कर्मचाऱ्यांशी रंगलेली लेण्यांबद्दल चर्चा संपत नव्हती. आम्हाला कळत होतं पण वेळही जात होता आणि उन्हं तापत होती. एरवी फेब्रुवारी इतका तापदायक नसतो पण या शेवटच्या तिसऱ्या आठवड्यात अचानक उष्णता वाढली होती. पुढे लेण्यांच्या दक्षिणेकडील सरासरी १५ किमीचा प्रवास करून तापत्या उन्हातून डोंगर चढून तिकोनाही गाठायचा होता.
किल्ले तिकोना डोंगर (Tikona Fort)


तिकोना पायथा, पवनेच्या काठावरून दिसणारे विहिंगम - किल्ले तुंग आणि मोरगिरी (Tikona Fort)

                            पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य 'पवना जलाशया'च्या काठानं, वळणा वळणांचा घाट चढत दुपारी तीन वाजता 'तिकोनापेठ' गावची कमान ओलांडून पायथ्याला पोहोचलो. जाताना उजवीकडे अफाट पवनेच्या पलीकडे 'किल्ले तुंगी'चं उत्तुंग शिखर भुरळ घालतं. तर समोर त्रिकोणी आकाराच्या डोंगरावर 'किल्ले तिकोना' दिसतो. त्रिकोणी आकारामुळेच त्याला 'तिकोना' म्हटलं जातं. पुढे शिवरायांनी त्याचं नाव 'वितंडगड' असं ठेवलं. किल्ला उजवीकडे ठेवत डाव्या बाजूने सरासरी एक किमी गावापासून पुढे आल्यास गड पायथ्याला पोहोचतो.

                            गड पायथ्याला गावकरी शेतात टपऱ्या बांधून येण्याऱ्या डोंगर भटक्यांसाठी पार्किंग आणि पिठलं भाकरीची सोय करून देतात. त्यांच्या शेतात पिकणाऱ्या चवळी, पावटा, दबड्याच्या शेंगा काढून विकताना दिसतात. इथून उजवीकडे जंगलात घुसणारी पायवाट तिकोना किल्ल्यावर घेऊन जाते.

मांडवी डोंगर आणि तिकोनाची डोंगरसोंड (Tikona Fort)


तिकोना किल्ल्यावर जाणारी पायथ्याची पायवाट (Tikona Fort)
       

                      नागमोडी चढाची पायवाट अर्ध्या तासात सह्याद्रीच्या अजश्र 'मांडवी'चा डोंगर आणि 'तिकोना' किल्ल्याच्या डोंगराला जोडणाऱ्या सोंडेवर घेऊन येते. या सोंडेवरून उजवीकडे वळल्यास वाट किल्ल्यावर जाते. पायवाट मळलेली, वहिवाटीची असल्यानं अजिबात चुकण्याची शक्यता नाही. या टप्प्यावर मागे वळून पाहिल्यास ईशान्येला 'माळवंडी' जलाशय दिसतो.
समोर दिसणारा माळवंडी जलाशय (Tikona Fort)
किल्ल्याचं 'मेटं' (Tikona Fort)
                      पुढे वाट किल्ल्याच्या मेट्यावर येते. हे 'मेटं' म्हणजे गडावर जाण्यापूर्वी पहिल्यांदा तपासणी करण्याचं तसेच गडावर किंवा गडावरून खाली तातडीचा निरोप देण्याचे ठिकाण असायचं. गडावर हल्ला झाल्यास तो परतवून लावण्याचं पहिलं काम या मेट्यावर केलं जात असे. सध्या मेट्यावर पहारेकऱ्यांच्या चौकीचे अवशेष दिसतात. इथून उजवीकडे दूर डोंगरावर किल्ल्याच्या तटबंदीचा बुरुज दिसतो. मेट्यानंतर छोटी कातळ टेकडी ओलांडून आणि किल्ला उजवीकडे ठेवत डोंगर धारेवरून चढत वाट दहा मिनिटांत छोट्या कातळ खिंडीतून नागमोडी वळसा घेते. 
किल्ल्याचा पहिला दरवाजा (Tikona Fort)
तिकोना वाटेवरची कातळखिंड (Tikona Fort)

 

किल्ल्याचा पहिला दरवाजा (Tikona Fort)
                       खिंडीतून चढून वर आल्यास डाव्या बाजूस कातळात कोरलेला किल्ल्याचा पहिला दरवाजा दिसतो. सध्या त्याची  दुरुस्ती केल्याचं दिसतं तसेच त्याचे लाकडी दरवाजेही नवीन दिसतात. गुहेत कोरावी तशी दरवाजाच्या आतील डाव्या बाजूस पहारेकऱ्यांची मोठी देवडी दिसते.
उध्वस्त पायवाटेवरून दिसणारे वेताळ दरवाजाचे बुरुज (Tikona Fort)
पहिल्या दरवाजाच्या आतील उध्वस्त तटबंदीतून पायवाट 



उध्वस्त 'वेताळ दरवाजा' (Tikona Fort)
वेताळेश्वर मंदिर (Tikona Fort)

                      या दरवाज्यातून उजवं वळण घेऊन वाट दगडांतून चढत डाव्या बाजूला दिसणाऱ्या दोन बुरुजातून माचीवर येते. बुरुजात उध्वस्त दगडी चौकट आणि पडझड झालेलं आजूबाजूचं बांधकाम दिसतं. किल्ल्याच्या या दुसऱ्या दरवाजाला 'वेताळ' दरवाजा म्हणतात. दरवाज्याच्या डाव्या हाताला समोर 'वेताळेश्वर' मंदिर दिसतं. मंदिर पूर्णतः उध्वस्त असून त्याच्या चौथऱ्याचे शेवटचे अवशेष जमिनीवर दिसतात. डावीकडे मंदिरापुढे किल्ल्याची प्रशस्त लांब माची असून माचीच्या टोकाला तटबंदीचा बुरुज दिसतो.  बुरुजावरून समोर मांडवीचा डोंगर दिसतो. खाली डोंगरसोंडेवरून किल्ल्याकडे येताना मेट्यावरून समोर दिसणारा हा तटबंदीचा बुरुज दिसतो. बुरुजाखाली दरी आणि दुरुन किल्ल्यावर येणारी पायवाट दिसते.

'वेताळ दरवाजा' (Tikona Fort)

तिकोना बालेकिल्ला सुळका - Tikona Fort 

तळं आणि लेण्यातील तुळजाई मंदिर (Tikona Fort)


                      वेताळ दरवाजातून उजवीकडे वळल्यास समोर बालेकिल्ल्याचा सुळका नजरेस पडतो.  पुढे पायवाट किल्ल्यात जाताना दिसते. आत किल्ल्यात डाव्या बाजूला उध्वस्त वाडे दिसतात. उजव्या बाजूला डावीकडील कातळात कोरलेली 'पणवती' वध करताना मारुतीची भव्य मूर्ती दिसते. मूर्तीच्या डाव्या पायाखाली ही राक्षसीन दाबली असून उजव्या हाताने चापट मारण्याच्या आवेशात असलेल्या या मूर्तीला 'चपेटदान' मारुती म्हणतात.

चपेटदान' मारुती - Tikona Fort

 लेण्यातील तुळजाई मंदिर (Tikona Fort)

 तळं आणि लेण्याचे कोरीव खण (Tikona Fort)

                      मारुतीच्या मूर्ती पुढे डाव्या बाजूला कातळात खोदलेलं मोठं पाण्याचं तळ दिसतं. तळ्यावर कातळात खोदलेली लेणी आहेत. लेण्यात तांदळा स्वरूपातील श्री तुळजाई देवीचं मंदिर आणि बाजूला ध्यान साधनेसाठी खोदलेली खोली दिसते. मंदिर आणि इतर खोल्या त्याकाळी एकूण सहा खण्यांच्या असाव्यात, पण आता त्यांची पडझड झालेली दिसते. तळं पाण्यानं काटोकाठ भरलेलं असून स्वच्छ दिसतं. तळ्या काठावर पाणी उपसण्यासाठी इंजिन दिसतं. गडाच्या डागडुगीसाठी या पाण्याचा उपयोग होत असावा.

तळ्यासमोरील वाड्यांचे अवशेष (Tikona Fort)

                      तळं आणि लेण्यांच्या गुहेसमोर उध्वस्त वाड्यांचे अवशेषही दिसतात. कदाचित गडावरील ती 'सदर' असावी. सदरेच्या बाजूला 'रामाची गादी' असा फलक दिसतो. जेव्हा गडावर राबता होता त्यावेळी या सदरेवर रामाच्या पादुका ठेवून राज्यकारभार चालविला जात असे. श्रावण महिना, दसरा, दिवाळी, रामनवमी, हनुमान जयंती आणि भक्ती पारायण असे उत्सव त्यावेळी इथे उत्साहाने पार पडत. त्याबद्दलचा माहिती फलक बाजूला दिसतो.

रोपला जोडलेलं इंजिन (Tikona Fort)

                      या वाड्यांच्या मागे तटबंदीवर गडाच्या दुरुस्तीसाठी रोपच्या सहाय्याने सामान वर आणण्यासाठी बसवलेलं इंजिन दिसतं.

                      पुढे डाव्या बाजुला गडाच्या बांधकामासाठी वापरलेला चुना मळण्याचा घाणा लक्ष वेधून घेतो. 
 

चुन्याचा घाणा (Tikona Fort)

तिसऱ्या महादरवाजासमोरील तुटलेल्या पायऱ्या (Tikona Fort)

                      घाण्याच्या पुढे डावीकडे बालेकिल्ल्यावर जाणाऱ्या पायऱ्या दिसतात. तर इथून उजवीकडे दहा मिनिटांची एक सरळ पायवाट दाट झाडीतून पुढे जाऊन गडाखालच्या तटबंदीकडे उतरते. या तटबंदीत गडाचा तिसरा महादरवाजा आणि बाजूलाच एक चोरवाट खाली उतरताना दिसते. महादरवाजा तटबंदीतील दोन्ही बुरुजात निर्माण केला असून, इथे गडाखाली उतरणाऱ्या पायऱ्या उध्वस्त, धोकादायक आहेत.

तिसरा महादरवाजा (Tikona Fort)

चोर दरवाजा - तटबंदीच्या आतून (Tikona Fort)

चोर दरवाजा - तटबंदीच्या बाहेरून (Tikona Fort)

तटबंदीबाहेरील खांब टाकी  (Tikona Fort)
बालेकिल्ल्यावर जाणाऱ्या पायऱ्या (Tikona Fort)

                     महादरवाजातून खाली खोल दरी, तिकोनापेठ गांव, पवना जलाशय आणि समोर माळवंडी जलाशय दिसतो. महादरवाज्याच्या आत तटबंदीलगत उध्वस्त घरांचे काही जोते दिसतात. त्याच्या अलीकडेच बाजूला चोर दरवाजा दिसतो. या दरवाज्यातून  किल्ल्याबाहेर आल्यास उजवीकडे तटबंदी खाली कातळात एक प्रशस्त मोठी पाण्याची खांब टाकी खोदलेली दिसते. या टाकीतील पाण्याचा नित्य उपसा होत असावा असं त्यात सोडलेल्या पाईपवरून लक्षात येतं. गडाच्या या टोकाला भटके फारसे फिरकत नसावेत असं पाऊल वाटेवर वाढलेल्या गवतावरून लक्षात येतं. या पाऊल वाटेवर सुंदर रीतीनं मुंग्यांनी निर्माण केलेली वारूळं दिसतात.

मोहक बांधणीचं मुंग्यांचं वारूळ (Tikona Fort)


गगनाला भिडणारे बालेकिल्ल्याचे बुरुज (Tikona Fort)
बालेकिल्ल्याच्या आत सुरुवातीची उजवीकडील टाकी आणि वरती खांब लेणं
बालेकिल्ल्याच्या उजवीकडील टाकी आणि खांब लेण्यांसमोरील टेहळणी माची - किल्ले तिकोना

बालेकिल्ल्याच्या उभ्या सरळसोट कोरलेल्या पायऱ्या (Tikona Fort)
                      तर पुन्हा चुन्याच्या घाण्याकडे मागे येऊन डावीकडे वळून चढणाऱ्या पायऱ्या बालेकिल्ल्याच्या प्रचंड उंच बुरुजात बनवले ल्या दरवाज्यात येतात. दरवाज्याच्या आत उजव्या बाजूला खडकात कोरलेली मोठी पाण्याची टाकी दिसते. टाकीच्या वर कातळ खांबांचा आधार घेतलेल्या अधांतरी गुहेत लेण्यांचे खण (खोल्या) दिसतात. कदाचित पूर्वी या खोल्यांमध्ये धान्य साठा केला जात असावा. 
                        या टाकीच्या समोर पायऱ्यांच्या पलीकडे मध्यावर अवघड जागी टेहळणीची छोटी माची दिसते. बालेकिल्ल्यावर ८० अंशात उभ्या चढानं जाणाऱ्या गुडघाभर उंचीच्या ४० पायऱ्या आहेत. जेमतेम एक पाय रुंदीच्या पायऱ्या दमछाक करतातच पण काळजी घेऊन चढाव्या लागतात. या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला सुरक्षेसाठी कातळात बोल्ट ठोकून त्यांना दोर लावले आहेत. बाहेरून आक्रमण झालंच तर या अवघड जागी शत्रूला नेस्तनाबूत करण्यासाठी बुरुजात पल्लेदार जंग्या ठेवलेल्या दिसतात.
बालेकिल्ल्यावर घेऊन जाणारा दरवाजा - किल्ले तिकोना


बालेकिल्ला दरवाजा (आतून) - किल्ले तिकोना

बालेकिल्ल्याची बुरुज माची  (Tikona Fort)
                       पायऱ्या नंतर दोन्ही बुरुजात बसवलेल्या दगडी कोरीव कमानीतून बालेकिल्ल्यावर प्रवेश होतो. या दाराच्या चौकटीवर उजव्या बाजूला सुंदर उठावदार कमळ कोरलेलं दिसतं. डाव्या बाजूचं कमळ ढासळलेलं दिसतं. चौकटीवरील बांधकामात 'चऱ्यां' ठेवलेल्या दिसतात.

बालेकिल्ल्याच्या कातळात कोरलेली टाकी आणि लेणं 
बालेकिल्ल्याच्या कातळात कोरलेली टाकी आणि लेणं (Tikona Fort) 

                       दरवाजा ओलांडून वर आल्यास समोर बालेकिल्ल्याच्या तटबंदीत प्रशस्त बुरुजाची माची दिसते. बालेकिल्ल्याच्या दरवाजा जवळच उजवीकडे १८० अंशात मागे वळून कातळ सुळक्याच्या काठावरून जाणाऱ्या कोरीव पायऱ्या दिसतात. या बालेकिल्ल्याच्या मुख्य कातळ सुळक्यात कोरलेल्या पाण्याच्या टाकीपर्यंत पोहोचतात. ही टाकी प्रशस्त मोठी असून टाकीच्या बाजूला लेण्यासारखी गुहा कोरलेली दिसते. बालेकिल्ल्याच्या सुरुवातीच्या पायऱ्या चढताना दिसणारी उजवीकडील टाकी आणि ही टाकी एकमेकींच्या बरोबर वर खाली कमीत कमी जागेत अगदी कल्पकतेनं घडवलेल्या दिसतात.

माचीवरून बालेकिल्ल्यावर जाणाऱ्या पायऱ्या (Tikona Fort)


पायऱ्या आणि डावीकडे खोल दरी - Tikona Fort
श्री वितंडेश्वर मंदिर आणि भूमिगत पाण्याच्या टाक्या (Tikona Fort)

                       या माचीवरून आडबाजूला उजवीकडे मुख्य बालेकिल्ल्यावर वळून जाणाऱ्या दगडात बांधलेल्या पायऱ्या दिसतात. डावीकडे खोल दरी दिसते. पायऱ्या चढून वर आल्यास उजवीकडे पुरातन 'श्री वितंडेश्वर' महादेव मंदिर दिसतं. मंदिराखाली पाण्याची मोठी खांब टाकी दिसते. या खांब टाकीवर अनोख्या पद्धतीनं हे मंदिर उभारलेले दिसतं. खांब टाकीच्या डाव्या बाजूला आणखी दोन भूमिगत टाक्या कातळात खोदलेल्या दिसतात. मंदिरासमोर टाकींच्या पुढे शिवपिंडी आणि भग्न नंदी दिसतो. तर टाकीवरील मंदिराच्या दारासमोर दुसरा सुस्थितीतला सध्या बसवलेला नंदी दिसतो. मंदिर जुनं असलं तरी छतावर सध्या स्लॅब घातलेलं दिसतं.

              आत मंदिरात सुरेख मोठी शिवपिंडी स्थापित असून, पिंडीभोवतीही दगडी 'अंकन' दिसतं. पिंडीवर पितळेच्या पाच फण्यांच्या नागदेवतेनं सावली धरली आहे.

खांब टाकीवरील श्री वितंडेश्वर मंदिर (Tikona Fort)
श्री वितंडेश्वर महादेव  (Tikona Fort)

 

                  वितंडेश्वर मंदिराच्या मागे बालेकिल्ल्याची सर्वोच्च टेकडी दिसते. टेकडीवर जाण्यासाठी मंदिराला उजवा वळसा मारून उत्तरेकडे गेल्यास समोर ध्वजकाठीचा बुरुज दिसतो. बुरुजावर फडकणारा मोठा भगवा लक्ष वेधून घेतो. या बुरुजाजवळून बालेकिल्ल्याच्या माथ्यावर चढणारी वाट दिसते. किल्ल्याच्या हा सर्वोच्च माथा आकारानं लहान असून त्यावर उध्वस्त बांधकामाचे जोते दिसतात.
बालेकिल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावरील उध्वस्त जोते (Tikona Fort)

तिकोना बालेकिल्ला - ध्वजकाठी बुरुज  (Tikona Fort)

ध्वजकाठी बुरुज, पुढे पवना धरण आणि मावळ परिसर   (Tikona Fort)

                  ३८०० फूट उंचीवरील किल्ल्याच्या या सर्वोच्च माथ्यावरून वायव्येला पवनेचा विस्तृत जलाशय दिसतो. जलाशयाच्या मागे वर उगवलेला किल्ले तुंगीचा उत्तुंग टोकदार सुळका , तुंगच्या मागे डावीकडे किल्ले मोरगिरी, बाजूला किल्ले लोहगड, लोहगडचा विंचूकडा, त्याच्याच बाजूला उत्तरेला किल्ले विसापूर, भातराशीचा डोंगर आणि आजूबाजूची पर्वत शिखरे एका नजरेत येतात. ईशान्येला माळवंडी जलाशय आणि संपूर्ण मावळ परिसरावर लक्ष ठेवता येतं. तर दक्षिणेला सह्याद्रीतील मांडवीचा अजस्त्र डोंगर आणि डोंगराच्या उजवीकडे 'हडशी' तलाव दिसतो. हा गडमाथा कलावंतीण शिखराची आठवण करून देतो.

बालेकिल्ल्यावरून दिसणारा हडशी तलाव (Tikona Fort)

                       बुरुजाजवळून बालेकिल्ल्याच्या टेकडीला पुन्हा डावा वळसा मारून पुढे आल्यास समोर किल्ल्याच्या सर्वोच्च उंचीवरील बुरुज दिसतो. या बुरुजावर डावीकडे कातळात खोदलेला एक प्रशस्त पाण्याचा तलाव दिसतो. तलावात उतरण्यासाठी दगडी पायऱ्या दिसतात. फेब्रुवारी शेवटच्या आठवड्यातही या तलावातील पाण्याची पातळी बऱ्यापैकी दिसते. 

                        श्री सुजित मोहोळ सध्या तिकोनाचे गडपाल आहेत. इथे येण्यापूर्वी 'बेडसे' लेण्यांत असतानाच आम्ही मोबाइलद्वारे त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. पण बेडसे डोंगरावर लेण्यांच्या चर्चेत आणि पुढील प्रवासात वेळ गेला. त्या संध्याकाळी तिकोनावर दुसऱ्या दिवशीच्या महाशिवरात्री निमित्त श्रीवितंडेश्र्वर महादेव मंदिरातून प्रज्वलित ज्योती आजूबाजूच्या गावात जायच्या असल्यानं, पायथ्याला तिकोनाचे गडपाल म्हणून त्यांच्यावर जबाबदारी  होती. आमची वाट बघून ते गडपायथ्याला थांबले होते. आम्ही दिलगिरी व्यक्त करून त्यांचा अधिक वेळ घेतला नाही. त्यांनी तिकोना पायथ्याला त्यांच्या 'तिकोना हॉलिडे होम आणि कॅम्पिंग' येथे रात्री मुक्काम करण्यास आम्हाला आमंत्रण दिलं. दुसऱ्या दिवशी सकाळी 'किल्ले तुंगी' नियोजित असल्यानं आम्ही त्यांना नम्र नकार दिला. शक्य तितकं पवनेला वळसा मारून पलिकडील किल्ले तुंगी जवळ करायचा होता.


सर्वोच्च माथ्यावरून दिसणारे वितंडेश्वर मंदिर आणि समोर मांडवी डोंगर (Tikona Fort)
बालेकिल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावरून दिसणारे किल्ले आणि पवनमाळ (Tikona Fort)
                      मुंबई, ठाणे शहरांपासून सरासरी सव्वाशे किमी आणि पुण्यातून ६० किमी वर सह्याद्रीच्या लोणावळा डोंगर रांगेतील लोणावळ्याच्या अग्नेयेस असणारा हा किल्ला ट्रेकर्सना नेहमीच भुरळ घालतो.

                        तिकोना'चा फारसा इतिहास सापडत नाही. हा किल्ला आजूबाजूला कोरलेल्या लेण्यांच्या कालखंडावरून इसवीसन पूर्व पहिल्या शतकानंतर कधीतरी लेणी आणि दुर्गम व्यापारी घाट रस्त्यांच्या रक्षणासाठीच निर्माण केला असावा. 

                        १४८३ साली निजामशाहीचा सरदार मलिक अहमद यानं जुन्नरची प्राचीन बाजारपेठ काबीज करून तिकोना जवळील लोहगड ताब्यात घेतला. पुढे १४८५ साली त्यानं तुंग आणि तिकोना किल्लेही निजामशाहीत आणले. त्यानंतर १६५७ साली छत्रपतींनी बराच कोकण प्रांत जिंकून तिकोना स्वराज्यात आणला आणि त्याचं 'वितंडगड' असं नामकरण केलं. १६६० साली हा किल्ला आणि परिसराच्या संरक्षणाची जबाबदारी सरनोबत नेतोजींवर सोपवली होती.

बालेकिल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावरील बुरुज, समोर मांडवी डोंगर आणि पावनमाळ (Tikona Fort)

बालेकिल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावरील तलाव (Tikona Fort)

                        जून १६६५ च्या पुरंदर तहात तिकोना मुघलांना देण्यात आला. १६७० साली शिवरायांनी तिकोना पुन्हा स्वराज्यात आणला. १६८२ साली संभाजीराजे आणि औरंगजेब पुत्र अकबरची तिकोनावर ऐतिहासिक भेट झाली होती.

                         १८१८ साली तिकोना इंग्रज कर्नल प्रॉथरच्या ताब्यात गेला आणि तिकोनाची वाताहत झाली.

बालेकिल्ल्याच्या दमवणाऱ्या धोकादायक कोरीव पायऱ्या - किल्ले तिकोना (Tikona Fort)









मांडवी डोंगर आणि हडशी तलाव - किल्ले तिकोना (Tikona Fort)

                  'शिवदुर्ग संवर्धन' ही संस्था गेली पंधरा वर्षांपासून आणि अलीकडील सहा सात वर्षांपासून 'गडभटकंती संस्था' लोक वर्गणीतून उध्वस्त तिकोनाच्या दुरुस्तीचा प्रयत्न करताना दिसतात.
                         आज शिल्लक राहिलेल्या बालेकिल्ल्याच्या घडीव दगडी चौकटी, त्याचे अवघड जागचे आकाशाला भिडणारे बुरुज, बालेकिल्ल्याच्या उभ्या कोरीव पायऱ्या, तिथली कातळात कोरलेली खांब लेणी आणि त्याखाली पाण्याच्या टाक्या तसेच खांब टाकीवरील वितंडेश्वर मंदिर हे बऱ्यापैकी आहेत. यावरून त्यावेळच्या साम्राज्यांनी व्यापारी घाट वाटांच्या सुरक्षेबरोबर, किल्ल्यांच्या सुरक्षेचाही दीर्घ विचार केलेला दिसतो. त्या दृष्टीनं केलेल्या या गिरिदुर्गाच्या स्थापत्य शास्त्राबरोबरच त्यांच्या अजोड कल्पकतेचीही खात्री पटते..
                                                      
                                                     || श्री कृष्णार्पणमस्तू ||
येथे - जयवंत जाधव

'किल्ले विसापूर' - मावळ, पुणे, महाराष्ट्र. Visapur Fort, Pune, Maharashtra.

                           उन्हाळ्यात शुष्क झालेल्या धरतीला पावसाने तजेला दिल्यानंतर सह्याद्रीतल्या दऱ्या डोंगरांचे रूप विलोभनीय असेच दिसते....